कुमार

Submitted by निरंजन on 28 March, 2012 - 00:29

नुकतच मला कोणीतरी विचारल की तुझा आवड्ता पक्षी कोणता मी म्हणालो, "माझा आवड्ता पक्षी कावळा". ऎकणार्‍याच तोंड जरा वेडवाकड झाल.

तुम्हाला सुद्धा विचित्रच वाटत न !

या कावळ्याची व माझी गट्टी झाली तीच मुळी "एक घास काऊचा, एक घास चिऊचा" पासुन.

"कावळ्याच घरट शेणाच व चिमणीच मेणाच" या गोष्टीत, घर वाहुन गेलेल्या त्या कावळ्याला ती चिमणी किती त्रास देते. बिचारा कावळा, मला त्या लबाड चिमणीच केलेल कौतुक कधीच आवडत नव्हत. त्या चिमणीचा मला फ़ार राग यायचा.

किती बिचार्‍या ह्या प्राण्यावर माणसानीसुद्धा अन्याय केलाय. त्याला पार खालच स्थान दिलय.

कावळा म्हणे "मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे
वाहवा तयाची करीती, मजला ते धिक्कारिती लोक हे !"

पहा त्याचा काळा रंग हे एकमेव कारण. त्या लबाड बगळ्याला सुद्धा वरच स्थान. कोणत्याही पक्षानी कपड्यावर घाण केली की लगेच आपण म्हणतो, कावळ्यानी घाण केली. का ? बाकी पक्षी घाण करतच नाहीत का ?

खर तर किती चांगला आहे हा, त्याला तुम्ही काही खायला द्या. तो कधीच एकटा खाणार नाही. काव काव करेल चार मित्रांना बोलावेल व सर्व मिळुन, जे असेल ते, असेल तेव्हढ खातील. हा गुण खर तर माणासानी शिकायला हवा. पंचतंत्रात विष्णुशर्माला सर्व प्राणी पक्षांचे गुण-अवगुण दिसले. पण कावळ्याचा हा गुण त्याला दिसला नाही.

या सर्वाच उट्ट कावळा काढतो ते त्याला पितरांच स्थान दिल जात तेव्हा. तेराव्याला पहा, नेहेमी काव काव करुन सर्व कावळ्यांना जमा करणारा हाच कावळा, कुठे तरी झाडाच्या वरच्या फ़ांदीवर बसलेला असतो व एका डोळ्यानी बघत असतो. कितीही विनवण्या केल्या तरी तो नाहीच बधत. लोकं बिचारे काव काव ओरडातात, काय काय अमिष दाखवत असतात पण जेव्हा त्याला वाटॆल तेव्हाच तो येतो.

लहानपणी पाहिलेले कावळे आठवत नाहीत पण मला आठवतोय ते माझ्या बागेत येणारे कावळे.

मी त्या कावळ्यांना मस्त नाव सुद्धा दिलेली होती. कुमार नावाचा कावळा तर माझा फ़ारच लाडका. आता हे नका विचारु की मला अनेक कावळ्यांमधुन माझा कुमार कसा ओळखु यायचा ते.

कुमार त्याच्या मैत्रीणीबरोबर असायचा व मला खिडकीतुन पाहुन मान वाकडी करायचा व त्याच्या एका डोळ्यानॊ हसायचा. हो हो हसायचाच तो.

आणि हो मला आठवतय तेव्हढे दिवसात त्यानी त्याची मैत्रीण पण बदललेली नव्हती. गॅलरीत मी त्याला खायला द्यायचो. मग तो त्याच्या सर्व कुटुंबाला, त्याच्या मित्रांना बोलवायचा व मी दिलेल साफ़ सुफ़ करायचा. मजा म्हणजे मेलेला उंदिर, कोणतीही घाण खाणार्‍या या पक्षानी कधीच अशी घाण माझ्या गॅलरीत आणली नाही.

कावळा हा चिमण्या व कबुतरांसारखा कधीही घरात येत नाही. त्याला आपली मर्यादा कळ्ते.

एकदा मी माझ्य़ा खोलीत होतो, कुमार व त्याची मैत्रीण खिडकीत येऊन जोर जोरात ओरडत होती. मी जाऊन बघीतल तर त्यांच्या बरोबर त्यांच एक छोट पिल्लु होत. मला दाखवाण्यासाठी त्यांनी ते आणलेल होत. माझ्या आदिवासी मित्रांमुळे पक्षांची भाषा थोडि थोडी मला समजत होती. त्यांच्या ओरडण्याच्या टोनवरुन त्यांना झालेला आनंद कळत होता. मी लगेच दोन बिस्किटाचे तुकडे गॅलरीत टाकले. त्या पिल्लानी माझ्याकडे बघीतल त्याला बहुतेक आई-बाबा सांगत असतील. "हा आपला मित्र बर का "

एकदा शाळॆत इतिहासाचा कंटाळवाणा तास चालु असताना, मला खिडकितुन झाडावर बसलेला कुमार दिसला. त्याच्या मैत्रीणी बरोबर बसुन मस्त चोचीनी पंख साफ़ करत होता. त्याला मी दिसलो, त्याची व माझी नजरा नजर झाली, आणि त्याच्या नजरेत असा काही आनंद दिसला की बस. त्यानी काव काव करुन त्याचे मित्र बोलावले. आणि वर्गाच्या खिडकीत सर्व जमा झाले. मी बाईंच लक्ष नाही अस पाहुन हळुच माझा डबा उघडला आणि चपातीचे तुकडे करुन खिडकीच्या कठड्यावर टाकले. सर्व कावळ्यांनी काव काव करायला सुरवात केली. माझ्यासारख्या कंटाळलेल्या बाकी मुलांनी लगेच डबे उघडले व कावळ्यांना खायला घालायला सुरवात केली. कंटाळवाण्या इतिहासापेक्षा कावळ्यांच काव काव ओरडण किती छान वाटल. आवाज इतका झाला की बाईंना शिकणच जमे ना. अशी मस्त मजा आली.

पण या पक्षाला भावना आहेत हे मात्र मला फ़ार उशीरा समजल.

माझे वडिल ज्यादिवशी गेले, त्या दिवशी स्मशानातुन यायलाच खुप उशिर झाला होता, रात्री खुप वेळ झोपच लागत नव्हती. सकाळी मी एकटाच गॅलरीत उभा होतो. चिमण्या मी खायला दिलेल खात होत्या. शेजारी TV चालु झाला होता. मला वडलांची खुप आठवण येत होती. आणि तेव्हढ्यात कुमार झाडावरुन उडत आला आणि माझ्याजवळ गॅलरीत येउन कठड्यावर बसला. त्यानी माझ्याकडे पाहिल. त्याच्या नजरेतसुद्धा दुःख होत. आज नेहेमीसारखा तो काव काव करत नव्हता. तो कठड्यावरच माझ्याजवळ सरकला. पण परत आपली मर्यादा संभाळुनच. माझ्या नकळातच माझ्या डोळात पाणी आल. तो मुका पक्षी माझ मुक सांत्वन करत होता.

स्मशानात माझ अनेकांनी कोरड सांत्वन केल होत, त्यापेक्षा हे मुक सांत्वन माझ्या मनाला स्पर्ष करुन गेल.

निरंजन

गुलमोहर: 

मस्तच अनुभव.. कावळा या प्राण्याला.. आपले पक्ष्याला नक्कीच खूप चांगली जाण असते..

कॉलेजमधील माझ्या कावळ्या मित्रांची आठवण झाली..

मागे कॉलेजमध्ये असताना मी परीक्षेच्या काळात अभ्यास करायला म्हणून रात्रीचा कॉलेजमध्ये जायचो. रात्री उशीरापर्यंत अभ्यास केला जायचा, आणि तीन-चार वाजता कधीतरी झोपायचो.. आम्हाला अभ्यास करण्यासाठी म्हणून खास काही क्लासरूम उघडे असायचे, बरेच जण बेंचवरच आडवे व्हायचे.. पण मला मात्र त्या लाकडी बाकड्यात अंगाचे मुटकुळे करून झोपणे आवडायचे नाही म्हणून मी बाहेर व्हराड्यांत ताणून द्यायचो.. अर्थात त्यातही माझी एक आवडीची जागा होतीच.. तर, सकाळी कधी सहाला उठायचे असायचे तर कधी सातला तर कधी साडेसातला.. अलार्म घड्याळ असे काही बरोबर नसायचे.. मोबाईल नावाचा प्रकारही माझ्याकडे नव्हता.. त्यामुळे नेमके हवे त्या टाईमाला उठणे असे शक्य नव्हते.. तरीही मी उठायचो.. आणि याला जबाबदार होते ते हेच आपले कावळे.. मला ज्या वेळी उठायचे असायचे नेमके त्याच वेळी त्या व्हरांड्याच्या कट्ट्यावर यांचा आरडाओरडा अचानक एवढा वाढायचा की झोपमोड झालीच पाहिजे. पण जेव्हा कधी लवकर उठायची गरज नसायची तेव्हा मात्र हे कुठे दडी मारून बसायचे ठाऊक नाही. एक तर फिरकायचेच नाहीत किंवा फिरकले तरी निदान एवढा आरडाओरडा नसावा की मला जाग येईल. सर्वात विशेष म्हणजे वेळ अचूक तीच (पाच दहा मिनिटांच्या फरकाने) ज्या वेळेला उठायचे आहे, जी मी मनोमन ठरवायचो. आणि ते उठणेही गरजेचे असायचे कारण पुढचा अभ्यासाचा टाईमटेबल त्यावर आधारलेला असायचा.. बरे मी हे ठरवायचोही मनातच.. ना रात्री झोपायच्या आधी समोरच्या वृक्षाकडे बघून ही वेळ ओरडायचो, ना कुठे एखादी चिठ्ठी लिहुन ठेवायचो.. तरीही ही वेळ त्या दोन-तीन वर्षात मिळून किमान ३०-३५ वेळा पाळली गेली.. ते ही न चुकता.. मला एक न उलगडलेले कोडे होते हे..

आईला एकदा सांगितले तेव्हा तिने असे काही रीअ‍ॅक्ट केले की जणू आपले वाडवडीलच कावळ्याच्या रुपाने माझी आणि माझ्या अभ्यासाची काळजी घेत आहेत.. तर वडीलांनी विल पॉवर की काय कारण दिले आणि चर्चा तिथेच थांबवली.. आज कावळ्यांचा विषय निघाला आणि हे आठवले..

निरंजन,

कथा चांगली आहे. कावळा माणसाच्या जवळ यायला भीत नाही. हे तुमच्या मैत्रीसाठी पूरक असू शकतं. Happy

कावळ्याला आपली मर्यादा अचूक समजते हे निरीक्षण योग्य आहे. कबुतरे भोंगळपणे वावरतात. कावळे स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल जागरूक असतात. माणसाच्या जवळ येतील, पण घरात घुसणार नाहीत.

आजून काही लेख असतील तर जरूर लिहा. तुमच्या वनवासी मित्रांचे अनुभव वाचायला आवडतील!

आ.न.,
-गा.पै.

अभिषेक तु़झा अनुभव खुपच छान आहे. आणि वेगळासुद्धा.

फुलपाखरु धन्यवाद

गा पै ..... वनवासी मित्रांचे अनुभव मी लिहिणारच आहे. त्यावर असलेली एक कथा इथे लिहितो.