द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण

Submitted by बावरा मन on 20 December, 2012 - 03:20

सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्‍या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्‍या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्‍या एका परिवाराभोवती फिरते. या परिवारात न्यूक्लियर प्लँट मध्ये कामावर जाणारा व ५५ एवढा बुध्यांक असणारा होमर सिंप्सन, त्याची आदर्श पत्नी मार्ज सिंप्सन, अतिशय खोडकर पोरगा बार्ट सिंप्सन , स्कॉलर आणि नैतिकता जागृत असणारी मुलगी लिसा सिंप्सन यांचा समावेश आहे..ही सिंपसन्स फॅमिली आणि त्याचे सदस्य अमेरिकन समाजाचे मुर्तिमन्त प्रतीक आहेत. होमर हा प्रचंड आत्म् केन्द्रित , कामावरून घरी ना जाता बार मध्ये घुसणारा , प्रचंड इग्नोरेंट आणि टिपिकल अमेरिकन नागरिकाप्रमाणे बाकी जगाबद्दल पूर्ण बेफिकीर ( इतका बेफिकीर की याला भारत हा रेड इंडियन लोकांचा देश वाटत असतो.) सिंपसन्स चा निर्माता मॅट ग्रोएनिंग च्या मते होमर चा बुधयांक ५५-६० च्या दरम्यान आहे. आता बोला! त्याची पत्नी मार्ज म्हणजे मुर्तिमन्त संसारी स्त्री. होमर कसाही असला तरी तिचे होमर वर निरातिशय प्रेम आहे. या जगवेगळ्यापरिवारला एकत्र ठेवणारा बॅकबोन म्हणजे मार्ज. बार्ट हा अतिशय खोडकर पोरगा. त्याच्या खोड्याना शाळेत आणि घरी सगळेच वैतागले आहेत. ह्याच्या खोडकर वृत्तीमुळे तो प्रेक्षकांमध्ये जाम पॉप्युलर झाला. इतका की अमेरिकन समाज विश्लेषकांच्या मते बार्ट हा हा अमेरिकन मुलांसाठी बॅड इन्फ्लुयेन्स आहे. त्याची लोकप्रियता आणि पर्यायाने बॅड इन्फ्लुयेन्स चा वाद एवढा वाढला की तत्कालीक अमेरिकन प्रेसिडेण्ट जॉर्ज बुश ला पण 'bartamania' ची दाखल घ्यावी लागली. लिसा ही घरातली स्कॉलर. तिने वयाच्या आठव्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारला असून शाकाहार अंगिकारला आहे.जेंव्हा सिंपसन्स परिवार किंवा स्प्रिंगफील्ड एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा लिसाचा आवाज हा सद्सद विवेका चा आवाज असतो. एकूण लिसा ही समाजातील कटू सत्य सांगणार्‍या 'intellectual minority' ची प्रतिनिधी.

सिंपसन्स हा काही निव्वळ अर्धा तास मनोरंजन करणारा शो नाही. त्यामध्ये अमेरिकन समाज व त्याच्या परीघात येणार्‍या सर्व गोष्टींवर व घटनांवर एक झंझणित व खुसखुशीत कॉमेंट असते. वेळेप्रसंगी अफगाणिस्तान व इराक युध्ावर पण बोचरी टीका असते. अनेक एपिसोड्स बघीतल्यावर माझे मत असे आहे की सिंपसन्स चे निर्माते प्रो-डेमोक्रॅट असावेत. कारण रिपब्लिकन पक्षावर व त्यांच्या प्रतिगामी साम्राज्यवादी धोरणांवर अनेकवेळा सिंपसन्स मधले पात्र टीका करत असतात. सरकारची मुखपत्र म्हणून काम करणार्‍या मीडीया वर मजेदार पण बोचरी टीका असते.सिंपसन्स मधील इतर पात्र प्रिन्सिपल स्किनर , करोडपती बर्न्स, बार मालक मो, सिंपसन्स चा बाप आणि इतर सपोर्टिंग पात्र पण अफलातून रेखाट्ले आहेत्. ही पात्र रंगवताना सरसकट generalizations चा आधार घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ बर्न्स हा अतिश्रीमंत माणूस स्प्रिंगफील्ड मध्ये न्यूक्लियर प्लँट चालवत असतो. हा अतिशय एककल्ली , रक़तपिपासू, व अन्यायी दाखवला आहे. अर्थातच विनोदी ढन्गात. कम्यूनिस्ट ज्या प्रकारे भांडवलदाराला पाहतात ते सर्व गुण या बर्न्स मध्ये एकवट्लेले आहेत. होमर सिंप्सन हे मुख्य पात्र अमेरिकन माणसाकडे उर्वरित जग कसे पाहते त्या stereotypes वर आधारलेले आहे. आज उर्वरित जगात काय प्रतिमा आहे अमेरिकन पुरुषाची? आत्म् केंद्रित , पराकोटीचा स्वार्थी, व उर्वरित जगाबद्दल प्रचंड ignorant. होमर अगदी तसा आहे. पण होमर हा बाकी कसाही असला तरी त्याचे स्वतहाच्या परिवारावर खूप प्रेम आहे. स्वताहाच्या बायकोसाठी व पोरांसाठी तो कुठलाही त्याग करायला तयार असतो. आज भारतात एकत्रित कुटुंब व्यवस्था मोडीत निघत आहे म्हणून आरडाओरडा चालू आहे.पण अमेरिकेत तर कुटुंब संस्थाच मोडीत निघाली आहे. अशावेळेस एकमेकांशी प्रचंड भांडून पण अनेक वादळाना तोंड देऊन एकत्र राहणार्‍या सिंपसन्स च्या लोकप्रियतेची बीजे रोवली गेली आहेत ती इथे. या एकत्र राहणार्‍या not so perfect परिवाराचे अमेरिकेला अप्रूप आहे ते यामुळे.

भारताच्या दृष्टीने बघायचे झाले तर त्यात भारतीय लोक व एकूण च भारताचे असणारे पॉज़िटिव चित्रण. अपु हे भारतीय पात्र होमर चा चांगला मित्र आहे. सध्या एकूण च अमेरिकन मनोरंजन विश्वात भारतीय पात्राना सुगीचे दिवस आहेत. आर्चीस मध्ये पण भारतीय पात्र आहे. द बिग बॅंग थियरी या अजुन एका भन्नाट शो मध्ये पण राजेश हे अजुन एक अतिशय लोकप्रिय पात्र आहे. एकूण च अमेरिकेत राहणार्‍या भारतीय लोकांबद्दल तिथे चांगला विचार केला जातो याचेच हे निदर्शक. इस्लामिक नागरिक किंवा मेक्सिकन माइग्रएंट्स च्या पार्श्वभूमीवर हे चांगले चित्र अजुन उठून दिसते.

जाता जाता या शो चा भारतीय सीरियल्स शी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा चे अनेक संदर्भ हे द सिंपसन्स वरुन घेतले आहेत. पण तारक मेहता म्हणजे कसे सगळे गोड गोड. अनेक सामाजिक मुद्द्यना वर वर स्पर्श करून सोडून दिल्या जाते तारक मेहता मध्ये. कधीही कुठले राजकीय किंवा सामाजिक भाष्य अशा सेरियलज मध्ये होताना दिसत नाही. आपल्या कडे पण एका सिंप्सन ची गरज आहे असे वाटते. अर्थातच नको तिथे संवेदनशीलता दाखवणार आपले राज्य व देशात ही सीरियल्स बंद पाडली जातील हा भाग अलाहिदा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ही माहिती करून दिल्याबद्दल. कधीच , कुठेच ह्या कार्यक्रमाबद्दल आधी वाचले, ऐकले, पाहिले नाही. फ्रेंड्स आवडीने पाहिले जात असे. Happy

बावरा मन,

या लेखात थोडा वेगळा दृष्टीकोन मांडला आहे. मी स्वत: सिम्पसनचा एकही भाग पाहिलेला नाहीये. त्यामुळे वरील दृष्टीकोनाबद्दल मला काहीच मत प्रदर्शित करता येत नाही. केवळ माहीती असावी म्हणून उधृत केला आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.