कवितेची एक ओळ

Submitted by तुषार जोशी on 22 March, 2012 - 00:52

'प्रेमस्वरूप आई' म्हणुनी करी ती हळवे
कवितेची एक ओळ हळवे करून रडवे

'जयोस्तुते' म्हणोनी करते कधी ती घोष
कवितेची एक ओळ भरते मनात जोश

'गाई पाण्यावर' आल्या कथुनी कधी प्रसंग
कवितेची एक ओळ ममतेत होई दंग

कधी वाजवी 'तुतारी' कधी लागते जिव्हारी
कवितेची एक ओळ घेते नभी भरारी

'फुलराणी' सारखी ती ऐटी मधेच चाले
कवितेची एक ओळ पाना फुलात डोले

ध्यानात ठेव 'तुष्की' पाळू नकोस खंत
कवितेची एक ओळ म्हणता फुले वसंत

तुषार जोशी, नागपूर 'तुष्की'
+९१ ९८२२२ २०३६५
२१ मार्च २०१२, २३:१५

गुलमोहर: