हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Sonyachya-Dhurance-Thasake.html
---------------------------------------------
पूर्णपणे भिन्न भाषेशी, संस्कृतीशी, जीवनमानाशी काही कारणाने संबंध आला, तर त्याची तुलना आपल्या स्वतःच्या राहणीमानाशी, संस्कृतीशी करणे, दोन्हींतली साम्यस्थळे शोधणे, विरोधाभासांवर बोट ठेवणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी आठ-पंधरा दिवसांची परदेशी सहल केली, तरी प्रत्येकाच्या मनात अशा तौलनिक निरीक्षणांचा भरपूर साठा जमा होतो. मग काहीजण त्याला प्रकट रूप देतात, गप्पांचे फड रंगवून आपले अनुभवरूपी किस्से इतरांना सांगतात. त्या सहल-संचिताचा जीव तेवढाच असतो.
पण जेव्हा पोटापाण्यासाठी प्रदीर्घ काळ परदेशात वास्तव्य करण्याची वेळ येते, तेव्हा परक्या संस्कृतीशी जुळवून घेतानाच्या अपरिहार्यतेतून झालेली सुरूवातीची ओढाताण, स्वतःला त्या मुशीत जाणीवपूर्वक घडवत जाण्याचा हळूहळू झालेला सराव आणि त्या ओघात व्यक्तीमत्त्व आणि वयोमान या दोहोंपरत्त्वे स्वतःशीच नोंदली गेलेली विविध निरीक्षणे ही नुसती निरीक्षणे न राहता सखोल आणि अभ्यासू चिंतनाची डूब घेत मनाचा तळ गाठतात.
‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे डॉ. उज्ज्वला दळवी यांनी केलेले असेच एक प्रकारचे सखोल आणि अभ्यासू चिंतन आहे. हे चिंतन जगासमोर आणताना त्याचे स्वरूप तितकेच अभ्यासू किंवा गंभीर ठेवण्याऐवजी त्यांनी हलक्याफुलक्या भाषेची निवड केली आहे. हा देखील एक प्रकारे गप्पांचा फडच आहे. हे खरे तर जरासे कठीणच काम; पण आपल्या उपजत विनोदबुध्दीला हाती धरत त्यांनी ते यशस्वीपणे पार पाडले आहे.
पुस्तकाचे उपशीर्षक ‘पाव शतकी सौदी अनुभव’ वाचून हे लगेच लक्षात येते, की साधारण पंचवीस वर्षांचा लेखाजोखा म्हणता येईल असे हे लिखाण आहे. हा अंदाज बांधत असतानाच त्यातल्या ‘सौदी’ या शब्दापाशी अवचित ठेच लागते; त्या देशाबद्दलची तुटपुंजी आणि ऐकीव माहिती, अनेक समज-गैरसमज यांची डोक्यात गर्दी व्हायला लागते. पण सतीश भावसार यांच्या अतिशय खट्याळ अशा मुखपृष्ठाचा हात धरून आपण कधी पुस्तकाच्या अंतरंगात शिरतो याचा आपल्याला पत्ताही लागत नाही.
वैद्यकीय सेवेच्या सौदी आमंत्रणाचा स्वीकार करून दळवी दांपत्याने आपल्या अन्य काही सहकार्यांसमवेत जून १९८५मधे सौदी अरेबियाच्या भूमीवर पाऊल ठेवले, ते उपरोल्लेखित समज-गैरसमजांचे बोट धरूनच. तिथे लगेचच त्यांना पहिला सौदी धक्का बसला; भाषेच्या भल्याथोरल्या अडसराने मामला अधिकच कठीण करून ठेवला. पण अपरिहार्यता म्हणा किंवा स्वयंनिर्णयावरील ठाम विश्वास म्हणा, शांत मनाने आणि डोक्याने, समजुतदारपणाने, आणि सोबतच्या स्वकीयांच्या साथीने त्यांनी हा पहिला अडथळा पार केला आणि सुरू झाली त्यांची त्या देशासोबतची पाव शतकी साथसोबत.
नित्य नव्या आव्हानांना सामोरे जात, हिंदू आणि इस्लाम धर्मांतील टोकाचे विरोधाभास सूज्ञपणे टिपत, बुरख्यासारख्या काही कर्मठ बाबींना त्वरित अंगवळणी पाडून घेत त्यांचा तिथला दिनक्रम सुरू झाला. ही संपूर्ण प्रक्रीया छोट्या-छोट्या किश्श्यांच्या स्वरूपात अतिशय सूक्ष्मपणे शब्दबध्द केली गेली आहे. ते करतानाची भाषा अतिशय ओघवती आहे. तसेच, ‘एक-एक दिवस ढकलण्याचा’ सूर कुठेही आळवला गेलेला नाही. त्यासाठी लेखिकेला मनोमन दाद द्यावीशी वाटते.
तेथील वैद्यकीय सेवेतील बहुतांश काळ त्यांनी ‘उम्म खद्रा’ या अतिशय मागासलेल्या खेड्यात व्यतित केला. त्यांच्या हॉस्पिटलमधे रुग्ण म्हणून येणार्यांमधे आधुनिक जगाचे मुळीच वारे न लागलेल्या भटक्या बेदू जमातीतील लोकांचा भरणा अधिक होता. या लोकांच्या सहवासात आल्यामुळे लेखिकेला हळूहळू त्यांची बोलीभाषा आत्मसात करावी लागली. कारण त्याशिवाय एक डॉक्टर म्हणून रुग्णांशी ऋणानुबंध निर्माण होणे शक्यच झाले नसते. कालौघात भाषेचा अडसर थोडा थोडा दूर होत गेला. तरीही अधूनमधून ठेचकाळायला होतच असे. वेळप्रसंगी अनवधानाने जरासे निराळे शब्द वापरले गेल्याने गैरसमज निर्माण होत; तर कधी अगदी फटफजिती देखील होई. रियाधच्या विमानतळावर कानावर पडलेला पहिला सौदी शब्द ‘याल्ला’ आणि त्यापासून सुरू झालेला अरबी भाषेसोबतचा आपला प्रवास लेखिकेने अतिशय मनोरंजक पध्दतीने मांडला आहे. निवेदनाच्या ओघात मराठी आणि सौदी भाषेतली साम्यस्थळे अनेक ठिकाणी दाखवून दिलेली आहेत. विविध अरबी राष्ट्रांतील बोलीभाषेतील काही ठळक फरकही दर्शवले आहेत. ते सारे वाचताना आपण अगदी गुंगून जातो.
तेथील रमादानमधील आणि लग्नकार्यांतील मेजवान्यांचे, उम्म खद्रामधील बाजार, खरेदी यांचे वर्णनही असेच खिळवून ठेवणारे आहे. त्या भूमीखाली असलेल्या तेलाने तिथे आणलेली समृध्दी या वर्णनांतून पदोपदी प्रत्ययास येते. तसेच वाळवंटातील रखरखाट, वाळूच्या वादळांमुळे दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, त्यापायी उद्भवणार्या वातावरणाशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नसणारे तिथले समाजजीवन याचे अगदी चित्रदर्शी वर्णन लेखिका करते. तेथील स्त्रिया-पुरुषांचे, लहान मुलांचे पेहराव, दूरदूर वाळवंटात विखुरलेली त्यांची घरे, दळणवळणाची साधने, पाहुणचाराच्या पध्दती, हॉस्पिटलमधे येणार्या रुग्णांचे विविध नमुने, त्यातून प्रचितीस येणारा शिक्षणाचा अभाव, धर्मावरील कडवी निष्ठा हे दर्शवणारे अगदी बारीकसारिक तपशील नर्मविनोदी शैलीत नमूद केले गेलेले आहेत.
शैली जरी खुसखुशीत नर्मविनोदी असली, तरी या सर्व वर्णनातून समोर येणारी एक बाब काळजाला चरे पाडून जाते; ती म्हणजे तेथील स्त्रियांच्या वाटेला येणारे अपरिमित कष्ट आणि त्यांना मिळणारी कस्पटासमान वागणूक. त्या दृष्टीकोनातून बोलायचे झाले, तर बुरख्याची सक्ती हे तर केवळ हिमनगाचे एक टोक म्हणायला हवे. कुटुंबनियोजनाला त्या धर्माचा असलेला विरोध आणि त्यापायी दर घरटी जन्माला येणारे पोरांचे लेंढार यात घरच्या स्त्रीच्या हालअपेष्टांना पारावार राहत नाही. बिजवराशी किंवा वार्धक्याने जर्जर झालेल्या पुरूषांशी विवाह कराव्या लागणार्या तरूण मुलींचीही काही उदाहरणे लेखिका देते. अशा मुली मग काही ना काही कारणे काढून हॉस्पिटलमधे भरती होत. लेखिकेच्याच शब्दांत सांगायचे, तर बाहेर काडीचीही किंमत नसणार्या बायका हॉस्पिटलमधे येऊन आपले सगळे चोचले पुरवून घेत. मात्र या संदर्भातील वर्णन करताना स्त्रियांना कराव्या लागणार्या अति स्वयंपाककामाबद्दलची सौदी म्हण किंवा सौदी बायकांनी दुसर्याच्या घरी राबणे कसे कमीपणाचे मानले जात असे याबद्दलची टिप्पणी यांसारख्या काही मुद्द्यांची पुनरुक्ती झालेली आहे. पुढील आवृत्तीच्या वेळी हे टाळण्याचा प्रयत्न जरूर केला जावा.
हे संपूर्ण लेखन बोली भाषेत केले गेलेले आहे. कुठेही सौदी अरेबियाला, तिथल्या रुढी-परंपरांना अथवा इस्लामला नावे ठेवली गेलेली नाहीत, की वैयक्तिक मतांचा मुलामा चढवून बेजबाबदार विधाने केली गेलेली नाहीत. जे जे समोर येत गेले, ते तसेच स्वीकारण्याची वृत्ती वाचताना शब्दाशब्दांतून आपल्याला जाणवत राहते आणि मनोगतातील सुरूवातीचे ‘हे प्रवासवर्णन नाही की आत्मकथनही नाही; तर मध्यमवर्गीय मराठी मनाला जे काही प्रकर्षाने वेगळे म्हणून दिसले, जाणवले तेवढेच मांडलेले आहे’ हे आपले शब्द लेखिका खरे करून दाखवते. उदाहरणार्थ, एके ठिकाणी केले गेलेले पहाटेच्या वेळी कानावर आलेल्या अजानचे वर्णन मनाला अतिशय स्पर्शून जाते.
अशा प्रकारच्या पुस्तकांमधे बहुतेकवेळा लेखकाच्या वैयक्तिक संग्रहातील छायाचित्रांचा एक विभाग हमखास पहायला मिळतो. या पुस्तकात ते झालेले नाही. अर्थात त्याची कुठेही उणीवही भासत नाही. अपवाद केवळ एकच. ‘वाळवंटी सूर मारिला’ या प्रकरणात एके ठिकाणी सॅण्डरोजेसचे अगदी रसभरित वर्णन आहे. ते वाचताना पटकन असे वाटून जाते, की सोबत याचे एखादे छायाचित्र दिले गेले असते, तर अधिक चांगले झाले असते.
बावीस ते सव्वीस या शेवटच्या पाच प्रकरणांत लेखिकेच्या निवेदनाने सर्वंकष वर्णनाचा बाज घेतला आहे. ते वाचन असताना मनोगतातील ‘काही माहिती सौदी पेशंटांनी दिली आहे तर काही तिथल्या अधिकृत वर्तमानपत्रांतून, माहितीपत्रकांतून आणि वेबसाईट्सवरून घेतली आहे’ या शब्दांचा खर्या अर्थाने प्रत्यय येतो. या अनुभवांचे आणि आठवणींचे पुस्तक करण्याचे ठरल्यावर त्यात या वाढीव प्रकरणांची भर पडली असण्याची शक्यता आहे. अर्थात ती प्रकरणेही आधीच्या प्रकरणांइतकीच सुरस आणि वाचनीय आहेत हे सांगणे न लगे.
पुस्तकाचे सादरीकरण नीटनेटके आहे. काही मोजके अपवाद वगळता मुद्रणदोषही फारसे नाहीत. एक बाब मात्र जराशी खटकते. सौदी अरेबियातील भारतीय पण बिगरमराठी व्यक्तींच्या तोंडचे संवाद जसेच्या तसे हिंदीत दिले गेले आहेत. काही ठिकाणी असे परिच्छेदच्या परिच्छेद आहेत. वाचनाच्या ओघात यामुळे निश्चितच अडथळा निर्माण होतो. अशा परिच्छेदांतील पहिली एक-दोन वाक्ये हिंदीत देऊन नंतर स्वच्छ मराठीत उर्वरित मजकूर दिला गेला असता तर अधिक चांगले झाले असते असे वाटते.
या काही तुरळक बाबी वगळल्या तर निखळ मनोरंजनाच्या निकषावर हे पुस्तक अगदी शंभर टक्के खरे उतरते; वाचकाला काहीतरी हाती गवसल्याचा निश्चित आनंद देते. मुख्य म्हणजे सौदी अरेबिया या देशाबद्दलचे आपल्या मनातले अनेक गैरसमज हे पुस्तक दूर करते.
डॉ. स्नेहलता देशमुख यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, १९८५तला वाळवंटातला ‘सौदी अरेबिया’ व आजच्या २०१०मधला ‘सौदी अरेबिया’ यांत इतका आमूलाग्र बदल झालाय हे लक्षात यायला या पुस्तकातले पानन् पान वाचायला हवे.
************
सोन्याच्या धुराचे ठसके
पाव शतकी सौदी अनुभव
लेखिका - डॉ. उज्ज्वला दळवी.
ग्रंथाली प्रकाशन. पृष्ठे - २७१. मूल्य - २७५ रुपये.
सौदी अरेबिया, एका बाजूने
सौदी अरेबिया, एका बाजूने प्रचंड समृद्धी, विकास आणि अद्ययावत सोइ सुविधांनी सज्ज अशी शहरे पण त्याचबरोबर परंपरागत अरब समाज असे परस्परविरोधी चित्र समोर येते. परिस्थिती आहेही तशीच - पाश्चात्य देशातील सुखवस्तूनची मोठी बाजारपेठ आणि त्याचबरोबर परंपरेने चालत आलेला प्रगैताहासिक चाली रीतींवर आधारित समाजसंघटन. अद्ययावत संसाधने आणि बक्कळ समृद्धी पण त्याचबरोबर सामाजिक बदलात अगदीच मागे असा नव्या जुन्याचा संगम असलेला हा प्रदेश. ओमान आणि येमेन हे तुलनेने कमी संपन्न देश वगळता सर्वच देशांत हा विरोधाभास दिसून येतो. पाश्चात्य देशांतील उपभोग्य वस्तूंबरोबरच अद्ययावत शस्त्रास्त्रे, सर्व प्रकारचे विलास आणि ऐश आरामाची साधने, कार्यक्रम उदा फॉर्म्युला वन, उंटाच्या शर्यती, महागडे व्यापार प्रदर्शने इत्यादी इथे भरताना दिसतात. परंतु अंतर्गत समाजरचना आणि प्रथा, रिवाज हे अजूनही शेकडो वर्षे जुन्या अशा विचित्र द्वंद्वात हा समाज जगताना दिसतो. या विसंगत वागण्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे उत्तुंग इमारती आणि झगमगाटीत उभ्या असलेल्या शहरातील महिला मात्र बुरख्याच्या आत आणि त्यांना सर्वाजनिक जीवनाची सर्व दारे बंद! नोकरीधंद्यात नगण्य असे त्यांचे प्रमाण, एकटीने संचार स्वातंत्र्य नाही, ड्रायव्हिंगची, खेळात भाग घेण्याची परवानगी नाही, एकूणच स्वतंत्र असे अस्तित्व या महिलांना नाही. आधुनिक, पाश्चिमात्य देशांचे अनेक बाबतीत अनुकरण करणारे हे देश जुन्या टोळीच्या समाज संरचनेस अगदी घट्ट धरून बसताना दिसतात. इथे धर्म आणि टोळींचा रिवाज असा फरक करण्याची गरज आहे. स्त्रियांचे एकूण समाजातील स्थान, त्यांनी कसे वागावे, राहावे याबाबतीतले नियम हे मुख्यतः अरबस्तानातल्या टोळी समाजाचे नियम परंतु ते धार्मिक नियम म्हणून इथून प्रसारित होताना दिसतात आणि इतर समाजावर लादलेले दिसतात. उदा मुस्लिम स्त्रिया वापरत असलेला काळा बुरखा हा खरे तर इथल्या खालिजी टोळीतील स्त्रियांचा परिवेश परंतु आज जगात - शिया धर्मीय सोडता हाच मुस्लिम स्त्रियांचा वेश आणि त्याला एक धार्मिक अधिष्ठान अशी गल्लत दिसते. महाराष्ट्रातील अगदी छोट्या खेड्यापाड्यात हे लोन पोहचलेले आहे. काही दशकांपूर्वी इथे आणि उत्तर भारताचा अपवाद सोडता प्रचलित असलेली साडी आता कमी दिसू लागली आहे. हाच बदल पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये झालाच पण आज पाश्चिमात्य देशांमध्येही मुस्लिम स्त्रिया स्वतःची वेगळी अस्मिता दाखवण्यासाठी हा परिवेश अट्टाहासाने धारण करताना दिसतात. त्यांच्या व्यक्ती व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून आज इतरांनी त्याला स्वीकृती दिलेली दिसते आणि असेलही तो व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतिक - कोणी काय घालावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि सोयीचा भाग - स्वातंत्र्यपूर्व काळात नववारी सोडून कुर्ता पायजमा घालता यावा यासाठी तेव्हा घराघरात वाद झालेच होते किंवा माझ्या पिढीला जीन्स घालता यावी म्हणून वाद झाले होते -- आजच्या तरुणांना यात वाद काय घालायचा इतपत जीन्स आता सर्वमान्य झालीच आहे. परंतु जेव्हा एखादी गोष्ट धर्माचा भाग म्हणून स्वीकारली जाते आणि लाद्लीही जाते तेव्हा ती नक्कीच आक्षेपार्ह असणारी गोष्ट. मुद्दा हा कि धर्म आणि संस्कृती आणि मुस्लिमांच्या संदर्भात इस्लाम आणि अरबांची टोळी संस्कृती यात फरक केला जात नाही, परिणामी जे या अरब देशांत घडते त्याला धार्मिक मान्यता म्हणून सर्व मुस्लिम जगात ते स्वीकारले जाते.
<<<उदा मुस्लिम स्त्रिया वापरत
<<<उदा मुस्लिम स्त्रिया वापरत असलेला काळा बुरखा हा खरे तर इथल्या खालिजी टोळीतील स्त्रियांचा परिवेश परंतु आज जगात - शिया धर्मीय सोडता हाच मुस्लिम स्त्रियांचा वेश आणि त्याला एक धार्मिक अधिष्ठान अशी गल्लत दिसते.>>>
शबाना, ओह! असं आहे का? धन्यवाद, या खुलासेवार पोस्टीबद्दल. मला अजूनपर्यंत बुरखा ही इस्लामचीच शिकवण असे वाटत होते.
महाराष्ट्रातील अगदी छोट्या खेड्यापाड्यात हे लोन पोहचलेले आहे. <<< सहमत. अलीकडेच मी माझ्या गावाला जाऊन आलो. पेठनाक्यावरून कराडला एसटीने येताना त्यात दोन बुरखाधारी महिला चढल्या. मला थोडे आश्चर्य वाटले. कारण इतकी वर्षं किंवा लहाणपणी या भागात असा वेष माझ्या पाहण्यात (कधीच) आला नव्हता. सहज म्हणून बाकी एसटीत जजर टाकली तर आणखी एक दोन सहप्रवाश्या त्या वेषात दिसल्या. मला वाटले कदाचित लहानपणी माझे जग लहान असेल म्हणून पाहण्यात आले नसेल.
बाकी पोस्टला अनुमोदन.
शबाना, तुमचा वरील संदेश पटला.
शबाना,
तुमचा वरील संदेश पटला. अरबीकरण आणि इस्लामीकरण वेगवेगळे मानले जातात. जसे जागतिकीकरण (ग्लोबलायझेशन) व पाश्चात्यीकरण (वेस्टर्नायझेशन) वेगळे आहेत.
मी ऐकलंय की अगदी सुरूवातीला बुरखा ऐच्छिक होता म्हणून.
आ.न.,
-गा.पै.
शबाना, आवडली पोस्ट. (आज
शबाना,
आवडली पोस्ट.
(आज पाहिली.)
अफगाणिस्थानात निळा बुरखा
अफगाणिस्थानात निळा बुरखा वापरतात....
http://www.dawn.com/news/1102048/the-difference-between-black-and-blue
फारच सुंदर रीतीने परिचय करुन
फारच सुंदर रीतीने परिचय करुन दिलास..लले.. मस्त दिस्तंय पुस्तक
परवा लायब्ररी मधे हे पूस्तक
परवा लायब्ररी मधे हे पूस्तक मिळाले.... पूर्ण वाचून काढले.... फारच छान..... तुझं परिक्षण एकदम छान....
हा पुस्तक परिचय वाचुनच पुस्तक
हा पुस्तक परिचय वाचुनच पुस्तक परवा आणले. अजुन वाचते आहे. बहुदा आज पुर्ण होईल. आवडले.
ह्या स्त्रिया अश्या गोष्टींना
ह्या स्त्रिया अश्या गोष्टींना विरोध कसा करत नाहीत . कडक उन्हाळ्यात काळ्या रंगाचा , अंगाला लपेटलेला बुरखा घालून वावरताना ह्यांना त्रास होत नसेल का ? मुस्लिम स्त्रिया त्रासदायक धार्मिक गोष्टींना कधीच विरोध करताना दिसत नाहीत . बुरखा घालणं असो , घरातच कोंडून राहणं असो, शिक्षण घेण्याला बंदी असो, भरमसाठ पोरं पैदा कारण असो कि एका माणसाच्या ४-४ बायका असणं bla bla bla
ह्या स्त्रिया अश्या गोष्टींना
ह्या स्त्रिया अश्या गोष्टींना विरोध कसा करत नाहीत>>>>>>>>सुरक्षित परिघात आपण(बाई जात म्हणून म्हणतेय कोणताही धर्म नव्हे) वावरत असतो.त्यामुळे अशा गोष्टी छोट्या वाटल्या तरीही किती कठीण असतात याची फक्त कल्पना केलेली बरी.
देवकी अश्या गोष्टी कठीण
देवकी अश्या गोष्टी कठीण असल्या तरी अशक्य नसतात . आपल्या समाजात नाही का किती सुधारणा झाल्यात . आपण सुरक्षित परिघात आहोत हे जास्त सयुक्तिक नाही वाटत . त्या असुरक्षित परिघात आहेत हे जास्त सयुक्तिक वाटतं
Pages