प्रवाह

Submitted by चाणक्य on 3 September, 2008 - 14:19

किनार्‍यावर नुसतेच कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय शोधतोय?

कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन भोवर्‍यामध्ये गुरफटलो
कधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधले
कधी निसटणारी वाळू हातात घेतली
तर कधी चिखलाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय शोधतोय?

शेवटी दमून भागून जेव्हा किनार्‍याला लागलो
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा डोहाकडे पाहीले ....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या डोहामधूनच उगम पावलाय एक सोनेरी प्रवाह...
जो जातोय दूर, खूप दूर... क्षितीजापर्यंत...
मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या प्रवाहात...

आता मला उमगलंय
मला फक्त वहात रहायचयं, पुढे पुढे जात रहायचयं!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मला फक्त वहात रहायचयं, पुढे पुढे जात रहायचयं... वाह ! (मूलभूत अपरिपूर्णता आणि अपरिहार्यता... दूसरं काय... असच ना !) मस्तच !

शेवटची ओळ (मला फक्त वहात रहायचयं, पुढे पुढे जात रहायचयं......)
व्वा झक्कासच आहे.

सुरेख कल्पना.

संतोष कौतुक धन्यवाद

कुसुमाग्रजांनी म्हटलेच आहे 'थांबल्याला पराजय ,जय चालत्याला !'
म्हणूनच 'फक्त वहात राहायचंय' ...बहुत खुब!!