ऋणानुबंधांच्या...
फार फार वर्षांपूर्वी Accenture कृपेने राणीच्या राज्यात जाण्याचा योग आला. पहिलीच onsite खेप होती. भारतातुन ह्या project वर गेलेले मी आणि एक नितीन असे दोघेच होतो. तो दक्षिणेकडचा म्हातारा, कंटाळवाणा दिसणारा मनुष्य होता. नंतर मला कळाले की तो माझ्याच वयाचा आणि सरस विनोदबुद्धी असलेला होता/आहे. पण सुरुवातीला तरी तो काही बोलत नसे. माझी त्याची ओळख करुन दिल्यावर चेहर्यावर हसुही न आणता, "Nice to meet u" म्हणाला आणि वळून कामात मग्न. त्यानंतर मीच त्याला बळेच जेवायला वगैरे विचारत असे. कारण असे कुणी न/कमी बोलणारे भेटले की त्या व्यक्तीला बोलते करणे अथवा मी बोलते राहुन वातावरण जिवंत ठेवण्याची जबाबदारी मी स्वतःहुन शिरावर घेते. असो, ह्या मनुष्याची गोष्ट आरतीला सांगत असताना (मी इथे कशी एकटी आहे आणि मला कसा कंटाळा येतो असे रडताना) तीने मला मायबोली विषयी सांगितले. त्यानंतरच्याच वीकांतला माबोकरांचे एक ए वे ए ठी पण होणार होते, त्याला मी जावे असे तीने सुचवले. एका मायबोलीकराने तीला स्थळ्/काळ इ माहिती इ-पत्राने पाठवली होती. ही सगळी माहिती तिने मला पाठवली आणि माबो करांना माझ्याविषयी सांगितले.
जिथे ए वे ए ठि ठरले होते ते Hyde Park माझ्या घरापासून जवळच होते. मी शनिवारी सकाळीच त्या इ-पत्राची प्रत घेउन Hyde Park कडे निघाले. नेमकाच रस्त्यात पाउस लागला. लंडनच्या हवामानशी फारशी ओळख नसल्याने मी अर्थातच छत्री वगैरे तयारीत नव्हते. ऑक्टोबरच्या थंडीला पूरेल असे एक जॅकेट तेव्हढे होते. बस थांब्यापासुन चालत बागेच्या ठरलेल्या दारापर्यंत जाईपर्यंत मी चींब भिजले. पोचल्यावर बघितले तर कुणीच नव्हते. तिथल्या चहाच्या टपरीत चहा घेत होते तो कुठुन तरी मराठी बोलणे कानावर पडले. बघितले तर टपरीच्या मागच्या बाजुला अजुन १-२ मंडळी उभी होती- पूर्णिमा, अमित (दांडेकर) आणि अभिजीत (अभिषेक ?). त्यांना निथळताना बघुन काय आपण मुर्खासारखे छत्री न घेता निघालो असे वाटणे एकदम बंद झाले. मग ओळखी वगैरे करुन घ्यायचा कार्यक्रम सुरुच होता तो मिलिंद (आगरकर) आला. तो एकदम साहेबासारखे कपडे करुन आला होता. मग बाकी मंडळींनी, "अरे हा तर कपडे घालून आला" असे विनोद (?) केले व मला, आम्ही असेच बोलतो, मनावर घेऊ नकोस वगैरे वार्निंगा दिल्या. मग हळूहळू प्रसाद (शिरगावकर), समीर, अभिजीत, ह्रिषक्या आणि कुटुंब (अपूर्वा ?) असे जमा झाले.
त्यानंतरचे ३-४ तास कसे गेले ते कळलेच नाही. गप्पांच्या नादात Hyde Park ला २-३ चक्कर मारुन झाल्या. इतका व्यायाम केल्यावर सगळ्यांनी तिथेच एका दुकानात भरपूर हादडले. मग पूर्णिमा, प्रसाद व मिलिंदला महाराष्ट्र मंडळाच्या नाटकाच्या तालमीला जायचे असल्याने ते जायला निघाले. फारसे काही काम वा प्लॅन नसल्याने त्यांच्याबरोबर आम्ही पण सगळे. पून्हा लागलेल्या झडीने प्रसादच्या पावसावरील कविता त्याच्याच मुखे ऐकायचा योग पहिल्याच भेटीत आला अभि़जीतनेही पाऊस ह्या विषयावरील कविता सादर केल्या. ही माझी मायबोलीकरांशी पहिली ओळख. परक्या भूमीत आग्रहाने मराठीतच बोलणारे, एकदम खेळीमेळीने, आपुलकीने बोलणारे मायबोलीकर मला एकदमच आवडले. दिवसभराच्या ओळखीतच त्यांनीदेखील "प्रेमाने" माझे नाव, "चाबुक" ठेवले. चाबकाचे फटके ओढल्यासारखे सटासट बोलते म्हणून
मग काय घरी गेल्यावर मी maayaboli.com वर गेले आणि झोकात चाबुक नावाचा ID काढला. परंतु मराठीत लिहीणे अवघड जात होते. मग मी फक्त रोमात राहु लागले. लंडनमधील बाकी सर्व माबोकरांशी संपर्क होताच. दर शुक्रवारी सर्वजण बेकर स्ट्रीटवर ग्लोब मधे जमत. गप्पां-टप्पा, एकमेकांची खेचणे वगैरे कार्यक्रम मनसोक्त झाले की कुणा एकाच्या घरी जेवणे व राहिलेले अपेयपान (त्या पुढच्या शुक्रवारी आधी गेल्यावेळी कोण कोण कामातुन गेलेच्या चर्चा ;)). मी सहसा ग्लोबमधुनच परत येत असे कारण माझ्या घरासमोरच Victoria Coach Station होते. तिथे फार चित्र-विचीत्र लोक दिसत व मला रात्रीची एकटीने जायची फार भीती वाटे.
पूढे दिवाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. इथे महाराष्ट्र मंडळाची सुद्धा बरीच मंडळी होती. हे सगळे लोक एकदम साहेबी कपडे घालून आले होते. माझ्यासह सर्व मायबोलीकर झक्कास भारतीय कपड्यांमधे होते (प्रसादने ह्रिषक्याचा कुर्ता वेळेवर परत न करता स्वतःच घातला असल्याने तो बिचारा चहा-सदरा घालून आला होता ). हा कार्यक्रमही छानच झाला. पण तिथे झालेल्या काही गोष्टी खूपच मनाला लागल्याने त्या दिवसापासून मी मायबोलीकर आणि मायबोली दोन्ही सोडले. ग्लोबला जाणे बंद केले. मिलिंदा आणि दामिट सोडले तर बाकी सर्वांशी संपर्क जवळ जवळ तोडला.
लंडनहुन वर्षभराने परत आल्यावर आरतीच्या ओळखीतुन अजून काही माबोकरांशी ओळखी झाल्या. पण दुधाने तोंड पोळले असल्याने मी ती ओळख हाय्-हॅलोच्या पूढे नेली नाही. तीला मात्र फार प्रेम होते/आहे सर्व माबोकर मित्र/मैत्रिणींचे आणि मायबोलीचे ह्याच दरम्यान एकदा दिनेशदांशी ओळख झाली. मला तेव्हा मनात माबोकरांविषयी आकस असल्याने मी बाइकवर बसुनच नुसते त्यांना हाय केले आणि झुरर्र निघून गेले. त्यांनी अर्थातच मनावर घेतले नसावे
पूढे लग्न झाल्यावर अमेरिकेत आल्यावर थोडेच दिवसांनी आरतीने घेतलेल्या एका मुलाखतीला प्रतिसाद द्यायचा म्हणून मी तो चाबुक आयडी पून्हा वापरायचा/जिवंत करायचा प्रयत्न केला पण त्या आयडीशी जोडलेला इ-पत्र पत्ता हरवल्यामूळे व्यर्थ मग माझी मोठी बहिण मला कधी-कधी म्हणते त्या नावाने, सिंड्रेला आयडी काढला (गुन्हा कबूल- मी चाबुकचा ड्यु आयडी आहे ;)). तेव्हाच धाकट्या बहिणीने लिहिलेली गौरी देशपांडे यांच्या वरील कथा मी मायबोलीवर प्रसिद्ध केली. त्या कथेच्या प्रतिसादात एका रसिक मायबोलीकराशी झालेल्या प्रश्नोत्तरांनी फारच मनस्ताप झाला. कशाला पून्हा एकदा मायबोलीच्या भानगडीत पडले असेही वाटले. कसे असते, एखादी घटना घडते तेव्हा आपण त्यात सहसा आपलीच बाजू बघतो आणि लाउन धरतो. समोरच्याची बाजू समजुन घेणे हे जरा अवघडच. स्वतःची चूक ओळखून कबूल करणे हे तर अगदीच दुर्मिळ. त्या न्यायाने मी परत एकदा मायबोलीवर बहिष्कार टाकला. तेव्हा, ऍडमिन असे कसे चालवुन घेतात, मायबोलीवर गटबाजी चालते वगैरे वगैरे विचार मनात येणे हे ओघाने आलेच
पण म्हणून गुलमोहोर वरील साहित्य थोडीच सोडता येते. वाचन तर माझा (तेव्हाचा) एकमेव छंद. त्यामूळे रोमात येणे चालूच होते. बहिणीच्या कथेला प्रतिसाद मिळाले की काय बघायला त्या पानावर पण नियमीत जात होते. बरेचदा ती कथा आणि प्रतिसाद वाचल्यावर एकदा कधीतरी वाटले उगीच इतके टाकून बोलले मी. पूढे कामात अतिशय व्यस्त असल्याने मायबोलीचा जरा विसरच पडला
दरम्यान आम्ही दोघे ईशानची वाट बघत होतो. माझ्या ड्यु-डेटच्या पंधरा दिवस आधी घरी असताना मी मायबोलीवर रोमातुन पोष्टात प्रवेश केला तेव्हापासनं रोमातुन पोष्टात, पोष्टातुन गुलमोहोरात, गुलमोहोरातुन सगळीकडे (पडीक) अशी वाटचाल चालु आहे. माझ्या लेखनाला आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादांनी (हुरळून जाउन) अजून लिहायचा हुरुप आलाय
वेगवेगळ्या बाफवर, विचारपुशीत, संपर्कात, ऑरकुटवर, ए वे ए ठि, पुस्तके/पाककृती देण्या-घेण्यात माझेही मित्र-मैत्रिणी झालेत, बरेच भले-बुरे अनुभव गाठीशी आलेत आणि आता माझी एक फार जुनी मैत्रिण म्हणते, तुला बाई फार प्रेम त्या मायबोलीचे आणि मायबोलीकरांचे. मी पण म्हणते तीला, "आहेच मुळी, जगबुडी आली की आम्हीच असणार आहोत २४ टक्क्यांमधे"
विनोदाचा भाग सोडला तर मायबोलीकर नसलेल्यांना मायबोलीची महती कशी सांगावी हा जरा प्रश्नच पडतो मला. नवर्याला सुद्धा जरा वेळच लागला हे समजवायला की हे मराठीतले ऑर्कुट नाही, हा एक परिवार आहे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर प्रेम करणार्या मराठी माणसांचा. त्याला प्रश्न पडला होता, आरतीच्या बहिणीला बाळ होणार म्हणून तोत्तोचान सारखे पुस्तक GS ने का पाठवले ? एखादा असता तर पुस्तकाचे नाव सांगून गप बसला असता. (शिवाय "त्या" गावचा असल्यामूळे त्याला कोणी दोषही दिला नसता ) हळुहळु येतेय लक्षात त्याच्या आणि माझ्याही
गेल्या वेळी बँगलोरमधे स्पोट झाले नी बातम्या वाचता वाचता मला म्हणाला, "कोई मायबोलीकर है बँगलोरमे ? सब ठीक है ना ?"
{ते जूने, लंडनमधे भेटलेले माबोकर दिसत नाहीत अजिबात माबोवर आता किंवा फक्त कवितांच्या बाफवर असतात जिथे मी सहसा जात नाही. आहात का कुणी ?}
आधी हाताला भाकर, तेव्हा मिळते
आधी हाताला भाकर, तेव्हा मिळते भाकर >>>> सायो, ते 'आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर' असे आहे. तू बहुधा घाईत लिहिल्याने चुकीचं झालयं, होय ना?
मामी, हो. चुकून लिहिलं गेलेलं
मामी, हो. चुकून लिहिलं गेलेलं ते. थॅन्क्स.
नाही हो मामी, सायोकडे हातात
नाही हो मामी, सायोकडे हातात एक भाकरी असेल तरच दुसरी भाकरी द्यायची पद्धत आहे. हो की नाय ग सायो ?
बादवे संयुक्ताऐवजी चुकून मायबोली पडलय का लिखाणात ? नाही, जवळजवळ सगळ्या तायाबायाच दिसल्या म्हणून इच्चारल.
सिंडाक्का, हे असल इमोशनल वगैरे लिहीण शोनाहो, रथाच्या भोपळ्याची भाजी केल्यागत वाटतय. सिंड्रेलास्पेशल झणझणीत येउद्या की कायतरी
मी पण हा लेख अगदी नवीन माबो
मी पण हा लेख अगदी नवीन माबो करीण असताना वाचला होता. आता ती गोष्ट वाचून काढते. आत्ता गरम गरम चहा बरोबर वाचायला छान वाटले. सिंडरेलाचे एकत्रित लिखाण प्रकाशित झाले तर मी नक्की पुस्तक विकत घेणार.
अमा, पुस्तक काढले तर मी एक(च)
अमा, पुस्तक काढले तर मी एक(च) कॉपी छापून घेइन
बाकी सर्वांना धन्यवाद. सानी, तुला पण धन्यवाद. असुदे, २-४ तिखटजाळ पदार्थांच्या रेसिपी टाकते चालेल का ?
रथाच्या भोपळ्याची भाजी >>>
सायोकडे हातात एक भाकरी असेल
सायोकडे हातात एक भाकरी असेल तरच दुसरी भाकरी द्यायची पद्धत आहे. हो की नाय ग सायो >>>> हो,हो. इस हाथ से लो, उस हाथ से दो
छान लिहिलय! पण "रोमातुन
छान लिहिलय!
पण "रोमातुन पोष्टात प्रवेश केला" आणि "ए वे ए ठि" वगैरे काय ते समजले नाही.
रोम-ROM- read only
रोम-ROM- read only mode
एवेएठि- एकाच वेळी एकाच ठिकाणी- गेट टूगेदरचं दुसरं रुप
धन्यवाद, सायो!
धन्यवाद, सायो!
हे मी वाचलंच नव्हतं की गं.
हे मी वाचलंच नव्हतं की गं. मस्त अनुभव
Pages