आजही मी लावलेले दार नाही.....

Submitted by kaaryashaaLaa on 16 September, 2008 - 16:15

मित्रांनो,

सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांची संख्या आता ५५ झाली आहे.

यांच्याव्यतिरिक्तही ज्यांना गझल शिकायची, लिहायची इच्छा आहे, पण नाव नोंदवायचं राहून गेलंय, अश्यांनी २६ तारखेपर्यंत आमच्याकडे आपल्या रचना पाठवा. आपण त्या कार्यशाळेत जरूर समाविष्ट करून घेऊ.

मायबोली वर आयोजित केलेली ही दुसरी कार्यशाळा थोडी वेगळी आणि मनोरंजक करू असं म्हटलं होतं.

पहिल्या कार्यशाळेत आपण ’तरही’ गझल लिहिल्या होत्या. म्हणजे एक ओळ (मिसरा) दिली होती.
त्याचे वृत्त (बहर), यमक (काफिया), स्वरचिन्ह (अलामत) व अंत्ययमक (रदीफ) समजावून सांगण्यात आले होते.
दिलेल्या ओळीने सुरूवात करून, तीच जमीन वापरून किमान ५ व कमाल कितीही असे शेर लिहून गझल लिहायची होती.

ह्यावेळी मात्र आपण काही बंधनं शिथील करणार आहोत. ह्या कार्यशाळेत आम्ही तुम्हाला फक्त अंत्ययमक काय असावं हे सांगणार. वृत्त आणि काफिया काय असावा हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. आहे ना मजा? Happy

मग तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही.

गझल कार्यशाळा २००८ साठी आपण निवडलेला रदीफ आहे : 'नाही'.

मग आता इतकंच करायचं -
'नाही' रदीफ वापरून किमान पाच शेर लिहायचे. म्हणजे फक्त १० ओळी!
गझल पूर्ण झाली, की ती आम्हाला kaaryashaalaa08@maayboli.com या पत्त्यावर पाठवायची.
ती गझल तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे निर्दोष करण्यासाठी संयोजक समितीचे सदस्य तुमच्याबरोबर असतीलच.

हे कसं, काय याची प्राथमिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे :

गझलची तोंडओळख - १
गझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार)
गझलची तोंडओळख -३ (शेर, काफिया, रदीफ, अलामत.. )
"गझल - काही उदाहरणे"

त्यातून काही अडलं तर आम्ही आहोतच. Happy

* एक स्पर्धक एकापेक्षा अधिक रचना पाठवू शकतो. मात्र अशा रचना वेगळ्या वृत्तात व वेगळा काफिया वापरून लिहिलेल्या असल्या पाहिजेत.
* ह्या कार्यशाळेत हझल (हास्य-गझल) स्वीकारली जाणार नाही Happy
* तसेच स्वरकाफिया असलेल्या गझल स्वीकारल्या जाणार नाहीत.
* कृपया तुम्ही लिहीत असलेली रचना आम्हाला खाली दिलेल्या ई-पत्त्यावरच पाठवावी.
ती रचना निर्दोष आहे असं ठरल्यावर संयोजक समिती कार्यशाळेत प्रकाशित करेल.
तोवर तुम्ही ती कार्यशाळेतल्या कुठल्याही दुव्यावर वा अन्यत्र कुठीही प्रकाशित करू नये.
* तसंच या आधीच अन्य ठिकाणी प्रकाशित झालेल्या रचना कार्यशाळेत देऊ नयेत अशी नम्र विनंती.
* तुमची मतं, तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. काहीही प्रश्न / शंका / सूचना असतील त्या आम्हाला अवश्य कळवा. त्यावर लगेच कार्यवाही केली जाईल.

लक्षात असू द्या :

२६ सप्टेंबर : गझल पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे.

नाव नोंदवायचं राहून गेलं? हरकत नाही. २६ तारखेपर्यंत तुमची गझल आम्हाला पाठवा. आपण ती कार्यशाळेत समाविष्ट करून घेऊ Happy

यापुढील पत्रव्यवहार या पत्त्यावर करायचा आहे : kaaryashaalaa08@maayboli.com

मग करताय ना सुरुवात? Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान.. ह्या सोप्या रदीफमुळे बर्‍याच वेगवेगळ्या वृत्तातल्या छानछान गझल वाचायला मिळतील ही आशा.
मला दोन शंका आहेत -
१. आधी मायबोलीवर प्रकाशित झालेली (माझीच) गझल थोड्याफार बदलाने पाठवली तर चालेल का?
२. एक स्पर्धक एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवू शकतो का?

धन्यवाद..

aaftaab,

१. आपण ह्या कार्यशाळेत परिक्षणासाठी वाचकांचा ही कौल घेणार आहोत. म्हणूनच गझल प्रकाशित करताना गझलकाराचे नाव जाहीर केले जाणार नाही. इथे लिहीलेल्या गझल पैकी निवडक गझला संग्रहातही समाविष्ट करणार आहोत. शिवाय नवीन गझल लिहिताना तुम्हाला जो आनंद मिळेल तो वेगळाच Happy म्हणून आधीच प्रकाशीत केलेली गझल नको. नवीन गझल वर काम सुरू करा Happy

२. दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर नियमावलीत add केले आहे. लक्षात आणून दिल्यबद्दल धन्यवाद.

सगळे गझल लिहायला गेले वाटते..

आज कुणालाच गॄहपाठ करायचा नाही का? Happy

मी हाव की... बाकी सगळे आळशी आहेत!! Proud
चाललाय, चाललाय...
मधे मधे काम आणि मधे मधे गृहपाठ Happy

१. वागणे माझे जगाशी ठीक नाही
हे मला मंजूर - मी सोशीक नाही
काफिया - क
अलामत -ई
गा ल गा गा गा ल गा गा गा ल

२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही
काफिया - ही
अलामत - अ
ल गा गा गा गा गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा
चुकलं वाटत... Sad

३. जसा मला वाटला तसा हा प्रवास नाही
अजून कोणीच सोबती आसपास नाही
काफिया - स
अलामत -आ
ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा

४. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
काफिया - रे
अलामत -अ
गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा गा

आयटे २ आणि ४ चुकीचे वाटतायेत..
२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही
काफिया -
अलामत -

४. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
काफिया - णे
अलामत -अ

==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

अरे वृत्त कुठले, ते नाही लिहिले. ते ही लिहा की Happy

१. वागणे माझे जगाशी ठीक नाही
हे मला मंजूर - मी सोशीक नाही
गालगागा * ३

२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही
लगागागा * ४

३. जसा मला वाटला तसा हा प्रवास नाही
अजून कोणीच सोबती आसपास नाही
लगालगागा * ३

४. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
गालगालगागागा * २

==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

१. वागणे माझे जगाशी ठीक नाही
हे मला मंजूर - मी सोशीक नाही

गालगागा * ३
काफीया: ठीक, सोशीक (ईकने शेवट होणारे शब्द)
अलामतः ई

२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही

लगागागा * ४
काफीया: माहीतही, ठेवीतही (अहीने शेवट असणारे शब्द)
अलामतः अ

३. जसा मला वाटला तसा हा प्रवास नाही
अजून कोणीच सोबती आसपास नाही

लगालगागा * ३
काफीया: प्रवास, आसपास
अलामतः आ

४. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

गालगालगागागा * २
काफीया: लाजणे, झाकणे
अलामतः अ

वागणे माझे जगाशी ठीक नाही
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा

हे मला मंजूर - मी सोशीक नाही
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा

वृत्त - गा ल गा गा *३
काफिया - ठीक, सोशीक.
अलामत - ’ई’

२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा

तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही
ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा

वृत्त - ल गा गा गा *४
काफिया - माहीतही, ठेवीतही.
अलामत - ’ई’

३. जसा मला वाटला तसा हा प्रवास नाही
ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा

अजून कोणीच सोबती आसपास नाही
ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा

वृत्त - ल गा ल गा गा *३
काफिया - प्रवास, आसपास.
अलामत - ’आ’

४. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा गा

चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा गा

वृत्त - गा ल गा ल गा गा गा *२
काफिया - लाजणे, झाकणे.
अलामत - ’अ’

चिन्नु, चौथ्या ओळीतील काफिया लाजणे, झाकणे का आहे आणि बरे का नाही हे समजावुन सांगशील का?

'नाही' हे बरोबर 'नाही' Happy
प्रत्येकाचे थोडे बरोबर पण अचूक 'नाही'
परत विचार करणार ना? की 'नाही'? Happy

मला वाटतं चौथ्यामधे काफिया 'णे बरे नाही' असा असावा.
अलामत 'अ'

-----------------------------------------------
आली दिवाळी! Happy

४. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

नलिनी,
वरील ओळींमध्ये 'बरे नाही' हा रदीफ (अंत्ययमक) झाला. कारण तो प्रत्येक ओळीच्या शेवटी repeat होणार. साधारण त्याच्या आधीचा शब्द म्हणजे काफीया-जिथे यमक जुळते. म्हणून लाजणे, झाकणे तसेच राहणे, पाहणे असे शब्द काफीया मध्ये येतील (अणे ने शेवट होणारे). त्यात 'णे' च्या आधीचे अक्षर किंवा स्वर म्हणजे 'अ' म्हणजेच इथे अलामत.

कळले आता.
म्हणजे २र्‍या ओळीबद्दलपण असेच होईल का?

२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही

रदीफ 'ही नाही'

काफिया - माहीत, ठेवीत.
अलामत - 'ई'

Happy नलिनी, मी पण शिकत्येय बरं का!

२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही

यात शेवटी repeat होणारा शब्द 'नाही', म्हणून तो रदीफ. त्याआधीचे यमक जुळणारे शब्द माहीतही, ठेवीतही (ईतही ने शेवट असणारे), ते काफीया. काफीयामधले पहिले जुळणारे स्वर अक्षर 'ई' म्हणजे अलामत.

आपण कोष्टकात दिलेली रदीफ ची व्याख्या पुन्हा बघू:

रदीफ म्हणजे मतल्यात दोन्ही मिसर्‍यांच्या शेवटी आणि त्यानंतरच्या प्रत्येक शेराच्या सानी मिसर्‍याच्या शेवटी येणारा शब्द अथवा शब्द-समूह

इथे 'शब्द अथवा शब्द-समूह' हे महत्वाचे आहे.

त्यामुळे ४ क्रमांकाच्या उदाहरणात ’बरे नाही’ हा रदीफ झाला.

आता काफियाची व्याख्या पाहू.

काफिया म्हणजे रदीफ च्या आधीचा असा शब्द ज्यातील एक अक्षर वा अक्षर-समूह common असतो.

ह्या व्याख्येप्रमाणे इथे ’लाजणे’, ’झाकणे’ असे काफिये झाले. इथे ’णे’ हे एकच अक्षर common आहे. पण क्र. २ च्या उदाहरणात काफिये (माहीतही, ठेवीतही) बघितले तर लक्षात येईल की इथे ’तही’ हा अक्षर-समूह common आहे.

आता वळूया अलामती कडे:

काफियाच्या न बदलणारा (common) हा जो भाग आहे त्याच्या आधीच्या अक्षराचा स्वर म्हणजे अलामत.

’लाजणे’, ’झाकणे’ मधे ’णे’ हा न बदलणारा भाग. त्याच्या आधी अनु:क्रमे ’ज’ आणि ’क’ आहेत त्यांचा ’अ’ हा स्वर आहे. म्हणून ’अ’ ही अलामत.
’माहीतही’, ’ठेवीतही’ मधे ’तही’ ह्या न बदलणार्‍या भागा आधी ’ही’ आणि ’वी’ आलेले आहेत. त्यांचा स्वर ’ई’ आहे. म्हणून ’ई’ अलामत आहे.

ह्या व्याख्या अजून स्पष्ट होण्यासाठी आपण ह्या गझलांमधील एक एक शेर बघू:

मैफलीत ह्या माझ्या पाहतेस का खाली?
हाय! लाजणार्‍याने जागणे बरे नाही

आणि:

किती हे धोरणी माझे निघाले सभ्य शेजारी
तसा आळीत मी नाही, तसा वाळीतही नाही.

अजून काही शंका असतील तर नक्की विचारा Happy

डोक्याचा भुंगा (की भुजंगप्रयात !) व्हायला लागला आहे आता Happy
'एक तरी ओळ लिहावी शहाणी' असं संदीप खरे का म्हणालाय ते आत्ता कुठे कळायला लागले आहे.
---------------

काय मंडळी.. सारेच गझल लिहीण्यात गुंगलेले दिसत आहेत... इकडे काहीच हालचाल नाही Happy
मग कधी पाठवताय तुमची गझल?

काही शंका असतील तर जरूर विचारा...

===
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही

एक शंका --

>> भावनांचा मांडला बाजार नाही
>> शब्द माझा एवढा लाचार नाही

हे गालगागा * ३ बरोबर?

जर ही फोड बरोबर असेल तर मग 'शब्द' ह्यातला 'श' हा गुरू असेल (कारण जोडाक्षराआधीचे अक्षर म्हणून) पण मग 'ब्द' लघु कसे? ते तर जोडाक्षर आहे -- म्हणजे गुरू असायला हवे ना?

संदीप, जोडाक्षर स्वतः बदलत नाही. पण त्या शब्दातलं जोडाक्षरा आधीचं अक्षर लघु असेल, आणि उच्चारताना त्यावर आघात येत असेल तर ते गुरू होतं.
'शब्द' उच्चारताना शब् + द असं उच्चारलं जातं ना? म्हणून पहिलं अक्षर गुरू झालं आणि 'द' लघु होता तो लघुच राहिला.

==
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
shama1_0.jpg

रदिफच्या व्याख्येप्रमाणे पुढील शेरात, 'बरे नाही' हा रदिफ झाला.
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

असा रदीफ चालणार आहे की, फक्तं 'नाही' हवा? (माझा प्रश्नं म्हणजे इथे गठ्ठ्याने गजला तयार आहेत.... तुम्ही उत्तर दिलत की, पुडी बांधुन हातात ठेवणार.... असला वाटतोय, मलाच... कायतरीच ना?)

daad,
Happy

चालेल ना असा रदीफ. काहीच हरकत नाही. (म्हणूनच ते उदाहरण मुद्दाम दिले आहे.)

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

विचार केला चिकार काही अजून सुचले नाही
गझल पाठवू स्पर्धेसाठी?.. अजून ठरले नाही

बरेच सुचले बरेच खचले बरेच गेले वाया
हात मारला इकडे तिकडे तरीहि जमले नाही
Happy
Sad

प्रयत्न चालू आहे...

आफताब,
जमतंय जमतंय. Happy

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

कठीण कठीण कठीण किती
गझल करणे बाई.
******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

मधुरा तुमचा email id आमच्याकडे नसल्याने तुम्हाला आम्ही एक मेल पाठवू शकलो नाही. कृपया आमच्या kaaryashaalaa08@maayboli.com ह्या पत्त्यावर तुमचा email id पाठवाल का?

आणि काही कठीण नाही हो.. तुम्ही प्रयत्न तर करा.. आम्ही आहोतच काही मदत लागली तर..

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

" तसेच स्वरकाफिया असलेल्या गझल स्वीकारल्या जाणार नाहीत."

कृपया 'स्वरकाफिया' बद्दल थोडंसं विवरण द्याल का? म्हणजे नेमकं काय स्वीकारलं जाणार नाही याचं उदाहरण दिलं तर समजायला सोपं होईल.
-सतीश

२न्ही ओळींत २८ मात्रा असण हा क्रायटेरीया चालतो का?
मग पुढे येणार्‍रा चारही शेरांतही २८सचं मात्रा यायला हव्या का?
मी जे लिहलयं त्याबद्दल मला जराही खात्री नाहीये. तर ते मी मेल कराव का?

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

सतीशजी,

मला जेवढी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करतो. काफियाचे स्वरूप हे काफियाचा न बदलणारा भाग व त्या न बदलणार्‍या भागाच्या आधी येणार्‍या अक्षराचा स्वर (अलामत) ह्या दोन गोष्टींनी ठरते. पण स्वर-यमक म्हणजेच सौती-काफियात हा न बदलणारा भाग हा फक्त शेवटच्या अक्षराचा स्वर असतो. म्हणजे पारंपारीक काफिया 'बाजार', 'लाचार', 'दार' असा चालतो. स्वर-काफिया मात्र 'बोलका', 'शांतता', 'केवढा' असा असेल. ह्यात शेवटच्या अक्षराचा 'आ' हा स्वर तेवढा सामाईक आहे.

मधुरा,

२८ मात्रा हा निकष होऊ शकतो. पण मग इतर सगळ्याच शेरांच्या प्रत्येक ओळींमधे २८ मात्रा यायला हव्या. आणि तुम्हाला काहीही शंका असतील तर अगदी नि:संकोच मेल पाठवा. आम्ही आहोतच. Happy

==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

Pages