वर्तुळ : भाग ३

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 September, 2012 - 02:06

वर्तुळ : मागील भाग

***************************************************************

इतके दिवस मनात उगीचच वाटायचे की त्याचे माझ्यावर प्रेमच नाही. म्हणुनच तो घरात विचारायचे टाळतोय माझ्याबद्दल. पण आता मरण समोर दिसत असताना कळत होते तो का टाळाटाळ करत होता ते? कुठल्या दुष्टचक्रात अडकलाय तो? आनंद एकाच गोष्टीचा आहे की लग्न करुन त्याच्या समवेत सुखाने आयुष्य काढने नशिबात नाहीये, पण निदान .....

ते जे काही होतं ते भयंकरच होतं. एक गोष्ट कळून चुकली होती की आता मृत्यु हेच एकमेव सत्य उरलय. आता सुटका नाही. आई-बाबा गेल्यापासून काकाकडेच वाढले होते. सख्खे काका-काकु असुनही आयुष्यभर अनाथच राहीले होते. नोकरी लागल्यावर तर काकानेही अतिशय कोरड्या आवाजात घर सोडायला सांगितले. तेव्हापासून २६ वर्षाच्या एकाकी आयुष्यात ’माऊलींच्या’ नावाचाच काय तो एकमेव सहारा होता. आता शेवटच्या क्षणीही तेच फ़क्त ओठावर होतं. गेल्या काही महिन्यांत ’तो’ आयुष्यात आला होता, पण असुन नसल्यासारखा. आता बहुतेक सगळं संपलं होतं. मृत्यु समोर आ वासून उभा होता. ते जे काही आहे ते इथलं, या पृथ्वीवरचं नाही. काहीतरी अमानवी, अघोरी आहे याची मनोमन जाणीव होत होती. काळ जवळ आला की सर्व मनोवृत्ती तीक्ष्ण होतात असं ऐकलं होतं पण आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होते. आजपर्यंत हे प्रकार फक्त कथा कादंबर्‍यातच वाचले होते. त्यामुळे त्याबद्दल एक विचित्र प्रकारचं कुतुहल होतं पण आज 'ते' स्वतःच्या बाबतीत घडत असताना मात्र कुतुहलाची जागा मृत्युच्या भयाने घेतली होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वामींच्या नावाचा जप सुरू केला. मनाची तयारी झालेली होती.

फ़ार काळ नव्हते त्या अवस्थेत मी, मी युगे लोटल्याचा भास होत होता. काहीच होत नाहीये हे पाहील्यावर मी आश्चर्याने डोळे उघडले. अजुनही मी सुरक्षीत होते. 'ते' जे काही होतं ते अजुनही तसंच समोर उभं होतं. तितकंच भयावह वाटत होतं. त्याच्या तिक्ष्ण सुळ्यांवरुन ओघळणारी ती बिभत्स लाळ थरकाप उडवत होती. पण...

पण त्याच्या डोळ्यातला अंगार काहीसा विझल्यासारखा वाटत होता. का कोण जाणे पण मला मघाशी बुभुक्षीत वाटलेली त्याची नजर, आता मात्र त्या नजरेत कसलीतरी भीती असल्यासारखं भासत होतं. पहिल्यांदाच मला जाणवलं त्याचे ते विखारी डोळे माझ्याकडे बघतच नव्हते. ते माझ्या डोक्यावरुन माझ्या मागे कुठेतरी बघत असावेत असे मला वाटले. मी पटकन मागे वळून बघीतले. तिथे , अगदी माझ्या मागे, साधारण ३-४ फुटांवर एक व्यक्ती उभी होती. सहा फुटाच्या आसपास उंची, मुळचा गोरापान असावा असा भासणारा पण आता जरा गव्हाळपणाकडे झुकलेला वर्ण. अतिशय देखणा चेहरा पण नजर त्या चेहर्‍यापेक्षा त्या व्यक्तीच्या डोळ्यातच अडकुन पडत होती. एखाद्या मंदीरातील शांतपणे तेवणार्‍या समईच्या ज्योतीचा प्रसन्नपणा होता त्या डोळ्यात. त्या डोळ्यात पाहताना का कोण जाणे पण मला एकप्रकारचा आश्वासक आधार लाभल्यासारखे वाटले.

"अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतात म्हणून 'ते' घाबरले काय?", मी त्या व्यक्तीला विचारले, तसे ते हसुन म्हणाले.

"नाही गं ताई, माझ्यात घाबरण्यासारखं काय आहे? 'ते' घाबरलय ते तुझ्या तोंडून बाहेर पडणार्‍या 'माऊलींच्या' नामस्मरणाला. माऊली कायमच तुझ्याच नव्हे तर माझ्या, या समस्त प्राणीमात्रांच्या पाठीशी उभे असतात, आपल्या रक्षणार्थ ! तुझ्या त्या माऊलींच्या नामस्मरणाने तर खेचुन आणलेय मला इकडे."

मला थोडेसे आश्चर्य वाटले कारण ते म्हणत होते माझ्या नामस्मरणाने त्यांना इकडे खेचुन आणले, पण माझा जप तर मनातल्या मनात चालु होता. मी काही विचारणार इतक्यात त्यांनी आपले एक बोट स्वतःच्या ओठांवर ठेवुन मला गप्प राहण्यास सांगत दुसर्‍या हाताने बाजुला सरकण्याचा इशारा केला. तशी मी बाजुला सरकले आता ते दोघेही एकमेकांच्या समोर होते. किती विरुद्ध परिस्थिती होती. मघाशी 'ते' आक्रमकाच्या रुपात होते आणि मी प्रचंड घाबरलेली. आता मात्र सीनच चेंज झालेला. आता 'ते' मागे मागे सरकत होते, त्याच्या डोळ्यात साकळलेली भीती मला स्पष्ट जाणवत होती आणि 'ती व्यक्ती' अगदी आत्मविश्वासाने त्याच्या दिशेने पावले टाकत पुढे पुढे जात होती. मला असे जाणवले की आता मात्र 'त्याला' इच्छा असुनही आपल्या जागेवरुन हलता येत नाहीये. त्याची गुरगुर वाढलेली होती. पण ती आता मघाच्यासारखी संतप्त, भयावह न वाटता केविलवाणी, एखाद्या आईपासुन एकट्या पडलेल्या कुत्र्याच्या पिलासारखी क्षीण गुरगुर वाटत होती. आता मागे जाता येत नाही असे बघीतल्यावर बहुतेक 'त्याने' पवित्रा बदलला. वाचण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून 'त्याने' आपल्या पुढच्या पायाचे पंजे जमीनीवर घासले आणि 'ते' हल्ला करण्यासाठी सज्ज झाले. पण 'ती व्यक्ती' मात्र अजुनही शांत होती. तसेच शांतपणे पुढे पुढे जात होती. साधारण त्याच्यापासुन तीन फुट अंतरावर जाऊन ती व्यक्ती गुडघ्यावर बसली आणि तीने आपले दोन्ही हात, आपण एखाद्या गोड बाळाला कवेत घेण्यासाठी जसे पुढे करतो तसे पुढे केले आणि तोंडाने कुठल्यातरी विवक्षीत शब्दाचा उच्चार केला. तसे परिस्थिती पुर्णपणे पालटून गेली. इतका वेळ हिंस्त्र वाटणार्‍या 'त्या' प्राण्याचे रुपांतर जणु काही एखाद्या पाळीव प्राण्यामध्ये झाले आणि 'ते' पुढे येवुन आपले तोंड जमीनीवर घासायला लागले. त्या व्यक्तीने आपला उजवा हात त्याच्या मस्तकावर ठेवला आणि मुखाने काहीतरी उच्चारायला सुरुवात केली. पुढच्याच क्षणी त्या प्राण्याच्या जागी फक्त काळसर धुक्याचे काही पुंजके दिसायला लागले. तो प्राणी हळु हळु अदृष्य व्हायला लागला. बघता बघता तो उभा होता ती जागा स्वच्छ होवून गेली. पुढच्याच क्षणी त्याचा मागमुसही तिथे उरला नाही. मी अवाक होवून पाहत होते...

"काय होतं ते? तुम्ही त्याचं काय केलत? तुम्ही कोण आहात?", त्या सदगृहस्थाचे आभार मानायच्या ऐवजी मी त्याच्यावर अक्षरशः प्रश्नांची फैर झाडली. एक गोष्ट तर स्पष्ट झालेली होती की 'तो' प्राणी आणि 'ती व्यक्ती' दोघेही सामान्य नव्हते. काहीतरी असाधारण असं होतं त्यांच्यात नक्कीच."

"सगळं सांगतो ताई, पण तू खुप घाबरलेली दिसते आहेस? इथुन जवळच आपलं घर आहे. घरी जाऊ, थोडं सरबत घे मग बोलुयात, काय?"

नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, तशीही झाल्या प्रसंगाने माझ्या घशाला कोरड पडली होती. आणि समोरची व्यक्ती अनोळखी असली तरी काही वेळापुर्वीच माझा प्राण वाचवला होता तीने. त्यामुळे मी काहीही न बोलता त्यांच्याबरोबर चालायला लागले. थोड्याच वेळात त्यांच्या घरापाशी पोहोचलो. समोरच एक छोटेसे बोगनवेलीच्या रोपट्यांचे कुंपण होते, तिथुनच एका ठिकाणी आत जायला जागा होती. मी फाटक शोधत होते, पण फाटकाच्या जागी तिथे मला फक्त थोडीशी मोकळी जागा दिसली आत जाण्यासाठी.

"एका ब्रह्मचार्‍याची मठी आहे ही. कुंपण तिची मर्यादा ठरवण्यासाठी आहे. पण इथे कुणालाही यायला अटकाव नाही, त्यामुळे कुंपणाला फाटक नाहीये."

जणु काही माझ्या मनातल्या शंकेचे उत्तरच दिले त्यांनी, न विचारता. मी त्यांच्यामागे कुंपणातुन आत गेले. आत जाता जाता आजुबाजुचा परिसर निरखु लागले. केवढे प्रसन्न होते तिथले वातावरण. छोटीशी बागच होती म्हणाना ती. वेगवेगळ्या फुलांची झाडे होती... चाफा, पळस, जाई-जुईच्या वेली, पारिजात, मोगरा, गुलाबाच्या वेगवेगळ्या जाती यांच्याबरोबरच काही फळझाडे ही होती आणि मधोमध ती सुरेख कुटी होती. क्षणभर वाटले, आपण चुकून पुराणकाळातल्या एखाद्या ऋषी मुनींच्या आश्रमात तर नाही आलो ना? छोटीशीच पण सुरेख अशी ती कुटी होती, फारतर चार पाच छोट्या छोट्या खोल्या असाव्यात आत. त्यांनी हॉलमध्ये प्रवेश केला. खाली छान शेणाने सारवलेली जमीन होती, भिंतीवर सर्वत्र स्वच्छ पांढरा चुना लावण्यात आला होता. त्यावर भगव्या रंगात "जय जय रघुवीर समर्थ " हा मंत्र लिहीण्यात आला होता. समोरच श्री समर्थ रामदासस्वामी तसेच प्रभु रामचंद्रांची तसवीर होती. त्यांनी तिथेच अंथरलेल्या एका चटईकडे बोट दाखवुन बसायला सांगितले आणि ते आतल्या खोलीत गेले. मी ही लगेचच टेकले. थोड्याच वेळात आतल्या खोलीतून एका पन्नाशीच्या घरातील व्यक्तीने सरबत आणुन दिले. एकदम मनावरचा सगळा ताण नाहीसा झाल्यासारखे हलके हलके वाटत होते. आपली सगळी दु:खे, सगळे तणाव विसरल्यासारखे झाले मला.

"नमस्कार मी भास्कर, आण्णांबरोबरच राहतो इथे."

"आण्णा?"

"जे तुम्हाला इथे घेवुन आले ते. त्यांचं नाव तसं 'सन्मित्र आहे, सन्मित्र भार्गव, पण आम्ही सगळेच त्यांना आदराने आण्णाच म्हणतो. बसा शांत थोडावेळ, आण्णा येतीलच आता."

मला आश्चर्यच वाटले, ही नवी व्यक्ती पन्नाशीची दिसत होती आणि ज्यांना ते आण्णा म्हणत होते ते जेमतेम ३५-४० चे वाटत होते. अर्थात मघाशी जे मी माझ्या डोळ्याने पाहीले होते त्यापुढे ही गोष्ट तेवढी आश्चर्याची नव्हती म्हणा. तेवढ्यात आण्णा आलेच बाहेर.

"कसं वाटतय ताई आता तुला? स्थिरावलीस की नाही?"

मी काही उत्तर द्यायच्या आधीच बहुदा माझ्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे पाहून त्यांना माझ्या मनातील कल्लोळाचा अंदाज आला असावा.

"तुझ्या प्रश्नाची उत्तरे आहेत माझ्याकडे. एक गोष्ट आधीच सांगतो. हे इथेच थांबणार नाहीये किंवा संपलेलेही नाहीये. जे काही झालय किंवा पुढे होणार आहे ते निश्चितच सर्वसामान्य मानवी पातळीवरचं नसणार आहे. स्पष्टच सांगायचे झाले तर तुला असलेला धोका अजुनही संपलेला नाहीये. किंबहुना म्हणुनच मी तुला तुझ्या घरी जाऊ न देता इथे समर्थांच्या या मठीत, मारुतीरायाच्या आश्रयाला घेवुन आलोय. थोड्या वेळाने भास्करदादा सोडून येतील तुला तुझ्या घरी. पण त्याआधी मला तुझा पुर्ण अनुभव ऐकायचा आहे. तुझ्या संरक्षणाची पुर्ण व्यवस्था केल्याशिवाय तूला एकटे सोडणार नाहीये मी. पण त्यासाठी मला सर्व माहिती हवी आहे. तू यात कशामुळे गोवली गेलीस याबद्दल काही कल्पना आहे का तुला?"

मला काय बोलायचे तेच सुचेना. ,"कसला धोका आण्णाजी?"

"अहं.., घाबरु नकोस. श्री स्वामी समर्थ आहेत ना तुझ्या पाठीशी. मग काय घाबरायचं. त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर ते कितीही भयानक असलं तरी सामना करु आपण त्याचा. माझा मारुतीराया समर्थ आहे तारुन न्यायला. तु नि:शंक होवून बोल. काय झालं."

त्यांच्या आवाजातली आश्वासक आर्द्रता जाणवली आणि मला धीर आला. तशी मी बोलायला लागले. किती वेळ बोलत होते की पण सगळं सांगुनच थांबले. अगदी आमच्या पहिल्या भेटीपासुन ते काही क्षणांपूर्वी त्याच्या घरी अनुभवलेल्या त्या जिवघेण्या घटनेपर्यंत सर्वकाही. मनातली सगळी काळजी बोलुन टाकल्यामुळे जरा शांत वाटायला लागले होते आता. तितक्यात लक्षात आलं की आपण जरी सुरक्षीत असलो तरी तो अजुनही त्या घरातच अडकलेला होता. त्याचं काय झालं असावं?

"आण्णा, तो अजुनही......"

पुढं काही बोलायच्या आधी माझं समोर लक्ष गेलं. आण्णा डोळे मिटून ट्रान्समध्ये गेल्यासारखे बसले होते. भास्करदादांनी आपल्या ओठांवर बोट ठेवुन मला गप्प केलं.

"आण्णांनी समाधी लावलीय. बहुदा तू विचारणार असलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधताहेत."

मी विचलीत, अस्वस्थ अवस्थेत त्यांच्याकडे बघत राहीले. आण्णा जवळ जवळ अर्धा तास त्याच अवस्थेत होते. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र झरझर बदलत होते. क्षणभर त्यांचा चेहरा थोडा वेडा-वाकडा झाला. पुढच्याच क्षणी पुन्हा चेहर्‍यावर नेहमीचे स्मित आले. अर्ध्या तासाने त्यांनी डोळे उघडले. मी काही बोलणार इतक्यात त्यांनी हाताच्या खुणेने मला गप्प केले.

"दादा, थोडं पाणी देताय?"

पाणी पिऊन आण्णा बोलायला लागले.

"खुप मोठं दुष्टचक्र आहे ताई हे. तुझा मित्र त्याच्या जन्मापासुनच यात अडकलेला आहे. कदाचित म्हणुनच तो लग्नाचा विषय काढायचे टाळत असावा. कदाचित त्याला हे सगळे आधीपासून माहीत असेल किंवा नसेलही. पण आपल्या घरातलं वातावरण सर्वसामान्यांपेक्षा वेगळं आहे हे त्याला नक्कीच माहीत असावं. त्या घराच्या अंगणातलं ते जे मोठं, पुरातन झाड आहे ना, त्याच्याच मुळाशी या सगळ्या दुष्टचक्राची सुत्रे पेरलेली आहेत. भास्करदादा, आपल्याला एकदा तिथे जाऊन यायला हवं प्रत्यक्ष. मी आत्ता त्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला पण तिथली शक्ती खुपच ताकदवान दिसत्येय. खुप प्रयत्न करुनही मला आत त्या घरात शिरता नाही आले. उलट मलाच त्या शक्तीने एक प्रचंड फटका दिला. सावध होतो म्हणुन बरे नाहीतर आता तुम्हाला माझ्या अंतीम यात्रेचीच तयारी करावी लागली असती. असो, पुर्ण तयारीनिशीच एकदा जावे लागणार आहे आपल्याला तिथे."

"आण्णा..... " मी काही बोलणार इतक्यात आण्णाच बोलले.

"पाहीलं मी त्याला. अजुनही ठिक ठाक आहे तो. पण आपण लवकर काही केले नाही तर फार काळ ठीक नाही राहणार तो. काहीतरी अतिशय भयानक असं काळाच्या उदरातून बाहेर येवु पाहतय. खुप वर्षांपुर्वी महत्सायासाने त्याला बंधीत करण्यात यश आलं होतं तत्कालिन लोकांना. पण आता कुणीतरी त्याच्यासाठी कस-कसली अघोरी साधना करुन त्याला शक्ती बहाल करतेय. त्याच्या पुनरागमनाची तयारी करतेय."

"तूझ्या घरी कोण कोण आहे?"

आण्णांनी एकदमच हा प्रश्न विचारला आणि मी कावरीबावरी झाले. हलक्या आवाजात त्यांना सांगितलं..."कोणीच नाही. तसे एक काका-काकु आहेत, पण त्यांना माझी कसल्याही प्रकारची जबाबदारी नकोय."

आण्णांनी हलकेच माझ्या मस्तकावर थोपटले.

"काळजी करु नकोस ताई. माऊली आहेत ना तुझ्या पाठीशी आणि आता मी आहे, भास्करदादा आहेत, आमचा तुका आहे. आता फक्त एक करायचं, भास्करदादांना घेवुन घरी जायचं, तुझं ३-४ दिवसांचं सामान घेवुन थेट इथे राहायला यायचं. शक्य असेल तर ३-४ दिवसांसाठी रजेचा अर्ज देवुन टाक ऑफीसमध्ये. हे ३-४ दिवस खुप धोकादायक असणार आहेत आणि तुला तिथे असुरक्षीत अवस्थेत सोडून मला त्यांच्याशी लढताही येणार नाही. या इथे, या मठीत मात्र तू सुरक्षीत राहशील. सगळं काही स्थीर स्थावर झालं की ४-५ दिवसात मीच नेवुन सोडेन तुला तुझ्या घरी किंवा नव्या घरी. ओक्के?"

जय जय रघुवीर समर्थ !

आण्णा, आतल्या खोलीत निघुन गेले. हॉलमध्ये मी आणि भास्करदादा दोघेच होतो. एक विलक्षण शांतता पसरली होती. पण ही वादळापुर्वीची शांतता होती. येणारे काही दिवस माझं आणि त्याचं भवितव्य ठरवणार होते. मनात एकच विचार होता..

"देव न करो, पण जर आण्णांना या युद्धात यश नाही मिळालं तर."

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल भाउ,

लयच येळ लावला जनु यन्दाच्या टायमला.....पन लय झ्याक झालय बगा... Happy
लिवा लिवा ....अजुन लय लिवा... Happy

अमित

>>> सगळं काही स्थीर स्थावर झालं की ४-५ दिवसात मीच नेवुन सोडेन तुला तुझ्या घरी किंवा नव्या घरी. ओक्के?" >>>
म्हणजे नक्किच स्विट एंड................
पु.ले.शु. (भराभर)

पुन्हा क्रमशः?????????????????????ते पण ईतक्या मोठ्या गॅप नंतर!! हे गजानना ,विशाल ला लवकर लिहायचि बुद्धि दे रे देवा!!

Happy

पण खूप छोटा भाग आहे.. +२

इतकी घाबरलेली व्यक्ती "अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतात म्हणून 'ते' घाबरले काय?" इतके मोठे वाक्य सुसंगतपणे बोलू शकणार नाही असे वाटले.

निषेध: अंध श्रद्धेला खत पाणी घालणारी कथा. >>>>> अहो, ती कथा आहे, ह्यातंच सगळं आलं नाही का? काल्पनिक आहे सगळं!!!

आणि बाकीच्यांना आवडतेय ना? तुम्हाला नसेल पटत तर नका वाचू हो!

officebusy.gif136.gif136.gif136.gif136.gif136.gif136.gif

???????

Pages