For here or to go...?

Submitted by Adm on 30 September, 2008 - 19:04

अपर्णा वेलणकर ह्यांचे For here or to go ? वाचलं..
१९६५-७० च्या सुमारास देशांतर केलेल्यांचे अमेरीकेत आल्यापासून ते अगदी उत्तरआयुष्यापर्यंत चे सगळे टप्पे मांडलेले आहेत. प्रस्तावनेतच म्हंटल्याप्रमाणे मराठी मध्यमवर्गाला सॉफ्टवेअर ची लॉटरी फुटण्याच्या तब्बल ३५-४० वर्ष आधी देशांतराच्या अग्नीदिव्यातून गेलेल्या माणसांची थरारक कहाणी..
अर्थातच ह्या सॉफ्टवेअरच्या वाटेवर स्वार होऊन तिकडे गेलेल्यांचं विश्व ह्या पुस्तकात दिसत नाही.
विषयाचा अवाकाच एव्हडा मोठा आहे की माझ्यामते जमवलेली सगळी माहिती ही सुसंगत पध्दतिने मांडण हेच मोठं आव्हान ठरू शकतं... प्रकरणांमधली विभागणी चांगली आहे फक्त प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातिला दिलेली प्रस्तावना तिच ती वाटते.. ह्यात दिलेले अनूभव हे सुमारे ३०/४० वर्ष जूने असलाने काही काही गोष्टी relate करता आल्या नाहीत.. पण निर्णय घेण्यात होणारी द्विधा मनस्थिती, देसी लोकांचं फक्त डॉलर आणि डॉलर च्या पाठी धावणं, इथल्या गोष्टींशी (राजकारण, खेळ, भूगोल, पर्यटन इ.) अगदी एकरूप नाही पण निदान समोरच्याशी संवाद साधण्याइतपतही माहिती न करून घेणं, कधीही बाहेर पडून देसीच खाणं, अस्थानी आपली संस्क्रूती/ समाज ह्यांचा बडेजाव मिरवणं हे पाहिलं असल्याने अगदी जवळचं वाटलं.. तसेच भारतातल्या नातेवाईकांचे (धरलं तर चावतय.. सोडलं तर पळतयं) टाईप अनूभव ही अगदी वास्तववादी आहेत..
लेखिकेचे स्नेही अमान मोमीन ह्यांचे विचार मात्र पटले नाहीत.. ते अगदीच दुसर्‍या टोकाचे वाटले.. अमेरीकत किंवा परदेशी गेल्यावर आपल्या गोष्टींसाठी अगदी अश्रू ढाळत बसू नये पण अगदी दुसरे टोक गाठून सगळं सोडूनही देऊ नये.. थोडं practical होऊन best of both the worlds घेण्याचा प्रयत्न करावा..
एकूण मांडणी आणि प्रस्ताविकांमधली थोडी repetitions वगळता एक चांगला आणि खूपच अभ्यासपूर्ण प्रयत्न वाटला.
आपल्यापैकी अनेकजण परदेशात आहेत. काही आत्ता गेलेले तर काही अगदी १०/१५ वर्ष परदेशी असलेले.. तुम्ही कोणी हे पुस्तक वाचलय का? वाचलं असल्यास तुम्ही ह्यातल्या अनूभवांशी relate करू शकलात का? किंवा तसेच अनूभव किंवा feelings तुम्हाला कधी आली होती का? नक्की सांगा.. वाचायला आवडेल.. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अडम, त्या पुस्तकातली बरीचशी माहिती, संदर्भ शोभा चित्रेंच्या 'गोठलेल्या वाटां'मध्ये येऊन गेले आहेत. त्या पुस्तकाची मी १०,१२ वर्षांपूर्वी पारायणं केली होती. त्यामुळे मला ह्या पुस्तकातून तोच तोच पणा जाणवला.अर्थात तो माझ्या पारायणांचा दोष.
२५,३० वर्षांपूर्वी ज्यांनी दुसर्‍या देशाबद्दल अगदी तुटपुंजी माहिती असताना प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन आपली मुळं परक्या देशात रोवली त्यांच्याबद्दल आदर, कौतुक आहेच.
त्या अमान मोमीनबद्दल सहमत. आणखीनही एका कोणाचा तरी संदर्भ आहे पुस्तकात जो मला खटकला. नाव आठवत नाहीये आत्ता.

मी अगदि नुकतच हे पुस्तक वाचलय. मला पुस्तकाचि कल्पना आवडलि पण काहितरि राहुन गेलय असहि वाटल वाचताना. ४० वर्षांपुर्वि अमेरिकेत आलेल्या लोकांनि कुठे कुठे आणि कसा कसा स्वतःशि आणि परिस्थितिशि लढा दिला हे वाचुन त्यांच्याविषयि चा आदर दुणावला.

पण हेच लोक काहि ठिकाणि अतिरेक करतात असहि वाटल. विशेषतः अमेरिकेत गेलेल्या मराठि लेखकांबद्दल. अगदि घराबाहेर घालवायला लागलेल्या एखाद्या चक्रम माणसाच ठिक पण सरसकट सगळ्या लेखकांनि यजमानांन्शि द्रोह केला किंवा एकुण अमेरिकन समृध्धिच्या किंवा यजमानांविष्यि असणार्‍या आकसापोटि इथुन गेल्यावर काहि बाहि लिहल असा असा एकंदर रोख दिसला. ५ वर्षांपुर्वि मी इथे आले तेन्व्हा स्टार मुव्हिस, बीबीसी इत्यादि पहाण्याचि सवय असुनहि मला बर्यापैकि कल्चरल शॉक बसला होता मग २० -२५ वर्षांपुर्वि पाहुणे म्हणुन गेलेल्या लेखकांना तो जाणवला आणि त्यांच्या लेखनातुन उमटला ह्याबद्दल इथल्या लोकांना एवढा राग का यावा? अगदि १९७४ च्या सुमारास अमेरिकेत राहुन गेलेल्या पु.ल. नि सुध्धा हेच केल असा एकंदर सुर दिसला. मी तो लेख वाचलाय ('जावे त्यांच्या देशा'मध्ये आहे) मला तरि त्यात कुठेहि आकसापोटि काहि लिहलेल आढळल नाहि.

अमीन मोमिन यांच्याबद्दल सहमत. तसे बर्याच लोकांचे विचार काहि वेळेला खटकले. पण एकुणच इथे आलेल्या आणि रमलेल्या स्त्रीया आवडुन गेल्या. आनंदिबाईंचा अमेरिकेपर्यंतचा प्रवास आणि इथल्या वास्तव्याविषयिचे संदर्भ हि आणखि एक जमेचि बाजु या पुस्तकाचि.

<<<एकूण मांडणी आणि प्रस्ताविकांमधली थोडी repetitions वगळता एक चांगला आणि खूपच अभ्यासपूर्ण प्रयत्न वाटला.>>>> अगदि असच वाटल मला पण पुस्तक वाचुन संपवल्यावर.

सायोशी सहमत.... शोभा चित्रें, डॉ. मीना नेरूरकर ह्याही लेखिका साधारण भारतीय माणसाला अमेरीकेत स्थिरस्थावर होण्यासाठी करावा लागलेला संघर्ष ह्याच विषयांवर लिहितात. सगळ्यांच्या लेखनात तेच तेच संदर्भ येत राहतात. हे पुस्तक वाचण्याआधीच ह्या विषयावरची बरीचशी पुस्तकं वाचनात आली होती, त्यामुळे ह्या पुस्तकाचं विशेष काही वाटलं नाही.

श्री पु भागवतांनी देखील अनिवासी भारतीयांच्या कथांचा एक संग्रह प्रसिद्ध केला होता.. त्यात देखील शोभा चित्रेंचा बराच पुढाकार होता..

-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी

गोठलेल्या वाटा आणि हे पुस्तक ह्या दोन्हीमध्ये ज्यांचा संदर्भ आलाय असे भारतातून आलेले साहित्यिक जे इथल्या मंडळींकडे राहून गेले आणि घरं बिरं घाण करुन गेले. ह्या मंडळींना बाहेर हॉटेलमध्ये रहाणं हा ऑप्शन नसतो कां? जर महाराष्ट्र मंडळ त्यांना बोलावत असेल तर त्यांची सोय करु शकत नाही कां? म्हणजे इथल्या लोकांचीही गैरसोय नको नी पुस्तकात असे संदर्भही वाचायला लागायला नकोत.

चिन्मय,
'देशांतरीच्या गोष्टी सांगता' मला वाटतं अजिता काळे यांचं आहे. इथे आलेल्या आणि स्थायिक झालेल्या लेखिकांमधे मला यांचं लेखन खूप आवडतं. थोडे वेगळे संदर्भ, इथल्या संस्क्र्‍ती बद्दल कुतुहल किंवा जाणून घेण्याची ओढ, त्यांचे इथले अनुभव वाचण्यासारखे आहे. मला तरी त्यांचे लिखाण शोभा चित्रें पेक्षा आवडते.

बरोबर. हे अजिता काळेंचं पुस्तक. टण्या म्हणतोय ते 'कुंपणापलिकडचे शेत'.. का हे पण वेगळंच?

टण्या म्हणतोय ते वेगळं असावं. कुंपणापलिकडचं शेत हे दिलीप चित्र्यांचं आहे.

मी म्हणतोय ते पुस्तक श्रीपुंनी (मौजने) प्रकाशित केले होते.. सगळ्या लघुकथा होत्या पण सर्व लेखक हे अनिवासी भारतीय होते.. ह्या लेखकांपैकी कुणाचेही साहित्य त्यापूर्वी प्रकाशित वगैरे झालेले नव्हते (अपवाद बहुतेक शोभा चित्र्यांचा)..

-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी

सायो
अमेरिकेत हॉटेल, मराठी साहित्यिकांना अन कलाकारांना ? हसून हसून डोळ्यात पाणी आलेली बाहुली
सविस्तर लिहावं लागेल याबद्दल. तोपर्यंत मराठी विश्वाच्या मंडळींना विचार

Sad अरे बापरे, एवढा हास्यास्पद प्रश्न विचारला का मी?
मराठी मंडळ किती मिळवतं, खर्च करतं, नी किती बचत करतं हे काही मला माहित नाहीय. तेव्हा जरा सविस्तर सांग बरं.

टण्या म्हणतोय ते पुस्तक म्हणजे कुंपणापलीकडलं शेत. इथे अमेरिकेत राहणार्‍या मराठी लोकांनी लिहिलेल्या कथा आहेत. विशेष म्हणजे या पैकी बरेच कथालेखक हौशी किंवा प्रथमच कथा लिहिणारे आहेत. दिलिप चित्र्यांचा हे पुस्तक प्रकाशित करण्यात मोठा वाटा होता पण हे त्यांचे पुस्तक नाही.

मी स्वतः आता ३८ वर्षांपूर्वी आलो.
मी असे पाहिले की तेंव्हा आलेल्या बर्‍याच लोकांनी आपले कार्यक्षेत्र पाSर बदलून टाकले. कित्येक इंजिनियर 'insurance, financial consultant, computer programming' अशा क्षेत्रात गेले नि जन्मभर त्याच क्षेत्रात राहिले. बर्‍याच जणांनी MBA करून पुढे पुनः मार्केटिन्ग, फायनान्स इ. करिअर्स केली.
त्या मानाने आजकाल येणारे लोक सुदैवाने ते जे शिकले त्याच क्षेत्रात राहू शकतात. भारताशी, तेथील घडामोडींशी सतत संपर्कात रहातात.
मला स्वतःला एव्हढेच वाईट वाटते की अगदी दहा पंधरा वर्षांपूर्वी पर्यंत, म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे भारतातील राजकारण तर सोडाच, पण सिनेमा, क्रिकेट इ. विषयांसंबंधी काsहीहि माहित नव्हते. त्यामुळे आता भारतापासून खूप दुरावल्यासारखे वाटते. भारतीय हे एकदम परके लोक वाटतात. नि त्याची खंत वाटते.

आता अमेरिकेचा भरपूर अनुभव घेऊन झाल्यावर पुनः भारताबद्दल प्रेम उत्पन्न झाले आहे. तरी दीर्घ मुदतीसाठी नुसतेच येऊन रहाणे, शक्य होईल का याबद्दल शंकाच वाटते, माझे मित्र, नातेवाईक अजूनहि तेथे आहेत, पण त्यांचे नि आपले विचार फार दुरावल्यासारखे वाटतात.

मी ही एवढ्यातच हे पुस्तक वाचले. खूपच अभ्यासपूर्ण ऍनेलिसिस केलेलं आहे. एकदा वाचायला सुरवात केली के संपवल्यशिवाय खाली ठेववत नाही.
गोठलेल्या वाटा व कुंपणापलिकडचे शेत ही आवडले होते.
या पुस्तकात "यू फूल मी गॉड टेक वन" हा लेख जांच्यावर आहे त्या माझ्या नवर्‍याच्या काकू आहेत. आम्ही सर्व त्यांच्या भारत भेटीची वाट पहात असू. भारतात आल्या की आमच्याकडे १५ दिवस तरी रहायच्या. त्या कॅनडात इण्डियन लेडी विथ सायकल म्हणून प्रसिद्ध होत्या.(वयाच्या सत्तरीत सुद्धा त्या सायकलवरून फिरत.) त्यांचे तिथले अनुभव अगदी ऐकण्यासारखे असत.

मी फार अपेक्षेने हे पुस्तक वाचलं. अनेकांचे अनुभव अतिशत चिकाटीने गोळा कडून त्या सगळ्यांचं नीट क्लासिफिकेशन करून ते मांडले आहेत. पण माझ्या मते या सगळ्या माहितीचं नुस्तंच सिंथेसिस आहे.
लोकांचे तेंव्हाचे अनुभव, अनेक्डोटल माहिती वाचायला छानच वाटतं. थोड्या फार प्रमाणात नंतर आलेल्या मंडळीनांही तसेच अनुभव येत असतात.

पण तेंव्हा आलेली मंडळींचे अनुभव सोडून बाकी लेखिकेचं विश्लेषण फारं दिसत नाही.

जुन्या मंडळींचे प्रश्न, अनुभव वगैरे सुद्धा फार ढोबळपणे मांडले आहेत. प्रातिनिधिक अनुभव मांडता मांडता फारच स्टिरिओटिपिकल वाटतं पुस्तक.

माहिती गोळा करणे अन ते सगळे संगतवार मांडण्यामागचे परिश्रम निश्चित प्रशंसनीय ...

मध्यंतरी कॅनडाच्या डॉ. विजय ढवळे यांनी लिहिलेले एक पुस्तक वाचले. नाव विसरलो. २५-३० वर्षांपूर्वी अमेरीकेत , कॅनडात स्थायिक झालेल्या मराठी मंडळींवर लिहिलेले हे लेख आहेत. डॉ. भालेराव, डॉ. गवांदे, राजन गडकरी ही नेहमीची यशस्वी मंडळी त्यात आहेतच. शिवाय इतर १५-२० मराठी सज्जन.
लेखकाने स्वतःवरही एक लेख लिहून टाकला आहे.
प्रत्येक लेखात भारताला अगणित शिव्या, 'भारतात आमच्या हुषारीचं कौतुक नाही हो SSS', हे वाक्य, किंवा डॉक्टर/ इंजिनीयर असूनही दुय्यम काम करत आज मिळवलेलं प्रचंड वैभव, असंच प्रत्येक लेखात वाचायला मिळतं.
बे एरीयात ज्याच्या बागेत हरणं बागडतात, तो उद्योजक आमट्यांना १०० डॉलर्स दरसाल पाठवतो, याचाही अभिमानाने दोनदा उल्लेख केला आहे.
एकंदरीत भारत, भारतातले लोक वाईट, आणि केवळ अमेरीकेत आल्यानेच आमचा उत्कर्ष झाला, असाच सूर बहुतेक लेखांत उमटतो.
शिवाय मराठी साहित्यिक, नाटकवाली मंडळी असंस्कृत, पैशाचे लोभी असूनही आम्ही त्यांना आमची करमणूक करण्याची संधी कशी देतो, आमच्या घरी राहू देतो, हे आहेच.

चिनूक्स,
सहमत. अजिता काळ्यांचं किंवा विद्युल्लेखा अकलूजकरांचं लिखाण सोडलं तर बहुतांशी हाच सूर दिसतो.
परत जायची इच्छा आणि न परतता आल्याचा/ देश सोडून आल्याचा गिल्ट यात कुठेतरी अडकलेल्या मनातून आलेले विचार असावेत असं जाणवतं बहुतांशी. मला वाटतं ३०-४० वर्षांपूर्वी देश सोडलेल्या बर्‍याच लोकांचा हा हिंदोळा चालू असतो. त्यामानाने गेल्या १०-१५ वर्षात तिथे स्थायिक झालेल्यांचा मानसिक/ भावनिक गोंधळ कमी आढळतो असं आपलं माझं अनुमान.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मला वाटतं ३०-४० वर्षांपूर्वी देश सोडलेल्या बर्‍याच लोकांचा हा हिंदोळा चालू असतो. त्यामानाने गेल्या १०-१५ वर्षात तिथे स्थायिक झालेल्यांचा मानसिक/ भावनिक गोंधळ कमी आढळतो असं आपलं माझं अनुमान. >>>>>
सहमत. माझ्या मते बाहेर जाणे हा प्रकार जसजसा मॅच्यूअर होत जातोय तसा हा गोंधळ कमी होतोय.

भारत विरोधी सूर हा बाहेर गेलेल्यांच्या लिहिण्या बोलण्यातून दिसतो कारण त्यांना justification द्यावसं वाटतं त्यामूळे असेल कदाचित. माझ्यामते असं justification देण्याची गरजच नाही.. ती नसेल तर उगाच तुलना किंवा भारताला किंवा परदेशाला शिव्या देणं होणार नाही.

त्यामानाने गेल्या १०-१५ वर्षात तिथे स्थायिक झालेल्यांचा मानसिक/ भावनिक गोंधळ कमी आढळतो<<<< पुस्तक वाचलेलं नाही, पण ह्या कॅटॅगरीत मी मोडते म्हणून सांगावसं वाटतंय. 'बुध्दीला मायदेशी मोल नाही' वगैरेच्या नावाखाली इथे (अमेरिकेत) येऊनही 'तो' हिंदोळा चालूच असतो. मानसिक/ भावनिक गोंधळ कमी होत नाही. अपराधीपणाची भावना बोचतच असते. स्वार्थ पाय निघु देत नाही. फक्त 'भारताला शीव्या घालणं आणि कलाक्षेत्रातल्या मंडळींना हीन लेखण्याचा' निर्बुध्दपणा, बेअकलीपणा हातून कधीही घडणार नाही ह्याची खात्री आहे!!
..............
दादल्याच्या खर्चाच्या, लाल काळ्या मिर्च्यांचा, वर्‍हाडी हा ठेचा बाई मी कुटला, जाऊ नगा आज माझ्या वाटला!!!! Proud

स्वार्थ पाय निघु देत नाही. >>
ऍक्सॅटली. हे आणि हेच ऐक कारण असते. नंतर मग घेतलेल्या निर्णयाला अनुकुल मते तयार केली जातात व तीच कारणे नंतर सत्य वाटतात.
मी खरेतर असे पुस्तकं वाचतच नाही कारण थोड्याफार फरकाने अश्या पुस्तकांत ऐकच सुर असतो जो मला मान्य नाही.

परदेशी जाणार्‍यांना, तिथे स्थिरस्थावर होउ पाहणार्‍यांना, किंवा तिकडचेच झालेल्यांना आपल्या या कृतीचे समर्थन का करावेसे वाटते? जे कधी परदेशी गेले नाहीत किंवा थोड्या काळात परत आले अशांना ही या समर्थनाबद्दल कुतुहल का असते ?

आपला देश सोडून दुसरी कडे जाउन राहणे काही illegal नाही. मग ते immoral, unethical आहे असं वाटतं असावं का?

सिगरेट कंपनीत नोकरी करणारे, दारु-गोळ्याच्या कंपनीत नोकरी करणारे अशा लोकांच्या कैफियती /समर्थन असलेली पुस्तकं नाहीत का?
परदेशस्थ भारतीयांनाच ही टोचणी का असावी ?

ता.क. अमेरिकेतल्या घरांच्या अंगणांमधून हरणं बागडत अस्तात म्हणून मोठेपणा मिरवणारे भंपक.

आपल्या इथे रस्त्यात गाई म्हशी असतात तशी इथे हरणं.
मुंबै मधे रस्त्यातून चरायला जाणार्‍या/चरुन येणार्‍या गाई म्हशी घोळक्याने दिसत नाहीत. पण छोट्या गावांमधून सर्रास दिसतीलच ना? तसंच वॉल स्ट्रीट वर किंवा व्हाइटहाउस च्या समोर हरणं दिसणार नाहीत . पण बाकी ठिकाणी घरं, अपार्टेमेंट्स, शाळा, इस्पितळं सगळी कडे हरणांचा उपद्रव असतो.

समीर पाटील आणि प्रकाश भालेरावांच्या बागेतील हरणांची पानपानभर वर्णनं मंगला खाडीलकरांच्या पुस्तकातही आहेत. Happy
या पुस्तकाचं नाव विसरलो.
यातही एकूण सगळं तेच आहे.

सिएटलला BMMचं अधिवेशन झालं तेव्हा लोकसत्ता- इंडीयन एक्स्प्रेसने एक विशेष पुरवणी प्रसिद्ध केली होती. त्यासाठी काही लेख मी लिहिले होते. त्यानिमित्ताने काही (सुप्रसिद्ध) परदेशस्थ मराठी लोकांशी संबंध आला. त्यांच्याशी संवाद साधल्यावर या लोकांना 'मराठी' का म्हणावं हा प्रश्न मला पडला होता.. शिवाय भारताबद्दल असलेला तिरस्कार...
मी याबद्दल लिहिलेलं केतकरांना आवडलं नव्हतं, केवळ 'अमेरीकेत त्यांना मिळालेल्या यशावर लेक्ष केंद्रीत कर', असं सांगण्यात आलं होतं...

हरणांचा उपद्रव >>>> म्हशी हरणांरख्या छान दिसत नाहीत म्हणून इथल्या उपद्रवी हरणांचे कौतुक होत असेल Wink

भारताबद्दल असलेला तिरस्कार >>> नाही नाही... India बद्दल असलेला तिरस्कार Wink

परदेशस्थ भारतीयांनाच ही टोचणी का असावी ? >>> बहुतांश आई-वडिलांना उतारवयात इथे येउन रहाणे नको वाटते. आपल्याला काही का कारणांनी परत जाणे होत नाही. मग (बर्‍याच जणांना) आई-वडिलां प्रती आपले कर्तव्य आपण पार पाडत नाही असे वाटते. ते कुठेतरी मनाला खाते. त्यातुनच ही कारणगाथा सुरु होते असे मला वाटते. देशाचा त्याच्याशी काही संबंध नसतो. हे म्हणजे नापास झालेला विद्यार्थी, "यंदा पेपर तपासणीत घोटाळा झाला" असे म्हणतो तसे आहे.

'बुध्दीला मायदेशी मोल नाही' >>>> हे एकदम झुठ. इथे येउन निव्वळ पाट्या टाकायचे काम बहुसंख्य लोक करताना दिसतात.

इतकी चर्चा वाचल्यावर आता हे पुस्तक वाचायचे आहे. मला कोणी देऊ शकेल ?

मला आता नक्की आठवत नाही, पण ही चर्चा "गोठलेल्या वाटा" सारख्या पुस्तकांना जास्त लागू पडेल ना? फॉर हिअर बरेच वेगळे आहे त्यापेक्षा.

चिनूक्स, लिन्क्स आहेत का लोकसत्ताच्या त्या लेखांच्या?

सिंड्रेला, माझ्याकडे आहे हे पुस्तक. पण सध्या ह्या लेखाच्या लेखकाकडे आहे. त्याला सांग तुला पाठवायला.

<<<परदेशी जाणार्‍यांना, तिथे स्थिरस्थावर होउ पाहणार्‍यांना, किंवा तिकडचेच झालेल्यांना आपल्या या कृतीचे समर्थन का करावेसे वाटते? जे कधी परदेशी गेले नाहीत किंवा थोड्या काळात परत आले अशांना ही या समर्थनाबद्दल कुतुहल का असते ?>>>

माणसाला आपण घेतलेल्या निर्णयाचे justification आधी स्वत:ला द्यावेच लागते, आणि नंतर चार लोकांना ते पटवुन दिल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. आता ते justification भारताविषयी तिरस्कार एवढंच असेल तर ते नक्कीच योग्य नाही. पण आपण केलेल्या कृत्याचे समर्थन करणे यात मला काही चूक वाटत नाही.

इतरांना त्याविषयी कुतूहल वाटण्याचे कारण म्हणजे अमेरिका (आणि इतर प्रगत देश) यांविषयी आणि तेथील राहणीमानाविषयी औत्सुक्य, आणि 'कधीतरी आपल्याही कुटुंबातील एखादा सदस्य परदेशी गेला तर... ' वगैरे विचारांमुळे तेथील अनुभवांविषयी वाटणारं आकर्षण....

सिंड्रेलाचा मुद्दा सुध्दा पटला....

santino,
पण परदेशात जाणार्‍यांनाच का हे समर्थन खाजगीत, जाहिर रीत्या, सार्वजनिक रित्या करावेसे वाटते ?

समाजाच्या इतर कुठल्याही सेगेमेंट मधे ही गरज का वाटत नाही?
सिनेमात जाणारे, नाटक करणारे, चळवळीत पडणारे, राजकारणातली मंडळी - सगळे सगळे आत्म चरित्र लिहितात पण त्यांचा लिखाणातून सुद्धा अशी समर्थनं , खुलासे अभावानेच दिसतात. मग 'फोरेन' ला जाणार्‍यांनाच का ही टोचणी ?

देशात राहून्, एका गावात जवळ किंवा एका घरात राहून वाडवडिलांची जबाबदारी न सांभाळणारे ही कित्येक आहेत. अशांना नाही कोणी जाब विचारत ( त्यांच्या खाजगी मामल्यात आपण कशाला पडा असा सोयिस्कर विचार ) ?

परदेशात गेलेल्यांविषयी अजुन एक गोष्ट नेहमी बोलली जाते ती ही की, NRI पूर्ण शिक्षण भारतात घेतात आणि त्याचा फायदा मात्र दुसर्या देशाला होतो. (टॅक्स, service ईत्यादीच्या रुपाने).
आणखी एक. जेव्हा परदेशस्थ 'बुध्दीला मायदेशी मोल नाही' असं म्हणतात तेव्हा, बर्याचदा त्याचा अर्थ भारतात आरक्षणामुळे,भ्रष्टाचारामुळे उच्च शिक्षणाच्या संधी आणि नौकरी लवकर न मिळणे असा असतो. विशेषतः उच्च शिक्षणाच्या बाबतीत हे फार पटते. शिवाय,४-५ वर्षाआधी एवढ्या सहजासहजी नौकर्या उपलब्ध नव्हत्या हेही खरे आहे.
सिंड्रेलाचा मुद्दा पटला.
(कृपया मला कोणीतरी अर्धा र कसा लिहायचा ते सांगा. उदा. दुसर्या)

Pages