ज्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, ज्यांच्या व्यंग्यचित्रांमुळं चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली, ते व्यंग्यचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीनं शिदंनी गेली पाच दशकं वाचकांना हसवलं आहे. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठं सजली. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली. शाळेच्या पाठ्यपुस्तकांतली त्यांची चित्रं बघत, त्या चित्रांच्या जोडीनं अभ्यास करत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या.
बेळगाव जिल्ह्यातलं भोज हे शिदंचं जन्मगाव असलं, तरी शिदं वाढले कोल्हापुरात. कोल्हापुरात चित्रकलेसाठी अतिशय पोषक असं वातावरण होतं. मंडईत, किंवा रंकाळ्याला वगैरे स्केचिंगसाठी मुलं जात असतात. शिदंही या मुलांमध्ये असत. चित्रकलेतली साक्षरता तपासणार्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षा शिदंनी दिल्या, तेव्हा आपल्यातही एक चित्रकार दडला आहे, हे त्यांना कळलं. कलाशिक्षणाची पंढरी असलेल्या जे. जे. कलामहाविद्यालयात मग त्यांनी प्रवेश घेतला.
अप्लाइड आर्टस् हा शिदंचा विषय. छंद म्हणून त्यांनी व्यंग्यचित्रं काढायला सुरुवात केली, आणि त्यांचं पहिलं व्यंग्यचित्र १९४६ साली 'मनोहर'मध्ये प्रसिद्ध झालं. ’हंस’ प्रकाशनाचे संस्थापक अनंत अंतरकरांनी त्या सुमारास ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’ अशी नवी मासिकं सुरू केली होती, आणि त्या निमित्तानं त्यांनी व्यंग्यचित्रांची एक स्पर्धाही जाहीर केली होती. शिदंनी या स्पर्धेसाठी आपलं चित्र पाठवलं, आणि अंतरकर शिदंच्या व्यंग्यचित्रांच्या प्रेमात पडले. त्यांनीच शिदंमधल्या व्यंग्यचित्रकाराला उत्तेजन दिलं. व्यंग्यचित्रांमुळे मिळणारा आनंद क्षणिक असतो, खरी कला पेंटिंगांमध्येच आहे, असा शिदंचा समज बदलला तो अंतरकरांमुळे. 'हंस', 'नवल', 'मोहिनी' अशा नियतकालिकांमधून शिदंची व्यंग्यचित्रं नियमितपणे वाचकांसमोर येऊ लागली, आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. पुढे १९५२ सालापासून सलग साठ वर्षं अंतरकरांच्या 'मोहिनी'च्या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शिदंनी केला. कमर्शियल आर्टिस्ट्स गिल्डनं (कॅग) आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनात शिदंचं १९५४ सालच्या 'मोहिनी'च्या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ निवडलं गेलं आणि त्यांच्या चित्रकलेच्या कौशल्यावर एक प्रतिष्ठेची मोहोर उमटली.
शिदंनी पुढे अनेक पुस्तकांसाठी, नियतकालिकांसाठी, वृत्तपत्रांसाठी चित्रं रेखाटली. शालेय पाठ्यपुस्तक मंडळानं गणिताच्या पुस्तकांमध्ये चित्रांचा समावेश असावा, असं ठरवलं, आणि या कामी शिदंची नेमणूक केली. गणितातल्या अमूर्त संकल्पना चित्रांद्वारे पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांसमोर मांडणं हे विलक्षण अवघड काम शिदंनी केलं, आणि चित्रांनी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या मनातली गणिताची भीती कमी केली.
'हसरी गॅलरी', 'चित्रहास', 'चिमुकली गॅलरी' या प्रदर्शनांद्वारे शिदंनी महाराष्ट्रातल्या गावोगावी चित्रकलेचे प्राथमिक धडे दिले. व्यंग्यचित्र म्हणजे काय, या कलेचं मर्मस्थान काय, हे शिदंनी महाराष्ट्राला शिकवलं. शिदंची चित्रं भारताबाहेरही लोकप्रिय झाली. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरली होती. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्सनं त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला.
शिदंचं चित्रकलेतलं योगदान जितकं अफाट, तितकंच मोठं काम त्यांनी चित्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केलं आहे. शिदंची चित्रं त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ लागल्यावर शिदंनी कायद्याचा अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की, जसे संगीतकाराला, लेखकाला आहेत, तसेच प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपिराइटचे, हक्क चित्रकारालाही आहेत. तुमची मुद्रित चित्रं तुमच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकत नाही, आणि चित्रं वापरायची असतील, तर ती त्या चित्रांचं मूल्य देऊनच वापरली पाहिजेत. तसं जर झालं नसेल, तर तुम्ही हरकत घेऊ शकता. शिदंनी मग ह्या चोर्या थांबवण्यासाठी कायद्याची मदत घेतली, आणि फुकट चित्रं वापरणं, किंवा परस्पर 'चित्रकलेचा प्रसार' करण्याचा मक्ता घेणं कमी झालं.
आपल्या समृद्ध आयुष्याचा हा पट शिदंनी 'रेषाटन' या आपल्या आत्मचरित्रात वाचकांसमोर मांडला आहे. शिदंनी या आत्मचरित्रात स्वतःच्या निर्मितीमागची प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दविरहित व्यंग्यचित्रांबद्दल भाष्य केलं आहे. अमूर्त शैली, आधुनिक चित्रकला, चित्र काढण्याची प्रक्रिया यांबद्दल शिदंनी हातचं राखून न ठेवता लिहिलं आहे. शिदं कमालीचे ऋजु आणि प्रांजळ आहेत. मात्र कामाच्या, वेळेच्या, व्यवहाराच्या बाबतीत हयगय केलेली त्यांना आवडत नाही. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांचा हा स्वभाव ठायीठायी दिसून येतो. हे आत्मचरित्र प्रामाणिक आहे, तटस्थ आहे, पण अतिशय तरुणही आहे. शिवाय जोडीला जागोजागी शिदंची सदाबहार, निर्मळ व्यंग्यचित्रं आहेत.
शिदंचं आत्मचरित्र प्रसिद्ध होणं ही चित्रकलेच्या दृष्टीनं फार महत्त्वाची घटना आहे. 'रेषाटन' हा माझ्या आठवणींचा प्रवास आहे; होडीतून. ज्या नदीतून तो होतोय त्या नदीचा प्रवाह माझ्या ब्रशच्या रेषेवरून जातोय....', असं शिदं म्हणतात तेव्हाच या आत्मचरित्राचं मोठेपण आणि वेगळेपण ध्यानात येतं.
ज्योत्स्ना प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'रेषाटन - आठवणींचा प्रवास' या थोर चित्रकार श्री. शि. द. फडणीस यांच्या आत्मचरित्रातलं हे पहिलं प्रकरण.
भोज हे बेळगाव जिल्ह्यातलं एक खेडेगाव, माझं जन्मगाव. गाव सोडून अनेक वर्षं झाली होती, पण तिथे जायची अवचित संधी आली. निमित्त काय झालं तर कोल्हापुरात १९८१मध्ये माझं ‘हसरी गॅलरी’ हे चित्रप्रदर्शन झालं. त्याला जोडूनच, हे प्रदर्शन निपाणीस ठरलं. संयोजक होते कुमार कोठडिया. प्रदर्शनाच्या त्या मुक्कामात मी सहज बोललो की, निपाणीजवळच माझं भोज हे जन्मगाव आहे, जाता येईल का? त्यावर कोठडियांचं उत्साही उत्तर, ‘‘जरूर! मी व्यवस्था करतो.’’ दुसरे दिवशीच त्यांचे सहकारी शिक्षक-मित्र जोशी सर मोटरसायकल घेऊन हजर. मी पाठीमागे बसलो. भोजचा प्रवास सुरू झाला. गाडी पुढे चालली होती. वेडीवाकडी वळणं, घरं, झाडी, मागे पडली....
मनातला प्रवास उलटा. भूतकाळातला. रिव्हर्समधला....
मारुतीचं देऊळ, शेजारचं मान्यांचं घर आणि काही खुणा पुसट. दारातून आत उजवीकडे शेड. तिथे आमची जनावरं असत. दोन म्हशी, एक बैल, एक गाय. एक घोडंही होतं, असं आमची ताई सांगत असे. अंगण ओलांडलं की मोठा सोपा. त्यातला निम्मा भाग नेहमी तंबाखूने भरलेला असायचा.
मी तीनचार वर्षांचा असतानाच माझे वडील गेले. त्यांना आम्ही तात्या म्हणत असू. त्यांचा एक जुना अस्पष्ट फोटो आहे. त्यांच्या आठवणीही तशाच धूसर. आमचं एकत्र कुटुंब, चौदापंधरा माणसांचं. त्यामुळे या सर्व कुटुंबाची जबाबदारी काकांवर पडली. त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो. अखेरपर्यंत तेच आम्हां सर्वांना वडलांच्या ठिकाणी. ही सारी माहिती मोठी बहीण ताई, आमचा आतेभाऊ गणपूदादा आणि मोठा भाऊ यांच्याकडून ऐकलेली. माहितीचे हे सारे तुकडे जुळवत जुनी चित्रं पूर्ण करायचा मला मोह होतोय....
माझ्या रांगत्या वयातली एक आठवण. ताईनेच सांगितलेली, त्यामुळे मानायलाच हवी. घरात कोणत्यातरी समारंभाची तयारी चालू होती. त्यासाठी तुपाचा एक मोठा गुंडा तयार ठेवला होता. अरे, अरे, म्हणेतो मी तो चक्क लवंडला. सारं तूप जमिनीवर. आता मला उमजतं, आजपावेतो आपल्या देहाला बाळसं का लाभलं नाही याचं रहस्य!
त्या वेळी उस्मान नावाचा नोकर आमच्या घरी होता. शेतीकामाबरोबरच आम्हा मुलांना दिवाळीचं दारूकाम, बेंदूर सण अशा गोष्टी दाखवण्याचं काम त्याचंच. गायीम्हशींचं दूध काढणं, ते घरात आणून देणं यासाठी त्याचा सर्वत्र सहज वावर होता. घरच्या धर्मनिष्ठा व सोवळं यामध्ये हे कसं बसत होतं? त्या वेळच्या ‘केसरी’ इत्यादी वृत्तपत्रांतून काही एक सामाजिक दृष्टिकोन पोचला असावा.
अधूनमधून अंगणात वासरू असायचं. वासराचं ते दिशाहीन हुंदडणं व त्यामागे धावणं याची मौज वेगळीच. एकदा एक वासरू आजारी पडलं. अण्णांनी त्याला गोठ्यातून घरात उचलून आणलं. माजघरात आपल्या गादीशेजारीच त्याच्यासाठी दुसरी गादी टाकली. त्यावर त्याला ते झोपवत असत. मात्र ते जगलं नाही.
आमच्या परसदारी एक विहीर होती. ती केवळ आमची नसायची. दिवसभर ती सार्वजनिक असायची....
परसातच एक खोपट बांधलेलं. बेंदूर सणाचे वेळी, ज्याला आपण बैलपोळा म्हणतो त्या वेळी, दिवसभर मी मातीचे बैल, जोंधळ्यांच्या धाटांची बैलगाडी अशा वस्तू बनवण्यात घालवत असे. मातीच्या आकाराशी खेळणं म्हणजे काय याचा पहिला अनुभव तिथे घेतला. शिल्पकलेचा तो पहिला स्पर्श होता.
सोप्यावर देशभक्तांचे फोटो लावलेले - लोकमान्य टिळक, नेहरू, लाला लजपतराय, रामकृष्ण परमहंस असे काही....
घरी काँग्रेशी विचारांचा, स्वदेशीचा प्रभाव होता. चरखा व सूतकताईची टकळी होती. वडील काँग्रेस अधिवेशनाला जायचे. आठवड्यातून दोनदा ‘केसरी’ यायचा. घोटीव कागदावर छपाई असलेले ‘चित्रमय जगत’चे अंक येत. भरपूर फोटो व चित्रं चाळत माझा वेळ उत्तम जात असे. वय निरक्षर, त्यामुळे चित्रंच तेवढी कळायची. चहा व परदेशी वस्तू निषिद्ध. त्यामुळे ‘चहा झालाय रे!’ अशी हाक आतून येणं अशक्य. फटाकेही परदेशी. ते त्या वेळी चीनमधून यायचे. तेही घरात यायचे नाहीत. आवाज ऐकायला बंदी नसल्यामुळे आम्हांला ते भरपूर ऐकायला मिळायचे, फक्त दिवाळीत, मात्र इतरांचे.
त्या वेळी आमचं घर होतं, थोडी शेतीही होती. वडील कोन्नूरला शिक्षक. कापडाचं दुकानही काही दिवस होतं. थोडक्यात प्रपंचाचा भार अनेक मार्गांनी सुकर करण्याची त्या वेळची ती गरज होती.
आम्ही शांडिल्यगोत्री जोशी. कोकणातून आलेले. आमच्या पणजोबांना, चिमणाजीपंत जोशी यांना, तासगाव संस्थानच्या पटवर्धनांनी फडणिशी दिली. त्या पेशामुळे जोश्यांचे फडणीस झालो.
फडणीस परिवारात फारशी माहीत नसलेली एक घटना. गणपूदादाने, आमच्या आतेभावाने, सांगितलेली. तो बालपणापासून आमच्या भोजच्या घरी राहिलेला. वयाने सर्वांत मोठा. आमच्या जमिनीपैकी महत्त्वाचं शेत आमच्या हातातून जाणार असं संकटच उभं राहिलं. कोणा मराठे नावाच्या गृहस्थाने ते शेत आम्हांला बक्षीसपत्राद्वारे दिलं होतं, त्यांच्याच वारसदारांनी आमच्यावर दावा लावला. मुद्दा कोणता, तर हे बक्षीसपत्र खोटं आहे, बनावट आहे. कारण ज्यांनी ते लिहून दिलंय ते साक्षर नव्हते. त्यांना लिहिता येत नव्हतं. सबब ते बक्षीसपत्र रद्द करून जमिनीचा ताबा मिळावा इत्यादी. कोर्टात त्यांचा दावा मान्य झाल्यासारखाच होता. त्यावर एकच उपाय होता की ज्यांनी ते बक्षीसपत्र लिहिलं, त्या मराठे नावाच्या गृहस्थांचं हस्ताक्षर स्वाक्षरीसह कोर्टात सादर करणं. इतक्या वर्षांनंतर असं हस्ताक्षर सापडणं कठीणच. दिवसरात्र कागद धुंडाळणं चालू होतं. आणि अचानक एक जुनं पोस्टकार्ड हाती आलं, मराठ्यांच्या हस्ताक्षराचं! तरीही सर्वांची उमेद त्या वेळी खचली होती. सर्व कुटुंब चिंतेत, घरात दुर्घटना घडल्याप्रमाणे सारे गप्प... निराश... अंधार! अण्णांचे पाटील नावाचे जवळचे मित्र त्या वेळी तिथे होते. ते म्हणाले, ‘‘जे पोस्टकार्ड मिळालंय ते घेऊन मी चिक्कोडी कोर्टात जातो. बघतो नशीब. तुम्ही गप्प बसा.’’ त्याप्रमाणे पाटील गेले. दुसरे दिवशी घोड्यावरून ते दौडतच आमच्या घरी आले व ओरडले, ‘‘अण्णा, आपलं शेत सुटलं! निकाल आपल्या बाजूने लागलाय. तुम्ही जे पोस्टकार्ड दिलं होतं त्यावरचं हस्ताक्षर आणि बक्षीसपत्र देणार्याची सही अन् हस्ताक्षर जुळतंय. तो माणूस साक्षर होता हे सिद्ध झालंय.’’ पोस्टाचा शिक्का असलेलं ते कार्ड कोर्टाने महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून मान्य केलं. त्या वेळच्या एक पैशाचं मूल्य असलेलं ते कार्ड. त्याने काही एकर जमीन आम्हांला परत मिळवून दिली! वादळ ओसरून गेलं. अंधार संपला. त्या एका कार्डाची किमया विलक्षण होती.
आमच्या एकत्र कुटुंबात आम्ही पाच भाऊ, चार बहिणी, माझे चुलते, चुलती, माझी आई (काकू), आजी, आत्या. आले-गेले पाहुणे वेगळेच. चुलते अण्णा हे कुटुंबप्रमुख. स्वभावाने थोडे कठोर, स्पष्ट बोलणारे. थोडक्यात दराराच म्हणा ना! पण कृतीमध्ये ते विलक्षण हळवे, प्रेमळ. त्यांनीच आमच्या एकत्र कुटुंबाला अखेरपर्यंत एक आधार दिला. कुटुंब म्हणून अर्थही दिला. चुलत, सख्खा, लाडका, दोडका अशा भेद दर्शवणार्या रेषाही त्यांनी केव्हाच पुसून टाकल्या होत्या.
शिक्षणासाठी क्रमाक्रमाने आमची, भावंडांची व्यवस्था त्यांनी कोल्हापुरास केली. मधूनमधून सुट्टीच्या दिवसांत आम्ही भोजेला जात असू. त्यासाठी सवारीची बैलगाडी खास कोल्हापूरला यायची. अंतर वीस मैल, पण प्रवास पूर्ण दिवस व्हायचा.
आता आठवतं ते आमचं कोल्हापूरचं मोघ्यांच्या वाड्यातील बिर्हाड. इथेच वसंत सरवटेशी माझी प्रथम ओळख झाली. हास्यचित्रांचा समान छंद व सहवास आजही आम्हांला आनंद देतोय. त्या वेळी हस्तलिखित मासिकांत आम्ही दोघांनी चित्रसजावट केली होती.
कुणाच्यातरी सोबतीने आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश झाला. अनेक हरहुन्नरी उपक्रमांत मी झोकून देत असे. मनात येईल ते व दिसेल ते करून पाहायचा छंद व्यसनाप्रमाणे आजही बाळगून आहे. शिवजयंती उत्सव, त्यासाठी शिवाजीचा पुतळा केला. शिवाजी, हनुमान यांची अनेक रेखाटने, दिसेल त्या कागदावर, भिंतीवर झाली. ‘पेंटर शिवराम’ ही सही ठोकायलाही मी विसरत नसे. मुळात कोल्हापुरात चित्रकलेचं वातावरण होतंच, मी वाचनालयसुद्धा काढलं. त्या वेळी संगीत मेळ्यांचं प्रस्थ खूप होतं. आम्हीही मेळा काढला. कोल्हापुरात तालमीचं वेड होतंच, माझ्या आताच्या देहयष्टीवरून (यष्टीच खरी!) विश्वास बसणार नाही. अनेक दिवस मी तालमीत कुस्तीला जायचो. नको तो पराक्रमही केला. कुस्ती करताना एका भिडूचा (माझ्याकडून डाव करताना) हात मोडला, तेव्हा हादरलोच. अखेर वर्गणी काढून आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावर उपचार केले व प्रकरण निस्तरलं. याबाबत कुणीही कुठेही वाच्यता केली नाही.
लहानपणी आपण सायकल कशी शिकलो, पोहायला कसं शिकलो हे आता आठवत नाही. पोहायचे सर्व प्रकार मी अनुभवले. कोल्हापूरचा रंकाळा तलाव, कोटीतीर्थ, नदी, विहीर. प्रत्येक पाण्याचा अनुभव वेगळा. मोठ्या शहरातले स्विमिंग टँकही नंतर अनुभवले.
पाण्यातल्या प्रवासाची एक वेगळी झलक मी अनुभवली, पंचगंगा नदी ते प्रयाग. प्रयाग हे जवळच असलेलं यात्रेचं ठिकाण. तिथे होडी वल्हवत जायचं, असं आम्ही पाच जणांनी योजलं. मी, बाबा गंभीर, आठल्ये, मुठे व अग्निहोत्री असे आम्ही पाच. निघायचं ठिकाण, कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट. रात्री दहा वाजता निघायचं. चांदण्या रात्री होडीने प्रवास अशी ही रम्य कल्पना. चौघांनी वल्हं धरायचं. एक जण सुकाणूवर. रात्री बारा वाजेतो आम्ही नदीतून चाललो पण चांदण्याचा पत्ता नाही. सर्वत्र अंधार. काळेशार पाणी. अंदाजाने पुढे चाललो. आमचं अज्ञान लक्षात आलं, ती रात्र चांदण्याची नव्हती, अमावस्या असावी. प्रयाग आलं. होडी किनार्याला लावली. दोरीने एका खडकाला बांधली. नदी किनार्यालगतच वर चढलं की मंदिर. तिथे देवदर्शन केलं. सहज खाली किनार्याकडे पाहिलं तर आमची होडी गायब. प्रकाश अंधुक असला तरी एवढं दिसलं. खाली किनार्यावर आलो. होडी पलीकडच्या किनार्याला लागलेली. ती परत आणायलाच हवी. पोहायला येणार्यांपैकी मी व अग्निहोत्री. दोघांनी पाण्यात सूर मारला. शिकस्तीने ती खेचून आणली. पुन्हा पक्की बांधली. प्रवाहामुळे ती सुटली असावी असं वाटलं व पुन्हा वर मंदिरात आलो. खाणं, विश्रांती झाल्यावर परतण्याची वेळ झाली. किनार्यावर आलो. पाहतो तो पुन्हा होडी गायब! पुन्हा पहिल्याप्रमाणे पोहत जाऊन होडी खेचून आणली. होडी कोण सोडतंय आणि का, हे गूढ अखेरपर्यंत कळलं नाही. परतीचा प्रवास सुरू झाला. चंद्रदर्शन तर झालं नाहीच मात्र कोल्हापूरला पोचलो त्या वेळी सूर्योदय झाला होता.
वेगळ्या जातीचे अनुभव कायम स्मरणात राहतात. एका सुट्टीत मी जवळच्या एका खेडेगावात, सिधनेर्लीला, गेलो होतो. माझ्या आतेभावाचे घरी. त्यांचा मुलगा रघुनाथ व मी शेतातून चाललो होतो. तो पुढे व मी बराच मागे. झाडावर आंबे दिसतात का, हे वर पाहत चाललो होतो. अचानक पायाजवळच्या गवतात एक सळसळ ऐकली. पाठोपाठ एक फुत्कार. मी मागे वळून पाहिलं तर आपला फणा काढून साक्षात एक नागराज! रोखून पाहणारे ते डोळे फक्त दोन फुटांवर. त्याक्षणी अर्थशून्य आवाजात मी हाक मारली. त्या आवाजालाच लोक ‘बोबडी वळणं’ असं म्हणत असावेत.
त्या वेळचं कोल्हापुरातलं वातावरण चित्रकलेची उमेद वाढवणारं. कलामहर्षी बाबुराव पेंटर, बाबा गजबर, गणपतराव वडणगेकर यांची चित्रं पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. डॉ.काटे यांच्या स्वागत कक्षात आबालाल रहिमान व अन्य कलावंतांची मूळ चित्रं लावलेली असायची. ती पाहताना वाटायचं आपण चित्रकार व्हायचं. एकदा कोल्हापूरच्या खासबागेत सर्कस आली होती. सर्कस मालकाचा तो रुबाब पाहिल्यावर वाटलं मोठं झाल्यावर आपण सर्कस काढायची. एका अर्थी हे स्वप्न मात्र खरं ठरलं. पाच क्विंटल सामानासह 'हसरी गॅलरी' हे चित्रप्रदर्शन (चित्रांत अनेक प्राणी होतेच!) मी अनेक शहरी नेलं. तो अनुभव एका सर्कशीचाच होता.
चित्रं दाखवणारी अद्भुत पेटी डोकीवर घेऊन फिरणारा कलाकार आठवतो का? हा फिरस्ता कलाकार जत्रेत किंवा गल्लीत त्या काळी दिसे. मुंबई, दिल्ली, आग्रा, लंडन इथली प्रेक्षणीय पण सरकती चित्रं त्यात दिसायची. ‘बंबई देखो -- एक पैशात’ या चालीवर झांजा वाजवत तो हा शो करायचा. पेटीला चार-पाच तोंडं. त्या तोंडाला डोळे भिडवून चित्रं पाहायची. हा ‘बंबई देखो’चा बायोस्कोप माझ्याही डोक्यात शिरला. एक पेटी मिळवली. चष्म्याची जुनी लेन्स मिळाली. अनेक चित्रांची लांब फीत रिळावरून फिरायची सोय केली. बाल रसिकांना हा ‘शो’ अर्थातच मी विनामूल्य दाखवला.
पोलीस ऑफिसर व्हायचंसुद्धा मनाने घेतलं. पण त्यासाठी हातात चंदेरी गोळा असलेली छडी प्रथम हवी. ही रुबाबदार छडी बनवण्यासाठी मी एक छडी मिळवली. लोखंडी पळीमध्ये शिसं टाकून ते शेगडीवर वितळवलं. वितळलेलं ते शिसं छडीच्या टोकावर ओतलं खरं, पण ते तिथे न बसता माझ्या पायावर पडलं. पाय भाजून आगडोंब. जोरात ओरडलो. पण ते ऐकायला तिथे कुणीच नव्हतं. ऑफिसर व्हायचं स्वप्न शिशाप्रमाणेच वितळून गेलं. पायावरचा व्रण मात्र अनेक वर्षं जन्मखुणेसारखा होता.
गणेशोत्सवात कोल्हापूरला मी कधी कधी नकला केल्याचं आठवतं. त्यानंतर अनेक वर्षांनी मी नक्कल सादर केली. मुंबईला जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधल्या शेवटच्या वर्षी प्रथेप्रमाणे आर्ट स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना निरोपसमारंभ होता. त्या वर्षी तो सहलीच्या स्वरूपात होता. मुंबईजवळच नोव्हा या एका खासगी बेटावर आमची सहल होती. तिथे प्राध्यापक व विद्यार्थी मित्रांसमोर ही नक्कल मी इंग्रजीतून सादर केली. पुढे माझ्यातला हा नकलाकार मी विसरलो पण हास्यचित्रांच्या रूपात तो मला पुन:पुन्हा भेटत राहिला.
हत्तीशी झुंज खेळण्यासाठी जुन्या काळी बांधलेलं साठमारीचं एक मैदान कोल्हापूरला होतं. १९३५-३६ साल असावं. त्या मैदानात आम्ही अनेक जण खेळायला जात असू. मैदानात अनेक बुरूज व भोवताली दगडी तटबंदी. काही ठिकाणी दोनतीन फुटांचं अंतर सोडून दुसरी समांतर भिंत. या जागेत बाहेर आलेले मोठाले खिळे, अशी विलक्षण रचना. भिंतीवरून धावताना उडी मारून पलीकडच्या भिंतीवर जाणं हे अनेकांचं धाडस असायचं. पाठशिवणीच्या खेळात हेच धाडस माझ्या भावाने, नानाने केलं. अंदाज चुकला व तो खाली कोसळला. त्याच वेळी ते मोठाले खिळे त्याच्या मांडीत घुसले! अपघात विचित्र आणि भयंकर होता. हॉस्पिटल, उपचार अनेक दिवस चालले. अण्णांना भेटायला येणारे अनेकजण एक साचेबंद प्रश्न विचारायचे, ‘‘नाना असा कसा पडला?’’ त्याचं उत्तरही सोपं नव्हतं. माझ्या चित्रकलेच्या अल्प ज्ञानावर मी एक चित्रमाला तयार केली होती. हा अपघाताचा प्रसंग मी तीन-चार चित्रांच्या मालिकेतून रेखाटला होता. अण्णांना हे चित्र भलतंच सोयीचं वाटलं. हा विषय निघाला की अण्णा म्हणायचे, ‘‘थांबा, शिवरामने चित्रच काढलंय ते दाखवतो.’’ अनुभवाशी साक्षात भिडणारी ही चित्रमाला त्या वयात माझ्यासाठी एक धडा होती.
चित्रकलेतील साक्षरता घडण्यासाठी आजच्या प्रमाणेच एलिमेंटरी व इंटरमीजिएट ड्रॉइंग ग्रेडच्या परीक्षा त्या वेळी होत्या. मी व वसंत (सरवटे) दोघांनी त्या परीक्षा दिल्या. शिंदेमास्तर नावाचे चित्रकलेचे एक शिक्षक आम्हांला लाभले. क्लासचा प्रवेश, फी असा काहीही प्रकार त्या वेळी नव्हता. ते अतिशय प्रेमाने शिकवत असत. एलिमेंटरी पूर्ण झाली. इंटरमीजिएटचा अभ्यास मी खरोखरी गांभीर्याने केलाच नाही. ते वर्ष वाया गेलं. यामुळे वेगळीच जिद्द संचारली. भरपूर सराव करून मी पुन्हा परीक्षा दिली.
निकाल मला अनपेक्षित होता. राज्यस्तरावर मला तीन विषयांत बक्षिसं मिळाली. शिंदेमास्तरांना घरी बोलावलं. कौतुकाने त्यांनी मला अल्पशी भेट व पेढे दिले. कालांतराने सरकारी पद्धतीनुसार एका पिवळसर कागदावर त्या तीन बक्षिसांबाबतचं अधिकृत पत्र मला पोस्टाने आलं. पत्रानुसार कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलच्या कचेरीत ती बक्षिसं मला मिळणार होती. तिथे पोचलो. कचेरीच्या अर्धवर्तुळी खिडकीतून ते पत्र आत सारलं. खिडकीपलीकडील माणसाने ते पत्र घेतलं व तो फाइली चाळू लागला. मी बाहेर उभा. बक्षिसांच्या तंद्रीत. क्षणभर भास झाला की बक्षीस समारंभ चालू आहे. स्टेजवर माझं नाव पुकारलं आहे. टाळ्यांचा कडकडाट... लख्ख प्रकाशझोत... इतक्यात समोरच्या खिडकीतून पुकारा, ‘‘शिवराम दत्तात्रेय फडणीस तुम्हीच का? इथे सही करा.’’ तात्काळ जाग आली. समोरच्या कागदावर सही केली. तीन बक्षिसांचे एकूण अठरा रुपये मोजून घेतले. झाला बक्षीस समारंभ. मी घरी आलो.
रेषाटन - आठवणींचा प्रवास
शि. द. फडणीस
ज्योत्स्ना प्रकाशन
किंमत - रुपये २५० फक्त
पृष्ठसंख्या - १९५
***
चित्रांचे हक्क - शि. द. फडणीस यांच्याकडे सुरक्षित.
रूमाल !! ... पुन्हा येवून
रूमाल !! ... पुन्हा येवून लेख निवांत वाचेन !!
मस्त लेख ! नक्की
मस्त लेख ! नक्की वाचणार.
पुलंच्या पूर्वरंग आणि अपूर्वाइतली रेखाटन पण फडणीसांचीच आहेत ना ?
अगदी अगदी लले. पु लं नी केलेल्या वर्णनाला पर्फेक्ट म्याच!
सुंदर. शिदंची चित्रं मला
सुंदर.
शिदंची चित्रं मला प्रचंड आवडतात; साधी, सोपी, माझ्यासारख्या चित्रकलेतल्या औरंगजेबालाही लगेच समजणारी.
अपूर्वाई, पूर्वरंग या पुस्तकांमधली त्यांची चित्रं पाहणे, आणि मग त्या चित्रांना अनुषंगिक असलेला मजकूर आसपासच्या पानांवर शोधणे, मजकुरातले शब्द त्यांच्या चित्रांत किती चपखल उभे राहिलेत त्याची पुनःपुन्हा प्रचिती घेणे हे माझं अत्यंत आवडतं काम असायचं.
त्या पुस्तकांचं हे असं 'उलटं वाचन' मला आजही करायला आवडतं.
'अपूर्वाई', 'पूर्वरंग' या
'अपूर्वाई', 'पूर्वरंग' या पुस्तकांमधली चित्रं शिदंनी पुलंशी अजिबात चर्चा न करता काढली आहेत. पुलं परदेशातून लेख पाठवायचे, आणि शिदं तो मजकूर वाचून चित्र काढत. हे लेख त्यावेळी 'किर्लोस्कर' आणि 'मनोहर'मध्ये प्रकाशित होत असत. हे लेख एकत्र करून पुस्तक काढायचं ठरलं, तेव्हा पुलंनी मजकुरात पुस्तकाच्या दृष्टीनं फेरफार केले, संपादन केलं. पण शिदंची चित्रं जशीच्या तशी वापरली गेली.
शाळेत असताना मोहीनीतील
शाळेत असताना मोहीनीतील त्यांची व्यंगचित्र खुप आवडायची.. त्यातील मांजर तर अगदी Favourite..
व्वा... शिदंची चित्र म्हणजे
व्वा... शिदंची चित्र म्हणजे बालभारती गणिताचं पुस्तक आठवतं! मजेदार असायची.
शिदंनी व्यंगचित्रांची स्वतःची
शिदंनी व्यंगचित्रांची स्वतःची व अस्सल मराठी शैली निर्माण केली व ती सहजसुंदर, बोलकी व अशयपूर्णही आहे. माझे आवडते व्यंगचित्रकार.
मस्त! अपूर्वाई आणि पूर्वरंग
मस्त!
अपूर्वाई आणि पूर्वरंग ही पुस्तकं तर शिदंच्या चित्राशिवाय आठवतच नाहीत, विशेषतः त्यांचा तो 'पिकासा गनेसा' तर अप्रतिम!
मस्त!!
मस्त!!
सुंदर लेख आहे.
सुंदर लेख आहे.
लली +१
लली +१
मस्त. मी पण त्यांची फॅन आहे.
मस्त. मी पण त्यांची फॅन आहे. हसरी गॅलरी माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. त्यांच्या याच पुस्तकातला काही भाग 'अंतर्नाद'मध्येही वाचला. पुस्तक नक्की वाचणार.
अत्यंत आवडते व्यंगचित्रकार,
अत्यंत आवडते व्यंगचित्रकार, अगदी गोड (क्यूट) अशी चित्रे असायची ती. आणि त्यामागच्या कल्पना तर
भन्नाटच असायच्या.
(प्रभाकर झळके, ग.ल.ठोकळ पण असेच आवडते )
शिदं ची चित्र वेगळ्याच
शिदं ची चित्र वेगळ्याच शैलीची, विशेषतः पहिल्यांदा कळत्या वयात हातात पेन्सिल धरून काय काढून बघावं असं मनात आल्यावर अपूर्वाई च आठवलं आणि त्यातली शिदं ची चित्र बघून ती तशीच्या तशी काढता आल्याने आपल्याही चित्रकला येते याचं समाधान देणारी
मस्तच
अतिशय सुंदर लेख. हरवुन गेलो.
अतिशय सुंदर लेख.
हरवुन गेलो. फार मजा आली.
आभार चिनूक्स.
प्रभाकर झळके, ग.ल.ठोकळ पण
प्रभाकर झळके, ग.ल.ठोकळ पण असेच आवडते >> होय दिनेश दा, अनेक दिवाळी अंक या नावांच्या विना सुने सुने वाटले असते. शि द फडणीसांची आयबीएन लोकमत वर ग्रेट भेट मधली मुलाखत छान होती.
मस्त लेख !
मस्त लेख !
रांगड्या कां होईना पण
रांगड्या कां होईना पण त्यांच्याच भाषेत शिदंना मनःपूर्वक सलाम ठोकावा असं त्यांच्या एका माबोकर चाहत्याला वाटणं स्वाभाविक आहे , नाही का ? -
सुंदर लेख शिदंच्या चित्रांची
सुंदर लेख
शिदंच्या चित्रांची खासीयत काही औरच...
वाचायलाच हवे.....
मस्तच.फडणीसांची चित्रं मलाही
मस्तच.फडणीसांची चित्रं मलाही खूप आवडतात. नुसत्या चित्रावरून पूर्ण घटना कळते.
ह्यात मोघे वाड्याच उल्लेख
ह्यात मोघे वाड्याच उल्लेख वाचला आणि भरुन आले. मोघे म्हणजे माझं आजोळ. खूप आठवणी आहेत त्या वाड्याच्या. परिस्थितीने वाडा विकाय्ला भाग पाडले, पण माझे मामा, आई, मावशी अजुनही त्या वाड्याच्या आठवणिने हळहळतात.
ह्यात ज्या वसंत सरवटेंचा उल्लेख आहे, ते माझ्या आईचे सख्खे आत्येभाऊ. ते ही ह्या वाड्यातच लहानाचे मोठे झाले.
आज वाडा तिथे नाही, जैन मंदिराने विकत घेतला. पण महाद्वार रोडवरुन जाताना हमखास वाड्याची आठवण येतेच.
भाऊ
भाऊ
आभार चिनुक्स. शिदं आणि वसंत
आभार चिनुक्स.
शिदं आणि वसंत सरवटे यांची चित्रे आवडतातच.
अप्रतिम नॉस्टॅल्जिक करणारा
अप्रतिम नॉस्टॅल्जिक करणारा लेख. शि द -द ग्रेटच!!
चिनूक्स - अप्रतिम!!
चिनूक्स ~ ज्या कलावंताच्या
चिनूक्स ~
ज्या कलावंताच्या कुंचल्यातून उमटलेली ती जादुभरी चित्रे पाहात पाहात आमचे हायस्कूल आणि कॉलेजचे दिवस फुलत गेले त्या श्री.शि.द.फडणीस यांच्याविषयी तुम्ही केलेले भरभरून लिखाण आणि तीवर येत असलेले उत्साहदर्शक प्रतिसाद वाचून एक करवीरकर या नात्याने मला काही जादाचाच आनंद होत आहे.
कोल्हापूरात वेळोवेळी मी आणि माझे मित्र शि.दं.ना (त्यांच्या पत्नी सुप्रसिद्ध लेखिका शकुंतला फडणीस ह्यादेखील तशा भेटीप्रसंगी असायच्या) 'हसरी गॅलरी' प्रसंगी भेटत असू. खूप प्रतिसाद मिळाला होता फडणीसांच्या त्या विलक्षण कल्पनेला. 'कार्टून्सचे प्रदर्शन' ही कल्पनाच अनोखी. देवल क्लब आणि लक्ष्मीपुरी येथील हॉलच्या प्रवेशद्वारातच रायटिंग पॅडला एक शुभ्र कागद असायचा आणि त्यावर एक भला मोठा उंदीर शि.दं.नी चितारलेला....तोच स्वागत करायचा. पण या उंदराच्या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चित्रातील शेपूट खर्याखुर्या चिमट्याने (त्या पॅडच्या) पकडून ठेवलेली. ही कल्पना भन्नाटच....तर आत गवळी दूध घालायला आला आहे (पूर्वी कोल्हापूरात हीच पद्धत होती) आणि मालकीणबाई गादीवर सुस्त आहेत, पण दूधाचे भांडे घेऊन कुणीतरी त्या गवळ्याजवळ आले आहे... कोण ? तर मालकीणबाईंचा बोका. त्यावेळी त्या गवळ्याचा चेहर्यावरील विस्मयजनक भाव आजही चांगलेच स्मरणात आहेत.
चिनूक्स यानी नामवंत लेखकांचा या निमित्ताने उल्लेख केलेलाच आहे. विशेषतः 'अपूर्वाई' आणि 'पूर्वरंग' मधील मजकुरांना शि.द.फडणीस यांच्या चित्रांनी जी साथ दिली ती केवळ अप्रतिम.....जी वसंतरावांनी पुढे ठणठणपाळ याना दिली.
मराठीत अनेक व्यंगचित्रकार होते आहेत, पण कार्टून्सना 'रंग' देण्याचे कामे शि.द.फडणीस यानीच केले (इंग्रजीत जसे मिरांडाने करून दाखविले).
अशोक पाटील
अप्रतिम. सगळी पु.लं. ची
अप्रतिम. सगळी पु.लं. ची पुस्तके आठवली. आणि शाळेतली गणिताची सुद्धा.
अतिशय सुंदर लेख
अतिशय सुंदर लेख
अप्रतिम! लिहिताना, उपमालंकार
अप्रतिम! लिहिताना, उपमालंकार वापरतानाही शिदंचं रेषांशी असलेलं गाढ नातं जागोजागी दिसतं. 'चुलत, सख्खा, लाडका, दोडका अशा भेद दर्शवणार्या रेषाही त्यांनी केव्हाच पुसून टाकल्या होत्या..' हे एक गोड उदाहरण.
(चिन्मयसोबतच) एकदा शिदंना भेटलो तेव्हा या माणसाची चित्रं बघत आपण लहानाचे मोठे झालो ही जाणीव झाली, आणि काहीतरी भरून येऊन दाटून येऊन हात आपसूक त्यांच्या पायाशी गेले. या भेटीत त्यांची बोलण्याची पद्धत, ऋजु स्वभाव, लहानखुरी हसरी मूर्ती- हे सारं नंतर कितीतरी दिवस मनात घर करून बसलं होतं. भारल्यागतच त्यादिवशी तिथून बाहेर पडायला झालं. गणिताच्या पुस्तकांपासून ते कळत नव्हतं तेव्हापासून बघण्यात आलेल्या दिवाळी अंकांतल्या शिदंच्या लाखो चित्रांनी मनात जे एक भावविश्व तयार केलं- त्याची जागा आजतागायत इतर कशाने घेतली नाही.
माहेरच्या (२०११) दिवाळी अंकात शिदंची अत्यंत सुंदर मुलाखत आहे. जरूर, आवर्जून वाचावी अशी. आता 'रेषाटन'ही घेणारच नक्की. धन्यवाद चिन्मय.
मस्त हो भाऊ हा लेख वाचल्यावर
मस्त हो भाऊ
हा लेख वाचल्यावर पुन्हा एकदा अपूर्वाई उघडले गेले, पहिल्याच प्रकरणात शिदंनी केवळ चेहरा आणि शरीराच्या जागी बूट, टाय, कोट वापरुन पुलंचं जे चित्र काढलेय ते अफलातून आहे!
वॉव. पुस्तक नक्की
वॉव. पुस्तक नक्की घेणार.
मंजिरी सोमणना खूप मोदक! अपूर्वाई/पूर्वरंगमधील चित्रं काढून पाहणे हा माझाही आवडता छंद होता! अर्थात तितकी रेषांची सफाई कुठली यायला!
ललीला सुद्धा खूप अनुमोदन! ही पुस्तकं मी पण अशीच उलटी वाचली आहेत.
हसरी गॅलरी प्रदर्शन अगदी भान हरपून बघितले होते! दिवाळी अंक, बालभारती, पुलंची पुस्तकं.. किती आरपार घुसले आहेत शिद मराठी माणसाच्या मनात, तेही सटली! बेस्ट आहेत शि. द. फडणीस!
Pages