आला आला गणेशोत्सव आला! पुण्या मुम्बईत आला! बाप रे!
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.
प्रश्न हा आहे कि आज इतक्या वर्षानंतर आपण गणेशोत्सवाचे जे स्वरूप पाहतो आहोत ते खरोखरच योग्य आहे का?
आपण एक सुसंस्कृत प्रजा म्हणून,जे चालू आहे ते तसेच चालू राहू द्यायचे आहे का?
आजच्या परिस्थितीची काही उदाहरणे घेऊया.-हि यादी खूप मोठी होऊ शकते - पण तरी...
वर्गणी घेण्या पासून त्याची सुरुवात होते. वर्गणी आता काही ठिकाणी प्रोटेक्शन मनी झाली आहे. मंडप, मूर्ती, देखावे वगेरे साठी खर्च होणारच. पण मंडपांमागे पडलेल्या बाटल्यांवर आणि कान फाडून टाकतील अश्या मोठ्या आवाजात वाजणाऱ्या (बरेचदा बीभत्स) अश्या गाण्यांवर पण हे पैसे खर्च होतात ना!
ह्या १० दिवसात रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते, प्रदूषण वाढते, रस्त्यांची दुर्दशा होते, विजेचा अपव्यय होतो आणि गणेशोत्सव सुरु झाल्या पासून ते विसर्जना पर्यंत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेवर अतिशय ताण येतो.
विसर्जन झाले कि काय बघतो आपण? तलाव, नदी, नाले, समुद्र, विहिरी - पाण्याचे जे जे म्हणून स्रोत आहेत ते सगळे प्रदूषित झालेले असतात.
रस्ते खराब आहेत म्हणून महापालिकेला शिव्या देतो आपण. पण जेव्हा महापालिकेचे पाणीवाले , वीजवाले , फोनवाले रस्ते खणून शांत होतात तेव्हा काय होते? तेव्हा गणेशोत्सव येतो, नंतर नवरात्री सुरु होतात आणि आपणच आधीच खराब असलेले किंवा आताच ठीक केलेले रस्ते मंडप लावण्या साठी परत खणून ठेवतो. म्हणजे पुन्हा महापालिकेला नावे ठेवायला आपण तयार!
एक जर्मन बेकरी कांड झाले कि थोडे दिवस आपली झोप उडते!
पण आपल्याला जेव्हा उत्सव साजरे करायचे असतात तेव्हा मात्र आपण पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेवर आपला आतोनात भार टाकून मोकळे होतो. उत्सव साजरे करणे हा तर आपला जन्मसिद्ध अधिकार आहे! स्वतंत्र भारतात!
शेजारच्या घरात मोठ्याने रेडिओ, टी.व्ही. जरी वाजत असेल तरी आपल्याला त्रास होतो.पण मोठमोठ्या डॉल्बीच्या भिंती उभारून जर आपण गाणी नाही बडवली तर कसे चालेल? आणि आता काय रात्री १२ पर्यन्त आवाज करायला परवानगी मीळाली आहे. ध्वनी प्रदूषण? हे काय असते आम्हाला माहित नाही आणि आम्हाला आमच्या शक्ती आणि भक्ती चे प्रदर्शन करायचे आहे हे का विसरता?
शहर घाण आहे, कचरा साठतो आहे म्हणून आपण ओरडतो. पण आपल्या भक्तीच्या महापूर मध्ये नदी,नाले,तलाव,समुद्र वगेरे जे पाण्याचे स्रोत आहेत ते सगळे प्रदूषित करायला आपण मागे पुढे पाहत नाही.
निर्माल्य, कलशात विसर्जित करणे म्हणजे काय?
आगदीच आधुनिकपण झाला!
आपण तर खूप धार्मिक आणि परंपरावादी आहोत! आणि हे असले कलश पुरणार तरी किती? आणि शेवटी ते कालाशातले निर्माल्य पण जाणार तर नदीमध्येच मग जाऊ दे - आपणच ते टाकूया नदीत!
विसर्जनाच्या वेळी २ - २ दिवस वाहतूक व्यवस्थेची "वाट" लागते. हि व्यवस्था कशी आहे हे वेगळे सांगायला नकोच!
पण आपल्या धार्मिक भावनेचा -कि राजकीय वर्चस्वाचा? - प्रश्न आहे ना! मग मिरवणूक जोरात नको का व्हायला? जितकी जास्त वाहतूक कोंडी तितके आम्ही जास्त शक्तिशाली!
आणि हे प्रश्न? हे प्रश्न आपण म्हणजे प्रजा जाऊ देतो पाण्यात - त्या गणराया बरोबर!
उपाय आहे का ह्याला काही? उपाय असला तरी इच्छा आहे का? विचार करायला वेळ आहे का? आणि काही करायला ताकद आहे का?
माझ्या मते काही उपाय आहेत -पण ते राबवायची माझ्यात नाही शक्ती न Authority! म्हणून फक्त विचार मांडायचे! मन मोकळे तरी होते!
प्रत्येक रस्त्यावर किती गणपति बसतिल ह्या वर काही निर्बन्ध असला पाहिजे.
एका रस्त्यावर दोन मंडपांमध्ये २ kilometer चे अंतर हवे असे काही तरी ठरवले तर मंडपांची संख्या कमी होईल.
डॉल्बी आणि इतर मोठा आवाज असणारी sound system वापरण्या वर बंदी असली पाहिजे. ती असेल कदाचित - पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
रात्री १० नंतर आवाज बंद न केल्यास जागेवरच दंड आणि शिक्षेची सोय झाली पाहिजे.
जी मंडळे मंडप उभारणी साठी रस्ते खराब करतील, जिथे दारूच्या बाटल्या सापडतील त्या मंडळांवर बंदी घालावी.
ह्या सगळ्या साठी पोलीस आणि स्वयंसेवी संस्था दोघे जागेवर असल्या पाहिजे. हवे तर फिरते न्यायालय ठेवावे ज्या मुळे जिथल्या तिथे न्याय होईल आणि "तारीख पे तारीख" होणार नाही. "हा सूर्य आणि हा जयद्रथ" असा न्याय पाहिजे.
घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी काही जागा ठरवून विसर्जनासाठी काही शुल्क ठेवावे.
सार्वजनिक मंडळाला परवानगी देताना विसर्जनासाठी किती माणसे जाणार आहेत त्या प्रमाणे स-शुल्क पास द्यावेत. विना परवानगी मंडळांना दंड आणि शिक्षा करावी.
मंडळाच्या विस्ताराप्रमाणे किती माणसे विसर्जनाला जाऊ शकतील ह्या वर निर्बंध घालावेत. उदाहरणार्थ - मानाच्या गणपतीच्या विसर्जनाला २००० माणसे, मोठ्या मंडळाच्या बरोबर १०००, मध्यम मंडळांबरोबर ५०० वगेरे.
एका हद्दी नंतर फक्त पास असेल त्या लोकांनाच विसर्जनासाठी जाऊ द्यावे.
ह्या शिवाय ज्यांना विसर्जन बघायचे असेल त्यांना स-शुल्क पास द्यावे. आणि सगळ्या पासची संख्या लिमिटेड असावी. म्हणजे त्या पेक्षा जास्त लोक विसर्जनाच्या वेळी जमणार नाहीत.
रस्ते बंद असतील तेव्हा विसर्जनाची वेळ ठरवून द्यावी आणि त्या पेक्षा उशीर केल्यास दंड करावा. पण माणसे कमी असतील तर सगळे वेळेत संपण्याची शक्यता जास्त आहे.
विसर्जनाचे "Live" प्रसारण "CCTV" चा उपयोग करून ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीन वर करावे. ह्याचा उपयोग सुरक्षे साठी पण होईल. ह्या स्क्रीन साठी प्रायोजक शोधले तर हा खर्च महापालिकेच्या किंवा पोलिसांच्या डोक्यावर पडणार नाही.
पास, स्पोन्सरशिप, दंड वगेरे मधून गोळा झालेले पैसे गणेशमंडळाच्या सदस्यांची एक समिती बनवून त्यांना द्यावे आणि त्या पैश्यांचा उपयोग सार्वजनिक विकासाच्या कामासाठी करावा.
करण्या सारखे खूप आहे.
निर्माल्य आणि मूर्तीची योग्य ती व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहांची बांधणी आणि देखभाल, पिण्याच्या पाण्याची सोय, सरकारी शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मदत, सरकारी हॉस्पिटल्स मध्ये गरीब रुग्णांना मदत.
हे अश्या साठी कि सरकारनी कितीही केले तरी समाजाची पण काही जवाबदारी लागते आणि कितीही चांगले सरकार असेल तरी (असेल तर!) करण्या सारखे खूप असते.
पण फक्त ह्या पैश्याची जवाबदारी महापालिके कडे नको. ती असली पाहिजे N G O कडे. म्हणजे त्याच्या सादुपायोगाची काही तरी खात्री राहील. नाही तर आज पर्यंत जसा विकास झाला आहे शहराचा (!) तसा ह्या पैश्यांनी पण होईल!
पण असा बदल करायचा आपण विचार तरी करणार का?
कारण आपण आता स्वतंत्र आहोत! त्या मुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधने येतील असा कोणता पण निर्णय आपल्याला नको असतो!
आपल्या राजकारण्यांना, महापालिकेला, सुरक्षा यंत्रणेला नावे ठेवायला आपण नेहेमी तयार असतो -कारण तसे करायला काही कष्ट पडत नाहीत.
पण आपण किती बेजवाबदार, बेफाम वागतो ह्याचा कधी आपण विचार करतो का?
आपण म्हणजे प्रजा कधी बदलणार का?
गणराया - आम्हाला सद्बुद्धि दे रे बाबा!
http://www.sonyslimitedworld.blogspot.in/2011_08_01_archive.html
लेख छान सार्वजनिक गणपती
लेख छान
सार्वजनिक गणपती पाहिजेत. ते आपल्या संस्कृतीचे द्योतक आहेत. प्रत्येक राष्ट्र अशी द्योतके सांभाळते. पण आपण लिहिले आहे तसे मस्त, योग्य, सुलभ व चोख अॅडमिनीस्ट्रेशन करुन हे साधता येईल. गर्दी कमी होईल व स्वच्छता वाढीस लागेल. त्याने पॉझीटीव्ह फरक पडला पाहिजे आपल्या समाजावर असे झाले पाहिजे. पुर्वी छान सांस्कृतीक कार्यक्रम व्हायचे (लता मंगेशकर अशाच गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रथम गायल्या होत्या) नुसते दारु पिऊन धिंगाणा घालायचे म्हणजे नको ते असे वाटायला लागते.
कडक नियम व समाजाचा त्याला पाठिंबा फार महत्वाचा आहे. राजकारण नको ह्यात व स्वतःचा अजेंडा तर मुळीच नको.
हे सगळे खरे आहे फक्त अजून एक
हे सगळे खरे आहे फक्त अजून एक भर
,,, ईतर स मुदायांचे मोर्चे निघाले दंगली झाल्या की त्यावर फक्त चर्चा करायची आणि सगळे नियम फक्त आपल्यालाच लावून घ्यायचे,,,,,,,,,
नाही नाही सगळ्यानाच हे लागू
नाही नाही सगळ्यानाच हे लागू करायचे (समान नागरी कायदा ह्यालाच म्हणतात जो आज नाही)
पण आपण सुद्धा पहिले पाऊल टाकायला हरकत नाही.
नाही नाही सगळ्यानाच हे लागू
नाही नाही सगळ्यानाच हे लागू करायचे (समान नागरी कायदा ह्यालाच म्हणतात जो आज नाही)
<<
चितळे गुरुजी,
चुकीचे बोललात. याला वडाची साल पिंपळाला असे म्हणतात.
क्रिमिनल कोड समान आहे. सर्व गुन्हेगार कायद्यासमोर सारखे आहेत. तिथे जात, धर्म, वा लिंग मधे येत नाही. पण तुमच्या-माझ्यासारखे लोक कायदे इम्प्लिमेंट करतात, त्यात लोचा आहे. उगा समान नागरी कायदा म्हणजे काय ही शिकवणी सुरु करायला लावू नका. झालंय आधी चावून चोथा करून ते.
सहमत इब्लिस आपल्याला. लिहिता
सहमत इब्लिस आपल्याला. लिहिता लिहिता चुकलो. नाही मला नाही करायचा तो चोथा रवंथ.