घर एकटे

Submitted by उमेश वैद्य on 1 October, 2012 - 04:01

घर एकटे

घर एकटे उतारावर अजूनी टिकूनी उभेच आहे
पावसाळे आणिक वादळे झेलत सोसत तिथेच आहे

तशीच आहे अजूनी त्याच्या परसामधल्या आंब्याची चव
अजूनही पडती आंबट बोरे कुणी नसे जरी वेचण्यास्तव

इथे राहिली किती माणसे कितीक पिढ्या अन जनने मरणे
अवघे गेले दहा दिशांनी उरली आता त्यांची स्मरणे

दिपावलीस्तव शत दिपांच्या कधी माळल्या होता माळा
आता सलते त्याच्या हृदयी तिन्हीसांजेची कातरवेळा

आज कुणी ना दीप लावया वृंदावनही ओके बोके
डौलदार या बैलगाडीची उभ्या उभ्या निखळली चाके

ते ही इथल्या माणसांसवे अन्नाची चव चाखत होते
अंगत-पंगत आवळी भोजन किती सुखांनी नहात होते

या भिंतीवर कितीक खिलारे घासत होती आपुली अंगे
माजघरामधी मुले ऐकती गोष्टी आजी रात्री सांगे

गुलमोहरीचे झाड दावते कुठे बायीचे होते घरटे
पिलां मजवरी सोडून जाई दाण्यासाठी रोज पहाटे

पाचोळा हा पडे रोजचा थर ही त्याचा जुनाट आहे
परी खिळखिळा असा खराटा वाट कशाची उगीचच पाहे

आहे माजले बेढब येथे कुंपण काठी बांबूचे बन
सहज सांगते किती वाहिले मीच येथले संसारी जन

शैशव इथले तारूण्याने गिळले आणिक उडून गेले
सात समुद्रा ओलांडूनिया म्हणे मजला परके झाले

उ. म. वैद्य २०१२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा उमेशजी खूप दिवसान्नी तीही इतकी मस्त रचना घेवून आलात धन्यवाद खूप आनद झाला मनाला

नॉस्टॅल्जिया !! बेस्ट उतरवलात अगदी !!

अजूनी , टिकूनी ,आणिक अशा जुन्या पद्धतीच्या शब्दाऐवजी साधे अजून ,टिकून ,आणि असे नेहमीच्या वापरातले शब्द ओळी अजून बोलक्या करून गेले असते (वै.म.)

व्याकरण पाहता <<<आता सलते त्याच्या हृदयी तिन्हीसांजेची कातरवेळा>>>> हे जरा खटकले मी ते असे वाचले <<<<<आता सलती त्याच्या हृदयी तिन्हीसांजेच्या कातरवेळा (वैयक्तिक मत राग नसावा)

या ओळी अगदी भावुक करून गेल्या<<<<
तशीच आहे अजूनी त्याच्या परसामधल्या आंब्याची चव
गुलमोहरीचे झाड दावते कुठे बायीचे होते घरटे

अधिक -उणे बोललो असल्यास क्षमस्व!!

आपला नम्र
वैवकु

मला गाव नाही, त्यामुळे तशा आठवणीही नाहीत.
तरीदेखील तुमची कविता वाचल्यावर गावाची ओढ असलेल्या माणसाच्या भावना मनाला जाणवल्या, भिडल्या..... प्रभावी कविता.