चाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 6 December, 2012 - 22:14

'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे. धागा 'संयुक्ता'तर्फे काढण्यात आला म्हणून 'संयुक्ता' ग्रूपमध्ये आहे.

***************************************************

आपली मायबोली ऐन षोडशा असली तरी बहुसंख्य मायबोलीकर आता चाळीशीत पदार्पण करते झालेले आहेत. विशीतली धडपड आणि तिशीतली गडबड मागे पडून चाळीशीचा प्रवास सुरू झाला आहे. आताच्या जमान्यात चाळीशी म्हणजे काही 'वय' झालं नाही हे नक्कीच. करियरमध्ये, धंद्यामध्ये, जीवनात अजूनही कितीतरी मोठ्या भरार्‍या घेण्याची हिंमत आहेच. पण तरीही कुठेतरी काहीतरी बदलतंय हे जाणवतंय. होय ना?

वयाच्या या टप्प्यात अनेकानेक बदल होत असतात. शारीरिक, मानसिक, परिस्थितीजन्य...

स्त्रीच्या शरीरात होणारे बदल अगदी ठळक असतात. रजोनिवृत्ती, त्यामुळे होणारे हार्मोनल चेंजेस आणि निसर्गानं बहाल केलेलं हे कवचकुंडल गळून गेल्यानं काही रोगांना शरीरात मिळणारा सहज प्रवेश. तर पुरुषांचे इतके ठळक नाही पण तरीही जाणवण्याइतपत होणारे शारीरिक बदल. यांचा स्त्रीपुरुषांच्या सहजीवनावर होणारा परिणामही महत्त्वाचा ठरतो.

सर्वसाधारणपणे या वयात स्त्रीपुरुष आपापल्या नोकरी-धंदा-संसारात स्थिर झालेले असतात. भौतिक सुखाची समीकरणं, आपापल्या चौकटीत का होईना, जुळवली गेलेली असतात.

पण तरीही समीकरणातले इतर घटक बदलू लागलेले असतात. मुलांची वयं वाढून त्यांची उच्च शिक्षणं सुरू होतात. त्याकरता पैश्यांची तजवीज करावी लागते. मुलं परदेशात रहायला जातात, बाहेरगावी नोकरीनिमित्त जाऊन राहतात. घर मोकळं होतं. 'एम्टी नेस्ट सिंड्रोम'च्या अनुभवाची ओळख होते.

आईवडिल एव्हाना वयस्क झालेले असतात. त्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे फोन नंबर्स मोबाईलमध्ये जमायला लागतात. अनायसे आपल्याकरताही हा डेटाबेस तयार होत आहे याची कुठेतरी नोंद घेतली जाते आणि मग नियमित आरोग्य तपासणी करण्याकडे कटाक्ष ठेवला जातो.

आईवडील वेगळे राहत असतील तरीही आता त्यांच्या ढासळत्या तब्येतीमुळे, आजारपणामुळे आलेल्या परावलंबित्वामुळे किंवा एक जोडीदार गेल्याने मागे उरलेल्या पालकांना आधार देण्याकरता अनेकदा त्यांना आपल्या घरी आणले जाते. या वाढीव जबाबदारीकरता घरातल्या व्यवस्थेची नव्याने बांधणी करावी लागते.

मानसिक दृष्ट्याही हा काळ तसा नाजूकच. स्त्रीची रजोनिवृत्ती जवळ आलेली असते आणि त्या बदलाचे पडसाद मनाच्या माध्यमातून वागण्यात उमटतात. घरातून निघून गेलेल्या मुलांच्या अवास्तव काळज्या करणं, कारण नसताना हळवं होणं, आपल्या ओसरत चाललेल्या सौंदर्यखुणांची खंत करणं, जोडीदाराला आपल्यात इंटरेस्ट राहिला नाहीये का अशा शंका मनात डोकावणं, निसटून चाललेलं तारुण्य पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणं असं काहीबाही घडत राहतं. हे चुकीचं वागणं आहे हे कळूनही वळत नाही. 'लाथ मारेन तिथं पाणी काढेन' ही वृत्तीही हळूहळू बदलायला लागलेली असते.

दुसर्‍या दृष्टीने विचार केला तर मुलांच्या जबाबदार्‍या कमी झाल्याने जोडीदारांना एकमेकांकरता पुन्हा वेळ मिळतो, एकत्र काही छंद जोपासणे, प्रवास करणे, गाण्याच्या मैफिली मनमुराद ऐकणे, काही सामाजिक उपक्रम हाती घेणे, नवनविन समवयस्क आणि समविचारी मित्रमैत्रिणी जमवून धमाल करणे या करता पैसा आणि वेळ गाठीशी असतो. त्यामुळे जीवन समृध्द करण्याच्या अनेक संधी असतात.

हल्ली चाळीशीचा फारसा बागुलबुवा केला जात नाही. जे बदल अपरिहार्य आहेत ते सहजपणे स्वीकारून जीवनाचा आनंद घेण्याची ही संधी आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वावरणारे आपल्या मायबोलीकरांमध्ये पण अनेक असतील. तर हा धागा आहे आपले अनुभव शेअर करण्याकरता, काही प्रश्न असतील, शंका असतील त्या मांडण्याकरता.

****************************************************
तळटीप : या लेखात व प्रतिसादात दिलेल्या माहितीची अधिकृत शहानिशा करून मगच त्यानुसार कार्यवाही करावी. या लेखाचा उद्देश केवळ अनुभव व माहितीची देवाण-घेवाण एवढाच असून काही वैद्यकीय उपचार असतील तर ते आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा.
चाळीशी म्हणजे नेमके कोणते वय अपेक्षित आहे? ४०+_ ५ का?

इथे प्रतिसाद दिल्यावर लोक आपले वय ओळखतील म्हणून प्रतिसाद देऊ नये का?
Wink

चाळीशीत मेनॉपॉज जरी काही टक्के स्त्रियांना होतो तरी ४० +_ ५ हे काही मेनॉपॉजचे योग्य वय नाही.
http://www.medicalnewstoday.com/articles/155651.php इथे मेनॉपॉजविषयी उत्तम माहिती आहे.
मायबोलीवर रूणूझुणूने लिहिलेली एक सिरीजही चांगली आहे.

धागा आवडला. ज्या पद्धतीने पातळ्या मांडल्या आहेत तेही भावलेच. उपयुक्त धागा आहे. मामींना धन्यवाद!

या धाग्यावर लिहायलाही आवडेल व वाचायलाही.

काही वेळाने लिहीन.

बाकी हल्ली सोशल लाईफच्या दृष्टीने फोर्टिज आर न्यू थर्टीज आणि आरोग्याच्या दृष्टीने ३०ज आर न्यू ४०ज.

पुढे येणार्या काळासाठी आर्थिक, शारिरीक आणि सोशल गुंतवणूक करण्यासाठी एकदम उत्तम काळ.

आर्थिक कारणांसाठी योग्य बचत आणि गुंतवणूक
शारिरीक - आहारात योग्य बदल आणि व्यायाम, रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन
सामाजिक- आवडता छंद जोपासणे, नवा छंद जोडून घेणे, एखाद्या सामाजिक उपक्रमाला जोडून घेणे

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस शिक्षण करियर आणि बेसिक स्वप्ने पूर्ण करणे याकरिता मन आणि शरीर कसेही बेशिस्तीने पादडलेले असते ते ताळ्यावर आणणे. शरीराला मनाला एक शिस्तशीर आणि आरामदायी (डिसीप्लीन्ड कंफर्ट) रुटिनची सवय लावणे.

छान माहिती मामी... धागा आवडला.

चाळीशीतली वाटचाल म्हणजे वयाची ४० ते ४९ वर्षे असा काळ असावा असे वाटते. साती यानी उपयुक्त भर टाकली आहे. धकाधकीच्या जिवनात अनेक कारणानी शरिराकडे लक्ष द्यायला वेळच नसतो... Sad

माझी एक जुनीच आणि नेहमीची शंका इथे विचारते -

स्त्रियांच्या रजोनिवृत्तीप्रमाणेच पुरूषांच्या रजोनिवृत्तीबद्दल (andropause) मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून सविस्तर माहिती हवी आहे. (वेबसाईट्सवर शास्त्रीय माहिती मिळते.)
कारण बहुतेक कुटुंबात आधी andropause अवतरतो आणि नंतर menopause.

मामी, मांडणी आणि कल्पना खूप आवडली लेखाची. वाचायला आवडेल.

अवांतर : चाळीशीनंतर बोलावे कमी, ऐकावे अधिक असं वाटू लागतं का ? त्याआधी जे जे मला समजले ते ते इतरांना सांगावे ( कि हे मला समजले) अशा अवस्थेतून आपण जात असतो का ?

<<अवांतर : चाळीशीनंतर बोलावे कमी, ऐकावे अधिक असं वाटू लागतं का ? त्याआधी जे जे मला समजले ते ते इतरांना सांगावे ( कि हे मला समजले) अशा अवस्थेतून आपण जात असतो का ?>>

तो अनुभवानंतर येणारा शहाणपणा असावा! आपण कोणी फ़ार महान नाही, किंवा आपल्याला जे माहिती आहे, ते अनेकाना कदाचित आधीच माहिती असेल, किंवा कोणी त्याविषयातील तज्ञही असतील, याची जाणीव होत असावी. म्हणून तोंड उघडून अवलक्षण करुन घेण्यापेक्शा गप्प रहावे हे बरे...! असा सूज्ञ विचार येत असावा!
(मी 'असावा' म्हणतेय, कारण अजुन चाळीशी आली नाहिए Happy )

>>चाळीशीत मेनॉपॉज जरी काही टक्के स्त्रियांना होतो तरी ४० +_ ५ हे काही मेनॉपॉजचे योग्य वय ना>><<
+ १

आजकाल सरासरी वय ४९+ असे आहे (भारतात तरी) असे वाचले होते एका मॅगझिनमध्ये. हि सरासरी काढण्याची बरीच गणितं दिली होती.( भारतात रहाणारी स्त्रीचेइतके का? युरोप स्त्रीचे किती? का? वगैरे वगैरे

बाकी चालू द्या, नंतर येतो काही काळाने Proud

मामी, मी गृहीतकाला थोडा धक्का देतो. (हो यु डोन्ट माईंड)

पूर्वीच्या चाळीशीतल्या कल्पना देखील बदलेल्या आहेत. आज चाळीतल्या पालकांचे मुलं उच्चशिक्षना कडे नाही तर हाय स्कुल कडे असतात. (अ‍ॅव्हरेज) बहुतेकांचे मुलं ४५ वर्षापर्यंत फारतर १० -११ वीला गेले असतील. अर्थात अपवाद आहेच. पण आजकालच्या जनरेशनला मुलं थोडी उशीरा म्हणजे ३० नंतर होतात कारण लग्न करण्याचे सरासरी वय वाढले आहे. इथे चाळीशी म्हणजे अर्लि फॉर्टी अन लेट फॉर्टी.

ह्यामुळे झाले काय आहे की चाळीशीत खूप कमी जनांना आपल्या आवडी निवडी साठी वेळ मिळेल. उलट हा कार्यकाल आता करियर घडविन्याचा झाला आहे. कारण आता मॅनेजर / सिनिअर मॅनेजर वगैरेच चाळीशीत असतो. तिथून डायरेक्टर, व्हि पी अशी वाटचाल करायला अजून वेळ द्यावा लागेल. आणि त्याच बरोबर रिटायरमेंट प्लानिग जे, आज पर्यंत करू करू असे म्हणत आलेलो असतो, तो करायचा झाला आहे. Wink

एम्टी नेस्ट सिन्ड्रोम आताशा अर्ली फिफ्टीत होईल. Happy

स्वतःसाठी वेळच नव्हता, ही टर्म देखील आताशा आणि इथून पुढे बदलेल / बदलत चालली आहे. अनेक पालक, पाल्याला ठेवून प्रवास करतात व दोघे कधी कधी एकेकटा देखील आवडीसाठी वेळ देतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक उपलब्धता. पूर्वी पैसेच कमी असल्यामूळे मोठे प्रवास वगैरे रिटायरमेंट मनी मध्ये व्हायचे, (पिलिग्रिम ट्रॅव्हल) पण आताशा लोक उत्साहाने गाडी काढून विकेंड आनंदात घालवतात.

हा वरचा प्यारा असाच, पूर्वी आणि आता मधील बदल दाखवायला, बाकी लेखातील भावनांशी सहमत आहे. फक्त वयाला अजून पुढे ढकला. Happy

मामी, मी पण केदारशी सहमत.
सध्या लग्नाचे वय ३० च्या पुढे गेलेय. तोपर्यंत सेटल झालोय असे वाटत नाही. शिक्षणाचा करियरचा अपेक्षित टप्पा गाठलेला नसतो. त्यामूळे मुले १० वर्षाच्या आसपासच असतात. त्यांच्या शिक्षणाकडेच लक्ष लागलेले असते.
अर्थात म्हातारपणी त्यांनी बघावे वगैरे अपेक्षा आता कुणीच ठेवत नाही. आणखी काही वर्षांनी, फॅमिली हि संकल्पना कदाचित बदललेली असेल. टिव्हीवरच्या मालिका काहीही दाखवोत पण आताची चाळिशीतली पिढी मुलांच्या वैवाहीक जीवनात फार ढवळाढवळ करेल असे वाटत नाही.

शिवाय आरोग्याबाबत बर्‍यापैकी जाण आल्याने, लोक असलेल्या व्याधी स्वीकारून त्याबद्दल सकारात्मक विचार करताना दिसताहेत. आणि त्या संभाळून आपल्या आवडीनिवडी / छंद जोपासताना दिसताहेत.

केदारला अनुमोदन (द्यावेच लागणार, कारण मी चाळिशित जाईन तेंव्हा माझा मुलगा फक्त ७वीत असेल हो :-P)
दिनेशदांनाही अनुमोदन, पुढच्या पिढीचे 'वैवाहिक' जीवन असेल का इथूनच मला शंका आहे!

मामी मस्त धागा. केदारशी सहमत.

साती आणि इतर तज्ञ मंडळींकडून खालील माहीती जाणून घ्यायला आवडेल
1) ह्या वयात सर्वसाधारणपणे करव्या लागणार्या Medical Tests. प्रत्येकाच्या वयानूसार आणि तब्बेतीनुसार अर्थातच त्या बदलतील पण एक जनरल आयडीया.
2) ह्या टेस्ट्सचा किती काळाने परत कराव्या - सहा महिने, वार्षिक इ.

हा प्रतिसाद इब्लिस आहे.

***************************************************

लग्नाचे वय उशीरा झाले म्हणूनचे एम्प्टी नेस्ट वगैरे वेगळा/सामाजिक विषय आहे, त्यावर साधक बाधक चर्चा इथे होईलच.

थोडे शरीरशास्त्रानुसार पाहू.

४० वय झालं, की "४०शी लागणे" हा एक भाग तर विसरलोच आहोत आपण. जवळचा चष्मा लागायला लागतो. बडिंग डायबेटिक्स, हायपरटेन्सिव्ह्ज ब्लॉसम होऊ लागतात. इ.;)

आपण ४० चे झालो आहोत हे अ‍ॅक्सेप्ट करायला शिकणे हे सर्वात महत्वाचे आहे.

भारताची अ‍ॅव्हरेज लाईफ एक्पेक्टन्सी ६० वर्षे म्हणतात. म्हणजे ३० झाले की निम्म्या गोवर्‍या 'गेलेल्या' असतात. मनाला कितीही उभारी असली, तरीही शरीर आता आधीसारखे काम करू शकत नाही हे ध्यानी घेणे गरजेचे आहे. अन हेच आपण ऐकायला तयार नसतो.

वर सातीनी म्हटल्या प्रमाणे
"सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस शिक्षण करियर आणि बेसिक स्वप्ने पूर्ण करणे याकरिता मन आणि शरीर कसेही बेशिस्तीने पादडलेले असते ते ताळ्यावर आणणे. शरीराला मनाला एक शिस्तशीर आणि आरामदायी (डिसीप्लीन्ड कंफर्ट) रुटिनची सवय लावणे." महत्वाचे आहे.

शरीराच्या जुने होण्यासोबत, मनाची एक तक्रार नवीच सुरू होते, ती म्हणजे, वर अजून उल्लेखला न गेलेला एक भाग --> 'मिडलाईफ क्रायसिस'

यात अनेक 'डायव्हर्स' लक्षणे दिसतात.

प्रचण्ड भिती वाटत असते. कशाची भिती वाटते तेही समजत नसते. जॉब्/बिजिनेस इ. सगळे सेक्युअर असलेत तरीही, नवीन काही करताना जास्तच टेन्शन येते. त्यात शरीर आधीसारखे काम करीत नाही. मग हे दुखते, ते दुखते, चक्कर येतात, थरथर होते, 'जीव' घाबरतो असे व्हेग तक्रार करणे सुरू होते.

कधी जे आहे त्यात आनंद वाटेनासे होते. सगळेच छान सुरू आहे, मग सुख बोचू लागते. आहे ते मोडून टाकून नवे काही करावे वाटू लागते. यातून विबासं, किंवा जास्त कॉमनली, रोज दारू पिणे सुरू होते.

काहीच नवे करण्यासारखे शिल्लक नाही असे वाटू लागते. त्यातून डिप्रेशन येते. हाती घेतलेली कोणतीही गोष्ट पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने होत नाही, हे सोडून ते करू लागणे असे होऊ लागते.

अनेक लक्षणे आहेत, गूगलून पाहिलेत तर तुम्हालाही सापडतील.

शेवटी,

ग्रोइंग 'अप' हे 'ग्रोइंग ओल्ड' पेक्षा जास्त महत्वाचे. ग्रेसफुल एजिंगची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात. आपण 'म्हातारे' व्हायला सुरुवात झाली आहे, हे अ‍ॅक्सेप्ट करून आता त्या बच्चनसारखा ग्रेसफुली एज्ड, अ‍ॅक्टिव्ह म्हातारा बनावे, की कोपर्‍यावरच्या दामूअण्णांसारखा विड्या फुंकणारा कुढ्या भांडकुदळ म्हातारा, हे ठरवायची वेळ म्हणजे चाळीशी.

- 'वरतून' (हाकलून दिले असावे बहुतेक) परत आलेला Wink इब्लिस

मामी....छान धागा!
साती...<आरोग्याच्या दृष्टीने ३०ज आर न्यू ४०ज> अनुमोदन.

इब्लिस आणि साती, दोघे इथे आहेत ते छानच.

वर सगळेच सहमत आहेत. मला वाटतं आपण आपले जीवन स्वतःसाठी जगायला लागू. म्हणजे आपण मूलांपासून दुरावलेले असू असे नाही. उलट तो बंध जास्तच मैत्रीचा होत जाईल.

मुलगा म्हणजे म्हातारपणीची काठी, वगैरे कल्पना कधीच कालबाह्य झाल्यात. पण तरीही असे वाटतेय, कि हा धागा जास्त दृढ होत जाईल. कारण आज ४० मधे असणार्‍या लोकांनी, प्रयत्नपूर्वक या नात्यात मोकळेपणा आणलेला आहे. बाबाला, एकेरी नावाने हाक मारणे हेसुद्धा याच पिढीने रुजवलेय.

केदार, दिनेशदा, आगाऊ
अगदी सहमत. सेम केस. जवळजवळ अर्धी चाळीशी उलटली अन मुलगी केवळ १० वर्षांचीच आहे.

साती, इब्लिस
छान पोस्टी.

प्रचण्ड भिती वाटत असते. कशाची भिती वाटते तेही समजत नसते. >>> हे जाणवायला लागलंय. कुठेही बाहेरगावी भटकायला जायचं असलं की आदल्या रात्री नीट झोप येत नाही. उगाच निघालोय, त्यापेक्षा घरीच असलेलं काय वाईट? अशी काहीतरी भावना मनात येत राहते.

रिफ्लेक्सेसही अगदी सूक्ष्म का होईना, कमी झालेले जाणवतात.

मी मांडलेला कोणताही मुद्दा sacrosanct नाहीये. चर्चा होऊ द्यात.

आगाऊ केदार नी दिनेशदा +१
सोशली चाळीशी ही पूर्वीच्या तिशीसारखी आहे हे मी वर म्हटलेय त्याचा अर्थ तोच.

पण हेल्थ प्रॉब्लेमच्या दृष्टीने आत्ताची तिशी ही पूर्वीच्या चाळीशीचे प्रॉब्लेम फेस करतेय.

चाळिशीत कुठले हेल्थ चेक करावे हे गुगलल्यावर कळेलच. पण त्याही आधी एकदा फॅमिली फिजीशीयनला किंवा फिजीशीयनला भेटून घ्यावे(माझ्या जातभाईंची सोय ;))
रूटीनबरोबरच तुमच्यासाठी आवश्यक असे योग्य ते चेक अप पॅकेज सांगतील.

आणि हो, त्या होल बॉडी सिटी स्कॅन टाइप्स मल्टीलेवल मार्केटींग वाल्याना फसू नका. रिपोर्ट सगले करतात पण अत्यंत अननुभवी ज्युनिअरमोस्ट डॉक्टरकडून रिपोर्टिंग करवून घेतात.

मामी, हि भिती स्त्रियांच्याच बाबतीत आहे का ? मला तर उलट ४० नंतर जास्त बेफिकीर झाल्यासारखे वाटतेय.
नवी आव्हाने स्वीकारावीशी वाटली, स्वीकारली देखील. जग काय म्हणेल ( लोक काय म्हणतील ) याची पर्वा
वाटेनाशी झालीय.

दिनेशदा
मुलांच्या भविष्याबाबत (जबाबदा-यां च्या बाबतीत म्हणूयात ) निर्धास्त होण्यासारखी परिस्थिती असेल तर नक्कीच तसं वाटेल. पण जबाबदा-या संपत नाहीत आणि वय निघून चाललंय याची बोच भीती मधे परावर्तित होत असावी ( नक्की माहीत नाही ). यात स्त्री-पुरूष असा फरक असेल असं वाटत नाही.

दिनेशदा, हा प्रत्येकाच्या स्वभावानुसार बदलणारा मुद्दा असावा. कदाचित एकापत्य असणारे आपल्या आजुबाजूचे समवयस्क लोक जास्ती लवकर सुटवंग झालेले पाहिले की ही मानसिक अस्वस्थता क्वचित येत असावी, ही भिती लिंगनिरपेक्षच वाटतेय मला तरी.

चाळीशी आली तेव्हा ती आलीये हे समजलेच नाही इतका व्यापातापात गुरफटलो होतो.
येऊन जाऊन, कॉम्प्युटरमुळे पन्चेचाळीसीलाच "वाचण्याचा" चष्मा लागला.
तिशीतच चंद्रमा होता तो चाळीशीपर्यन्त हेलिप्याड बनुन आता विमानतळ झाले आहे.
चाळीशीचे असे वेगळे दडपण म्हणा वा उत्सुकता म्हणा काहीच जाणवले नाही. फरक झालाच असेल तर ओळखितली बालके/तरुण-तरुणी "काका" म्हणून हाक मारू लागले.
मात्र आता पन्नाशी आली ती मात्र चान्गलीच ठसठशीतपणे इतकी की आत्ताच साठी गाठली आहे की काय असे वाटावे.
असो.
चाळीशीत चष्मा, पन्नाशीत दातान्ची कवळी, अन् साठी मधे हाती काठी हे नक्कीये. Happy

मला वाटतं आपण भिती नेमकी कशाची वाटतेय, त्याचा शोध घेतला तर !
मुलांच्या ( बाहेरील जगातील) सुरक्षिततेबाबत काळजी वाटतेय का ? किंवा एवढी आकर्षणे असताना, ते काहितरी वेडा निर्णय घेतील. याची भिती वाटते का ? (मला लेकीबद्दल तसे वाटते.)

का स्वतःच्याच तब्येतीबाबत वाटतय ? खुप काही करायचे होते आणि करायचे राहून गेले, वेळ थोडा आहे. याची खंत ?

म्हणजेच ती मानवाच्या अस्तित्वापासून समोर असलेली मृत्यूची भिती ?

मामी, मांडणी आणि कल्पना खूप आवडली लेखाची >>+१
केदार शी सहमत .. कारण हेच चित्र आजुबाजुला दिसतयं..

साती, इब्लिस, छान लिहिताय.

फरक झालाच असेल तर ओळखितली बालके/तरुण-तरुणी "काका" म्हणून हाक मारू लागले.>>>

हो हे मात्र आहे. त्या "आंटी" प्रकाराने डोक्यात शॉट लागतो..... मुलं मुलीच नाहीत तर दूकानदार पण !!!!!

मोहन की मीरा
त्या "आंटी" प्रकाराने डोक्यात शॉट लागतो..... मुलं मुलीच नाहीत तर दूकानदार पण
>>>
मला चळिशीत यायला अजुन बराsssssच कालावधी आहे पण दूकानदार आंटी म्हणत्तात हा अनुभव मलापण आहे.
म्हणजे माझी परिस्थिती अजुन गंभीर आहे का?? Wink

Pages