दसऱ्यानंतरची एक दुपार. जेवण होऊन आई मागचं आवरत असतानाच बाबा विषय काढतात. "मुलं काय करतायत गं या दिवाळीला?”
“झालं का तुमचं सुरु? इतकी चिंता आहे तर करा की फोन तुम्हीच”, खरकटी भांडी सिंकमध्ये टाकत आई पुटपुटली. ते बहुतेक त्यांनी ऐकलं नाही, किंवा तसं दाखवलं नाही.
“दसऱ्यालाही वाट बघितली, तू जर आज-उद्या बोललीस तर विषय काढ"
दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात गावी हा डायलॉग ठरलेला.
“उद्या कशाला मग, चला लावूया आत्ताच फोन” असं म्हणत आई हात कोरडे करत त्यांच्यामागे बैठकीत येते. आधीच्या पिढीचं हे फोन 'लावणं' हा खास प्रकार असतो. (आता फोन 'मारला' म्हणतात). याचं फोन 'लावणं' म्हणजे तंबोरा वगैरे लावल्यासारखा तब्येतशीर बैठकीचा प्रकार असतो. यासाठी सहसा लँड-लाईनचा वापर केला जातो. कधी नव्हे ते बाबा अगदी नंबरही लावून रिसिव्हर तिच्या हातात देतात आणि त्यांचा पलीकडे आवाज जाणार नाही पण आईला वेळप्रसंगी सूचना देता येतील अशा अंतरावर थांबतात. तरीही जिला फोन लावलाय त्या पलीकडच्या अति-संवेदनशील कान असलेल्या सुनेला इकडून दोन्ही स्टेशन्स स्पष्ट ऐकू येत असतात (सासरच्या फ्रिक्वेन्सीजना परफेक्ट ट्यूनिंग) आणि हे माहित असूनही त्यांना 'प्रक्षेपण-केंद्रा'पासून फार लांब जाता येत नाही, कारण दोघी नक्की आपसात काय बोलल्या हे तंतोतंत कधीच दुसऱ्याला सांगत नाहीत हे त्यांना अनुभवानं माहित असतं, त्यामुळे कृत्रिम-उपग्रह जसा विशिष्ट कक्षेत स्थिर ठेवतात तसे ते स्वतःला ४ ते ५ फुटांवर स्थिर ठेवून उगीचच टीव्ही लावून (पण आवाज म्यूट करून) रिमोटशी चाळा करत बसतात.
सहसा हा फोन बायकोला मी ऑफिसला गेल्यावर येणार हे ठरलेलं. आधी इकडचं-तिकडचं बोलणं झालं कि मग आई मूळ मुद्द्याला हात घालते, "हे गं, मी काय म्हणत होते, दिवाळीचं काय करताय तुम्ही?”
“दिवाळीचं ना, होहो, आलीच की दिवाळी”, पहिल्यांदाच दिवाळी आल्यासारखा हिचा बावचळलेला स्वर.
“खरं तर मी फोन लावला हेच विचारायला आणि दुसरंच बोलत बसले. तर काय मग धरू न आम्ही तुमचं येणं गृहीत?... मलाही आताशा होत नाही फराळ, आल्यागेल्याचं आणि हेही म्हणतात, मुलं नसली कि काही मजा नाही". वाक्याचा उत्तरार्ध बाबांच्याकडे पहात ठोकून दिलेला असतो. तेही “बरोबर बोललीस” अशी मान हलवत हलक्या आवाजात "त्याला सुट्टी आहे का विचार आधी" अशी मौलिक सूचना करतात.
“हो, यायचं तर आहेच मनात, म्हणजे येतोच ना आम्ही दर वर्षी... फक्त याला सुट्टी कधी...” पत्नी. प्रत्यक्षात प्रश्न सुट्टीचा नसतो तर या दिवाळीला आम्ही तिकडे न येता गोव्याला जायचं म्हणतोय हे कसं सांगायचं हा असतो कारण तेही अजून पक्कं नसतं. पहिली एक-दोन वर्षं गावी जाण्याचा उत्साह असायचा आणि नंतरही इच्छा तर असायची पण तो सणासुदीचा गर्दीतून बसचा प्रवास आणि इकडं सगळं बंद करून जाणे वगैरे जीवावर यायला लागायचं आणि हा सूक्ष्म बदल माता-पित्यांच्याही लक्षात यायचा. त्यात गावी आजू-बाजूचे हितचिंतक "मुलं एकदा तिकडे गेली की रमली तिकडेच, फार दिवस काही जिव्हाळा टिकत नाही आता तुम्हीच तुमचा विरंगुळा शोधा" वगैरे पळी-पळी आहुती येता-जाता आवर्जून घालणं चालू करतात.
"दिवाळीला असेलच ना त्याला सुट्टी? नाहीतर रजा काढ म्हणावं. कोकणात तर माणसं हमखास जातात वाट्टेल ते झालं तरी", आईचं चालूच. बाबा पुढे वाकून तिच्या कानात "कोकणात गणपतीला जातात गं, दिवाळीला नाही" अशी डागडुजी करतात. "तेच हो, तिला कळलं मला काय म्हणायचंय ते" पीचवर सेट्ल झाल्यावर आता ती फार लक्ष देत नाही.
"एक मिनिट हं" असं म्हणून इकडे बायको फोनचा रिसिव्हर बाजूला ठेवून 'टाईम-प्लीज' च्या अविर्भावात एक खोल श्वास घेते आणि जरा बाजूला जाऊन मला मोबाईलवर कॉल लावते. खरंतर तिला स्वतःला फारसा प्रॉब्लेम नसतो पण मीच गोव्याला जाऊया का अशी टूम काढून नंतर, बघू ऐनवेळी करत आमच्यातली ही चर्चा गणपती नंतर लगेच निर्णय न घेता पेंडिंग टाकलेली असते आणि त्यामुळे ती नेमकी आज बेसावध खिंडीत सापडलेली असते त्यामुळे तडक ऑफिसमध्ये फोन लावून माझी शेंडी इमर्जन्सी चेन सारखी ओढण्यावाचून तिला पर्याय नसतो.
"कामात नाहीयेस ना?"
"छे, छे मी आपला असाच आलो होतो या बाजूला, दिसलं ऑफिस म्हणून आत येऊन बसलोय, बोल"
गंभीर परिस्थितीत नेमकी विनोद करण्याची दुर्बुद्धी सुचते.
"चेष्टा करायची वेळ नाही, आई आहेत फोनवर, दिवाळीला येणं जमेल का म्हणतायत म्हणून तुला फोन केला विचारायला, काय सांगू?"
एका दमात, इतकं स्पष्ट आणि रोखठोक? पर-सेकंड-बिलिंग चा इतका परफेक्ट वापर याआधी कधी झालेला आठवत नाही. नक्कीच चेष्टा करायची वेळ नसावी.
मी गंभीरपणे, "बरं मग? काय करूया? जायचंय का आपल्याला? गोव्याचं चाललं होतं ना आपलं?" असं काहीतरी एका बाजूला मेल्स चेक करत बडबडतो.
"काय करूया...? म्हणजे काय? आणि हे तू मलाच का विचारतोयस? तुला तुझं काही मत, इच्छा काही नाही का?”
“मग कुणाला विचारू?” ऑफिसमध्ये बायकोचा फोन आल्यावर आणि तो तापणार याची शक्यता वाटली तर बोलण्याचा एक विशिष्ठ कोरीडॉर आहे, तिकडे मी नकळत निघालो.
“मलाच का संकटात टाकता रे तुम्ही लोकं नेहेमी? मलाच पारंबी करून तुम्ही मस्त झोके घेता इकडून तिकडे"
पारंबीचा संतापमिश्रित टाहो ऐकून माझ्यातला वर्षानुवर्षे दोरे गुंडाळून बनियन-बाईंडिंग केलेला आधारवड क्षणभर थरथरला आणि म्हणाला,
“एक मिनिट. मी आणि आई-बाबा मिळून तुझं सँड-विच करतोय असं तुला म्हणायचं आहे का?”, डेस्कवरून उठता-उठता उचललेल्या चिकन-मेयो सँड-विचचा शेवटचा कोपरा तोंडात कोंबताना मला दुसरी काय उपमा सुचणार?
संसार-सँड-विच सिंड्रोम. हा खूप जुना मानसिक आजार असून त्यात दोन किंवा तीन लोकांत आपण विनाकारण चेमटले जातो ही भावना वरचेवर होत असते. रुग्ण अशावेळी तुझे आई-वडिल, तुझी माणसं (काळानुसार तुझे फोक्स वगैरे) अशा संज्ञा वापरत असतो. गम्मत म्हणजे हे साधं सँड-विच नसून अनेक थरांचा बर्गर असतो. त्यामुळे मग काकडीला वाटतं की दोन स्लाईस मध्ये माझं सँड-विच होतंय, स्लाईसला वाटतं की इकडची काकडी आणि तिकडच्या टोमाटो मध्ये माझं सँड-विच होतंय, इत्यादी.. इत्यादी. तरीही प्रत्यक्ष एकमेकांशी बोलताना दोन्ही बाजूनी सभ्यतेचं स्निग्ध लोणी फासणं आणि मनातल्या मनात मात्र मलाच ‘सॉसा’वं लागतं वगैरे घोकण, असा हा संसारी-बर्गर असतो. त्यामुळे असं कुणी कुरकुरलं की ते चालायचंच म्हणून मी त्याचा जास्त विचार करत नाही.
पण तरीही “तुला तुझं काहीच मत नाही का?” हे कसं काय बुवा ती म्हणाली असं मला वाटून गेलंच. वास्तविक हा प्रश्न संसारात लग्न झाल्यावर पाच वर्षांनी नवऱ्याला विचारावा आणि तो पण बायकोनंच हे म्हणजे नुसतं जखमेवर मीठ चोळणं नव्हे तर खडे-मीठ ठेवून कुटणे नव्हे का? पण मी उघड काही म्हणालो नाही, कारण नाही म्हटलं तरी तिच्या हातचं मीठ खाल्लं होतं आणि जागरणं केली होती (खाल्ल्या मिठाला जागतात ना, तेच ते)
“नुसतं सँड-विच नाही, ग्रील करता तुम्ही पद्धतशीर, दोन्ही बाजूनी”, पारंबी माझ्या गळ्याभोवती आवळत चालली होती. वेळीच तिच्यातून मान सोडवणं आवश्यक होतं.
"अगं संकट काय त्यात, साधं विचारतीये ना ती, सांग संध्याकाळी आल्यावर बोलून सांगते म्हणून, त्यात काय एवढं?", तोपर्यंत मित्राला गोव्याचं फायनल करायला सांगायला पाहिजे हा मनात विचार.
"साधं विचारतीये? म्हंटलं तर विचारलंय पण टोन असा आहे कि या..च, म्हणजे जमवा...च". (हे हिच्या सासुबैंच्या आवाजातलं ‘टोन्ड मिल्क’ मी कधी प्यालेलं नसतं, ती चव हिलाच बरोब्बर जाणवते.) मग “ठीक आहे, पण आज संध्याकाळी कुठल्याही परिस्थितीत फायनल” असं म्हणत ती वैतागून मोबाईलचं लाल बटन एकदाचं अंगठ्यानं चेमटवते.
"कालनिर्णय बघत होते" असं बाजूला ठेवलेला तिकडचा फोन कंटिन्यू करताना व्यत्ययाचं स्पष्टी-करण. प्रत्यक्षात तिकडून आमचा 'कॉल-निर्णय' व्यवस्थित ऐकून झालेला असतो, कारण कितीही म्हंटलं तरी नवरा बायको (त्यांची तशी समजूत असली तरी) कसलाही निर्णय घेण्यासंबंधी दबक्या आवाजात बोलूच शकत नाहीत. ती कुजबुज अल्पावधीतच अजय-अतुल च्या संगीतासारखी टिपेला जाणार म्हणजे जातेच आणि दोघांपैकी कुणीतरी एकानं शेवटची टिपरी टाण्णकन थाळीवर मारल्यावरच थांबते.
असो.
तर एव्हाना तिकडे बाबांनी आणि इकडे बायकोनी आपापली काल-निर्णयं टेबलावर अंथरलेली असतात. असं महत्वाचं प्लानिंग उभ्या-उभ्या भिंतीकडे आ वासून बघत होऊच शकत नाही. दुध, पेपरची नोंद करणं वेगळं. तर मग आणखी जरा विचार-विनिमय होतो, पुण्याहून काय तयार फराळ आणायचा याची यादी, नवे कपडे वगैरे यावर येत्या आठवड्यात वेळोवेळी चर्चा करायची यावर एकमत होऊन बोलणं संपतं. झालं, गावी दिवाळी जवळ-जवळ फिक्स.
आता इतकं सगळं घडून गेल्यावर त्या दिवशी संध्याकाळी बाहेरच जेवण करणं सर्वार्थानं सुरक्षित असतं हे ओघानं आलंच, कारण मागच्यावर्षीप्रमाणेच यंदाही ‘गोवा’ (पूर्वी आपले श्रीहरीकोटा वरून सोडलेले उपग्रह उलटे येऊन पडायचे तसा) समुद्रातच ढकलला जाणार असतो. (नंतर कुणीतरी त्याची दिशा बंगालच्या उपसागराच्या दिशेने केली म्हणे आणि मग ते मुकाट वर जाऊन फिरत बसायला लागले)
संध्याकाळी हॉटेलात बायको समोरच्या प्लेटीतल्या मंचुरियन मध्ये हातातला काटा आणि टेबलाखालून माझ्या नडगीवर पुन्हा पुन्हा चप्पलचं टोक तंद्रीत उगीचच ठोकत असते. काहीही करून आपण निदान ख्रिसमसच्या सुटीत तरी जाऊच हे सांगण्यासाठी मनात मी दत्ताचा धावा करत “डिसेम्बरा, डिसेम्बरा, गोव्यात जाऊ डिसेम्बरा” घोळवत असतो. तेव्हढ्यात टेबलावर ठेवलेला माझा मोबाईल डोळे उघडझाप करत गुरगुरत, थरथरत स्वतःभोवती फिरत वाजतो.
“काय ठरलं रे, तिकिटं काढलीस का तू?”, पलीकडून माझी बहिण विचारत असते आणि इकडे माझा चेहेरा अजूनच पडतो. आमचं गोव्याचं ठरतंय, मुलांना तुमच्याबरोबर गावी पाठवते असं माझ्या बहिणीने दुपारीच सांगितलेलं मी हिला सांगायचं विसरूनच गेलेलो असतो. बायको माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत असतानाच वेटर माझ्यासाठी मागवलेला बर्गर आणून पुढ्यात ठेवतो. हिचं व्हेज ‘मांचुरं’ एव्हाना काटा खुपसून खुपसून कधीच चिंधाडून गेलेलं असतं. कधीकधी गुन्हा करून माणूस स्वतःहून पोलीस स्टेशनात हजर होतो तसं चक्क त्या तीळ लावलेल्या पावाखालीच जाऊन दडून बसावं असं मला होतं आणि कानात आपोआप गोव्याचं लोकगीत ऐकू यायला लागतं “उंदीर मामा आईलो, अनि पावाखाली लपलो, अनि मान्जोरीच्या पिलान त्याका एका घासां खायलो, या या मायाया, या या मायाया, या या मायाया, या या मायाया”
धमाल लिहीलंय.
धमाल लिहीलंय.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आवडलं
आवडलं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जबरी लिहिलंय.
जबरी लिहिलंय.
लेखन आवडलं...
लेखन आवडलं...
हायक्लास.भन्नाट .जबरी
हायक्लास.भन्नाट .जबरी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खतरनाक..... एक कपल एकदम
खतरनाक.....
एक कपल एकदम डोळ्यापुढेच आलं.....फुल्ल टू रोलपोल....:हहगलो:
संसार-सँड-विच सिंड्रोम![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ती कुजबुज अल्पावधीतच अजय-अतुल च्या संगीतासारखी टिपेला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
'कॉल-निर्णय'![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदंरित सगळाच लेख मस्त...म हा न लिहिता तुम्ही.....लय कामाच्या वक्ताचा मुंगु ब्रेक इज मस्ट नाहीतर कामाने डोकं फिरेल...आता असं हलकंफुलकं वाचल्यावर जरा ताळावर आल्यासारखं वाटतंय...
लिखते रहो....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनोदी लिहीलंय .. छान!
विनोदी लिहीलंय .. छान!
एकदम ओरिजिनल खूप आवड्लं.
एकदम ओरिजिनल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप आवड्लं.
फार फार मस्ताय.. आवर्जून सगळं
फार फार मस्ताय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवर्जून सगळं लिखाण वाचतीये... तुमची लिखाणशैली आवडते अहे फार
शुभेच्छा
“डिसेम्बरा, डिसेम्बरा,
“डिसेम्बरा, डिसेम्बरा, गोव्यात जाऊ डिसेम्बरा”>>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
लै भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा ! एकदम भारी !! लेखनशैली
वा ! एकदम भारी !! लेखनशैली खुप आवडली !!!.........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच छान आहे रे!
फारच छान आहे रे!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फारच छान
फारच छान![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फारच छान
फारच छान![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त लिहिलय... खुप
मस्त लिहिलय... खुप आवडलं.......
ते फोन लावण्याचे प्रसंग आणि
लय मंज्ये लय मंज्ये लयच
लय मंज्ये लय मंज्ये लयच भारी..........
फक्त शेवट मला अपूर्ण वाटला....
बाकी मस्तच...
पु.ले.शु.
कल्याणी
साजिरा...... भारी निरिक्षण..
साजिरा...... भारी निरिक्षण..
धमाल आहे
धमाल आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फार फार छान!!! एकदम मस्त!!!!
फार फार छान!!! एकदम मस्त!!!! एक नंबर....
संसार-सँड-विच सिंड्रोम.... लै भारी....
मुंगेरीलाल , तुम्ही खरोखररच
मुंगेरीलाल , तुम्ही खरोखररच उत्कृष्ट लिहीलय. खूप खूप दिवसांनी इतक छान वाचायला मिळाल. धन्यवाद.
छोटासाच प्रसंग.. फार सुंदर
छोटासाच प्रसंग.. फार सुंदर खुलवलेला आहे. आवडण्या शिवाय दुसरा पर्यायच नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम!!!!!!
अप्रतिम!!!!!!
संपुर्ण लेख वाचताना एक स्मित
संपुर्ण लेख वाचताना एक स्मित आणि हास्य चेहर्यावर कायम होते.... सेंण्टी मुड असले तरी पंचेस आवडले..
रेड मुंगेरी... मी ज्या वेगाने वाचतोय त्यावरुन तुम्हाला तुमचा लिखाणाचा वेग वाढवावा लागणार आहे... लक्ष्यात येतय ना???![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
ज्यांनी वाचलेलं नाही
ज्यांनी वाचलेलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा वर काढतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
ज ब र्या
ज ब र्या
“डिसेम्बरा, डिसेम्बरा,
“डिसेम्बरा, डिसेम्बरा, गोव्यात जाऊ डिसेम्बरा” >>>>> हे वाचुन मेले ठार![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जबरदस्त! खूप मस्त लिहिता
जबरदस्त! खूप मस्त लिहिता मुंगेरीलाल!
Pages