'मराठी कविता समूहा'च्या 'ओळीवरून कविता - भाग ९९' मधील माझा सहभाग -
आठवती का सांग तुला मी
लिहिलेल्या पहिल्या ओळी ?
नकळत सुचली होती कविता
अगदी साधी अन भोळी
तीच जी तुझ्या अजून दिसते
गालावरच्या खळीतुनी
डोळ्यांतुन चमचम करते वा
रुळून हसते बटीतुनी
हरकत नाही, विसरुन जा तू
पहिली कविता अल्लडशी
पन्नासावी आठवते का
जमली होती फक्कडशी ?
तुझ्या चालण्याची लय होती
धीमी पण दिलखेच अशी
तुझ्याप्रमाणे नटली सजली
तुझी हुबेहुब छबी जशी
नाही ना? मज ठाऊक होते
नाही आठवणार तुला..
गंध स्वत:चा किती पसरला
कळतच नसते कधी फुलां
वाहत होती अखंड सरिता
कवितांची झुळझुळणारी
कधी तुझ्या निर्व्याज हसूसम
उथळ तरी खळखळणारी
आता केवळ पात्र कोरडे
आटुन गेली ती सरिता
आज तुला मी अर्पण करतो
माझ्या त्या साऱ्या कविता....
............... आज तुला मी अर्पण करतो
............... माझ्या त्या साऱ्या कविता....
....रसप....
२० ऑगस्ट २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/08/blog-post_21.html
सुंदर!
सुंदर!
खूप हृद्य!
खूप हृद्य!
वा वा मस्त ग्रेट आहेस तू
वा वा मस्त
ग्रेट आहेस तू रणजित........जियो !!
(दुसर्या कडव्यात खळीतुनी, बटीतुनी ऐवजी खळीमधे,बटेमधे असे वाचले मला ते जास्त आवडले.........वैयक्तिक मत कृ.गै. न.)
छान ..... “नाही ना? मज ठाऊक
छान .....
“नाही ना? मज ठाऊक होते
नाही आठवणार तुला..
गंध स्वत:चा किती पसरला
कळतच नसते कधी फुलां” >>> हे अधिक आवडलं.