प्रकाशचित्रात पोवाड्याचे फक्त पहिले व शेवटचे कडवे आहे ज्याचे ’दामोदरसुत’ यांनी इतरत्र लिहिलेले एक रसग्रहण माझ्या वाचनात आले. ते दामोदरसुतांच्या अनुमतीने काव्यरसिकांसाठी येथे देत आहे. या पोवाड्याची ऊर्वरीत कडवी श्री. चैतन्य दिक्षित यांनी कष्ट घेऊन आवर्जून उपलब्ध करून दिली इतकेच नव्हे तर पोवाड्याचे रसग्रहण उत्तम व्हावे यासाठी शब्दार्थ तर दिलेच पण कांही सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली. त्यामुळे या रसग्रहणात त्यांनी लावलेल्या फार महत्वाच्या हातभाराबद्दल त्यांचे शतशः आभार. ती कडवी दामोदरसुतांनी केलेल्या पहिल्या आणि शेवटच्या कडव्याच्या रसग्रहणानंतर दिली आहेत.
आपल्याला हवे असलेले संपूर्ण पोवाड्याचेच रसग्रहण आता इथे दिले आहे.
दामोदरसुतांनी केलेले पहिल्या आणि शेवटच्या कडव्याचे रसग्रहण :
हे हिंदु शक्तिमध्ये निर्माण झालेल्या (निपजलेल्या),
अंधाराचा नाश करणाऱ्या प्रखर तेजा,
हे हिंदूंनी केलेल्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्वरी सामर्थ्या,
हे हिंदूंचे वैभव असणाऱ्या, सौभाग्य असणाऱ्या आणि कल्याणकारी अलंकारा,
हे दुष्टांचा कर्दनकाळ असलेल्या नरसिंहा,
हे हिंदूंमध्ये निपजलेल्या, नरश्रेष्ठा ! नृसिंहाप्रमाणे प्रकट होऊन अत्त्याचारी यावनी आतडे बाहेर काढणार्या पराक्रमी अशा प्रभो शिवाजी राजा (तुझा जयजयकार असो).
( दुसरे कडवे खरे तर शेवटचे कडवे आहे. त्याचा अर्थः)
हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करते.
अंतःरणातील उचंबळून आलेल्या भावना तुझे अभिनंदन (गुणगान ) करतात.
मी तुझ्या पायाशी माझे भक्तिरूपी चंदन अर्पण करतो.
ज्या तुला उघडपणे सांगू शकत नाही अशा माझ्या मनातील इच्छा ( पोवाडा रचला त्या काळात आपल्यावर ब्रिटीशांचे राज्य होते त्यामुळे 'माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करावेस' हीच ती इच्छा असणार . पण त्याकाळी त्याचे उच्चारणदेखिल अशक्य!) तू पूर्ण कर.
हे दुष्टांचा कर्दनकाळ असलेल्या नरसिंहा,
हे हिंदूंमध्ये निपजलेल्या, सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या प्रभो शिवाजी राजा (तुझा जयजयकार असो).
---दामोदरसुत
ऊर्वरीत कडवी :
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
रसग्रहण : नंतर ते देशाची सध्याची [हा पोवाडा १९०० च्या आसपासचा आहे] दुरवस्था शिवरायांना सांगताहेत. [तुमच्या काळी मजबूत असलेल्या] गडांचे तटांची पडझड झालेली आहे. (आपण बांधलेला) ’जलदुर्ग’ भग्नावस्थेत आहे. [ सर्व दुरवस्थेने अस्वस्थ जयदुर्ग स्वत:च्या आसवांमध्ये भग्नावस्थेत पडला आहे असेच त्यांना म्हणायचे असावे] तुमच्या भवानी तलवारिचा [भारतियांना ] विसर पडल्याने तिला गंज चढला आहे. [असा गंज चढू दिल्याचा राग येऊन] ती भवानीही कोणाला आधार देईनाशी झाली आहे. [येथे १८५७, वासुदेव बळवंत फडके, चाफेकरबंधू यांच्या अपयशी ठरलेल्या सशस्त्र उठावांचा संदर्भ असेल का?]
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
रसग्रहण : हे राजा, (रक्षणकर्ते) किल्ले, जंजिरे (पाण्यातील किल्ले) पडून गेले. राज्याच्या राजधान्या नष्ट होऊन तेथे जंगले माजली. सर्व मंगल गोष्टींचा पारतंत्र्यात पराभव होतांना पाहून जगण्याची लाज वाटू लागली आहे.
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
या दोन कडव्यांचे श्री चैतन्य दिक्षित यांनी प्रतिसादरूपात केलेले उत्तम रसग्रहण येथे देतो:-
ह्यात काव्यशास्त्रदृष्ट्या 'यथासंख्य' अलंकार वापरला गेला आहे.
जी शुद्धि हृदाची, जी बुद्धि..., जी युक्ति... जी शक्ति.... अशा ओळींचा संदर्भ पुढील
'ती शुद्धे हेतुची..., ती बुद्धि ....., ती शक्ति....' ह्या ओळींशी जोडला जातो.
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी=> ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी=>ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी, जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी => ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
ह्यातून सावरकर शिवरायांकडे मागणं मागतात.
हे प्रभो शिवाजीराजा, तुझ्या अंतःकरणात जी शुद्धी आहे तिने रामदास स्वामीही संतुष्ट झाले. आमच्या कर्मांचे हेतूही असेच शुद्ध राहू दे. ज्या बुद्धिमत्तेने तू शत्रूच्या पाचशाह्यांना (आदिलशाही, कुतूबशाही, निजामशाही ह्या तीनच आत्ता आठवत आहेत, अजून २ कुणाला आठवत असतील तर लिहा) शह दिलास ती बुद्धी इथल्या भाबड्या जिवालाही लाभू दे, जेणेकरून आम्ही सद्यकालातील शत्रूला नामोहरम करू शकू.
हे शिवराया तू 'शक्ति-युक्ति'चे मुर्तिमंत उदाहरण आहेस. तुझी शक्ति-युक्ति आमच्या शोणितात म्हणजेच रक्तात वाहू दे. आम्हाला आज त्याची नितांत आवश्यकता आहे.
शिवरायांकडे एक आदर्श म्हणून 'नुसते' न बघता, त्यांच्यातले कोणते गुण आपल्याला हवे आहेत हे अगदी नेमकेपणाने सावरकरांनी लिहिलेले आहे. इथे 'जे जे उत्तम उदात्त उन्नत' ते आणि तेच घेण्याचा सावरकरांचा गुण त्यांच्या काव्यातही भरून राहिला आहे ह्याचा आपल्याला प्रत्यय येतो.
यानंतर शेवटच्या कडव्याचे [ जे प्रकाशचित्रात आहे] दामोदरसुतांनी केलेल्या रसग्रहणाप्रमाणे सावरकर साकडे घालतात कि, "हे शिवराया, आमच्या आजच्या इच्छाही तुम्हि पूर्ण कराव्यात."
येथे रसग्रहण पूर्ण झाले आहे. तरीही चूक भूल देणे घेणे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी एका मित्राच्या आग्रहावरून श्री विनय हर्डिकर यांचे 'ज्वाला, समिधा आणि फुले' हे सावरकरांच्या काव्यावर आधारित व्याख्यान ऐकले. दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. सावरकरांच्या काव्यातल्या संस्कृत्-प्रचूरतेमुळे काव्याचा अर्थ कळणे जरा जडच जायचे, मग त्यातील अर्थ्-गर्भता कळणे तर दूरच. पण या भाषणानंतर वाटायला लागले की या अडचणींमधून मार्ग काढून आणि असे रसग्रहण करणारे तज्ञ उपलब्ध असतांना जर ते काव्य समजाऊन घेतले नाही तर आपण निव्वळ 'करंटे' च!
तेव्हांपासून अशा रसग्रहणांच्या शोधात मी होतो. त्याच दरम्यान मी माबोवर वाचू लागलो. विजय कुलकर्णी यांचा सावरकरांवरील लेख त्यावेळी गाजत होता. तो लेख, आणी नंतर अक्षय जोग, दामोदरसुत अशांचे लेख वाचून माझी ही इच्छा आणखीच वाढली. अलिकडेच श्रीयु यांनी माबोवर ’शत जन्म शोधितांना’ या काव्याच्या रसग्रहणासाठी लेख लिहिला. त्याला मिळालेल्या प्रतिसादांवरून अशी रसग्रहणे वाचायला मिळतील ही अपेक्षा आज ना उद्या पुरी होण्याची आशा वाटते.
सावरकरांसाराखा महाकवी पुन्हा
सावरकरांसाराखा महाकवी पुन्हा होणे नाही !!सावरकराना प्रणाम _________/\__________ !!!!
सावरकरी काव्याची आम्हास अजून ओळख करून देणे ही विनन्ती
धन्यवाद !!
अक्षय जोग, दामोदरसुत अशांचे
अक्षय जोग, दामोदरसुत अशांचे लेख वाचून..
हे वेगवेगळे आहेत का ?
'हिंदुनृसिंहा' ह्यात जो
'हिंदुनृसिंहा' ह्यात जो 'नृसिंह' शब्द आला आहे तो दोन अर्थांनी आला असावा असे वाटते.
'नरांमध्ये श्रेष्ठ' हा एक अर्थ.
'नृसिंहाने ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूस ठार केले त्याप्रमाणे तू नरसिंह होऊन यावनी शक्तीची आतडी बाहेर काढलीस' हा दुसरा अर्थ.
मी भास्कर, मूळ धाग्यात पूर्ण पोवाड्याचा समावेश केलात तर बरे होईल. मी नंतर माझा हा प्रतिसाद संपादित करेन. >> प्रतिसाद संपादित केला आहे.
पं. हृदयनाथ मंगेशकरांनी पहिले आणि शेवटचेच कडवे गाण्यासाठी निवडल्याने तेवढेच माहिती होते, पण तुमच्या ह्या धाग्याच्या निमित्ताने शोध घेतला असता आत्तापर्यंत अपरिचित असे कडवे मिळाले. धन्यवाद.
शेवटच्या कडव्याबद्दल थोडंसं लिहितो. ह्यात काव्यशास्त्रदृष्ट्या 'यथासंख्य' अलंकार वापरला गेला आहे.
जी शुद्धि हृदाची, जी बुद्धि..., जी युक्ति... जी शक्ति.... अशा ओळींचा संदर्भ पुढील
'ती शुद्धे हेतुची..., ती बुद्धि ....., ती शक्ति....' ह्या ओळींशी जोडला जातो.
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी=> ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी=>ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी,जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी => ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
ह्यातून सावरकर शिवरायांकडे मागणं मागतात.
हे प्रभो शिवाजीराजा, तुझ्या अंतःकरणात जी शुद्धी आहे तिने रामदास स्वामीही संतुष्ट झाले. आमच्या कर्मांचे हेतूही असेच शुद्ध राहू दे. ज्या बुद्धिमत्तेने तू शत्रूच्या पाचशाह्यांना (आदिलशाही, कुतूबशाही, निजामशाही ह्या तीनच आत्ता आठवत आहेत, अजून २ कुणाला आठवत असतील तर लिहा) शह दिलास ती बुद्धी इथल्या भाबड्या जिवालाही लाभू दे, जेणेकरून आम्ही सद्यकालातील शत्रूला नामोहरम करू शकू.
हे शिवराया तू 'शक्ति-युक्ति'चे मुर्तिमंत उदाहरण आहेस. तुझी शक्ति-युक्ति आमच्या शोणितात म्हणजेच रक्तात वाहू दे. आम्हाला आज त्याची नितांत आवश्यकता आहे.
शिवरायांकडे एक आदर्श म्हणून 'नुसते' न बघता, त्यांच्यातले कोणते गुण आपल्याला हवे आहेत हे अगदी नेमकेपणाने लिहिले आहे. इथे 'जे जे उत्तम उदात्त उन्नत' ते आणि तेच घेण्याचा सावरकरांचा गुण त्यांच्या काव्यातही भरून राहिला आहे ह्याचा आपल्याला प्रत्यय येतो.
'शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस आदरपूर्वक सोडून दिले होते' ही गोष्ट सावरकरांना तितकीशी पटली नसल्याचे 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक वाचल्यास लक्षात येते. ते त्यांनि बरेच 'रोखठोक' लिहिलेही आहे.
त्यामुळे 'जय शिवराय' असे म्हणून शिवाजीराजाची 'अंधभक्ती' सावरकरांना मान्य नाही. शिवाजीराजांचे स्वतःचे उत्तमगुण आणि एक राज्यकर्ता म्हणून त्यांच्या अंगी आलेले (किंवा असलेले) जे गुण सावरकरांना त्यांच्या काळात आवश्यक वाटले, ते गुण मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
छान.
छान.
खुप छान वाट्ले ही माहिती
खुप छान वाट्ले ही माहिती वाचुन
सुंदर आहे हे काव्य ! लताने
सुंदर आहे हे काव्य ! लताने शेवटची दोन कडवी गायली आहेत ना ? आणि त्याच चालीवर पहिली दोन कडवी पण गाता येत आहेत.
सुरेख... चैतन्यचा प्रतिसादही
सुरेख...
चैतन्यचा प्रतिसादही सुंदरच ! धन्यवाद
@चैतन्य दिक्षित आपण उर्वरीत
@चैतन्य दिक्षित
आपण उर्वरीत कडवी उपलब्ध करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद!
आपण सुचविल्यापरमाणे मूळ लेखातच ती कडवी आता टाकली आहेत. श्रीयु यांच्या धाग्यावरच हा पोवाडा टाकला नाही कारण तेथे त्याच काव्याचे रसग्रहण पूर्ण हाती लागणे आवश्यक आहे. येथेही फक्त याच पोवाड्याचे रसग्रहण व्हावे अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आपण खूपच चांगल्या रसग्रहणाला प्रारंभ केल्याबद्दल धन्यवाद!
Chan
Chan
खुप छान ! आणखी वाचायला आवडेल!
खुप छान ! आणखी वाचायला आवडेल!
आजवर पोवाड्याचे रसग्रहण
आजवर पोवाड्याचे रसग्रहण अपूर्णच होते.
आता या पोवाड्याचे संपुर्ण रसग्रहण आज मूळ लेखात दिले आहे.
या कामात अनेकांचि मदत झाली. त्या सर्वांचे आभार.
आता पूर्ण रसग्रहण वाचून कांही राहिले असेल तर सांगावे ही प्रार्थना!
पोवाडा या शब्दाचा अर्थ सजीव
पोवाडा या शब्दाचा अर्थ सजीव होऊन समोर आल्यासारखा हा पोवाडा अन त्यावर हृदयनाथ + लता. कानामनाचा भाग्ययोग आपल्यासाठी.
वीररसाचा प्रत्यय वीरानेच द्यायचा !
''शूरवीराचा पोवाडा शूरवीराने गावा/ऐकावा '' अशी एक म्हण आहे मराठीत, ती या पोवाड्याच्या रूपाने प्रत्ययास येते.
धन्स मी भास्कर,दामोदरसुत,चैतन्य ,रसग्रहण आवडले.
मी-भास्कर, फारच छान वाटते आहे
मी-भास्कर, फारच छान वाटते आहे संपूर्ण काव्याचे रसग्रहण.
माझ्याकडून थोडा अधिक ऊहापोह करायचा प्रयत्न करतो आहे.
तुम्ही आणि इतरांनीही अजून थोडा विचार करून मते दिलीत तर अधिक खोलात जाऊन हे काव्य समजावून घेता येईल.
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा>>
ह्यातून सावरकरांना असा संदेश द्यायचा असावा का?
'ज्या राष्ट्राची 'शस्त्र-शक्ति' क्षीण आहे, त्या राष्ट्राला त्यांचा देवही तारू शकत नाही?
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें>>
ह्यात कोणते गड-कोट आणि जंजिरे सावरकरांना अपेक्षित असावेत?
केवळ दगडी गड-कोट अपेक्षित नसावेत.
ज्या काही संस्था (इंग्रजी सिस्टम) भारतभूमीच्या सुवर्णकाळाच्या आधारभूत मानल्या जाऊ शकतात त्या संस्था (इंग्रजांच्या कूटनीतीमुळे) भंग पावत चालल्या आहेत. उदा. भारतीय शिक्षण-संस्था
राजधान्यांची जंगले झाली म्हणजे, ज्या राज्यकर्त्यांनी वेळीच परदास्य येणार नाही अशी खबरदारी घ्यायला हवी होती ती न घेता परकीयांची हुकूमशाही ते सहन करीत आहेत. जंगलात जशी एका सिंहाचीच हुकूमत चालते तसेच आज झाले आहे. म्हणून पूर्वी ज्या राजधान्यांनी आणि त्या योगे राजांनी आणि सामान्यांनीही वैभव उपभोगले, त्या राजधान्यांची जंगले झाली आहेत आणि राजा आणि सामान्य प्रजाही हुकूमशाही मुकाट सहन करीत आहे. आणि हताश होण्याचे सर्वात मोठे कारण हे की परदास्याची कुणालाही चीड येत नाहीये.
परदास्य पराभविं सारीं मंगले- जणु परदास्यालाच मंगल मानले जात आहे. आम्हाला तर आता अशा काळात जगत असल्याचीच लाज वाटते आहे. मग अशा वेळी शिवप्रभूशिवाय कोण स्फूर्ती देऊ शकेल? त्यांच्याही काळी अशीच परिस्थिती होती. पण शिवरायांनी राज्याला परदास्याच्या निद्रेतून मुक्त केलं. 'स्व' ची जाणीव करून दिली. तशीच आत्ताच्या समाजालाही व्हावी म्हणूनच सावरकर शिवरायांकडे मागणे मागत आहेत. (जी शुद्धि हृदाची.... इ. शब्दांत असलेले मागणे)
----
परदास्य पराभवि सारी मंगले- ह्याचा वर मी भास्कर ह्यांनी दिलेला अर्थ(सर्व मंगल गोष्टींचा पारतंत्र्यात पराभव होत आहे) जास्त योग्य वाटतो, पण मला त्या ओळी अगदी पहिल्या वाचनातही वर दिल्यात तशाच वाटल्या होत्या म्हणून इथे देतो आहे. त्या ओळींचा अर्थ मला वाटला तसा नसेलही, पण तसा वाचायला मात्र हरकत नसावी.
----
छानच अर्थ चैतन्य, असेच
छानच अर्थ चैतन्य, असेच कवितेच्या खोलात जाणे अपेक्षित आहे..
हे हिंदू शक्ती संभूत दिव्यतम तेजा..
अनेक शतकांच्या गाढ निद्रेत स्वतःला विसरलेल्या ,अनेक परचक्रे झेलताना पचवताना
तगलेली पण सामर्थ्य अन जगण्यातले सौंदर्य हरवलेली ,पराभूत वृत्तीत गुरफटलेली,अहिंसा अन दयामयतेच्या पराकोटीच्या आग्रहातून दयनीयतेपर्यंत पोचलेली हिंदू मानसिकता सावरकरांना नेहमीच अस्वस्थ करत होती, शिवरायांना आवाहन करून ती चेतवण्याचा या कवितेचा तोच हेतू आहे.,जो सावरकरांच्या जीवनाचाही हेतू आहे.
शिवाजी महाराजांचे आकर्षण सावरकरांना अगदी तरुण वयापासून होते ते इतके की उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वास्तव्य करताना सावरकरांनी शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचे उत्सव तिथे सुरू केले होते !
@चैतन्य दिक्षित हे
@चैतन्य दिक्षित
हे विवेचनदेखील पटेल असेच आहे. विवेचन खूप आवडले.
'ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा'
ज्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलून लढायचा प्रयत्न केला ते सर्वजण रूढार्थाने अपयशी ठरले जणु काही 'भवानीकडे [शस्त्रसामर्थ्याकडे] दुर्लक्ष केल्याने तीही आधार [यश] देईनाशी झाली ' असा अर्थ असावा असे मला वाटले.
चैतन्य.. खुप सुंदर अर्थ लावला
चैतन्य..
खुप सुंदर अर्थ लावला आहेस या पोवाड्याचा. सावरकरांसारखा कायम काळाच्या पुढे बघणारा मुत्सद्दी भुतकाळाच्या जिर्ण-शिर्ण अवशेषात रमणारच नाही.
भास्करजी...खुप खुप आभार !!