नर्मदे हर!
काही दिवसांपूर्वी एक "मिसळपावकर" आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्या यशवंत कुलकर्णीने 'एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा' ही सुंदर लेखमालिका 'मिसळपाव' संस्थळावर लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं. यशवंतच्या लेखावर प्रतिक्रिया लिहिणार्यांनी जगनाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर' पुस्तकाचा उल्लेख केला होता. आयुष्यात कधी नर्मदा परिक्रमेला जाऊ न जाऊ, निदान प्रत्यक्ष जाऊन आलेल्याचे अनुभव वाचावेत म्हणून पुस्तकाचा शोध सुरू झाला. रत्नागिरीला गेले होते तेव्हा एका दुकानात चौकशी करता पुस्तक सध्या नाही मागवून देऊ असं सांगितलं. आता पुस्तकांच्या दुकानात जाऊन रिकाम्या हाताने परत कसं येणार? बाकी पुस्तक चाळायला सुरुवात केली. सहजच एका पुस्तकाकडे लक्ष गेलं. "नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा" लेखक गो. नी. दांडेकर.
-नर्मदेच्या तटाकी-
या पुस्तकाबद्दल ना कधी काही ऐकलं होतं ना वाचलं होतं. पहिली आवृत्ती जुलै १९४९ मग जुलै १९८७ आणि आता तिसरी आवृत्ती जुलै २००९. मध्यंतरी सुमारे २० वर्षे हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. या पुस्तकात गोनीदांनी सुरू केलेल्या आणि अपुर्या राहिलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल लिहिलं आहे सुरुवातीच्या उण्यापुर्या ६७ पानांत आणि पुढे दुसर्या भागात म्हणजे 'दक्षिणवारा' मधे त्यानी १९८४ साली केलेल्या दक्षिण भारताच्या प्रवसाचं प्रवासवर्णन आहे. दक्षिणवारासुद्धा नेहमीच्या रसाळ आणि प्रसन्न गोनीदां शैलीत आहे. पण आता त्याबद्दल काही लिहीत नाही.'नर्मदातटाकी' मधे विद्यार्थी वृत्तीने श्रीधरशास्री पाठक यांच्या धुळे इथल्या आश्रमात गुरुगृही राहात असताना केलेल्या अधुर्या नर्मदा परिक्रमेचा वृत्तांत आहे.
गोनीदां हा माणूस जातिवंत भटक्या. आश्रमात राहिल्यापासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून या भटक्यासमोर कोणीतरी नर्मदा परिक्रमेविषयी रोज काहीतरी बोलावे. मग गुरुजींनी नर्मदा परिक्रमा कोण करील म्हणून विचारताच गोनीदांमधला हा भटक्या जागा झाला आणि गोपाल तसाच परिक्रमेला निघाला. बरोबर किती सामान ते! दोन लंगोट्या, एक धोतर, एक तांब्या, एक सतरंजी आणि गीताभाष्य! नर्मदेपर्यंत पोचायला रेल्वेच्या तिकिटाचे पैसे? नव्हतेच! मग गुरूजींनीच सोय केली धुळ्याहून हर्दा, तिथून बसने हांडिया गाठले, आणि गोपालाची परिक्रमा सुरू झाली. नर्मदेच्या पहिल्या दर्शनाने मनी उमटलेले भाव गोनीदांनी अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले आहेत. ठिकठिकाणची नर्मदेची रूपं, ती पाहून गोनीदांच्या मनात आलेले विचारतरंग, आणि त्यांचं वर्णन करताना ठिकठिकाणी सहजच आलेल्या काव्यपंक्ती, अभंगांच्या ओळी, सूक्ते, श्लोक, अक्षरशः वाचकाला मेजवानी आहे.
पहिल्याच दिवशी पहाटे नर्मदामय्याच्या आरतीने जाग आली आणि मग "ते अद्भुत रूप माझ्या समोर एखादी पैठणीची घडी उपलपावी, तशागत दृश्य केले" अचानक आकाशातला आणि नर्मदामय्यातला चैतन्याचा खेळ पाहताना सगळे विश्व चैतन्यमय आहे असा स्पष्ट बोध एखादा साक्षात्कार व्हावा तसा झाला आणि "अतीव आनंदाने दोन्ही हात वर उभवून गोपाल ओरडू लागला, "हरिरेव जगत| जगदेव हरि:|" एवढ्यात एका पंडताने "कहां के हो महाराज?" म्हणत गोपालाला परत नेहमीच्या जगात आणून सोडले. गोनीदां मग नर्मदामय्याला विनवू लागले, "मय्या मला पुन्हा दे ना मघाचा आनंद!" पण नर्मदामय्याच्या लहरींनी जणू उत्तर दिले, "पोरा, अजून खूप पहायचे आहे तुला. खूप उशीर आहे तिथे पोचायला. तुझी खूपशी भावंडे आहेत. दु:खी, दीन, दुबळी. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मगच मगच तू तिथे पोहोचू शकशील!"
मय्याच्या तटाकी शेकडों हजारों वर्षांच्या परिक्रमींच्या वाटचालीने तयार झालेल्या पावटीवरून चालताना गोपालाचे मन भरून यावे. या वाटेवरून किती ऋषीमुनी चालून गेले असतील, कधीतरी माझी ज्ञानोबामाऊली नामदेवाबरोबर कदाचित या वाटेवर चालली असेल, अशा विचारानी अद्भुत आनंद मिळावा. आणि अशातच एक चटचटत्या दुपारी नर्मदेच्या वाळवंटात एक ७/८ वर्षाचे नागवे लेकरू मय्याचं पाणी आणायला मातीची फुटकी मडकी घेऊन निघालेलं गोपालाने पाहिलं. अशा पेटत्या दुपारी हे काय करते आहे पाहूया म्हणून गोपाल त्याच्या पाठीमागे त्याच्या मोडकळल्या झोपडीपर्यंत गेला, तर झोपडीत लाज राखण्यापुरते पटकूर नेसलेली त्या पोराची आई बसलेली. या दोघांच्या मधे एका खापरात अर्धी वाळकी भाकरी आणि त्या भाकरीच्या तुकड्यासाठी मग त्या मायलेकरात तुंबळ द्वंद्व सुरू झाले. त्या क्षणी गोपालाला साक्षात्कार झाला मोठे बंगले आणि ही मायलेकरे दोन्ही एका समाजपुरुषाची अंगे आहेत. जोपर्यंत तुझा समाजपुरुष आपल्या या जीर्णशीर्ण अंगाचे निरीक्षण करण्याएवढा सावध बनत नाही, तोपर्यंत तुला मोक्षाच्या मागे लागण्याचा अधिकार नाही!
एक विलक्षण अस्वस्थता आली आणि इथून पुढे परिक्रमेबरोबर गोपालाचा आंतरिक प्रवास सुरू झाला. या अस्वस्थतेचं उत्तरही मय्याच्या तटाकी मिळालं. एका ठिकाणी एक काळ्या दगडांचं सुरेख शिल्पांनी अलंकृत केलेलं भव्य मंदिर होतं. त्यावर ते बांधणार्या शिल्पकाराचं नाव नव्हतं काही नाही. बाजूला एक मोडकळीला आलेली धर्मशाळा होती आणि त्यावर पाटी, "कोण्या इनामदाराने ही धर्मशाळा बांधवून तिचा हक्क स्वतः आणि स्वतःच्या वंशजांसाठी राखून ठेवला आहे." आणि त्या क्षणी गोनीदांना अस्वस्थतेचं उत्तर सापडलं. ज्या क्षणी व्यक्ती ही केंद्रबिंदू झाली त्या क्षणी समाजपुरुषाची उपासना थांबली. आणि मोक्षासाठी देवाकडे वशिला लावायला सुरुवात झाली. सगळं मलाच, मला एकट्यालाच पाहिजे! पण हे आमचे तत्त्वज्ञान नव्हेच. आमचे तत्त्वज्ञान आहे त्या हजारों वर्षांच्या मंदिरासारखं. मंदिर उभं केलं आणि बांधणारा शिल्पकार समाजपुरुषात अनाम मिसळून गेला. समाजरूप होण्यातच संतोष आहे!
इथून गोनीदांची परिक्रमा शांत चित्ताने पुढे सुरू झाली. वाटेत महेश्वर पाहून अहल्याबाईंची आठवण जागी झाली. वाटेत नर्मदामय्याची असंख्य विलोभनीय रूपे पाहून गोनीदांना जे वाटलं त्याची वर्णनं मुळातूनच वाचण्यासारखी. नर्मदामय्याच्या कडेच्या पायवाटेवरून कोणकोण महानुभाव गेले असतील त्यांची गोनीदांनी कल्पना केली आहे आणि त्या अनुषंगाने आपले रसाळ अक्षरधन वाचकांवर उधळले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही परिक्रमा अर्धीच राहिली. पण शेवटी ते म्हणतात, ज्याला ज्याला शक्य आहे त्याने दर वर्षी काही काळ नर्मदामय्याच्या तटाकी घालवावा. ती आतुरतेने आपल्या लेकरांची वाट पहात आहे. ज्याला ऋजु अंतःकरण घेऊन तिजजवळ जाता येईल, अशा प्रत्येकाने तिच्या कुशीत काही काळ आसरा घ्यावा. आणि मग भारतीय संस्कृतीच्या पुनरुद्धाराचा मंत्र घेऊन समाजसन्मुख होऊन परत फिरावे. विचार करतेय, हे जमेल मला?
------------
नर्मदे हरः २
गोनीदांचं हे काहीसं अप्रसिद्ध पुस्तक वाचलं आणि तेवढ्यात आमच्या गावात मॅजेस्टिकचं पुस्तक प्रदर्शन आलं. तिथे जाऊन कुंटे यांचं पुस्तक शोधणं आलंच! एक पुस्तक दिसलं, नाव नर्मदे हर! उचललं तर लेखक श्री. रघुनाथ रामचंद्र गुण्ये. परत कुंटेंच्या पुस्तकाने हुलकावणी दिली. हातात आलेलं 'नर्मदे हर' थोडं चाळलं. विकत घ्यावं वाटलं आणि इतर पुस्तकांबरोबर तेही घरी आलं. घरी आल्याबरोबर गावाला गेलेल्या नवर्याला फोन केला, म्हटलं "गुण्ये नावाच्या माणसाचं पुस्तक विकत आणलंय." तो म्हणे, "त्या लेखकाचं पूर्ण नाव काय?" सांगितलं. अतर्क्य योगायोग असा, की नवरा म्हणाला, "अग ते आजच आपल्या घरी येऊन गेले." सासरे रहातात त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवधे गावाला लागूनच, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेरळ गाव आहे. तिथे हे लेखक श्री गुण्ये रहातात. आमच्या गावी आलेल्या एका मित्राला भेटायला ते त्या दिवशी आमच्या घरी येऊन गेले.
अत्यंत साधा निगर्वी मनुष्य. आयुष्यात सुरुवातीला काही वर्षे सिव्हिल इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरी केली. मग परमार्थात लक्ष गेलं. स्वामी स्वरूपानंदांचं शिष्यत्व लाभलं. प्रपंच केला नाही तरी रूढार्थाने संन्यासही घेतला नाही. त्यांनी अध्यात्मावर आणखीही पुस्तकं लिहिली आहेत. पण मी वाचलेलं हे एकच "नर्मदे हर". १९८२-८३ साली त्यांना नर्मदा परिक्रमेची ऊर्मी आली. त्यामागे कोणताही भाविक, धार्मिक उद्देश नव्हता. पण एक आंतरिक मस्ती होती, जी त्यांना नर्मदामय्याकडे ओढून घेऊन गेली. पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि कळलं की कुंटे यांना जे पुस्तक वाचून नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा मिळाली तेच हे पुस्तक!
आताच्यासारखे परिक्रमा सुरू करताना गुण्ये यांनी धार्मिक विधी वगैरे केले नाहीत, तर नेमावर इथून सरळ चालायला सुरुवात केली! फक्त स्वतःपुरते काही नियम त्यांनी बांधून घेतले, ते म्हणजे, अंगावरचे २/३ काय ते तेवढेच कपडे, एक पंचा, एक पातळशी शाल, एक तांब्या, एक वही (दैनंदिनी लिहिण्यासाठी), आणि बॉलपेन इतकंच काय ते सामान! स्वतः स्वयंपाक करायचा नाही. त्यामुळे कोणी शिधा दिला तरी उपयोग नाही. शिजवलेलं शुद्ध, कांदालसूण नसलेलं अन्न मिळेल ते खायचं, चहा कॉफी प्यायची नाही. भिक्षा मागायची नाही. नर्मदामय्याचं स्नान करून रोज रुद्राची एकादष्णी करायची. पिण्यासाठी नर्मदेचं पाणी वापरायचं. रोख पैसे जवळ ठेवायचे नाहीत! नेमावरला पोचताना गुण्येंजवळ ४० रुपये राहिले होते, ते त्यांनी ब्रह्मचारी विश्वनाथजींच्या आश्रमाला दान केले आणि गुण्ये परिक्रमेला तयार झाले!
रोज साधारण १८/२० किमी अंतर चालून गुण्ये यांनी १६० दिवसांत सुमारे ३२०० कि.मी. अंतराची परिक्रमा पूर्ण केली. ९ जानेवारी १९८३ ला सुरू झालेली परिक्रमा १० जून १९८३ ला पूर्ण झाली. वाटेत अनेक अडचणी आल्याच. शक्यतः आश्रमातून रहायचं पण जिथे अशी सोय होणार नाही तिथे कुणा गृहस्थाने बोलावलं तर त्याच्या घरी रात्र काढायची. एकट्याने चालायला सुरुवात केली होती पण वाटेत कोणी ना कोणी साथीदार थोड्या थोड्या अंतरात मिळत राहिले. आजारपणातून शुश्रुषा करणारे कोणी कोणी भेटत राहिले, जेवायला वाढणारे हात भेटत राहिले. ज्या प्रदेशात वस्ती नही पण शिधा उपलब्ध होता तिथे अन्न शिजवून वाढणारे परिक्रमीही भेटत राहिले. अगदी भिल्लांच्या प्रदेशातही जेवणाची व्यवस्था झाली. एकही दिवस आपल्यावर उपाशी झोपायची वेळ आली नाही आणि नर्मदामय्यानेच हे घडवलं अशी त्यांची श्रद्धा. एका खेडेगावात उपाशी झोपायची वेळ आली होती, पण जिथे स्त्रियांनी परपुरुषासमोर यायचं नाही अशी पद्धत त्या जागीही कोणा स्त्रीने रात्रीच्या अंधारात पुढ्यात येऊन प्रसादाचा लाडू खाऊ घातला. असेही अनुभव आले.
परिक्रमेत आलेल अनेक अनुभव गुण्यांनी अतिशय सजगपणे घेतले आणि मग वाचकांसमोर ठेवले. संन्याशानी स्वतः भरपेट जेवावे पण अतिथीला काही देऊ नये, तर कोणा हरिजनाने शक्य तेवढे करून गुण्यांना काहीतरी खाऊ घालावे असे अनुभव. अन्न कोणत्या जातीच्या माणसाने दिले आहे याचा गुण्ये यांनी विचार केला नाही. अतिशय थंडी असेल त्यावेळी कोण्या आश्रमात साधूने दिलेले ब्लँकेट घेण्याचा विवेकीपणा दाखवला आणि जेव्हा कुडकुडणारा दुसरा माणूस पाहिला तेव्हा ते ब्लँकेट त्या माणसाला द्यायला एका मिनिटाचाही विचार केला नाही. ही निर्मळता आपल्याला संपूर्ण पुस्तकात ठिकठिकाणी भेटते. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चेहर्यावर दिसणारी शांतता या त्यांच्या शिष्याच्या लिखाणात सगळीकडे दिसून येते.
शूलपाणीच्या जंगलात भिल्लांशी गाठ पडलीच. अगदी मातीचं मडकं आणि भोपळ्याचा तुंब्या काढून घेतलाच पण अंगावरची लंगोटीही काढून घ्यायचा प्रयत्न झाला. त्या भागात दारिद्र्य काय भयानक प्रमाणात असेल याची ही चुणूक. जंगलाच्या आधीच्या गावात डायरी ठेवल्यामुळे ती वाचली. आणि नंतर हे प्रवासवर्णन लिहायला ती उपयोगी पडली. पण आपलं सगळं सामान चोरीला गेलं म्हणून रडणारा "संन्याशी"ही त्यांना इथे भेटला! फक्त भगवे कपडे घालणार्या संन्याशांची गुण्यांनी माफक थट्टा केली आहे, त्याचवेळी मुलाला पाजणार्या एका भिल्ल स्त्रीला पाहून आपलं चित्त विचलित झालं होतं हा अनुभवही प्रांजळपणे सांगितला आहे.
परिक्रमा करणारे काय काय उद्देशाने परिक्रमा करतात याचं छान वर्णन या पुस्तकात आहे. तसंच वाटेत भेटणार्या अनेक साधू संन्याशांबरोबर झालेल्या चर्चा आपल्यापुढे ठेवल्या आहेत, पण हे कुठेही कंटाळवाणं होत नाही. तशीच अनेक व्यक्तींची लोभसवाणी चित्रं आपल्यापुढे उभी केली आहेत. गुण्ये यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन केले आहे, मोठ्या प्रमाणात पाठांतर केले आहे. या सगळ्याची उदाहरणे पुस्तकात ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. अनवाणी चालताना पायात घुसणारे काटे, आजारपण यांचं वर्णन करताना तीच निर्लेप वृत्ती जी त्यांना मोठेपणा देऊ पहाणार्या लोकांशी वागताना आहे. वाटेत लागलेल्या महेश्वर, मांडूगड यांचं सुरेख वर्णन आहे तसंच भकास आणि उपेक्षित अवस्थेत असलेल्या रावेरखेड इथल्या राऊंच्या समाधीचं वर्णन आहे. अमरकंटक, भेडाघाट यांचं वर्णन करताना गुण्ये यांची प्रासादिक शैली आणखीच सुंदर वाटू लागते.
"गृहस्वामिनी पंचविशीच्या आतली युवती. प्रसन्नवदना. परिक्रमावासी पाहून हरखलेली. चंद्रमौळी झोपडी. हातपाय पसरायला मिळेल एवढीच काय ती जागा.त्यात सगळा संसार." अशा प्रकारची छोटी छोटी चित्रदर्शी वाक्य सगळ्या पुस्तकभर विखुरलेली. वाटेत आलेल्या सगळ्या आश्रमांची आणि गावांची वर्णने या पुस्तकात आहेत. पुस्तक संपताना परिशिष्ट म्हणून या गावांची यादी आणि कोणत्या गावी किती चालून मुक्काम केला याचे तपशील आहेत. परिक्रमेच्या मार्गाचा उत्तम नकाशा आहे. परिक्रमेला जाऊ इच्छिणार्या लोकांना हे पुस्तक वाचून बरीच माहिती मिळेलच पण निव्वळ प्रवासवर्णन म्हणून वाचणार्यांची निराशा होणार नाही. मुळात व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे सरदार सरोवर प्रकल्पाकडे गुण्ये यांचं लक्ष गेलं नाही तर नवल! विस्थापितांच्या प्रश्नाबद्दल "एक मोठे शून्य नजरेसमोर उभे आहे." असं ते लिहितात. या योजनांचा लाभ काही लोकांना होईल पण जास्त लोकांना तोटाच आहे. लाभार्थींची काही जमीन विस्थापितांना द्यावी असा अभिनव उपाय ते सुचवतात, तेही इतक्या वर्षांपूर्वी! चालताना अनेक लोक धरणाची चौकशी करायचे आणि "नर्मदामैय्या प्रचंड पहाड फोडून येते, ती ही धरणे टिकू देणार नाही" असा विश्वास व्यक्त करायचे! ती सगळी मंडळी आज कुठे आहेत मय्याच जाणे!
या धरणांमुळे परिक्रमेचा मार्ग बदलला आहे, त्याचबरोबर या साध्यासुध्या लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागला असेलच. अनेक गावं, पेशवा सरकार राऊंची समाधी, जंगलं सारंकाही एक दिवस नर्मदार्पण होणार आहे, तेव्हा विस्थापितांबरोबरच त्या जंगलातले लहान ससे, भेकरं, या सार्यांचा आक्रोश कोणाच्या कानी पडणार आहे? तरीही नर्मदामैय्या वाहते आहे आणि आपल्या लेकरांना परिक्रमेला बोलावते आहे. या शेकडों हजारों वर्षांपूर्वीच्या रक्तातल्या हाकेला ओ देऊन कोणीतरी गुण्ये नाहीतर आत्मशून्य एक दिवस आपल्या अटींवर ती वाट चालू लागेल आणि परत आल्यावर आपले अनुभव आमच्याबरोबर वाटून घेईल. तोपर्यंत "नर्मदे हर!!"
नि:शब्द!!
नि:शब्द!!
नर्मदामैया म्हटले की गोनीदा
नर्मदामैया म्हटले की गोनीदा आठवतात व गोनिदा म्हटले की रेवामैया.
दोन्ही पुस्तकांचा एवढा सुरेख परिचय करुन दिलात की ही पुस्तके वाचल्याशिवाय दुसरी गतीच नाही असे होऊन गेले.
तुमची लेखनशैली छानच आहे, रेवामैयाबद्दल तुम्हाला वाटणारे प्रेमही सर्व लेखात ठायी ठायी प्रत्ययाला येते.
तुम्हाला मनापासून धन्यवाद.
नर्मदा परिक्रमा ! मला करायचीच
नर्मदा परिक्रमा ! मला करायचीच आहे याच आयुष्यात
या वरती फार वेगळे, मला अतिशय आवडलेले पुस्तक म्हणजे गुजराथी लेखक धृव भट्ट यांचे 'तत्वमसि'. अंजनी नरवणे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस नी काढलय. अगदी वाचावच असं पुस्तक लिहेन कधीतरी त्यावर.
ज्योति मस्त लिहिलत आपण. धन्यवाद ! मला तेही पुस्तक आवडलं होत. नर्मदा परिक्रमा हा अतिशय हळवा करणारा विषय आहे....
नर्मदामैया म्हटले की गोनीदा
नर्मदामैया म्हटले की गोनीदा आठवतात >> अगदी.. 'कुण्या एकाची भ्रमणकथा' वाचताना गोनिदांनी घडवलेले नर्मदामैय्याचे दर्शन अजुन लक्षात आहे.. नि आता ह्या पुस्तकांचा परिचय झाल्यावर तर परिक्रमेविषयी जाणून घ्यायची उत्सुकता अजून वाढली आहे !
ज्यो.. छान परिचय करुन दिलास.. धन्यवाद
दोन्ही पुस्तकांचा छान
दोन्ही पुस्तकांचा छान परिचय.
आता वाचावी लागतील दोन्ही पुस्तके.
जगन्नाथ कुंटे यांची नर्मदा
जगन्नाथ कुंटे यांची नर्मदा परिक्रमेवर दोन पुस्तके आहेत.उत्तम आहेत वाचा.
छान परिचय. आपण स्वतः, धार्मिक
छान परिचय.
आपण स्वतः, धार्मिक कारणांसाठी नाही, पण सहज म्हणून नर्मदा परिक्रमा करावी, असा विचार
अनेकवेळा मनात येऊन गेला.
ज्योताई,छान परिचय करुन दिलास
ज्योताई,छान परिचय करुन दिलास दोन्ही पुस्तकांचा
दोन्ही पुस्तकं वाचणार.
कुण्या एकाची ... वाचलय.
कुण्या एकाची ... वाचलय. नर्मदे हर मात्र घरात असून वाचणं होत नाहीये
छान परिचय!
छान परिचय!
नुकतंच " नर्मदे हर हर " -
नुकतंच " नर्मदे हर हर " - जगन्नथ कुटे वाचुन काढलं . ( आत्ताच भुंग्याला देवुन आलोय )
पुस्तक परिचय लिहावा असा विचार मनातही आला होता सकाळी ! खुपच सुंदर आहे पुस्तक ! अध्यात्मिक अनुभव ही अचाट आहेत ...पण मला भावला तो साधे सोप्पेपणा ...
कोण्या एकाची भ्रमणगाथाही मस्तच आहे !
अर्थात हा सगळा अनुभवाचा मामला ! शब्दाला मोल नाही ... शब्द फोल ..अनुभव साच ....
बघ्गुया अनुभवाचा योग कधी येतोय ते !
वा मस्तच परिचय. गुण्यांचे
वा मस्तच परिचय. गुण्यांचे नर्मदा हर वाचायला हवे.
मी वाचले आहे नर्मदे हर हर - कुंट्यांचे. अनेक अनुभव मस्त आहेत पण तरी काही अत्यर्क वाटतात जसे हनुमानाचे भेटने. कधी कधी लिखानात अहं जाणवतो. पण तरीही हे पुस्तक वाचावे, त्यांनी एकापेक्षा जास्त परिक्रमा केल्या आहेत असे पुस्तकात लिहिलेले आढळते.
सुरेख परिचय कुण्या एकाची आणि
सुरेख परिचय
कुण्या एकाची आणि नर्मदे हर हर वाचली आहेत. आता 'नर्मदा तटाकी' शोधतो , धन्यवाद
मी गो.नी.दांडेकर आणि जगन्नाथ
मी गो.नी.दांडेकर आणि जगन्नाथ कुंटे ह्या दोघांचीही पुस्तके वाचली आहेत. मला स्वतःला गो.नी.दांच पुस्तक जास्त आवडल. चमत्कार इत्यादी विषयांवर फारसा विश्वास नाही. त्यामुळे कुंटेंच पुस्तक तेवढ भावल नाही.
नर्मदापरिक्रमेवरची जी काही
नर्मदापरिक्रमेवरची जी काही पुस्तकं वाचली त्यात भारती ठाकुरांचं नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा हे मला सगळ्यात आवडलेलं पुस्तक. अतिशय साधं, सोपं, प्रामाणिक आणि प्रवाही लेखन. ज्योतीताई, पुस्तक ओळखींबद्दल आभार
मी नुकतेच कुंट्यांच पुस्तक
मी नुकतेच कुंट्यांच पुस्तक वाचले. काल माझी मैत्रीण स्वाती आली होती. तिची विहीण नुकतीच परिक्रमा करून आली अन तिच्या विहीणीने तिला पुण्याच्या चितळे पती-पत्नींच्या नर्मदा परिक्रमेच्या दरम्यान आलेल्या अनुभवन कथनाची तबकडी भेट दिली. अन त्यावर स्वाती भरभरुन बोलत होती. अन आज हे परीक्षण वाचनात आले. भारती ठाकुरबरोबर निवेदिता खांडेकरपण परिक्रमेला गेली होती. माझ्या मैत्रीणीकडे तिची भेट झाली होती, ती पण परिक्रमेविषयी भरभरून बोलत होती. तोपर्यंत मी परिक्रमेविषयी ऐकले वा वाचले नव्हते. भारती ठाकुरचे पुस्तक मात्र वाचले नाही .आता मलाही परिक्रमेचा अनुभव घ्यावासा वाटतोय. नर्मदे हर!
"तरीही नर्मदामैय्या वाहते आहे
"तरीही नर्मदामैय्या वाहते आहे आणि आपल्या लेकरांना परिक्रमेला बोलावते आहे."
~ ही भावना फार भावली. कॉलेज जीवनात तसे त्यानंतर नोकरी जगतात प्रवेश मिळाल्यानंतरही मी वेळोवेळी खूप भटकलो आहे, पण हे नर्मदा परिक्रमा प्रकरण कधी "पायी" घ्यावे असे कधी वाटले नाही. त्याला कारण यासाठी समविचारी सहकारी लागतात, एकट्याने करण्याचे माझ्यात धाडस नाही असे नाही, पण मला सोबत बोलणारी कुणीतरी व्यक्ती हवी असते. तसे असेल तर जसलमेरचा वाळवंटी पट्टाही तुडविण्यास काही वाटत नाही.
गोनिदा आणि कुंटे दोन्ही वाचली आहेत. पण लेखक श्री. रघुनाथ रामचंद्र गुण्ये यानीही याच अनुभवावर पुस्तक लिहिले आहे आणि त्याचे नाव 'नर्मदे हर !" आहे हे तुमच्याकडून आत्ता समजले. जरूर मिळवितो मी हे पुस्तक.
{आजच कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनमध्ये अक्षरवार्ताच्या पुस्तक प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे. तिथे पाहतोच सायंकाळी, नसेल तर फ्लिपकार्ट आहेच.}
अशोक पाटील
शैलजा + १. भारती ठाकूरांच्या
शैलजा + १. भारती ठाकूरांच्या पुस्तकाचा पहिला अर्धा भाग अत्यंत सुरेख आहे. नुसत्याच परिक्रमेविषयी नाही तर त्या निमित्ताने घडलेल्या अंतर्यात्रेबद्दल त्यांनी लिहिले आहे तो भाग खूप सुंदर आणि विचार करायला लावणार आहे. दुसर्या भागात मात्र 'सखी' अबोल झालिये. तो भाग मग थोडासा रुक्ष वाटला मला. पण पुस्तक संग्राह्य नक्की आहे.
माधव, पुन्हा एकदा वाचून पाहते
माधव, पुन्हा एकदा वाचून पाहते आता तुमची ही टिप्पणी लक्षात ठेवून. तेह्वा एका बैठकीत वाचले होते आणि हे तेवढे जाणवले नाही. आता पुन्हा वाचून पाहते आणि मग बोलू.
जगन्नाथ कुंटे यांची दोन
जगन्नाथ कुंटे यांची दोन पुस्तके वाचून मला नर्मदामैयाची ओढ लागली.आणी तिच्यावर लिहिलेले सर्व साहित्य वाचण्याचा छंद जडला.भारती ठाकूरांचे पुस्तक वाचले.पुण्याच्या सुहास लिमये यांचे नर्मदे हर,हर नर्मदे वाचले.पुण्याच्याच चितळे पतिपत्नींची यात्रेची सी.डी ऐकली.त्याचे पारायण केले. आणी मैयाची ओढ लागली.आता तिच्या परिक्रमेचा योग केंव्हा येणार हे तिच जाणे.
जगन्नाथ कुंटे यांचं 'नर्मदे
जगन्नाथ कुंटे यांचं 'नर्मदे हर' कितीही वेळा वाचलं तरी मन भरत नाही. अध्यात्मिक अनुभव अफलातुन आहेत. . पुस्तक वाचुन नर्मदा भेटीची ओढ होती.
त्यासाठी दरवर्षी बडोद्याजवळील 'नारेश्वर' येथील श्री रंगावधुत स्वामी आश्रमाला भेट देते. वसंत पंचमीस खास कार्यक्रम असतो. नर्मदा परिक्रमेची सीडी ही आणली. तशी प्रत्येक ठिकाणी नर्मदेचं वेगळच रुप दिसतं. नारेश्वर येथील नर्मदेच रुप तर अतीव सुंदर, अंतर्मुख करणारं!!! तासनतास नर्मदेकाठी बसुन रहावसं वाटतं!
सुंदर लेख! काल परवाच "कुणा
सुंदर लेख!
काल परवाच "कुणा एकाची..." वाचायला घेतलंय...तोपर्यत हा विषयही माहित नव्हता कधी. ह्या लेखाचं शिर्षक बघुन लगेच वाचायला घेतला.
सध्यातर मला एका अतिशय सुंदर लिखाणाची मेजवानी मिळतच आहे. पुढे कुंटे आणि गुण्ये यांच्या पुस्तकांबद्दलची उत्सुकता ही वाढलीये..आता नक्की शोधणार ती पण.
मि पा वर ती लेखमालिका शोधत होते, सापडत नाहीये. लिंक द्याल का?
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
छान परिचय.
छान परिचय.
छान लिहिले आहे. जगन्नाथ कुंटे
छान लिहिले आहे.
जगन्नाथ कुंटे यांची राजू परुळेकर यांनी घेतलेली नर्मदा परिक्रमेविषयी मुलाखत इथे ऐकता येईल. सहा भाग आहेत.
जगन्नाथ कुंटे यांची राजू
जगन्नाथ कुंटे यांची राजू परुळेकर यांनी घेतलेली नर्मदा परिक्रमेविषयी मुलाखत इथे ऐकता येईल. सहा भाग आहेत.
>>>
ह्या अख्ख्या मुलाखतीत राजु परुळेकर लईच बोअर होत आहेत असे वाटल्ते
nikhilaraav vaagaLe saaheb pahije hote
ज्योति, तुम्ही जगन्नाथ कुंटे
ज्योति, तुम्ही जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक वाचले आहे का ? असल्यास त्याबद्दल काही का लिहिले नाही ?
मी फक्त कुंटे यांचे "नर्मदे हर" वाचले आहे. मध्यंतरी पुस्तकाच्या दुकानात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे याच विषयावर अजुनही काही पुस्तके दिसली, तेव्हा माझा असा समज झाला की कुंटे यांचे पुस्तक पाहून अजुन काही लोकांनी त्याच विषयावर आपल्या अनुभवांची पुस्तके लिहिली असावीत. एखाद्या विषयाची लाट येते त्याप्रमाणे. खरे काय आहे ? कोणी खुलासा करू शकेल का ?
गोनिदांच्या पुस्तकाबद्दल माहिती नव्हती, त्यांचे पुस्तक सर्वात आधी आले असणार.
महेश, कुंटे यांचं पुस्तक अजून
महेश, कुंटे यांचं पुस्तक अजून मला मिळालं नाही. गोनीदांचं पुस्तक सगळ्यात आधीचं. १९४९ सालचं. गुण्ये यांचं पुस्तक १९९६ चं. पण त्यानी परिक्रमा १९८३ साली केली होती. आणि हे पुस्तक वाचून कुंटे यांना प्रेरणा मिळाली असा उल्लेख आहे. इतरही अनेक पुस्तकांबद्दल अनेकांनी वर उल्लेख केले आहेत, जसे की भारती ठाकूर, इथे त्या पुस्तकांबद्दल कोणी लिहिलं असेल तर कृपया लिंक्स द्या म्हणजे सर्वानाच बरं पडेल.
माहितीबद्दल धन्यवाद, पण मला
माहितीबद्दल धन्यवाद, पण मला एक प्रश्न पडला आहे की कुंटे यांचेच पुस्तक जास्त प्रसिद्ध का झाले असावे ? कारण मी अनेकांकडून नर्मदा परिक्रमेवर कुंटे यांच्या पुस्तकाबद्दलच ऐकले होते.
महेश, गुण्ये यांचं पुस्तक
महेश, गुण्ये यांचं पुस्तक (तसंचं गोनीदांचं सुद्धा) बरीच वर्षे उपलब्ध नव्हतं. गुण्ये यांच्या पुस्तकाची पहिली एडिशन १९९६, दुसरी २००९ आणि तिसरी २०१०. कदाचित त्यामुळे ते लोकांच्या विस्मरणात गेलं असावं. आणखी एक गोष्ट म्हणजे गुण्ये यांनी कुंटे यांच्याप्रमाणे चमत्कृतीपूर्ण अनुभव लिहिले नाहीत. तशा अनुभवांची अपेक्षा करणार्यांची कदाचित हे पुस्तक वाचून निराशा होईल.
Pages