सकाळी उठले तीच एका मंजुळ आवाजाने. तसा नेहमी येत असे, पण आज जरा जास्तच जवळून अन खणखणीत. वृटिव्हSS, वृटिव्हSS, वृटिव्हSS
अन बाहेर हॉलमध्ये आले तर चक्क टेरेसच्या बांधावर दोन बुलबुल साद घालत बसले होते. आधी टेरेसवरच्या बागेत सगळ्या झाडांची पाहणी त्यांनी केली.
मग उडून गेले. साधारण अर्ध्या तासाने पुन्हा साद आली. वृटिव्हSS मी स्वयंपाकघरात काम करत होते, तर सुळ्ळ्कन बुलबुल हॉलमध्येच दाखल झाला.
मस्त पंख्यावर बसून पाहणी करू लागला. मग थोडा पुढे येऊन झुंबरावर त्याने दोन घिरट्या घातल्या अन मग पुन्हा स्वारी बाहेर गेली.
१० मिनिटातच दोघे जोडीने आले. आता तर त्यांना कंठच फुटला. लालबुडी चक्क झुंबरावर जाऊन बसली.
ती झुंबरावर अन तो पंख्यावर अशी काही चर्चा झाली. मग लालबुडी ग्लाईड घेऊन टेरेसच्या बांधावर टेकली. लालबुड्या तिच्या पाठोपाठ कुंदाच्या फांदीवर विसावला. पुन्हा त्यांची चर्चा झाली. अन मग ती भुर्र दिशी उडून गेली. अन तो कुंडीतल्या झाडंमध्ये खुडबुड करू लागला.
एव्हाना माझा लेक डोळे चोळत उठला. " कसले आवाज करत्येस गं ? " माझ्या गोड गळ्याबद्दल त्याचा असा गोड गैरसमज ऐकून मला भरून आलं " आज सुट्टी होती, चांगलं झोपणार होतो, तर सकाळपासून काय गं किरकिर करतेय्स? " झालं माझं विमान धाडदिशी जमिनीवर आपटलं. बहुदा या सगळ्याचा परिणाम लालबुड्यावरही झाला, अन तो नारज होऊन निघून गेला.
मी लेकावर दुहेरी चिडले. एकतर माझा भ्रमनिरास केला, वर लालबुड्याला घाबरवले. मी रागारागाने काही बोलणार इतक्यात महाशय परत भर्रकन आले अन झुंबरावर येऊन बसले. अन चोचीत लांब वाळके गवत. ते बघताच मी सारे विसरले. "असे बघ बघ, बुलबुल घरटं करतोय बहुदा." " हॅ, घरटं बिरटं काही नाही. मागे तू मारे दोन बी एच के चा फ्लॅटही देऊ केला होतास की. कोणी ढुंकून बघितलं नाही त्या कडे. " फिदी फिदी हसत लेक सुनाऊन गेला. मग मी गप्पच बसले. काय करणार, त्याचं खरच होतं की. इथे अनेकांनी सांगितलं होतं, पण तरीही मला फार आशा होती, कोणीतरी भाडेकरू येईल म्हणून. पण छे! अन माझ्या बरोब्बर दुख-या नसे वर दाब देण्याचे कौशल्य लेकाने बापाकडून वारसा म्हणून मिळवलं होतं ते देऊन लेक आपलं आवरायला निघून गेला.
आमच्या प्रेमालापाने नवराही उठला. त्याने फक्त एक कटाक्ष टाकला. खांदे उडवले, बस तेव्हढे पुरले. मग हे सारे आपल्या घरचे नाहीच असा ठाम विचार करून त्याने विषय संपवला, न बोलताच.
मग मीही नेहमीची कामे आवरायला घेतली. एक कान अन एक नजर लालबुड्यावर होतीच. तेव्हढ्यात कामवाली आली. केर काढताना तिने गवगवा केलाच. "ताई, घरटं होऊ देऊ नका, लई ताप असतो त्याचा. एकतर भारी कचरा करतात. तुम्ही काही काढणार नाही त्ये. थांबा मीच काढते." तीने केरसुणी सरसावलीच. मी "अगं थांब थांब. नको त्यांना त्रास देऊ" म्हणे पर्यंत बुलबुल आलाच. "ताई अवो, असं काय करता. नका असं करू. नंतर तुम्हीच वाईट वाटून घेत बसाल, एखादं अंड फुटलं, पिल्लं उडून गेली की..." "असू दे गं . मुकी पाखरं ती. मी नाही वाईट वाटून घेणार. राहू दे काही दिवस. " " बरं राहू दे तर राहू दे. पण नंतर तुम्हीच काळजी करात बसाल बरं... "
झालं, प्रत्येकाने माझ्या आनंदावर पाणी घालणे, विरजण घालणे अन कुंपण घालण्याचे काम केले. अन सगळे आपापल्या कामांना भिडले. लेक नवरा बाहेर पडले. कामवालीही सगळे आवरून गेली. जाताना झुंबराकडे नाराज्-नाराज नजर टाकायला कोण्णी कोण्णी विसरले नाही.
कधी नव्हे ती मी चक्क आग्रही राहिले. अन मग माझी दुपार सुरू झाली. सहसा मी आमच्या टेरेसच्या दाराजवळच्या खुर्चीवर बसून वाचन, लिखाण, टिव्ही बघणे वा विणकाम करते. आजही यशीच बसायला गेले. पण आज उन जरा जास्तच होतं, म्हणून तिथला पंखा लावायला हात पुढे केला तेव्हढ्यात साद ऐकू आली, वृटिव्हSS
अर्रेच्चा, विसरलेच मी, आज नवीन पाहुणा आहे नाही का घरी. अन त्याच्या जाण्यायेण्याच्या वाटेवरचा पंखा लावून मोठाच वेडेपणा करणार होते मी. मग मी पंखा न लावताच माझ्या खुर्चीवर बसले. आज एक नवीन पुस्तक हाती आले होते. काही पाने वाचून होताहेत तोच जवळून भुर्रकन बुलबुल उडाला. आता त्याच्या फे-या वाढल्या. अन मला अजिबात न घाबरता त्याने काम चालू ठेवले. मधूनच तीही येऊन बघून जात होती. थोड्यावेळाने सहज टिपॉयकडे लक्ष गेले अन हसूच आले. एक नवीन, काटक्यांची रचना तिथे रचली जात होती. वरती ते दोघे घरटे विणत होते. अन खाली आपसूकच काटक्यांचा इकेबाना तयार होत होता. "चला हे एक बरं झालं. मला रोज नवीन फ्लॉवर अॅरेंजमेंट करायला नको. अन बाईलाही कच-याचा त्रास व्हायला नको. फक्त नव-याला हे पटवणे एव्ह्ढेच जिकीरीचे काम " असा विचार करत शांतपणे पुन्हा पुस्तकाकडे वळले.
आता तर त्या दोघांनी माझ्याकडे पार दुर्लक्ष केले. जणू मी माझ्याच घरात एक पुतळा झाले होते. अंधार पडू लागला तशा त्यांच्या फे-या थांबल्या. रात्री त्यांनी कोठेतरी आसारा घेतला असावा.
दुस-या दिवशी जरा उजाडले नाही तोच गजर झाला; वृटिव्हSS , अन मग कालचाच प्रयोग मागून पुढे सुरू झाला. त्यांचे घरटे आता आकार घेऊ लागले. जेमेतेम आठवड्यात एक सुरेख घरटे विणले गेले. त्या विणीची मी प्रत्यक्ष साक्षीदारही बनले. एक एक गवत घेऊन, त्याची चोचीने गंफण करत त्यांनी आपला विसावा तयार केलेला मी पहात राही.
किती कौशल्य. किती चिकाटी. किती कष्ट. किती प्रयत्न. त्यासाठी त्यांनी माझ्या बागेतल्या पामच्या झाडच्या पानांच्या बारीक बारीक उभ्या रेषा ज्या कौशक्याने तोडल्या त्याला तर वादच नाही. आपणही ते करू शकू असे वाटत नाही.
अन मग दोघे बराच वेळ आपल्या प्रेमकुजनात राहू लागले. कधी अगदी हळुवार आवाजातले त्यांचे कुजन चाले. तर कधी जोरात चर्चा चालत. कधी घरट्यात, तर कधी टेरेसच्या बांधावर, तर कधी कुंदाच्या झाडावर. अन मग एक दिवस ती एकटीच घरट्यात दिसली. तो कुठे गायबच झाला. एक दोनदा तो आला मग ही बाहेर गेली २ मिनिटात परत आली. ती आपले घरटे सोडेना तेव्हाच कळले की आता घरटे मोकळे नाही. माझा आनंद गगनात मावेना. भावी पिल्लांची, त्यांच्या नाजूक चिवचिवाटाची मी आतुरतेने वाट पाहू लागले. एक दिवस दोघे नाहीत हे बघून अत्यंत चपलाई करून आत डोकावायचा प्रयत्न केला. पण काहीच दिसेना. मग कॅमेराचा वापर केला ( फ्लॅश आवर्जून टाळला) चटकन खाली उतरले.
स्टूल जागेवर ठेवे पर्यंत ती आलीच. मी कॅमेरात डोकावले. दोन ऊलुशी, रंगीत गोजिरवाणि अंडी विराजमान झाली होती घरट्यात ! त्यांचे रुटिन चालूच राहिले. आता तर माझ्या अगदी एका फुटावरून ती अन तो ग्लाईड करू लागले.
अन मग एका संध्याकाळी अंधार झाल्यावर राणी बाहेर गेली. माझं लक्षच नव्हतं. ती तिच्या घरट्यात इतकी शांत बसलेली असे की ती आहे की नाही हे कळतच नसे. माझ्या अन माझ्या लेकाचे प्रेमळ भांडणाचे आवाज, टिव्हीवरच्या सिरियल्स, लेकाच्या आवडत्या डिस्कव्हरीवरचे चित्रविचित्र आवाज; कश्श्या कश्श्याचा तिला त्रास होत नसे. अन तिचाही कसलाच त्रास आम्हाला होत नसे. अन त्या दिवशी ती अशी अवेळी बाहेर गेली. अन परत येताना तिला आमचे घरच सापडेना. नेहमी उजेडात आमच्या टेरेसवरचा रस्ता माहिती होता. पण आता अंधार झाला होता. त्यातून आमच्या टेरेसला ओनिंग असल्याने हॉलमधला उजेड बाहेर जात नव्हता. बाहेरून उजेड दिसत होता तो स्वयंपाकघराचा. अन मग चुकून तिने तीच वाट धरली. स्वयंपाकघरातून ती आत आली अन मी दचकलेच. पण लगेच लक्षात आले, ही तीच आहे म्हणुन मग मी आपली निवांत झाले. पण ती मात्र बावरली. आल्या आल्या स्वयंपाकघराच्या फॅनवर विराजली. पण समोर घरटं दिसेना. ती भिरभीरली. स्वयंपाकघरात तिने गोल गोल चकरा घातल्या. मध्येच चितकारलीही. मग माझं लक्ष गेलं. अन मला तिचा झालेला गोंधळ लक्षात आला. बिचारीला वाटले ती नेहमीच्या वाटेने आलेय, अन समोर घरटं दिसत नाहीये, अंडी सापडत नाहीये म्हटल्यावर तिचा जीव था-यावर राहिला नव्हता. बिचारी गरा गरा फिरत होती.
आता काय करावं अन तिला वाट दाखवावी सुचेना. खरं तर स्वयंपाकघर आणि हॉल यांच्यामध्य भींत नाहीये. परंतु मधल्या एका पीलरने तिला आपले घरटे दिसत नव्हते. रादर ती हॉलच्या दिशेने बघतच नव्हती. मध्येच तिने बाहेर जायचा प्रयत्न केला पण ते ही तिला जमे ना (स्वयंपाकघराच्या खिडकी बाहेर उभे खांबांचे डिझाईन आहे.त्यात बाहेर काळोख) ती अगदीच कावरी बावरी झाली होती. मग मी तिला दिशा दाखवण्यासाठी स्वयंपाकघराचे दिवे बंद केले. मग ती उडून हॉलमध्ये आली. पण तरीही तिला घरटे दिसेना कारण आता ती हॉलमधल्या दुस-या पंख्यावर होती. अन झुंबरातले तिचे घरटे समोरच्या फॅनच्या बाजूला होते.
ती पुन्हा कावरी बावरी झाली. तिचा तो कळवळलेला चेहरा मला बघवेना. मग मी हॉलमधले पहिल्या पंख्याजवळचा दिवा ठेवला अन बाकीचे सगळे घालवले. आता ती पहिल्या पंख्यावर येऊन बसली. पण तोंड उलट्या बाजूला. मग मी या बाजूला थोडे खटखट केले. त्या बरोबर ती उलटी वळली. एक क्षण तिने माझ्या कडे बघितले. एव्हाना मी तिला मदत करतेय हे कळले असावे. मी झुंबराकडे बोट केले. कसे कोणजाणे पण तिलाही कळले. तिने नजर वळवली. अन जिवाच्या आकांताने तिने झेप घेतली, घरट्याकडे. तिचा धपापलेला ऊर मला दिसत होता. हुश्श. मलाही हुश्स्य झाले. पोचली बाई एकदाची आपल्या घरट्यात.
मी स्वयंपाकघरात परत आले. माझ्या पायाला काहीतरी ओलसर लागले. बहुदा मगाशी घाबरून तिची कढी पांतळ झाली होती बिचारी पक्षिण झाली म्हणून काय झालं ? शेवटी घरावरचा, पिल्लांवरचा तिचा जीव आईचाच होता ना !
मग एक आठवडा झाला. त्या दोघांचे रुटिन चालू राहिले. आता मला पिल्लांची चाहूल हवी होती. त्याच सुमारास मला अन माझ्या नव-याला एक दिवस बाहेरगावी जावे लागले. लेक घरीच होता. त्यामुळे त्या दोघांची चिंता नव्हती.
आम्ही रात्री ८-९ वाजता घरी आलो. तर बया गायब होती. मी लेकाला विचारले. तर तो म्हणाला, " हो बाई तुझी लेक अन जावई बरे आहेत. ती बया संधाकाळपासून सारखी जा ये करतेय." " हो रे, रागवू नको. शेवटी माया मुलीलाच असते हो" असं त्याला चिडवून मी कामाला लागले. थोड्या वेळात ती परत आली. लगेच पुन्हा परत गेली. आज ती रस्ता अजिबात चुकत नव्हती. पण रात्रीच्या वेळेस अंधार झाल्यावर तिच्या या फे-या मला घोर लावून गेल्या. अगदी ११ पर्यंत तिच्या फे-या चालू होत्या. मग रात्री ती आली की नाही मला काही कळलं नाही.
दुसरा दिवस उजाडला पण माझा नेहमीचा गजर झालाच नाही. वृटिव्हSS असा आवाजच आला नाही. कालच्या दमणूकीने जर उशीराच जाग आली. अन लक्षात आलं की ती नाहीचये. अरेच्चा काय झालं ? सकाळचं सगळं भराभरा आवरलं. अन मग बाहेर जरा तिचा शोध घेतला. पण ते दोघेही दिसेनात. शेवटी हिय्या करून स्टुलावर चढले. मनात धाकधूक होतीच, काहीतरी विपरित घडलं होत,....
अन कॅमेरा पुन्हा क्लिक केला. पटकन खाली उतरून पाहिलं कॅमेरात ,... अन विश्वासच बसेना.... घरटं मोकळं होतं. अगदी कशाचाही मागमूस नव्हता. मला काहीच कळेना, मग वाटलं मी बघण्या, क्लिक करण्यात काही चूक केलीय. लेकाला चढवलं वर. उंच असल्याने त्याला दिसलं. म्हणाला " आई अगं यात काहीच नाहीये." " अरे नीट बघ अंडी, अंड्याची चरफलं, काही तरी असेल..." "नाही, ग, अगदी मोकळं आहे घरटं..."
मी चकीत होञ्न त्याने काढलेला फोटो बघत राहिले. स्वच्छा, मोकळे सुबक घरटे....
नक्की काय घडलं ? मी पुन्हा मागचे फोटो बघितले. होती छान छोटीशी रंगीत दोन अंडी होती तिथे. मग ती काय झाली? पिल्लं झाली का? ती मला का दिसली नाहीत? अंडी उबलीच नाहीत का? पण मग न ऊबलेली अंडी तरी कुठेत? त्याने, तिने काल इतक्या फे-या का मारल्या? पिल्लांना घेऊन गेली? की अंडी घेऊन गेली ? मला या कोड्याचे उत्तरच नाही सापडले. कोणी पक्षी तज्ज्ञ सांगतील का काय घडलं असावं ? का ? त्यांना अचानक घरटं सोडावं असं का वाटलं असावं ? माझावरचा त्यांचा विश्वास असा अचानक का उडाला?
मी नंतर आठवडाभर वाट पाहिली पण ती दोघे नाहीच आली. अखेर ते घरटे मी उतरवले. त्या दोघांची आठवण म्हणून आता त्याला धबधब्यावर ठेवलेय.
एक न सुटलेले कोडे !
वाचून झाल्यावर पाच मिनिटे काय
वाचून झाल्यावर पाच मिनिटे काय प्रतिक्रिया देऊ सुचतच नव्हते..
कशाशी तरी रीलेट झाल्यासारखे वाटत होते पण समजत नव्हते..
मग लिटील स्टुअर्ट सिनेमा डोळ्यासमोर आला..
आपले लिखाण, अनुभव, तगमग, काळजी, एफर्टस.. सारे आवडले अंड्याला..
अवल, खुप छान झाला आहे लेख !
अवल, खुप छान झाला आहे लेख ! अगदी मनापासुन लिहीलेस...त्यातुन तुझी उत्कंठा, काळजी, पक्षांवरचे प्रेम्....सर्व काही दिसुन आले. अप्रतिम झाला आहे लेख!
तुझ्यासारखाच मीही असा अनुभव घेतला....रॉबीन पक्षाचा..त्याने माझ्या फुले लावलेल्या हँगींग बास्केट मधे जागा निवडली......पक्षांची जागा निवडण्यासाठी होणारी ये-जा, घरटे करण्यासाठी एवल्याशा चोचीतुन घेउन येणारी सामुग्री, घरटे झाल्यावर अंडी घालुन ती उबवणे. ती उबवण्यात 'ती' बिझी असताना 'त्याचे' जवळपास घुटमळत राहणे. पिल्ले अंड्यातुन बाहेर आल्यावर त्यांना खाउ घालण्यासाठी केलेली दोघांची धावपळ्...त्या ३ पिल्लांमधे एक खुप अशक्त, तर एक खुप धीट, आगाउ....... पुढे पुढे करुन भावंडाचे खाणे ही हाच हडप करणारा...कधी कधी एक गांडुळ आईने आणले कि एका बाजुने एक घेणार तर दुसर्या बाजुने दुसरे पिल्लु ते ओढणार मग आई आपल्या चोचीने ते मधे कापुन दोघांना देणार...मग एकेकाचे उडुन जाणे. अशक्त पिल्लु मात्र खुप उशीरा उडाले...त्याला उडायला लावणारी आईची मेहनत, खंबीरपणाही जाणवला. तीने आधी त्याला खाणे आणुन देणे कमी केले, बराच वेळ ती त्याला एकट्याला ठेवायची.... त्याला बास्केटच्या बाहेर ढकलुन द्यायलाही कमी केले नाही. पण हे पिल्लु खुपच भित्र होते. बास्केट्च्या कडेपर्यंत जायचे पुन्हा मागे फिरायचे. एके दिवशी मात्र तेही उडून गेले. खुप छान अनुभव घेतला. हे सर्व त्यांनी साडेतीन आठवड्यात केले...अगदी घर बांघण्यापासुन्--पिल्ले उडेपर्यंत.
sorry! माझा हा प्रतिसाद खुपच मोठा झाला ,नाहीतर त्यांचे २ फोटोही टाकले असते.
अंड्या धन्यवाद विद्याक ,
अंड्या धन्यवाद
अगं लिही ग सविस्तर अन टाक फोटो. विषय तोच ना मग मी अन तू काय ? आपण सगळे एकच गं 
विद्याक , कित्ती छान
कदाचित त्यांनी अंडी नेली
कदाचित त्यांनी अंडी नेली असतील. मुंबैत एकदा कबुतराने गॅलरीत घातलेले अंडे कावळ्याने पायात पकडुन नेताना मी बघितलेय. टीटवी पण अंडी पायात धरुन जागा बदलते हे कुठेतरी वाचलेय / टीवीवर बघितलेय. बाकि ह्यातल काही कळत नाही पण लेख अप्रतिम.... कबुतराच्या अंड्याचे उदाहरण फक्त शेर्लॉक्स होम्स्च्या प्रतिसादासाठीच
अभिजीत नवले, >> जेव्हा सर्व
अभिजीत नवले,
>> जेव्हा सर्व शक्याता पडताळुनही काही हाती लागत नाही तेव्हा जी सगळ्यात जास्त साधी / सोपी आणि
>> दुर्लक्षीलेली शक्याता असते तीच खरी ठरते. - इती शेरलॉक होल्म्स.
एक शक्यता राहिली आहे. मात्र ती पडताळणे शक्य नाही. नवजात पिल्लांना (नख्यांत पकडून) घेऊन आईबाप उडून दुसर्या घरटी गेले असतील. आणि रिकामी कवचं आईने खाऊन टाकली असतील. अधिक माहितीसाठी कृपया इथे पहावे (इंग्रजी दुवा. कृपया empty हा शब्द शोधणे.).
आ.न.,
-गा.पै.
अवल, मस्त लेख! खूप आवडला!!
अवल, मस्त लेख! खूप आवडला!!
आ.न.,
-गा.पै.
अवल मस्त लेख !!!! पण शेवट
अवल मस्त लेख !!!! पण शेवट अनपेक्षीत
@निवांत पाटीलजी : तुम्ही
@निवांत पाटीलजी : तुम्ही भुतकाळात झालेला प्रकार लक्षात ठेवुन खास वेळात वेळ काढुन माझ्या प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद देण्यासाठी आलात हे पाहून मन भरुन आले. तसा इतरवेळी मी एका कोपर्यात पडुन असतो आणि कोणाच्या खिजगणतीतही नसतो, पण एवढ्या काळानंतरही तुम्ही मला लक्षात ठेवले आणि खास माझ्यासाठी प्रतिसाद दिलात. आजकालच्या जमान्यात एवढ कोण करतो ना कोणासाठी? तुमच्या व्यस्त दिनचर्येतुन माझ्या अतिमहत्वाच्या प्रतिसादाला त्याहुनही अतिमहत्वाचा प्रति-प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. यामुळे तुमची काही महत्वाची कामे खोळंबली असतील तर त्याबद्दल दिलगीर आहे.
त्या पक्षांनी अंडी स्वतः नेली असतील हे पटते.
कारण कावळ्याने जर पळवली असती तर त्यांनी घरट्यात येउन अस्वस्थतेने घिरट्या घातल्या असत्या.
आरतीताई...कालच तुझ्या ब्लॉगवर
आरतीताई...कालच तुझ्या ब्लॉगवर हे वाचले.तिथे प्रतिक्रिया देणे जमले नाही
फारच सुरेख वर्णन केले आहेस.मी पुण्यात असताना मलाही हे सर्व अनुभवायला मिळाले होते;फक्त लालबुडया नसून कबुतराचे घरटे होते,तेही ड्राय बाल्कनीच्या जमिनीवर.पण फरक इतकाच की तेव्हा घरट्यात पिलांचेही आगमन होउन त्यांना उडायला आई बाबांनी शिकवेपर्यंत सर्व गोष्टी मी अनुभवल्या.त्यामुळे तुला किती हुरहुर लागली असेल ते लगेच जाणवले.
अवल, कित्ती छान लिहितेस ग?
अवल, कित्ती छान लिहितेस ग? वर्णन असे केलेस की अगदी सगळ्या घटना समोर घडतायत असे वाटले. पण प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहीला. तू, जागू, कित्ती भाग्यवान आहात, हे सर्व तुम्हाला अनुभवायला मिळतं.

मी हे कबुतराच्या बाबतीत अनुभवलं. त्याने आमच्या ग्रिलमध्ये कुंड्यांसाठी ठेवलेल्या फळीवर अंडी घातली होती. तेव्हा दररोज आमच निरीक्षण चालायच. जेव्हा पिल्ल जरा मोठी झाली तेव्हा, आई-बाबानी, त्यांना उडायला शिकवताना, प्रथम स्वतः उडून दाखवलं, असं बर्याच वेळा केल. तरी ती उडेनात, मग ती दोघ लांब उडून गेली, (बहुतेक त्याना घाबरवण्यासाठी) थोड्यावेळाने परत येऊन त्याना उडून दाखवल, व त्यांच्या शेजारी बसून त्याना समजावू लागली. पण पिल्ले ऐकत नाही म्हटल्यावर चक्क चोचीने ढकलून दिले. आणि आपण इतक्या उंचावरून खाली पडू, या भितीने ती पिल्ले उडाली. आणि आई-बाबा आनंदीत झाले.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
सुरेख फोटो अन खुसखुशीत लेखन.
सुरेख फोटो अन खुसखुशीत लेखन.
अप्रतीम लेखन पण पिल्ले कुठे
अप्रतीम लेखन
पण पिल्ले कुठे गेली
उत्कंठा ताणून धरणार लेख. पण
उत्कंठा ताणून धरणार लेख. पण शेवट अगदी अनपेक्षीत
सगळेच असं म्हणताहेत की "पण
सगळेच असं म्हणताहेत की "पण शेवट अगदीच अनपेक्षित". हे चांगलं मानू की वाईट ? पण नावात ते तसे अध्यारुत आहेच ना
छान लिहलय.
छान लिहलय.
अवल, तुझ्या सुखांत धाग्यावर
अवल, तुझ्या सुखांत धाग्यावर हा किस्सा टाकायला नको वाटलं म्हणून इथे लिहिते.
मध्ये लेकाच्या स्विमिंगक्लासच्या बाहेर साडे-पाच फुटी क्रिसमसट्री वर लालबुड्याने घरटं केलं होतं आणि दोन छोटी पिल्लंही होती. आम्ही क्लास जॉईन केला तेव्हा पिल्लं होतीच घरट्यात. मुलाला कडेवर उचलून दाखवली. खूप मजा आली पोरांना. पण दोन दिवसांनंतर घरटं रिकामं बघून आम्हाला धक्काच बसला. कदाचित मांजरीनं खाल्ली असतील असं तिथला रखवालदार म्हणाला. उडून जाण्याइतकी ती पिल्लं मोठी नव्हती. त्यांना पिसंही फुटलेली नव्हती
पुढच्या वेळेला अस झाल तर सी
पुढच्या वेळेला अस झाल तर सी सी कॅमेरा लावा.
अगो, मला वाटतं छोट्या
अगो, मला वाटतं छोट्या पिल्लांना सुरक्षित ठिकाणी नेत असावीत पक्षीही. प्राणी नाहीका किती सावध अन अलवारपणे तोंडात धरून पिल्लांना नेतात. तसे पक्षी पायात पकडून नेत असावेत.
तसं झालं असेल तर फार बरं
तसं झालं असेल तर फार बरं वाटेल !
Pages