माबो ज्युनिअर शेफ्स - बच्चेकंपनींना करतायेण्याजोग्या पाककृतींचे संकलन

Submitted by लाजो on 2 July, 2012 - 23:33

इथे बच्चेकंपनींना करता येण्याजोग्या पाककृती, टीप्स, आयडियाज इथे शेअर करू या Happy

सुरुवात करण्याआधी काही साध्याच पण महत्वाच्या गोष्टी:

स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सनी घ्यायची काळजी:

१. हात स्वच्छ साबण लावुन धुवुन घावेत.
२. केस नीट बाधुंन घ्यावेत.
३. साधे, अंगासरशी कॉटनचे कपडे घालावेत.
४. सूरी, कात्री, किसणी इ इ धारधार वस्तु वापरताना आई बाबांची मदत घ्यावी. बाजारात कमी धार असलेल्या मुलांना वापरता येण्याजोग्या सुर्‍या/कात्र्या मिळतात त्या वापराव्यात.
५. कुकटॉप वरुन भांडे उतरवताना/ ओव्हनमधुन केक काढताना/ मायक्रोवेव्ह मधुन बोल काढताना आई/बाबाची मदत घ्यावी.
६. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन - अर्धे लक्ष इथे अर्धे टीव्ही वर चालु असलेल्या कार्यक्रमात असे नको - अ‍ॅक्सिडंट्स होण्याची शक्यता जास्त.
७. आई/बाबांना आपल्यापेक्षा थोडे जास्त कळते आणि जास्त अनुभव आहे तेव्हा त्यांचे ऐकावे

स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सच्या मोठ्या असिस्टंट्सनी (अर्थात आई/बाबांनी) घ्यायची काळजी:

१. मुलं स्वयंपाकप्रयोगात बिझी असताना त्यांना स्वयंपाकघरात अजिबात एकटे सोडु नका...

स्वत: आपल्या हाताने केलेला पदार्थ खाण्यात आणि खिलवण्यात आगळीच मजा आहे तेव्हा यंग शेफ्स, बी अलर्ट, बी सेफ आणि एंजॉय!!!

हॅप्पी कुकिंग Happy

माबो ज्युनिअर शेफ्स - पाककृती:

१. माबो ज्युनिअर शेफ्स १ - जस्ट स्टर अँड बेक, चॉकलेट केक - लाजो

२. माबो ज्युनिअर शेफ्स २ - स्नो बॉल्स - पौर्णिमा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! छान धागा.
वाचत राहिन.
सध्या वय वर्षे तीन इनग्रेडिएंटस मिसळणे, चहा साखर बोर्नविटा डब्यातून काढून मोजून कपात , गॅसवर नसलेल्या पातेल्यात टाकणे , ढवळणे अशी मदत स्वयंपाकात चालू आहे.

लाजो.. Happy सो क्यूट धागा..
नील ( वय ८ वर्षं) ला लिटल शेफ पुस्तक पाठवलंय.. ते वाचून मस्तपैकी स्वतःसाठी ब्रे फा बनवतो..
त्यालाच विचारून ,शेअर करते रेसिपीज इकडे.. नुकतंच स्वतःकरता आणी मॉम करता कीश विथ बेकन असं काहीतरी बनवलं होतं त्याने.
३ते ८ वर्षांची मुलं बटाटे,चीज किसणे,मॅश करणे,सिंपल जॅम, चटणी, बटर सँडविचेस बनवणे, लसूण सोलणे इ. गोष्टी इ. गोष्टी आनंदाने करतात..

सुचना ७ अगदी आवडली. Wink

वय वर्ष ११ ते १५/१६ पर्यंतच्या मुलांसाठी ( ज्यांना फक्त ते आणि त्यांच्या वयाचे मित्र/मैत्रिणीच शहाणे आहेत असं वाटतं. :)) वय वर्ष १७-१८ नंतर रेसिपीज करण्याकरता आईच्या हातात सापडण्याची शक्याताच नाही, त्यामुळे त्यांना काउंट न केलेलंच बरं.

मस्त धागा !

आम्ही सारे खवय्ये चे प्रयोग अगदी तश्शीच नक्कल करत चालू असतात घरी.

माझ्या /आमच्या सगळ्यांच्याच बर्‍याचश्या प्रयोगांत तिचा वाटा असतोच असतो.

इथल्या खास बच्चेकंपनीसाठीच्या रेसिपीज करताना तिला मज्जा वाटेल हे नक्की Happy

माझ्या लेकीनं मुंबईत मास्टरशेफ क्लासेस केले होते. त्यांना मस्त मस्त प्रकार शिकवले होते. मी लेकीला अगदी ती ४-४.५ वर्षांची असल्यापासून छोट्या सुर्‍या हाताळायला देत होते. हात कापला तर काय होईल हे एकदा समजावून सांगितल्यावर ती अगदी जपून केळी, उकडलेला बटाटा वगैरे कापायची. टोमॅटो इ. देऊ नयेत, दिलेत तर टोमॅटो कापायला असते ती खास सुरी द्यावी.

आताही केक वगैरे बेक करायचा असेल (फ्रॉम स्क्रॅच नाही. आमची उडी बेट्टी क्रॉकर पर्यंत) तर तिला सोबत घ्यावेच लागते. हल्ली कच्चे बटाटे वगैरेही कापते. पण एका मध्यम बटाट्याकरता साधारण १० मिनिटं असा वेळ ठेवावा लागतो. Proud

ह्या वर्षीच्या इन्ग्रजीच्या पहिल्याच धड्यात 'बाहेर पाऊस भयंकर असल्यामुळे, टीपी म्हणून आईच्या मदतीने कुकीज केलेल्या मुलाची गोष्ट' आहे. ते वाचून 'आई आपणही कूकीज बनवूया' अशी सूचना कम इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे! तर कृपया कोणीतरी बच्चेकंपनीला घेऊन कूकीज करण्याची रेसिपी टाकलीत तर बरं होईल. आगाऊ धन्यवाद.

बाकी, मी त्याला पहिल्यापासूनच स्वयंपाकघरात वावरू देते. त्याच्या वय, समज आणि इच्छेनुसार सोपी, छोटी कामं करतो रोज. माझी भावी सून मला दुवा देणार आहे नक्कीच Wink

डायरेक्ट शेफ म्हणून अपॉइंट करण्याआधी अ‍ॅप्रेंटिस म्हणून ठेवावे.
शेंगा सोलणे, धान्य निवडणे , ताक घुसळणे, खेळण्यातल्या पोळपाटावर पुर्‍या /पापड लाटणे,गाजर /काकडी किसणे हे उद्योग मी लहानपणी आवडीने केलेले आहेत. नारळ खोवणे, विळीवर भाज्या चिरणे हेही जरा नंतर केले.
जिन्नस /भांडी काढणे ठेवणे ही काम सांगितल्यास किचनमधल्या वस्तू जिन्नस कुठे असतात, वापरून झाल्यावर कुठे ठेवायच्या माहिती होईल.

सूचना क्रमांक ६ लहानांपेक्षा मोठ्यांना जास्त लागू आहे. त्यात टीव्हीबरोबर मायबोली आणि फोन यांचा अंतर्भाव हवा.

त्यात टीव्हीबरोबर मायबोली आणि फोन यांचा अंतर्भाव हवा.>>> हेहेहे
भरत, पण असय ना की समजा लाजोमावशीने माबोवर सांगितलेली रेसिपी करायची ठरली तर माबोवर डोकवावेच लागणार आणि काही शंका असेल तर त्वरीत विचारण्यासाठी लाजोमावशीला फोन करावाच लागणार! Wink त्यामुळे तेव्हढी सुट द्या बॉ!

सरबत, सॅन्डविच करणे, घरी केलेल्या पाणीपुर्‍यांमध्ये स्वतःला हवं तसं सारण भरुन घेणे ह्या बरोबरच आम्ही अजुन जेवायला जमिनीवरच बसत असल्यामुळे ताटं, वाट्या, पाण्याची भांडी उचलुन ठेवणे आणि फरशी पुसून घेणे ह्याही गोष्टी आमचा ज्युनिअर शेफ करतो.
पूनमचं शेवटचं वाक्य +१ Proud

मस्तच! सगळ्यांच्याच घरी लिटील शेफ्स आहेत तर Happy

पौर्णिमा, इथे मी चॉकलेट चिप कुकिज ची पाकृ दिली आहे ती सोपी आहे मुलाबरोबर करायला. बघ आवडत्ये का ते Happy

माझी जुनिओर शेफ वय वर्ष ५ टन्ग / होर्लिक्स बन्विने आवडत्ये . इतर्स्त्स पदलेलि भन्दि उचलेने उदा. कप, गग्लस्स एत्यदि. व मझ्या सासु मि (शेफ) किति काम केले ते पतवुन देने व मला चिदुन देने.

पण "आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार" हा मोठ्ठा प्रश्न आहे ! >> Lol रुणुझुणू. अगदी अगदी.
पण मदत चालु असते घरी. भाजी निवडणे, कुकीज करणे ( सध्या मावे नसल्याने होत नाहीयेत), कोकम सरबत बनवुन घेणे इ.
सोप्या रेसिपीज इथे आल्या कि करायला देईनच. ( आधी त्या मलाही सोप्या वाटल्या पाहीजेत Wink )

माझी श्रावणी ६ वर्षाची आहे. ती लिंबू सरबत बनवते स्वतःहून.

बाकी एक एक रेसिपीज बिन गॅसच्या करत असते. त्यामध्ये माझ्या किचनमधले पिठ, साखर, राई, जिर अश्या वस्तूंचे नुकसान होत असते पण मी तिला थोडे थोडे देते तिला प्रोत्साहन देण्यासाठी. रोज वाट्या, पाणि आणि किचनमधल थोड थोड सामान घेउन ती तिच्या पद्धतीच्या आपल्याला न समजणार्‍या रेसिपीज बनवत असते. सी बेबीज वरील आय कॅन कुक बघते रोज.

भारी धागा आहे. माझा लेक आता १४ वर्षाचा आहे. वरण भाताचा कुकर लावणे, मॅगी, विविध सॅलड्स, व्हाइट सॉस आणि पास्ता. वगैरे शिकवलय. गेली ३-४ वर्ष हौस म्हणुन का होइना करतोय अधुन मधुन.
बाकी ,वेगवेगळी डिप्स बनवणे, चाट चे प्रकार (करुन ठेवलेल्या चटण्या वापरुन ) करतो. मित्राना खिलवतो देखिल. (नंतरचा पसारा आवरणे पण पदार्थ बनवण्याचा एक भाग आहे हे आठवण केल्याशिवाय होत नाही Wink )
इथे आणल पाहिजे त्याला . Happy

अरे वा ! मस्त धागा आहे हा Happy

स्वतःला हवे तेव्हा लिंबूसरबत बनवून घेणे हा लेकीचा आवडता उद्योग आहे सध्या >>> मंजुडी, सेम हियर Happy अथपासून इतिपर्यंत आईची लुडबुड न होता करु शकणारा हा एकच प्रकार असल्याने एकदम हिट आहे आमच्याकडे पण.

भारतात गेलो की बहिणीच्या मुलासोबत मॅगी बनवणे हा अत्यंत आवडता उद्योग.

ह्यशिवाय पॅनकेकचे बॅटर बनवायला आवडते. बाकी, कुकी/केक/ब्राउनी इ चे घटक एकत्र करुन बॅटर बनवणे, ते साच्यांमध्ये ओतणे, ऑम्लेट करणार असल्यास अंडी फोडून बीट करुन देणे, ब्रेड टोस्टरमध्ये टाकणे, मायक्रोव्हेवचा टायमर सेट करणे, इतर काही पदार्थ करणार असल्यास भांड्यांची जमवाजमव उर्फ पसारा करणे, केलेल्या पदार्थांचे फोटो काढणे ही सध्याची आवडती कामं. हे सगळं सिझनल असतं त्यामुळे अजून महिन्याभराने वेगळ्याच आवडी असल्यास सांगता येत नाही Wink

मस्त धागा. धन्यवाद लाजो आणि सगळेच.
आमच्याकडेही तेच. स्वैपाकघरात मज्जा.

मयेकर, पौर्णिमा, दीपाली- पोस्टी आवडल्या.
मनिमाऊ Lol

मस्त धागा. माझा लेक वय वर्षे १८ होईपर्यंत बरेच करी. सँडविचेस करणे, कुकर लावणे, बटाट्याची भाजी करणे, वरण करणे, अगदी चपात्याही करू शकायचा. पण आता मनिमाऊ म्हणते तसे >>>वय वर्ष १७-१८ नंतर रेसिपीज करण्याकरता आईच्या हातात सापडण्याची शक्याताच नाही.<<< तसं झालय Sad परवाच जरा रागावून असं म्हटलं. मग गुमाने बटाट्याची भाजी, सॉरी पिठलं केलं Proud जास्ती कौशल्य दाखवायला गेला अन उकडलेल्या एका बटाट्याचे १०८ तुकडे कापले Lol
तेव्हा मला पटलं की मुलगा पुरुष झाला Proud

"आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार" हा मोठ्ठा प्रश्न आहे ! >>> रुणुझुणू अगदी, आमच्याकडेही हे लागू.
पण त्यामुळेच मुलाला शिकवणार आहे. माझ्यासारखी त्याची फजिती नको. सध्या ३ वर्षाचा असल्याने उत्साह खुप आहे आणि ऐकतो पण. फ्रिजमधुन सांगितलेल्या वस्तु काढणे, भाज्यांना आंघोळ घालुन पुसून देणे. ताट वाढणे हे खुप आवडतं.

पण त्यामुळेच मुलाला शिकवणार आहे. >> हो हो. मी सुद्धा.
'मोठ्या मुलाचं' ही पाककौशल्य भयानक असल्याने सध्या एकसाथ तिघेही प्रशिक्षण घेत आहोत.
मॅगी बनवता येते (गॅसजवळचं काम माझं किंवा बाबाचं). बाकी शेंगदाण्याची सालं काढणं, बटाटे सोलून देणं आणि बर्टर नाइफने तुकडे करून देणं, कडीपत्त्याची पानं वेगळी करून देणं ही कामं आवडीने करतो.
सीबिबीजवरचं आय कॅन कुक पाहून "आपण हे करू या का ?" विचारत असतो, पण बरेच घटक इथे मिळत नसल्याने (किंवा शोधायचा कंटाळा) ते पुढे ढकलले जाते.
अजून एक....सायोच्या मलई बर्फीची पाकृ वापरून पेढे आम्ही बर्‍याचदा करतो. तेव्हाही सगळे घटक एकत्र करणं, पेढे वळणं आणि प्रत्येक पेढ्यावर केशराच्या काड्या चिकटवणं ही कामं निगुतीने करतो.

तर कृपया कोणीतरी बच्चेकंपनीला घेऊन कूकीज करण्याची रेसिपी टाकलीत तर बरं होईल. >>

माझ्याकडे एकसे भले दो प्रकार आहे. मी दोघांना रेसिपी वाचायला लावते. दोघे मदतीला आहेत म्हणून रेसिपी डबल करायची -तर सगळी मापे दुप्पट करणे , रेसिपी दुप्पट केली की त्यातून आता किती कुकीज / कपकेक्स होतील , ते कसे वाटायचे अशी बेरजा, गुणाकार , भागाकार, अपुर्णांकांची उजळणी झाल्याशिवाय रेसिपी सुफळ संपूर्ण होत नाही .

मेधा Happy आमच्याकडे पण असेच चालायचे. पण मग एक दिवस लेकाची ट्युब पेटली - ' आई चिटिंग करते. शाळेला सुट्टी म्हणून होमस्कूल.'

हे काय.. सगळे लीटील मा स्टर्स काय करतात आहेत!! आला की उन्हाळा.. झाल्या की सुरु सुट्या!! मग आता? येउ द्या

माझे सजेशनः
१. सुकी/ओली भेळ
२. सँडविचेस
३. कच्चा चिवडा
४. रसना च्या पाकिटातिल रसना करुन बाटलीत भरणे
५. भाज्या किसुन देणे
६. फ्रेन्च टोस्ट
७. सॅलड साठी भाज्या चिरणे ई. ई.

Pages