शेतकरी जोडीचा रांगडा रोमान्स थंडीच्या लाटेला पळवून लावतो

Submitted by pradyumnasantu on 12 February, 2012 - 00:36

आली थंडीची लाट थेट माझ्या मळ्यात
हुडहुडी शिरली
कशी तनामनात
काया थरथरली मस्ती सुरसुरली
कात चुना रंगे पाना-------------त

थंड वा-याचा झोत घेतो गळ्याचा घोट
बट भुरभुरते
कपाळात
रात गहिवरली ऋत शिरशिरली
शीळ उमटते काना-------------त

थंड शिवार रान, मला करी हैराण
धनी विसरू नका
तुम्ही भान
गारवा रुतला, गळा ठसठसला
कळ धुसफुसली अंगा-----------त
रात गहिवरली ऋत शिरशिरली
शीळ उमटते काना-----------त

सांगतो मी ते कर राज मनात धर
चांदणीचा चारा
पेटवी भारा भर
कोर चंद्राची तोडून वेणीत माळ
थंडी राहील कुठून आकाशा---------त
रात गहिवरली ऋत शिरशिरली
शीळ उमटते काना-----------त

नका बोलू काही, लावू नका च-हाट
ही दमट चांदणी
कशी घेईल पेट
रोगापरीस इलाज आरभाट
राव कुठल्या तुम्ही सपना----------त
रात गहिवरली ऋत शिरशिरली
शीळ उमटते काना-----------त

नाव माझं सर्जेराव,देतो मिशीवर ताव
चल चल ग सखे
अंधारात घाल नाव
अहो सोडा मला धनी धसमुसळा
असा कसा हा हात पिरगळला---------त
रात गहिवरली ऋत शिरशिरली
शीळ उमटते काना-----------त

अंग गरम झालं, जणू तव्यात तिळगुळ
काटा काटा फुले
सा-या अंगांगावर
जसा सुर्य उगवला, भर पहाटेला
नका टोचू मिशी ओठा------------त
रात गहिवरली ऋत शिरशिरली
शीळ उमटते काना-----------त

आता मळ्यामधून, थंडी गेली पळून
लाट ओसरली
जोडी पसरली
भर ओल्या ओल्या शिवारात
रात गहिवरली ऋत शिरशिरली
शीळ उमटते काना-----------त

(जोडीची ही रांगडी प्रीत शेतात लपून पहाणारी सर्व मंडळी आता
ढोलकी वगैरे वाद्ये घेउनच तिथे अवतरतात आणि वाद्यांच्या गजरात
थंडी पारच पळून जाते)

सगळ्यांच्या पोटी
पेटली शेकोटी
उभ्या रानाला तशी
त्याची धग बसली
सर्जेरावाचं कुटुंब मग असं नाचलं की
थुई थुई करते चांदरा-----------त
थंडी विरघळली, अन पळून गेली
कोवळे किरण आले झोका--------त

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आहे !

सॉरी, गाणं नीट चालीत म्हणता येतय काय ते मनातल्यामनात तर्‍हतर्‍हेने म्हणून बघत होतो त्यापायी प्रतिसाद द्यायला थोडा उशीर झाला. लावणीच्या बाजातली ही द्वंद्वगीताची रचना छान आहे. आणि ठस्केबाजपणे म्हणताही येते.
कोर चंद्राची तोड, वेणीमधी ती माळ. थंडी राहील कुठून आकाशात? ही कल्पना मस्तच.

एम. कर्णिकः
प्रतिसादाबद्दल आभार. पण...........
'लावणीच्या बाजातली" या मुद्द्याबाबत असहमत. खेड्यातील बरचसे शेतकरी कुटुंबिय ढोलकी वगैरे वाद्यांच्या तालावर अशी गाणी म्हणतात. पोळा सणाच्यावेळीही अशा प्रकारची गाणी म्हटली जातात. फरक फक्त इतकाच की या गाण्याला शृंगारीक साज दिला आहे. लावणी हा तितकाच उच्च दर्जाचा गीत्-प्रकार आहे खरा, मात्र तो पूर्णतः वेगळा आहे. प्रसंगाचा बेस व रचनेचा प्रकार हे दोन्हीही गृहीत धरून.
मतभिन्नतेबद्दल क्षमस्व.