हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Sonyachya-Dhurance-Thasake.html
---------------------------------------------
पूर्णपणे भिन्न भाषेशी, संस्कृतीशी, जीवनमानाशी काही कारणाने संबंध आला, तर त्याची तुलना आपल्या स्वतःच्या राहणीमानाशी, संस्कृतीशी करणे, दोन्हींतली साम्यस्थळे शोधणे, विरोधाभासांवर बोट ठेवणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी आठ-पंधरा दिवसांची परदेशी सहल केली, तरी प्रत्येकाच्या मनात अशा तौलनिक निरीक्षणांचा भरपूर साठा जमा होतो. मग काहीजण त्याला प्रकट रूप देतात, गप्पांचे फड रंगवून आपले अनुभवरूपी किस्से इतरांना सांगतात. त्या सहल-संचिताचा जीव तेवढाच असतो.
पण जेव्हा पोटापाण्यासाठी प्रदीर्घ काळ परदेशात वास्तव्य करण्याची वेळ येते, तेव्हा परक्या संस्कृतीशी जुळवून घेतानाच्या अपरिहार्यतेतून झालेली सुरूवातीची ओढाताण, स्वतःला त्या मुशीत जाणीवपूर्वक घडवत जाण्याचा हळूहळू झालेला सराव आणि त्या ओघात व्यक्तीमत्त्व आणि वयोमान या दोहोंपरत्त्वे स्वतःशीच नोंदली गेलेली विविध निरीक्षणे ही नुसती निरीक्षणे न राहता सखोल आणि अभ्यासू चिंतनाची डूब घेत मनाचा तळ गाठतात.
‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे डॉ. उज्ज्वला दळवी यांनी केलेले असेच एक प्रकारचे सखोल आणि अभ्यासू चिंतन आहे. हे चिंतन जगासमोर आणताना त्याचे स्वरूप तितकेच अभ्यासू किंवा गंभीर ठेवण्याऐवजी त्यांनी हलक्याफुलक्या भाषेची निवड केली आहे. हा देखील एक प्रकारे गप्पांचा फडच आहे. हे खरे तर जरासे कठीणच काम; पण आपल्या उपजत विनोदबुध्दीला हाती धरत त्यांनी ते यशस्वीपणे पार पाडले आहे.
पुस्तकाचे उपशीर्षक ‘पाव शतकी सौदी अनुभव’ वाचून हे लगेच लक्षात येते, की साधारण पंचवीस वर्षांचा लेखाजोखा म्हणता येईल असे हे लिखाण आहे. हा अंदाज बांधत असतानाच त्यातल्या ‘सौदी’ या शब्दापाशी अवचित ठेच लागते; त्या देशाबद्दलची तुटपुंजी आणि ऐकीव माहिती, अनेक समज-गैरसमज यांची डोक्यात गर्दी व्हायला लागते. पण सतीश भावसार यांच्या अतिशय खट्याळ अशा मुखपृष्ठाचा हात धरून आपण कधी पुस्तकाच्या अंतरंगात शिरतो याचा आपल्याला पत्ताही लागत नाही.
वैद्यकीय सेवेच्या सौदी आमंत्रणाचा स्वीकार करून दळवी दांपत्याने आपल्या अन्य काही सहकार्यांसमवेत जून १९८५मधे सौदी अरेबियाच्या भूमीवर पाऊल ठेवले, ते उपरोल्लेखित समज-गैरसमजांचे बोट धरूनच. तिथे लगेचच त्यांना पहिला सौदी धक्का बसला; भाषेच्या भल्याथोरल्या अडसराने मामला अधिकच कठीण करून ठेवला. पण अपरिहार्यता म्हणा किंवा स्वयंनिर्णयावरील ठाम विश्वास म्हणा, शांत मनाने आणि डोक्याने, समजुतदारपणाने, आणि सोबतच्या स्वकीयांच्या साथीने त्यांनी हा पहिला अडथळा पार केला आणि सुरू झाली त्यांची त्या देशासोबतची पाव शतकी साथसोबत.
नित्य नव्या आव्हानांना सामोरे जात, हिंदू आणि इस्लाम धर्मांतील टोकाचे विरोधाभास सूज्ञपणे टिपत, बुरख्यासारख्या काही कर्मठ बाबींना त्वरित अंगवळणी पाडून घेत त्यांचा तिथला दिनक्रम सुरू झाला. ही संपूर्ण प्रक्रीया छोट्या-छोट्या किश्श्यांच्या स्वरूपात अतिशय सूक्ष्मपणे शब्दबध्द केली गेली आहे. ते करतानाची भाषा अतिशय ओघवती आहे. तसेच, ‘एक-एक दिवस ढकलण्याचा’ सूर कुठेही आळवला गेलेला नाही. त्यासाठी लेखिकेला मनोमन दाद द्यावीशी वाटते.
तेथील वैद्यकीय सेवेतील बहुतांश काळ त्यांनी ‘उम्म खद्रा’ या अतिशय मागासलेल्या खेड्यात व्यतित केला. त्यांच्या हॉस्पिटलमधे रुग्ण म्हणून येणार्यांमधे आधुनिक जगाचे मुळीच वारे न लागलेल्या भटक्या बेदू जमातीतील लोकांचा भरणा अधिक होता. या लोकांच्या सहवासात आल्यामुळे लेखिकेला हळूहळू त्यांची बोलीभाषा आत्मसात करावी लागली. कारण त्याशिवाय एक डॉक्टर म्हणून रुग्णांशी ऋणानुबंध निर्माण होणे शक्यच झाले नसते. कालौघात भाषेचा अडसर थोडा थोडा दूर होत गेला. तरीही अधूनमधून ठेचकाळायला होतच असे. वेळप्रसंगी अनवधानाने जरासे निराळे शब्द वापरले गेल्याने गैरसमज निर्माण होत; तर कधी अगदी फटफजिती देखील होई. रियाधच्या विमानतळावर कानावर पडलेला पहिला सौदी शब्द ‘याल्ला’ आणि त्यापासून सुरू झालेला अरबी भाषेसोबतचा आपला प्रवास लेखिकेने अतिशय मनोरंजक पध्दतीने मांडला आहे. निवेदनाच्या ओघात मराठी आणि सौदी भाषेतली साम्यस्थळे अनेक ठिकाणी दाखवून दिलेली आहेत. विविध अरबी राष्ट्रांतील बोलीभाषेतील काही ठळक फरकही दर्शवले आहेत. ते सारे वाचताना आपण अगदी गुंगून जातो.
तेथील रमादानमधील आणि लग्नकार्यांतील मेजवान्यांचे, उम्म खद्रामधील बाजार, खरेदी यांचे वर्णनही असेच खिळवून ठेवणारे आहे. त्या भूमीखाली असलेल्या तेलाने तिथे आणलेली समृध्दी या वर्णनांतून पदोपदी प्रत्ययास येते. तसेच वाळवंटातील रखरखाट, वाळूच्या वादळांमुळे दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, त्यापायी उद्भवणार्या वातावरणाशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नसणारे तिथले समाजजीवन याचे अगदी चित्रदर्शी वर्णन लेखिका करते. तेथील स्त्रिया-पुरुषांचे, लहान मुलांचे पेहराव, दूरदूर वाळवंटात विखुरलेली त्यांची घरे, दळणवळणाची साधने, पाहुणचाराच्या पध्दती, हॉस्पिटलमधे येणार्या रुग्णांचे विविध नमुने, त्यातून प्रचितीस येणारा शिक्षणाचा अभाव, धर्मावरील कडवी निष्ठा हे दर्शवणारे अगदी बारीकसारिक तपशील नर्मविनोदी शैलीत नमूद केले गेलेले आहेत.
शैली जरी खुसखुशीत नर्मविनोदी असली, तरी या सर्व वर्णनातून समोर येणारी एक बाब काळजाला चरे पाडून जाते; ती म्हणजे तेथील स्त्रियांच्या वाटेला येणारे अपरिमित कष्ट आणि त्यांना मिळणारी कस्पटासमान वागणूक. त्या दृष्टीकोनातून बोलायचे झाले, तर बुरख्याची सक्ती हे तर केवळ हिमनगाचे एक टोक म्हणायला हवे. कुटुंबनियोजनाला त्या धर्माचा असलेला विरोध आणि त्यापायी दर घरटी जन्माला येणारे पोरांचे लेंढार यात घरच्या स्त्रीच्या हालअपेष्टांना पारावार राहत नाही. बिजवराशी किंवा वार्धक्याने जर्जर झालेल्या पुरूषांशी विवाह कराव्या लागणार्या तरूण मुलींचीही काही उदाहरणे लेखिका देते. अशा मुली मग काही ना काही कारणे काढून हॉस्पिटलमधे भरती होत. लेखिकेच्याच शब्दांत सांगायचे, तर बाहेर काडीचीही किंमत नसणार्या बायका हॉस्पिटलमधे येऊन आपले सगळे चोचले पुरवून घेत. मात्र या संदर्भातील वर्णन करताना स्त्रियांना कराव्या लागणार्या अति स्वयंपाककामाबद्दलची सौदी म्हण किंवा सौदी बायकांनी दुसर्याच्या घरी राबणे कसे कमीपणाचे मानले जात असे याबद्दलची टिप्पणी यांसारख्या काही मुद्द्यांची पुनरुक्ती झालेली आहे. पुढील आवृत्तीच्या वेळी हे टाळण्याचा प्रयत्न जरूर केला जावा.
हे संपूर्ण लेखन बोली भाषेत केले गेलेले आहे. कुठेही सौदी अरेबियाला, तिथल्या रुढी-परंपरांना अथवा इस्लामला नावे ठेवली गेलेली नाहीत, की वैयक्तिक मतांचा मुलामा चढवून बेजबाबदार विधाने केली गेलेली नाहीत. जे जे समोर येत गेले, ते तसेच स्वीकारण्याची वृत्ती वाचताना शब्दाशब्दांतून आपल्याला जाणवत राहते आणि मनोगतातील सुरूवातीचे ‘हे प्रवासवर्णन नाही की आत्मकथनही नाही; तर मध्यमवर्गीय मराठी मनाला जे काही प्रकर्षाने वेगळे म्हणून दिसले, जाणवले तेवढेच मांडलेले आहे’ हे आपले शब्द लेखिका खरे करून दाखवते. उदाहरणार्थ, एके ठिकाणी केले गेलेले पहाटेच्या वेळी कानावर आलेल्या अजानचे वर्णन मनाला अतिशय स्पर्शून जाते.
अशा प्रकारच्या पुस्तकांमधे बहुतेकवेळा लेखकाच्या वैयक्तिक संग्रहातील छायाचित्रांचा एक विभाग हमखास पहायला मिळतो. या पुस्तकात ते झालेले नाही. अर्थात त्याची कुठेही उणीवही भासत नाही. अपवाद केवळ एकच. ‘वाळवंटी सूर मारिला’ या प्रकरणात एके ठिकाणी सॅण्डरोजेसचे अगदी रसभरित वर्णन आहे. ते वाचताना पटकन असे वाटून जाते, की सोबत याचे एखादे छायाचित्र दिले गेले असते, तर अधिक चांगले झाले असते.
बावीस ते सव्वीस या शेवटच्या पाच प्रकरणांत लेखिकेच्या निवेदनाने सर्वंकष वर्णनाचा बाज घेतला आहे. ते वाचन असताना मनोगतातील ‘काही माहिती सौदी पेशंटांनी दिली आहे तर काही तिथल्या अधिकृत वर्तमानपत्रांतून, माहितीपत्रकांतून आणि वेबसाईट्सवरून घेतली आहे’ या शब्दांचा खर्या अर्थाने प्रत्यय येतो. या अनुभवांचे आणि आठवणींचे पुस्तक करण्याचे ठरल्यावर त्यात या वाढीव प्रकरणांची भर पडली असण्याची शक्यता आहे. अर्थात ती प्रकरणेही आधीच्या प्रकरणांइतकीच सुरस आणि वाचनीय आहेत हे सांगणे न लगे.
पुस्तकाचे सादरीकरण नीटनेटके आहे. काही मोजके अपवाद वगळता मुद्रणदोषही फारसे नाहीत. एक बाब मात्र जराशी खटकते. सौदी अरेबियातील भारतीय पण बिगरमराठी व्यक्तींच्या तोंडचे संवाद जसेच्या तसे हिंदीत दिले गेले आहेत. काही ठिकाणी असे परिच्छेदच्या परिच्छेद आहेत. वाचनाच्या ओघात यामुळे निश्चितच अडथळा निर्माण होतो. अशा परिच्छेदांतील पहिली एक-दोन वाक्ये हिंदीत देऊन नंतर स्वच्छ मराठीत उर्वरित मजकूर दिला गेला असता तर अधिक चांगले झाले असते असे वाटते.
या काही तुरळक बाबी वगळल्या तर निखळ मनोरंजनाच्या निकषावर हे पुस्तक अगदी शंभर टक्के खरे उतरते; वाचकाला काहीतरी हाती गवसल्याचा निश्चित आनंद देते. मुख्य म्हणजे सौदी अरेबिया या देशाबद्दलचे आपल्या मनातले अनेक गैरसमज हे पुस्तक दूर करते.
डॉ. स्नेहलता देशमुख यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, १९८५तला वाळवंटातला ‘सौदी अरेबिया’ व आजच्या २०१०मधला ‘सौदी अरेबिया’ यांत इतका आमूलाग्र बदल झालाय हे लक्षात यायला या पुस्तकातले पानन् पान वाचायला हवे.
************
सोन्याच्या धुराचे ठसके
पाव शतकी सौदी अनुभव
लेखिका - डॉ. उज्ज्वला दळवी.
ग्रंथाली प्रकाशन. पृष्ठे - २७१. मूल्य - २७५ रुपये.
अरे व्वा, मस्तच परिचय!
अरे व्वा, मस्तच परिचय! धन्यवाद
पुस्तकाचं नाव लईच आवडलंय
पुस्तकाचं नाव लईच आवडलंय
लले अप्रतिम परिचय... नक्की
लले
अप्रतिम परिचय... नक्की घेवुन वाचणार... कारण हा साहित्य प्रकार मला खुप आवडतो
निळु दामलेंचं "उध्वस्थ अफगाणिस्तान", "इस्तंबुल ते कैरो" , शोभा बोंद्रेंचं "लॅगॉस चे दिवस" , डेबोरा एल्वीस चं "अमेरिकन ब्युटी स्कुल" डॉ. लाभसेट्वारांची अमेरिके वरची दोन्ही पुस्तके, अनिल अवचटांचं "अमेरिका" ही अशी पुस्तके माझ्या अत्यंत आवडीची आहेत. परत परत वाचत असते.
आता हे सुध्धा वाचणार
उत्तम पुस्तक असावे . परिचयच
उत्तम पुस्तक असावे . परिचयच उत्तम आहे त्यामुले वाटतेय तसे. टायटल तर एकदम आगळे आणि चपखल आहे...
मोकिमी ची आवडती पुस्तके माझीही आवडती आहेत.
फिरोझ व प्रतिभा रानडे या दांपत्याची अफगाणिस्तानच्या वास्तव्याची पुस्तकेही अशीच थरारक आणि वाचनीय आहेत...
फिरोझ व प्रतिभा रानडे या
फिरोझ व प्रतिभा रानडे या दांपत्याची अफगाणिस्तानच्या वास्तव्याची पुस्तकेही अशीच थरारक आणि वाचनीय आहेत...>>>
हो बाजो.. ते विसलेच होते. प्रतिभा काळें चं ( अस्वस्थ अफगाणिस्तान) हे ही यादीत असुद्या...
निळू दामलेंचं 'अवघड
निळू दामलेंचं 'अवघड अफगाणिस्तान ' आहे ना?
निळू दामलेंचं 'अवघड
निळू दामलेंचं 'अवघड अफगाणिस्तान ' आहे ना>>
हो बाजो... लिहिताना गोंधळ झाला.... स्लिप ऑफ टंग... आय मीन की बोर्ड
बरंच काही (चांगलं) ऐकून आहे
बरंच काही (चांगलं) ऐकून आहे या पुस्तकाबद्दल.
नक्कीच वाचणार !
मस्त लिहिला आहे परिचय.. !
मस्त लिहिला आहे परिचय.. ! वाचायला हवं हे पुस्तक..
धन्यवाद ललिता..
एका छान पुस्तकाचा सुरेख परिचय
एका छान पुस्तकाचा सुरेख परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
लले, धन्यवाद, नक्की वाचणार
लले, धन्यवाद, नक्की वाचणार
मस्त पुस्तक आहे हे..मध्ये
मस्त पुस्तक आहे हे..मध्ये एकदा सहज पाने चाळताना बरे वाटले म्हणुन लायब्ररी मधुन आणले होते...तर एकदम अचानक आवडुन गेले..
परिचय पण मस्तच!
हे पुस्तक जितकं सुंदर आहे
हे पुस्तक जितकं सुंदर आहे त्यापेक्षा १००००००००००० पटीने लेखिका सुंदर आहे. आमच्या मंडळात गणेशोत्सवाला उज्ज्वलाताई आल्या होत्या. पाच मिनिटाच्या अवधीत त्यांनी सर्वांना आपले केले. आम्हाला अगदी भरुन आले होते त्यांचे बोलणे ऐकताना. फारच ममताळु व्यक्तिमत्त्व. कुणीही त्यांच्या प्रेमात पडल्यावाचून रहाणार नाही.
उज्ज्वलाताई माझ्या फेसबुकात आहे. ईमेलवर फोनवर संवाद होत असतो आमचा.
त्यांची लेखनशैली सुंदर आहे. (
त्यांची लेखनशैली सुंदर आहे. ( काही लेख वाचले होते ) पुस्तक परीचय छानच जमलाय.
चांगला पुस्तक परिचय, ललिता.
चांगला पुस्तक परिचय, ललिता.
http://brcgranier.pagesperso-
http://brcgranier.pagesperso-orange.fr/gmeop/Mougenot.html
सँड रोझेस बद्दल इथे माहिती आहे. खुपदा आपण लेखकाकडून चांगल्या फोटोग्राफीची पण अपेक्षा करतो, पण
कधी कधी लेखकाने साकार केलेली शब्दप्रतिमा, हि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, अशा दर्ज्याची असते.
माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी
माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे....ज्याच्या शीर्षकानेच {तसेच भावसार यांच्या कल्पक मुखपृष्ठानेही} ते हाती घ्यावे असेच वाटते. डॉ.उज्ज्वला दळवी यांचे हे अनुभवकथन अगदी समोरासमोर बसून गप्पा मारल्याच्या धाटणीचे आहे, ज्याची छान ओळख ललिता-प्रीती यानी या लेखात करून दिलेली आहेच.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कार्य केलेल्या डॉ.स्नेहलता देशमुख यांच्या उज्ज्वला दळवी या विद्यार्थिनी होत्या, त्यामुळे डॉ.स्नेहलता यानी आपल्या विद्यार्थिनीला दिलेली शाबासकी अत्यंत यथार्थच आहे हे "....ठसके" सिद्ध करते.
या ओळखलेखात ललिता यानी २५-३० वर्षापूर्वीच्या सौदीतील विविध उदाहरणे दिलेली आहेतच, पण आजच्या 'बहुढंगी....अतीश्रीमंत' सौदीपेक्षा बेदू जमात आणि खर्या अर्थाने मेंढपाळ जीवन जगत असलेल्या तेथील जुबैल सारख्या ग्रामीण भागातच दळवी दांपत्याला आपल्या नोकरीची वर्षे काढावी लागल्याने खर्या अर्थाने त्यानी सौदी अरेबिया हा देश पाहिला, अनुभवला असे म्हणता येईल.
वर्षाला जेमतेम ५ इंच पाऊस पाहाणार्या जनतेपुढे आज जगातील झाडून सारी सुखे धो-धो रित्या कोसळत आहेत, सर्व सेवा मान लववून हजर आहेत....हा बदलही उज्ज्वला दळवीनी छान टिपला आहे या पुस्तकात.
[अवांतर होईल, तरीही डॉ.उज्ज्वला दळवी यांच्याविषयी लिहितो : त्यांची शैक्षणिक गुणवत्ता फार प्रभावी आहे. दहावीच्या व बारावीच्या परीक्षेत त्या मुंबई केन्द्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. एम.बी.बी.एस. नंतर त्यानी एम.डी.ही पूर्ण केले तर सौदीला रवाना होण्यापूर्वी त्या डीवाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख पदावर काम करीत होत्या.....
....हा परिचय या पुस्तकात आहेच.]
पुस्तक परिचय आवडला.
पुस्तक परिचय आवडला.
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय!
सुरेख परिचय
सुरेख परिचय
छान पुस्तक परीचय लले!
छान पुस्तक परीचय लले! इंटरेस्टींग वाटतंय पुस्तक, वाचेन नक्की.
मोहन की मीरा, तुम्हाला डेबोरा रॉड्रीग्झचे 'काबूल ब्युटी स्कूल' म्हणायचे आहे का?
नुकतेच वाचले. छान आहे पुस्तक
नुकतेच वाचले. छान आहे पुस्तक - तुमच्या परिचयासारखे.
ललिता, काय सुरेख पुस्तक परिचय
ललिता, काय सुरेख पुस्तक परिचय करून दिला आहेस! नक्की वाचणार. मला कामानिमित्त या देशाच्या वार्या अधूनमधून कराव्या लागतात. अगदी वेगळ्या जगात आल्यासारखा अनुभव प्रत्येक वेळी येतो. आणि इथल्या जनजीवनाविषयीचे कुतुहल प्रत्येक वेळी चाळवते.
चांगला पुस्तक परिचय कित्येक दिवसांनी वाचला.
उत्तम परिचय; पुस्तक नक्की
उत्तम परिचय; पुस्तक नक्की वाचेन.
छान आहे पुस्तक परिचय ..
छान आहे पुस्तक परिचय ..
फार मस्त आहे पुस्तक! एका
फार मस्त आहे पुस्तक! एका रविवारी बैठक मारून संपवलं होतं! छान परिचय!
मस्तच परिचय! धन्यवाद बरच काही
मस्तच परिचय! धन्यवाद
बरच काही चांगलाच ऐकलय पुस्तकाबद्दल.
या वेळी म्याजेस्तिक मध्ये दुसर्या पुस्तकांची वर्णी लागल्याने ते घेण राहूनच गेल
इथला परिचय वाचून मध्यंतरी हे
इथला परिचय वाचून मध्यंतरी हे पुस्तक आणून वाचलं.
मला ठिकठिक वाटलं. लेखिकेचे अनुभव खूपच वेगवेगळे आहेत.. मांडलेही चांगले आहेत. पण लिहिण्याची शैली फार नाही आवडली... मधे मधे फार शाब्दिक कोट्या आहेत.. त्या जरा वैताग देतात..
एकंदरीत पुस्तकापेक्षा हा परिचयच जास्त चांगला आहे.
उत्तम परिचय! पुस्तक मलाही
उत्तम परिचय! पुस्तक मलाही आवडलं होतं.
>>> हे संपूर्ण लेखन बोली भाषेत केले गेलेले आहे. कुठेही सौदी अरेबियाला, तिथल्या रुढी-परंपरांना अथवा इस्लामला नावे ठेवली गेलेली नाहीत, की वैयक्तिक मतांचा मुलामा चढवून बेजबाबदार विधाने केली गेलेली नाहीत. जे जे समोर येत गेले, ते तसेच स्वीकारण्याची वृत्ती वाचताना शब्दाशब्दांतून आपल्याला जाणवत राहते.
--- नेमकं!
Pages