टीप : माझे डोळे नुकतेच उघडलेत. सर्वांचे उघडावेत या सदिच्छेपोटी हा लेखनप्रपंच. उपरोध, उपहास या प्रकाराशी माझा संबंध येत नसल्याने सर्व लिखाण नम्रतेने वाचावे.
शाळा शिकून जे शिकलो त्यामुळे नोकरीचे विचार सतत मनात घोळत असतानाची गोष्ट. कुणी सरकारात गेला, कुणी मल्टीनॅशनल मधे गेला कुणी नुकत्याच जम बसलेल्या आयटी क्षेत्रात गेला तर कुणी मनपा, रेशन कार्ड, जमीन महसूल खाते अशा ठिकाणी गेला. ज्याला कुठेच काही संधी मिळाली नाही त्यांच्याशी काही वर्षे संपर्क राहीला मात्र त्यांच्या अडचणींची जंत्री वाढत गेल्याने सगळेच सेटल्डस त्यांना टाळू लागले. सहानुभूती मात्र होतीच !!
काही वर्षांपूर्वी स्नेहसंमेलन झालं. रेशन कार्ड सुस्थितीत होतं. त्यांच्यापेक्षाही जमीन महसूल संपन्न स्थितीत होते तर मनपांच्या चेहरीवर निरनिराळ्या कार्सच्या एसीचे राप चढले होते. मल्टीनॅशनल्स वेल सेटल्स पण कोशावस्थेत होते.
मागे पडलेल्या मंडळिंचा विचार मनात आला. ते आलेले दिसले नाहीत. जाताना पार्किंगमधे बीएमडब्ल्यूची ८६ लाखाची एक कार दिसली. मघापासून स्पॉनसरर म्हणून मिरवणारे एक सोनेरी काड्यांचा चष्मा असलेले व्यक्तिमत्व त्या कारमधे बसताना आम्हाला हात हलवून बाय करू लागले आणि अचानक ट्यूब पेटली..
पक्या ??? आणि मग त्याला थांबवून काय , कसं काय या चौकशा सुरू झाल्या.
आणखीही दोघांची ष्टोरी निराळी नव्हती. अकरावीला पोहोचू न शकलेला पक्या जे एम रोडवर तीन मजली ऑफीस बांधतोय. एकाचा स्वतःचा कारखाना आहे. दोनेक हजार कोटींचा टर्नओव्हर आहे. ज्या मुलांना आम्ही टाळत होतो आता त्यांच्याच अपॉइण्टमेण्टस घेऊन त्यांना भेटायला जाऊ लागलो. ( फेका तर मारत नाही ना हे पहायची पण तीव्र इच्छा होतीच ).
पुढच्या वेळी आणखी काही टाळभैरव भेटले. म्हणजे ज्यांना आम्ही टाळत असू असे. एक बडा एजंट आहे. एकाचा सरकार दरबारी कामे करून द्यायचा व्यवसाय आहे म्हणे. या वयात घडलेला जगप्रवास, आलिशान गाड्या, एकाचा असलेला वरळी सी फेसचा फ्लॅट... विश्वास बसत नव्हता !!!
हळू हळू एकेकाची कहाणी उलगडत गेली आणि यांच्या प्रगतीचा समान धागा उलगडत गेला. सगळेच रस्ते बंद झाले कि मनुष्य भिंतीवर धडका द्यायची तयारी ठेवतो अगदी हेच या सर्वांचं झालं. ही मित्रमंडळी प्रातिनिधीक आहेत. सध्या देशात अशी मंडळी जोरात आहेत. ज्यांचे सर्व रस्ते बंद झाले होते अशांच्या कामगिरीचा आलेख पाहून इतरेजन भारावून जाण्याची पद्धत देशात आहे.
एका रिक्षा ड्रायव्हरचं उदाहरण प्रसिद्धच आहे. रिक्षा ड्रायव्हर ते हजारो कोटींची संपत्ती, स्वतःच हेलिकॉप्टर आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षासारखा प्रासाद आहे. दुबईत पेट्रोकेमिकल कंपनीत कामाला गेलेला मजूर आज देशातला सर्वोच्च उद्योगपती बनतो, गावचा सरपंच ते आज राज्याचा अघोषित सर्वेसर्वा.. जाणता राजा !!
काय फरक पडला असावा हुषार विद्यार्थ्यांच्यात आणि या सर्व मंडळीत ? शाळेत न चमकल्याने जगाच्या शाळेत मिळणारं शिक्षण यांना नाईलाजाने घ्यावं लागलं आणि तोच कळीचा मुद्दा ठरला. ज्या वेळी नोकरदार मंडळी इन्कमटॅक्स कॅल्क्युलेशन करून स्वतःच कसे रिटर्न फाईल केले याच्या बढाया मारत होती तेव्हां आमचा पक्या एफएसआय आणि बांधकाम गुणोत्तर यांचा अभ्यास करत होता. कंपनीच्या लेखा परीक्षणामधून खडा निवडावा तशी चूक लक्षात आणून देऊन व्हीपींची कौतुकाची थाप पाठीवर घेऊन आमच्यातला एक सुखावत होता त्याच वेळी आगाश्या मात्र मोकळे भूखंड शोधून त्यावर आरक्षण कसं टाकता येईल यावर मनपाच्या अधिका-यांकडून धडे घेत होता.
यांचं शिक्षण प्रमाणपत्रविरहीत होतं. मात्र आरक्षण टाकून नंतर ते कसं उठवावं, सरकारी जमिनींचे मूळ मालक शोधून काढून त्यांच्याशी अल्पदरात बॅकडेटेड कागदपत्रं कशी बनवावीत आणि नंतर हे भूखंड कनवाळू शासनाने उदार होऊन मूळ मालकाला परत केल्यावर त्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःकडे कसे घ्यावेत हे शिक्षण ना कायद्याच्या पुस्तकात ना शालेय शिक्षणात ! बरं सर्टिफिकेट मिळणार नसेल तर कोण अशा शिक्षणाकडे लक्ष देईल ? आम्हाला हव्यात डिग्र्या !!! डिग्र्या घेऊन सुशिक्षित बेकार हे बिरूद मिरवलं कि संघटना काढून चीडचीड व्यक्त करणे, वर्तमानपत्रात लेख लिहीणे इतिकर्तव्य पार पाडले कि उर्वरीत आयुष्यात आम्ही व्यवस्था बदलण्याचे बरेच प्रयत्न केले पण शेवटी काहीच हाती लागलं नाही असं म्हणायला आंम्ही मोकळे !!!
जगाच्या शाळेत शिकलेले लोक असे पुढे जाताना पाहून डोळे खरंच उघडलेत. आणि मग डोळस नजरेने पुन्हा आजूबाजूला पाहीले. अरब जगतातून भारतात आलेला मुलगा आज बिझनेस आयडॉल आहे. पण हा ही जगाच्या शाळेत शिकलेला. जे कायद्याने करता येत नाही ते करण्यातच खरी मजा असते हे याने ओळखलं होतं. परवान्याच्या किचकट अटी पाहूनच अनेक सामान्य भारतीय इच्छा असूनही उद्योग काढू शकले नाहीत. कर्ज मागूनही कित्येकांना ते मिळाले नाही. यांची बातच और ! धंदा करायचा तर तो आपल्या पैशाने नाही हा महामंत्र त्यांना समजलेला होता. मग मॅनजरचा खिसा थोडा गरम केला तर बिघडलं कुठं ? कापडनिर्मितीसाठी मिळालेल्या परवान्यात शंभर तागे महिन्याला हे प्रमाण परवडत नाहीच मग. पण काढले तीन हजार धागे तर कुणाला कळणार आहे हे त्या मुलाच्या लक्षात आले. पुढे त्याने हर एक आदमी की किमत होती है आपको उसकी पहचान होनी चाहीये हा सिद्धांत रूढ केला. कापडौद्योगात अनभिषिक्त सम्राट बनतानाच अनेक गैरप्रकार करून ( कायद्याच्या दृष्टीने ) आपलं साम्राज्य वाढवत नेलं. सरकारी अधिकारीच आपल्याकडे ओढले. या खेळातच पुण्यातल्या रिक्षावाल्यासारखं आणखी एक नाव पुढे आलं. आणि मग अशा नावांची मादीयाळीच दिसू लागली...
अमरसिंह, नीरा राडीया, बरखा दत्त, हिंदुजा असे असंख्य लोक !!
मग बाँबे हाय मधे ३३ वर्षे संशोधन केल्यानंतर या ठिकाणी नैसर्गिक वायू मिळणार नाही म्हणून हा शोध थांबवल्याचं ओएनजीसी जाहीर करतं काय आणि सहा महिन्यातच रिलायन्सला त्या ठिकाणी तेलविहीरी सापडणे काय असा योगायोग घडून येऊ लागला. हे योगायोग इतके वारंवार घडू लागले कि गोदावरी बेसीनचं क्षेत्र असाच गैरसमजूतीतून शासन विकायला काढतं काय आणि एकच खरेदीदार त्यांना सापडतो काय आणि बिचारा देशाच्या इन्फ्रास्टक्चर विकासाच्या धेयाने झपाटल्यागत तिथे आपलं पाऊल टाकतो काय. पण त्याच्या भावाला मात्र हे पटत नाही आणि तो काडी टाकतो. लाखो डॉलर्सचा गॅस आणि तेल मिळू शकणारं क्षेत्र सरकारने अत्यल्प रॉयल्टी मधे माझ्या भावाल दिलंय म्हणून कोर्टात जातो काय !
वीजनिर्मिती करणे हे तर कुणाचेही कर्तव्यच असते. पण शासनाला जे परवडत नाही ते जर कुणी स्वखर्चाने करत असेल तर त्याला मोबदला दिला पाहीजे कि नाही ? जगच्या शाळेत हे शिकवतात. पण अशा सज्जनांना समुद्रात बुडवायची भाषा करणा-यांनाच पुढे आपण केव्हढी मोठी चूक करत होतो याची उपरती झालेली याची देही याची डोळा आपण सर्वांनी पाहीली. पण गो-या अमेरिकनांनी त्यांच्ञा देशात या सज्जनांना बुडवून टाकले आणि आपले वीजनिर्मितीचे संकट गहीरे झाले.
सरकारला काय परवडते आजकाल ?
रस्ते बांधायला पैसे नाहीत. शाळा बांधायला पैसे नाहीत, कॉलेजेस काढायला जमिनी नाहीत. वीज देता येत नाही. विमानं उडवता येत नाहीत. पोलिसांना बंदुका आणि पगार देता येत नाही. मग जर खाजगी क्षेत्र पुढे येत असेल तर त्यांना नको का मदत करायला ? आमच्या पक्याला हे कळतं. अशी एकमेकांना मदत केली कि संबंध सुधारतात. चार ओळखी होतात. सरकार दरबारी वजन वाढतं. पोलीस सॅल्युट मारतात. कुठे कशात फसलं कि एका फोनवर सुटका होते. एकमेकांच्या उपयोगी पडल्याशिवाय हे होत नाही.
बीएसएनएल फायद्यात चालवून काय मिळणारे सांगा बरं ? रिलायन्सच्या फोनचं उद्घाटन टीव्हीवर दाखवतानाच लँडलाईनचे दर एक रूपया वरून तीन रूपये आणि ते ही लोकल कॉल्स तीन मिनिटांसाठी करताना हे दाक्षिण्य नाही दाखवलं तर कसं चालेल ? उगाच का निवडणुकांना निधी मिळतो ?
टाटांची गाडी स्वदेशी ! देशाच्या भल्यासाठीच ही गाडी त्यांनी निर्माण केली. मग कर माफ केले तर बिघडतं का ? गेली कित्येक वर्षे ते निवडणुका सांभाळताहेत.
कोळशाच्या खाणीत कोळसा सडत पडला होता. मग पक्यासारखे लोक जिंदाल, एस्सार, रिलायन्स, टाटांच्या कानाला लागले. मंत्र्यांच्या कानाला लागले. कोळसा तो. कितीही उगाळला तरी काळाच. मग काढला थोडा थोडा तर काय बिघडलं ?
प्रवासाल निघाल्यावर रस्त्यात दहा रूपयाचा वडापाव पस्तीस रूपयांना घेणा-यांना दान द्यावंसं वाटू नये ? या दानातून कित्येकांचे संसार उभे राहू शकतात. याच उदात्त भावनेने ठिकठिकाणी टोलनाकी उभी राहिलीत.
टू जी स्पेक्ट्रममधे तर काहीच घ्यायचं नव्हतं. सगळं फ्री टू एयर. मग घेऊ द्या ना ज्याला घ्यायचं त्याला. !!
पण या देशात काही लोकांना बोंबा मारायची गरजच आहे. स्वतः मेरीटमधे यायचं, नोक-या करायच्या आणि इतरांकडे ढुंकूनही पहायचं नाही. मग त्यांनी पोटापाण्याचा धंदा आरंभला कि कायदे सांगायचे. च्यायला कायदे शिकून का हे लोक मोठे झाले ? कायदे कसे वाकवायचे याचंच सहज शिक्षण बाहेरच्या शाळेत मिळतं. वसंतदादा विद्यापीठातून बाहेर पडलेल्यांनी अशा शाळेत शिकून देशाचं नाव मोठं केलंय.
पण नोकरदारांना हे मान्य नाही. स्वतः काही करायचं नाही आणि दुस-यालाही काही करू द्यायचं नाही हा यांचा अॅप्रोच ! या पुण्यवंतांना त्यांनी दरोडे टाकणारे दरोडेखोर म्हटलंय. दरोडे टाकले असते तर कारवाई नको का व्हायला ? झाली ??????
नाही ना ! म्हणजेच ज्या अर्थी कारवाई नाही त्या अर्थी सगळं आलबेल आहे. पक्या म्हणतच होता. आधीच वदवून घ्याय्चं कि ब्वॉ उलटी गेम केलीत तर सगळ्यांची नावं सांगणार. विचार तेलगीला !!
हा सगळा आढावा घेतला आणि खात्रीच पटली कि काही होत नाही. आपणही दरोडेच टाकायचे. काही वेडंवाकडं होत नाही. सगळे खूष तर आपण खूष !! सगळा राजी खुषीचा मामला आहे, आपण करायची खोटी आहे. केल्याने होत आहे रे आधी (हात ओले) केलेची पाहीजेत .. बस्स हे लक्षात ठेवायचं.
बघा पटतंय का हे ?
मग... येताय दरोडे टाकायला ??
किरण, दरोडे असे चिल्लर नाही
किरण,
दरोडे असे चिल्लर नाही टाकायचे एक्दम १ लाख ८६ हजार कोटी वगैरे असा हात मारायचा
असो.. भावना पोहोचल्या..
लेखातला "रिक्षावाला" म्हणजे ज्याच्या डेक्कन आणि युनिवर्सिटी रोड ला आलिशान बिल्डींग्स आहे तो तर नाही? काही महिन्यापुर्वी कस्टम मधे अडकलेला?
(No subject)
छान ... यात आणखीएक धंदा
छान ... यात आणखीएक धंदा राहिला .... बाबा, बापू, महाराज होणे. त्या वरच्या लोकांच्या साखळीतच हेही लोक असतात.
तु हो पुढे............. मी
तु हो पुढे............. मी सामान घेउन येतोच........
किरण.. जबरदस्त लेख !!
किरण..
जबरदस्त लेख !! आत्म परीक्षण करायला लावणारा !!
पुढे त्याने हर एक आदमी की
पुढे त्याने हर एक आदमी की किमत होती है आपको उसकी पहचान होनी चाहीये हा सिद्धांत रूढ केला.
जुने नि जागतिक सत्य!
आयुष्यभर नक्की काय बरोबर, काय चूक या गोंधळात पडलेले असतात ९९ टक्के लोक. काय करतो तेसमजून उमजून करून त्यात समाधान मानणे हे कळत नाही. अंती हाती काही लागत नाही! मग उगाचच
आम्हाला हव्यात डिग्र्या !!! डिग्र्या घेऊन सुशिक्षित बेकार हे बिरूद मिरवलं कि संघटना काढून चीडचीड व्यक्त करणे, वर्तमानपत्रात लेख लिहीणे इतिकर्तव्य पार पाडले कि उर्वरीत आयुष्यात आम्ही व्यवस्था बदलण्याचे बरेच प्रयत्न केले पण शेवटी काहीच हाती लागलं नाही असं म्हणायला आंम्ही मोकळे !!!
अशी खंत करायची. त्यापेक्षा विचार करणे सोडून काही करता येणार असेल तर करा, नाहीतर चालू द्या मागल्या पानावरून पुढे.
असे दरोडे घालण्यात, लाचलुचपत करण्यात काही 'अनैतिक' वगैरे काही नाही. तेहि एक प्रकारचे ज्ञान नि कौशल्य आहे. सर्वांनाच नसते ते. आपले नि 'आपल्या' लोकांचे कल्याण करणे हेच जीविताचे कर्तव्य असेल तर त्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करणे हेच कर्तव्य ठरते. संसार वार्यावर सोडून सदेह स्वर्गात जाणे संत तुकारामांना जमते, ऐर्या गैर्याला नाही!
बायको मुलांचे पोट दररोज भरणे या कर्तव्यपूर्तीसाठी आद्यकवि वाल्मिकी महर्षी सुद्धा दरोडेच घालत होते. कर्तव्यपूर्तीसाठी पांडवांनी स्वतःच्या भावंडांचा, पितामहांचा वध केला!
अडचण हीच की एक वेळ क्वांटम मेकॅनिक्स नि रिलेटिव्हिटी मधे पी एच डी मिळवणे सोपे आहे, पण वरील प्रकार करायला जी अक्कल लागते, ती फार थोड्या लोकांना असते. मग बसा पी एच डी करत. जसे इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला नाही म्हणून बसा बी एस सी करत, तसे. मग ओळखी काढून याच लोकांकडून दोन दमड्या मिळवून पोट भरा.
परदेशात गेल्यावर मारे आमच्या
परदेशात गेल्यावर मारे आमच्या देशभावना जागृत झाल्या, विमानतळावर पोहोचताना घशात आवंढा आला, गहीवरुन वगैरे आले, देश मागे सुटत असल्याची तीव्र भावना बोच लागली. काही वर्षांनी परत आलो आणी....
हाण तिच्या मारी.. चिखलात लडबडलेले डुक्कर आणी देशातील राजकारणी, व्यापारी ( सगळेच तसे नाहीत पण संधी मिळाली की होणार ), बिल्डर ( काहींचे पराक्रम अनुभवलेले) सगळे सारखेच.
किरण अगदी मनातले लिहीले.:अरेरे:
सभ्य दरोडेखोरांची व्याख्या बदललीय, वाल्मिकीचाच वाल्या झालाय.
आता तरी देवा मला पावशील का?
लज्जास्पद वस्तुस्थिती! किरण,
लज्जास्पद वस्तुस्थिती!
किरण, अगदी पोटतोडकीने लिहिलं आहेत.
kiran.. खुप छान. लेख वाचून
kiran.. खुप छान. लेख वाचून हळहळ वाटते आपल्या देशाचे काय होणार ह्याची काळजी वाटते.
आपला लेख आवडला. होत आहे तसेच. पण शेवटी आपण म्हणतोना पैसे काय कोणीही मिळवतो - त्या पैसे मिळवण्यावर मोठेपण अवलंबून नसतेच. म्हणूनच बाबा आमटे, थोर स्वातंत्र्यसैनीक व असे अनेक (तुमच्या माझ्या सारखे ) नगौरवलेले लोक असतात त्यांचा conscience ठीक राहतो. नाही तर एमएले कांडा सारखे तोंड लपवून फिरावे लागते.
.............ज्याच्याकडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकून नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकून आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. लाच घेणाऱ्या प्रत्येक माणसापाठीमागे नेहमी त्याचे हावरट कुटुंब असते. लाचखोरी करून "दुसऱ्यानी मला लाच घ्यायला लावली" आपल्याला असे म्हणून टाळता पण येत नाही, कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपल्या स्वतःचाच असतो. जो इसम लाच खातो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो. मग इतरवेळेला किती का राष्ट्रप्रेमाचा आव आणूदे. जो लाच घेतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. व आपणही (म्हणजे समाजाने त्याच्याकडे तो राष्ट्रद्रोही आहे असे समजून त्याच्याशी व्यवहार केला पाहीजे.........
आपण राष्ट्रव्रत घेतले का
http://www.maayboli.com/node/21790
१५ ऑगस्ट आले की लोकाना भाषणे
१५ ऑगस्ट आले की लोकाना भाषणे करायचा रोग जडतो.
शेळीताई आज श्रावण संपला बरं
शेळीताई आज श्रावण संपला बरं का.:खोखो:
किरणराव, तुमचा प्रश्णः मग...
किरणराव,
तुमचा प्रश्णः
मग... येताय दरोडे टाकायला ??
आमचे उत्तरः
आपल्या 'जी' मधे 'डी' नाही असता, तर इथे लेख लिहिण्याऐवजी ऑलरेडी ८६ लाखाची बीयमडब्ल्यू उडवित असतो आपण
संपादनः आपण = मी + तुम्ही
ह्म्म्म ... खंत पोचतेय फक्त
ह्म्म्म ... खंत पोचतेय फक्त हे सगळं ढळढळीत सत्यासारखं माहित असेल तरी सर्वसामान्यांना चाकरी करून अशाच लोकांची हांजीहांजी करावी लागणे यापरते दु:ख ते काय?
किरण, जिव्हार लिहिलंत.रोजचे
किरण, जिव्हार लिहिलंत.रोजचे पेपर वाचवत नाहीयेत.मीडियाचा रतीब पुरा पडत नाहीय.या सर्व गोष्टींमध्ये भर म्हणून सामूहिक उन्माद,हिंसा.
अशोक नायगावकरची एक कविता आठवतेय..
गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे
मी दार लावले आतून आयुष्याचे
मी परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही
..मी लढलो नाही..
:((
अरे बापरे .. असं म्हणुन आता २
अरे बापरे .. असं म्हणुन आता २ मि. हळहळणार.. तुझ्या लेखाला छान म्हणणार ... आणि मग परत आपल्या कामाला... परत येरे माझ्या मागल्या... साला मुर्दाड झालं आहे जिवन पार ... काही फरक पडत नाही आपल्या आयुष्यात
किरन.. यात एक राहीलय...
किरन..
यात एक राहीलय... घडोघडी जागो जागी बाँब स्फोट करुन सुद्धा जेल मध्ये चिकन बिर्यानी व भेजा फ्राय,
खाणारे मातब्बर लोक.
आजच्या म टा तील बातमी,
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा (२६ / ११चा हल्ला) सूत्रधार अबू जुंदाल याला कसाब प्रमाणेच जेलमध्ये दररोज चिकन-मटणाची मेजवानी मिळत आहे. अबूच्या संरक्षणाची आणि दररोज संध्याकाळी रोजा सोडताना त्याला जेवण वाढण्याची जबाबदारी जेलमध्ये कार्यरत पोलिसांकडेच सोपवण्यात आली आहे.
याआधी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने २००९ मध्ये पहिल्यांदा मुंबईच्या आर्थर रोड जेलचे जेवण नाकारले होते. त्याने जेल कर्मचा-यांकडे बिर्याणी, भेजा फ्राय आणि मलई मागितली होती.
रमझान सुरू असल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, असा विचार करुन पोलिसांनी कसाब प्रमाणेच अबू जुंदालसाठी मेजवानीची व्यवस्था केली आहे. अबूला दररोज एक लिटर दूध, एक किलो सुका मेवा, एक ग्रॅम मलई, एक प्लेट भेजा फ्राय, एक पीस चिकन रोल, एक प्लेट कबाब देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त त्याला समोसा, मालपोवा, फिरनी आदी गोडधोड खाऊ घातले जात आहे. एटीएसच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे वृत्त मिड डे या इंग्रजी सायंदैनिकाने दिले आहे.
वा..... झक्कास एकदम.
वा..... झक्कास एकदम.
एक ग्रॅम मलई ...?
एक ग्रॅम मलई ...?
१ ग्रॅम मलई कमी झाली नाही का
१ ग्रॅम मलई कमी झाली नाही का ? काय हा अत्याचार चालवला आहे ?
>>अबूला दररोज एक लिटर दूध, एक
>>अबूला दररोज एक लिटर दूध, एक किलो सुका मेवा, एक ग्रॅम मलई, एक प्लेट भेजा फ्राय, एक पीस चिकन रोल, एक प्लेट कबाब देण्यात येत आहे.<<<
हे सगळं एका माणसाने दररोज सलग ३ दिवस खाऊन दाखवलं तर मी तुम्हाला अन त्या रिपोर्टरला एक कप चहा पाजायला तयार आहे. पैज आपली. एका माणसाच्याने खाऊन होणार नाही. माझ्या ****च्याने १ किलो सुकामेवा दररोज खाऊन होणार नाही. रोज सकाळी 'करतो' तेही ७०० ग्रामपेक्षा जास्त होत नाही. १ किलो खाऊ कुठून?
(१ कप चहा पाजण्याची ऐपत असलेला, व जिंकण्याची ग्यारंटी असलेला) इब्लिस.
उषःकाल होता होता काळरात्र
उषःकाल होता होता काळरात्र झाली ...
अबु जिंदाल खायला आणि सरकार
अबु जिंदाल खायला आणि सरकार द्यायला तयार असताना तुम्ही कोण त्याला अडवणारे?
तुमच्याने एक किलो सुकामेवा खाउन होणार नाही, त्याला कोण काय करणार ? तुम्ही आपला चहाच प्या !!
बाकी तुमचे सकाळचे पुढचे डिटेल्स तुम्हालाच लखलाभ !!
बाकी हि बातमी फक्त म टा मध्येच नाही तर मिड डे मध्ये पण आलेली आहे.
(अगदी अ.जि. च्या रोजच्या जेवणावरील खर्चा सकट)
http://www.mid-day.com/news/2012/aug/180812-mumbai-Abu-Jundal-demands-bh...
am-and-gets-it.htm
रच्च्याकने तुमच्या भावना पोहोचल्या !!
सरकारने अ.जि.ला खिलवून मारु नये, त्याला जितक होत तितकच द्यावे वैगेरे,
(No subject)
एवढ्या फाईन प्रिंटवर जाऊ नका.
एवढ्या फाईन प्रिंटवर जाऊ नका. टायपो पण झाल्या असतील. पण अजमल व अबूला खूप काही छान छान खायला मिळते व तेही निर्लज्ज सरकार देते आहे हे महत्वाचे (आता त्याच्या नावावर 'इतरही' 'लोकं' 'खात' असतील ती गोष्ट वेगळी).
यात आणखीएक धंदा राहिला ....
यात आणखीएक धंदा राहिला .... बाबा, बापू, महाराज होणे. >>>>
मानवी मनाला स्ट्रेस मॅनेजमेंटची आवश्यकता असते. हल्ली मानसोपचार तज्ञांकडे जायची पद्धत आहे. पूर्वी ज्याच्याशी दोन शब्द बोलल्यावर बरं वाटायचं अशा व्यक्तींना कदाचित समोरच्याची मानसिक अवस्था कळालेली असावी. एखाद्याच्या कुवतीनुसार स्पष्ट सांगणे किंवा त्याला हवे ते सांगणे यामुळे स्ट्रेस कमी होत असावा. अशा लोकांना मग समाजात मान असावा. तसंच करमणुकीचं कुठलंही साधन नसल्याने मन इशस्तवनात रमवले जात असावे. आयुष्याचे ध्येय म्हणजे इशप्राप्ती हे अशाच कुणातरी मान्यवराने सांगितलेले असावे. थोडे मागे गेले तर मागची पिढी भाबडी असल्याचे दिसून येईल. म्हणूनच समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यामागे काय कारण आहे हे समजून न घेताच लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकलेलं असणार !
ध्यानधारणा, विपश्यना यामुळे खूप चांगले मानसिक उपचार होतात. ही कला अवगत असणारे इतरांना कुठलीही अपेक्षा न ठेवता शिकवतात. पण ध्यानधारणा किंवा विपश्यनेमुळे स्वभावावर नियंत्रण येत असले तरी बदल होत नाही. या लोकांमधे इगोदेखील आढळतो. तसेच भिडस्तपणाही.
थोडक्यात काय तर ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत ते निरनिराळ्या कारणांनी स्वतःची प्रसिद्धी करत नाहीत. पण ज्यांना या गोष्टी शिकवून स्वत्:चा फायदा करून घ्यायचा आहे त्यांच्या पथ्यावर पडणारीच ही बाब आहे. म्हणूनच वरीलपैकी एखाद दुसरी झलक दाखवली कि लोकांचा विश्वास बसतो आणि बाबा, महाराज उदयास येत असावेत. हा देखील लोकांच्या श्रद्धेवरचा दरोडाच आहे.
एवढ्या फाईन प्रिंटवर जाऊ नका.
एवढ्या फाईन प्रिंटवर जाऊ नका. टायपो पण झाल्या असतील. पण अजमल व अबूला खूप काही छान छान खायला मिळते व तेही निर्लज्ज सरकार देते आहे हे महत्वाचे (आता त्याच्या नावावर 'इतरही' 'लोकं' 'खात' असतील ती गोष्ट वेगळी).
चितळे, ते निर्लज्ज पोलीस
चितळे,
ते निर्लज्ज पोलीस देताहेत. सरकार नाही.
बातमी नीट वाचा.
तिथे खजूर लिहिले की आपण सुकामेवा म्हणावे.
अन तिथे वस्तूंचे बाजार भाव लिहिलेत, आपण त्याला ते रोज सकाळ संध्याकाळ मिळते असे म्हणावे.
एकंदर काय? तर त्या टॅब्लॉईडने भडक छापावे अन आपण इथे तावातावाने धरम/देस खतरेमे ची बांग द्यावी.
चालू द्या.
इब्लिस आपल्याशी सहमत. काहीसे
इब्लिस
आपल्याशी सहमत. काहीसे होते आपण म्हणालात तसेच.
पण होते काय कोणी तरी सरकारातून (करीयर माईन्डेड पोलिटीकली करेक्ट अधीकारी) असे आदेश देतात व कॅसकेडींग इफेक्ट सुरु होतो.
ते निर्लज्ज पोलीस देताहेत.
ते निर्लज्ज पोलीस देताहेत. सरकार नाही हे तुम्हाला कस काय कळल बुवा ?
बाकी धरम देस वैगेरे खतरे मे काही खर नाही !.
खरतर काहीच झालेल नाही.
त्या लोकांनी फक्त शहीद झालेल्या जवानाच्या स्मारकाला लाथानी पावनच केलय !
अगदी नामशेष केलय, पोलिसांची अब्रु वेशीवर टांगली, महीला पोलिसांची पुरती ईज्जत काढली,
रस्त्यात मिळालेल्या प्रत्येक वहानाचा चकनाचुर केला.
पण आपण म्हणतो खरतर काहीच झालेल नाही.
रणजित चितळेजी,
पोलिसांना एक गोळी झाडायला ही सरकारच्या आदेशाची वाट पहावी लागते, आणि अश्या आणिबाणिच्या
प्रसंगी झाडलीच तर पुढे चौक शी आयोग वैगेरे असतच. त्यामूळे जर सरकार पोलिस्यांच्या मागे ठाम पणे
ऊभे नसेल तर पोलिस हतबलच होणार
आरोपीना पकडण्या साठी ईद नंतर मुहुर्त मिळेल कदाचीत, आणि ते आरोपी सुद्धा पोलिसांची वाट प हात
असतीलच, कधी येऊन आपल्याला पकडताहेत याची
एकंदर काय ? आपल्याला कश्याचच काही नाही.
आपण मात्र निधर्मि सरकार वैगेरेच्या गप्पा ठोकु.
ह्या कसाब दिमतीला पोलिस
ह्या कसाब दिमतीला पोलिस कमांडो दस्त्यासाठी नेमलेले सहा आचारी गेले तिन वर्ष हजर होते. त्या तिन वर्षात
ह्या पोलिस कमांडोना निक्रुष्ट दर्ज्याच आणि अपुर जेवण मिळत होत कारण त्याच्यासाठी एकच खानसामा
उरला होता. तो बिचारा एकटा किती लोकाच जेवण बनवणार.
शेवटी पोलिस कमांडोनी उच्च अधिकार्याकडे लेखि तक्रार केल्या वर हा प्रकार उघडकीस आला. हे सहा आचारी
कसाब साठी दिले पण कुठल्याही बदलीच्या सोपस्काराशिवाय
हि बातमी म टा मध्ये ३ महिन्या पुर्वी प्रसिद्द झालीय.
Pages