आपण किती तक्रारी करत असतो सतत. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही म्हणून. नोकरी-धंद्यात प्रश्न उभे राहिले म्हणून. आर्थिक आणि शारिरिक दुखणी उद्भवली म्हणून. वीज-रस्ते-पाणी भरपूर मिळत नाही म्हणून. सरकार आणि प्रशासन नालायक आहे म्हणून. प्रेमभंग झाला म्हणून आणि आज जेवण फार बरं नाही मिळालं म्हणूनही.
खरं तर हे सारं आपण हातीपायी धड असतो म्हणून. तसे नसतो तर काय झालं असतं? सोपं आहे- देवाने दुसरं काही दिलं नाही तरी चालेल, पण हे नशीबात नको द्यायला होतं- असं रोज वाटलं असतं.
वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सटाण्याच्या अपंग कल्याण केंद्राला भेट दिली तेव्हा तिथल्या सामान्य-निरोगी आयुष्याचा, समाजात इतरांच्या बरोबरीने जगण्याचा मिसळण्याचा हक्क नाकारल्या गेलेल्या दुर्दैवी जीवांना बघितलं आणि अक्षरशः मिटून जायला झालं. आपण सुदैवी असल्याच्या जाणीवेबरोबरच निसर्गाशी लढाई करत आनंदाने जगणार्या या शेकडो मुलांना बघून अंतर्मुख व्हायला झालं.
साधारण दीड तपापूर्वी पुण्याच्या मामासाहेब मोहोळ प्रतिष्ठानने ही निवासी अपंग शाळा सटाण्यात सुरू केली, तेव्हापासूनच प्रवास आपल्याला थक्क करून टाकतो. झोकून देऊन काम करणार्या इथल्या शिक्षकांनी अन कार्यकर्त्यांनी गावोगावी खेडोपाडी फिरून अपंग मुलं गोळा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अनेक ठिकाणाहून हाकलून देण्यात आलं. कारण ही कुटुंब गरीब होती आणि जमेल तसं काम करण्यात आणि भीक मागण्यातही या दुर्दैवी मुलांची त्या कुटुंबांना मदत होत होती. शालेय शिक्षण तर या मुलांपासून लाखो मैल दूर- अशी परिस्थिती.
केंद्राला जागा कशीबशी मिळाली, पण त्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला. इमारत बांधणे, शाळेची आणि अपंगांसाठी लागणारी साधनसामग्री, त्यांचं रोजचं जेवण, कपडे आणि इत्यादी लाखो गोष्टी सरकारी अनुदानाशिवाय कशा उभ्या करायच्या हा यक्षप्रश्न पुण्यामुंबईनाशिकच्या तसंच स्थानिक देणगीदारांनी हळुहळू सोडवायला सुरूवात केली. हा सारा प्रवास खरं तर चार ओळींत लिहिता येण्यासारखा नाहीच.
सरकारी अनुदान तर आजही नाही, आणि कधी मिळेल तेही सांगता येत नाही. मात्र अठरा वर्षांनंतर आज संस्थेची स्वतःची मुख्य इमारत, शाळेची इमारत, व्यायामशाळा, संगणक खोली आणि यांत लागणारे बहुतेक सारं साहित्य आहे. हे सारं पाहून आता अपंग व्यक्तीच्या कुटुंबांचा विश्वास बसू लागला आहे. आपल्या दुर्दैवी मुलांच्या आयुष्यात थोडाफार उजेड भविष्यात आहे, याची खात्री वाटू लागली आहे.
काही छायाचित्रांद्वारे या संस्थेची ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न.
***
संस्थेच्या आवारात प्रवेश केल्यानंतरची ही दर्शनी इमारत. सगळीकडे स्वच्छता, टापटीप आणि नीटपणा डोळ्यांत भरण्याजोगा. ही साफसफाई जमेल तशी मुलंच करतात. शिक्षक आणि स्वयंसेवक त्यांना मदत करतात.
त्याशेजारची शाळेची इमारत आणि मैदान. जमेल तशी सजावट आणि नेटकेपणा इथंही आहे. कचरा नावालाही नाही.
मुलांनी स्वतः खपून संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी बाग तयार केली आहे, जपली आहे.
शालेय शिक्षणापुरतंच मुलांना मर्यादित न ठेवता इथून ती बाहेर पडतील तेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील अशा प्रकारे इथल्या व्यावसायिक शिक्षणाचंही डिझाईन करण्यात आलं आहे. संगणक प्रशिक्षण हा त्यातलाच एक भाग. हे सारं अर्थातच ठिकठिकाणच्या देणगीदारांच्या कामातूनच उभं राहिलं आहे.
व्यायामासाठी जागा. ही सजवलीही आहे मुलांनीच इथल्याच एका चित्रकार शिक्षकांच्या मदतीने.
इथलं साहित्य आणि उपकरणं अशीच कुणीकुणी दिलेली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही फिजिओथेरपिस्ट इथं नेमाने येऊन मुलांकडून व्यायाम करून घेतात. आजवर कधीच उभं राहू न शकलेली मुलं स्वतःच्या पायांवर उभं राहतात तेव्हाचा आनंदाची तुलना कशाशी करता येईल बरं?
सांगितल्याबरहुकूम व्यायाम करून दाखवला की मग खाऊ, बक्षिस. म्हणजे काय, आनंदच. पण कधी तरी उभं राहता येईल- या आशेचा आनंद जास्त मोठा!
निवासाची जागा. आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहणारी आनंदी मुलं.
इतर शाळांत होतात तसे इथेही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम वेळोवेळचं औचित्य साधून होतात. कुणाचा नाच छान आहे, तर कुणाचा आवाज दैवी. कुणी नाटकबाज आहे तर कुणी भाषणबाज..!
अपंग दिनानिमित्त खास स्पर्धाही होतात. जिल्ह्याच्या आणि राज्यस्तरीय स्पर्धांतूनही बाजी मारलेले काही बहाद्दर. यांना दुर्दैवी तरी कसं म्हणावं?
आणि यांत बक्षिसं आणि प्रशस्तीपत्रं मिळाल्यावर झालेला डोंगराएवढा आनंद!
ही दिनचर्या. सार्यांची पाठ आहे अगदी. आपण कुणी पाळतो एवढ्या काटेकोरपणे अशी दैनंदिनी?
ही भोजनशाळा. जेवायला बसायच्या आधी नित्यनेमाने श्लोक, प्रार्थना.
मुख्य इमारत, शाळा, भोजनालय, स्वच्छतागृहे, झोपण्याच्या खोल्या आणि सगळ्या परिसरात मुलांना आधारासाठी अशी हँडरेल्स लावली आहेत.
आपल्याला असतो तसा त्यांनाही मोकळा वेळ असतोच की. मग ही मुले असं खेळून स्वत:ला आणि एकमेकांना रिझवतात. इतकंच काय, पण कधी दंगाही करतात!
झेंडावंदन. स्वत:च्या पायावर धड उभं तर राहायचं आहेच, पण देशाबद्दलही काहीतरी वाटतंच आम्हाला. काय वाटतं ते वेळ आल्यावर करूनच दाखवू थेट.
आमच्या हातात कलाही आहे म्हटलं. शोभेच्या वस्तू बनवण्यापासून रोपं तयार करण्यापर्यंत अनेक कामं आम्ही दिवसभर करत असतो. इतकंच नाही, तर आम्ही केलेल्या वस्तू चक्क विकल्याही जातात. बघायचंय? हसू नका. शाबासकी द्या.
काही नाही. या जगातलं आमचं स्थान शोधतोय. चिंता नको. आम्ही तयार करूच ते, नसलं तरी.
ही घ्या पोझ! मी माझ्या पायावर उभा आहे. आनंदात आहे. सध्या फोटोच काढा. भविष्यात यालही एखादे वेळेस माझ्याजवळ ऑटोग्राफ घ्यायला!
***
बर्यापैकी सुसज्ज परिपूर्ण असं हे निवासी अपंग कल्याण केंद्र असलं तरी अजून निधीची आवश्यकता आहे. अनेक गोष्टींबाबत वस्तुरूप मदत अजून हवी आहे. महिन्याला लाखो रुपये खर्च असणार्या या केंद्रात सध्या शंभराच्या वर मुलं आहेत आणि दहावीपर्यंत शाळा आहे. जवळपास चारशे मुलं आजवर इथून बाहेर पडली आहेत, आणि त्यातली काही उच्चपदस्थही आहेत. बाकीची समाधानाने आणि मानाने समाजात जगत आहेत.
दुर्दैवी मानल्या जाणार्या मुलांना मानाने जगण्याचा, शिक्षणाचा, रोजगाराचा आणि प्रतिष्ठेचा हक्क देणार्या या अशा संस्था म्हणजे आमची मंदिरं आहेत. नतमस्तक व्हायला यापेक्षा चांगली जागा ती कोणती सापडणार?
***
***
हृदयस्पर्शी लेख वाचून
हृदयस्पर्शी लेख वाचून गलबलले
धन्यवाद या माहितीसाठी
साजिरा डोळे पाणावले. मागे
साजिरा डोळे पाणावले.
मागे आमच्या येथिल मतीमंद मुलांच्या शाळेला आम्ही भेट दिली तेंव्हाही अशीच अवस्था झाली होती. आणि त्या शिक्षकांविषयी फार आदर वाटतो. खुप सोशीकता असावी लागते ह्या मुलांना सांभाळण्याकरीता.
छान
छान
सुरवातीला काळजात चर्र झाले
सुरवातीला काळजात चर्र झाले होते..!
एवढी गोड मुलं... स्वतःच्या कमीपणाबद्दल चेहर्यावर लवलेशही नाही... उलट शिकण्याची जिद्द आणि आत्मविश्वास पाहुन कौतुक वाटते. त्यांच्या जिद्दीला आणि शाळेच्या मॅनेजमेंटला, शिक्षकांना सलाम!!!
अतिशय प्रेरणादायी. इथे माहिती
अतिशय प्रेरणादायी.
इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, साजिरा.
नतमस्तक व्हायला यापेक्षा
नतमस्तक व्हायला यापेक्षा चांगली जागा ती कोणती सापडणार? >>>
इथे ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
साजिरा इथे या संस्थेची ओळख
साजिरा
इथे या संस्थेची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. किती नीट्नेटका ठेवलाय सगळा परीसर. बघूनच एकदम प्रसन्न वाटते.
धन्यवाद, साजिरा..
धन्यवाद, साजिरा..
धन्यवाद या माहितीसाठी
धन्यवाद या माहितीसाठी
धन्यवाद साजिरा.
धन्यवाद साजिरा.
धन्यवाद साजिरा इथे या
धन्यवाद साजिरा इथे या संस्थेची माहिती व ओळख करून दिल्याबद्दल! महाराष्ट्राच्या अंतर्भागात अशी कितीतरी मुले आहेत ज्यांच्यापर्यंत आपले मदतीचे, आधाराचे हात पोचू शकले तर त्या मुलांच्या आयुष्याला खरोखर चांगले वळण मिळू शकेल. या शाळेत वाचनालयाची सुविधा कशी आहे? आपण त्यांना पुस्तकरूपाने तर मदत करू शकतोच, शिवाय त्यांना ज्या वस्तूंची मदत हवी आहे त्यांबद्दल कळाले तर तशीही मदत उभारू शकतो.
जबरदस्त जिद्द.. हे असे पाहिले
जबरदस्त जिद्द..
हे असे पाहिले की आपले खुजेपण लक्ष्यात येते.
अतिशय प्रेरणादायी, फोटोसहीत
अतिशय प्रेरणादायी, फोटोसहीत छान माहिती..
धन्यवाद ...
धन्यवाद साजिरा...
धन्यवाद साजिरा...
धन्यवाद साजिरा! ह्या संस्थेची
धन्यवाद साजिरा! ह्या संस्थेची माहीती दिल्याबद्दल. अशा परिस्थितीतही त्या मुलांच्या चेहर्यावरचे हसु पाहुन त्यांचे कौतुक वाटते. छान माहीती दिलीत.
अरुंधती, अपंग शाळेचे
अरुंधती, अपंग शाळेचे व्यवस्थापक श्री. गिरी (फोन- ९४४२२७५५४९२) आणि मुख्याध्यापक श्री. धोंडगे (फोन- ९८९०५१८५२७, ०२५५५-२२५०३३) यांनी वरील प्रश्न इथे उपस्थित केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले आहेत.
वाचनालय उभारण्याचा काही वर्षांपुर्वी प्रयत्न झाला होता, मात्र तेव्हाच्या (शाळेचं, व्यायामशाळेचं, फिजिओथेरपीचं, भोजनशाळेचं, निवासी खोल्यांचं इ. सामान) निकडी यापेक्षा जास्त महत्वाच्या असल्याने ते काम मागे पडलं. इथली मुलं ५ ते १६ वर्षे या गटातली आहेत. त्यांना वाचनालयाची अवांतर पुस्तकांची अर्थातच गरज आहे.
सध्या या संस्थेला खालील बाबतीत वस्तुरूप मदत हवी आहे. संस्थेत सध्या अंदाजे १०० मुलं आहेत.
१) मुलांच्या झोपण्यासाठी बेड्स मिळालेत, मात्र गाद्या अजून नाहीत. खूप जाड नसलेली साधी, वॉटरप्रुफ कव्हर असलेली फोमची गादी अंदाजे १००० ते १२०० रु. पर्यंत जाईल असा अंदाज.
२) साधे पण टिकाऊ एकरंगी बेडशीट्स तसेच पांघरूणे.
३) शाळेचे गणवेश. गणवेशाव्यतिरिक्तही कपडे, नाईट ड्रेसेस मिळत असतील, तर हवेच आहेत. ही सारी मुलं गरीब कुटुंबातली असल्याने त्यांना त्यांच्या घरून काहीही मिळत नाही.
४) वह्या, पुस्तकं व इतर शालेय साहित्य. जूनमध्ये नवीन वर्ष सुरू होईल, त्याच्याआधी हे कुठूनतरी आणावे लागेल. दरवर्षाप्रमाणे त्यासाठी संस्थेचे प्रयत्न चालू आहेतच.
५) वाचनालय झाल्यास पुस्तकांसाठी कपाट. शिवाय इतर काही सामान ठेवण्यासाठीही कपाटं.
साजिरा, धन्यवाद या
साजिरा, धन्यवाद या माहितीबद्दल. मायबोलीवरच काहीजणांशी / जणींशी गरजू संस्थेला पुस्तक रूपाने मदत करता येईल का, याबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या संदर्भात ही माहिती उपयुक्त ठरेल. संबंधितांना कळवत आहे.
साजिरा, अतिशय प्रेरणादायी
साजिरा, अतिशय प्रेरणादायी माहिती! धन्यवाद!
साजिरा, धन्यवाद इथे शेअर
साजिरा, धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
मदत करायला नक्की च आवडेन.
नतमस्तक व्हायला यापेक्षा चांगली जागा ती कोणती सापडणार?>> +१
साजिरा धन्यवाद.
साजिरा धन्यवाद.
संयुक्ता तर्फे महिला
संयुक्ता तर्फे महिला दिनानिमित्त गरजु संस्थेला मदत करण्याचा जो उपक्रम राबवला गेला, त्याबद्दल इथे लिहिले आहे. http://www.maayboli.com/node/33264
ह्या उपक्रमांतर्गत पुणे येथील मुलींच्या अंधशाळेला मदत केली गेली व त्यानंतर अजुन १५००० रुपये देणगी उरली आहे. सर्वानुमते उर्वरीत रक्कम वस्तुरुपाने सटाणा केंद्राला द्यावे असे ठरत आहे. साजिरा ह्यांनी ह्या संस्थेची उत्तम ओळख करुन दिली आहेच.
त्यांच्याशी चर्चा करुन केंद्राला जमतील तितकी बेडशीटस व योग्य अशी पुस्तके देण्याचे ठरवत आहोत.
सध्या संस्थेची गरज खालीलप्रमाणे,
१) बेडशीट्स- २०० मग (साधे पण टिकाऊ बेडशीट अंदाजे रु. १५० प्रतिनग)
सोलापुर चादरी (बेडशीट पण) प्रसिध्ध असल्याने मी काही दुकानदारांशी बोलुन स्वस्तात मिळतील का ती पहाणार आहे. तसेच मायबोलीवर सोलापुरचे जे आहेत त्यांच्या काही ओळखी आहेत का ते कृपया कळवा. थोडक्यात सांगायचे तर शक्यतो ज्यांच्यामुळे कमीतकमी किंमतीत जास्तीतजास्त स्वस्त व टीकावु बेडशीटस मिळतील ते शोधायचे आहे. हे फक्त सोलापुरलाच लागु नाहीतर कोणत्याही गावातुन मिळाली तरी चालेल. तर अशा तुमच्या काही ओळखी/माहिती असेल तर कृपया कळवणे.
२) संस्थेचे अजुनतरी वाचनालय नाही. मुलं ५ ते १६ वर्षे या गटातली आहेत. त्यांना वाचनालयाची, अवांतर पुस्तकांची अर्थातच गरज आहे. जुनीही अर्थातच चालणार आहेत.
साजिराची त्या मुलांबरोबर भेट झाली आहेच. त्यांनी त्या मुलांना पुस्तकाची किती नितांत आवश्यकता आहे ते सांगितले. फक्त करमणुक ह्यासाठी नव्हे तर त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी व वाढीसाठी. साजिरा ह्यांना विनंती केली की त्यांनी ते लिहावे.
कृपया पुस्तके सुचवा. ती कुठुन विकत घ्यावीत म्हणजे जास्त स्वस्त पडतील हेही माहीत असेल तर लिहा. निदान ५०-१०० पुस्तके देता आली तरी सुरुवात होईल.
हे सर्व १५००० रुपयांत होईलच असे नाही. म्हणुनच जमेल तितके करणार आहोत.
अजुनही कोणाला मदतीचा हात पुढे करायचा असेल स्वागत!
सुनिधीजी, सोलापुरी 'चादर' ही
सुनिधीजी,
सोलापुरी 'चादर' ही पांघरूण म्हणून वापरास जास्त योग्य आहे असे वाटते..
वर बदलले आहे. धन्यवाद.
वर बदलले आहे. धन्यवाद. प्रत्यक्ष चौकशी केल्यावर चित्र अजुन ठळक होईल. अजुन कुठे चांगली मिळु शकतील काही कल्पना? त्याच गावात बनलेली असली की बरे पडते.
धन्यवाद सुनिधी! पुस्तकांची
धन्यवाद सुनिधी!
पुस्तकांची नावे, सवलतीच्या दरात ती कोठे मिळू शकतील हेही कळू शकल्यास त्यानुसार ठरविता येईल.
गोड मुलं... स्वतःच्या
गोड मुलं... स्वतःच्या कमीपणाबद्दल चेहर्यावर लवलेशही नाही... उलट शिकण्याची जिद्द आणि आत्मविश्वास पाहुन कौतुक वाटते. त्यांच्या जिद्दीला आणि शाळेच्या मॅनेजमेंटला, शिक्षकांना सलाम!!!>>>++११११
अतिशय स्तुत्य काम साजिरा आणि
अतिशय स्तुत्य काम साजिरा आणि लेखही सुंदर, न जाणो तुझ्या लेख वाचुन त्यांना मदतही मिळेल.
हा बाफ वर आणायला प्रतिसाद! या
हा बाफ वर आणायला प्रतिसाद!
या मुलांसाठी चादरी (बेडशीट्स) संयुक्तातर्फे देत आहोत. कोणाला जर त्या निधीत काही ऐच्छिक भर घालायची असेल तर मला किंवा साजिराला जरूर संपर्क साधावात ही विनंती. या मुलांसाठी काही पुस्तकेही घेऊन द्यायचा विचार आहे. बघूयात कसे जमते ते.
ही निवासी अपंग कल्याण केंद्र
ही निवासी अपंग कल्याण केंद्र सटाणा यांची वेबसाईट :
http://apangsatana.com/
तिथे त्यांचे इतर तपशीलही आहेत.
संयुक्ता सुपंथ महिलादिन २०१२
संयुक्ता सुपंथ महिलादिन २०१२ गरजू संस्थेला मदत उपक्रमात जमा झालेल्या निधीतून १४,००० रुपयांच्या सोलापूर येथून खरेदी केलेल्या १०० सिंगल कॉटन प्रिंटेड बेडशीट्सची मदत सटाणा, जि. नाशिक येथील निवासी अपंग कल्याण केंद्राच्या वसतिगृहातील मुलांना करण्यात येत आहे. त्यानुसार चादरी संस्थेत पोहोचविण्यासाठी साजिरा यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत. जुलै महिना अखेरपर्यंत त्या सटाण्याच्या संस्थेत पोहोचतील. सुनिधी, साजिरा व बाकीच्या सर्व मदतकर्त्यांना हार्दिक धन्यवाद!
अपंग कल्याण केंद्राकडून मला
अपंग कल्याण केंद्राकडून मला आज मिळालेलं पत्र सर्वांच्या माहितीसाठी देत आहे.
'संयुक्ता'चे अपंग कल्याण केंद्रातर्फे आभार मानतो. तसंच अरुंधती आणि सुनिधी यांनी खूप वेळ घालवून हे काम तडीस नेलं, त्यासाठी मनःपुर्वक धन्यवाद.
Pages