भेट सेलेब्रिटीची
काव्य
कवींना असते काही वेगळंच पहाण्याची शक्ती
रवीसुद्धा जे न पाही ते पहाण्याची युक्ती
आकाश पांघरुन जग शांत झोपलंय असं त्यांना भासतं
कवींच्या दृष्टीनं आकाश कधी पांघरूण तर कधी समुद्र असतं
चंद्रिकेची बनते नाव, चांदण्या प्रवासी
खरंच हे कवीलोक म्हणजे स्वप्नपूरचे रहिवासी
**
सत्य
माझ्या दृष्टीनं आकाश हे फक्त छत
क्षितिज भिंत
माझा पंधरा वर्षांचा मुलगा हे भविष्य
छोटं बाळ, बायको
मजूरी हेच आयुष्य
**
स्वप्न
मी कधीचा विसरलोय स्वप्नांचं रुप
मुलाच्या डोळ्यांत मात्र पाहिलेत मी खूप
त्याला इच्छा आहे कवी व्हायची
धुकं म्हणजे ’चादर उबेची’,फाटकं कांबळं त्याची ’गोधडी उन्हाची’
छोट्या जागेत त्याचे होतात खूपच हाल
पण झोपताना म्हणेल हा माझा राजमहाल
नट शाहमानखानचा फॆन आहे तो
फ़र्स्ट डे फर्स्ट शो हमखास बघतो
त्याच्याच सिनेमातल्या एक एक अदा
नक्कल करत असतो सदा न कदा
कधीतरी मला भेटेल का शामानखान
हे त्याच्या डोळ्यांतलं दुसरं सपान
**
भविष्य
देवानंच जर ठरवलं त्याचं स्वप्न पुरं करणार
तर तुम्ही आम्ही ते प्राक्तन कसं बदलणार?
**
काय, कसं घडलं:
शाहमानखान गेला होता एका पार्टीत
ठाउक आहेच सर्वांना या पार्ट्यांचं गणित
पहाटेनं धुक्याची चादर पांघरलेली
मुलगा गाढ झोपेत, गोधडीतून धुकं होतं ठिबकत
आपला कडवा फॆन इथे रहातोय कसं कळलं कुणास ठाउक
त्याला भेटायला शाहमान झाला भावूक
**
पुन्हा काव्य
आला उष्म्याचा झोत
जणू उर्जेचा स्रोत
चादर धुक्याची वितळली क्षणात
स्वप्नं माझ्या मुलाची त्याच्या कणाकणात
(काव्य माझे नाही ना कळले?)
**
गद्य
प्रख्यात अभिनेता शाहमानखान याने
मद्यधुंद अवस्थेत आपल्या आलिशान गाडीखाली
फूटपाथवर झोपलेल्या चौघाची फॆमिली चिरडली.
**
काव्य माझे नाही ना कळले
पण जरूर असेल आमच्या रक्तातून आकळले
(No subject)
एकदम काळजालाच हात घालता हो
एकदम काळजालाच हात घालता हो तुम्ही प्रद्युम्न.
छान आहे,आवडली.
छान आहे,आवडली.
कविता लेखनाचा सुन्दर
कविता लेखनाचा सुन्दर प्रयोग........एखादी परफेक्ट स्क्रिप्ट वाचल्या सारखी वाटतेय.
मस्त.!!
छान आहे कविता.
छान आहे कविता.
छान... शब्द व कल्पना
छान...
शब्द व कल्पना ,चौकार/षटकारांची आतषबाजी...
फारच करूण शेवट आहे. छान
फारच करूण शेवट आहे. छान काव्य.
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई नशेत
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
नशेत गाडी चालवून सात जणांचा बळी घेणा-या अॅलिस्टर परेराला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाल्यावर बॉलीवूडचा हिरो सलमानखानचे काय होणार हा सवाल चर्चेत आला आहे