गुंफता गुंफता गजरे

Submitted by pradyumnasantu on 4 February, 2012 - 18:44

जाईजुई अन सायल्या
वेचूनी केल्या गोळा
रंगली मैफ़ल बहिणींची
गुंफण्यास गजरे माळा

ओठात धरूनीया सुई
धाकटी म्हणाली ताई
आई बघ आपली आता
पूर्वीची राहिली नाही

घडीघडी मी पहाते
दादाचीच बाजू घेते
दोघींचाही आपला
दुस्वास जणू ती करते

एकेक कळी निवडत मग
थोरली तिला उत्तरते
धाकटे खरे मजलाही
करु काय मुळी न समजते

मी तरी बाई आता
लग्न करुन जाणार
पोटात भिती दाटते
की तुझे कसे होणार

धाकटी होई रडवेली
मज सोडुनी तू जाणार
त्यापेक्षा मजसाठी तू
शोध ना तुझा कुणी दीर

मी वहिनीच्या राज्यात
एकटी कशी ग राहू
टोमणे हरघडी कुचके
मी सांग कशी ते सहू

कामाची राधाबाई
अजिबातच ऐकत नाही
दोघीही आपण आता
जणू इथे रहातच नाही

या सगळ्या गोष्टी होती
तो माळा करुनी झाल्या
अन दोघी बहिणी मग त्या
घेऊनीया आत पळाल्या
****
तिजसाठीच मी तो केला
हा गजरा मस्त टपोरा
वहिनीच्या दाट केसांत
दिसणार छान साजरा

हा केला मी आईला
तिज आवडते ही जाई
माळता जाई केसात
ती तिची रहातच नाही

हा तिसरा मी केलेला
राधाबाईला देते
दिसभर राबते बिचारी
प्रेमाने सारे करते

बोलत त्या आईकडे गेल्या
वहिनीही तिथेच ती होती
सांगुनि सर्व मग गप्पा
मारली तयांनी मिठी

हसल्या नि खूप खळखळल्या
आ्ठवून खोट्या चुगल्या
गुंफता गुंफता गजरे
बहिणी त्या खेळ खेळल्या

गुलमोहर: 
शब्दखुणा: