निबंध परिचय - भारतातील जाती, उगम, तंत्र व प्रसार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १९१६

Submitted by मनीषा- on 21 August, 2012 - 04:01

भारतातील जाती, उगम, तंत्र व प्रसार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १९१६
Castes in India, Their Mechanism, Genesis and Development

हा निबंध डॉ अ अ गोडेनवायजर ह्यांच्या मानववंशशास्त्र परिषदे मध्ये , कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका येथे ९ मे १९१६ मध्ये वाचण्यात आला.
एक बौद्धिक क्षमतेचे प्रदर्शन करणारा पण तरीही अतिशय सुटसुटीत आणि स्वच्छ मांडणी असणारा निबंध असे ह्या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल. बाबासाहेबांनी सोप्या शब्दात त्यांचे विचार अतिशय सुसूत्रतेने आणि प्रभावीपणे मांडले आहेत. कुठेही गोंधळाला वा चुकीच्या ‘interpretation’ ला जागा न ठेवता त्यांनी विषय वाचका पर्यंत योग्य प्रकारे पोचवला आहे

ह्या निबंधाचा मूळ उद्देश हा भारतीय जातीसंस्थेचा उगम शोधणे,तिचे तंत्र समजून घेणे व तिच्या वाढीचे/प्रसाराचे कारण तपासणे हा आहे. लेखकाने तीन टप्प्यामध्ये हे उद्दिष्ट्य पूर्ण करत आणले आहे. त्याचा गोषवारा हा असा ...

१. कुठल्याही समाजामध्ये वर्ग हा असतोच

२. बंद वर्ग म्हणजे 'जात'

३. जातीच्या चार मोठ्या विचारवंताच्या ( सेनार्ट , नेसफील्ड, रिस्ले आणि केतकर ) व्याख्या घेऊन त्यामधून बाबासाहेबांनी स्वतःची व्याख्या सिद्ध केली आहे.

४. थोडक्या मध्ये – ज्या समूहाच्या आतच ज्यांचे लग्नाचे व्यवहार सीमित असतात त्या समूहाला जाती म्हणता येईल. ‘endogamy’ अर्थात 'अंतर्विवाह' हे जातीचे एकमेव लक्षण आहे.

५. जाती ह्या कायम बहुवचनामध्ये असतात. ‘एक जात' ह्याला काही अर्थ नाही. मुळात 'जात' ही बंदिस्त असल्यामुळे, जातीबाहेरील लोक हे एका प्रकारे बंदिस्तच असतात व त्यांची दुसरी जात आपसूकच निर्माण होते.

६. आज ही सगोत्र वा सपिंड विवाह निषिद्ध मानले जातात. एका जाती अन्तर्गतही हा संकेत कटाक्षाने पाळला जातो. ही रूढी अतीपूर्वीच्या सामाजिक रिवाजांची द्योतक आहे. जगातील सर्व समाज हे मुळात ‘exogamous’ अर्थत बहीर्विवाह करणारे होते. अर्थातच लग्नसंबंध कुलाच्याबाहेरच करावा लागत असे. टोळी समाजा मध्ये हे उपयुक्त होते कारण त्यामुळे विविध टोळ्यांमध्ये नातेसंबंध तयार होऊन समाजाचे वर्तुळ विस्तारत असे. जातीसंस्थेमध्ये ह्याच्या बरोबर उलट गोष्ट अपेक्षित असते. म्हणजेच विवाह हा जाती अंतर्गतच घडला पाहिजे.

७. त्यामुळे जातीसंस्थेतील ‘endogamy’ ची पद्धत रूढ करण्यासाठी इतर काही रूढी तयार झाल्या. मुळात एकदा 'endogamy' महत्वाची मानली की उपलब्ध विवाहयोग्य स्त्री पुरुषांचा आकडा हा मर्यादित असणार आणि तो पुरवून वापरावा लागणार हे निश्चित. त्यामुळे विवाहानंतर जर जोडप्यातील एक जण मृत्यु पावला तर उरलेल्या ‘अधिक’ व्यक्तीला विवाहासाठी पुरुष/स्त्री उपलब्ध करून देणे म्हणजे इतर विवाहयोग्य लोकांचे नुकसान आहे. त्यातही ‘अधिक’ मनुष्य स्त्री आहे का पुरुष व त्याची उपयुक्तता याच्या आधारावर काही रूढी तयार झालेल्या दिसतात.
अ) सती – पुरुषाच्या मृत्यूनंतर स्त्रीला जाळले तर बरेचसे प्रश्न संपतात. मुळात तिच्यासाठी दुसरा पुरुष शोधायची गरज कधीच पडणार नसते .
ब) विधवांना पुनर्विवाहाची बंदी – सती हा प्रकार अधिक क्लेशकारक व अडचणीचा, तसेच सहज करता येणारा नसल्याने, वैधव्य आलेल्या स्त्रीने पुन्हा कधी ‘विवाह’ करू नये अशी बंदी आणली. ह्यामुळे बायकी कामासाठी जरी ती उपलब्ध झाली तरी तिच्या साठी नवीन वर शोधायची अडचण मिटली.
क) प्रौढ – बालिका विवाह - ‘अधिक’ पुरुषाच्या बाबतीमध्ये अर्थातच वेगळा विचार आहे. पारंपारीकरित्या पुरुषच हा स्त्रीहून महत्वाचा असल्याने त्याला जाळणे अथवा सक्तीने संन्यास घ्यावयाला लावणे नेहमीच जमेल असे नाही. म्हणून अशा प्रौढ पुरुषांनी, अजून लहान असलेल्या (विवाहयोग्य वयात न आलेल्या) मुली लग्नासाठी ‘वापरण्याची' पद्धत निर्माण झाली. ज्यामुळे बालविवाहाची रूढी तयार झाली ..

८. ह्या तीनही रूढी ज्या समाजामध्ये ठळकपणे दिसतात तिथे जातीसंस्थेची सुरुवात झाली. ब्राह्मण समूह हा वर्गीय समाजातही देवाधर्माची कामे करणारा म्हणून वरच्या पायरीवर होताच. त्या समाजाने ‘endogamy’ प्रथा स्वीकारली व स्वतःला कोंडून घेतले तसेच इतरांस आत येण्यास मज्जाव केला. ही व्यवस्था बळकट होण्यासाठी वरच्या तीन रूढी निर्माण झाल्या. ही घटना एका दिवसात घडली नाही, काही शतकांच्या कालखंडावर झाली .

९. ही जी प्रथम 'जाती' तयार झाली त्याच्या कारणाचा शोध ह्या निबंधामधे घेतला गेलेला नाही. बाबासाहेब म्हणतात तसे,वरच्या मुद्द्यांच्या आधारे कुठे सुरु झाली असेल( ब्राह्मण समाजामधे) हे अनुमान् बांधता येते. पण का निर्माण झाली त्याची कारणे कळणे कठीण आहे.

१०. ब्राह्मण समाजाने जाती इतरांवर लादल्या नाहीत, ते करता येणेही अशक्य आहे. त्यांनी कथा-पुराणे इत्यादी मधून जाती दृढ केल्या असतील पण इतर जातींची निर्मीती त्यांनी केली असे म्हणता येणार नाही. असा एक समाज/समूह उरलेल्या सर्वाना तसेच वागायला भाग पाडू शकत नाही. इतर समाज, तत्कलीन 'उच्चभ्रूंचे' हळुहळु अनुकरण करत जातात. क्र.५ मधे म्हणल्याप्रमाणे एक जाती कधी तयार होत नाही तर किमान २ जाती तयार होतातच.

१२. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र हे प्राचीन समाजामधे व्यवसायाधारित वर्ण होते जे 'वर्ग’ही होते. सुरुवातीच्या काळात एका वर्णातुन दुसर्‍या वर्णात येण्यास प्रत्यवाय नव्हता.

त्यातील ब्राह्मण हा वर्ण सामाजीक उतरंडीवर देव-धर्म/ अध्यापन संबंधीत व्यवसायामुळे उच्च समजला जात असल्याने इतर वर्णांनी त्यांच्या ह्या नवीन चालीचे अनुकरण केले. आणि समाज हा अनुकरणप्रिय असतो हे सत्य आहे.

१३. ह्या अनुकरणामधे ह्या वर्णांमधील अंतराप्रमाणे त्याचा प्रभाव कमी होत गेला. म्हणजे क्षत्रीय वर्णाने जितक्या प्रमाणामधे क्र् ७ मधल्या रुढी अंगीकारण्याचा प्रयत्न केला त्याहून कमी प्रमाणामधे वैश्य व शूद्र समाजामधे हा रुढी दिसतात. तसेच हे शेवटचे दोन वर्ण हे सरमिसळतेच्या द्रुष्टीने अधिक लवचीक असल्याने, बर्‍याच नवीन येणार्‍या समूहांच्या ह्याच वर्णांतर्गत जाती निर्माण झाल्या.

१४. मनू ने जाती-शुध्दीचे नियम तयार केले नाहीत. असा एकटा मनुष्य नियम तयार करुन देतो आणि ते वर्षानुवर्षे चालतात हे शक्य नाही. मनूने त्या काली प्रचलीत असलेले नियम् ग्रंथबध्द केले असे म्हणावे लागेल.

मी माझ्या अल्पमतीने सारांश देण्याचा प्रयत्न केला आहे.

जिज्ञासूंसाठी लेखकाच्या मूळ शब्दांमधे हे मूलभूत विचार वाचण्यासाठी हे पुस्तक पीडीफ स्वरूपामध्ये ‘http://archive.org’ वर उपलब्ध आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मनरी,
वा!
सुंदर. याला म्हणतात 'इन अ नटशेल' सांगणे. मी याला डिस्टिलेशन म्हणेन. छान मांडले आहे.

>>कुठेही गोंधळाला वा चुकीच्या ‘interpretation’ ला जागा न ठेवता त्यांनी विषय वाचका पर्यंत योग्य प्रकारे पोचवला आहे<<
ही त्यांची हातोटी. कायदा लिहिताना, त्याचे चुकीचे इंटरप्रिटेशन वा गोंधळ होणार नाही या प्रकारे त्याची शब्दरचना करावी लागते. शब्दांवर हुकुमत व प्रचण्ड वाचन असल्याशिवाय हे होत नाही.

>>मी माझ्या अल्पमतीने सारांश देण्याचा प्रयत्न केला आहे.<<
विद्या विनयेन शोभते!

अभिनंदन!

मनरी,सूत्रमय लेखन.अभिनंदन. पण जातीसंस्थेच्या विचाराअंतर्गत केलेला जेंडर-बायस चा विचार मला एकांगी वाटतो. जसे की सती,विधवा पुनर्विवाहास प्रतिबंध,विधवा केशवपन हे ब्राम्हणेतरांमध्ये प्रचलित नव्हते किंवा या प्रश्नांची धार कमी होती. याबद्दल विशेष खोलात लिहाल का?

निबंध परिचय मोजक्या शब्दात आणि माहितीपुर्ण वाटला.

पारंपारीकरित्या पुरुषच हा स्त्रीहून महत्वाचा असल्याने त्याला जाळणे अथवा सक्तीने संन्यास घ्यावयाला लावणे नेहमीच जमेल असे नाही.
----- कुठल्या काळा पासुन पुरुष हा स्त्रीपेक्षा महत्वाचा मानला गेला आहे. पुरुषाला महत्व येण्याला सुरवात कुठे आणि कशामुळे झाली ?

त्याला जाळणे अथवा सक्तीने संन्यास घ्यावयाला लावणे नेहमीच जमेल असे नाही
---- इतिहासांत पुरुष सती गेला असे एक तरी उदाहरण आहे का? स्त्री कडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन कुठे, कसा आणि का बदलला हे मी शोधतो आहे म्हणुन हे प्रश्न.

@मनरी
मूळ पुस्तक वाचणे प्रत्येकाला शक्य नाही. आपण मुळचे पुस्तक वाचून त्याचा गाभा आमच्यासारख्यांपर्यंत समर्थपणे पोचवला यासाठी धन्यवाद!

जसे की सती,विधवा पुनर्विवाहास प्रतिबंध,विधवा केशवपन हे ब्राम्हणेतरांमध्ये प्रचलित नव्हते

>>
आं? मग अहिल्याबाई होळकर सती जायला निघाल्यावर मल्हाररावांनी त्यांचे मन वळवून त्याना परावृत्त केले ते कसे. ते तर धनगर समाजाचे होते ना? विधवा पुनर्विवाहास प्रतिबंध तर अजून ही बर्‍याचशा मुख्य जातीत आहेच. अगदी ब्राम्हणांदेखील सरसकट विधवा पुनर्विवाह होतच नाही . मराठे तर याबाबतीत फारच 'कर्मठ' आहेत. फक्त काही भटक्या समाजात हे नियम जरा सैल आहेत एवढेच. पण सगळ्याच हिन्दू धर्मात विधवाविवाह अजूनही सामन्य नाहीत हे खेदाने नमूद करावे लागते. विधवा केशवपन मात्र पूर्णतः थांबल्याचे दिसते.

लेख आवडला Happy
बाबासाहेबांनी सोप्या शब्दात त्यांचे विचार अतिशय सुसूत्रतेने आणि प्रभावीपणे मांडले आहेत. कुठेही गोंधळाला वा चुकीच्या ‘interpretation’ ला जागा न ठेवता त्यांनी विषय वाचका पर्यंत योग्य प्रकारे पोचवला आहे >>>+१ पटले Happy

सर्वांना परिचय वाचनाबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद.

उदय,
लेखातील विचार बाबासाहेबांचे असल्याने मी उत्तर देणे योग्य नाही. ह्या लेखामधे त्याचे उत्तर नाही असे म्हणता येईल.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे तशीही मिळणे कठीण आहे. पुढे काही, सुचले, सापडले तर लिहीन.

भारती,
ब्राह्मणेतरांमधे ह्या रूढी कमी-अधिक प्रमाणामधे प्रचलीत होत्या. आंबेडकरांनी हा कर्मठपणा वर्णांतर्गत अंतरांप्रमाणे कमी होत गेला असे म्हणले आहे. (क्र.१३)

मनरी, परिचय चांगलाच आहे पण ही केवळ एक बाजू होती. १९१६ मधली. २० वर्षे गेली आणि आंबेडकरांचे मत बदलले होते.

१९३६ मध्येही हा विषय जात-पात-तोडक समिती मुळे ऐरणीवर आला. आणि बापू व डॉ आंबेडकर ह्यांच्यात ह्या विषयावरून खडाजंगी झाली. "हरिजन" मध्ये हे एकमेकांविरूद्धचे व बापूंचे हिंदू धर्माबद्दलचे - हो महात्मा गांधींचेच, ते पण हिंदू धर्माबद्दलचे प्रसिद्ध झाले. त्याला उत्तर म्हणून परत डॉ आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिले, "अ‍ॅनिलेशन ऑफ कास्ट"

बांपूचे विचार (हरिजन मधील लेख) वाचले तर जात-पात, वर्ण व हे का होत गेले असेल, ह्याबद्दल माहिती मिळते.
अर्थात आपल्याकडे कुठल्याही विषयाला केवळ विचार म्हणून न पाहता त्याला देवत्व व त्या व्यक्तीचे विचार असे पाहिले जात असल्यामूळे मायबोली ह्या फोरम वर ह्या विचारांची चर्चा निर्भेळपणे होणे केवळ अशक्य असल्यामुळे आवरते घेतो. पण प्रस्तुत विषय, डॉ आबंडेकरांचे बदललेले विचार व त्यावरील बापूंची उत्तरे व परत प्रतिउत्तर मुळातून वाचने महत्त्वाचे आहे.

केदार, बाबासाहेबांच्या जातीविषयक नंतर केलेल्या लिखाणाविषयी लिहिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. वाचायचा प्रयत्न चालू आहे..

उत्तम परिचय मनरी. एकदम मुद्देसूद.

>>कुठल्या काळा पासुन पुरुष हा स्त्रीपेक्षा महत्वाचा मानला गेला
सुरुवातीला स्त्री नवी संतती निर्माण करू शकते म्हणून जास्त महत्वाची/ देवतास्वरूप होती. भटक्या टोळ्यांना मनुष्यबळाची कमतरता असे. जेव्हा मनुष्य अधिकाधिक स्थिर होऊ लागला, अमकी जमीन, तमके रान हे या टोळीचे अशी कुंपणे घालू लागला तेव्हा विशेषतः लढण्यासाठी पुरुषांचे प्रमाण महत्त्वाचे ठरू लागले. जिंकलेली जमीन, गुरे व माणसे (स्त्री, पुरुष, मुले) ही कल्पना अस्तित्वात आली.
(अशी थियरी आहे.)