आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं. त्यात मिपाच्या पाकृ लेखांनी मला चांगलच पछाडून सोडल्यानं शेवटी नाही नाही म्हणता भाताच्या ऐवजी चपात्या हा साधा पदार्थ आणि ऑम्लेटच्या ऐवजी अंड्याचे कालवण करावे असे ठरले.
मग ठरल्या प्रमाणे मी किचनकडे वळलो. पण अचानक किचनच्या दारातच मी चूळबूळत थबकलो, मनात एकप्रकारची बैचेनी वाढून, माझी छाती जोरजोरात धडधडू लागली. का कुणास ठाऊक पण मध्येच लग्न होऊन प्रथमच सासरच्या घरात प्रवेश करणार्या नववधू सारखे मला उगीच भासू लागले. त्यामुळे मनावर एकप्रकारचे दडपण आले. पण मग मी आपल्याच धडधडत्या छातीवर हात ठेवत, रडणार्या मुलीला उगी उगी म्हणणार्या वधूच्या पित्यासारखे सगळं ठिक होईल असे स्वतःला समजावत मनातील भिती आणि नर्व्हसपणा कमी करत हळूच नकळत पायाखाली नजर टाकली आणि तांदळाचा तांब्या पायाखाली नाही याची खात्री करत मग मी किचनमध्ये इंट्री केली. प्रथम टाईम मॅनेजमेंटसाठी मोबाईल पाहीला. सकाळचे बरोब्बर साढे आठ वाजले होते, चला म्हणजे स्वयंपाकाला आपणाकडे भरपूर वेळ आहे असे म्हणत मी गव्हाच्या पिठाचा डबा बाहेर काढला. तसा मला अजूनही गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठातला फरक कळत नाही, पण रोज स्वयंपाक करताना दिदिच्या जवळ हाच डबा असतो हे माझ्या चाणाक्ष नेत्रांनी मी पाहीले होते त्यामुळे हा डबा गव्हाच्या पिठाचाच आहे हे मला माहीत होते.
डब्यातले पिठ चाळणीने चाळून मग त्यात थोडे पाणी टाकून ते मी मळू लागलो. काही वेळ माझ काम अगदी सराईतपणे चालू झालं, पण पिठाच्या मनात मात्र माझ्या विरुध्द वेगळच कटकारस्थान शिजत असावं. कारण पिठ व्यवस्थितपणे मळून झालं तरीसुद्धा ते काहीस टणक वाटत होतं. त्यामुळे पुन्हा पाणी टाकून ते मी मळू लागलो पण काही उपयोग झाला नाही, शेवटी मग मळून झालेल्या पिठाला नरमपणा आणण्यासाठी आणि त्यावर मळणीचा शेवटचा हात मारण्यासाठी मी त्यावर थोडे तेल चोपडले आणि तेथेच पिठाने उग्र रुप धारण करण्यास सुरवात केली!
आगीत पेट्रोल टाकावे आणि त्याचवेळी आगीने चवताळून एकच भडका घ्यावा अशी त्यावेळी त्या पिठाची अवस्था झाली. काही क्षणांत त्या पिठाने माझ्या हाताला च्विंगम पेक्षाही भयानक असे चिटकायला सुरवात केली, त्यातून बचावासाठी मी त्यावर काही पाण्याचा शिडकावही केला पण त्याने स्थिती आणखीनच बिघडली. शेवटी कधी पाणी, कधी सुके पिठ, पुन्हा पाणी आणि पुन्हा सुके पिठ अशी क्रमाक्रमाने त्यात भर टाकत गेलो. अर्ध्या तासानंतर छोट्या दोन चपातीच्या पिठाने दुप्पट आकार घेतल्यानंतर पिठाची आग काही अंशी तरी शमली आणि तेथेच मनगट पकडून विव्हळत मी दहा मिनिटांची रेस्ट घेतली! सलग अर्धा तास नॉन स्टॉप पिठ मळत असल्याने हाताची बोटे आणि मनगट ठण्णss ठण्णss ठणकून निघत होते आणि त्यात मी अधिक वेळ रेस्टही घेऊ शकत नव्हतो; कारण ते पिठ अजुनही काहीसे टणकच राहीले होते आणि आणखी अर्धा एक तास जर मी थांबलो तर त्याच्या मला वरवंट्यानेच चपात्या लाटाव्या लागल्या असत्या!
त्यामुळे पुन्हा मी माझ्या कामाला लागलो. काही वेळ पुन्हा तेल चोपडून मी त्या पिठाला चांगले मळून-मळून काही अंशी तरी नरम करण्यात यशस्वी झालोच! पिठ मळणीच्या यशस्वी मोहीमेनंतर ते पुढीलप्रमाणे दिसू लागले. (यापुर्वीचे म्हणजेच, पिठ मळणीचे फोटो अतिशय भयानक असल्याने त्या कार्याचे फोटो काढण्याचे कटाक्षाने टाळलेले आहेत)
मळलेल्या पिठाचे चपात्यांसाठी सम-चार गोळे करण्यात आले. आहाहाss! काय ते पिठाचे गोळे चिकने दिसत होते म्हणून सांगू. ते पिठाचे आकर्षक गोळे पाहून मला तर सातारच्या गोग्गोड कंदी पेढ्यांचीच आठवण आली आणि तोंडाला भरभरुन पाणी सुटले, पण दुसर्याच क्षणी याच पिठाच्या मळणीचे आत्ताच आलेले भयानक, ताजे अनुभव आणि ते प्रसंग आठवून तोंडचे पाणी आल्या पावली तोंडाला आणि घशाला कोरड पाडून तसेच परत पळाले!
आता माझ्या कामाला खरी सुरवात झाली. तवा गॅसवर ठेऊन मी चपाती लाटायला घेतली. पण आता त्या गोळ्याने पोळपाटालाच चिकटण्याचा पावित्रा घेतला. "पिठ पोळपाटाला चिकटायला नको म्हणून त्याला सुके पिठ लावायचे असते." हे बहीणीचे कोणे एके काळी कोणालातरी सांगतानाचे अमृत बोल माझ्या कानांना आठवले आणि मग मी त्याला लग्गेच हाताने पावडर लावतात तसे पिठ लावले. पण तरी सुद्धा ते पिठ पोळपाटाला काहीसे चिकटतच होते. चपाती लाटताना स्त्रियांच्या हातात चपात्या कशा पोळपाटावर गरगर फिरतात, पण माझी चपाती गोल फिरायचे सोडाच पण तिथल्या तिथे सुद्धा हलत नव्हती. शेवटी मग ती चपाती तशीच पोळपाटावर ठेऊन चपातीऐवजी पोळपाट फिरवून मी तिला गोल आकार देऊ लागलो. काही प्रमाणात मी यशस्वी झालोही होतो पण ते पाहून मध्येच नशीबाच्या पोटात खुपलच! त्यामुळे नंतर चपाती लाटल्यानंतर चपातीने गोल आकार तर घेतला पण तो भलताच विचित्र दिसत होता. बरं असू दे असं म्हणून मी ती माझ्या आयुष्यात प्रथमच बनविलेली एकुलती एक चपाती तव्यात अंथरली!
आता चपातीचा आकार चुकला म्हणून काय एवढं पण दात काढायची गरज नाही! ही मी बनवलेली पहीलीच आणि मुख्य म्हणजे तुटून रिमेक न होता यशस्वीपणे तव्यात पडलेली चपाती आहे! ही चपाती भाजून झाल्यावर मात्र तिने अचानक आपले अंग ताठरून का घेतले(?) तेच कळाले नाही. त्यामुळेच की काय; पण म्हणून मला तिच्याकडे बघून उगीच दिवाळीच्या कडाकण्याची आठवण आली! आता बारी होती ती दुसर्या चपातीची. पहीलीचा अनुभव लक्षात घेता मी दुसरी चपाती जास्त पातळ लाटली नाही आणि त्यामुळेच ती पहीली पेक्षा थोडीशी नरम झाली.
पण येथे दोन्ही चपात्या भाजताना त्या पुर्णपणे नरमही झाल्या नव्हत्या की त्यांना पापडचा कुठे लवलेशही आला नव्हता. नाही म्हणायला पहीली चपातीच पुर्णपणे पापड झाली होती ती गोष्ट वेगळी! शेवटी तिसर्या चपातीच्या घडीला मी थोडे तेल लावले व ती लाटून तव्यात टाकली. त्यामुळे ती चपाती पहील्या दोन्हीं चपात्यांपेक्षा अधिक नरम झाली आणि म्हणून खुश होत मीच माझ्या पाठीवर थाप मारुन स्वतःला शाबाशकी दिली. एव्हाना चपातीने चपाती नामक खाद्यपदार्थाच्या गुणधर्मात दिसण्यास सुरवात केली होती.
(हा श्रीलंका नव्हे! तसा प्रश्न कोणीतरी नक्कीच काढेल, म्हणून मी ही चपाती उलटी फिरवलेली आहे)
शेवटची चपाती तव्यात टाकल्यावर मात्र मी आनंदाने टुन्नकन उडीच मारली. चौथी चपाती अक्षरशः फुगली होती! एखादी मुलगी पटल्यावर झाला नसेल एवढा आनंद मला त्यावेळी झाला.
अशा प्रकारे चार चपात्या यशस्वीपणे तयार झाल्या होत्या. म्हणजेच मिशन चपाती कंप्लिट.
सहजपणे म्हणून मी घड्याळात नजर टाकली तर बारा-वीस झाले होते. म्हणजे चार चपात्यांसाठी मला जवळजवळ तिन तास लागले होते! घड्याळाकडे दुर्लक्ष करित मी माझ्या पुढच्या मोहीमेकडे वळलो. मनात म्हटल अजुन दहाच वाजलेत अजुन खुप वेळ आहे!
अंड्याच्या कालवणासाठी प्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतले. येथेसुद्धा नवीन सुरी तिला काहीच धार नसल्यासारखी करत मला खिजवत होती. पण मी सुद्धा एकाच जाग्यावर पुन्हापुन्हा सुरी फिरवत टोमॅटो कापत होतो, त्यात कांदाही ओला असल्याने पाण्यातील माशासारखा सुरीच्या कचाट्यातून निसटून पळत होता व मिही त्याला वारंवार पकडून बळी घेणार्या कसायासारखा त्याला कापत होतो. कितीही झाले तरी आता मी कोणाकडूनही हार मानून घेणार नव्हतो. त्यामुळेच जिद्धिने आणि चिकाटीने मी माझे काम करत होतो. पंधरा मिनिटांनी कांदा आणि टोमॅटोची धरपकड आणि कापाकापी झाली!
जेवताना कालवणात कोणकोणत्या पदार्थांची चव लागते ते आठवत हळूहळू त्या-त्या पदार्थांची किचनकट्यावर हजेरी लावण्यात आली.
आता येथे श्रीखंडाचे लेबल असलेल्या डब्यात मिठ आहे. त्यामुळे अंड्याच्या कालवणात श्रीखंडही टाकतात का असा उगीच पाणचट प्रश्न कोणीही विचारु नये! (नवशिकाऊ स्वयंपाक कर्ते असा त्यांचा अपमान कदापी सहन करणार नाहीत! जो कोणी असे विनोद करेल त्याला आमच्या याच पाकृचे पोटभर जेवण भरवले जाईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी!)
तर आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळू (सिनेमातला नव्हे!) टोप गॅसवर ठेऊन मी त्यात अनुक्रमे, तेल, जिरे, हळद आणि चटणी टाकली व चांगले परतून घेतले. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकले.
आता पाणी टाकायची वेळ आली. पण अरेरे! पाणी कुठे आहे? मसाल्याच्या गडबडीत कालवणासाठी लागणारा मुख्य पाणी हा घटक घ्यायचा विसरुनच गेला होता. त्यामुळे ऐन वेळी पाण्याने माझी चांगलीच तारांबळ उडाली आणि पाणी घेण्याच्या गडबडीत कांदा हलवण्याचे मला विस्मरण झाले. त्यामुळे मध्येच माझे दुर्लक्ष झाल्याने टोपातील मसाला माझ्यावर कोपला आणि त्याने हळूहळू कोळशाचा रंग धारण केला. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मी तातडीने त्यात पाणी टाकले आणि पुढचा अनर्थ टळला. तरीही काही बरेच काळे ठिपके वर तरंगू लागले. त्याकडे कानाडोळा करत मी त्यात मिठाची चिमट टाकली. छे! मिठ सुद्धा थोडेच राहीले आहे. नवीन पाकीट फोडून टाकावे लागेल. विचार करत करत मी ते मिश्रण चांगले ढवळून उकळण्यासाठी फास्ट गॅसवर ठेवले.
कालवणाला उकळी फुटल्यानंतर त्यात अख्खे दोन अंडे न ढवळता फोडण्यात आले आणि ते मिश्रण पाच मिनिटांसाठी झाकून ठेवले. पाच मिनिटांनी कालवण खदखदू लागले. सर्व घरभर मॅगीसारखा मंद मोहक सुवास सुटला. आणि पुन्हा पोटात कावळे ओरडू लागले.
घड्याळात आता दुपारचा एक वाजला होता. वेळ न दवडता मी माझी अशी स्पेशल डिश सजवून तयार केली.
कोणाच्याही मदतीशिवाय आपण जेवण बनवले या आनंदात मी जेवायला घेतले आणि चपातीचा एकच घास तोडून तो तोंडात टाकला तोच!......
काहीतरी पाणचाट तोंडात गेल्यासारख वाटल. हे असं का वाटाव हे प्रथम मलाच काही कळाल नाही. मी जास्त लक्ष न देता सरळ टीव्ही ऑन केला आणि टीव्ही बघत पुन्हा जेवणास आरंभ केला. पहीली चपाती तर कडाकण्यासमानच असल्याने तिचा वापर लिज्जत पापड सारखा करावा असे मी ठरवले व त्यानुसार जेवणाचा एक घास घेतल्यानंतर मी ती चपाती तोंडी लावत कडाडूम कुडूडूम अशी करत खाऊ लागलो (चपाती पापडासारखी इतकीही पातळ आणि कुरकुरीत झालेली नव्हती. तर ती जाडसर आणि कडकडीत झालेली होती. त्यामुळे कुर्रम कर्रम असा आवाज न करता ती कडाडूम कुडूडुम असाच आवाज करत होती.)
दोन-तिन घास पोटात गेल्यानंतर मात्र कावळ्याची चलबिचल कायमचीच थांबली. बहुदा असल्या जेवणाने पोटातील कावळे पोटातल्या पोटातच मेले असावेत! पण त्यामुळे परिणाम मात्र वेगळा झाला. पोटातील प्रत्येक आतडे जिवाच्या आकांताने त्या घासाला परतुन लावू लागले. भुकेसाठी पोटाचं तिळ-तिळ तुटणं मी ऐकून आहे पण येथे तर जेवणाच्या घासानेच पोट तिळ-तिळ तुटताना मी पहील्यांदाच पाहत होतो! हिंदी पिक्चरमध्ये एखादी स्त्री कलाकार काही प्रसंगाला जशी भावनाविवश होऊन जिवाच्या आकांताने "नहीsssss.." म्हणून ओरडते तसेच माझे प्रत्येक आतडेसुद्धा अक्षरशः बोंबलत होते. उशीरपर्यंत उपाशी राहील्याने कदाचित असे झाले असेल म्हणून मी शेवटी प्रत्येक घासाला पाण्याचा घोट घेऊ लागलो निदान त्यामुळे तरी असे होणार नाही. पण कशाचे काय! चार-पाच घास घेतल्यानंतरसुद्धा तिच स्थिती. काही वेळानंतर मात्र माझ्या मनानेच त्या जेवणाची धास्ती घेतली. चपातीमुळे कदाचित असे झाले असावे मी दुसरा निष्कर्ष काढला आणि फ्रिजमधील ब्रेडचं पाकिट काढल. आता त्या चपातीला कायमचा रामराम करुन मी ब्रेड आणि कालवणावरच आपला लंच भागवण्याचे ठरवले. पण हे काय! त्या ब्रेडच्या घासालाही तसाच अनुभव येऊ लागला. आता मात्र मला काहीच समजेना, कालवण तरी बरोबर झालं होतं मग हे असं काय होतय?
विचार करण्यात आणि जेवणात माझा उरलेला निम्मा दिवस संपला. यानंतर सलग दोन दिवसांपर्यंत माझ्या अंगात कणकणी भरुन आली व काही प्रमाणात ते तापलेही होते. या घडल्या प्रकारानंतर मात्र मी कानाला खडाच लावला. स्वयंपाकाची आणि स्पेशली माझ्याच हातच्या जेवणाची मी चांगलीच धास्ती घेतली. पुढे घरातील मंडळी येईपर्यंत मग मी ऑम्लेट आणि ब्रेड यावरच भागवले.
पाच दिवसानंतर ज्यावेळी घरातील सर्व मंडळी आली त्यावेळी त्यांना हा माझा सगळा पराक्रम कळाला आणि सगळ्यांनी कपाळावरच हात मारुन घेतला. कशाला अशा उचापती करायच्या म्हणून सर्वांनी जाहीरपणे माझी चांगलीच टर उडवली.
नंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातून सहजच माहीती पडले की डब्यातील चटणी तिखट कमी असल्याने अधिक टाकावी लागते, तसेच चपाती या प्रकारात मिठ हा घटकसुद्धा सामाविष्ठ असतो. जो मी टाकलाच नव्हता, नव्हे त्याचा विचारच मी केला नव्हता. सगळ्यात शेवटीची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या डब्यात मिठ असायचे तो डबा ऐन वेळी बदलून खायच्या सोड्याचा करण्यात आलेला होता! आणि याची सुचना ते सर्वजण बाहेर जाताना मला वारंवार देण्यात आलेली होती, परंतु त्याचवेळी मी झोपेत असल्याने ते बोलणे एका कानाने ऐकून तिथेच दुसर्या कानाने मी सोडून दिले होते. आता घ्या!!!! या सर्व स्पष्टीकरणाने मला मी बनवलेल्या जेवणाच्या भयानकतेचे रहस्य पुर्णपणे उलगडले. सत्य स्थिती कळ्ल्यावर आता यावेळी कपाळावर हात मारुन घेण्याची पाळी माझीच होती.
-सत्यघटित
७ एप्रिल २०१२
(No subject)
(No subject)
काहीतरी पाणचट तोंडात
काहीतरी पाणचट तोंडात गेल्यासारख वाटल>>> हे वाचल्यावर वाटलं की अंडं न उकडता घातलं की काय........
छान. मी ९वीत असताना माझ्या
छान.
मी ९वीत असताना माझ्या आईला हॉस्पिटलाइज केलं होतं. तेव्हा मी एकदा अंड्यांचं कालवण केलं होतं. तेव्हा माझा भाउ जेवताना मला म्हणाला की हे पेशंटच जेवण आहे.
(No subject)
अनू तु केलेले पदार्थ
अनू
तु केलेले पदार्थ दिसायला तरी बरे दिसतायत
खालची रामकहाणी वाचायच्या एवजी
खालची रामकहाणी वाचायच्या एवजी आधी शेवटचे ताट बघून तरी मस्त दिसतेय असे मनात म्हटले. नंतर.. म्हणजे जे म्हणतात ना तेच खरय तर... दिसण्यावर जावू नका, फसाल...
(इतक्या पाकृ चे फोटो टाकतात मग चवीला चांगलेच असतील सांगता येत नाही की काय);)
फोटो छानच आहेत
फोटो छानच आहेत
बापरे मिठा ईवजी सोडा कशी असेल
बापरे मिठा ईवजी सोडा
कशी असेल त्याची चव ईमॅजीन करुन्च आंगावर काटा आला
(No subject)
फोटो छानच आहेत>> दिनेशदा,
फोटो छानच आहेत>> दिनेशदा, याची चव बघायची ईच्छा आहे?
अनु
फोटो छान आहेत. चवी च माहित
फोटो छान आहेत. चवी च माहित नाही. पहिल्या प्रयत्नात पोळ्यांचा आकार चांगला आहे.( माझ्या ह्याच्या पेक्षा हॉरीबल असायच्या) पण हे सोड्याचं प्रकरण लै भारी !!!! ( काय दिव्य चव आली असेल???)
आणि हो ... लोक घरात न्हवती तर जरा तुमची "असंभव " तरी पुर्ण करायची ना... शेवट व्हायचा आहे तिचा. दुरसी कदे कुठे लिहिली असेल तर लिंक द्या... नाहीतर आधी ती इथे पुर्ण करा ( ही धमकी समजु शकता !!!).....
चांगली जमली होती हो ती गोष्ट का संपवत नाही!!!!!!
(No subject)
(No subject)
जेवण बनवायला जमले नाही. पण
जेवण बनवायला जमले नाही. पण लिहायला मस्त जमले. छान केले वर्णन. हे वाचुन माझे 'ते' दिवस आठवले...... पिठाचा, डाळींचा गोंधळ उडणे... एकदा आई घरी नसताना मावसभाऊ त्याच्या मित्रांना घेउन आला तेव्हा रवा न निवडता केलेल्या गोड शिर्यावर भावाने मारलेला शेरा आठवला...शिर्यात काय खडीसाखर घातली आहे का? एक ना दोन बर्याच गोष्टी आठवल्या.
अरे वा मस्त प्रयत्न आहे. माझी
अरे वा मस्त प्रयत्न आहे. माझी तर सुरवात ह्या पेक्षा पण वाईट होती. अजूनही काही जास्त सुधारणा झाली नाही आहे पण मी प्रयत्न करणे सोडले नाही. तुमच तर मला कौतुकच वाटत कित्ती जिद्दी ने सगळ पूर्ण केलंत. थोड्या चुका ह्या होणारच सुरवातीला पण म्हणून नाउमेद न होता प्रयोग कारण सोडू नका माझ्या सारख. आनंदाची गोष्ट एकच तुम्ही एकटेच नाही आहात असे बरेच जण असतात जगात.
मागच्याच रविवारी प्रिझ मधले (Ready to bake dinner rolls) काढून बाहेर ठेवले आणि मग चार तासांनी त्यांना ओवेन मध्ये ठेवण्य साठी गेले बघते तर काय सगळे एकमेकांना चिकटले होते. हात लावला तर ते वेगळ व्ह्यायचं नावच घेईनात.
मग नवऱ्याला हाक मारली तर तो हा सगळा प्रकार बघून लाबुनच पळून गेला. नेहमी मला किचन मध्ये त्याचा आणि आईचा दोघांचाच आधार असतो आज तोच पळून गेला बाहेर पक्षी बघयला. मग पुढचे तीन तास घालून कसंतरी करून अजून कणिक घालून तेल लावून कसं तरी केल बाई सगळ्यांना वेगळ आणि ठेवले एकदांचे त्या बेकिंग Tray मध्ये.
एकाच वेळेस लहान मोठे असे वेगवेगळ्या आकाराचे तब्बल चाळीस रोल्स तयार झाले आहेत. अजून हि तेच खातो आहोत रोज थोडे थोडे. आज तर ठरवलं आहे की घरी गेल्यावर उरलेले टाकून देईन पण टाकायला थोडं वाईट वाटत. शेवटचा प्रयत्न म्हणून मायबोली वरच आहारशास्त्र मध्ये विचारणार आहे....... ह्या रोल्स चं काही करता येईल का म्हणून?
(No subject)
(No subject)
)
:))
छान जमलयं!!!
छान जमलयं!!!
सगळ्यात शेवटीची आणि सर्वांत
सगळ्यात शेवटीची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या डब्यात मिठ असायचे तो डबा ऐन वेळी बदलून खायच्या सोड्याचा करण्यात आलेला होता! आणि याची सुचना ते सर्वजण बाहेर जाताना मला वारंवार देण्यात आलेली होती, परंतु त्याचवेळी मी झोपेत असल्याने ते बोलणे एका कानाने ऐकून तिथेच दुसर्या कानाने मी सोडून दिले होते. आता घ्या!!!!..............................
ओह!!!! नो खरच फार भयानक.
(No subject)
एंड प्रोड्क्ट भारी दिसतय पण
एंड प्रोड्क्ट भारी दिसतय पण
फारच जबरदस्त लिहीलंय. हे
फारच जबरदस्त लिहीलंय.
हे मात्र खरं की कणिक आयुष्यात पहिल्यांदा मळताना 'हा पीठाचा विस्कळीत डोंगर एक सुटसुटित क्युट गोळा बनणार तरी कसा' हा प्रश्न पडतोच.
पोळ्या छान दिसतायत हां पाहिल्या प्रयत्नाच्या मानाने..आणि फुगल्या पण आहेत.
हा हा.. मीठाच्या जागी सोडा
हा हा.. मीठाच्या जागी सोडा ... आणि चपातीत मीठ घालायचे असते हे वाचून मी सुद्धा पाच मिनिटे कन्फ्यूज होतो की चपातीत मीठ घालतात की नाही घालतात, घालतात की नाही घालतात .. पण तुमचे घरचे म्हणताहेत घालतात, तर घालतच असतील
चपाती पापडासारखी इतकीही पातळ
चपाती पापडासारखी इतकीही पातळ आणि कुरकुरीत झालेली नव्हती. तर ती जाडसर आणि कडकडीत झालेली होती. त्यामुळे कुर्रम कर्रम असा आवाज न करता ती कडाडूम कुडूडुम असाच आवाज करत होती.)))
भारिये कुकिंगचा पहिला अनुभव