पुण्यात राहिल्यावर व ट्रॅफिक स्थिती पाहिल्यावर असे दिसून येते की पुण्याला एका चांगल्या, सुलभ आणि वेळेवर प्रवाशांनी ने-आण करणार्या सोयीची खूप गरज आहे. त्यासाठी डीएमआरसी ( दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) ने पुण्याच्या विविध विभागाचा अभ्यास करून खालील पर्याय दिले.
फेज १ ( २०१३ पर्यंत पूर्णत्वास)
लाईन १. वनाज ते रामवाडी. ( नळस्टॉप, डेक्कन, कोर्ट, पुणे स्टेशन ते रामवाडी)
लाईन २. चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज
फेज २ ( २०२१ पर्यंत पूर्णत्वास)
लाईन ३ डेक्कन ते बंड गार्डन
लाईन ४ हिंजवडी ते पुणे विद्यापीठ
हा प्लान २०१० मध्ये पुणे मनपाने तत्वतः मान्य केला. दोन महिन्यांपूर्वी जून २०१२ मध्ये राज्य सरकारने देखील हिरवा कंदील दाखविला
त्यामुळे आता मेट्रो प्रकल्प सुरू होण्यास वाव आहे. पण सध्या मेट्रो वरून की भुयारी हा प्रश्न ऐरणीवर आहे.
मेट्रो साठी २००८ च्या अंदाजानुसार २०० करोड रू प्रति किमी खर्च येईल पण हा खर्च मुख्यतः खालून की वरून ह्यावर जास्त अवलंबून असतो. जर भुयारी मार्ग अवलंबला तर अर्थातच जास्त खर्च येतो पण त्याचे फायदे खूप असतील. राष्ट्रवादी असे म्हणत आहेत की मेट्रो वरून करू. अर्थातच कमी खर्च हे कारण त्यात असेल पण विचार करू जाता मला खालील मुद्दे मांडावे वाटतात.
मेट्रो - रस्त्यावरून फायदे.
१. नागरी सुविधा फायदे फारसे नाहीत. आर्थिक फायदे मात्र भरपूर कारण जाहिरात.
तोटे
१. मेट्रो होईपर्यंत वनाज ते रामवाडी ( ह्यामध्ये वनाज, पूर्ण कर्वे रस्ता - डेक्कन - पुणे स्टे. बंड गार्डन - खराडी ते रामवाडी ह्या पूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक जाम होणार. म्हणजे आधीच रस्ता पुरत नाही, त्यात ही कामाची भर. वर दिलेले सर्वच मार्ग ट्रॅफिक जामचे शिकार होणार. (अर्थात आत्ताही आहेच पण त्यात अजून भर पडेल) म्हणजे पुढची ५ वर्षे ह्या भागात राहणारे लोक वैतागणार. शिवाय हा रस्ता म्हणजे पुण्याची धमनीच म्हणावे लागेल.
२. मेट्रो एकदा आणली की यु आर कमिटेड. मग पुढे एखादा फ्लाय-ओव्हर जरी ह्या रस्त्यावर बांधायचा झाला तरी अशक्य.
३. पार्किंग व्यवस्था. ( पार्क अॅण्ड राईड) अजिबात वाव नाही.
४. मेट्रो स्टेशन पण रोडवरच उभी करावी लागल्यामुळे मुंबईत सध्या जसे दिसते, एका निवासी इमारतीला खेटूनच मेट्रो स्टेशन तसे दिसेल.
५. शहराचा एकुण सौंदर्यात भर पडेल असे वाटत नाही.
मेट्रो - भुयारी
खूप खोल विचार करता असे दिसते की मेट्रो हवीच असेल तर भुयारी मेट्रो हा पर्याय सर्वात चांगला आहे असे वाटते.
१. सध्याच्या ट्रॅफिकला कुठेही धक्का बसत नाही, सर्व काम खूप खोलवर होत राहते.
२. स्टेशन बांधताना कुठल्याही इमारती शेजारी बांधले जात नाही.
३. क्रॉस रोड असले तरी तळमजला -१ वर एक लाईन व तळमजला -२ वर दुसरी लाईन आखणे खूप सोयीचे होईल.
४. अनेक प्रगत देशातील मोठ्या शहरात भुयारी रेल्वेचे जाळे आहे व ते शहर फिरण्यासाठी मारक न ठरता पुरक ठरते.
२००८ मध्ये जी पाहाणी झाली होती ती आज २०१२ मध्ये फारच फोल ठरते. मेट्रो तर हवीच पण ती भुयारी व DMRC ने सुचवलेल्या पेक्षा वेगळ्या मार्गावर असे मला वाटते. २००८ मधील पुणे व आजचे पुणे ह्यात खूप
फरक पडला आहे.
उद्याचे पुणे :
इस्ट पुणे
हडपसर, उंद्री ते पार फुरसुंगी अन डाव्याबाजूला मगरपट्टा, खराडी, धानोरी ते विमानतळ आणि आणखी थोड्या डाव्या बाजूला येरवडा चंदन नगर ते वाघोली असे पुणे वाढले आहे.
वेस्ट पुणे
१०० एकरापेक्षा अधिक प्रोजेक्ट असेल तर त्याचे वर्गीकरण टाऊनशीप मध्ये होते. आता हिंजवडी फेस १ ते ३ मध्ये मोठमोठ्या टाऊनशीप आल्या आहेत. फेज ३ च्या पूर्वेला पुढे जो सध्याच्या २० फुटी रस्ता जातो तिथे
नवा रिंग रोड येणार असल्यामुळे पार रिहे पर्यंत वाढ होणार. रिह्यात आत्ताच जागा ( नॉन एन ए) ३५० ते ४५५ अशी आहे. त्यातच ह्या जागा ४-४०० एकरच्या टाऊनशीप मध्ये असल्यामुळे रिंग रोड अस्तित्वात आल्यावर पुणे तिथपर्यंत वाढणार. हिंजवडीच्या पुढे मुंबईच्या बायपास रस्त्यावर रावेत पर्यंतच्या सर्व स्किम मध्ये गुंतवणूक आहे तर बाय पास ते म्हारुंजी ह्या मधल्या पट्यात लाईफ रिपब्लिक, व्हिलेज, एक्सारबिया अशा २००-२०० एकर्सच्या स्किमस आहेत. तिथून पुढे चांदवड पर्यंत पूर्ण शेत जमीन विकली गेली आहे. नवीन रिंग रोड चांदवड ते पिरंगुट असा असणार आहे. चांदनी चौक - भुगाव - पिरंगुट ह्या पट्यात खूप मोठ्या स्किम्स येत आहेत. व लोक येत्या १० वर्षात तिथे राहायला जाणार. त्यामुळे चांदनी चौक ही जागा खूपच महत्त्वाची (जी आजही आहेच) ठरणार.
चांदखेड-रावेतच्या बाजूला गहुंजे पर्यंत मुंबईचे मोठे बिल्डर्स उदा हिरानंदानी, लोधा, रामा ग्रुप इत्यादींच्या टाऊनशीप होत आहेत. मधल्या पट्यातील हिंजवडी, वाकड, ताथवडे, इथे नव-नवीन स्किम्स रोज येत आहेत. त्यामुळे वेस्ट पुणे ( ग्रेटर पुणे ) हे आता PMRDA मध्ये रुपांतरीत होणार. कालच्या पुण्यापेक्षा ह्या पुण्यात राहणारी लोक तुलनेने थोडी उच्च मध्यमवर्गीयात मोडत असल्यामुळे ट्रॅफिकचा बोजा नव-नवीन कार्स मुळे वाढणार. रोड व नागरी सुविधा ह्यांची योग्य आखणी ही काळाची गरज आहे.
आज रोजी २ ते अडिच लाख वाहनांची भर प्रतिवर्षी पुण्यात पडते. हे सर्व जर टाळायचे असेल तर मेट्रो रूट पण असा हवा की ज्यामुळे वाहनांच्या वापरात घट व्हावी.
मेट्रो संदर्भात ह्या विषयी जनजागृती करणार्या श्री प्रशांत इनामदारांचे म्हणणे पण मला पटते (अर्थात काही अंशी - वरून नको ह्या मताशी सहमत आहे. पण मेट्रो नको हे पटत नाही. ती हवीच.
मेट्रो रूट रामवाडी ते वनाझ : डीएमआरसी ने जो रूट दिला आहे तो देखील मला (व्यक्ती / नागरिक ) म्हणून योग्य वाटत नाही. कारण मेट्रोचा खर्च त्यातून निघणार तर नाही उलट वरून मेट्रो मुळे असून अडचण नसून
खोळंबा होईल असे वाटते. सध्या मुख्य ट्रॅफिक ही कार्सची आहे. हळूहळू घरटी एक कार होणार त्यामुळे चपुढच्या पाच वर्षात ट्रॅफिक आणखीच बिकट होईल, वाढेल.
ह्यासाठी खालील रूटस असावेत असे वाटते.
१. हिंजवडी ते वारजे माळवाडी ( लाईन १ ) (चांदनी चौकात दोन लाईन्स, एक स्टॉप सध्याच्या ओव्हरब्रिज जवळ इथे परत जंक्शन औंधकडे वळणार्या गाड्यांसाठी.)
२. चांदनी चौक ते जुने विमानतळ ( भुसारी - पौड फाटा - कर्वे रोड - डेक्कन, मनपा - पुणे स्टे - मगरपट्टा विमानतळ )
३. मनपा ते सध्याच्या हिंजवडी ओव्हरब्रिज ) मॉडेल कॉलनी, विद्यापीठ, औंध - काळेवाडी फाटा ते ओव्हरब्रीज)
४. स्वारगेट ते कात्रज.
ह्या मेट्रो लाईन्स मुळे होईल काय की सर्व कार ट्रॅफिक कमी होऊन लोक इस्ट ( मगरपट्टा- खराडी) ते वेस्ट (हिंजवडी) असे जोडले जातील त्यामुळे अगदी औंध मध्ये राहणारा व्यक्ती ही मनपा मार्गे परत मगरपट्या पर्यंत रेल्वेने जाऊ शकतो. ते देखील आरामात. शिवाय इस्ट वेस्ट असल्यामुळे ( वनाझ ते रामवाडी हा पण इस्ट वेस्ट मार्ग होता) दिल्ली मेट्रो ने जी सुचना केली ती पण योग्य प्रकारे हाताळता येईल.
मेट्रो सोबतच आणखी एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे सध्या असलेल्या पुणे स्टेशन ते चिंचवड लोकल्सची संख्या वाढवणे. (त्यामुळे ह्या मार्गावर मेट्रोची गरज आहे असे वाटत नाही. कारण लोकल्सचे योग्य नियोजन केले तर खूप मोठा भार हलका होऊ शकतो. )
ह्या शिवाय एक मोठी गरज आहे ती म्हणजे पार्क अॅण्ड राईड योजना अवलंबण्याची व रेल्वेच्या वेळांनुसार बसेसच्या वेळेच्या नियोजनाची. हे सर्व जर झटपट झाले तर आपण पुढच्या काही वर्षात परत एकदा कर्वे रोड ते डेक्कन १० मिनिटात जाऊ शकू. किंवा कोथरूड ते मगरपट्टा हा प्रवास फास्ट मेट्रो ने २० मिनिटांच्या आत होऊ शकेल. ज्याला आज रस्त्याने १ तास सहज लागतो.
फेज १ २०१३ मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे असे दिल्ली मेट्रो म्हणते पण २०१३ उंबरठ्यावर आहे आणि आपण आत्तापर्यंत फक्त होकारा मध्येच अडकलो होतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर एका स्पेशल पर्पज व्हेईकलची निर्मिती करून एक मंडळ लगेच स्थापन केले जावे व त्या मंडळावर मेट्रो लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी द्यावी.
केदार तु सुचवलेल्या पर्यायात
केदार तु सुचवलेल्या पर्यायात जास्त भर आयटी साठी दिलाय अस वाटतय. रामवाडी ते कर्वेनगर मेट्रो सुचवताना रांजणगाव , शिक्रापुर याभागातल्या MIDC चा पण विचार केला आहे अस मला वाटत.
सुशांत तसे वाटू शकते पण
सुशांत तसे वाटू शकते पण त्यात पुढील मुद्दा विचारात घेतला आहे. चांदनी चौकात पिरंगुट MIDC ला विचारात घेतले होते. फक्त आयटी नाही, बायो टेक पण. हिंजवडीचे फेज ३ सारखी फेज ४ सुद्धा आहे. ५ च्या गप्पा पण सुरू आहेत. हा आयटी हब न राहता बायो हब पण येत्या १० वर्षात होईल.
तसेच पुढील मुद्दे लक्षात घेतले.
१. कार घेणारे लोक व त्यांची आर्थिक परिस्थिती.
२.शिवाय घर घेणे आता कोणालाच परवडत नाहीये. त्यामुळे नवीन घर घेणारे हे धानोरी, विश्रांतवाडी, वाघोली असे पूर्वे कडे आणि वाकड / ताथवडे / रावेत असे पश्चिमेकडे राहतात. हे सर्वच आय टी वाले नाहीत. कारण पिंप्री-चिंचवड MIDC येथून जवळ आहे.
३. रांजनगाव वा इतर MIDC मधून चंदन नगर पर्यंत येईपर्यंत सध्या जाम नसतो तर त्या पुढे असतो. रांजनगाव व चाकण MIDC मधील लोक आता इस्ट पुणेच जास्त प्रिफर करत आहेत. त्यामुळे साहजीक त्यांची वर्दळ चंदन नगर पर्यंत संपेल. मी एक लाईन चांदनी चौक मगरपट्टा आणि धानोरी- विमानतळ अशी लिहितो आहे ती अर्थात चंदन नगर एक्झेटेंशन केली तर मात्र तू म्हणतोस ते सहजसाध्य होईल.. अॅग्रीड.
केदार.. हिंजवडी ते वारजे
केदार.. हिंजवडी ते वारजे माळवाडी >> ही लाइन खरंतर पुढं कात्रज चौकापर्यंत पाहिजे म्हणजे मधल्या सिंहगड ऱोड, धायरी, आंबेगाव, धनकवडी आणि कात्रज भागातल्या लोकांचीपण सोय होइल.
एक उत्सुकता म्हणून विचारतोय.. इथलं विचारमंथन तू कोणापर्यंत पोहोचवायचा पण विचार करतोयस काय? जर योग्य त्या लोकांपर्यंत हे पोहोचणार असेल तरच याचा खरा फायदा होइल.
कळीचा मुद्दा हा योग्य नियोजन,
कळीचा मुद्दा हा योग्य नियोजन, त्याचं अवलंबन (इम्प्लिमेन्टेशन) आणि राजकीय इच्छाशक्ती हाच आहे असं नाही का वाटत? पीएमटी धड चालवली तरीही कितीतरी फरक पडेल वाहतूकव्यवस्थेवरच्या ताणात.
मेट्रोबद्दल दुमत नाही. भुयारी मेट्रो खरंच सुखदायक प्रकार असतो
इथलं विचारमंथन तू कोणापर्यंत
इथलं विचारमंथन तू कोणापर्यंत पोहोचवायचा पण विचार करतोयस काय >> हो अजित पवारांपर्यंत. कारण मला प्रामाणिकपणे असे वाटते की २००८ मधील गरजांवर आधारीत प्लान चुकीचा आहे. व २०१२ मधील ( २०२५ मधील) गरजा वेगळ्या आहेत.
केदार, चांगला लेख. बरेच
केदार, चांगला लेख. बरेच डीटेल्स आहेत. एक दोन प्रश्नः
१. डीएमआरसी ने लाईन्स ठरवताना काही मॉडेल्स ची तुलना केली होती का याची माहिती कोठे उपलब्ध आहे का? उदा: समजा एक पर्याय असा बघितला - की शहराबाहेरून रिंग रोड सारखी जाणारी व हिंजवडी, पिंपरी-प्राधिकरण चा औद्योगिक भाग (एमआयडीसी), खराडी वगैरे, मगरपट्टा ई. जोडणारी मेट्रो. जी शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरूवातीला जाणार नाही. या मेट्रोला 'फीडर' बस सर्विस, जी नेहमीच्या रस्त्यांवरून या मेट्रोचे स्टॉप्स उभे-आडवे जोडेल. यात शहराच्या अत्यंत गजबजलेल्या कोणत्याच भागात बांधकाम करावे लागणार नाही, निदान सुरूवातीला. कोथरूड वरून खराडीला, मगरपट्ट्याला, भोसरीला जाणार्या व्यक्ती सध्या उगाचच कर्वे रस्त्यावरून जातात ते पहिले दुसर्या मार्गाने जातील. नेहमी ऑफिसला जाणारे लोक बस-मेट्रो-बस असे करू शकतात, जर वेळ वाचणार असेल तर.
२. दुसरे म्हणजे मेट्रो नको म्हणणार्यांनी इतर पर्याय काय सुचवलेत?
३. पुढच्या ५ वर्षांत शहराची वाहतूक सुधारण्याचे इतर काही प्लॅन्स मनपाकडे आहेत का?
या सगळ्या गोष्टींची मक्तेदारी तू घेतलेली नाहीस याची कल्पना आहे, पण हे सगळे रिलेव्हंट प्रश्न असल्याने येथे टाकत आहे
भारतात प्रमुख शहरांमधे बरेचसे रस्ते अजून २०-३० वर्षांपूर्वीच्याच रूंदीचे असताना लक्षावधी कार्स रस्त्यावर येउ देणे आणि त्यावर काही निर्बंध नसणे हे मला तरी चुकीचे वाटते. अमेरिकेच्या संदर्भाने बोलायचे तर आपण सबर्बन लिव्हिंग मॉडेल डाउनटाऊन मधे कोंबण्याचा प्रयत्न करत आहोत - हजारो लोकांकडे स्वतःची कार, शहरातल्या शहरात सुद्धा कारने जाण्याचे कल्चर, मॉल्स मधे एकदम खरेदी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसणे (अमेरिकेत बर्याच ठिकाणी ती पुरेशी नाही. आपल्याकडे बस व रिक्षा असूनसुद्धा लोक त्याच्या भरवशावर राहू शकत नाहीत) ई. या सबर्ब वाल्या सवयी पण छोटे रस्ते, पार्किंग उपलब्ध नसणे, शहरातील दाटीवाटीच्या भागातील ऑफिसेस हे 'डाउनटाउन' कल्चर हे दोन्ही मिक्स होत आहे.
कळीचा मुद्दा हा योग्य नियोजन,
कळीचा मुद्दा हा योग्य नियोजन, त्याचं अवलंबन (इम्प्लिमेन्टेशन) आणि राजकीय इच्छाशक्ती हाच आहे असं नाही का वाटत? पीएमटी धड चालवली तरीही कितीतरी फरक पडेल वाहतूकव्यवस्थेवरच्या ताणात. >>> +१
मेट्रो पुण्यात ??? अरे
मेट्रो पुण्यात ??? अरे वा........... मला आल्यावर सांगा.....दिघी पर्यंत जायचे आहे
भारतात प्रमुख शहरांमधे बरेचसे
भारतात प्रमुख शहरांमधे बरेचसे रस्ते अजून २०-३० वर्षांपूर्वीच्याच रूंदीचे असताना लक्षावधी कार्स रस्त्यावर येउ देणे आणि त्यावर काही निर्बंध नसणे हे मला तरी चुकीचे वाटते
>>
तिकडे कार विकत घेण्याबाबतचा बीबी पाहिला असता एकदम उलट मानसिकता दिसून येते. पी एम टी सुधारली तरी फोर व्हीलरवाली आणि बाईकवरील मंडळी त्यात बसतील असे वाटत नाही. कारण स्तॉपवर उतरून गंतव्यस्थळी पुन्ही पायी जाण्याची मानसिकता लोकांत राहिली आहे असे वाटत नाही....
पुण्यात मेट्रो व्यवहार्य नाही
पुण्यात मेट्रो व्यवहार्य नाही अजिबात आवश्यकता नाही असं म्हणत नाही.
पण वरून मेट्रो बांधताना जर रहदारीचा खोळंबा होत असेल तर भुयारी रेल्वेमुळे कसा होणार नाही ? दिल्लीमधे भुयारी रेल्वेचं काम चालू असताना रस्ते खणून ठेवल्याने सतत जाम लागत होता. अर्थात तिथले रस्ते महारुंद असल्याने चार ट्रॅक खणले तरी चार शिल्लक राहत होते. पुण्यात इनमिन एक ट्रॅकचे रस्ते. त्याचंच विभाजन केलं गेलंय. मोठे रस्ते म्हणजे कर्वे रस्ता, जे एम रोड, युनिवर्सिटी रोड, सातारा रोड आणि सिंहगड रोड. आळंदी रस्ता हा नुकताच रुंद झालेला आहे. बाकी सर्व आनंदच आहे. आत्ता आहे त्याच मोठ्या रस्त्यांवर संध्याकाळी जाम असतो. खणल्यावर काय होईल ? किमान दहा वर्षे हे काम चालेल.
बरं ड्रेनेज, टेलिफोन, पाणी आदींचं कसलंही नियोजन नाही. या वाहिन्या कुठून नेणार ?
सर्वात महत्वाचं म्हणजे मेट्रो कुणासाठी ? मेट्रोच्या मागचे उद्देश काय आहेत ?
तर मेट्रोचं बांधकाम करणा-यांना चार एफएसआय देण्याचं घाटत आहे. सर्वच पक्षांचं यावर एकमत आहे. म्हाडाला अडीच एफएसआय देताना चालढकल होतेय आणि ती बरोबरच आहे. दाट वस्तीच्या पुण्यात जिथे रस्ते लहान आहेत, पाण्याचे पाईप लहान व्यासाचे आहेत आणि ड्रेनेजवर ताण आहे तिथे आहे त्याच्या चौपट वस्ती झाली तर काय होईल ?
वाहनं कुठे लावणार ? रस्त्यांसाठी वाढीव जागा कुठून आणणार ? पाणी प्रत्येकाला मिळणार का ? ही चार एफएसआयची तरतूद घातक आहे. वाडे आणि जुन्या इमारतींचे सौदे पूर्ण होत आलेत. यांचे खरेदीदार कोण आहेत ? शेवटी मेट्रोचा फायदा कोणाला होणार आहे ?
वनाज ते रामवाडी या मार्गाचे निकष काय आहेत ?
ओफिसेस कोणत्या भागात आहेत, रहिवासी क्षेत्र कुठे आहे याचा शास्त्रीय अभ्यास कुणी केलाय हे प्रश्न विचारले कि विकासाचे मारेकरी इतकंच उत्तर सत्ताधारी देतात. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळतील का हा कळीचा मुद्दा आहे. नाहीतर चला आज सुट्टी आहे तर मेट्रोमधून फिरून येऊ इतकाच उद्देश राहील मेट्रोचा.
२. दुसरे म्हणजे मेट्रो नको
२. दुसरे म्हणजे मेट्रो नको म्हणणार्यांनी इतर पर्याय काय सुचवलेत?
@ फारएण्ड
बीआरटी मध्ये सुधारणा केली तर मेट्रोच्या अतिशय कमी किंमतीत किफायतशीर पर्याय उपलब्ध होईल. बीआरटीला लेन राखून ठेवण्याऐवजी ती लेन इलेव्हेटेड केली तर आवश्यक प्रवासी संख्येसाठी बस सोडता येईल. ही व्यवस्था पुण्यात कुठेही करता येईल. याचे मॉडेल एका पुणेकर नागरिकाने मनपाला दिलेले आहे. निर्दोष अशा त्या मॉडेलवर चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही.
केदार... मेट्रो सेवा ही आता
केदार...
मेट्रो सेवा ही आता पुण्या साठी पर्याय राहीला नसुन आवश्यकच झाली आहे. डिझेल वर / गॅस वर चालणार्या
सार्वजनीक बस सेवे पेक्षा मेट्रो बरी.
मेट्रो रेल्वे जमीनी वरुन घेणे म्हणजे १०-१२ मीटर उंचीवरून जाते. मेट्रोचे स्टेशन्स सोईच्या ठीकाणी बांधावी
लागली तरीही मेट्रो लाईन ( रुळ) सरळ रेषेत कमीत कमी अंतरात बांधता येतात.
आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण बर्याच गोष्टीसाठीचा ऊहापोह करत बसतो. ५ ते १० वर्षे अभ्यासासाठी त्या नंतर
जमिनी संपादन करणे वैगेरे, नियोजीत मार्ग ठरवणे.
कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो ही दोनच चांगली उदाहरणे आहेत, जेथे काम टाईमटेबलप्रमाणे झाले,
मुबई मेट्रोरेल्वे व दुबईरेल्वेची घोषणा एकाच वेळेला २००६ ला झाली. दोन्ही शहरे तितकीच गजबजलेली,
२००६ ला सुरु करुन दुबईने ठरल्या प्रमाणे ०९-०९-२००९ ला पहिल्या लाईनचे उदघाटन करुन सेवा सुरु केली. वर्षभरात दुसरी लाईन ही सुरु केली. दुबईची मेट्रो ही टुरीस्ट अॅट्राक्शन आहे व जगातल्या सर्वात सूंदर मेट्रो पैकी गणली जाते.
वरदाच्या पोस्ट्शी सहमत. किरण
वरदाच्या पोस्ट्शी सहमत.
किरण - धन्यवाद. पुण्यातील बर्याच रस्त्यांवर होणार जॅम हा 'कम्युटर जॅम' असतो - म्हणजे ऑफिस च्या वेळेत होणार - काही रस्त्यांवर ठराविक दिशेने होणारा ( लक्ष्मी रस्ता, टिळक, बाजीराव, शिवाजी हे रस्ते अपवाद आहेत). ती ऑफिसेस व त्यात येणारे लोक याचा अॅनेलिसीस करून त्यावर काहीतरी मार्ग काढता येइल.
पीएमटीत काहीतरी सुधारणा होणे आवश्यक आहे - बसेस ची कमतरता (कायम साधारण २०० बसेस नादुरूस्त असतात असे वाचले होते), त्यातील गर्दी - आयटी, मल्टिनॅशनल मधे जाणारा व लॅपटॉप गळ्यात घालून फॉर्मल कपडे घालणारा माणूस त्यातून ऑफिसला जाऊ शकेल अशी अवस्था नाही (या लोकांचा उल्लेख करायचे कारण म्हणजे स्वतः कार घेऊन जाणार्यात यांचे प्रमाण जास्त आहे). रूट प्लॅनिंग किती बरोबर आहे कल्पना नाही.
बाजो - काही कंपन्यांमधे लोक सायकल वरून येणे, चालत येणे वगैरे अगदी कमी प्रमाणावर का होईना पण सुरू झालेले आहे. त्याला ऑफिस मधे मान्यता व मान मिळाला तर ते वाढेल.
मेट्रो च्या बाबतीत - ती
मेट्रो च्या बाबतीत - ती "स्टॅण्डर्ड गेज" ची असेल असे मधे वाचले होते. ते ही चुकीचे आहे. आपल्याकडे ब्रॉड गेजचीच असणे आवश्यक आहे. एकतर डबे मोठे असतात त्यामुळे जास्त लोक जाऊ शकतात. दुसरे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे पुढे गरज पडली तर या गाड्या रेल्वेच्या ट्रॅकवरूनही जाऊ शकतील. म्हणजे खडकी पर्यंत जाणारी मेट्रो नेहमीच्या रूळांवरून पुढे कोठेही जाऊ शकेल. येत्या काही वर्षात पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण होणारच आहे, नंतर तिकडच्या गावांनाही (लोणी, उरूळी वगैरे) थेट कनेक्ट करू शकेल.
एकीकडे रेल्वे गेली अनेक वर्षे "युनिगेज" प्रकल्प (भारतातील सगळे ट्रॅक्स एकाच मापाचे - ब्रॉड गेजचे करणे) राबवत असताना नवीन रेल्वेचे कोणतेही प्रकार वेगळ्या मापाच्या ट्रॅकचे करण्यात नुकसानच आहे.
(यात मेट्रो ची गाडी नेहमीच्या ट्रॅकवरून मुळात चालू शकते का हा मुद्दा आहे. पण तशी ती करून घ्यायला अवघड नसावी).
मी कायम स्वतःच्या दुचाकीशिवाय
मी कायम स्वतःच्या दुचाकीशिवाय पुण्यात न हिंडणारी अशी. पण कलकत्त्यात, दिल्लीत रहात असताना कधीही त्या दुचाकीला मिस केलं नाही/ करत नाही. गंतव्य स्थळी जाण्यासाठी बस, मेट्रो, शेअर रिक्षा, टॅक्सी असे विविध पर्याय असतात. उलट, स्वतः गाडी ताबडत जावं लागत नाही याचा अपार आनंद आहे. कलकत्त्याची सार्वजनि वाहतूक व्यवस्था अजिबात आदर्श वगैरे नाही. पण निदान जिथे कुठे जायचंय तिथे जायला वेळच्यावेळी वहानं मिळतात. दिल्ली आता तर सुधारलंच आहे पण जेव्हा ब्लूलाईन बसेसच्या काळात सुद्धा दिल्लीत हिंडणं हे पुण्यापेक्षा सुखकरच होतं. तेव्हा उत्तम सार्वजनिक व्यवस्था असली तरी लोक त्याचा फायदा घेणार नाहीत हे फार वरवरचं विधान आहे
तिकडे कार विकत घेण्याबाबतचा
तिकडे कार विकत घेण्याबाबतचा बीबी पाहिला असता एकदम उलट मानसिकता दिसून येते. >> बाजो, कार विकत घेतली म्हणजे लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार नाहीत हे लॉजिकच चुकीचं आहे. अनेक लोक तयार आहेत पण तसं रिलायबल आणि डिपेंडेबल साधन सध्या अस्तित्वात नाहिये. मी स्वतः हिंजवडीला जायला ऑफिसच्या बसचाच वापर करतो (माझ्याकडं कार असूनसुद्धा). आणि असे अनेक मित्र आहेत जे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायला तयार आहेत. पण PMPML नं काहीही झालं तरी सुधरायचं नाहीच असंच ठरवलेलं दिसतंय. लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीही प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. उदाहरणच द्यायचं झालं तर - कोथरूडहून हिंजवडीला जाण्यासाठी त्यांनी एक बस चालू केली जी डायरेक्ट हायवेवरून न जाता अख्खं पुणं फिरून जाती (मनपावरून). अशा मार्गावरून कोण जाइल? त्यापेक्षा गाडी घेउन गेलेलं कधीपण चांगलं.
फारेंडा.. योग्य मुद्दे मांडले आहेस. पण मला नाही वाटत की मेट्रोला पूरक गोष्टींचा प्लॅनमध्ये विचार झाला असेल. भारतीय मानसिकता खूप रियाक्टिव आहे (प्रोअॅक्टिव नाही). जेव्हा पार्किंगचावगैरे प्रॉब्लेम गळ्यापर्यंत येइल तेव्हा हे लोक विचार करतील पार्क अँड राईड सारख्या सुविधेचा.
@ फारेण्डा मेट्रोच्या खर्चात
@ फारेण्डा
मेट्रोच्या खर्चात बसेस विकत घेता येणार नाहीत का ? अगदी व्होल्वोच्या आरामशीर बसेसची सेवाही सुरू करता येईल. कुठल्याही शहरात वाहतूकीचे प्लानिंग करताना वाहनांची संख्या आणि रस्त्याची रुंदी व त्याची लांबी यांचे गुणोत्तर लक्षात घेतले जाते. मुंबई, दिल्ली, कलकत्ता ही महानगरे पूर्वीपासूनच प्रशस्त रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यासारख्या अरुंद रस्त्याच्या कुठल्या शहरात अन्यत्र मेट्रोचं नियोजन झालेलं आहे का ? अहमदाबाद मधे मेट्रो ऐवजी बीआरटीचाच पर्याय स्विकारला गेलाय. विशेष म्हणजे तिथे ही योजना यशस्वी झालीये. पुण्याच्या नियोजनातच घोळ असावा.
पुण्यासारख्या इलेव्हेटेड रूट्स बीआरटीसाठी नक्कीच राखून ठेवणे सोपे जाणार आहे. कमी अंतराची खाजगी वाहने या रस्त्यावर येऊच शकणार नाहीत. मेट्रो मधून प्रवास करताना तिचा झालेला खर्च भरून निघण्यासाठी तिकीट किती असणार हा कळीचा मुद्दा असणार आहे. जर मेट्रोच्या लाईन्स आणि वेळा या सोयीच्या नसतील तर हा पांढरा हत्ता ठरण्याची शक्यता जास्त आहे.
मेट्रोच आणायची असा अट्टाहास
मेट्रोच आणायची असा अट्टाहास असल्यास तिचे टर्मिनस पुणे मनपाच्या परिसरात व्हावे. हवे तर शासकिय गोदामांची जागा देण्यात यावी. जुना बाजार ते मलाधक्का इथे रेल्वेची एक लाईन आहे. इथेही टर्मिनस बनू शकते. या टर्मिनस पासून एक लाईन सिंहगड रस्ता, एक हडपसर, एक वारजे, एक चंदन नगर आणि एक कात्रज अशी नेता आली तर या मेट्रोचा वापर होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी यासाठी जवळच दुसरे टर्मिनस असावे जेणे करून एकाच टर्मिनस वर गर्दी टाळता यावी.
खरं तर हा पैसा वापरून रेल्वे ऐवजी जोड बसेस, दुमजली बसेस या प्रकारच्या मार्गावरून सोडल्या तर ते जास्त किफायतशीर होईल.
मेट्रो - भुयारी खूप खोल विचार
मेट्रो - भुयारी
खूप खोल विचार करता असे दिसते की मेट्रो हवीच असेल तर भुयारी मेट्रो हा पर्याय सर्वात चांगला आहे असे वाटते.
१. सध्याच्या ट्रॅफिकला कुठेही धक्का बसत नाही, सर्व काम खूप खोलवर होत राहते.
२. स्टेशन बांधताना कुठल्याही इमारती शेजारी बांधले जात नाही.
३. क्रॉस रोड असले तरी तळमजला -१ वर एक लाईन व तळमजला -२ वर दुसरी लाईन आखणे खूप सोयीचे होईल.
४. अनेक प्रगत देशातील मोठ्या शहरात भुयारी रेल्वेचे जाळे आहे व ते शहर फिरण्यासाठी मारक न ठरता पुरक ठरते.
>>>
केदार तुझ्या वरील मुद्द्यावर as a structural engineer मी काही बाबींवर प्रकाश टाकु ईच्छितो -
१. दिल्ली येथे जमिनीखालील मेट्रोचा मार्ग एकूण मार्गाच्या साधारणपणे २०% पण जेमतेम असेल. बाकी सर्व मार्ग एलेव्हेटेड आहेत किंवा जमिनीच्या लेवलला आहेत.
२. जमिनीवर मेट्रो करण्यासाठी DMRCच्या सारखे रस्त्याच्या मध्यभागी (रोड डिव्हायडरवर) गोल आकाराचे पिलर्स घेऊन बॅलन्स्ड कँटिलीव्हर पद्धतीचे बांधकाम प्रिकास्ट / प्रिस्ट्रेस्ड टेक्नॉलॉजी वापरुन करता येऊ शकेल. पुण्यात मुंबईसारख्या ऊंच इमारती नसल्यामुळे निवासी इमारतीला खेटूनच मेट्रो स्टेशन असा प्रकार होणार नाही.
३. जमिनीखाली जर मेट्रो करावयाची झाली तर कुठल्याच बाबतीत पुण्यात व्यवहार्य ठरणार नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे आपण दख्खन पठारावर (जे अत्यंत कठीण अशा अग्नीजन्य अशा बेसॉल्ट खडकांपासून बनेलेले आहे) वसलेलो आहोत. त्यामूळे २/३ मजले खोल मेट्रो लाइन्स, स्टेशने वगैरे बांधताना कठीण खडक तोडावे लागतील, की जे २/३ फुटाच्या खोलीवर लागतात (सर्वसामान्यतः). अत्यंत डेन्स अशा नागरी भागात कठीण खडक तोडण्यासाठी compressors व ब्रेकर्स वापरवे लागतील. ओपन किंवा वॅगनड्रील ब्लास्टींग करता येणार नाही, परीणामतः खूप वेळ खर्ची पडेल (निदान ५/६ वर्षे) व ट्रॅफिक जॅम्स रोजचेच होतील. पावसाळ्यामधे तर हॅवॉक होईल.हा अनुभव पिंपरी-चिंचवड येथील वा संचेतीच्या चौकातील ग्रेड सेपरेटरसच्या वेळचा ताजाच आहे.
४. तसेच existing drainage, water supply, electrical & telephone cables व इतर services सुध्धा खूपच प्रोब्लेम्स देतील.
त्यामूळे elevated मेट्रोचा पर्यायच चांगला आहे.
किरण पण त्यामुळे ट्रॅफिक जाम
किरण पण त्यामुळे ट्रॅफिक जाम हा प्रश्न सुटणारच नाही. सध्याच्या बीआरटी मध्ये सुधारणा किती आणि कशा करणार? अहमदाबादचे उदा. पुण्याला लागू होणार नाही कारण तिथे इस्ट वेस्ट अशी ट्रॅफिक (दोन्ही कडे भरमसाठ) नाही. पुण्यात उलटे आहे.
रोड मोठे करायलाच हवेत. पण त्याचबरोबर पर्यायी व्यवस्था हवी.
सर्व मोठ्या शहरांची तुलना केली तर नुसत्या बसेसच्या सोयींनी काही होणार नाही. तर त्या सोबत रेल्वेचे जाळे विणले तर ट्रॅफिक जाम सुटून घरी लवकर पोच न्यास मदत होईल
वरदा ने म्हणल्यासारखे एकदा का योग्य ती सेवा (रेल्वे) दिसत असली तर लोकं आपोआप कार चालविणे कमी करतात. मी शिकागोत राहायचो. तिथे अशा पाच सहा वेगवेगळ्या लाईन्स आहेत. (मेट्रो नाही) पण लोक डाऊन टाऊनला जाताना कायम रेल्वेनेच जाणे प्रिफर करतात. मुंबईत देखील तेच. न्यु यॉर्कला पण तेच. हेच आज ना उद्या पुण्याचे होईल. म्हणून नुसत्या बसेस वर जगणे पुण्याला सोडावे लागेल.
१. डीएमआरसी ने लाईन्स ठरवताना काही मॉडेल्स ची तुलना केली होती का याची माहिती कोठे उपलब्ध आहे का? >>. मलाही माहिती नाही.
या मेट्रोला 'फीडर' बस सर्विस, जी नेहमीच्या रस्त्यांवरून या मेट्रोचे स्टॉप्स उभे-आडवे जोडेल. >> अगदी त्यामुळेच बसेसचे नियोजन करावे लागेल असे म्हणले आहे.
बाजो पी एम टी पण रस्त्यावरूनच धावते. वरील उत्तर तिथेही लागूच. जिथे जिथे रस्ता येतो (पुण्यात) तिथे तिथे ट्रॅफिक जाम दिसतोच.
जर मेट्रोच्या लाईन्स आणि वेळा या सोयीच्या नसतील तर हा पांढरा हत्ता ठरण्याची शक्यता जास्त आहे. >> बरोबर आहे. पण म्हणूनच मेट्रो कुठून सुरू करता व कोठे थांबविता ह्याला जास्त महत्व आहे. आज जर मेट्रोचा पर्याय दिला तर मी माझ्या गाडीने डाउन टाऊन पुण्यात येणे तसेच हिंजवडी किंवा मगरपट्याला कामावर जाणे बंद करेन व मेट्रोचा वापर करेन. (मीच नाही तर बहुतांश सर्व जे रोजच्या ट्रॅफिक जामला कंटाळले आहेत)
जर लाईन्स योग्य असल्या तर आपोआप खर्च भरून निघेल.
भारतीय मानसिकता खूप रियाक्टिव आहे (प्रोअॅक्टिव नाही). जेव्हा पार्किंगचावगैरे प्रॉब्लेम गळ्यापर्यंत येइल तेव्हा हे लोक विचार करतील पार्क अँड राईड सारख्या सुविधेचा. +१ मनिष. कारण आपल्याकडे समाजाचा विचार करणारे कोणीच नाहीत. सगळे स्वार्थी.
अतुलनीय धन्यवाद.
अतुल, उत्तम पोस्ट.
अतुल, उत्तम पोस्ट.
केदार इलेव्हेटेड रोडचं मॉडेल
केदार
इलेव्हेटेड रोडचं मॉडेल सकाळ मधे आलेलं होतं. ते दुमजली रस्त्याचं आहे. त्यात सुधारणा केली तर मध्यभागी इलेव्हेटेड रोड ठेवून खालचा इतर रस्ता वापरात आणणे सहज शक्य आहे. इलेव्हेटेड रोडचे पिलर्स वापरून स्काय बसचा पर्यायही खुला आहे...
जाणकार यावर प्रकाश टाकतीलच.
याआधी एकदा थोडी चर्चा यावर
याआधी एकदा थोडी चर्चा यावर झाली होती, सारी चर्चा एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने -
http://www.maayboli.com/node/13510
पुण्याचे नियोजन पेक्षा
पुण्याचे नियोजन पेक्षा पुण्याच्या नियोजनाचा झालेला बट्ट्याबोळ हा सगळ्या समस्यांचा जन्मदाता आहे.
पूर्वी कुठल्याही बांधकामाच्या योजनेला पुणे मनपामधून मंजुरी घ्यावी लागे. त्यांचे कडक निकष असत. पाणीपुरवठा, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, किती लोकसंख्येची स्कीम आहे त्याप्रमाणे रस्ते सोडलेत का वगैरे. सरकारच्या नगररचना विभागाकडे ही नियमावली मिळते. गुंठ्यांचे प्लॉट पाडतानाही रस्ते वगैरे पाहीले जाते. शिवाय पाणी साठवण्याची व्यवस्था, आजूबाजूची वस्ती, पिण्याच्या पाण्याचा जोड हे मंजुरी देतानाच पाहीले जाई.
पुण्यात हिंजवडीला आयटीची घोषणा झाली आणि जमिनी विकत घेण्याचा सपाटा लावला गेला. बड्या धेंडांच्या जमिनीला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने नियम वाकवण्यात आले. किती लोकसंख्या वाढणार आहे वगैरेचा अजिबात विचार न करता परवानग्या देणं चालू आहे. मंजुरीसाठी आर्किटेक्टची परवानगी आता चालते. नंतर त्याने मंजूर केलेले नकाशे मनपा तपासणार !! याच कारणामुळे बांधकामानंतर आवश्यक सेवा पुरवता येत नसल्याने बांधकाम व्यावसायिक कन्व्हेयन्स डीड करण्याचे टाळतात. सावकाशीने मग सोसायट्या हातापाया पाडून कंप्लीशनचे सर्टीफिकेट घेतात आणि तीन पट टॅक्सही भरतात.
नगरचना शास्त्राच्या तत्वाप्रमाणे शहराला जितका पाणीपुरवठा होऊ शकतो तितक्याच लोकसंख्येसाठी घरं बांधायला हवीत. पण नियमच बदलले गेल्याने पुण्यातले रस्ते, पाणी आणि इतर सुविधांवर प्रचंड ताण आलेला आहे.
किमान आयटी क्षेत्राला निवासी क्वार्टर्सची सक्ती करायला हवी होती. पण मग बांधकाम व्यावसायिकांचे काय ? कामाला कुठेही असले तरी रहायचे मात्र पुण्यातच या मानसिकतेने दुष्काळात तेरावा महिना झालाय. शासकिय यंत्रणा या कुणाचे भले करत असतात हे जर समजून घेतले तर मेट्रोने कुणाचे भले होणार आहे हे समजायला उशीर लागणार नाही.
उद्या आहे अशीच मेट्रो योजना
उद्या आहे अशीच मेट्रो योजना राबवली गेली आणि चार एफएसआयची खिरापत बिल्डर्सना वाटली गेली तर मेट्रोच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल. एका पुण्यात चार पुण्यांचा समावेश करण्यासारखं आहे हे. काय उपयोग मग मेट्रोचा ?
हाच प्रश्न मी मनपा निवडणुकीच्या आधी प्रा. विकास मठकरींनाही विचारला होता. पण याचं उत्तर कुणालाही द्यायचं नाहीये.
पुण्याचे नियोजन पेक्षा
पुण्याचे नियोजन पेक्षा पुण्याच्या नियोजनाचा झालेला बट्ट्याबोळ हा सगळ्या समस्यांचा जन्मदाता आहे.
>>> किरण्या विषय पुण्याचे नियोजन नसुन "मेट्रोची व्यवहार्यता" हा आहे. तरी सेंटी न होता यावर बोल.
अतुलदादा वाहतूक हा नियोजनाचा
अतुलदादा
वाहतूक हा नियोजनाचा भाग असतो कि नाही ? ट्रॅफिक २००० नावाची एक फिल्म मी पाहिली होती त्यात लोकसंख्या आणि वाहतूक व्यवस्था याचा शास्त्रीय विचार दाखवला गेलाय.
कोथरूडहून हिंजवडीला
कोथरूडहून हिंजवडीला जाण्यासाठी त्यांनी एक बस चालू केली जी डायरेक्ट हायवेवरून न जाता अख्खं पुणं फिरून जाती (मनपावरून)>>> हायला, लयीच कॉमेडी गोष्ट आहे ही.
मेट्रो च्या बाबतीत - ती
मेट्रो च्या बाबतीत - ती "स्टॅण्डर्ड गेज" ची असेल असे मधे वाचले होते. ते ही चुकीचे आहे. आपल्याकडे ब्रॉड गेजचीच असणे आवश्यक आहे>>> हि चुकीची कन्सेप्ट आहे. स्टॅण्डर्ड गेज मधे शहरातील शार्प वळणे बनवायला सोपी पडतात. जगात सगळीकडे मेट्रो स्टॅण्डर्ड गेज वर बनवतात. त्यामुळे दिल्ली मेट्रो फेज १ साठी श्रीधरन रेल्वे बरोबर भांडले होते. पण त्याना रेल्वेच्या आडमुठेपणा मुळे फेज १ ब्रॉड गेज करावी लागली. पण बाकीच्या फेज स्टॅण्डर्ड गेज वर आहेत.
पण जगात जास्त ठिकाणी
पण जगात जास्त ठिकाणी स्टॅण्डर्ड गेज आहे त्यातील बर्याच ठिकाणी बाकी रेल्वे सिस्टीम सुद्धा त्याच गेज मधे आहे म्हणूनही असेल.
त्यामुळे मला चुकीचे वाटत नाही. दोन्हीच्या बाजूने मते आहेत. ब्रॉड गेज डब्यांची कपॅसिटी जास्त असण्याचा फायदा आहेच. येथे सॅन फ्रान्सिस्को ला उलटे आहे - अमेरिकेची बाकी रेल्वे सिस्टीम स्टॅण्डर्ड गेज आहे पण येथील मेट्रो (बार्ट) ब्रॉड गेज आहे.
पुढच्या २०-२५ वर्षांमधे भारतात १५-२० ठिकाणी जरी चालू झाली तरी एवढी मागणी असेल की इकॉनॉमी ऑफ स्केल वगैरेचे प्रॉब्लेम्स ही येणार नाहीत.
Pages