देणार्याचे हात घ्यावे...
"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली.
"त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई."
पाचातल्या चार महालक्ष्म्या खाली माना घालून उभ्या होत्या. पाचवी नुस्तीच टकामका बघंत उभी राहिली.
"बोला गं कुणीतरी पटापटा! बाकी कामं आहेत मला." कारेकर बाई वैतागून म्हणाल्या.
"ह्या काय बोलतील बाई? मीच सांगतो. ह्या पोरी मधल्या सुट्टीत फाटकावरून कुदून बाहेर गेल्या बोरंवाल्या म्हातारीकडं! म्हणाल तं एकीजवळ पैसा न्हाई. उधारीचा मामला! आधीची पण उधारी हाए ह्यातल्या दोघींची. म्हातारी सोडेना. पोंक्षेबाई हापडे करून चालल्या होत्या. त्यांनी बघीतलं. म्हातारीच्या टपररीतून बाहेर काढून माझ्या हवाली केलं. घाईत होत्या."
"काय गं मुलींनो, हे खरं नं?" पाच माना नंदीबैलासारख्या निमूट हलल्या.
'कुणाला विचारून शाळेच्या बाहेर पडलात?" पुन्हा शांतता.
"शाळेची शिस्त तर मोडलीतच. पण बाहेर कुणी परस्पर पळावून नेलं असतं म्हणजे? आणि पैसे नाहीत तर घ्यावं कशाला विकंत? शिक्षा म्हणुन उद्यापासून प्रार्थनेआधी अर्धा तास शाळेत हजर रहायचं. बोकील बाईंना मदत करा वाचनालयात. तुमच्या पालकांना चिठ्ठ्या पाठवणार आहे मी आता. पुन्हा असं व्हायला नको. आलं लक्षात?" कारेकर बाईंना नक्कीच घाई असावी .नाहीतर नक्कीच मोठं लेक्चर झालं असतं. मुली जायला निघाल्या.
"उद्या पैसे चुकते करा. गजाभाऊ, ह्यांना वर्गात पोचतं करा. शिक्षकांना सांगा ह्या उशीरा का आल्या ते. कुणाच्या गं वर्गात तुम्ही?"
"दातार बाईंच्या."
"नेतो बाई." गजाभाऊ उत्तरले. "चला महालक्ष्म्यांनो. वर्गात चला. आता घरी चिठ्ठ्या जाणार. आईबाप चांगली पुजा करणार!! मजा!! कशाला ते सडके बोरं पेरु खाता? डबे न्हाई आणंत?" गजाभाऊंनी विचारताच त्यातली एक रडयला लागली.
"रडू कशापाई अंबाबाई? खाताना तर बोरं गोड लागले असतील! जाऊ दे. नको रडू! काई नाई म्हणणार आई. सांग माऊलीला 'पुन्हा असं नाई करणार' म्हणून."
"गजाभाऊ, आई नाहीये तीला. काकुकडे रहाते. घरचा अभ्यास नाही केला म्हणून काकुनं डबा दिला नाही आज. मग मधल्या सुट्टीत हीला भूक लागली म्हणून बोरंआज्जीकडे गेलो हीच्याबरोबर."
एव्हाना लुटखुट वर्गाजवळ आलं होतं. मुली वर्गात गेल्या. दातारबाई गजाभाऊंशी बोलायला बाहेर आल्या. सगळी रामकहाणी सांगून झाली.
"बाई, रडूबाईला पाठवता का माझ्याबरोबर ५ मिनिटं? अर्ध्या दिवसाची उपाशी आहे पोर. माझ्या डब्यातले चार घास खाईल तर अभ्यासात लक्ष तरी लागेल."
त्यादिवशी त्यांच्या डब्यातली भाजी पोळी खाऊन, तृप्त होऊन त्या आईविना पोरक्या पोरीच्या अंतरात्म्यानं गजाभाऊंना खूप आशीर्वाद दिले असावेत.
***
गजाभाऊ म्हणजे शाळेतलं लाडकं व्यक्तीमत्व! तासांचे टोल देण्या, नोटिस फिरवण्यापासून शाळेच्या अखेरीस रिक्षावाल्यानं बुट्टी मारली म्हणून मुलींना घरी पोचवून देण्यापर्यंत सगळी जबाबदारी त्यांचीच. गाजाभाऊंचं शाळेवर नितांत प्रेम आणि अर्थातच शाळेचं त्यांच्यावर!
गजाभाऊंचा अवतार म्हणजे खाकी शर्टावर खाकी पँट. शर्टाच्या खिशात पाच पन्नास पेन. पायात 'भरपूर ठिकाणी खिळे ठोकून दुरुस्त केलेल्या' चपला. तोंडात समस्त विद्यार्थीनींसाठी 'अंबाबाई, महालक्षुमी, विरजाई (ही पण फार पावरफुल देवी असावी) अशी संबोधनं.
शाळेची ट्रिप, गाईडचा कँप त्यांच्याशिवाय होऊच शकायचा नाही. गाईडच्या कँपला तर एकवेळ नीळ्या साडीतल्या परबबाई नसल्या तरी चालेल पण गजाभाऊ नाही तो कँप कसला? अश्या दिवशी भल्या पहाटे डेपोतून बस आणणं हे त्यांचच काम. जमलं असतं तर त्यांनी आधल्या रात्रीच ड्रायव्हर मंडळींना घरी झोपवून सकाळी चहा नाष्ता देऊन धरून आणलं असतं. ३-४ बसेस असल्या की गजाभाऊंचं ब्लड प्रेशर हाय!
"बाई तीनातल्या २ बशी न्हाई मागं. सांगु का ड्रायव्हरला थांबायला?" किंवा "पुढली बस फार फास चाललीय. सांगू का आपल्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला?"असल्या घालमेलीत सगळ्या 'बशी' योग्य स्थळी पोचल्या, मुली मोजून त्या बरोब्बर नंबराइतक्या भरल्या की त्यांचा जीव भांड्यात पडायचा.
त्यांच्याबरोबरच्या ट्रिपमधे 'भोजन' हा हायलाईट! स्वतःच्या डब्यातली भाजी पुरी संपवून तारामावशींनी म्हणजे गजाभाऊंच्या सौ. नी काय पाठवलंय ह्याची उत्सुकता असायची. तारामावशी त्यांच्याबरोबर शंभर दीडशे मुलींसाठी खाऊ पाठवायच्या. कधी कणकेच्या लाडवातला घास नाहीतर मुठभर चिवडा हाती मिळायचा. चवदार खाऊसाठी गजाभाऊंसमोर लाईन लागायची. आमचं खाणं पीणं आटोपलं की ते ड्रायव्हर मंडळींबरोबर जेवायला बसायचे. रिटायरमेंटला आलेल्या कर्णिकबाई मग हळूच त्यांच्या पाठीवर हात फिरवून म्हणायच्या,
"गजा, किती धावपळ करशील राजा? खाऊ घालणं पुरे आता. जेवायला बस." मग बाई हळूच गजाभाऊंच्या आवडीची डब्यात आणलेली भाजी त्यांच्या हाती द्यायच्या.
अश्याच एका सहलीला एका शेताच्या बांधाजवळ मुली डबे खायला बसल्या. शेजारी पेरुची बहरलेली बाग.
"गजाभाऊ, पेरू" मुलींचा लकडा.
"मालकाला विचारल्याबिगर कशे तोडायचे विरजायांनो! चोरी करणं पाप!" मुली गप्प बसल्या. जरा वेळानं २-३ मुली आणि दातारबाई हातात एक एक पेरु घेऊन येताना दिसल्या. मागून कुणीतरी धावत आलं.
"ओ बाई, कोणाला इचारून पेरू घेतले?"
"अहो बांधाजवळ पडलेले उचलले. तोडले नाहीत." दातारबाई म्हणाल्या.
"थी बी चोरीच!"
बाई लाजेनं अर्धमेल्या झालेल्या. तेव्हड्यात गजाभाऊ पुढे झाले.
"ओ भाऊ रंगदारी करायचं काम न्हाई. इथे बसायची परमिशन घेतली मालकाकडून तव्हाच मालकानं पेरू खायाची बी परमिशन दिली. माझ्या पोरी गुणाच्या. एकीनं आतापावतर तोंड न्हाई लावलं पेरुला. अन गोंधळ नको म्हणून मी 'मालकाची परवानगी न्हाई' म्हणालो. बाई पोटुशी! वाटलं एक पेरू खावा तर तुझा बगीचा काय ओस पडं का?"
राखणदारवजा दिसणारा तो माणूस दातारबाईंच्या मोठ्ठ्या पोटाकडे बघून खजील होऊन चालता झाला. तासाभरानं पेरुंनी भरलेली एक मोठ्ठी टोपली आमच्याकरता हजर झाली. 'माझ्या पोरींनी न विचारता पेरुला तोंड लावलं नाही' ह्याचा गजाभाऊंना कोण अभिमान!
***
गजाभाऊंची सांपत्तिक स्थिती तशी बताचीच असावी. पाचवीत कधीतरी रिक्षेवाला आला नसताना त्यांनी सायकलवर बसवून घरी सोडलं होतं. वाटेत तारामावशींना "अंबाबाईला घरी सोडून येतो" म्हणून सांगायला ते घराशी थांबले. तेव्हा त्यांचं चंद्रमौळी तरी नीटनेटकं लावलेलं घर बघायला मिळालं होतं.
"रिक्षेवाल्याची वाट बघत पोर भुकेली झाली असेल." म्हणून मला घरातून झुणका पोळीची गुंडाळी खायला मिळाली होती. अप्रतीम चव!
आम्ही शाळेत घालवलेल्या ८-१० वर्षांत त्यांना सतत हसत्मुखानं काम करताना बघीतलं होतं. शाळेतल्या विद्यार्थींनींइतकच त्यांच भिंती, टेबल खुर्च्या, फळे आणि मैदानावर प्रेम. भिंतीवर शाईचे डाग पाडले, मैदान उकरलं की 'कशापाई नुकसान करता?' हा त्यांचा कळकळीचा सवाल असे. "कुठल्या अंबाबाईचं काम ह्ये?" असं विचारत डाग स्वच्छ केला जाई, मैदानातला खड्डा माती टाकून सारखा केला जाई. खाऊचा पैसा 'संचयीका' नामक बँकेत टाकला की भविष्यात कश्शाची ददात पडणार नाही ही ठाम समजूत गजाभाऊंमुळे!!!
***
आता शाळेतून बाहेर पडून बरीच वर्ष लोटलीत. रेगेबाई, कर्णिकबाई अश्या लाडक्या शिक्षकांइतकीच गजाभाऊंची आठवण होते.
असाच एकदा शाळेत जायचा योग आला, शाळा सोडून जवळापास १५ वर्षांनंतर! शाळेचं गॅदरिंग होतं. जिव्हाळ्याची बाब! तेव्हा 'तयारी' नामक अपूर्व सोहळा बघायला जायचं ठरवून शाळेत आले. मुख्याध्यापिकाबाईंनी त्यांच्या खोलीत बोलवलं. आम्ही शिकंत असताना जराच वर्षांपूर्वी जॉइन झालेल्या चित्रेबाई मुख्याध्यापिका झाल्या होत्या. दार उघडून, परवानगी मागून आत गेले.
"कित्ती वर्षांनी भेटतेयस गं!" नमस्कारासाठी वाकताच चित्रेबाई पोटाशी घेत म्हणाल्या. आजुबाजुचे ओळखीचे फोटो, ट्रॉफिज बघताना आठवणींचे खूप कप्पे उघडंत होते.
"जिम्नॅशियम मधे नाचाची प्रॅक्टिस जोरदार सुरू आहे. बघायचीय?" मी लागलीच होकार दिला. तेव्हड्यात टेबलावरच्या पाकीटाकडे बाईंचं लक्ष गेलं.
"अरे रामा, विसरलेच." पाकीट उघडंत त्या म्हणाल्या.
"काय झालं बाई?"
"अगं पळंत जा आणि गजाभाऊंना ही पावती देऊन ये."
"गजाभाऊ? शाळेत?" त्यांना रिटायर होऊन बरीच वर्ष झाली होती.
"हो हो. फाटकापर्यंतच पोचले असतील बघ. जा पटकन."
मी पावती घेऊन देह आवरत धावत सुटले. गजाभाऊ कुणाकुणाशी बोलंत फाटाकापर्यंत पोचलेच होते.
"गजाभाऊ!!!!!! ओळखलंत?"
"कसा विसरेन विरजाई. केव्हड्या मोठ्या झाल्या पोरी!" माहेरचं जीवाभावाचं माणुस भेटल्याचा आनंद झाला. मी कुठे असते, काय करते ह्याची गजाभाऊंनी आवर्जून चौकशी केली.
"गजाभाऊ, घरी निघालात? थांबा ऑटोरिक्षा करून देते."
"नको पोरी, घाईत आहे. जावई येतात घ्यायला."
"मग त्यांच्याबरोबर आईकडे चला. तीथे बसून गप्पा करु." मी म्हणाले.
"वेळ असता तर आलो असतो. पण आता गाडीची वेळ झाली."
"कुठे परगावी निघालात?" शिव्या खाल्ल्या तरी 'कुठे जाता' विचारायची सवय सुटत नाही.
"ह्या गावचं दाणापाणी संपलं आपलं. तारा गेली. आता पोरी एकटं र्हाऊ देत नाहीत. म्हणून त्यांच्याकडे मुकाम. जावई न्यायला आले. काय करावं? जावंच लागतं. पोरी जीव टाकतात माझ्यावर. त्यांना दुकवून काय करू?" एव्हाना आम्हा दोघांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. मी नमस्काराला वाकले तशी मला उठवत गजाभाऊ म्हणाले,
"सुकात रहा. आता तुम्ही, ही शाळा कधी दिसेल माहित न्हाई." तेव्हड्यात त्यांचा जावई आला. मी रिक्षात बसायला त्यांना आधार देत म्हणाले,
"गजाभाऊ, चित्रेबाईंनी ही पावती दिलीय. विसरलेच होते."
"ह्याचं काही काम न्हाई." म्हणंत त्यांनी त्याचे चार तुकडे करून खिशात कोंबले. ओझरत्या नजरेनं मी बघीतलं, बर्याच मोठ्या रकमेची पावती होती. गजाभाऊंचा रिक्षा डोळ्याआड झाला.
मी परत चित्रेबाईंच्या खोलीत आले.
"अगं गजाभाऊंनी शाळेतल्या सावित्रीबाई फुले दत्तक्-पालक योजनेला देणगी दिलीय." चेक ड्रॉव्हरमधे घालत त्या म्हणाल्या.
***
गॅदरिंगच्या उद्घाटनाला अहवालवाचन झालं. शाळेसाठी आर्थिक मदत करणार्या दात्यांची नावं वाचल्या जाऊ लागली. नावं घेतलेली मंडळी जागेवर उभी राहिली. टाळ्यांचा गजर झाला..
"आणि अखेर एक महत्वाची देणगी, पंचवीसहजार रुपयांची! नाव जाहीर न करण्याची विनंती दात्यानं केलीय.."
मला पुढचं ऐकु येईनासं झालं! स्टेज अंधुक दिसायला लागलं...
शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय?
***************************************
मॄण्मयी, एव
मॄण्मयी,
एवढ्या कमी शब्दातलं एवढं भिडणारं व्यक्तीचित्रण मी फार क्वचितच वाचलंय. सगळ्यांच्याच शाळेत असे एखादे गजाकाका असतात, शिक्षण नाही पण माणुसकीच्या संस्था नक्कीच असतात असे गजाकाका
झकास
झकास व्यक्तीचित्रण, मृण. छान छान वाटलं वाचून.
खूप आवडले
खूप आवडले गजाकाका!!!
सुंदर
सुंदर व्यक्तीचित्रण..
शब्दांच्य
शब्दांच्या पलिकडले......
मृ, मस्तच
मृ, मस्तच जमलंय व्यक्तिचित्रण. खूप आवडले गजाभाऊ.
>>>शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय?
हेही आवडलं नी पटलं.
मृ. चांगले
मृ. चांगले लिहील आहेस, आवडले गजाभाऊ. डोळ्यासमोर एकदम एक प्रेमळ आजोबा उभे राहीले.
आमच्या
आमच्या शाळेत अशाच एक अनसूयाबाई होत्या. कधीच निवृत्त झाल्या, पण अजूनही दसर्याला, दिवाळीत त्यांच्या घरासमोर नमस्काराला येणार्यांची रांग असते..
मृण्मयी,
मृण्मयी, फार सुरेख लिहिलयस.. मस्तच एकदम..खुप आवडलं.
मृण्मयी
मृण्मयी गजाकाकांसारखे लोक आहेत म्हणून तर मजा आहे जगण्यात...
छान लिहीलंस.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
छान
छान लिहिलय!
शेवटच वाक्य महत्वाच!
पण ते समजण्याची दृष्टी मात्र अशा लेखातून मिळते!
हा लेख छापुन पोरीला वाचायला देणार!
(बायदिवे, मजकुर सिलेक्ट करुन सिलेक्टेड भागाचा प्रिन्ट घेता येतो, तो चान्गला येतो)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
सुरेख !!
सुरेख !! दानत आणि संस्कार... कोणाकडून शिकायला मिळतील याला काहीच बंधन नाही हे खरे. तसे बंधन नाही हे आपले नशीबच.
***
Has the LHC destroyed the world yet?
(If you are not satisfied, please check out the source code.)
सुरेख !!
सुरेख !!
खूपच
खूपच सुंदर. डोळ्यात पाणी कधी आल वाचताना कळालच नाही.
खूप सुंदर!
खूप सुंदर! डोळे पाणावले..
..प्रज्ञा
खुपच
खुपच सुंदर!
खूप सुंदर!
खूप सुंदर! डोळे पाणावले..
डोळ्यात पाणी कधी आल कळालच नाही......
तुम्हा
तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी
मस्त
मस्त लिहिलय मृण्मयी.
असे किती गजाभाऊ असतात नाही? आठवण आली आमच्या शाळेतल्यांचीपण.
आमच्या शाळेत कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांबरोबर शाळेतल्या गजाभाऊंचेही फोटो लागले आहेत.
आवडलं
आवडलं मृण्मयी.. सुरेख..
स्लार्टी, दानत बरेचदा ज्या माणसाकडून आपण अपेक्षा करत नाही त्याच्याकडून शिकायला मिळते.. आपली अपेक्षा हा आपला कंस्ट्रेन्ट असतो..
काय सुरेख
काय सुरेख लिहिलं आहेस गं मृण्मयी!
अगदी छान,
अगदी छान, मनापासुन आवडले. अशा माणसांतील देवांपासुन, आम्हाला हात नाही पण नख जरी घेता आले तरी खुप आहे...
मृ, सुरेख
मृ, सुरेख लिहिलं आहेस. गजाभाऊं अगदी डोळ्यांसमोर उभे राहिले इतके छान उतरवले आहेस.
खरंच खूपच
खरंच खूपच भावस्पर्शी आहे. शेवटचं वाक्य अतिशय पटलं!
अहा.. खूप
अहा.. खूप छान मृ.. आमचे रघूकाका आठवले आणि डोळापाणी आलं..
चांगल्या माणसांवरच जग चालतय हेच खरं!
पुन्हा
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!
आता एक विचारायचंय, मुख्य अश्या मायबोलीकरांना, ज्यांनी माझी आधीची ललीतं (व्यक्तिचित्रणं) वाचली आहेत. माझं लिखाण खूप साचेबंद वाटतं का? (आधीचे लेख आठवत असतील तर सांगा.) मला स्वत:ला वाचताना हे जाणवलं म्हणून विचारतेय. प्रामाणिकपणे सांगाल अशी आशा!
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी
मृ.... पाय
मृ.... पाय कुठे आहेत तुझे ? नमस्कार करायचाय !!
खूपच सुरेख लिहिलं आहेस.
>> हापडे
कस्सला पर्फेक्ट शब्द पकडलायस.
लेखातलं शेवटचं वाक्य तर खूप म्हणजे खूपच आवडलं.
फारच सुंदर
फारच सुंदर लिहिलं आहेस मृण्मयी......आवडलं...
मला तरी
मला तरी नाही वाटलं साचेबंद. जी व्यक्तिचित्रण वाचली होती ती सगळीच आवडली.
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म्म .... !!!!!!!!!!!!!!!
परागकण
Pages