गोष्ट एका संगीताची
पूर्वी कधीतरी कोणी एक राजा निधन पावला. त्याच्या तरूण राजपुत्राने व्यवस्थित क्रियाकर्म केले. घाटावरून अस्थिकलश परत घेऊन येताना त्याने एका सतारवादकाचे वादन व गायन ऐकले. ते इतके प्रभावी होते की आधीच शोकमग्न असलेल्या त्या तरण्या राजाचा दु:खावेग अनावर होऊन त्याने हातातला अस्थिकलश हवेत उधळून दिला... त्यातली काही राख त्या वादक/गायकाच्या डोक्यात पडली. अन् मग काय विचारता ? डोक्यात राख गेल्याने डोके खाजू लागले... बरे साक्षात राजा समोर येऊन असा भावविभोर होऊन ऐकत असल्याने वादन/गायन थांबवावे तरी कसे ? त्यामुळे तो मध्येच सतारीवरचा हात काढून डोके खाजवायचा तर कधी डोक्याला जोरदार झटके द्यायचा... एकीकडे 'राजासमोर गाता/वाजवता आले नाही तर काय' याची भीती, चिंता, खाजर्या डोक्यामुळे आलेला वैताग यांचे अद्भुत भावमिश्रण त्याच्या मनात तयार झाले.... तर दुसरीकडे बोटे सतारीच्या तारांवर घाईघाईत फिरवून पटकन डोक्याकडे खाजवण्यासाठी नेल्यामुळे सतारीतून वेगळेच बोल निर्माण व्हायला लागले आणि अंगाला झटके देत राहिल्याने आवाजाला वेगळाच झटका येऊ लागला... परिणामी, राजाला अत्यंत विलक्षण अशा संगीताचे तितकेच विलक्षण सादरीकरण अनुभवायला मिळाले... आणि गंमत म्हणजे हे त्या राजाला आवडले. राजा राजी तो गधा काझी ! तो गायक/वादक दरबारी गायक/वादक झाला.
काही काळाने या नव्या राजाचे समवयस्क मित्र त्याच्या भेटीस आले. त्यावेळी राजाने गायक/वादकाला त्या खास संगीताची फर्माईश केली. आता आली का पंचाईत ! झाकली मूठ सवालाखाची या न्यायाने तो गायक/वादक राजाला म्हणाला, "महाराज, आमच्या संगीतघराण्याची प्रथा अशी आहे की डोक्यात राख घातल्याशिवाय आम्ही कला सादर करत नाही, तेव्हा थोडी राख आणवावी." राजाने राख मागवली. ती त्या गायक/वादकाने डोक्यात चोळली आणि सुरू केले त्याचे गायन अन् वादन. आश्चर्य म्हणजे त्या मित्रांनाही हे अभूतपूर्व संगीत आवडले. झाले ! त्यानंतर त्या राजाची प्रथा सुरू झाली... अधूनमधून मित्रांना बोलवायचे, संगीतकाराला आदेश धाडायचा आणि नोकराला सांगायचे, "जा रे, राख आण." मित्र यायचे, संगीतकार डोक्यात राख घालून त्याचे ते लोकविलक्षण संगीत सादर करायचा, राख संपली की राजा आणि त्याचे मित्र ओरडायचे, "राख आण !" राजा आणि त्याचे मित्र त्या संगीतस्वर्गात धुंद होऊन जायचे.
हळूहळू या संगीताबद्दल प्रजेला कळले... मग संगीतकाराने प्रजेसमोर गायन-वादन केले. प्रजेतील तरूणवर्गाने ते डोक्यावर घेतले. मग ते कार्यक्रमही जोरात सुरू झाले. संगीतकाराने कार्यक्रम ठेवावा, तुडुंब गर्दी व्हावी, त्याने डोक्यात राख घालून तिथेही त्याचे खास संगीत सादर करावे, राख संपली की श्रोत्यांनी ओरडावे, "राख आण!" अन् कार्यक्रम सुरू रहावा... वणवा पाहता पाहता पसरला.
तो राजा आणि तो संगीतकार जाऊनही शेकडो वर्षे झाली, पण तीन गोष्टी मात्र ते इथे कायमच्या ठेवून गेले. आजही आपण बिथरलेल्या वागण्याला 'डोक्यात राख घालून घेणे' म्हणतो. आजही त्या संगीतकारासारखीच सतार वाजवतात, फक्त तिला गितार म्हणतात. आजही तरूणाई त्या संगीतकारासारखीच भीती, चिंता आणि वैताग यांना सामोरे जाते... अन् आजही तरूणाई म्हणते, रॉक ऑन !
(No subject)
अल्-फाटून
अल्-फाटून स्लार्टी - कसला उगम आहे रॉक ऑन चा
स्लार्टी, भ
स्लार्टी,
भन्नाट!!!!
धन्यवाद लिंकबद्दल डुआय
धन्यवाद लिंकबद्दल डुआय
ग्रेट .
ग्रेट .
झक्कास उपपत्ती!
झक्कास उपपत्ती!
Pages