निरंजन व रामा या दोघांनीही पुढे होऊन त्यांना नमस्कार केला.त्या तपस्वींनी 'आयुष्यमान भव' म्हणून आशीर्वाद दिला व म्हणाले -आज अकरा वर्षे झाली. दर चैत्र महिन्यात मी इथे वास्तव्यास येत असतो. अतिशय सुंदर, शांत असणारे हे ठिकाण माझे आवडते आहे. परंतु या परिसरातील कोणालाही याजागेबाबत माहिती नाही. तुम्ही कसे पोचला या ठिकाणी .
महाराज, निरंजन नम्रपणे म्हणाला -आम्ही आमची गाय शोधत होतो तेवढ्यात एक ससा दिसला त्याचा पाठलाग करताना आम्हाला या गुहेचा तपास लागला आणि तुमचे दर्शन झाले.आपण कोण आहात कृपा करून सांगाल काय?
या देहाला शिवदास म्हणतात, वर्षातले अकरा महिने आम्ही तीर्थयात्रा करतो व एक महिना या गुहेत येऊन साधना करत असतो.
तुम्ही एवढ्या वर्षे इथे येत असता आणि आमच्या गावाला याचा अजूनदेखील पत्ता नाही हे एक आश्चर्यच म्हणवे लागेल -निरंजन.
मुलांनो हि गुहाच आजवर कोणाला माहित नाही म्हटल्यावर मी कसा माहित पडेन. शिवाय लोकांना जर समझले तर माझ्या एकांतवासात व्यत्यय येईल.
परंतु महाराज आपल्या पवित्र दर्शनाला आमचे गाव मुकले ना?
तुझे खरे आहे बाळ, परंतु योग्य आल्याशिवाय मी लोकांतात येणार नव्हतो. आता ती वेळ आली म्हणूनच तुम्हाला या गुहेचा शोध लागला.
तर महाराज आपण गावात येऊन आमच्या गावातील लोकांना दर्शन द्या खूप चांगला गाव आहे आमचा, तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी निरंजन हात जोडत म्हणाला.
त्यावर शिवदास बाबा म्हणाले. बाळांनो मी नक्कीच गावात येईल परंतु थोडे थांबा चार पाच दिवसात मी गावात येईन.
जशी आपली इच्छा बाबा, परंतु एक विनंती होती. निरंजन म्हणाला.
बोल.
आमचा एक सदा म्हणून मित्र आहे असे म्हणून निरंजन ने सदाची सारी हकीकत सांगितली, व त्याला बरा करण्यासाठी बाबांची विनवणी केली.
ठीक आहे उद्या त्याला घेऊन या परंतु त्याच्याबरोबर जास्तजन येऊ नका. फक्त एक दोघेजण या, आणि या गोष्टीचा कुणाला पत्ता लागू देऊ नका. या तुम्ही आता असे म्हणून शिवदास बाबांनी डोळे मिटले व ते ध्यानस्थ झाले.
दोघांनी त्यांना नमस्कार केला व गुहेबाहेर पडले.
रात्री नऊ वाजता निरंजन व रामा सदाच्या घरी गेले. सदाच्या चुलत्याने त्यांच्याकडे रागाने बघतच घरात घेतले. या पोरानंपायीच आपल्या सदाची हि अवस्था झाली असे सदाच्या घरच्या सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे ते सदाच्या सगळ्या मित्रांना शिव्या घालत होते.
घरात आल्या आल्या दिनकरराव म्हणाले- झाला एवढा खेळ बास झाला, आता आमच्या घरी येऊन नवीन काय वाटोळे करायचं राहिलय
काका तुमचा आम्हा पोरांवर राग आहे हे आम्हाला माहित आहे. जे घडलं ते घडलं पण तेच उगाळून काय होणार आहे त्यापेक्षा तो कसा बरा होईल हे पाहायला पाहिजे.आणि तो आमचा चांगला मित्र आहे. पोरांनी सुरुवातीला पैंज लावली होती हे जरी खरे असले तरी,नंतर त्याला स्मशानात जाऊ नको म्हणून सांगितले होते. जे घडायला नको होते ते घडलेच आहे त्याच्यावर वाद घालीत बसण्यापेक्षा त्याला बरा करण्यासाठी काहीतरी करू.
आम्ही तर सगळं काही करून बसलो. श्यामराव हताशपणे म्हणाले. एवढ सारं करून पोरगं काय हाताला लागणा काय हुणार हाय कुणास ठाऊक?
काका धीर सोडू नका उपाय सापडलाय म्हणून तर इतक्या राच्च आम्ही आलोय.
उपाय सापडला हे शब्द ऐकताच दोघाही भावांच्या चेह-रावर आशेची टवटवी दिसू लागली. दिनकर राव लगेच म्हणाले.
सांगा पोरांनू लगीच, काय बी उपाय असू द्या नि कितीबी खर्च येउद्या पर आमचा सदा तेवढा नीट होऊद्या. रागाच्या भरात बोल्लेलो मनावर घेऊ नका. सदाच्या काळजीने पर डोस्क कामातून गेलय.
त्यानंतर निरंजन ने गुहेत गेल्यापासून सर्व हकीकत सांगितली. व उद्या आपण सदाला घेऊन जाऊ असेही सांगितले.
आपल्या गावात अशी गुहा आहे कि ती आजवर कुणालाच दिसली नाही. हे ऐकून दोघा भावांना आश्चर्य वाटले नि त्या बरोबर सदा नक्कीच बरा होईल हि आशाही.
गुहेत शिरताना सदाने खूपच त्रास दिला मोठ्याने ओरडू लागला नि पळून जायचा प्रयत्न करू लागला. परंतु निरंजन नि रामाने त्याला सोडला नाही. ताकतीचा वापर करूनच त्याला ओढतच त्यांनी आत नेला. दिनकरराव, श्यामराव तर गुहा बघून हबकूनच गेले होते . मांत्रिकाच्या गुहेत आणि या गुहेत खूपच फरक होता. मांत्रिकाच्या गुहेत उग्र वास यायचा व भीती वाटायची त्या उलट इथे आल्या आल्या मनाला एक प्रकारची शांतता लाभल्यासारखे वाटत होते.
ते पाचही जण आत आले व त्यांनी महाराजांना नमस्कार केला. व सदाला पुढे घेतला महाराजांनी त्याच्याकडे पाहून स्मित केले. सदा त्यांच्याकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने पाहत होता.
महाराज म्हणाले
हे पहा मी याला बरा करतो परंतु याला आजच्या दिवस माझ्याजवळ राहूद्या उद्या तुम्ही या आणि सदाला घेऊन जा.
अश्या वाईट अवस्थेत सदाला तिथे एकटे ठेवायला दिनकरराव व श्यामराव यांची मने तयार होईना. ते चुळबुळ करू लागले.
तेव्हा निरंजन महाराजांना म्हणाला- महाराज, आमच्यापैकी कोणी याच्या सोबत राहिले तर नाही का चालणार?
नाही, मला काही विशेष प्रयोग करायचे आहेत. आणि त्या वेळी इथे कोणीही नको आहे. तुम्ही याला घ्यायला उद्या याल तेव्हा हा सर्वांना ओळखत असेल हि खात्री मी देतो.
जशी आपली इच्छा महाराज आम्ही उद्या येतो. असे म्हणून निरंजनने सर्वांना बाहेर काढले.
बाहेर आल्यावर त्याने सदाच्या चुलत्याची व वडिलांची समझुत काढली. व उद्या आपण लवकर येऊ असे म्हणून ते गावाचा रस्ता चालू लागले.
सदा बरा झाल्याची बातमी गावात झपाट्याने पसरली. सदाला बरे करणारे महाराज उद्या आपल्या गावात येणार आहे हे समजल्यानंतर गावातील बहुतेक सगळ्यांनी आपली कामे रद्द करून गावातच महाराजांच्या दर्शनाला थांबायचे ठरवले.
सदाला एवढ्या मोठ्या भुताच्या तावडीतून सोडवणारे महाराज लय पावरबाज हाय अशी चर्चा आख्ख्या गावात चालली होती. त्यांचं दर्शन घेण्यासाठी काहींनी तर शेजारच्या गावात असणाऱ्या नातेवाईकांना देखील बोलावले होते. त्यामुळेच दुसऱ्यादिवशी गावात असणाऱ्या पाराभोवती भली मोठी गर्दी जमा झाली होती. थोड्याच वेळात निरंजन महाराजांना घेऊन आला. ते पारावर टाकलेल्या सतरंजीवर बसताच त्यांच्या दर्शनासाठी लोकं गडबड करू लागली. गोंधळ होऊ नये म्हणून निरंजन सर्वांना म्हणाला.
सर्वांनी शांत बसावे व बसूनच महाराजांना नमस्कार करावा. महाराज जास्त वेळ थांबणार नाहीत तेव्हा प्रत्येकाला वैयक्तिक दर्शन देता येणार नाही. महाराज दहा मिनिटे आपल्याशी बोलणार आहेत. त्यातूनच ते थोडे मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा सर्वांनी शांतता राखावी.
महाराजांनी बोलायला सुरुवात केली. अगोदर ते अध्यात्मावर बोलले. ईश्वर भक्ती सध्याच्या जीवनात किती गरजेची आहे ते त्यांनी लोकांना पटवून दिले. नंतर त्यांनी सदाचा विषय घेतला.ते म्हणाले
तुम्हा सर्वांना वाटले होते कि सदा स्मशानात गेला तिथे त्याला भूतबाधा झाली.आता तो बरा होणार नाही वैगेरे वैगेरे, तुम्हा सर्वांना मी सांगतो कि सदाला कुठलीही भूतबाधा झाली नव्हती. तो फक्त प्रमाणाबाहेर घाबरला होता. त्याचा परिणाम त्याच्या मनावर खोलवर झाला होता. त्यामुळे त्याची अवस्था अशी झाली होती. त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढल्यानंतर मी त्याच्याशी खूप चर्चा केली. त्याचे विचार खूपच चांगले आहेत. आपल्या समाजात खोट्या अंध श्रदधे पायी समाजाची खरोखर अधोगती झाली आहे.
देवाला बळी देणे हि सुद्धा एक प्रकारची अंध श्रद्धा आहे ज्या जीवाला देवाने जन्म दिला त्याच जीवाचा बळी तो देव कश्याला मागेल. देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींवर श्रद्धा हवीच परंतु ती डोळस असायला हवी. कुणाही भगताच्या, मांत्रिकाच्या नदी लागून तुम्ही स्वताचे नुकसान करून घेऊ नका.
महाराज, शिवाने मध्येच प्रश्न केला - भुते-खेटे आहेत का नाहीत भूतांचे असणे आम्ही मानावे कि नाही. कारण ज्या ग्रंथान्मधून देवांचे वर्णन आहे त्याच ग्रंथामध्ये भूतांचाही उल्लेख आहेत.
भुते नाहीत असे मी म्हणत नाही परंतु गैरसमजुतीने व कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी भुताला जन्म देऊ नये. भुतांच्या जेवढ्या घटना सांगितल्या जातात किंवा घडतात त्यापैकी हजारामागे एखादीच खरी असते. परंतु त्या सगळ्याच खऱ्या आहेत असे समझुन आपण मांत्रिकांचे नि भगतांचे खिसे भरत असतो ह्या गोष्टीला माझा विरोध आहे.
मग तुम्ही म्हणता सदा घाबरला पण तो काहीतरी दिसले म्हणूनच घाबरलाना ? मग त्याला दिसणारे भूत असू शकते.
नाही त्याला काय झाले हे पाहण्यासाठी मला माझ्या दिव्य दृष्टीचा वापर करावा लागला . त्यात मला असे दिसून आले कि सदा एक तास भर फक्त भूतांचाच विचार करत होता. त्यामुळे त्याचे भीतीचे प्रमाण वाढत होते. ज्यावेळी तो खूप घाबरला नेमके त्याच वेळी रानमांजराने तिथे उडी मारली. भूतानेच उडी मारली असे सदाला वाटले. नि तो पळत सुटला. एकंदरीत अतिभयाने त्याची अशी अवस्था झाली होती.
महाराज आम्हाला तर आता असा प्रश्न पडतो कि दिव्यदृष्टी, अंतरज्ञान, ह्या ज्या शक्ती आहेत त्यावर तरी कसा विश्वास ठेवावा. निरंजन म्हणाला.
हे पहा ह्या ज्या दिव्य शक्ती आहेत त्या म्हणजे चमत्कार नव्हे, त्या दिव्य विद्या आहेत. त्या प्रकारची खडतर साधना केल्यानंतर त्या प्राप्त होत्यात मला माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने व माझ्या साधनेमुळे काही दिव्य विद्या प्राप्त झाल्या आहेत म्हणून मी सदावर योग्य उपचार केला नि तो त्या भयंकर भीतीच्या भोवरयातून बाहेर पडला.
तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला परंतु श्रद्धा-अंधश्रद्धा यात खूप कमी अंतर आहे ते आम्हा खेडेगावाच्या लोकांना कस कळणार. निरंजन म्हणाला.
डोळसपने जी कृती आपण करतो ती श्रद्धा होय नि सारासार विवेकाचा विचार न करता अंधपणाने केलेली कृती म्हणजे अंधश्रद्धा होय .याच्यावर खूप काही बोलता येईल परंतु मला हिमालयात निघून येण्याचे आदेश आले आहेत वेळ कमी असल्यामुळे या सर्व गोष्टी मी सदाला कालच सांगितल्या आहेत. पुढच्या महिन्यापासून विठ्ठल मंदिरात सदा काही चांगल्या ग्रंथांचे वाचन चालू करणार आहे. वाचत असताना अर्थ सांगताना तो तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा यावर चांगले मार्गदर्शन करेल.
समाप्त
शेवटच्या भागाला खूपच उशीर
शेवटच्या भागाला खूपच उशीर झाला आहे त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो
छान आहे कथा, पण शेवट थोडा
छान आहे कथा, पण शेवट थोडा बाळबोध वाटला.
मजा नाही आली.
मजा नाही आली.
ठाकठीक. पण अजून लिहा.
ठाकठीक.
पण अजून लिहा. पुलेशु
धन्यवाद आबासाहेब
धन्यवाद आबासाहेब
अनिल . आवडली कथा. चान्गला
अनिल . आवडली कथा. चान्गला प्रयत्न.
प्रवाही ,ओघवती भाषाशैली.वरती
प्रवाही ,ओघवती भाषाशैली.वरती धरुन बसा aka, keep it up