भाबडा

Submitted by pradyumnasantu on 2 February, 2012 - 21:56

सायेब, थोडा येळ मिळेल का? जरा खाजगी बोलायचं आहे
धोंडीबा, ये, ये ना, सांग काय सांगायचं आहे
सरकार, मी कृषी-कॊलेजचा मजूर आज तीस वर्ष झाली, तुमी प्राचार्य माझं
अरे हो हो मी ओळखतो तुला चांगलं,नि:शंकपणे सांग काय म्हणणं आहे तुझं
जरा खाजगी,
असुदे, सांग तू
जरा घरगुती
अरे असुदे रे, बोल तू
साएब, क्वाटरमधली कामगारं लई चिडवाचिडवी करत्यात
जाता येता टोचत्यात
सायेब, मला, बायकोला... माझं काय न्हाई मी घ्येत मनावर,
खरं बायकु माझी, हरदयानं लई नाजुक खरोखर
हरदयानं
व्हय हरदय हरदय, हीतं असतं ते, छाताडात, रगत साफ करतय ते
हं, हृदय!!
त्येच. लई नाजुक तिचं हरदय.
ही लोकं काईबाई बोलत्यात तवा मी तिच्या छातीला हात लावून बगतो
लई फाष्ट धडधड करतंय, त्ये आयकून माझा ऊरबी फाटतोय.
अरे पण काय बोलतात हे लोक? आणि कशासाठी
तुम्ही असं काय केलंय की ते आहेत तुमच्यापाठी?
आणि आहेत तरी कोण ही धेंडं
सांग मला नावं, मी करतो एकेकाला सस्पेंड
न्हाई न्हाई सरकार, पोटावर लाथ न्हाई मारायची
ती बी मजूरंच हाईत कालिजची
मला न्हाय जमनार, नावं नाय सांगनार, म्या जातू, कामं हाईत फार्माची
अरे अरे थांब, जाउ नकोस, नाही करत मी कुणाला सस्पेंड
पण सविस्तर सारं सांग, करु नकोस गडबड
काय सांगू सायेब, लगनाला झाली वर्षं वीसावर योक
पदरात अजूनशान न्हाइ ल्योक
ही लोकं काईबाई बोलत्यात, तिला वांझ, मला नंपीवसक म्हन्त्यात
......
धोंडीचे डोळे भरुन वाहिले
ऐकून हे हुंदके, प्राचार्य मूक जाहले

तेना सिक्शा व्हावी ह्ये म्हननं न्हाई
पर मला एक शंका हाये प्राचार्यसायेब,
सरकार, ह्ये कालिज म्हंजे आमची जान
हितली हिरवाई आमचे पंचप्राण
आठ वर्षांपूर्वी झाल्यालं वृक्षारोपन
त्या येळला, तुमी मला नि बायकोला दिल्याला मान
येक नारळाचं रोप लावाया तुमी बोलिवलं आमाला
आमी बी धागधुगीतच पेरलेलं रोपाला.
तवाधरनं रोज जीवाभावानं जपलंय म्या तेला
आज बगितला म्या माज्या झाडाला नारळ लागल्याला,
सरकार, आता सांगा मला,
जर आमचं जीवन म्हनजे हीच झाडं, फुलं, पानं
आन, आमा वांझ जोडीनं लावलेल्या रोपाला आलंय फळ जोमानं
तर मग सरकार, मी नंपीवसक कसा
आणि ती वांझ कशी?
सांगा सरकार!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वाव. आपण लावलेल्या झाडाला आलेल्या फळांना स्वतःची मुलं मानणार्‍याच्या भावना समजून घेतल्या तर त्याचा प्रश्न खरोखर निरुत्तर करणारा वाटतो. छान कल्पना आणि छान कल्पनाविस्तार.