प्रत्येक देशाची आपली अशी एक संस्कृती असते. रितीरिवाज असतात, खाद्यप्रकार असतात. अंगोलात येउन आता ५ महिने झालेत त्यामुळे इथल्याही अशा काही गोष्टी तुमच्या बरोबर शेयर कराव्याशा वाटल्या. मी काही सगळंच बघितलेलं नाही अजून पण मला सगळ्यात जास्त विशेष वाटलं ते म्हणजे इथलं जेवण, इथली लग्न पद्धती, घरात मृत्यू झाल्यावर करण्यात येणार्या गोष्टी आणि इथल्या बायकांचे पारंपारिक ड्रेस!
इथलं कॉमन जेवण म्हणजे फुंज. हे आपल्या कडच्या गव्हाच्या चीका सारखं दिसतं, आणि वर्याच्या तांदुळा सारखी चव असते. इथे रताळ्यासारखं एक मुळ मिळतं, त्यापासून फुंज बनवतात. विविध प्रकारच्या मांसाबरोबर हे खातात. आणि बरोबर बियर प्यायली जाते. बेकरी प्रोडक्टस मध्ये जो अतिशय साधा ब्रेड असतो त्याला डोंकेय'स ब्रेड म्हणतात. आणि जो तिथला उत्तम ब्रेड मानला जातो त्याला देवाचा ब्रेड "पाऊ दे देऊश" असं म्हणतात.
लग्न म्हणजे भारतीय संस्कृतीत असतात तशी समारंभा सारखी वाटली नाहीत. तो एक कौटुंबिक सोहळा म्हणून केला जातो. मुहूर्त वगैरे चा प्रश्नच नसल्यामुळे एक तारीख ठरवून त्या दिवशी मुला कडची मंडळी मुलीकडे येतात. इथे हुंडा मुलाकडून मुलीला दिला जातो. त्यात रोख पैसे, विविध प्रकारचे मद्य आणि कपडे अशा गोष्टी असतात. त्याची यादी मुलीकडचा एक माणूस आधी वाचून दाखवतो. मग त्यात घासाघीस वगैरे करून तो मुद्दा सेटल करण्यात येतो. तो पर्यंत मुलगी आतच असते. हुंडा नक्की झाल्यावर मग तिला बाहेर आणतात आणि नंतर रिंग सेरेमनी होते.हे आपल्या साखरपुड्या सारखंच असतं. (अर्थात हा अंगठी घालण्याचा भाग आपणच पाश्चिमात्य लोकांकडून घेतलाय असा मला वाटतं. नाहीतर टिळा किंवा तिलक हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. असो.) या पुढचा भाग खरा गमतीचा आहे. समजा अजूनही मुलीचे आई-वडील हुंड्या बद्दल असमाधानी असतील तर ते रुसून बसतात आणि मुलीला सासरी घेऊन जायला नकार देतात. मग परत त्यात निगोशिएट करून त्यांचा रुसवा काढला जातो. (थोडक्यात काय, मनासारखं झालं नाही तर रुसणे हे त्याही संस्कृतीत आहेच...) कधी कधी रिंग सेरेमनी च्या वेळी मुलगी लहान असते त्यामुळे नंतरची एखादी तारीख ठरवून मुलीला सासरी घेउन जातात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नंतर मद्यपान जेवण वगैरे करून हे लग्न साजरे केले जाते. आणि सोहळा संपतो.
घरातल्या मृत्यूचा हे लोक घेत असलेला अर्थ काही प्रमाणात सकारात्मक वाटला पण पहिल्यांदाच बघत असल्याकारणाने थोडा चमत्कारिक वाटला. एकदा अशीच घरात बसले होते...अचानक कसली कसली गाणी आणि लोकांचा गलबला ऐकू आला. प्रथम दुर्लक्ष केलं कारण नेहमीच अशी मोठ्ठ्या-मोठ्ठ्यांदा गाणी लावून वीक एंड ला हे लोकं अक्षरशः डोकं उठवतात. समोरच एक शाळाही होती. त्यामुळे शाळा सुटायच्या वेळेला मुलांचाही गोंगाट असायचा. पण नंतर खिडकीत जाउन बघितलं तर समोरच्या इमारती खाली टेबलावर एका माणसाचा फोटो ठेवला होता. त्याच्या दोन्ही बाजूला बुके होते आणि आजूबाजूला खुर्च्या ठेवून लोकं बसलेली होती...नीट निरखून बघितलं तेव्हा समजलं की काही जण रडत होते आणि काही जण सांत्वन करत होते. तेव्हा समजलं की कुणीतरी गेलंय आणि तो प्रकार असाच सलग तीन दिवस चालला. दिवस रात्र त्या फोटो पाशी कुणी ना कुणी बसलेलं असे. आणि झोपायच्या वेळा सोडल्या तर शांत आणि बहुधा दुःखी गाणी लावलेली असत. चौथ्या दिवशी मात्र कहर झाला. त्या दिवशी शनिवार असल्याने मी आणि माझा नवरा घरातच होतो. नेहमीप्रमाणे एक-एक कफे मारावी म्हणून खाली गेलो, तर किमान दोनशे-अडीचशे लोक तिथे जमा झाले होते. त्याच त्या इमारती च्या खाली बुफे मांडलेला होता. शेजारीच बियर च्या बॉटल चे बॉक्सेस होते आणि ती सर्व मंडळी आपण लग्नात बुफे मध्ये जसं आपापल्या ग्रुप बरोबर जेवतो ना, तसं जेवत होती. नटून थटून आलेली नसली तरी तयार होऊन आलेली दिसत होती. मी आणि माझा नवरा चाटच पडलो. आम्हाला वाटलं दुसर्या कुणाच्या घरातच कार्यक्रम असेल. पण शेजारच्या घरात माणूस जाउन तीन दिवस झालेत आणि हे काय? असा आपला अगदी टिपिकल मराठी विचार आमच्या मनात डोकावला. नंतर त्याबद्दल जेव्हा नवर्याच्या ऑफिस मध्ये विचारलं तेव्हा समजलं की हा तिथला रिवाज आहे. तीन दिवस दुःखाचे पाळायचे आणि चौथ्या दिवशी लोकांना बोलावून जेवण द्यायचे. त्या मागे कारण असं की जो माणूस गेलाय त्याबद्दल दुःख वाटणं सहाजिकच आहे पण तो स्वर्गात पोचलाय हे आपण साजरं केलं पाहिजे. ही गोष्ट मला सकारात्मक वाटली.
आपण टी व्ही वर बघतो त्याचाशी मेळ असलेला फक्त इथल्या बायकांचा पोशाखाच आहे. म्हणजे एक सहा वारी साडी एवढं कापड असतं. बहुतेक वेळा त्यावर मोठ्ठी मोठ्ठी फुलांची नक्षी किंवा गडद रंगसंगती असते. त्यातलंच कापड त्या डोक्याला गुंडाळतात, आणि त्याच कापडाचे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट आणि स्कर्ट शिवतात. केसांच्या तर्हा तर अनंत असतात. मुळात तुमच्या केसांची लांबी छोटी असली तरी फरक पडत नाही. कारण दुसरे खोटे केस त्यासाठी वापरतात. खोटे म्हणजे आयात केलेले हे केस असतात. केसांची आयात हा तिथला एक व्यवसाय आहे असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. तर ह्या केसांच्या जुड्या करून खर्या केसांबरोबर त्याच्या वेण्या किंवा पिळे घातले जातात आणि मग त्याच्या हेयरस्टाईल घरच्या घरी करता येतात. प्रत्येक आठवड्याला निराळी हेयरस्टाईल!
तर असं आहे अंगोला पुराण! देश खूपच आकर्षक आहे. शोधणार्याच्या नजरेला बघायला खूप गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या हिंडून बघण्याइतकी सामाजिक सुरक्षितता नाही. कारण २००७ च्या सिव्हील वॉर नंतर अंगोला अजूनही सावरतोय. पैसा हीच सध्या एकमेव गरज असून त्यासाठी शिक्षण हा मार्ग आहे हे अजून उमजायचंय......त्यामुळे जे मिळेल ते विकून पैसे मिळवणे आणि भूक भागवणे हेच ध्येय!
छान लिहिलंय. पहिला भागही
छान लिहिलंय. पहिला भागही वाचला. अजून लिहा.
आवडलं
आवडलं
छान लिहिलय. फुंजी, म्हणजे
छान लिहिलय.
फुंजी, म्हणजे कसाव्याचे पिठ असते. त्याची उकड काढतात. पश्चिम आफ्रिकेत बहुतेक भागात तेच ( म्हणजे कसावा ) मुख्य अन्न आहे.
दोईश बद्दल काहीतरी गफलत असणार, दोईश म्हणजे दोन, दोईश पाव म्हणजे दोन पाव. २५ / २५ क्वांझाचे दोन पाव घेणे सोयीस्कर असते.
बाकी लग्न आणि मृत्यू, याबाबत बहुतेक आफ्रिकन देशांत हिच पद्धत आहे. सहारा वाळवंटाच्या प्रदेशात मात्र स्त्री सत्ता असल्याने, तिथे स्त्रियांना, मुले निवडण्याचा हक्क असतो. पूर्व आफ्रिकेत, खास करुन मसाई समाजात, मूलाला मुलीसाठी गायी वगैरे द्याव्या लागतात.
केसाबाबत त्यांची एक मजबूरी असते. त्यांचे केस स्पायरल वाढतात. उष्ण प्रदेशात त्यात जास्त उष्णता साठते आणि डोके गरम होते. म्हणून केस विणून डोक्यालगत त्याच्या वेण्या घालून, त्यातून बाहेर राहिलेले केस, मेणबत्तीने जाळतात. असे केल्याने हवा खेळती राहून डोके थंड राहते. कृत्रिम केस बसवणे हे मात्र, फॅड.
इथे लहान मुली, केसांना बरेच मणी लावतात. त्या खेळताना / बागडताना ते छानच दिसतात.
मुले मात्र अजिबात केस वाढवत नाहीत. ( पहिल्यांदा आफ्रिकेत उतरलो त्यावेळी, एकाचवेळी सगळ्यांच्या आई वडलांचे काय बरेवाईट झाले का ? असा अभद्र विचार मनात आला होता. )
छान लिहिताय ! बरीच नवीन
छान लिहिताय ! बरीच नवीन माहिती मिळाली.
छान लिहीताय.
छान लिहीताय.
मस्त वाटतंय वाचताना. लिहित
मस्त वाटतंय वाचताना. लिहित रहा.
दिनेशदा दोईश म्हणजे २ आणि
दिनेशदा
दोईश म्हणजे २ आणि देउश म्हणजे देव........
मला अंक पाठ झालेत आता.....महिन्याचं समान गेले सहा महिने भरल्यामुळे......
इथे लहान मुली, केसांना बरेच
इथे लहान मुली, केसांना बरेच मणी लावतात. त्या खेळताना / बागडताना ते छानच दिसतात. >>>>>
मला फक्त इथली लहान बाळच आवडतात...........
बाकी सगळ गोड वगैरे वाटण्याच्या पलीकडच आहे.
श्री, स्वाती,
श्री, स्वाती, मामी
धन्यवाद..........लिखाणाची आवड होतीच पण मायबोलीवर आल्यापासून लिहावच लागल......कन्ट्रोल करण शक्यच नव्हत......
खूपजणांना होतं असं.
खूपजणांना होतं असं.
म्हणजे एक सहा वारी साडी एवढं
म्हणजे एक सहा वारी साडी एवढं कापड असतं.>>>>>
तसलं एक कापड मला नवर्याच्या ऑफिस मधल्या एकांच्या बायकोने दिलंय गिफ्ट म्हणून.....त्यांना इंडिअन फूड खायचं होतं म्हणून घरी बोलवलं होतं मी......
काय करणारे काय माहीत त्या कपड्याच? आता डिसेंबर मध्ये भारतात जाताना नेसून जाईन म्हणते....सासू सासरे चक्कर येउन पडतील.......जाताना बरी होती म्हणतील......:D
लुआंडा म्हटले कि "दिलीप
लुआंडा म्हटले कि "दिलीप प्रभावळकर" आठवले..तिथली शिक्षण पद्धती,लग्न झालेल्या मुलीचे सामाजिक अधिकार/स्वतंत्रता,फळं-पालेभाज्या,पिकं,हवामान याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल.
छान लिहिताय. अजून तिथल्या
छान लिहिताय. अजून तिथल्या लोकांबद्दल वाचायला आवडेल
जाह्नवी, मस्त लिहिलयस. नविनच
जाह्नवी, मस्त लिहिलयस. नविनच माहीती मिळती आहे.
पण एवढ्यातच संपवू नकोस. अजुन खूप वाचायला, फोटो बघायला आवडेल अंगोला बद्दल. नक्की लिही वाट बघती आहे तुझ्या पुढच्या लेखाची.
नक्कीच अनु ३ .... दिनेशदा नी
नक्कीच अनु ३ ....
दिनेशदा नी सुद्धा आधी काही लेख लेहिले आहेत अंगोला बद्दल. त्यामुळे मी जरा वेळ घेते पुढच्या लेखासाठी.....नवीन आणि वेगळी माहिती शोधते....फोटोज मिळाले तर उत्तमच....आणि मग पुढचा लेख लिहिते.......
मस्त लिहिलंयस जाह्नवी! होतं
मस्त लिहिलंयस जाह्नवी!
होतं असं बर्याच जणाना
जान्हवी, आम्ही दिवसभर ऑफिसात
जान्हवी, आम्ही दिवसभर ऑफिसात असतो त्यामूळे आमचा वेळ आणि दिवस कसा जातो ते कळतच नाही,
तूम्हाला कंटाळा येणे साहजिकच आहे.
पण एखाद्या देशात, रिकामा वेळ कसा सत्कारणी लावायचा, यासाठी शोभा बोंद्रे यांचे, लेगॉसचे दिवस, हे पुस्तक
अवश्य वाचा. खुपच सुंदर अनुभव आहेत ते.
मस्त लिहिलंय..... भारीच दिसतो
मस्त लिहिलंय.....
भारीच दिसतो आहे हा देश .....
फोटो ??
छान लिहीले आहेत जान्हवी
छान लिहीले आहेत जान्हवी दोन्ही भाग
अजून जाणून घ्यायला आवडेल अंगोलाविषयी. फोटो नाही टाकले या भागात? टाका बर? 
सुंदर लिहिलंय ! पहिल्या
सुंदर लिहिलंय ! पहिल्या भागाचि लिंक देता का ? आत्ता मिळाले तर बघतेच.
प्रज्ञा१२३.....ही पहिल्या
प्रज्ञा१२३.....ही पहिल्या भागाची लिन्क....
http://www.maayboli.com/node/38675
(No subject)
मस्त लिहिलेत दोन्ही भाग!!!
मस्त लिहिलेत दोन्ही भाग!!!
मस्त आहे ही मालिका. एका
मस्त आहे ही मालिका. एका वेगळ्या देशाची ओळख. आपले दिनेशदा पण तिकडेच आहेत. तुम्ही मागच्या भागात काही फोटो टाकले होते, त्या वरुन एकंदर परिस्थीतीची ओळख होते.
ह्याची मालिका करा. लेख चांगले होत आहेत.....
छान लेख ह्याची मालिका करा.
छान लेख
ह्याची मालिका करा. लेख चांगले होत आहेत..... मोकिमी>>+१
चांगली आहे मालिका! >> अशी
चांगली आहे मालिका!
>> अशी मोठ्ठ्या-मोठ्ठ्यांदा गाणी लावून वीक एंड ला हे लोकं अक्षरशः डोकं उठवतात.
हे लोकं? आपल्याकडे काय वेगळं आहे?
मस्त >>>>>>>> बोले तो झकासच
मस्त >>>>>>>> बोले तो झकासच वर्णन >>>>अस कुणीतरी प्रत्येक देशाच लिहील तर किती बरं होईल