येताय दरोडे टाकायला ?

Submitted by Kiran.. on 18 August, 2012 - 07:13

टीप : माझे डोळे नुकतेच उघडलेत. सर्वांचे उघडावेत या सदिच्छेपोटी हा लेखनप्रपंच. उपरोध, उपहास या प्रकाराशी माझा संबंध येत नसल्याने सर्व लिखाण नम्रतेने वाचावे.

शाळा शिकून जे शिकलो त्यामुळे नोकरीचे विचार सतत मनात घोळत असतानाची गोष्ट. कुणी सरकारात गेला, कुणी मल्टीनॅशनल मधे गेला कुणी नुकत्याच जम बसलेल्या आयटी क्षेत्रात गेला तर कुणी मनपा, रेशन कार्ड, जमीन महसूल खाते अशा ठिकाणी गेला. ज्याला कुठेच काही संधी मिळाली नाही त्यांच्याशी काही वर्षे संपर्क राहीला मात्र त्यांच्या अडचणींची जंत्री वाढत गेल्याने सगळेच सेटल्डस त्यांना टाळू लागले. सहानुभूती मात्र होतीच !!

काही वर्षांपूर्वी स्नेहसंमेलन झालं. रेशन कार्ड सुस्थितीत होतं. त्यांच्यापेक्षाही जमीन महसूल संपन्न स्थितीत होते तर मनपांच्या चेहरीवर निरनिराळ्या कार्सच्या एसीचे राप चढले होते. मल्टीनॅशनल्स वेल सेटल्स पण कोशावस्थेत होते.

मागे पडलेल्या मंडळिंचा विचार मनात आला. ते आलेले दिसले नाहीत. जाताना पार्किंगमधे बीएमडब्ल्यूची ८६ लाखाची एक कार दिसली. मघापासून स्पॉनसरर म्हणून मिरवणारे एक सोनेरी काड्यांचा चष्मा असलेले व्यक्तिमत्व त्या कारमधे बसताना आम्हाला हात हलवून बाय करू लागले आणि अचानक ट्यूब पेटली..

पक्या ??? आणि मग त्याला थांबवून काय , कसं काय या चौकशा सुरू झाल्या.

आणखीही दोघांची ष्टोरी निराळी नव्हती. अकरावीला पोहोचू न शकलेला पक्या जे एम रोडवर तीन मजली ऑफीस बांधतोय. एकाचा स्वतःचा कारखाना आहे. दोनेक हजार कोटींचा टर्नओव्हर आहे. ज्या मुलांना आम्ही टाळत होतो आता त्यांच्याच अपॉइण्टमेण्टस घेऊन त्यांना भेटायला जाऊ लागलो. ( फेका तर मारत नाही ना हे पहायची पण तीव्र इच्छा होतीच ).

पुढच्या वेळी आणखी काही टाळभैरव भेटले. म्हणजे ज्यांना आम्ही टाळत असू असे. एक बडा एजंट आहे. एकाचा सरकार दरबारी कामे करून द्यायचा व्यवसाय आहे म्हणे. या वयात घडलेला जगप्रवास, आलिशान गाड्या, एकाचा असलेला वरळी सी फेसचा फ्लॅट... विश्वास बसत नव्हता !!!

हळू हळू एकेकाची कहाणी उलगडत गेली आणि यांच्या प्रगतीचा समान धागा उलगडत गेला. सगळेच रस्ते बंद झाले कि मनुष्य भिंतीवर धडका द्यायची तयारी ठेवतो अगदी हेच या सर्वांचं झालं. ही मित्रमंडळी प्रातिनिधीक आहेत. सध्या देशात अशी मंडळी जोरात आहेत. ज्यांचे सर्व रस्ते बंद झाले होते अशांच्या कामगिरीचा आलेख पाहून इतरेजन भारावून जाण्याची पद्धत देशात आहे.

एका रिक्षा ड्रायव्हरचं उदाहरण प्रसिद्धच आहे. रिक्षा ड्रायव्हर ते हजारो कोटींची संपत्ती, स्वतःच हेलिकॉप्टर आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षासारखा प्रासाद आहे. दुबईत पेट्रोकेमिकल कंपनीत कामाला गेलेला मजूर आज देशातला सर्वोच्च उद्योगपती बनतो, गावचा सरपंच ते आज राज्याचा अघोषित सर्वेसर्वा.. जाणता राजा !!

काय फरक पडला असावा हुषार विद्यार्थ्यांच्यात आणि या सर्व मंडळीत ? शाळेत न चमकल्याने जगाच्या शाळेत मिळणारं शिक्षण यांना नाईलाजाने घ्यावं लागलं आणि तोच कळीचा मुद्दा ठरला. ज्या वेळी नोकरदार मंडळी इन्कमटॅक्स कॅल्क्युलेशन करून स्वतःच कसे रिटर्न फाईल केले याच्या बढाया मारत होती तेव्हां आमचा पक्या एफएसआय आणि बांधकाम गुणोत्तर यांचा अभ्यास करत होता. कंपनीच्या लेखा परीक्षणामधून खडा निवडावा तशी चूक लक्षात आणून देऊन व्हीपींची कौतुकाची थाप पाठीवर घेऊन आमच्यातला एक सुखावत होता त्याच वेळी आगाश्या मात्र मोकळे भूखंड शोधून त्यावर आरक्षण कसं टाकता येईल यावर मनपाच्या अधिका-यांकडून धडे घेत होता.

यांचं शिक्षण प्रमाणपत्रविरहीत होतं. मात्र आरक्षण टाकून नंतर ते कसं उठवावं, सरकारी जमिनींचे मूळ मालक शोधून काढून त्यांच्याशी अल्पदरात बॅकडेटेड कागदपत्रं कशी बनवावीत आणि नंतर हे भूखंड कनवाळू शासनाने उदार होऊन मूळ मालकाला परत केल्यावर त्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःकडे कसे घ्यावेत हे शिक्षण ना कायद्याच्या पुस्तकात ना शालेय शिक्षणात ! बरं सर्टिफिकेट मिळणार नसेल तर कोण अशा शिक्षणाकडे लक्ष देईल ? आम्हाला हव्यात डिग्र्या !!! डिग्र्या घेऊन सुशिक्षित बेकार हे बिरूद मिरवलं कि संघटना काढून चीडचीड व्यक्त करणे, वर्तमानपत्रात लेख लिहीणे इतिकर्तव्य पार पाडले कि उर्वरीत आयुष्यात आम्ही व्यवस्था बदलण्याचे बरेच प्रयत्न केले पण शेवटी काहीच हाती लागलं नाही असं म्हणायला आंम्ही मोकळे !!!

जगाच्या शाळेत शिकलेले लोक असे पुढे जाताना पाहून डोळे खरंच उघडलेत. आणि मग डोळस नजरेने पुन्हा आजूबाजूला पाहीले. अरब जगतातून भारतात आलेला मुलगा आज बिझनेस आयडॉल आहे. पण हा ही जगाच्या शाळेत शिकलेला. जे कायद्याने करता येत नाही ते करण्यातच खरी मजा असते हे याने ओळखलं होतं. परवान्याच्या किचकट अटी पाहूनच अनेक सामान्य भारतीय इच्छा असूनही उद्योग काढू शकले नाहीत. कर्ज मागूनही कित्येकांना ते मिळाले नाही. यांची बातच और ! धंदा करायचा तर तो आपल्या पैशाने नाही हा महामंत्र त्यांना समजलेला होता. मग मॅनजरचा खिसा थोडा गरम केला तर बिघडलं कुठं ? कापडनिर्मितीसाठी मिळालेल्या परवान्यात शंभर तागे महिन्याला हे प्रमाण परवडत नाहीच मग. पण काढले तीन हजार धागे तर कुणाला कळणार आहे हे त्या मुलाच्या लक्षात आले. पुढे त्याने हर एक आदमी की किमत होती है आपको उसकी पहचान होनी चाहीये हा सिद्धांत रूढ केला. कापडौद्योगात अनभिषिक्त सम्राट बनतानाच अनेक गैरप्रकार करून ( कायद्याच्या दृष्टीने ) आपलं साम्राज्य वाढवत नेलं. सरकारी अधिकारीच आपल्याकडे ओढले. या खेळातच पुण्यातल्या रिक्षावाल्यासारखं आणखी एक नाव पुढे आलं. आणि मग अशा नावांची मादीयाळीच दिसू लागली...

अमरसिंह, नीरा राडीया, बरखा दत्त, हिंदुजा असे असंख्य लोक !!

मग बाँबे हाय मधे ३३ वर्षे संशोधन केल्यानंतर या ठिकाणी नैसर्गिक वायू मिळणार नाही म्हणून हा शोध थांबवल्याचं ओएनजीसी जाहीर करतं काय आणि सहा महिन्यातच रिलायन्सला त्या ठिकाणी तेलविहीरी सापडणे काय असा योगायोग घडून येऊ लागला. हे योगायोग इतके वारंवार घडू लागले कि गोदावरी बेसीनचं क्षेत्र असाच गैरसमजूतीतून शासन विकायला काढतं काय आणि एकच खरेदीदार त्यांना सापडतो काय आणि बिचारा देशाच्या इन्फ्रास्टक्चर विकासाच्या धेयाने झपाटल्यागत तिथे आपलं पाऊल टाकतो काय. पण त्याच्या भावाला मात्र हे पटत नाही आणि तो काडी टाकतो. लाखो डॉलर्सचा गॅस आणि तेल मिळू शकणारं क्षेत्र सरकारने अत्यल्प रॉयल्टी मधे माझ्या भावाल दिलंय म्हणून कोर्टात जातो काय !

वीजनिर्मिती करणे हे तर कुणाचेही कर्तव्यच असते. पण शासनाला जे परवडत नाही ते जर कुणी स्वखर्चाने करत असेल तर त्याला मोबदला दिला पाहीजे कि नाही ? जगच्या शाळेत हे शिकवतात. पण अशा सज्जनांना समुद्रात बुडवायची भाषा करणा-यांनाच पुढे आपण केव्हढी मोठी चूक करत होतो याची उपरती झालेली याची देही याची डोळा आपण सर्वांनी पाहीली. पण गो-या अमेरिकनांनी त्यांच्ञा देशात या सज्जनांना बुडवून टाकले आणि आपले वीजनिर्मितीचे संकट गहीरे झाले.

सरकारला काय परवडते आजकाल ?
रस्ते बांधायला पैसे नाहीत. शाळा बांधायला पैसे नाहीत, कॉलेजेस काढायला जमिनी नाहीत. वीज देता येत नाही. विमानं उडवता येत नाहीत. पोलिसांना बंदुका आणि पगार देता येत नाही. मग जर खाजगी क्षेत्र पुढे येत असेल तर त्यांना नको का मदत करायला ? आमच्या पक्याला हे कळतं. अशी एकमेकांना मदत केली कि संबंध सुधारतात. चार ओळखी होतात. सरकार दरबारी वजन वाढतं. पोलीस सॅल्युट मारतात. कुठे कशात फसलं कि एका फोनवर सुटका होते. एकमेकांच्या उपयोगी पडल्याशिवाय हे होत नाही.

बीएसएनएल फायद्यात चालवून काय मिळणारे सांगा बरं ? रिलायन्सच्या फोनचं उद्घाटन टीव्हीवर दाखवतानाच लँडलाईनचे दर एक रूपया वरून तीन रूपये आणि ते ही लोकल कॉल्स तीन मिनिटांसाठी करताना हे दाक्षिण्य नाही दाखवलं तर कसं चालेल ? उगाच का निवडणुकांना निधी मिळतो ?

टाटांची गाडी स्वदेशी ! देशाच्या भल्यासाठीच ही गाडी त्यांनी निर्माण केली. मग कर माफ केले तर बिघडतं का ? गेली कित्येक वर्षे ते निवडणुका सांभाळताहेत.

कोळशाच्या खाणीत कोळसा सडत पडला होता. मग पक्यासारखे लोक जिंदाल, एस्सार, रिलायन्स, टाटांच्या कानाला लागले. मंत्र्यांच्या कानाला लागले. कोळसा तो. कितीही उगाळला तरी काळाच. मग काढला थोडा थोडा तर काय बिघडलं ?

प्रवासाल निघाल्यावर रस्त्यात दहा रूपयाचा वडापाव पस्तीस रूपयांना घेणा-यांना दान द्यावंसं वाटू नये ? या दानातून कित्येकांचे संसार उभे राहू शकतात. याच उदात्त भावनेने ठिकठिकाणी टोलनाकी उभी राहिलीत.

टू जी स्पेक्ट्रममधे तर काहीच घ्यायचं नव्हतं. सगळं फ्री टू एयर. मग घेऊ द्या ना ज्याला घ्यायचं त्याला. !!

पण या देशात काही लोकांना बोंबा मारायची गरजच आहे. स्वतः मेरीटमधे यायचं, नोक-या करायच्या आणि इतरांकडे ढुंकूनही पहायचं नाही. मग त्यांनी पोटापाण्याचा धंदा आरंभला कि कायदे सांगायचे. च्यायला कायदे शिकून का हे लोक मोठे झाले ? कायदे कसे वाकवायचे याचंच सहज शिक्षण बाहेरच्या शाळेत मिळतं. वसंतदादा विद्यापीठातून बाहेर पडलेल्यांनी अशा शाळेत शिकून देशाचं नाव मोठं केलंय.

पण नोकरदारांना हे मान्य नाही. स्वतः काही करायचं नाही आणि दुस-यालाही काही करू द्यायचं नाही हा यांचा अ‍ॅप्रोच ! या पुण्यवंतांना त्यांनी दरोडे टाकणारे दरोडेखोर म्हटलंय. दरोडे टाकले असते तर कारवाई नको का व्हायला ? झाली ??????

नाही ना ! म्हणजेच ज्या अर्थी कारवाई नाही त्या अर्थी सगळं आलबेल आहे. पक्या म्हणतच होता. आधीच वदवून घ्याय्चं कि ब्वॉ उलटी गेम केलीत तर सगळ्यांची नावं सांगणार. विचार तेलगीला !!

हा सगळा आढावा घेतला आणि खात्रीच पटली कि काही होत नाही. आपणही दरोडेच टाकायचे. काही वेडंवाकडं होत नाही. सगळे खूष तर आपण खूष !! सगळा राजी खुषीचा मामला आहे, आपण करायची खोटी आहे. केल्याने होत आहे रे आधी (हात ओले) केलेची पाहीजेत .. बस्स हे लक्षात ठेवायचं.

बघा पटतंय का हे ?

मग... येताय दरोडे टाकायला ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण, सगळेच जर दरोडे घालू लागले, तर घालायचे कुठे?
'येताय दरोडे टाकायला?' हे शिर्षक वाचल्यावर आधी वाटले की 'Please rob me' बद्दल लिहीले असावे: http://pleaserobme.com/ ती वेबसाईट एका ज्वलंत स्वनिर्मीत आगीवरील छोटीशी फुंकर आहे.
तसेच काही तुमच्या (म्हणजे आमच्या - आपल्या) प्रश्नाबाबत करता येईल का?
If you can't beat them, join them मधे एक गृहितिकं आहे: ' you can't beat them'. ते खरं असायची गरज नाही. इथे मूख्य गोष्ट हि की त्यांना beat करायचेच नाही तर गेम अशा प्रकारे खेळायचा की त्यांना गेम खेळताच येणार नाही. आणि ते सगळ्यांनी (म्हणजे अर्थात त्यांनी सोडून) ठरवले तर होऊ शकते. दुर्दैवानी सगळ्यांना हे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखेच वाटते.
असो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. सांगून पाहतांना मलाच काही (एखादा छोटातरी) उपाय सुचतोय का ते तपासत होतो. आपल्यापरीने योग्य गोष्टी करत राहणे हे एक पाऊल नक्कीच असु शकते.

Pages