सुशिला
एका गावात एक मुलगी होती, खुपच सुंदर आणि सुशिल, नावच होतं तिचं सुशिला. अवघ्या दिड-दोनशे उबरठ्यांचं ते गाव, एका मोठ्या नदीच्या काठावर वसलेलं होतं. सुशिला त्या गावात आपल्या आई-वडीलासोबत राहत होती. ती त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांच्याकडे शेती नव्हती म्हणुन तिचे आई-वडील दुसर्याच्या शेतात मजुरीला जात, त्या मिळणार्या मजुरीवर ते आपल्या संसाराचा गाडा ओढत. सुशिलाही त्यांच्या सोबत मजुरीला जात असे, कारण आता ती वयाने मोठी झाली होती, तरुण दिसायला लागली होती, तेव्हाच तिचे आई-वडील म्हातारे दिसत होते, त्यांच्याकडुन आता शेतातली कष्टाची कामं होत नव्हती.
सुशिला आता लग्नाला आलेली, मग ती एकटीच कशी दुसर्याच्या शेतात कामाला जाईल, कारण शेतातचे मालक मजुरावर हात टाकायला कधीच मागे-पुढे पाहत नाहीत, त्यांचा एकच विचार असतो, मजुरांना जसं वापरुन घेता येईल, तसे ते वापरतात. आता सुशिला सुंदर दिसायला लागली होती, पण तिचं लग्न करायला फक्त सुंदर दिसणं एवढचं काही उपयोगाचं नव्हतं, कारण तिच्या वडीलांकडे देण्यासारखं काहीच नव्हतं, मुलाला हुंडा म्हणुन. आता तिच्याशी कोण लग्न करणार? गावातले रिकामे तरुण तिच्या घराभवती उगाच चकरा मारायचे.
गावातल्या तरुणांच्या नजरा सुशिलाभोवती फिरायला लागल्या, तेव्हापासुन तिचं मजुरीला जाणं बंद झालं, घरातलं कोणीच कामाला जात नाही म्हणुन गावातल्या वाण्याची दुकानाची उधारी वाढत होती. कोणाच्याही घरात पैसा नसला तरी माणसाला उपाशी राहुन जिवन जगता येत नाही. सुशिलाच्या वडीलांना काय करावं हे सुचत नव्हतं, एखाद्या नातलगाकडे मदत मागुन उपयोग नव्हता. आतापर्यंत कोणीही त्यांच्याशी उसनवारी केली नव्हती, ज्यांच्याकडुन परत-फेडीची शक्यता नसते, त्यांना कोण दारात उभं करणार? एकदम साधी, सरळ, व्यवहारी गोष्ट.
दिवसामागुन दिवस जात होते, आयुष्य त्यांना पुढे ढकलत होतं, पण तेव्हाच वाण्याच्या उधारीचं ओझं वाढत होतं, दुकानातुन उधारीवर सामान आणायला सुशिलाच जात होती, त्या म्हातार्या वाण्यानं तिला कधीच माघारी पाठवलं नव्हतं किवां उधारीचं तो तिला बोलला नव्हता. एक दिवस संध्याकाळी वाणीच त्यांच्या घरी आला, घरातल्या बाजीवर बसला, तेव्हा घरातल्या सगळ्यांच्या माना खाली गेल्या कारण त्याची उधारी फेडायला घरात कोणतीच सोय नव्हती. इकडच्या- तिकडच्या गोष्टी झाल्यावर जेव्हा वाणी महत्वाच्या विषयावर आला तेव्हा त्यानं उधारी मागितली नाही तर सरळ सुशिलाचा हात मागितला.
वाण्याचं हे बोलणं ऐकुन, सुशिलाच्या आई-वडीलांच्या पोटात विस्तवाचे गोळे उठले, ते तोंडात आले पण तोंडातच जळत राहीले. त्यांना त्या वाण्याला शिव्या द्यायाच्या होत्या, घरातुन हाकलुन द्यायाचं होतं, पण वाण्याची उधारी मोठी होती, दोन वर्षापासुन हे घर त्याच्याच मेहरबाणीवर जगलं होतं. सुशिलाच्या आई-वडीलांनी विचार केला, आता जर वाण्याला घराबाहेर काढलं तर उद्या सकाळपर्यंत आपल्याला गावाबाहेर जावं लागेल, तरी वाण्याच्या कर्जाचं ओझं आपल्या डोक्यावरुन उतरणार नाही. आता या वयात हे गावातलं घर सोडुन बाहेर फिरायचं तरी कुठे? या जगात गावं बदलली, माणसं बदलली तरी व्यवहाराची रीत एकच असते.
वाणी त्यांना काय करायचं हे विचारीत होता, तेव्हा आई-वडीलांच्या नजरा सुशिलाकडे गेल्या. कधीही बिकट परिस्थीतीत माणुस निर्णय नेहमीच दुसर्यावर ढकलण्याच्या बेतात असतो. निर्णय ढकलणारा कितीही अनुभवी का असेना! ज्यावर निर्णय ढकलला जातो, तो वयानं कितीही लहान असला तरी. माणसाला आयुष्यात असा जुगाराचा खेळ कधीतरी नाईलाजं खेळावा लागतो.
सुशिलाची नजर वाण्याकडं गेली, तर तो तिच्याकडंच पाहत होता. तो सुशिला कोणत्याच कोपर्यातुन नवरा दिसत नव्हता, त्याचं पोट सुटलेलं होतं, डोळ्याला चष्मा लागलेला होता, डोक्यावर टक्कल पडलेलं होतं, तिनं एवढं चालवुनही घेतलं असतं, पण हातातली काठी टेकत-टेकत तो घरापर्यंत चालत आला होता, एवढा तो म्हातारा होता. त्याला मुलगा- मुलगी कोणीही नव्हतं, वर्षाभरापुर्वीच त्याची बायको देवाघरी गेली होती.
गरीब घरात जन्माला येणं हा काही गुन्हा नसतो असं आजवर सुशिलाला वाटत होतं, आपल्यालाही कोणीतरी भेटणार तोही गरीब असला तरी तिचं काहीच बिघडणार नव्हतं, जो कोणी नवरा भेटील, त्याच्या पिठात आपलं मिठ टाकुन ती आपला संसार फुलवणार होती, तेव्हाच तिला आपल्या म्हातार्या आईवडीलांची जाणिवही तिला होत होती. तिच्या सौदर्यांवर भुलुन, तिला मागणी घालणारा तरुण आजवर तिला तिच्या गावात भेटला नव्हता.
वाणी सुशीलाच्या उत्तराची वाट पाहत होता, तेव्हा तिचे वडील वाण्याला म्हणाले, " उद्या सकाळी सांगतो." पण वाणी सकाळपर्यंत उसंत द्यायाला तयार नव्हता, कारण सगळ्या गावात तोच श्रींमत होता, आजही गावात त्याच्या शब्दाला मान होता, तेवढाच त्याचा दरारा होता, कारण आजही अर्ध गाव वाण्याच्याच दुकानातल्या किराण्याच्या उधारीवर जगत होतं, म्हणुन वाण्याला आताच निर्णय हवा होता.
सुशिलानं लग्नाला होकार दिला, तेव्हाच वाणी त्या घरातुन उठला. चार दिवसानंतर गावातल्याच एका मंदिरात सुशिलाचं त्या म्हातार्या वाण्यासोबत लग्न झालं. या घटनेला गावातल्या चार लोकांनी वाईट म्हटलं तर चार लोकांनी चांगलं. वाणी म्हातारा झाला होता, त्याच्या मागे कोणी नव्हतं, त्याची सगळ्या संपत्तीला कोणीच वारसदार नव्हता, म्हणुन वाण्यानं अशी युक्ती केली होती की जिच्यामुळे त्यालाही मरेपर्यंत आधार मिळणार होता आणि सुशिलाला, तिच्या आई-वडीलांची गरीबी कायमची संपणार होती. सुशिला आता एवढ्या संपत्तीची मालकीन झाली होती की तिला, तिच्या आई-वडीलांना कोणाच्याही कामाला न जाता आयुष्याभर बसुन खाता येईल.
लग्नाच्या दिवसापासुन सुशिला, तिचे आई-वडील वाण्याच्या घरात राहायला गेले. सुशिलाच्या आयुष्यातली लग्नासारखी मोठी घटना अगदी सहज घडुन गेली होती, आता तिला एक वर्ष झालं होतं. सार्याला गावाला माहीती होतं की वाणी म्हातारा आहे तरी सुशिला दिसली की बायका तिला चिडवत, "का ग सुशिला, वाड्यात पाळणा कधी हलणार?" यावर तिला काय बोलावं, हे तिला कळत नव्हतं. दुसर्याच्या संसारातल्या उणीवा काढत बसणं हा बायकांचा स्वभाव असतो, खरं तर त्यात त्यांना वेगळीच मजा येते.
वाड्यात पाळणा हलायचा काही प्रश्नच नव्हता, कारण वाण्यानं सुशिलाला हातच लावला नव्हता. त्याच्या तरुणपणात पहिल्या बायकोला मुलं होत नाही म्हणुन वाण्याच्या मनात दुसरं लग्न करण्याचा विचारही आला नव्हता. सुशिलाशी लग्न करुन त्यानं हक्काचा आधार शोधला होता, बस एवढचं. वाड्याबाहेरच्या गावाला त्याचं काय? कोणाचंही लग्न झालं की पुढच्या वर्षभरात घरात पाळणा हलला पाहीजे, असा जुना संकेत ते सांभाळत होते. सुशिला कधी वाड्याबाहेर दिसली की बायका तिचा पिच्छाच पुरवायच्या, " अगं, म्हातारपणात सुध्दा मुलं होतात, फक्त देवाचा आर्शिवाद पाहिजे. तुझा नवरा म्हातारा आहे, पण तुझ्यात काय कमी आहे." एका बाईनं तिला शेजारच्या गावातल्या देवाची महती ऐकवली, तिथं सलग पाच सोमवार जावुन पुजा केली की बाईला मुलं होतात असा महीमा गायला. आपल्या गावातल्या बर्याच बायका त्या मंदिरात दरवर्षी जातात, सहज दर्शनासाठी, तु नवस म्हणुन जायाचं, लागलं तर मी येत जाईल तुझ्यासोबत.
आता सुशिलाही वाड्यातली म्हातारी माणसं सांभाळुन कंटाळली होती, तिलाही बाहेर फिरावं असं वाटत होतं, नवसानं जमलस तर मुलंही हवं होतं, तिला जर मुलं झालं तर ती कितीही मोठा नवस फेडायला तयार होती, कारण वाड्यात पैशाची काहीच कमी नव्हती ज्याची ती मालकीन होती, फक्त तिला वाण्याची संमती हवी होती. तिनं त्याला विचारलं, त्यानं होकार दिला.
सोमवारी गावातल्या बायकासोबत सुशिला गावाबाहेर पडली, गाव नदीच्या तिकडच्या काठावर होतं, नदी नेहमी पाण्यानं तुडुंब भरलेली असायची, इकडु-तिकडे जाण्यासाठी एक नाव होती. सगळ्या बायका नावेत बसल्या. सुशिला नावेत बसायला घाबरत होती, तिला पाण्याची भिती वाटत होती, खरं तर ती आजवर नावेत कधीच बसली नव्हती, शेजारच्या गावात गेलीच नव्हती. ती काठावरच उभी होती, सगळ्या बायका तिला बोलवत होत्या, तेव्हा एका माणसानं तिचं मनगट धरुन नावेत ओढलं. सुशिला एकदम थरारली, कारण आयुष्यात पहिल्यांदा पुरुषाच्या स्पर्शाची जाणिव झाली. तिनं एकदाच त्या माणसाकडे पाहीलं, तो चांगला तरुण होता, नंतर तिची नजर खाली गेली. नाव तिकडच्या काठाकडे तरंगत चालु लागली.
तो तरुण तिकडच्या गावातला पहिलवान होता, दणकट शरीर, उंचीनं पुरा, देखणा. त्यानं सुशिलाचं एकदाच मनगट ओढलं, पण ती त्याच्याकडे कायमची ओढली गेली. त्या दिवसानंतर पलिकडच्या गावात नवस फेडायला जाणं, हे एक निमित्य झालं, कारण त्यानं तिची पाठ सोडली नाही.
त्या एका महीन्यात सुशिलाचं पलिकडच्या गावात चार-पाच वेळा जाणं झालं, तेव्हा तो सुशिलाला बघण्याच्या निमित्याने मंदिराच्या आवारात हजर राहायचा, शेवटच्या सोमवारी सुशिलानं बायांना काहितरी कारण सांगुन उशिरा जायाचं ठरविलं, कारण पहिलवानाला एकदा भेटण्याच्या इच्छेनं तिच्या मनात घर केलं होतं. त्या दिवशी एकटीच दुपारी निघाली, जेव्हा ती मंदिराच्या आवारात पोहचली, तेव्हा तिची नजर पहिलवानाला शोधत होती, तो काही तिला दिसला नाही, मग तिनं विचार केला की तो वाट पाहुन परत गेला अशील, पण पुजा आटपुन ति बाहेत आली, तेव्हा तो आवारातच उभा होता.
मंदिराच्या मागेच्या बागेत जाऊन त्या दोघांनी अगदी लाजत-लाजत भरपुर गप्पा मारल्या, तेव्हा संध्याकाळ कशी झाली हे सुशिलाला समजलं नाही, तिला तर त्याच्याजवळच बसुन राहावं असं वाटत होतं, पण वाड्यात वाणी, तिचे आई-वडील तिची वाट पाहत असल्याची जाणीव तिला झाली, तेव्हा तिनं स्वत:ला त्याच्यापासुन सोडवुन घेतलं. जाता-जाता पहिलवान तिला म्हणाला" आज नवस संपला परत केव्हा भेट होईल, तुला जेव्हा वाटलं तेव्हा भेटायला ये, रोज संध्याकाळी या मंदिराच्या बाजुच्याच आखाड्यात असतो!"
अशा तर्हेने पाच-सहा भेटीनंतर, सुशिला-पहिलवानाचं प्रेम चांगलच दाट झालं, ह्या प्रकरणानं दोन्ही गावांना चघळायला चांगलाच विषय मिळाला होता, पण वाण्याला जावुन सांगायची कोणाचीच हिंमत होत नव्हती, कारण या गावातल्या पाच-सहा माणसांना पहिलवानं आपली पहिलवानकी दाखवली होती. आता पहिलवानाकडुन आपली हाडं सैल करुन घेतल्यापेक्षा दोन्ही गावं हा विषय गुपचुप चघळत होते.
कोणत्याही प्रेयशीला प्रियकर हा नवरा म्हणुन हवा असतो, त्यासाठी ती जिवाचं रान करते, तेव्हाच कोणत्याही प्रियकराला प्रेयशी ही बायकोसारखी हवी असते पण बायको म्हणुन नको असते.
एक दिवस सुशिलाला पहीलवानाला भेटावं असं वाटत होतं, कारण त्या भेटीची धुंधी अजुनही तिच्या अंगातुन गेली नव्हती. वाड्यातल्या कामात तिचं लक्ष लागत नव्हतं, कारण पहिलवानचं चित्र तिच्या डोळ्यासमोर तरळत होतं, म्हणुन सकाळपासुन तिनं काहीच खाल्लं नव्हतं. सुशिलाची आई तिला विचारत होती, "तुला काय झालं, तु आजारी आहेस काय?" सुशिलाला आईला काय सांगावं हेच समजत नव्हतं, कारण आजवरच्या आयुष्यात एकही दिवस एवढा त्रासुन सोडणारा गेला नव्हता.
त्या दिवशी काहीही करुन तिला पहिलवानाला भेटायला जायाचं होतं, पण वाण्याला काय सांगावं हेच तिला कळत नव्हतं. नवस संपला हे त्याला माहीत होतं, तो वाणी खुपच कंजुश होता, कारण तिला पलिकडच्या गावात जाण्यासाठी मोजुन तिला दोनच रुपये द्यायाचा नावेच्या भाड्यासाठी, एक रुपाया जाण्याला-एक परत येण्याला. सुशिलाचं पुजेचं सामान तिच्या घरच्या दुकानातलंच असे.
गावातल्या एखाद्या बाईला उसने दोन रुपये मागितले तर ती दहा गोष्टी विचारत बसेल, पलिकडच्या गावात जाण्याऱ्या माणसाकडे पहिलवानासाठी निरोप दिला तर गावात बोबांबोब होईल, बरं नदीच्या पाण्यातुन जायाचं म्हटलं तर सुशिलाला पोहता येत नव्हतं. काय करावं हे जे सुचत नाही, तेव्हा सगळ्यांनाच देव आठवतो.
सुशिला धावत देवाघरात गेली, हात जोडुन नमस्कार केला, तेव्हा थोडाही वेळ न जाता तिला मार्ग दिसला, एका सुपारी खाली तिला एक रुपाया दिसला, तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता तिनं तो उचलला. आता प्रियकरापर्यंत पोहचण्याचा तिचा मार्ग सुकर झाला होता, तिकडुन परत येण्याचं बघता येईल? किवां तिला तशी गरजच वाटत नव्हती? सुशिलानं दिवसभर डोक्यात हाच निर्णय पक्का केला होता.
संध्याकाळ होण्याची वेळ झाली तेव्हा सुशिला नदीच्या दिशेनं चालु लागली. तिनं नावाड्याच्या हातावर एक रुपाया ठेवला, तेव्हाच त्याची नाव संथ पाण्यावर चालु लागली. आता ती पहिलवानाला भेटायला अधीर झाली होती, तो भेटल्यावर त्याच्यापुढं मनातलं सगळं रिचवणार होती. सभोवताली अंधार पडत होता तरी सुशिलाला उद्याचा आपल्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येईल, असा भास होत होता.
आता सुशिला तिचे म्हातारे आई-वडील, म्हातारा नवरा वाणी, त्यानं आजवर केलेले उपकार, त्यानं तिच्या घराचा मिटवलेला भाकरीचा प्रश्न, याचं काहीच वाटत नव्हत. तो वाणी तिला विनाकारण दोन रुपये देवु शकत नव्हता म्हणुन एकदम हलकट वाटत होता.
एकदाची नाव तिकडच्या काठावर पोहचली, सुशिला नावेतुन उतरली, मंदिराच्या दिशेनं धावतच निघाली. पहिलवान तिला मंदिराच्या मागेच भेटणार होता, कारण जवळच त्याचा आखाडा होता. आखाड्याच्या दरवाज्यातुन तिनं पहिलवाना भेटायला निरोप पाठवला ती आधीच ठरलेल्या ठिकाणी गेली. सुशिलानं त्याला भेटीची आतुरता बोलुन दाखवली, त्यामुळे पहिलवान खुपच खुश झाला, नंतर बरच वेळ ती दोघ ऐकमेकांना बिलगुन होती.
रात्र झाली, तेव्हा पहिलवानाला वेळेचं भान आलं, तो सुशिलाला म्हणाला, "मागच्याच आठवड्यात आपण भेटलो होतो, मग अशी घाईघाईनं येण्याची काय गरज होती?" तेव्हा सुशिलानं एकदम मुद्दयालाच हात घातला, त्याला लग्नसंबधी विचारलं, तेव्हा तो तिच्यापासुन चार हात लांब झाला. तो बोलायला लागला," सुशिला हे काय विचारतेस आपलं प्रेम आहे ना ऐकमेकांवर, खरं तर मी त्यातच आंनदी आहे, आता मी जर तुझ्याशी लग्न केलं तर या गावात मला पहिलवान कोण म्हणेल. मला आणखी कुस्त्या लढायच्या आहेत....... मी लग्न केलं तर मग संपलच सारं........... मी अजुन घरच्यांना काहीच विचारलं नाही!"
संध्याकाळी वाण्याचा वाडा कायमचा सोडायचा निर्णय घेऊनच ती वाड्याबाहेर आली होती, कारण तिला फक्त तिचा प्रियकर हवा होता, त्याच्या सहवासात तिला सगळी सुखं मिळणार होती. पहिलवाणासाठी ती सारे बंधन तोडुन आली होती, आता तिला माघार घेणं शक्य नव्हतं, म्हणुन ती त्याला लग्नासाठी सारखी विणवत होती. पहिलवान तिला सांगत होता की, "अगं, लग्न म्हणजे संसार, त्यात सगळ्या गोष्टी व्यवहार बघुन करायच्या असतात, पण प्रेम म्हणजे शुध्द भावना, तिच्या कोणताही व्यवहार नसतो. त्या भावनेचं व्यवहारात कसं काय रुपांतर होऊ शकतं?"
आता सुशिलाला पुढे काय बोलावं हेच सुचत नव्हतं, कारण तो तिला वेगळंव तत्वज्ञान ऐकवित होता. शेवटी तिनं त्याचे पाय धरले तरी काहीच उपयोग होत नव्हता. तो पहिलवान एखाद्या शिकवलेल्या पोपटासारखा तेच-तेच परत बोलत होता. आता इथं थाबण्यात अर्थ नाही हे सुशिलानं ताडलं, ती परत निघाली. रात्रीच्या अंधारात आकाशात चांदण्या चमकत होत्या आणि सुशिलाच्या डोळ्यापुढे काजवे, कारण आता तिला पुढची वाट चांगलीच खडतर वाटत होती.
प्रियकर मानत नाही म्हटल्यावर प्रेयसीचा नाईलाज झाला, तिला परत नवर्याच्या घरी जाणं क्रमप्राप्त ठरलं, तसचं काही कारण नसतांना गावातल्या दुसर्या पुरुषाच्या घरात राहणं, हे सुशिलाला पटणारं नव्हतं, तसचं आता तिचा पहिलवानाशी कवडीचाही संबध उरला नव्हता.
सुशिलाला आता वाण्याच्या वाड्याची आठवण आली, तिचे म्हातारे आई-वडिल, म्हातारा वाणी, त्यानं केलेले आजवरचे एक-एक उपकार आठवत होते. ती कोणालाही न सांगता वाड्याबाहेर पडली होती, वाड्यातले सारे तिचा गावभर शोध घेत असतील. आता साऱ्या गावात चर्चा होत राहील, मला उद्यापासुन गावात तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, या विचारानं ती आणखीच हादरली.
सुशिला परतीच्या वाटेला लागली, त्यावर पहिलवाना काहीच बोलला नाही, तो फक्त तिच्या पाठमोऱ्या आकुर्तीकडे पाहत होता. थोड्या अंतरावर जावुन ती अचानक थांबली, मागे वळाली, म्हणाली, "आता नावेच्या भाड्यासाठी एक रुपाया तरी दे! माझ्याकडे एकच रुपया होता, तो येतांना मी नावाड्याला दिला." त्यावर तो बिनधास्तपणे म्हणाला, "मी तुला आधीच सांगितलं आहे ना, आपलं प्रेम हे भावनिक नातं आहे, त्यात व्यवहार आलेला मला कधीच चालणार नाही!"
पहिलवानाचे हे शब्द ऐकुन सुशिला उभ्या जागीच भोवळच आली, कारण ती सकाळपासुन जेवली नव्हती, तिची प्रेमाची धुंधीही कायमची उतरली होती. तिचा भोवतालचा अंधार आणखीणच गडद झाला, स्वत:ला सावरत ती परत फिरली, नंतर तिनं पहिलवानाकडे पाहिलही नाही.
सुशिलाला आता कळालं की ती किती मुर्ख माणसावर प्रेम करत होती, एका रुपयासाठी विनवणी करतांना तिच्या डोळ्यात धारा आल्या होत्या, तरी त्या दगडाला एक पाझर फुटला नाही. ती चालता-चालता त्याला शिव्या देत होती, "मोठ्या भावनांच्या गोष्टी करत होता, अरे तुला तर मनच नाही, तशीच डोक्यात अक्कलही नाही. कोणाशी कसं वागावं, कोणत्या परिस्थीतीत काय निर्णय घ्यावा, तुला तर काहीच व्यवहारचं ज्ञान नाही. तु ताकदीचे खेळ खेळणारा रेडा आहेस रेडा!"
सुशिला नदीच्या काठावर येऊन पोहचली तेव्हा नावेत नाड्यातला पाहुन तिच्या अंगात उत्साह संचारला, उन्हाळ्या खंगारलेल्या झाडाला जशी एका पावसानंही पालवी फुटते तसा. तिच्या वाटत होतं की वाण्याला आपण सगळं खरं सांगितलं तर तो आपल्याला समजुन घेऊन, मला पहिलीच चुक माफ करील. वाण्याच्या डोक्यावरचे सगळे केस उगाच पाढरे झाले नसणार, या जगाच्या व्यवहाराचं तेवढच ज्ञानही त्याला नक्कीच असणार.
सुशिलाजवळ आता नावेच्या भाड्याचा एक रुपया नव्हता, त्यावरुन त्यांच्यात बोलणं चालु झालं. तिचं आताच तिकडच्या काठावर जाणं किती महत्वाचं आहे हे नावाड्याला पटवुन दिलं, उद्या त्याला दोन रुपये भाडं द्यायाचं ती कबुल झाली, तर तो तिला सरळच म्हणाला की, "मी उद्यावर भरवसा ठेवुन जगणारा माणुस नाही, कारण मी नेहमी वर्तमानातच जगतो." एवढं बोलुन तो नावाडी आपली हातातली वल्ही नावेत टाकुन नाव किनार्याला बांधुन, सुशिलाच्या मनात फुटलेल्या हिरव्या पालवीला आग लावुन, आपल्या गावाकडे निघुन गेला.
आता सुशिलासमोर एकच प्रश्न होता की पलीकडच्या काठावर जायाचं कसं? सुशिलानं नावेचे दोर सोडले. ती नाव चालवायला नावेत उतरली, पण त्या नावेची वल्ही एवढी वजनदार होती की तिच्याकडनं त्या जागच्या उचलल्याही नाहीत. सुशिलानं शेवटी हिंमत जुटवली, नावेचा विचार डोक्यातुन काढुन टाकला. तिनं आपली साडी कंबरेला खोचली, सरळ त्या अंधाऱ्या पाण्यात उडी घेतली, तेव्हा ते पाणी किती खोल असेल याचं भानही तिला आलं नाही. तिला नवर्याच्या घरी जायाचं होतं, समाजाची रित सांभाळायची होती, म्हाताऱ्या आई-वडीलांना आधार द्यायचा होता.
त्या अंधार्या पाण्यात सुशिला जोरानं हात-पाय हलवत होती, पाण्यावर तरंगायला धडपडत होती, ती मोठ्यानं कोणालातरी आवाज देत होती, अगदी जिवाच्या खोलीवरुन ती ओरडत होती, पण आजवर तिचा आतला आवाज कोणी ऐकलाच नव्हता, तो ऐकणारा कोणी तिला भेटलाच नव्हता, तरीही तिला जगायचं होतं.
असंख्य शक्यतांनी भरलेल्या या जगात काहीही होऊ शकतं. एकदाची सुशिला पलिकडच्या काठावर पोहचली, पण दोन दिवसांनी. जेव्हा तिचं प्रेत फुगुन पाण्यावर तंरगत पलिकडच्या काठावर गेलं, नंतर गाई-बैलांना पाणी पाजतांना ते एका माणसाला दिसलं.
***********
सुन्न करणारे कथानक.
सुन्न करणारे कथानक.
शेवट
शेवट
(No subject)
(No subject)
वरच्या सगळ्यांचे
वरच्या सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार!
- श्यामराव
आवडली. हे तर खूपच छान वाक्य.
आवडली.
हे तर खूपच छान वाक्य. <<पण आजवर तिचा आतला आवाज कोणी ऐकलाच नव्हता, तो ऐकणारा कोणी तिला भेटलाच नव्हता, तरीही तिला जगायचं होतं.>>