ईट प्रे लव्ह
‘ईट प्रे लव्ह’ या शीर्षकावरून हे पुस्तक म्हणजे एखाद्या स्वच्छंदी, आनंदी आयुष्याची कहाणी असावी असे वाटते. पण ‘सुसान बॉवेलला......... बारा हजार मैलांवरूनही ती मला सतत आधार देत राहिली.’ या अर्पणपत्रिकेच्या मजकुरामुळे या समजुतीला लगोलग धक्का बसतो आणि वाचकाची उत्सुकता चाळवली जाते.
सुरूवातीच्या मनोगताला लेखिका ‘जपमाळेचा १०९वा मणी’ म्हणते आणि एक सूक्ष्मशी आध्यामिक डूब देऊनच पुस्तकाची सुरूवात करते.
आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, प्रसंगी आत्मवंचना आणि आत्मशोध असा हा एलिझाबेथ ऊर्फ लिझचा वर्षभराचा प्रवास. इटालियन भाषेचा अभ्यास, इटालियन खाद्यपदार्थांचा आस्वाद (ईट), भारतीय योगाभ्यास (प्रे) आणि नंतर इण्डोनिशियातील वास्तव्यात प्रेमाचा नव्याने घेतलेला शोध (लव्ह) यांच्या माध्यमातून अंतःकरणाचा समतोल साधण्याची ही कहाणी. या सर्वांतून एकीकडे लिझची मनाची कलंदर वृत्ती दिसते, तर दुसरीकडे आपल्याला यातूनच आनंद मिळणार आहे हे ओळखून निसटत चाललेल्या आत्मविश्वासाला परत आणण्याचा, स्वतःशी प्रामाणिक रहायचा तिचा प्रयत्न मनाला भावतो. इटली, भारत, इण्डोनेशिया अशा तीन परस्परविसंगत ठिकाणी जाऊन राहण्याच्या स्वतःच्या तीव्र इच्छेच्या पार्श्वभूमीवर लिझमधली लेखिका अगदी सहजपणे एक मौलिक विचार मांडून जाते. ती लिहीते, ‘जगाच्या दृष्टीनं वरवर विसंगत दिसणार्या दोन गोष्टींमधील चांगल्या गोष्टी एकत्र करून त्यांचा लाभ घेण्याइतकं तुम्ही तुमचं आयुष्य व्यापक बनविलेलं असेल, तर त्यात काय वावगं आहे?’
सहधर्मचराशी झालेले टोकाचे मतभेद, त्यातून उद्भवलेला घटस्फोट आणि अटळ नैराश्य या सगळ्याचेच कुठलाही आव न आणता अत्यंत प्रभावी वर्णन लिझ करते. ९ सप्टेंबर २००१ या घटस्फोटाच्या तारखेपाठोपाठ येतो तो वर्ल्ड ट्रेड सेण्टरवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख. घटस्फोटानंतरची मनाची अवस्था वर्णन करण्यासाठी वापरले गेलेले ‘सगळीकडं विनाशाचं थैमान पसरलं होतं. एकेकाळी एकत्र असलेलं सगळं आता विखुरलं होतं. सगळा चक्काचूर झाला होता.’ हे त्या हल्ल्याच्या वर्णनाचे प्रतिक नेहमीच्या पठडीतलेच आहे असे आधी वाटते खरे; पण अमेरिकावासियांच्या दृष्टीने या घटनेला एक वेगळीच मिती आहे हे लक्षात घेतले, तर मग ही बाब फारशी खटकत नाही.
जीवनातील हरवलेला आनंद परत मिळवण्यासाठी इटालियन भाषेचा-खाद्यपदार्थांचा आस्वाद-अभ्यास, भक्तीची-मनःशांतीची आस पूर्ण करण्यासाठी भारतातील आश्रमातील वास्तव्य, प्राचीन इण्डोनिशियन-बाली संस्कृतीच्या मदतीने आनंद व भक्ती यांचा घातलेला मेळ, त्यादरम्यानची मनाची आंदोलने, हीच तीन ठिकाणे निवडण्यामागचा कार्यकारणभाव, ठिकठिकाणी गवसलेल्या नव्या मित्र-मैत्रिणींसोबत बहरून आलेले नाते, त्या मैत्रीतले कडू-गोड अनुभव हे सगळे कधी आर्त प्रामाणिकपणाने, तर कधी खट्याळ-खुसखुशीत शैलीत लिझ कथन करते.
इटालियन आणि अमेरिकन कार्यसंस्कृतीतील फरक लक्षात आल्यावर स्वतःच्या आनंदाच्या संकल्पना नव्याने जाणून घेण्याची तिला गरज भासते. भारतातील आश्रमात दाखल झाल्यानंतर योगाभ्यासादरम्यान एकाग्र होऊ न शकणार्या स्वतःच्या मनाला ती या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणार्या माकडाची उपमा द्यायलाही कमी करत नाही. एकंदरच संपूर्ण लेखनात उपमालंकाराचा अतिशय प्रभावी वापर केला गेला आहे. मोडलेले लग्न आणि नंतर लगेच एक असफल प्रेमप्रकरण यांच्या कटू अनुभवांनंतरही पुन्हा एखाद्या पुरुषाचा सहवास नव्याने हवासा वाटणे हे कसे नैसर्गिक आहे ते देखील ती अगदी मोकळ्या मनाने कबूल करते.
हे एक अतिशय प्रांजळ असे आठवणींरूपी आत्मकथन आहे हे खरेच, मात्र ‘एका स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास’ हे उपशीर्षक वाचून यात स्त्री-मुक्तीवादी काही शोधायला जाल तर हाती बव्हंशी निराशाच येईल.
वयाच्या तिशीतच केले गेलेले हे सगळे चिंतन निश्चितच कौतुकास्पद आहे. काही ठिकाणी अतिशय परिणामकारक भाषेचा वापर, तर काही ठिकाणी एखाद्या शाळकरी मुलीने लिहीलेल्या निबंधाची धाटणी असलेल्या या निवेदनाबद्दल निरनिराळे वाचक निरनिराळी मतप्रदर्शने करतील. घटस्फोटामुळे मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली एक तरूण, उच्चशिक्षीत, सुखवस्तू अमेरिकन स्त्री आपले शहर, घर, काम सोडून वर्षभर दूर निघून जाते ही एक मूळ बाबच कुणाला बांधून ठेवेल; तर काहींना हे सगळे म्हणजे पाश्चात्य वैचारिक स्वातंत्र्याच्या अतिरेकाचे, आर्थिक सुबत्तेचे गंभीर परिणाममात्र वाटतील.
एका अमेरिकन स्त्रीच्या दृष्टीकोनातून वर्णन केल्या गेलेल्या योग, ध्यानधारणा, विपश्यना या संकल्पना वाचताना कुणी गुंगून जाईल; तर बुध्दीप्रामाण्यवाद्यांना ते सारे कंटाळवाणे वाटण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे ‘इण्टरनॅशनल बेस्टसेलर’ हे लेबल दूर करून ज्याने त्याने आपापल्या परीने या पुस्तकाला जोखावे, तोलावे, त्याचे साहित्यिक आणि चिंतनमूल्य पडताळून पहावे असे म्हणावेसे वाटते.
शेवटी, लेखिकेने व्हर्जिनिया वोल्फचे एके ठिकाणी उद्धृत केलेले विचारच पुन्हा मांडावेसे वाटतात, की ‘स्त्रीच्या आयुष्याच्या भल्यामोठ्या खंडावर एका तलवारीची छाया पडलेली असते. या तलवारीच्या पात्याच्या एका बाजूला रुढी, परंपरा, हुकूम, शिस्त असतात. ते सगळं बरोबर, योग्यच असतं. तुम्ही जर ही बाजू ओलांडून या तलवारीच्या दुसर्या बाजूला येण्याएवढ्या हट्टी आणि वेड्या असलात, तर तुम्हाला या बाजूला सगळा गोंधळच गोंधळ दिसतो. रूढी, परंपरांना झुगारून देऊनच तुम्हाला हे आयुष्य निवडावं लागतं. नियमितपणाचा तिथं लवलेशही नसतो. नेहमीसारख्या सुरळीत गोष्टी तिथं नसतात.’
तलवारीची ती पहिली बाजू ओलांडणे हाच कळीचा मुद्दा ठरतो. त्यानंतर स्त्रीच्या अस्तित्वाला नव्याने काही अर्थ लाभू शकतो.
वर्षभराच्या आत्मिक संघर्षानंतर हाच नवा अर्थ शोधण्यात लिझ यशस्वी ठरते.
----------
कमिटेड
इण्डोनेशियातील वास्तव्यात लिझला फिलीप भेटतो; मूळचा ब्राझिलीयन, पण आता ऑस्ट्रेलियाचा नागरीक असलेला, पन्नाशी पार केलेला एक घटस्फोटीत पुरूष. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. कटाक्षाने लग्न न करायचा निश्चय करून अमेरीकेत एकत्र रहायला लागतात. आपापले व्यवसाय पुढे चालू ठेवतात. जगभर एकत्र प्रवासही करतात. असाच एक प्रवास आटोपून परतताना फिलीपला अमेरीकेत प्रवेश नाकारला जातो. व्हिसा, इमिग्रेशन इ.मधील नियमांवर बोट ठेवून त्याला असे सांगितले जाते, की इथून पुढे अमेरीकेत येऊन व्यवसाय करायचा असेल तर अमेरीकेचे कायमचे नागरीकत्त्व घ्यावे लागेल, म्हणजेच पर्यायाने लिझशी लग्न करावे लागेल.
हे ऐकताच, पुन्हा लग्न करण्याची जणू काही शिक्षाच ठोठावण्यात आली असावी अशा प्रकारे लिझ हादरते. तिच्या मनातली विवाहसंस्थेविषयीची भीती पुन्हा डोके वर काढते. फिलीपशी लग्न करण्यावाचून पर्याय नसल्याचे जेव्हा तिच्या लक्षात येते, तेव्हा मात्र ती कंबर कसून कामाला लागते. कुठल्या? तर, लग्नाविषयी स्वतःच्या मनात असलेल्या सर्व शंका-कुशंका, गैरसमज, पूर्वग्रह दूर करण्याच्या; आणि ते ही निर्धाराने, आत्मविश्वासाने. हा निर्धार तिला मिळालाय तो ‘ईट प्रे लव्ह’मधील आत्मशोधामुळेच.
फिलीपच्या स्थलांतराच्या कायदेशीर बाबी पूर्ण होण्यादरम्यानच्या कालावधीत लिझ विवाहविषयक अनेक पुस्तके वाचून काढते. त्यात मांडल्या गेलेल्या विचारांवर सखोल, संशोधनात्मक चिंतन करते आणि शेवटी आपण जे करणार आहोत ते योग्यच आहे याची स्वतःच्या मनाशी खात्री पटवूनच फिलीपशी विवाहबध्द होते. तिचे ‘विवाह या सामाजिक संस्थेच्या गुंतागुंतीच्या जागेत शांततेनं राहण्यासाठी केलेले प्रयत्न’ म्हणजेच ‘कमिटेड’ हे पुस्तक.
एकंदर आठ प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले आहे. यामुळे पुस्तकाला एक आटोपशीर, बांधीव स्वरूप प्राप्त झालेले आहे. ही सर्व प्रकरणे परस्परावलंबी आहेतच, पण तितकीच स्वतंत्रही आहेत.
‘विवाह आणि स्त्रिया’ या प्रकरणात केल्या गेलेल्या साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकन विवाहित स्त्रीचे वर्णन आताच्या भारतीय शहरी विभागात राहणार्या स्त्रीला तंतोतंत लागू होते. त्याच प्रकरणात ‘विवाहसंस्थेला मॅट्रिमनीऐवजी पॅट्रिमनी असं कुणालाही म्हणावंसं का वाटत नाही?’ असा परखड सवालही केला गेला आहे. ‘विवाह आणि इतिहास’ हे प्रकरण प्रेम, लग्न, एकमेकांवरील विश्वास आणि घटस्फोट यांच्या परस्परसंबंधांवर भाष्य करते. तर ‘विवाह आणि भुरळ’ या प्रकरणातील बहुतांश भाग हा तद्दन पाश्चात्य विचारसरणीचा द्योतक असा वाटतो. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ‘विवाह आणि क्रांतिकारकता’ व ‘विवाह आणि स्वायत्तता’ या प्रकरणांचा. त्यांत दर्शवण्यात आलेले विवाहसंस्थेचे दोन अत्यंत महत्त्वाचे पैलू म्हटलं तर सर्वांना ज्ञात असतात, पण त्याची जाणीव फार थोड्यांना असते. त्या पैलूंचा परिणामकारक वापर फार थोडेजण करतात.
एकेकाळच्या दोन डोकी-चार हात-चार पाय असलेल्या मानवाच्या ग्रीक रूपककथेचा आणि निखळ विवाहबंधनातल्या भिंती आणि खिडक्यांच्या रूपकांचा घेतलेला आधार, तर कधी घटस्फोटीत लोकांना दिलेली ‘जपान’ या देशाची उपमा, ‘सी-गल्स’ या पक्ष्यांविषयीचे संशोधन, ‘व्हॅसोप्रेसिन रिसेप्टर जीन’बद्दलचे अस्सल वैज्ञानिक संदर्भ यांच्या साहाय्याने केले गेलेले हे लेखन वाचकांच्या मनावर गहिरा परिणाम केल्यावाचून राहत नाही.
स्वतःच्याच मनाशी निकराने चार हात केल्यानंतर एखादे व्यक्तिमत्त्व किती झळाळून उठू शकते त्याचे हे पुस्तक म्हणजे एक दमदार उदाहरण आहे. ते वाचताना ‘ईट-प्रे-लव्ह’मधली बाथरूमच्या फरशीवर मध्यरात्री तीन वाजता हुंदके देत रडत बसणारी हीच का ती लिझ असा प्रश्न वाचकाला निश्चितच पडेल.
पण...
फिलीपच्या कुठल्या गोष्टी आपल्याला आवडतात ते लिझ एके ठिकाणी सांगते; काही अगदी मनापासून, तर काही खट्याळ शैलीत. तिथले एक अनुवादित वाक्य इतका जोरदार धक्का देते, की त्याच्या तुलनेत इतर संपूर्ण पुस्तक हे उत्कृष्ट अनुवाद म्हणूनच गणले जावे. ते वाक्य आहे - ‘कोंबडीचं गाढव वर असताना तुम्ही तुमची अंडी मोजू नका’ हे त्याचं भयानक वाक्य मला खूप आवडतं'. जरी एखाद्याला मूळ (स्लँग?) इंग्रजी वाक्य माहीत नसले, तरीही हा अनुवाद वाचून तो निपचित पडेल हे नक्की!!!
**********
ईट प्रे लव्ह. एका स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास. (पृष्ठे ४५५. मूल्य ३०० रुपये)
कमिटेड (पृष्ठे २९९. मूल्य २५५ रुपये)
अमेय प्रकाशन. लेखिका - एलिझाबेथ गिल्बर्ट. अनुवाद - डॉ. मीना शेटे-संभू.
लले, अत्यंत सुंदर परिक्षण
लले, अत्यंत सुंदर परिक्षण लिहिलयंस. आवडलंच.
छान लिहीले आहेस. मी इट प्रे
छान लिहीले आहेस. मी इट प्रे लव्ह मुव्ही पाहिला आहे ज्युलिया रॉबर्ट्सचा. आवडला होता. तसं भटकावं अशी सणक आली होती तो पाहून.. पुस्तक वाचले पाहिजे.
कमिटेडही इंटरेस्टींग दिसतंय. बघीन लायब्ररीत.
कोंबडीचे गाढव?? सिरिअसली??
बस्के, खरंच, कोंबडीचे गाढव...
बस्के, खरंच, कोंबडीचे गाढव...
कमिटेड हे पुस्तक मला स्वत:ला ईट-प्रे-लव्ह पेक्षा जास्त आवडलं. मूळ पुस्तकांचे नेटवरचे रिव्ह्यूज वगैरे पाहिले तर असं दिसून येतं, की पाश्चात्य जगतात पहिलं पुस्तक जास्त लोकप्रिय आहे. पण भारतीय वाचकांना दुसरं अधिक आवडेल असं वाटतं.
मागच्या आठवड्यातच माझी
मागच्या आठवड्यातच माझी बिल्डिंगमधली मैत्रिण आम्हाला विचारत होती की 'इट प्रे लव्ह' पिक्चर लागला होता तो पाहिलात का तुम्ही, तेव्हा आम्ही तिला उडवून लावलं की कसले कुठलेतरी पिक्चर बघत बसलेली असतेस म्हणून.... आता हे परिक्षण वाचल्यावर तेव्हा तो पिक्चर बघायला हवा होता असं वाटायला लागलंय
असो, आता परत लक्ष ठेवणार कधी लागतोय परत त्यावर.
फिलीपच्या स्थलांतराच्या कायदेशीर बाबी पूर्ण होण्यादरम्यानच्या कालावधीत लिझ विवाहविषयक अनेक पुस्तके वाचून काढते. त्यात मांडल्या गेलेल्या विचारांवर सखोल, संशोधनात्मक चिंतन करते आणि शेवटी आपण जे करणार आहोत ते योग्यच आहे याची स्वतःच्या मनाशी खात्री पटवूनच फिलीपशी विवाहबध्द होते.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कितीही संशोधनात्मक चिंतन केले, सखोल अभ्यास केला, कितीही स्वतःच्या मनाची खात्री पटली तरी लग्न झाल्यानंतर कहानी में असा काही जबरदस्त घुमाव येतो की लग्न केलेला प्रत्येक माणूस हवालदिल झालाच पाहिजे
असो, लले, बरं लिहिलंयस
छान लिहिलंय !
छान लिहिलंय !
कितीही संशोधनात्मक चिंतन
कितीही संशोधनात्मक चिंतन केले, सखोल अभ्यास केला, कितीही स्वतःच्या मनाची खात्री पटली तरी लग्न झाल्यानंतर कहानी में असा काही जबरदस्त घुमाव येतो की लग्न केलेला प्रत्येक माणूस हवालदिल झालाच पाहिजे>> जोटाझापा
बाकी परिचय उत्तम. हे स्वतःच्या शोधासाठी भटकणे वगैरे मला ज..रा निरर्थक वाटतं, पण असो.
छान परिचय...वाचायला हवीत
छान परिचय...वाचायला हवीत दोन्ही पुस्तकं
'ईट प्रे लव्ह' या पुस्तकाचा
'ईट प्रे लव्ह' या पुस्तकाचा मराठी अनुवाद मी काही महिन्यांपूर्वी वाचला होता. मला हे पुस्तक अतिशय कंटाळवाणे वाटले. शेवटची काही प्रकरणे तर अक्षरशः वाचवत नाहीत इतकी कंटाळवाणी आहेत. एकंदरीत पुस्तक फारसे आवडले नाही. चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे तो कसा आहे याची कल्पना नाही.
:हेमावैम:
मंसोसाठी टाळ्या. आगाऊ +१. छान
मंसोसाठी टाळ्या. आगाऊ +१.
छान लिहीले आहेस ललिता. वाचावेसे वाटले.
माझ्या 'वाचूच न शकलेल्या'
माझ्या 'वाचूच न शकलेल्या' पुस्तकांच्या लिस्टमध्ये आहे हे 'ईट प्रे लव्ह'. सिनेमाही फडतूस आहे. इथे पुस्तक आणि सिनेमा दोन्हीची व्यवस्थित 'हवा' केली होती. चांगलं असावं म्हणून लोकांनी वाचलं असणार त्यामुळे मागणी/खप वाढला आणि 'लोकप्रिय' असा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे.
(पुस्तक वाचवले नाही तर सिनेमा कशाला पाहिला या प्रश्नाचे उत्तर 'हावियर बार्डेम' आहे. धन्यवाद.)
ललितादेवी, परीक्षण
ललितादेवी,
परीक्षण नेहमीप्रमाणे उत्तम आहे. वाचकाची उत्सुकता वाढवण्याची तुमची हातोटी आवडते.
आ.न.,
-गा.पै.
लोलास अनुमोदन. एकदमच रडगाणं
लोलास अनुमोदन. एकदमच रडगाणं आहे इट प्रे लव म्हणजे. मी नेटाने पूर्ण वाचलं पण उगाच वाचलं असं वाटलं. पुस्तकच नाही आवडलं म्हणून सिनेमा पाहिलाच नाही.
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा ऑल एक्सपेंस पेड आत्मशोश आणि पुस्तक हा तिच्या प्रोजेक्ट्चा भाग होता.
कमिटेड मात्र वाचलं नाही.
पण ललिता पुस्तकापेक्षा तुझं परिक्षण/परिचय चांगलं आहे
'हावियर बार्डेम' >> हे पुरेसे
'हावियर बार्डेम' >> हे पुरेसे कारण आहे!!!
लोला +१. 'हावियर बार्डेम' हा
लोला +१. 'हावियर बार्डेम' हा एक महान प्रकार आहे.
कोंबडीचे गाढव >
लोला + १ (पुस्तक वाचावसंच
लोला + १
(पुस्तक वाचावसंच वाटलं नाही. हे अनुमोदन सिनेमासाठी आणि तो बघण्याच्या कारणासाठी आहे. :P)
लले छान परीक्षण खर सांगायच
लले छान परीक्षण
खर सांगायच तर मूवी अजिबातच आवडली नव्हती. सो पुस्तकाच्या वाटे गेले नाही.
अगोदर मुव्ही पाहिला. अजिबातच
अगोदर मुव्ही पाहिला. अजिबातच नाही आवडला. खर सांगायच झाल तर ललिता, तुझ परिक्षण वाचून खरच इतका "Depth" असलेला मुव्ही होता तो ? असा प्रश्न पडलाय मला. (सांगायचा मुद्दा हा कि तुझ परिक्षण चांगल आहे. )
कधी कधी पुस्तकावरुन काढलेले मुव्हिज निराशा करतात. म्हणुन वेड्यासारख पुस्तक पण वाचल . nope. मुळं पुस्तकच over hyped आहे. Oprah ने त्याला आणखी वर नेवून ठेवल. पुस्तक निम्म्यातूनच सोडून दिल वाचायचं.
ईट लव्ह प्रे वाचून २ एक वर्षे
ईट लव्ह प्रे वाचून २ एक वर्षे झाली असावीत. सुरुवातीला बरेच खिळवते पण नंतर बालीतील भाग तेवढा आवडला नाही. पण दुसरी जीवन शैली म्हणून रंजक वाटले.
समीक्षण चांगले आहे.
"ईट प्रे लव्ह" पुस्तकाची इतकी
"ईट प्रे लव्ह" पुस्तकाची इतकी हवा पाहून वाचायला घेतले खरे पण अत्यंत कंटाळवाणे वाटले. पूर्ण वाचू शकलो नाही. "ओंजळीत भरले दवबिंदू" या मंदाकिनी अष्टीकर यांच्या रटाळ कादंबरीची आठवण झाली. हे मा वै म.
मलाही मूवी बोअर झाला होता.
मलाही मूवी बोअर झाला होता.
आईशप्पथ. मी एकटीच दिसतीय
आईशप्पथ. मी एकटीच दिसतीय मुव्ही आवडलेली. मजा आहे!
ईट प्रे लव: मला अतिशय बोर
ईट प्रे लव: मला अतिशय बोर झाले. २० व्या मिनिटाला पुस्तक बंद करून झोपले.
पहिले १० मिनीटे वाचून वाटले मजा आहे(नायिकेची... मस्त फिरायला जायच शोध घ्यायच्या नावाखाली..)
सुरुवात बरी वाटली म्हणून घेतले पण नाही आवडले. अस्थिर व चंचल डोक्याची नायिका असे वाटले. पुढे काय होइल म्हणून वाचायचा प्रयत्न केला पण काय ते तेच ते.
> हे स्वतःच्या शोधासाठी
> हे स्वतःच्या शोधासाठी भटकणे वगैरे मला ज..रा निरर्थक वाटतं
पण फिरल्यामुळे स्वत:बद्दल आणि जगाबद्दल बरंच काही कळतं
लोला +१ पीळ आहे प्रकरण.
लोला +१
पीळ आहे प्रकरण.
सर्वांना धन्यवाद. चला...
सर्वांना धन्यवाद.
चला... म्हणजे 'ईट प्रे लव्ह' न आवडलेले अनेकजण आहेत माझ्यासोबत
भारतीय वाचकांना 'बळंच' वाटणारच पुस्तक आहे हे. त्यामानाने 'कमिटेड' थोडं सुसह्य आहे.
(पुस्तक वाचल्यावर सिनेमा पाहण्यात तर मला मुळीच इण्टरेस्ट नाहीये. :फिदी:)
पण फिरल्यामुळे स्वत:बद्दल आणि
पण फिरल्यामुळे स्वत:बद्दल आणि जगाबद्दल बरंच काही कळतं>>> शक्य आहे, पण स्वशोध ही वृत्ती आहे, ती अंगभूत असेल तर फिरायला जा अथवा न जा तो केल्यावाचून राहवत नाही.
आगावा, सहीच !!
आगावा, सहीच !!
स्वशोध ही वृत्ती आहे, ती
स्वशोध ही वृत्ती आहे, ती अंगभूत असेल तर फिरायला जा अथवा न जा तो केल्यावाचून राहवत नाही.>>>>>>>>>
आगावा, एकदम पटेशच
aschig आणि आगाऊ दोघांचेही
aschig आणि आगाऊ दोघांचेही बरोबर आहे. फिरण्यामुळं प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी परिमाणं मिळतात, तीच जर तुमच्या आजूबाजूचं जग मर्यादित असेल तर मिळणार नाहीत. अर्थात जगाकडे डोळे उघडे ठेवून पहायची वृत्तीच नसेल तर त्यांचा फायदा नाही हेही खरेच. (स्वत:चा शोधबिध काय माहीत नाही, हे जनरल सगळ्याच बाबतीत लिहिलंय)
या प्रकारचे लेखन आवडत असेल तर ('बेस्ट एग्झॉटिक मेरिगोल्ड हॉटेल' ज्यावार आधारीत आहे ते) "These Foolish Things" by Deborah Moggach कदाचित आवडेल. सिनेमाही बरा वाटला.
बस्के, मी आहे तुझ्याबरोबर.
बस्के, मी आहे तुझ्याबरोबर. मला आवडला होता पिक्चर. पुस्तक अजून वाचलेले नाही.
Pages