सह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा

Submitted by आनंदयात्री on 3 January, 2012 - 23:26

सह्यांकन २०११ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान
सह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम अहुपे व्हाया हातवीज
सह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गायदरा घाट
सह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीमाशंकर व्हाया भट्टीचे रान
सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप

डोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसहालाच जाग आली तेव्हा बरंच फ्रेश वाटत होतं. व्हरांड्यातून बाहेर आलो तेव्हा, समोर जीवधन किल्ला, वानरलिंगी सुळका आणि डाव्या हाताला नाणेघाटाच्या पठाराचा उंचवटा दिसत होता. सिंगापूर गाव जीवधन किल्ला आणि आंबोली घाट यांच्या मधल्या डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. दोनदा चहा आणि विलासदादाच्या हातचे फस्क्लास पोहे हादडल्यावर ओळखपरेड झाली. सुदैवाने अतिशय अनुभवी मंडळी आमच्या बॅचमध्ये होती. काही जण हिमालयात ट्रेक केलेले तर काही यापूर्वीच्या ५-६ 'सह्यांकन' मध्ये सहभागी झालेले होते. तो अनुभव पाहता आपले हे पहिलेच 'सह्यांकन' आहे असे वाटून अचानक मीच स्वतःला अतिशय क्षुद्र जीव समजायला लागलो.

(अवांतर माहिती - उभे डावीकडून - महेश शिंगणे उर्फ यत्ता दहावी, अभिषेक शिंगणे, शंतनु अभ्यंकर(उलटी टोपी), लीडर सौरभ भिडे उर्फ बल्लू, लीडर लांबा, विद्या कामत, सुहास कुलकर्णी, आठवले काका(पांढरी दाढी), विनायक कर्वे, रोहित पाटकर, ललिता, लहू डफळे, मिलिंद हर्डी़कर. बसलेले डावीकडून - रूची गोसालिया उर्फ सीओईपी, पंक्ती शाह उर्फ टीचर, जय उर्फ यत्ता आठवी, सचिन करंबेळकर, प्रसाद (श्री. ललिता) व फोटॉ काढणारे अस्मादिक)

'चक्रम'तर्फे सर्वांना टोप्या आणि स्लिंग(कधी चढ-उताराला आधार म्हणून वापरायचा ८-१० फुटी रोप) वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कॅरीमॅट सॅकला कशाने बांधायची हा मला पडलेला प्रश्न त्या स्लिंगने कायमचा सोडवला. 'चक्रम' आम्हाला (खर्‍याखुर्‍या) टोप्या घालणार आहे हे आधीच समजल्यामुळे मी घरून निघतानाच टोपीचे ५० ग्रॅम वाचवले होते.

निघा, निघा असं एकमेकांना म्हणत पॅक-लंच (सॉस आणि पराठे) सोबत घेऊन सर्वांनी निघायला ९ वाजले. संपूर्ण मोहिमेमध्ये आम्हा सहभागी लोकांमुळे झालेला हा एकमेव उशीर! सुरूवातीला सपाटीवरून चालत आंबोलीघाटाच्या पायथ्याशी पोचायचे होते.

जीवधन किल्ला आणि वानरलिंगी -

खास सह्यांकनसाठी पायलटवीरांनी आखलेले (मोहीम ठरवताना जे ट्रायल ट्रेक केले जातात, त्यांना पायलट ट्रेक किंवा रेकी असं म्हणतात) दिशादर्शक बाण पळूपासूनच दिसायला सुरूवात झाल्यावर माझा पुरता हिरमोड झाला. आता वाट चुकायची शक्यता जवळजवळ शून्य होती! हे वाट चुकण्याचं आणि स्वतः शोधण्याचं लागलेलं वेड हा भटकंतीचा खराखुरा प्राण म्हणायला हवा!

सुरूवातीला थोडा वेळ सपाटीवरून चालल्यावर जेव्हा डोंगरपायथा आला आणि झाडीत शिरायची वेळ आली, तेव्हा लांबाने 'मी वाट दाखवतो' असे म्हणून लीड करायला सुरुवात केली, आणि ताबडतोब आम्ही वाट चुकलो! मी अर्थातच तुडुंब खूश झालो. खरं सांगायचं तर, वाट चुकली की ट्रेक अफलातून होतो, यावर माझा अनुभवांती पूर्ण विश्वास बसला आहे. मोहिमेच्या पहिल्याच तासात वाट हरवल्यामुळे आता संपूर्ण मोहिम अत्यंत यशस्वी होणार याबद्दल माझ्या तरी मनात कुठलीच शंका उरली नव्हती. मग लाकडे तोडणारा एक गावकरी भेटला. त्याला खिंडीची वाट दाखवण्यासाठी तयार केले आणि आम्ही पुढे निघालो.

वाटेत एका पाण्यापाशी विश्रांती घ्यायला थांबलो. आणि लांबामहाराजांनी इथे 'जॅक अँड जिल' या बालपणी शिकलेल्या एका रम्य कवितेवर आख्यान सुरू केले. खजुर, गोळ्या, चिवडा, चकल्या असा मनमुराद पोटभर फराळ झाल्यावर ते आख्यानही संपले आणि आम्ही पुढे निघालो.

ही वाट खडतर आणि अत्यंत अनियमित चढाची आहे. कमालीचा दमवणारा आंबोली घाट चढून खिंडीत पोचलो तेव्हा ढाकोबाच्या पहिल्या कँपचे लीडर आमच्या स्वागताला उभे होते. खरं म्हणजे, काल रात्री आणि त्यामु़ळे आज सकाळी निघायला झालेला उशीर ऐकून ते 'घाट बर्‍यापैकी उतरून जावी लागेल' अशा विचारानेच आले होते, पण आमच्या वेगामुळे आम्हीच त्यांना वर 'खिंडीत गाठले' होते. इथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला साडेतीन तास लागले होते. पळूपासून इथपर्यंत पोचायला पायलटवीरांनी जवळ जवळ ७ तासांचा टाईमलॉग दिला होता. यावरून आपल्या बॅचमध्ये वयाने मोठे (म्हातारे म्हणायचा मोह आवरता घेतो आहे) असले तरी मोठ्या मोहिमेसाठी पूर्ण तयार असे वीर आहेत याची झलक बघायला मिळाली.

आंबोली घाटाची ही नाळेसारखी दिसणारी वाट

ढाकोबाचे कँपलीडर MB, अक्षय दांडेकर उर्फ दांडू आणि सुदीप आमच्यासाठी सरबत घेऊन आले होते. खिंडीतून वर अर्धा-पाऊण तास चढून दोनच्या सुमारास ढाकोबाच्या जुन्या देवळापाशी पोचलो. तिथे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. आता तासभर सपाट पठारावरून चाललो की कँपमध्ये पोहोचणार होतो. मध्ये एक रॉकपॅच पार करून पुढे जावे लागते.

वरच्या पठारावर पोचलो की पळू गावाच्या विरूद्ध बाजूचा नजारा दिसतो. आंबोली गाव या बाजूला आहे.

तुम्ही कधीतरीच ट्रेकींग करता, आम्ही रोज करतो, असंच बहुधा यांना सांगायचं असेल -

इथून डोंगरमाथ्यावरूनच वळसे घेत घेत वाट ढाकोबा डोंगराकडे जाते. वाट अजिब्बात चुकू नये म्हणून ही दक्षता - ठराविक अंतरावर मारलेले तीन बाण या फोटोत दिसत आहेत.

वाटेवर ढाकोबा डोंगराचे झालेले पहिले दर्शन -

आमच्या वेळापत्रकानुसार आम्ही आज ढाकोबा पायथ्याला मुक्काम करणार होतो. दूरवर कँपचे तंबू दिसू लागले आणि सकाळपासूनच्या पायपिटीचा विसर पडला. ढाकोबाकडे जाणार्‍या वाटेपासून थोडंसं पुढे पश्चिमेकडे कलणार्‍या सूर्याला पाठीशी ठेवून कँप उभा होता. दक्षिणेकडे मोकळं पठार, उत्तरेकडे देवराई, साधारण उगवतीला ढाकोबा डोंगर असा सुंदर आसमंत सोबत होता.

आजची संपूर्ण वाटचाल संपवून संध्याकाळी पाच वाजता कँपमध्ये पोचलो तेव्हा स्वागताला एक बॅनर सज्ज होता. कँपची व्यवस्था अतिशय नेटकी होती. सुका व ओला कचरा टाकायला, तसंच पिण्यासाठी आणि वापरायच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. सहभागी भटक्यांसाठी मोठे दोन आणि कँपलीडर्ससाठी छोटे तीन तंबू उभे होते. बाकी सगळा 'मामला' उघड्यावरच होता.

जीर्णोद्धार सुरू असलेले मंदिर -

कँपवर पोचल्यावर एका कँपलीडरने काय करायचे नाही, कुठे जायचे नाही याच सूचना दिल्या. त्यांचा सारांश, जो आम्ही नंतर आठवून आठवून लक्षात ठेवला, तो असा होता -
१. सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी विहीरीवर जायचे नाही. (मग जायचे कधी? यावर 'आत्ता' हे उत्तर मिळाले!)
२. तंबूच्या भिंतींना सॅक टेकून ठेवायच्या नाहीत.
३. तंबूच्या मधल्या खांबाला तसेच बाहेरच्या दोर्‍यांना धक्का लावायचा नाही.
४. डबा टाकायला (याचा अर्थ विचारू नका) अमुक एका दिशेला जायचे नाही.
५. रात्री उठायचे झाल्यास एकट्याने उठायचे नाही. (अजून एकाची झोपमोड करायची)
६. मोजे तंबूमध्ये न्यायचे नाहीत. इ.इ.
(यानंतर 'चुळा भरताना आवाज करायचा नाही' अशा खास पुणेरी प्रकारची एखादी सूचना येते की काय असं वाटायला लागलं होतं, पण तशी सूचना नाही मिळाली.) साहजिकच, पुढचे चार दिवस हा बिचारा सूचनादाता सूचना कशा द्याव्यात आणि देऊ नयेत यासाठी आमच्या बॅचभर आणि पुढील सर्व कँप्सवर प्रसिद्ध झाला! गरमागरम कचोरीचा नाष्टा आणि चहा झाल्यावर आम्ही तंबूमध्ये सॅक लावल्या आणि फ्रेश व्हायला विहीरीवर गेलो. सूर्यास्त दुर्ग किल्ल्याच्या पाठीमागे होणार असल्यामुळे मनासारखा देखावा बघायला मिळणार नव्हता.

अंधार पडल्यावर स्टार्टर म्हणून रस्सम तयार होते. रस्समपान झाल्यावर काही कँपलीडर्स जनरेटर सुरू करण्याच्या खटपटीला लागले आणि उरलेले आमच्याससोबत वर्तुळ करून मैफल जमवून बसले. विडंबने, कविता, भटसाहेबांच्या गझल, किस्से, चारोळ्या यांचा उगवत्या चांदण्याच्या छपराखाली मोकळ्या सपाटीवर साधारण तासभर रंगलेला तो कार्यक्रम कायम लक्षात राहिल! मध्येच दोन-तीन उल्काही पडताना पाहिल्या. खगोलपंत दांडूने त्यावर थोडी माहितीही पुरवली.

थंडी आणि वारा दोन्ही जोरदार होते. बरोब्बर साडेआठला जेवणाची हाक आली आणि आम्ही तंबूमध्ये शिरलो. तुपातला शिरा, पुर्‍या, उसळ, पापड, भात-मुगाची आमटी असा अत्यंत अनपेक्षित भरगच्च मेनू पानात आल्यावर आमची बोलती बंद झाली आणि हाता-तोंडाची गाठ पडली!

जेवणानंतर आकाशाकडे पाहिलं, तेव्हा वर समस्त चांदण्यांचं संमेलन भरलेलं होतं. व्याध, वृषभ रास, सप्तर्षी, मृगाच्या दिशेने रोखलेला बाण (बस! मला एवढंच कळतं...) असे मानवी मनावर परिणाम करणारे असंख्य ज्ञात-अज्ञात स्वयंप्रकाशी घटक तिथे रोजच्यासारखे जमा झाले होते. आम्हीच त्यांना नवखे होतो. 'जगात ठराविक काळाने घडलेल्या अशुभ घटनांच्या वेळी आकाशातील तार्‍यांची तीच विशिष्ट स्थिती दिसली होती' - इति लांबा! आणि मग पुढची पंधरा मिनिटे लांबाने समजेल अशा भाषेत मेदिनीय ज्योतिष्यशास्त्र आणि जरा वेळाने तो विषय बदलत ज्ञान मिळवण्याचे मार्ग, तीन प्रकारची कर्मे (प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण) यावर (उभ्या उभ्या) आख्यान दिले. 'समोरच्याला झेपेल असे उदाहरण दिल्यास विषयामधली गोडी वाढते' हे माझे जुने मत लांबाने पुन्हा अधिरेखित केले. त्याला जेवणाची हाक आली, म्हणून नाईलाजाने तो विषय थांबवावा लागला आणि आम्ही तंबूकडे परतलो.

बाहेर थंडी वाढली होती. अजून चार पूर्ण दिवसांची मोहीम बाकी होती. थंडीमुळे थकवाही जाणवत होता. उगाच रिस्क नको म्हणून गरम पाण्याबरोबर औषध घेतले आणि स्लीपिंग मॅटमध्ये शिरलो. झोपल्यानंतर बहुतेक थोड्याच वेळात घामाघूम होऊन जागा झालो, आणि घाम पुसून पुन्हा झोपलो एवढंच आठवतं आता....

आजचा हिशोबः
दिनांक - २० डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १० किमी.
वैशिष्ट्यः अंदाजे साडेतीन हजार फूट चढून चार हजार फुटांवर मुक्काम. अवघड, दमवणारा पण सुंदर असा आंबोली घाट पार.
(क्रमशः)

-- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/ )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्ही... Happy
फोटोज पण मस्तं...

ट्रेक असला तरी एकुणच खाण्या-पिण्याची मज्जा चाल्ली होती की.... Proud

छान वृत्तांत आणि सर्व प्रकाशचित्रे ! हा भाग ही मस्त. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत. Happy

खाण्यापिण्याची चैन बघता 'सह्यांकन' मिस केल्याचे वाईट वाटते... छान लेखन

btw पहिल्या दिवशी फक्त दहाच किमी?

फोटो आणि वर्णन दोन्ही भारी आहे. Happy
अजुन जास्त फोटो (कोलाज केलेले मोठ्या आकारात आणि इथे न टाकलेले वै) पहायचे असतील तर पिकासा किंवा फ्लिकरची लिन्क देणार का??
जबरी अनुभव असणार हा.
जिंदगीमे एक बार तो लेनेकाच है. Happy

वन वर्ड- वॉव्व!!
ह्या प्रवासात व्हर्च्यूअल सह्यांकन करायला मिळणार आहे हे नक्की..
तुमचा दिनक्रम सही होता..
आणि तू लिहीतो अहेस त्या फ्लो नुसार समजणं सोपे जात आहे, एन्जॉईंग धिस सिरीज Happy
अरे त्या बकर्‍या कसल्या मस्त चढत आहेत Proud
स्नॅप्स एक नंबर Happy
पुढचा भाग?
एकूण चाल - अंदाजे १० किमी>> धन्य _/\_

.

Happy मस्त..

इतकं खायला मिळाल्यामुळे शेवटच्या भागात, ट्रेकपूर्वी आणि ट्रेकनंतर असा स्वतःचा एक फोटो टाक नक्की.. Wink Lol

सर्वांचे आभार!

खाण्यापिण्याची चैन बघता 'सह्यांकन' मिस केल्याचे वाईट वाटते...

अरे हे काहीच नाही! Proud

btw पहिल्या दिवशी फक्त दहाच किमी?
Happy yes.. its like that... टोटल मिळून अंदाजे ६० एक किमी चाल झाली असेल...

एकाद्या नाव नसलेल्या डोंगराला अथवा सुळक्याला नविन नाव देणे योग्य, पण आधीच त्या सुळक्याला नाव आहे. त्यात त्याला नविन नाव देणे कीतपत योग्य आहे.
अज्जिबात योग्य नाही! तुमच्याशी सहमत. पण तिथे जे ऐकलं त्यावरून लिहिलं.
जाता जाता - आम्ही त्या सुळक्याचं नाव खडा ऐवजी आमच्या लीडरच्या नावावरून 'लंबा पारशी' ठेवलंय! आता बोला! Proud

माधव, बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद. केलाय बदल. "पूर्वी" हवं होतं..

ह्या प्रवासात व्हर्च्यूअल सह्यांकन करायला मिळणार आहे हे नक्की..

नक्कीच! आणि एका दिवसात १० किमी फार विशेष गोष्ट नाही गं...

मुक्ता, एवढाही बदललो नाहीये मी लगेच...
Lol

झकासराव, सह्यांकन आता २०१३ मध्ये!

आ.या.,

मस्तच आहे वृत्तांकन. लांबा सोबत आहे म्हंजे फुल्ल टाईमपास! मी कैक वर्षांपूर्वी त्याच्यासोबत ट्रेकास गेलो होतो. त्यावेळची त्याची मुक्ताफळे आणि इतरांनी उडवलेली खिल्ली ऐकून अस्मादिकांचा जीव धान्य झाला! Happy

अवांतर : लांबाच्या शाळेत अस्मादिक शिकले हे दिव्यज्ञान त्यावेळी त्याच्याच तोंडी प्राप्त झाले. त्याचा आणि माझा एकाच मास्तराशी खुन्नस होता हेही तेव्हाच कळले.

असो.

सोळाव्या प्रचित तिसरा बाण दिसत नाहीये! की मलाच दिसत नाहीये? Sad

आ.न.,
-गा.पै.

अवांतरावांतर : लांबाला सातवीची स्कॉलरशिप मिळाली आहे. Happy (माहितीचा स्रोत : अर्थातच लांबा!)

जबरदस्त... ट्राय करायला पाहिजे एकदा सह्यांकन... ट्रेक साठी नाही रे.. खाण्या-पिण्याच्या चंगळ साठी Wink .. पुढचा भाग लवकर येऊ दे!!!

जबराटचरे ........ Happy
आठवले काकांबरोबर माझा राजगडचा ट्रे़क झालाय. नियमीत योगा त्यांच्या फिटनेसचे रहस्य आहे. Happy

सुरवात मस्तच.. Happy आठवले काका म्हणजे निवृत्त झाल्यावर त्यांनी एका वर्षात २०० च्या वर किल्ले केले होते तेच का?

वेताळ_२५...
खडा पारशी सुळका नसून 'वांदरलिंगी सुळका' असे आहे.
>>> तूला वानरलिंगी म्हणायचे आहे का? मी वांदरलिंगी हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. तसेच खडा पारशी हे नाव देखील नवीन नाहीये. मंडण गडाचे देखील असेच.. आता सर्वजण त्याला 'मदन' असेच बोलावतात...

Pages