वंध्यत्व-३. पी सी. ओ. एस.

Submitted by साती on 16 May, 2012 - 05:52

वंध्यत्व ३.-पीसीओएस

या आधी कृपया हे भाग वाचा-

भाग १. प्राथमिक माहिती आणि पुरूषांमधील वंध्यत्व.

भाग २. स्त्रीयांमधले वंध्यत्व आणि मासिक पाळीचे सामान्य चक्र.

ही लेखमाला लिहायला सुरूवात केल्यावर मला सगळ्यात जास्त वंध्यत्वाबाबतीतल्या ज्या प्रश्नावर मायबोलीकरांकडून विचारणा झाली त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे पीसीओडी /पीसीओएस. अर्थात-पॉलिसिस्टिक ओवॅरियन डिसीज किंवा सिंड्रोम.

सुरूवातीला स्टीन आणि ल्यूवेंथॉल या डॉक्टरांनी जेव्हा या आजाराने पिडीत स्त्रीया पाहिल्या तेव्हा त्यांना सोनोग्राफीत या स्त्रीयांच्या बीजांडात /ओव्हरीत कित्येक पाण्याने भरलेल्या गाठी (सीस्ट) दिसल्या. या सीस्टचे निर्मूलन करण्यासाठी बीजांडांचा थोडा भाग सर्जरीने काढून टाकल्यावर त्यातील कित्येक स्त्रीयांना गर्भधारणा होऊ लागली. त्यामुळे बीजांडात सीस्ट निर्माण झाल्याने होणारा रोग म्हणून या रोगाचे नांव पॉलिसिस्टिक ओवॅरियन डिसीज म्हणजे पीसीओडी ठेवण्यात आले. ज्या दोन डॉक्टरांनी हा आजार पहिल्यांदा शोधला त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या आजाराला स्टीन ल्यूवेंथाल डिसीज असेही म्हणतात. पण कालांतराने हा आजार केवळ बीजांडातील पाण्याच्या गाठी किंवा पॉलिसिस्टिक ओवरीज इतकाच मर्यादित नसून एकाच रोगाच्या विस्तृत पटलाचा हा केवळ एक भाग आहे हे लक्षात आले.

लक्षणे
या आजाराने पीडित महिलांमध्ये खालील लक्षणे दिसतात.

१.पाळीच्या सामान्य नियमित चक्रातील बदल

-बहुतेक मुलींना पहिली पाळी (मिनार्की) अगदी वेळेवर येते पण नियमित अश्या २-३ पाळ्या येऊन गेल्यावर पाळी बर्‍याच महिन्यांत येत नाही/ फार पुढे जाते.

-अनियमित/अनैसर्गिक पाळी - वारंवार किंवा फार कालावधीने पाळी येणे.रक्तस्त्राव अगदीच कमी किंवा खूपच जास्त होणे.

२.पुरुषीपणा(विरिलायजेशन)

-स्तनांचा आकार अचानक कमी होणे
-आवाज जास्तच घोगरा/पुरुषी होणे
-क्लायटोरिसचा आकार मोठा होणे
-छाती,पोट,चेहरा आणि स्तनाग्रंभोवती अतिरीक्त/पुरूषांसारखे केस वाढणे.
-टक्कल पडणे(मेल पॅटर्न बाल्डनेस)

३. त्वचेतील इतर फरक

-खूप जास्त प्रमाणात चेहरा/पाठ इथे मुरमे वाढणे.
-मानेचा मागचा भाग,बगला,मांड्यांमधला भाग इथे काळ्या रंगाच्या जाडसर वळकट्या(अकँथोसिस) पडणे.

Acanthosis-Nigricans-300x200.jpg४.चयापचयावर परिणाम (मेटॅबोलिक इफेक्ट) -इंस्युलिन्स रेजिस्टन्समुळे जाडी वाढणे आणि त्यामुळे मधुमेह,रक्तदाब इ.आजार.

इथे हे लक्षात घेणे जरूरीचे आहे की अगदी पूर्ण नॉर्मल मुलींनाही सुरूवातीच्या काही काळात पाळी अनियमित येऊ शकते. तसेच हा आजार कधीही उद्भवू शकतो,अगदी एक-दोन सामान्य बाळंतपणे होऊन गेल्यावर सुद्धा!

बर्‍याचदा स्त्रीया एक-दोन मुले असल्यास या आजाराचे उपचार घेण्यात टाळाटाळ करतात,पण असे करु नये कारण डायबेटिस / थायरॉईडसारखाच हा सुद्धा
जवळपास शरीरातल्या प्रत्येक भागावर परिणाम करणारा आजार आहे.
योग्य त्या उपचारांअभावी खालील दुष्परिणाम होऊ शकतात.

१.वंध्यत्व- अनियमित बीजमुक्तीमुळे गर्भधारणा होण्यात अडथळा येऊन वंध्यत्व.
२.गर्भाशयाच्या अंतर्पटलाच्या कर्करोगाची(एन्डोमेट्रिअल कॅन्सरची)शक्यता वाढते.
३.जाडी वाढल्याने अतिरक्तदाब, डायबेटिस आणि हृदयरोगांची शक्यता वाढते.
४.स्तनांच्या कर्करोगाची शक्यताही वाढते असे एका अभ्यासात दिसून आलेय.

सिंड्रोम आणि रोग या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सिंड्रोम म्हणजे वेगवेगळ्या लक्षणांचा एक आजार समुह. या पीसीओएस मध्ये इतकी विविध लक्षणे आढळतात की २००३ पासून तज्ज्ञांनी खालीलपैकी २ लक्षणे आढळल्यास अशा आजारास पीसीओएस म्हणावे असे मान्य केले आहे.( European Society for Human Reproduction and Embryology (ESHRE) and the American Society for Reproductive Medicine (ASRM) )

१. अल्पबीजमुक्ती/अबीजमुक्ती (Oligo-ovulation or anovulation)- दोन पाळ्यांमधील काळ वाढणे किंवा अजिबात पाळी न येणे(oligomenorrhea or amenorrhea)

२.पुरूषी आंतर्स्त्राव वाढणे(Hyperandrogenism )- वर उल्लेखिल्याप्रमाणे पुरूषी बाह्यशरीरलक्षणे वाढणे किंवा पुरूषी स्त्रावांचे रक्तातील प्रमाण वाढणे.

३. सोनोग्राफीमध्ये बीजांडात द्रवपदार्थ भरलेले असंख्य कोष (सिस्ट) दिसणे-Polycystic ovaries

थोडक्यात पीसीओएस असण्यासाठी दरवेळेस सोनोग्राफीमध्ये असंख्य सीस्ट दिसतीलच असे नाही.

पीसीओएसची कारणे-

पीसीओएस या आजाराचं नेमकं कारण आजतागायत कळलेलं नाही. हा आजार वंशपरंपरागत असू शकतो पण असेलच असेही नाही. सध्या या आजाराच्या वाढत्या प्रमाणाचे एक मुख्य कारण आहार आणि जीवनशैलीतील बदल असावे हे सुचवले जाते.
मानवी शरीरात स्त्री आणि पुरूष या दोन्ही प्रकारचे आंतर्स्त्राव दोघांतही कमी अधिक प्रमाणात असतात. पण काही ठराविक गुणसूत्रांमुळे कोणते स्त्राव स्त्रीयांत आणि कोणते स्त्राव पुरूषांत जास्त प्रमाणात असावे हे ठरते.
तसेच शरीराच्या इतर पेशीत असणारे रीसेप्टर (जे 'वरून-मुख्य न्यूरोहार्मोनल सिस्टीमकडून' आलेल्या संदेशांचे ग्रहण करून त्याबरहुकूम कार्यवाही घडवून आणतात त्यांचे पेशीतील प्रमाण आणि संवेदनशीलताही स्त्री पुरुष शरीरात वेगवेगळी असते. ओव्हरी,टेस्टीज या खेरीज किडन्यांच्यावर असणारी छोटीशी सुप्रारिनल किंवा अ‍ॅड्रिनल ग्रंथीही पुरूषी प्रकाराची काही संप्रेरके बनवते.

सामान्यतः निसर्गाचे या सगळ्यांच्या समन्वयाचे एक चक्र असते पण काही जनुकीय घटकांमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे हे चक्र बदलले की त्याचे परिणाम असे पीसीओएसच्या स्वरूपात दिसून येतात.

(संप्रेरकांचे दळणवळण आणि कार्य हा फारच कीचकट आणि मनोरंजक विषय असला तरी एवढं तपशीलात जाणं इथे मला शक्य नाही. कुणाला अधिक कुतूहल असेल तर नेटवरून अधिक माहिती मिळवून वाचता येईल.)

पीसीओएस रुग्णांकरिता चांचण्या-

या आजाराचे निदान बहुतांशी याच्या लक्षणांवरूनच केले जाते. तरीही काहीवेळा थायरॉईड, मेटॅबोलिक सिंड्रोम, अ‍ॅड्रिनल ट्यूमर, प्रायमरी ओवॅरियन फेल्युअर अशा आजारात याच्या लक्षणांची सरमिसळ झालेली असते.
रूग्ण जेव्हा डॉक्टरकडे जाते तेव्हा खालील गोष्टींसाठी चाचण्या केल्या जातात

१.हा आजार नक्की पीसीओएस हाच आहे का?
२.आजाराची तीव्रता किती आहे?
३.त्यामुळे वर उल्लेखिलेल्या डायबेटिस,कॅन्सर अशा काही गुंतागुंती झालेल्या आहेत का?

रक्तचांचण्या-

१.खाण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतरची रक्तशर्करा (fasting and post prandial blood sugar) आणि रक्तातील विविध प्रकारच्या कॉलेस्टरॉल्सचे प्रमाण (fasting lipid profile)- इंस्युलिन रेजिस्टन्स असेल तर पीसीओएसमध्ये हे प्रमाण वाढलेले असेल.

2. फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग आणि ल्यूटिनायजिंग हार्मोन्स (FSH, LH, LH/ FSH ratio)-
पीसीओएस मध्ये एलएच वाढते आणि एफ एस एच नॉर्मल किंवा कमी होते. एल एच /एफ एस एच हा रेशो ३ पेक्षा जास्त येतो.

3. डी एच ई ए आणि टेस्टेस्टेरॉन या पुरूषी संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण (DHEA and testesterone level)-
हे नॉर्मलपेक्षा पीसीओएस मध्ये खूप वाढलेले असते. पण टेस्टेस्टेरॉनची लेव्हल १५० पेक्षा जास्त असेल तर ओवरी किंवा अ‍ॅड्रिनल्स यांच्या ट्यूमर आणि कॅन्सरची शक्यताही पडताळावी लागते.

4. थायरॉईड आणि थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स (T3,T4,TSh)- थायरॉईडच्या आजारात जाडी वाढणे,साखर वाढणे काही वेळा दिसून येते. पण थायरॉईडच्या आजारात या हार्मोन्सचे रक्तातील प्रमाण खूपच बदललेले असते. पीसीओएस मध्ये सामान्य असते.

5. सोनोग्राफी (USG)- ओवरीतील सीस्टचे अस्तित्व, एंडोमेट्रिअमची (गर्भाशयाचे अंतर्पटल) जाडी, इतर कोणते आजार (ओवरी किंवा अ‍ॅड्रिनल्सचे ट्यूमर) आहेत का हे बघण्यासाठी

6. कंप्युटराईज्ड टोमोग्राफी CT/ मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग MRI -ज्यावेळी वरिलपैकी कुठल्या कॅन्सरची शक्यता असेल तर त्याचा प्रसार पाहण्यासाठी.

उपचार-
या आजाराच्या उपचारांची ही मुख्य उद्दिष्टे असतात-

१.पाळी नियमित करणे
२.पुरूषी लक्षणे दूर करणे
३.मेटॅबोलिक दुष्परिणाम-रक्तदाब, रक्तशर्करा,जाडी नियमित करणे.
४.गर्भाशयाच्या कॅन्सरला आळा घालणे
५.बीजमुक्ती नियमित करून वंध्यत्व दूर करणे.

त्यामुळेच केवळ वंध्यत्वनिवारणासाठीच नव्हे तर वरिल सगळ्या गोष्टींसाठीही या आजाराचे योग्य निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे.

१. जेव्हा अविवाहित / विवाहित पण अद्यापि मूल नको असलेल्या मुली आमच्याकडे उपचारांसाठी येतात तेव्हा पाळीत नियमितता आणणे आणि पुरूषी लक्षणे दूर करणे हे महत्त्वाचे ठरते. अनियमित पाळीमुळे या मुलींच्या खेळ, अभ्यास, परीक्षा, फिरणे अश्या गोष्टींवर खूपच मर्यादा येतात. पुरूषी लक्षणांमुळे आत्मविश्वास जातो, समाजात अवहेलना होते आणि लग्नंही जुळत नाही. यावेळी सर्वप्रथम गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात. या गोळ्यांत असणार्‍या ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरोन या स्त्री संप्रेरकांमुळे स्त्रीयांमधिल पुरूषी लक्षणे दूर व्हायला मदत होते आणि स्त्री शरीरलक्षणांमध्ये सुधारणा होते. या गोळ्या सतत २१ दिवस घेउन नंतर त्या थांबवून रक्तस्त्राव होऊ दिला जातो. यामुळे दोन फायदे होतात, एकतर सततच्या स्त्री संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रभावामुळे होणार्‍या गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता कमी होते. ठराविक काळामध्ये पाळी येत असल्याने स्त्रीला आयुष्यही सामान्यपणे जगता येते.
अर्थात ज्या स्त्रीयांना लगेच बाळ हवे आहे त्यांच्यावर या प्रकारचे उपचार करता येत नाहीत.

२. ट्रीटमेंट सुरू होण्याआधीच वाढलेले अनावश्यक केस हेअर रिमूविंग क्रीम,ब्लीच, वॅक्सिंग किंवा इलेक्ट्रोलिसीस्/लेझर या प्रकारांनी कमी करावे किंवा लपवावे लागतात.

३. मुरूमांचे प्रमाण कमी करण्यासाठी चर्मरोगतज्ज्ञांच्या साहाय्याने वेगवेगळे उपचार घ्यावे लागतात.

४.मेटफॉर्मिन - सहसा हे औषध डायबेटिसच्या उपचारात वापरले जाते. पण अभ्यासात असे आढळून आले आहे की डायबेटिस नसतानाही जर पीसीओडीच्या रूग्णांत हे औषध वापरले तर रक्तातील साखर आणि कॉलेस्टरॉल आटोक्यात ठेवण्यात मदत होते. वजन आणि रक्तदाबही कमी होतो. तसेच पुरूषी संप्रेरकांचे प्रमाणही कमी होते.
जरी अमेरिकेत सर्वच पीसीओएस रुग्णांना मेटफॉर्मिन सुरू करत नसले तरी इथे भारतात बरेच जण करतात. मी तरी पीसीओडी लक्षणे आढळणार्‍या मुलींनाही कमी प्रमाणात २५० मिग्रॅ/प्रतिदिन का होईना हे औषध सुरू करते. निकाल चांगले आहेत. बर्‍याच वेळा नुसत्या या औषधाने बीजमुक्ती (ओव्यूलेशन) रेग्युलर होऊन पाळी नियमित झालेली दिसते. एवढेच नव्हे तर हे औषध घेणार्‍या स्त्रीयांना जर गर्भधारणा झाली तर त्यांना पीसीओएस
रूग्णांना गर्भारपणात होणारा डायबेटिस (गेस्टेशनल डीएम) होण्याची शक्यताही नऊ पटीने कमी होते.
(अर्थात माझ्या प्रॅक्टीसमध्ये मी अजूनतरी गरोदर स्त्रीयांना मेटफॉर्मिन दिलेले नाही. प्रेग्नन्सी आढळल्यास इंस्युलीन इंजेक्शनच सुरू केलीयत कारण अजूनही गर्भावर मेटफॉर्मिनचे साईड इफेक्ट होतच नाहीत याचे काही ठोस पुरावे नाहीत.)

५.ओव्यूलेशन इंडक्शन-
बर्‍याचवेळा मेटफॉर्मिननंतर ओव्यूलेशनची प्रक्रिया सुधारलेली आढळते. त्यानंतर क्लोमिफेन हे औषध वापरले जाते.
हे औषध नोनस्टिरॉईड अँटिइस्ट्रोजेन समजले जाते. पण शरीराच्या वेगवेगळ्या भागात याचे इस्ट्रोजेन रिसेप्टरवर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. गोळाबेरिज मेंदूकडून येणारे एफ एस एच आणि एल एच यांचे प्रमाण सुधारून ओवरी ओव्यूलेशन करायला सज्ज होतात.
एकदा का पाळी आली की पाळीच्या पाचव्या दिवसापासून पुढचे ५ दिवस ५० मिग्रॅ क्लोमिफेन दिले जाते. त्यानंतर सोनोग्राफी करून ओव्यूलेशन प्रक्रिया सुरू झालीय की नाही हे पाहिले जाते. काही ठिकाणी रक्तातील
एफ एस एच आणि एल एच यांचे प्रमाणही सतत तपासले जाते. जोडप्याला योग्यवेळी शारिरीक संबंध ठेवण्याची सूचना केली जाते किंवा पुरूषाचे वीर्य सिरी़ंजद्वारा स्त्रीच्या गर्भात (IUI technique) सोडले जाते.जर असिस्टेड रिप्रोडक्टीव टेक्निक वापरायचे असतील (उदा आय वी एफ) तर अशाप्रकारे ओव्यूलेशन स्टिम्यूलेट करून स्त्रीबीजे पुढिल प्रक्रियेसाठी मिळवली जातात. (एग हार्वेस्टिंग).
या क्लोमिफेनचे खूप साईड इफेक्ट आहेत अर्थात.सगळ्यात महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे एकदम ४-५ बीजे मुक्त होऊन (हायपर स्टिम्यूलेशन) एकाचवेळी खूप भ्रूण तयार होतात. नुसती जुळी तिळी नव्हेत तर काही वेळा अक्षरशः ७-८ मुले एकदम पोटात वाढायला लागतात. त्यामुळे डॉक्टरी सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सततच्या पर्यवेक्षणाखालीच हे औषध घ्यावे. (भारतात काही वेळा स्त्रीया इतके भयानक औषधही कुठूनतरी ओवर द काउंटर मिळवून वापरतात आणि मग उलट्या, डोकेदुखी, नजर मंद होणे इतकेच काय पण काही वेळा अतिशय हायपरस्टिम्यूलेट ओवरींमुळे जीवावरच बेतणे असे साइड इफेक्टस घेऊन आमच्याकडे येतात.)
दुसरं म्हणजे हे औषध घेण्यापूर्वी प्रजनन संस्थेचे मी या आधी सांगितलेले काही दोष,पुरूषांतील दोष यांचे योग्य ते निदान आणि उपचार करून मगच हे औषध घ्यावे. कारण एकदा ओव्यूलेशन इंड्यूस केल्यावर मग ट्यूबच ब्लॉक आहेत किंवा नवर्‍याचा स्पर्म काऊंटच लो आहे तर उपयोग काय?

५.आहार आणि व्यायाम- पीसीओएसच्या रोगपटलाचा मुख्य भाग मेटॅबोलिक असल्याने आहार आणि व्यायामामुळे या आजारात फार फरक पडतो. केवळ मूळ वजनाच्या १०% इतके वजन कमी केल्यास ओव्यूलेशनची शक्यता ४-५ पट वाढते. बाकी रक्तशर्करा,लिपीडस यांत सुधारणा होते ते वेगळेच. शक्यतो डायबेटिस टाईप २ च्या रूग्णांना सांगण्यात येणारी पथ्ये आम्ही पीसीओएस च्या रूग्णांना सांगतो.
म्हणजे तंतूमय पदार्थ-फायबर्स आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असणारे पदार्थ आहारात वाढवा. रिफाईन्ड कार्ब्स उदा साखर,मैदा यांचे आहारातील प्रमाण कमी करा. तसेच ट्रांस फॅट / सॅच्युरेटेड फॅट यांचे आहारातील प्रमाण कमी करा. थोडक्यात अकृत्रिम, नैसर्गिक-ऑर्गॅनिक आणि जास्त प्रक्रीया न केलेले पदार्थ खा.
आजकाल एकवेळ शिजवताना जास्त प्रक्रीया न केलेले पदार्थ खाणे जमेल पण हॉर्मोन प्रक्रीया, विविध प्रतिजैविके,विषारी औषधे यांचा भडिमार न केलेली फळे,भाज्या,दूध,अंडी,मांस मिळणे कठिण. तरीही थोडे तारतम्य वापरून आपला आहार सुधारण्यास रूणाला सांगण्यात येते.

आठवड्यातून किमान ५ दिवस अर्धा तास शरीरास योग्य असा व्यायाम रूग्णाला सूचविण्यात येतो.

६.शल्यचिकीत्सा (सर्जरी) - जरी सुरूवातीला ओवरींचे वेज रिसेक्शन करून ओवरीचा थोडा भाग काढून टाकणे ही उपचारपद्धती या रोगावर मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली तरी जसजसे या आजाराचे मुलभूत मेटॅबोलिक स्वरूप कळत गेले तसतसे सर्जरीचे प्रमाण कमी होत गेले.
आजकाल केवळ ओवॅरियन ड्रिलींग हा प्रकार काही वेळा वापरला जातो.

७. मानसिक उपचार- या आजारात हार्मोन्सच्या चढ उतारामुळे स्त्रीयांना खूप मोठ्या प्रमाणात डिप्रेशन, मूड स्विंग होतात. जर यात वंध्यत्व असेल तर सामाजिक दबावही जास्त असतो. अशावेळेस रूग्णाला योग्य काउंसेलिंग आणि औषधांसहित इतर मानसोपचार करावे लागतात. परदेशात याकरिता पीसीओएस सपोर्ट ग्रूप अगदी ऑनलाईनसुधा आहेत. भारतात एकंदरच मानसिक आरोग्यविषयक अनावस्था असल्याने या आजारात`रुग्णाला फार मानसिक त्रास सहन करावा लागतो.

थोडक्यात स्त्रीयांच्या चयापचयावर (मेटॅबोलीजम) परिणाम करणारा हा आजार स्त्रीयांमधील वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे. केवळ वंध्यत्व निवारण झाले की याचे उपचार पूर्ण झाले असे नसून पुढे आयुष्यभरही या रोगासाठी योग्य ती काळजी घेत राहावी लागते.

*****************************************************************************************************

१.इतका किचकट भाग सोप्या भाषेत समजावून सांगायच्या प्रयत्नात माझी फॅफॅ उडालेली आहे तरी कुणाला समजण्यात काही अडथळा असेल तर कळवावे, पुन्हा एकदा प्रयत्न करेन.
२. हा भाग समजल्याखेरिज पुढच्या असंख्य चाचण्या आणि उपचार कळणे शक्य नाही त्यामुळे थोडंफार डिटेलात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
३. शक्यतो मुख्य इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. त्यामुळे भाषांतर उगाच पुस्तकी किंवा क्लिष्ट होणार नाही. तसेच आपल्या डॉक्टरशी चर्चा करताना आपल्याला भाषेचा/शब्दांचा अडथळा येणार नाही. तसेच नेटवरून इंग्रजी संकेतस्थळावर संदर्भ शोधणे सोप्पे होईल.
४.माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत किंवा मला जे माहिती आहे ते सगळेच इथे लिहिणे शक्य नाही तेव्हा योग्य संदर्भ मिळवून सखोल माहिती पाहिजे असल्यास ती मिळवायला हे प्राथमिक ज्ञान म्हणून उपयोगी पडेल. बाकी बाबतीत आपले डॉक्टर आपल्याला मदत करतीलच.
५. माझी ही माहिती पुरवायची धडपड आणि कष्ट लक्षात घेता कुणी ही माहिती कॉपी पेस्ट करुन वापरल्यास/ फॉर्वर्ड केल्यास कृपया "मायबोलीवरिल डॉ. साती " या आयडीला थोडंसं क्रेडिट द्यायला विसरु नका. Happy
६. कृपया मुद्रितशोधनातील चुका कळवा, मला वेळ मिळताच योय तो बदल करेन.
७. या मालिकेतील लेखांचा उद्देश केवळ वंध्यत्वाशी संबंधित आजारांबद्दल प्राथमिक माहिती देणे हा आहे. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

**************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

hcg trigger shot 5000 घेउन हि ovulation न होता cyst बनत असेल तर हा LUFS चा प्रकार असू शकतो का?

भाग्यश्री अमित, तुम्ही हा लेख पूर्ण वाचला नाहित की वाचूनही तो कळला नाही?
मी वरच्या लेखात उपचारांविषयी लिहिलंय की!

साती,
आणि त्याच बरोबर जर गजकर्न, नायटा, खरुज यावर काहि उपाय महिति आसेल तर सन्गा

भाग्यश्री अमित | 31 January, 2013 - 10:22
पीसीओडी कशाने कमि होते त्या साठि वेगळे कोणते उपाय आहेत का
<<
भाग्यश्री अमित | 5 February, 2013 - 14:49
साती,
आणि त्याच बरोबर जर गजकर्न, नायटा, खरुज यावर काहि उपाय महिति आसेल तर सन्गा
<<
102.gif

इब्लिस,

हो पीसीओडी कशाने कमि होते त्या साठि कोणते उपाय आहेत का ते माझ्यासाठि हवे आहे आनि दुसरे माझ्या मैत्रिणि साठि हावे आहे.
ईथे विचारणे चुकिचे आहे का ??????????????
आणि हो उत्तर डॉ. साती यांना विचारले आहे.

भाग्यश्री,
कशाने कमी होते अन उपाय कोणते, ते लेखात ठळक करून "उपचार" असे लिहिले आहे तिथपासून पुढे आहे. ते कृपया वाचा. साती यांनीही आपल्याला तेच सुचविले आहे.
लाईफस्टाईल बदलणे हा उपचाराचा एक मोठा भाग असतो. पण ते असो.
*
खरूज, गजकर्ण व नायटा हे तीन वेगवेगळे त्वचारोग आहेत, तिघांचे उपचार वेगवेगळे आहेत. यासाठी त्वचारोगतज्ञांना दाखवून योग्य निदान झाल्यानंतर उपचार करून घ्यावेत हे अधिक योग्य आहे.

मैत्रिणीसाठी विचारले याचा उल्लेख पोस्टीत केला असता तर तुमचे प्रश्न इतके विनोदी अन उद्वेगजनक वाटले नसते.

साती यांना विचारलेत ते समजले, पण त्या त्वचारोग तज्ञ नाहीत हे मला ठाऊक आहे.
असो.

LUFS ?

मी नायट्या पेक्षा भारी उत्तर इथे लिहिले होते, पण नेटदेवांच्या कृपेने, सेव्ह झाले नाही आणि भा.अ. वाचल्या.

majhe lagn houn 2 varsh hotil.. balasathi khup try karte aahe... doctor suddha kele.... mala bal honyasathi mi kay karu...

डॉ. साती व इब्लिस
मी डॉ.कडे तपासणी सुरू केली आहे.त्यांनी प्रथम नवर्याची धातु तपासणी केली ती नॉर्मल आहे.आता मला फॉलीकच्या गोळ्या दिल्या आहेत.पुढची पाळी आल्या नंतर HSG ची टेस्ट करायला सांगितले आहे.मला हे विचारायचे आहे की,जर ही तपासणी केल्यानंतर काही ब्लॉकेज आढळले तर ऑपरेशन करावे लागते का? ते कशा पद्धतीचे असते व कीती तिव्र असते?

कृपया प्रतिसाद द्या.

Hysterosalpingography टेस्ट बद्दल कोणाला माहीति असल्यास द्यावी.

Mi Janavi.. tumcha lekh vachala.. khupach chaan vatale... kadhipasun vicharen mhanatey...madam majhe lagn houn 2 year jhale... doctor suddha kele... kahi gun aala nahi.. dr. ne sangitale ki majhya Mr.che sperm count low aahe... tablets ghetalyamule sperm count changale means high jhale.. majhi 3 vela follicle study (sonography) keli..tevha bij tayar houn raptured hot navate, 3 vela asech jhale ..... 4th time dr.ne raptured honyasathi injection dile aani tevha relation thevayala sangitale.. jase dr.ne sangitale tase mi suddha follow kele..pan tari suddha preganancy rahile nahi....
Ase ka hote... pls mala sanga....

जर ट्रेकींग किंवा कोणताही शारीरीक व्यायाम सवयीचा भाग असतो तेव्हा आपले शरीरही त्याला नॉर्मल रूटीन म्हणूनच स्विकारते त्यामुळे त्याचा इफेक्ट ओव्युलेशनवर होणार नाही.
पण केव्हातरी एकदाच ट्रेकींगच काय कोणतीही हेवी अ‍ॅक्टिविटी किंवा मानसिक ताण असेल तर शरीराचे न्यूरोह्युमोरल अ‍ॅक्सिस विचलीत होऊन ओव्युलेशन पुढेमागे होऊ शकते.

Dr. Sati,

IUI done on 7th Aug,13 & period date is 23rd Aug,13
but till date periods not started , I have taken Pregnancy test at today morning but it's negative.
Pl. suggest I have to wait OR doctor visit?

Chinki, wait for atleast 10-12 days before taking preg. test.>>>+१

चिनिक मी पिरेडच्या ८ दिवसानंतर टेस्ट केली ति ही निगेटिव आली होती. म्हणुन डॉ.ने रक्त तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा ती तपासणी पॉसिटिव आली.म्हणून साधारण १२-१५ दिवसांनीच तपासणी करा.शुभेच्छा.

चिंकी बीटा एचसीजी ही ब्लड टेस्ट करा. आययुआय झाल्यावर १५ दिवसांनी ही टेस्ट करायला डॉ. ने सांगितले असेल ना?
तुम्हाला जर संशय असेल की तुम्ही प्रेग्नंट आहात तर लवकरात लवकर ही टेस्ट करा. या टेस्टमुळे प्रेग्नंसी कन्फर्म होईल. दुसरे म्हणजे डॉ. प्रेग्नसी रिलेटेड औषधे सुरु करतील त्याने बाळाला वाढायला मदत होईल. तिसरे म्हणजे जर एक्टोपिक प्रेग्नंसी वगैरे असेल तर लवकर लक्षात येईल आणि पुढचा खुप मोठा त्रास वाचेल.

मी हा लेख फेसबुकवर तुमच्या नावाने नक्की शेअर करेन. मी एक ग्रुप बनवला आहे, सखी सहेली म्हणून, त्यात. तुमचा फेसबुक आयडी कळला तर तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करेन. आणि टॅग करेन.

वल्लरी, माबो संपर्कातून मेल पाठविल्यास मला इमेलमध्ये येईल.
दुसर्या कुण्णाकुण्णाला कळणार नाही विपू दिसते तशी.
मात्रं पर्सनल प्रश्न असतील तर तुमच्या डॉकनाच विचारा.
जनरल प्रश्न असतील तर इथेच विचारायला हरकत नाही म्हणजे उत्तरांचा फायदा सर्वानाच होईल.

लॅप्रोस्कोपी बद्दल विचारायचे होते...
मोस्ट्ली मुलं राहताना प्रॉब्लेम असेल तर करतात असं वाटत..
पण जर मुल झाली असतिल, वेट पण कंट्रोल मध्ये आहे...
खाण्या पिण्याची पथ्ये पाळुन सुद्धा जर पाळी नियमित होत नसेल तर हा (लॅप्रोस्कोपी) पर्याय आहे काय?

..

Pages