मागील वर्षी पुण्याच्या 'मैत्री' संस्थेने मेळघाटात भरवलेल्या १०० दिवसांच्या निवासी शाळेचा हा सचित्र वृतांत. ३१ मुली व ११ मुले अशी एकूण ४२ मुले होती. चार गट पाडले होते. आम्ही ४ स्वयंसेवक ४ गटांसाठी अशी योजना होती. प्रत्येकजण ८ दिवस तिकडे राहिलो आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी सोबत घेऊन आलो.
मेळघाटातील 'कोरकू' या आदीवासी समाजातील, रानपाखरांगत मनमौजी मुलांना शाळेबद्दल आकर्षण व प्रेम निर्माण करण्यात यशस्वी व्हायचे म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे.
त्यामुळे मुद्दामच असे 'वेळापत्रक' आखले होते, ज्यात अभ्यासाखेरीज इतरही उद्योग असतील...:)
सकाळी आम्हा स्वयंसेवकांचा दिवस चालू होई तो बंब पेटवण्यापासून, ह्या कामात(देखील) तरबेज असलेले बेडेकर काका आमच्या बॅचला होते म्हणून बरे!
नंतरची कामगिरी म्हणजे मुलांना उठवून (खरेतर त्या सगळ्यांना कधीही उठवावे लागले नाही, एकाला जरी जाग आली असली की बाकीच्यांना उठवण्याचे काम तोच करे) त्यांना ब्रशवर पेस्ट देणे. मग पुढील आन्हिके आटपून घेणे.
सकाळच्या सत्रातील पहिला कार्यक्रम म्हणजे जवळच असलेल्या मैदानावर (मैदान कसले, शेत्-वावरच होते ते) सगळ्यांना व्यायामासाठी घेऊन जाणे. आधीच मुलं, त्यातून निसर्गाच्या सानिद्ध्यात वाढलेली, त्यांच्या वेगाने तिकडे जायचे म्हणजेच नाकात दम येणे हा वाक्प्रचार जगणे. तिथे जाऊन वेगवेगळे व्यायामप्रकार करायचे व करवून घ्यायचे ते आणिक वेगळेच!
इतका व्यायाम झाल्यावर भूक नाही लागणार तर काय होणार. मग पळतच येऊन सकाळचा नाष्टा.
असा पोटोबा झाला की मग विठोबा अर्थात सकाळची प्रार्थना....
ह्या मुलांच्या तोंडून 'इतनी शक्ति हमे दे ना दाता' ऐकताना भरून आलेले मन, 'जन गण मन' ऐकताना फुलून यायचे.
मग सुरु व्ह्यायची शाळा, मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे आपली परिक्षाच...
मग काय, कधी काठावर पास
तर कधी चक्क नापास...
कितीही कंटाळा आलेला असो वा भूक लागलेली असो, कौतुकास्पद बाब म्हणजे जेवणाआधी रांगेने (आपापली विसळून घेतलेली) ताट्-वाटी आणि म्हटलेल्या प्रार्थना...
ही मराठी प्रार्थना
ही कोरकू प्रार्थना
जेवणानंतरचा काही वेळ मुलांच्या अंघोळी, कपडे धुणे, आराम या साठी राखून ठेवण्यात आला होता.
मग सुरु व्ह्यायची 'सृजनशील कृतींची' वेळ
अशा काय काय मस्त वस्तु तयार करून झाले की वेळ व्ह्यायची खेळाच्या तासाची....
शिवाशिवी, लंगडी, क्रिकेट (हो अगदी बरोबर ऐकलत तुम्ही, तेंडूलकर इथेही प्रसिद्ध आहेच.)
खेळून परत आल्यावर रीतसर हातपाय धुवून थोडासा पोटाला आधार म्हणून खाऊ खाणे (हा.. पण शिस्तीतच...)
नंतरचा वेळ राखीव होता टिव्ही पाहणे (हो डिश अँटेना, सोलर पॅनल यामुळे टिव्ही दिसतो, पण ,मुलांना (सुदैवाने) अजुन त्याची सवय नाहीये) संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर, पाढे-परवच्या नंतर , गोष्टी, गाणी, नकला असा दंगाच असायचा... कोरकू भाषेतील गाण्यांचा खजिनाच खुला व्हायचा...
बघता बघता दिवस संपायचा, (मुलांची झाल्यावर) रात्रीची जेवणे व्हायची. मग आम्ही ४ जण, मारायचो गप्पा, करायचो एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण. आठ दिवसांपुर्वी एकमेकांना 'कवाच नाय' भेटलेले, न ओळखणारे आम्ही 'कार्यकर्ते' बनून गेलो होतो शिकवायला मात्र आलो खूप काही शिकूनच....
वा! हर्पेन आज तुमचा अजून एक
वा! हर्पेन आज तुमचा अजून एक पैलू कळाला! खुप छान उपक्रम! तुमचेही कौतुक!
Pages