कसलीच तयारी न करता पहिल्यांदाच गिर्यारोहणाला जाणारे किती लोक पाहिले आहेत तुम्ही ??
ज्या जागी जायचं आहे तिथला नकाशा, तिथे आधी कुणी गेलंय का, त्यांचे अनुभव काय होते, तिथलं वातावरण कसं असेल, सोबत काय न्यावं लागेल, तिथे त्रास होऊ नये म्हणून खाण्या-पिण्यात काय बदल करावे लागतील, आणि सगळी काळजी घेऊनही काही त्रास झालाच तर काय उपाययोजना करायची.....
......बहुतांशी लोक अशी शक्य तितकी माहिती गोळा करूनच गिर्यारोहणाला निघतात.
आणि असं केल्यामुळे " आपल्याला नक्की जमेल हे ! " हा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढतो, प्रवास तुलनेने सुखकर होतो.
४-८ दिवसांच्या गिर्यारोहणासाठी एवढी तयारी करायची गरज असेल तर मग .......आयुष्याचा एक तृतीयांश काळ ज्या अवस्थेत घालवायचा त्या " रजोनिवृत्ती " म्हणजेच मेनोपॉजबद्दल माहिती करून घेण्याची आवश्यकता किती तरी पटीने जास्त आहे !
पण ह्या विषयावर खुलेपणाने चर्चा होताना अजूनही दिसत नाही. गर्भावस्थेबद्दल बर्याच प्रमाणात जागृती होत आहे, त्यामानाने मेनोपॉज हा विषय बर्याचदा दुर्लक्षित राहतो.
मेनोपॉज म्हणजे बर्याच स्त्रियांना बागुलबुवासारखा वाटतो...खरं स्वरुप माहीत नसल्याने आणखीनच घाबरवणारा. ह्या विषयाबद्दल बोलायला वाटणारा संकोच सोडून देऊन चर्चा झाल्या तर स्त्रियांना आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला नक्कीच खूप फायदा होईल.
ह्या लेखमालिकेतून मेनोपॉजविषयी शास्त्रीय माहिती देण्याचा मानस आहे.
विषय तसा मोठा आणि गुंतागुंतीचा वाटू शकेल असा आहे. त्यामुळे शक्य तितक्या हलक्या-फुलक्या भाषेत
लिहायचा प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा काही गोष्टी बोजड वाटल्या तर नक्की सांगा. उलगडून सांगायचा प्रयत्न करीन.
लेखमालिकेतील विषय असे आहेत :
मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?
मेनोपॉज-२ : शरीरात होणारे बदल / लक्षणे
मेनोपॉज-३ : शरीराला होणारे धोके - हाडांची झीज आणि हृदयविकार
मेनोपॉज-४ : शरीराला होणारे धोके - युरिनरी इनकॉन्टिनन्स
मेनोपॉज-५ : योग्य वेळेआधी येणारा म्हणजेच प्रिमॅच्युअर मेनोपॉज
मेनोपॉज-६ : हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी
मेनोपॉज-७ : अल्टरनेटिव्ह थेरपी
मेनोपॉज-८ : जीवनशैलीतील बदल
*******************************************************************************************************************
मेनोपॉज म्हणजे काय ?
मेनोपॉजचा शब्दशः अर्थ आहे - स्त्रियांची शेवटची मासिक पाळी.
हा ग्रीक शब्द आहे. मेन म्हणजे मन्थ आणि पॉसिस म्हणजे सिझेशन
जागतिक आरोग्य संस्थेने केलेली व्याख्या : Menopause is permanent cessation of menstruation due to loss of ovarian follicular activity.
कुठली मासिक पाळी शेवटची असणार आहे, हे आधी सांगता येत नाही. त्यामुळे शेवटच्या मासिक पाळीनंतर एक वर्ष उलटून गेल्यावर 'मेनोपॉज आला' असं निदान केलं जातं.
पेरिमेनोपॉज : शेवटची मासिक पाळी येण्याच्या काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात तसे बदल घडून यायला सुरूवात झालेली असते. बर्याच स्त्रियांमध्ये हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षे इतका असतो.
ह्या काळाला पेरिमेनोपॉज असे म्हणतात.
पोस्टमेनोपॉज : स्त्रीच्या आयुष्यातील, शेवटच्या मासिक पाळीनंतरच्या उर्वरित काळाला पोस्टमेनोपॉज असे म्हणतात.
जगभरातील स्त्रियांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय ५१ वर्षे इतकं आहे.
भारतातील स्त्रियांमध्ये हे थोडं अलीकडे म्हणजे ४८ वर्षे इतकं आहे.
अर्ली मेनोपॉज : ४५ वर्षे वयाच्या आधी आलेला.
प्रिमॅच्युअर मेनोपॉज : ४० वर्षे वयाच्या आधी आलेला.
लेट मेनोपॉज : ५५ वर्षे वयाच्या नंतर आलेला.
वयाच्या फरकामुळे तयार झालेल्या ह्या व्याख्यांचा संबंध काही आजारांशी आहे. म्हणून त्यांचा उल्लेख इथे केला आहे.
हे सगळं आहे नैसर्गिकपणे घडून येणार्या मेनोपॉजबद्दल.
पण काहीवेळा इतर काही गोष्टींमुळे बीजांडांचं (ओव्हरीज) कार्य अवेळी थांबतं.
उदा. - सर्जिकल मेनोपॉज : शस्त्रक्रिया करून दोन्ही ओव्हरीज काढून टाकल्यामुळे आलेला मेनोपॉज.
तसेच कर्करोगासाठी घेतल्या गेलेल्या रेडिओथेरपी आणि/किंवा किमोथेरपीमुळे ओव्हरीजवर दुष्परिणाम झाल्याने आलेला मेनोपॉज.
मेनोपॉज का येतो ? म्हणजेच मासिक पाळी का थांबते ?
जी.सी. विल्यम्स ह्या शास्त्रज्ञाने असं मांडलं की, उत्क्रांतीदरम्यान अपत्यांमध्ये असलेल्या आपल्या जेनेटीक पूलचं रक्षण करण्याच्या हेतूने स्त्रियांच्या शरीरात काही बदल घडत गेले. मेनोपॉज हासुद्धा स्त्रीशरीराने आपल्यात घडवून आणलेला एक बदल आहे.
आयुष्याच्या शेवटापर्यंत स्त्रियांची गर्भधारणेची क्षमता शिल्लक राहिली तर काही गंभीर प्रश्न उभे राहतात. जसे की, साठाव्या वर्षांपर्यंत एखाद्या स्त्रीला मुले होत राहिली आणि शेवटच्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळातच त्या स्त्रीचा वृद्धावस्थेमुळे मृत्यू झाला, तर तिच्या अपत्यांच्या जिवंत राहण्याला धोका येणार.
माणसाच्या अपत्याला स्वयंपूर्ण व्हायला इतर प्राण्यांच्या तुलनेत बराच जास्त काळ लागतो.
बहुतांश प्राण्यांची पिल्ले जशी जन्मानंतर थोड्या अवधीतच उभी राहतात, स्वतःचं अन्न मिळवायला चालू करतात....तसं माणसाच्या अपत्याबाबत होत नाही.
त्यामुळे त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या अपत्यांचा उपासमारीमुळे मृत्यू ओढवू शकतो. आणि परिणामतः सगळाच जेनेटिक पूल धोक्यात येऊ शकतो.
हा जेनेटिक पूल टिकवण्यासाठी स्त्रियांच्या शरीराने ठराविक वयाच्या सुमारास आपल्यातील गर्भधारणेच्या क्षमतेचा त्याग केला.
ह्याचा परिणाम म्हणून तिला होणार्या अपत्यांच्या एकूण संख्येत घट झाली. पण तिच्या मृत्यूपर्यंत तिची अपत्ये साधारण १५-१६ वर्षांची होऊ शकल्याने स्वतःचं अन्न मिळवण्याइतपत आणि जेनेटिक पूल पुढे चालू ठेवण्याइतपत स्वयंपूर्ण झाली.
शिवाय तरूण मुले-मुली अन्नाच्या शोधात गेल्यानंतर ही वृद्ध स्त्री नातवंडांसोबत थांबून त्यांचं ...आणि पर्यायाने त्यांच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या जेनेटिक पूलचं रक्षण करू शकली.
थोडक्यात सांगायचं तर, क्वालिटीसाठी क्वान्टिटी कमी होण्याची झळ सोसूनही माणसासाठी हा सौदा फायद्याचा ठरला.
ह्यालाच "ग्रँडमदर थेअरी" असे म्हणतात.
ह्या थेअरीबद्दल अनेक वाद-प्रतिवाद आहेत. इतर काही थेअरीजही मांडल्या गेल्या. पण आपण इथेच थांबून आपल्या मूळ विषयाकडे वळू या.
मासिक पाळी का थांबते ?
प्रजननक्षम काळात स्त्रीशरीरात काही ठराविक हॉर्मोन्सचा सुसंबद्ध ऑर्केस्ट्रा सतत चालू असतो.
ह्या कलाकारांनी (हॉर्मोन्सनी) काही चुका केल्या तर ऑर्केस्ट्राची सुसूत्रता बिघडते, आणि काही समस्या उद्भवू शकतात.
GnRH (जी एन आर एच), FSH ( फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन), LH (ल्युटिनाइजिंग हॉर्मोन), Prolactin (प्रोलॅक्टिन), Thyroid hormones (थायरॉइड हॉर्मोन्स), Estrogen (इस्ट्रोजेन), Progesterone (प्रोजेस्टेरॉन)
हे ऑर्केस्ट्रातील काही ठळक कलाकार.
हायपोथॅलॅमस मधून निघालेलं GnRH (जी एन आर एच) हे हॉर्मोन पिट्युटरी ग्रंथीला संदेश देतं. पिट्युटरीने पाठवलेली FSH ( फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) आणि LH (ल्युटिनाइजिंग हॉर्मोन) ही दोन हॉर्मोन्स ओव्हरीजना संदेश देतात.
ओव्हरीजमध्ये दर महिन्याला काही ठराविक बीजांच्या आकारमान आणि कार्यामध्ये बदल घडत असतात.
FSH आणि LH च्या प्रभावाखाली ह्या बीजांमधून Estrogen (इस्ट्रोजेन) आणि Progesterone (प्रोजेस्टेरॉन) ही हॉर्मोन्स तयार होतात.
ह्या सगळ्या हॉर्मोन्सच्या प्रमाणांमध्ये योग्य वेळी योग्य ते बदल घडत असल्यामुळे प्रत्येक महिन्याला पाळी येते. ( किंवा स्त्रीबीजांचा शुक्राणूंशी संयोग झाल्यास गर्भधारणा होते.)
ओव्हरीतील एकूण बीजांची संख्या ठरलेली असते. म्हणजे पुरूषांच्या शरीरात जसे नवीन शुक्राणू पुन्हा-पुन्हा तयार होत राहतात, तसं स्त्रियांमध्ये होत नाही.
आईच्या पोटात असताना १२ ते २० आठवड्याच्या स्त्रीगर्भाच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीजांची संख्या ही सर्वात जास्त असते....म्हणजे साधारण ७० लाख इतकी.
ह्यातील बरीचशी बीजे गर्भावस्थेतच नष्ट होतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीजमध्ये साधारण २० लाख बीजे शिल्लक असतात.
पहिली मासिक पाळी ते शेवटची मासिक पाळी ह्या ३०-३५ वर्षांच्या काळात साधारणपणे ४०० बीजे परिपक्व होऊन बाहेर पडतात.
मेनोपॉजच्या वयापर्यंत ओव्हरीजमधील स्त्रीबीजांचा साठा जवळजवळ संपत आलेला असतो.
त्यामुळे पिट्युटरी ग्रंथीकडून आलेल्या FSH आणि LH चे आदेश पाळायला आणि त्यानुसार इस्ट्रोजेन तयार करायला पुरेशी स्त्रीबीजे शिल्लक नसतात. परिणामी रक्तातील इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी कमी होत जातं.
आणखी जास्त प्रमाणात FSH पाठवून उपयोग होईल ह्या आशेने पिट्युटरी ग्रंथी FSH पाठवतच राहते. परिणामी रक्तातील FSH चं प्रमाण वाढत राहतं. (म्हणूनच काहीवेळा मेनोपॉजचं निदान करण्यासाठी FSH ची पातळी मोजली जाते.)
मासिक पाळीचं चक्र चालू राहण्यासाठी आवश्यक असणारी सुसूत्रता बिघडल्याने ते चक्र बंद पडतं....आणि असं एक वर्षापर्यंत चालू राहिलं तर मेनोपॉज आला असं मानलं जातं !
ह्या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की मेनोपॉज हा आजार नसून स्त्रीशरीराची अटळ आणि पूर्णतः नैसर्गिक अशी अवस्था आहे.
असं असूनही बहुतांश स्त्रिया मेनोपॉजला का घाबरतात ? त्यावेळी इतका शारीरिक आणि मानसिक त्रास का होतो ??
ह्याचं उत्तर आहे - इस्ट्रोजेनची कमतरता आणि त्यामुळे दिसू लागलेली लक्षणे !
आधी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांच्या शरीरातील हॉर्मोनल ऑर्केस्ट्रामधील इस्ट्रोजेन हा एक अतिशय महत्वाचा कलाकार आहे. स्त्रीशरीरातील अनेक अवयव आणि त्यांची कार्ये ह्याच्यावर इस्ट्रोजेनचा प्रभाव आणि नियंत्रण असते.
खाली दिलेल्या चित्रावरून ह्याची कल्पना येईल.
मेनोपॉजच्या वेळी रक्तातील इस्ट्रोजेनची पातळी अगदी कमी झाल्याने त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो.
.........घरातील स्त्री चार दिवस बाहेर गेली की -
" तू गेल्यावर फिके चांदणे
घर परसूही सुने सुके,
मुले मांजरापरी मुकी अन्
दर दोघांच्या मधे धुके "
..........अशी अवस्था होऊन सगळे भांबावतात ना अगदी तसंच इस्ट्रोजेन नाहीसं झाल्यावर शरीरातील अवयवांचं होतं.
त्यातही जर हे सगळं अनपेक्षितपणे, मनाची कसलीच पूर्वतयारी नसताना घडलं तर त्या स्त्रीला ह्या बदलांसोबत जुळवून घेणं खूप कठीण जातं.
संशोधनात असं आढळून आलं आहे की, ज्या स्त्रियांना ह्या बदलांची आधीपासून माहिती असते, त्यांना मेनोपॉजमुळे होणारी त्रासदायक लक्षणे कमी तीव्रतेने जाणवतात.
हे बदल आणि त्यामुळे जाणवणारी लक्षणे ह्याबद्दल पुढच्या लेखात.
- रुणुझुणू (स्त्रीरोगतज्ञ)
*******************************************************************************************************************
- सर्व चित्रे जालावरून साभार.
- वैद्यकीय बाबींशी संबंधित काही इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. पण कुणाला त्यांच्यासाठी बोलीभाषेतील मराठी प्रतिशब्द माहीत असल्यास सांगा. मी योग्य ते बदल करीन.
डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश मेनोपॉज ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.
उत्तम लेख रुणू! सोप्या
उत्तम लेख रुणू! सोप्या भाषेतील माहिती + आकृत्या / चित्रे यांमुळे लेख वाचताना समजायला सोपा जातोय. कळायला काहीशा गुंतागुंतीच्या, महत्त्वाच्या व नाजूक अशा या विषयाबद्दल अनेकांना फारसे माहित नसते. तू ही लेखमाला लिहायला घेतलीस याबद्दल तुझे खास अभिनंदन!!
पुढील लेखांची वाट पाहत आहे. शुभेच्छा! 
अरुंधती +१. छान लिहीते आहेस
अरुंधती +१.
छान लिहीते आहेस रुणुझुणु.
चांगला उपक्रम रुणुझुणू.
चांगला उपक्रम रुणुझुणू. व्यवस्थित आणि सर्वांना कळेल अशा भाषेत माहिती देत आहात. धन्यवाद.
पुढच्या लेखांची वाट बघते.
उपयुक्त सिरीज रुणुझुणू. फॉलो
उपयुक्त सिरीज रुणुझुणू. फॉलो करेनच.
उत्तम लेख! धन्यवाद रुणुझुणू.
उत्तम लेख! धन्यवाद रुणुझुणू.
छान माहिती, उत्तम लेख! काही
छान माहिती, उत्तम लेख! काही गोष्टी पहिल्यांदाच समजल्या! धन्यवाद!
Effects of Estrogen वालं
Effects of Estrogen वालं चित्र पहा.
याला म्हणतात फेअरर सेक्स.
या लकी स्त्री जमाती मध्ये, एइस्ट्रोजेन-
१. कोलेस्टेरॉल कमी करतं, अन करोनरी आर्टेरीज नीट ठेवतं.
२. मेमरी लॉस कमी करतं.
३. बोन डेन्सिटी टिकवून ठेवतं.
बाकी रिप्रॉडक्टीव कामे तर स्त्री आहे म्हणून त्या शरीरात होणारच आहेत
उत्तम लेख! पुढल्या लेखांच्या
उत्तम लेख!
पुढल्या लेखांच्या प्रतिक्षेत.
सुरेख आणि सोप्या शब्दात
सुरेख आणि सोप्या शब्दात सांगते आहेस.......
<<<<<<<<<माणसाच्या अपत्याला
<<<<<<<<<माणसाच्या अपत्याला स्वयंपूर्ण व्हायला इतर प्राण्यांच्या तुलनेत बराच जास्त काळ लागतो.
बहुतांश प्राण्यांची पिल्ले जशी जन्मानंतर थोड्या अवधीतच उभी राहतात, स्वतःचं अन्न मिळवायला चालू करतात....तसं माणसाच्या अपत्याबाबत होत नाही.>>>>>>>>>>>
असं का ? ......थोडं विषयापासून लांब आहे .....पण समजून घ्यायचं आहे.
पोस्ट मेनोपॉज काळात स्त्रीबीजांचा सर्व साठा संपलेला असतो का ?
याचा स्त्री पुरूष संबंधांवर
याचा स्त्री पुरूष संबंधांवर काय परिणाम होतो ? शारिरिक, मानसिक ?
खरच सोपं आणि त्यामुळे नीट
खरच सोपं आणि त्यामुळे नीट समजेल असं लिहिलं आहे रुणुझुणू. पुढच्या लेखांची वाट पहात आहे.
लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल
लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल सर्वांचे आभार.
<< या काळात होणारे मानसिक बदल / तणाव याबद्दल पण लिहिणार ना ?>> हो दिनेशदा, लिहिणार आहे.
<<शरीरात बदल तर पुरुषांच्याही होतात, मला वाटते त्याला र्अॅन्ड्रोपॉज म्हणतात ना?>>
सुरश, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
पुरूषांमध्येही टेस्टोस्टेरॉन ह्या हॉर्मोनची पातळी वयाप्रमाणे कमी होत जाते त्याला अॅन्ड्रोपॉज म्हणतात. स्त्रीपुरूष दोघांमध्ये ह्या बदलांना " क्लायमॅक्टरिक " असेही म्हणतात.
दोघांमध्ये फरक हा आहे की मेनोपॉजनंतर स्त्रीची प्रजननक्षमता पूर्ण थांबते. तसं पुरूषांच्या बाबत होत नाही.
मात्र हॉर्मोन्सची पातळी कमी झाल्याने शारीरिक संबंधातील अनिच्छा, इम्पोटेन्स, थकवा येणं, विस्मरण, चिडचिड, नैराश्य हे सगळं घडू शकतं.
अॅन्ड्रोपॉज ह्या अवस्थेला अजून जागतिक आरोग्य संस्थेकडून अजून ICD 10 ( International Statistical Classification of Diseases and Related Health Problems) मध्ये मान्यता मिळालेली नाही.
प्रामाणिकपणे सांगायचं तर ह्या विषयावर एवढीच माहिती मी खात्रीपूर्वक देऊ शकीन. ही एक लिन्क पहा.
पुढेमागे सवड मिळाल्यास थोडा अभ्यास करून ह्या विषयावर लिहायचा प्रयत्न करीन.
<< याचा स्त्री पुरूष संबंधांवर काय परिणाम होतो ? शारिरिक, मानसिक ?>> महेश, दुसर्या लेखात ह्याविषयी लिहिलं आहे. आज किंवा उद्या लेख प्रकाशित करते.
<< युटरस काढून टाकणे- हा प्रकार डॉक्टर्स सुचवतात- ते ऑपरेशन त्रासदायी आणि बरेचदा शेवटाचा पर्याय म्हणून केले जाते- अज्ञान आहे ह्याबद्दल, म्हणूनच त्याबद्दल जाणून घेण्यास आवडेल >> बागेश्री, त्या आणि आणखीही बर्याच विषयांवर लिहिणार आहेच. पण जरा सवडीने.
<< या लकी स्त्री जमाती मध्ये,....>> इब्लिस, तुमची आवडती म्हण - जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे !
अरे वा रूणू, वेलकम बॅक टू
अरे वा रूणू, वेलकम बॅक टू मायबोली.
पुढिल भागांची वाट पाहतेय.
हिस्टरेक्टोमीबद्दल लिहिच. माझ्याकडे फार मजेदार अनुभव आहेत याबाबत
कुठेतरी लिहिले होते पूर्वी. सापडले की इथेही लिहिते.
उत्तम लेख!!!. अगदी सोप्या
उत्तम लेख!!!. अगदी सोप्या शब्दात समजावून सांगत आहात ..इथे शेअर करत आहात त्या बद्दल धन्यवाद
उत्तम माहितीपूर्ण व साध्या
उत्तम माहितीपूर्ण व साध्या भाषेत समजाविल्याबद्दल आभार.

ओके, धन्यवाद !
ओके, धन्यवाद !
खुप छान माहीती !
खुप छान माहीती !
खूप छान माहिती. धन्स.
खूप छान माहिती. धन्स.
अरुंधती +१. उपयुक्त सिरीज
अरुंधती +१.
उपयुक्त सिरीज रुणुझुणू. फॉलो करेनच. धन्स
खूपच सोप्या शब्दात सांगितलं
खूपच सोप्या शब्दात सांगितलं आहेस समजावुन
उत्त्तम लेख! सर्वांना सहजपणे
उत्त्तम लेख! सर्वांना सहजपणे समजेल अशा शब्दात सांगीतले आहेस. खरच खुप खुप धन्यवाद!
धन्यवाद रुणुझुणु. उत्तम.
धन्यवाद रुणुझुणु. उत्तम.
छान माहिती. जालावर आहेच पण
छान माहिती. जालावर आहेच पण इथे मिळाली की घरातनं आधार मिळाल्यासारखे वाटते. आता तुमचा हात धरून ह्या अवस्थेतून पार होता येइल. पीएम एस चा पहिले मानसिक त्रास असा होत असे कि दोन दिवस आधी किंवा आधीच्या आठवड्यात कोणच्या तरि विषयावरून बोललेले फार लागायचे व मग त्यावरून रडायला येऊन पार जीवनात अर्थ नाही इतके वाईट व निराश वाटत असे. ( हे म्हणजे प्युअरली हार्मोनल कारण मूळ स्वभाव नॅचरली ऑप्टिमिस्टिक आहे. ) मग पुढे सर्व सुरळित होत असे. पण ह्या परिस्थितीत आल्यावर ( किंवा वयानुरूप मॅच्युरिटी मुळे असेल) हे मूड स्विंग्ज कमी होत होत नाहिसेच झाले आहेत. जगण्यासाठीचे काही त्रास सहन करायचे व बाकी
आनंदी आत्म विश्वास पूर्ण अंतरंग हे डिव्हाइड नक्की झाले आहे. मूड स्विंग्ज्स नसल्याने फार बॅलन्स्ड व फ्री वाटते.
खुप छान आणि उपयुक्त माहिती
खुप छान आणि उपयुक्त माहिती ...........
उत्तम लेख! पुढल्या लेखांच्या
उत्तम लेख!
पुढल्या लेखांच्या प्रतिक्षेत.
खूप माहितीपूर्ण लेखन
खूप माहितीपूर्ण लेखन
छान उपयुक्त माहिती आणि लेख .
छान उपयुक्त माहिती आणि लेख . धन्यवाद!
उत्तम लेख आणि सोप्या शब्दात
उत्तम लेख आणि सोप्या शब्दात समजवलेले आहे.
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
उत्तम आणि सोप्या भाषेतली
उत्तम आणि सोप्या भाषेतली माहिती.
धागा सार्वजनिक केला ते बरं झालं.
असंच, पुरूषांच्या अॅण्ड्रोपॉझबद्दलही लिहिणार का?
बहुतेक घरांना आधी अॅण्ड्रोपॉझला तोंड द्यावं लागतं, आणि मग मेनोपॉझला. अॅण्ड्रोपॉझच्या वेळेस बायकोनं नवर्याला समजून घेतलं, तर तो ही तिच्या मेनोपॉझच्या वेळी तिला नीट समजून घेईल. त्यासाठी अॅण्ड्रोपॉझचीही सविस्तर माहिती मिळायला हवी.
ओव्हरीतील एकूण बीजांची संख्या ठरलेली असते. >>> हे मला माहित नव्हतं.
Pages