चक दे इंडिया!!

Submitted by शांतीसुधा on 22 December, 2011 - 02:22

(निवेदनः या लेखाचा हेतू सचिन तेंडूलकर विरूद्ध इतर हा नाही आहे. सचिन तेंडूलकरचं कर्तुत्त्व मोठं आहेच. या लेखाचा हेतू क्रिकेट या खेळाला इतकं अवाजवी महत्त्व का मिळालं असावं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यात लपलेलं पैशाचं राजकारण उघड करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर प्रेमींनी तेंडूलकर विरूद्ध हा लेख असा पवित्रा घेऊ नये.)

आमच्या घराच्या मागील शाळेत पूर्वी फुटबॉल अणि हॉकी या दोन खेळांची प्रत्येकी एक आणि दोन अशी मैदानं होती. आता होतीच म्हणायला हवं कारण गेल्या काही वर्षांत त्या मैदानांचं रूपांतर एकत्रितपणे एका क्रिकेटच्या ग्राऊंड्मध्ये झालंय. साठ-सत्तरच्या दशकातले चित्रपट पाहिले तर बॉलिवुड सिनेमांमध्येही कॉलेज तरूणांच्या हातात हॉकी-स्टीक्स दाखवून हॉकी या राष्ट्रीय खेळाला जागा दिल्याचं दिसून येतं. तसा या दशकात हॉकी वर ’चक दे इंडिया" आला आणि रसिकांना आवडलाही पण तो परिणाम तातपुरताच राहिला. हिंदीच्या पाठ्यपुस्तकात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद या नावाने धडाही होता पण त्या व्यतिरीक्त इतर कुठेही ध्यानचंद यांचं नाव झळकताना पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याने त्यांची कामगिरी छोटी होते असं नाही पण ’"रात गयी बात गयी” सारखं व्यक्ती काळाच्या पडद्या आड गेली की त्या व्यक्तीचं कर्तुत्त्व कितीही मोठं असलं तरी विसरलं जातं. तसंच काहीसं मेजर ध्यानचंद यांच्या बाबतीत झालं असं वाटतंय. मागे एकदा वर्तमानपत्रात भारतीय हॉकीचा कप्तान धनराज पिल्ले याचं नाव वाचण्यात आलं. तेव्हा भारतीय संघाने कोणत्यातरी आंतरार्ष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकलेलं होतं. धनराज पिल्लेसुद्धा पिंपरी-चिंचवड मधील एका झोपडपट्टीत रहात होता. मग त्याला आर्थिक मदत करण्याविषयीची आवाहनं वाचण्यात आली. त्यानंतर एकदोन वेळा दूरदर्शनवरही झळकला होता बिचारा. पण नंतर कुठेच दिसला नाही. नुकतंच भारतीय हॉकी संघातील युवराज या खेळाडूच्या बाबतीत असंच काहीसं झालं. त्याचप्रमाणे फेसबुकवर सध्या एका वेटलिफ्टरचा पापड करतानाचा फोटो झळकतो आहे. यासगळ्याच्या निमित्ताने विचारचक्रं सुरू झालं आणि नकळत सध्याचा भारतातील धर्म-खेळ क्रिकेट आणि राष्ट्रीय खेळ हॉकी यांची तुलना सुरू झाली.

१९७० च्या शेवटी आणि १९८० च्या सुरूवातीला सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ आणि इतर बर्‍याच क्रिकेटपटुंमुळे भारतातील क्रिकेटने मध्यमवर्गियांच्या आयुष्यात प्रवेश केला. तोपर्यंत क्रिकेट हा खेळ तसा श्रीमंती खेळ मानला जात असे. कसोटी क्रिकेटचे सामने ५-५ दिवस चालायचे. आपली कामं सोडून ५ दिवस खेळ बघायला येणारे फक्त श्रीमंतच. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हा खेळ आजच्या इतका प्रसिद्ध नव्हता. नवाब मन्सुर अली खान पतौडी (इतरही काही नावं असतील पण उदाहणादाखल एकच लिहीले आहे) हे नाव त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जायचं. साधारणपणे ८० च्या दशकात भारतात दूरदर्शन चालू झालं आणि क्रिकेट हा खेळ दूरदर्शन पाठोपाठ घरोघरी पोहोचला. ८० च्याच दशकात क्रिकेट या खेळात "वन डे क्रिकेट" च्यारूपाने क्रांती झाली. या "वन डे क्रिकेट" मुळे क्रिकेट जगतात उलथा पालथ झाली आणि पाच दिवसांच्या तुलनेत एक दिवस खेळणं सुटसुटीत वाटल्याने सामन्यांची संख्याही वाढली, त्याला लागणारी कौशल्य कसोटी क्रिकेटपेक्षा वेगळी होती. अधिक प्रेक्षवर्ग आणि मध्यमवर्गीय आर्थिक स्तरांतून आलेले खेळाडू पाहून सामान्य जनतेला क्रिकेट आपलं वाटू लागलं.

इकडे वाढत्या प्रेक्षक संख्येने आणि उपग्रह वाहिन्यांमुळे दूरदर्शन प्रक्षेपणात झालेल्या अमूलाग्र क्रांतीने तसेच वन-डे मुळे क्रिकेट फिव्हर "इट क्रिकेट, स्लीप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट इ. इ." पासून आता हे क्रिकेट वेडाचं लोण गल्ली-बोळ आणि झोपडपट्ट्यांमध्येही पोहोचलं आहे. ग्लोबलायझेशन मुळे जाहीरात कंपन्यांचं फावलं आणि त्यांनी क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मोठमोठ्या प्रमाणात अनुदानं आणि बक्षिसं द्यायला सुरूवात केली. देशातल्या चलाख राजकारण्यांनी काळाची पावलं वेळीच ओळखून बीसीसीआय सारखी खासगी संस्था उभी केली की जी आता भारतीय क्रिकेटची सर्वेसर्वा झाली आहे आणि भ्रष्टाचार-काळापैसा यांचं आगारही. पूर्वी आपल्याकडे फुटबॉलला किंवा हॉकीला अशी डिमांड असायची. अजुनही आपण बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांत गेलो तर भर पावसात, चिखलात अनेक मुलं फुटबॉल खेळताना दिसतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यामुळे मिळणारे पैसे आणि त्याशिवाय युवक-युवतींकडून मिळणार्‍या उस्फूर्त प्रतिसादाचं ग्लॅमर अनेक तरूणांना क्रिकेटकडे आकर्षित करून घ्यायला लागलं. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडूलकरचा उदयही ८० च्या दशकात शेवटी शेवटी झाला आहे. त्याच्या नंतर कित्येक आले आणि गेले, भारतीय क्रिकेट संघाने आपल्या पर्फॉर्मन्सचा लंबक नेहमीच एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत हलता ठेवला पण सचिन तेंडूलकरच्या सातत्याला सलामच ठोकायला हवा. प्रत्येक घरातील आई-वडिलांना आपला बाळ्या सचिन तेंडूलकर बनण्याची स्वप्नं पडतात आणि त्यासाठी बाळ्याने शाळेत जायला सुरूवात केली की पेन्सिलच्या ऐवजी क्रिकेटची बॅट त्याला अधिक समर्थपणे कशी पेलता येईल याकडे लक्ष पुरवलं जातं. बॉलिवुडच्या सिनेनिर्मात्यांनीही या गंगेत "लगान" द्वारे आपले हात धुऊन घेतले. याच कालावधीत पेप्सी आणि कोक यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही क्रिकेटबरोबरच आपलंही बस्तान भारतात बसवलं. कदाचित पेप्सी आणि कोकच्या बाटल्यांमुळे भारतीय तरूणांच्या भावना फक्त क्रिकेटसाठीच उचंबळतात किंवा क्रिकेटसाठी उंचबळणार्‍या भावनांमुळे पेप्सी, कोकलाही भारतीय तरूणांच्या मनात जागा मिळाली...असंही असेल.

संगणक आणि आंतर्जालिय क्रांतीमुळे एकूणच संपूर्ण जगाचा वेग वाढल्याने २०-२० क्रिकेटची संकल्पना आली, की ज्यामध्ये प्रत्येक संघाने प्रत्येकी २० षटकं टाकायची. तीन तासात निकाल जाहिर. हे म्हणजे क्रिकेट वेड्यांच्या देशात तीन तासाच्या बॉलीवुड सिनेमापेक्षा कमी ग्लॅमरस आणि व्यवसाय खेचणारं नव्हतं. म्हणूनच की काय विविध जाहिरात कंपन्या, भारतातील मोठमोठे इंडस्ट्रीयालीस्ट तसेच काही बॉलीवुड स्टार्स यांनी एकत्र येऊन विविध व्यावसायिक संघांची उभारणी केली आणि जगभरातील क्रिकेटपटुंना भरपूर पैसे देऊन आपल्या संघासाठी खरेदी करून त्यांची कडबोळी टीम आय पी एल सारख्या स्पर्धांत खेळवायला सुरूवात केली. गेल्या ३-४ वर्षांत आय पी ल च्या माध्यमातून या सगळ्यांनी खोर्‍याने पैसा मिळवला आहे. तरूणांना वेडं करणारा आणि पैशासाठी देशापेक्षा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा हा मंत्र देणारा आय पी एल हंगाम म्हणजे भारतातील विविध श्रीमंत लोकांचा विविध क्रिकेटपटुंवर लावलेल्या पैशाचा जुगार. मग यात अनेकांनी आपल्या काळ्या पैशाची धवल-गंगा करण्याच्या प्रक्रियेत नाहून घेतलं. क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचं दुसरं मोठं केंद्र तयार झालं. बी सी सी आय काय किंवा आय पी एल काय सगळेच एका माळेचे मणी त्यामुळे या दरोडेखोरांना बेड्या कोण घालणार? ज्यांच्या हातात सत्ता त्यांचेच प्रतिनिधी या संघटनांच्या चालक पदावर असल्याने या वळूंना वेसण घालणं अशक्य होऊन बसलंय.

दरम्यान भारताच्या राष्ट्रीय खेळाचं, हॉकीचं काय झालं? भारतीय हॉकीला आंतर्गत राजकारणाचं ग्रहण लागायला ८० च्या दशकातच सुरूवात झाली. त्याचप्रमाणे काही जाणकारांच्या मते बदलेले हॉकी चे नियम हे सुद्धा हॉकीचा पडता काळ चालू होण्याचे कारण आहे. खरं तर नियम बदलले तर नविन नियमांनुसार खेळाडूंना प्रशिक्षण मिळणं गरजेचं होतं. पण तसं झालंच नाही. हॉकी इंडियावर एकतर खेळाडू किंवा ज्यांना भारतीय राजकारणात फारशी किंमत नाही असे राजकिय नेते प्रमुख म्हणून नेमले जाऊ लागले. मग आपोआपच केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदानही कमी होत गेलं. मधेच वर्तमानपत्रात बातमी वाचली की ४-५ वर्षांपूर्वी झालेल्या एका आंतर्राष्ट्रीय हॉकीच्या स्पर्धा रजिस्ट्रेशनचे काही लाख रूपये केंद्रिय क्रिडामंत्रालयाने हॉकी इंडियाला दिलेच नाहीयेत आणि एकीकडे कॉमनवेल्थ गेम ची वेल्थ कॉमनली लुटून कलमाडी सारखे तिहार मध्ये सुद्धा गेलेत. किती हा विरोधाभास.. आता याला कारण हॉकीचा कारभार सांभाळत असलेले लोक आणि त्यांचं आंतर्गत राजकारण. एकूणच यासगळ्याचा परिणाम भारतीय हॉकीच्या खेळावर आणि त्याच्या पॉप्युलॅरीटीवर झाला असण्याची शक्यता आहे. कारणं काहीही असोत पण भारतीय हॉकीला.......भारताच्या राष्ट्रीय खेळाला ग्रहण लागलंय हे नक्की. आजही अमेरिका किंवा कॅनडात बघितलं तर लोक अनुक्रमे बेसबॉल आणि आईस हॉकी साठी वेडे असतात. का? कारण ते त्यांचे राष्ट्रीय खेळ आहेत. काही जाणकारांचं असंही म्हणणं आहे की त्या खेळांच्या पॉप्युलॅरीटीशी राष्ट्रीय खेळ असण्याचा संबंधच नाही. हे फक्त मार्केटींग आणि व्यावसायिक स्वरूप याचा परिणाम आहे.

हा प्रश्न केवळ हॉकीचा नसून इतर भारतीय खेळांचाही आहे. अगदी विश्वनाथन आनंदने बुद्धीबळात सातत्यपूर्ण कामगीरी करत जगज्जेते पद गेली काही वर्षे राखले आहे तरी भारतातील क्रिकेटपटुंना जी वागणूक मिलते ती त्यालाही मिळत नाही हे खटकतंच. मधे असं वाचनात आलं होतं की भारतीय नेमबाजी स्पर्धेतील कुमारवयीन वयोगटातील खेळाडूंच्या पालकांनी जाहीरपणे ही खंत व्यक्त केली की त्यांच्या मुलांना आंतर्राष्ट्रीय स्पर्धांत भाग घेण्यासाठी केंद्रशासनाकडून काहीच अर्थसहाय्य मिळालं नाही. ते त्यांनी स्वखर्चाने केलं. पण निदान भारताचं प्रतिनीधीत्त्व करणार्या या खेळाडूंना सरावासाठी गोळ्यासुद्धा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. दोनच महिन्यांपूर्वी इंदौरला क्रिकेटची आंतर्राष्ट्रीय मॅच होती त्यावेळी तिथल्या प्रेक्षागृहातील खुर्च्या साफ करण्याचं काम ३ रूपये प्रति खुर्ची या दराने इंदौरच्या राष्ट्रीय पातळीच्या फुटबॉल टीम मधील खेळाडूंनी केलं. करण त्यांच्याकडे सरावासाठी साधनं घेण्यास पुरेसे पैसे नव्हते. स्थानिक क्रिडा मंत्रालयाकडे याविषयी चौकशी केली असता कल्पना नाही, बघतो अशी उत्तरं मिळाली.

आज कालच्या तरूण रक्तांनी वेगळाच प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केलीय. भारतात हॉकी फारशी खेळली जात नाही, हॉकीचे सामने झाले तरी कोणाला माहिती नसतं आणि ह्याउलट क्रिकेटसाठी सर्वदेश वेडा झालेला असतो इतका की आम्ही सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव ही उपाधी सुद्धा देऊन टाकली आहे. मग क्रिकेटच का नाही भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. हॉकीच का? प्रश्न विचार करायला लावणारा म्हणून थोडा शोध घेतला तर धक्कादायक गोष्ट समोर आली. "हॉकी या खेळात भारताला एकूण ८ सुवर्ण पदकं मिळाली आहेत. सन १९२८ ते १९५६ हा हॉकीचा सुवर्णकाळ होता की जेव्हा भारताने सातत्याने ऑलिंपिक्स मध्ये ६ सुवर्णपदकं पटकावली. या सुवर्णकाळात भारताने २४ ऑलिंपिक सामने खेळले आणि एकूण १७८ गोल्स करत (७.४३ गोल प्रत्येक सामन्यात) २४ च्या २४ सामने जिंकले. त्यानंतरची दोन सुवर्णपदकं १९६४ साली तसेच १९८० साली झालेल्या ऑलिंपिक्स मध्ये मिळवलीत. १९८० पर्यंत इतका सुंदर पर्फॉर्मन्स असताना एकदम हॉकीला काय झालं? दूरदर्शन मधील क्रांतीचा उपयोग सर्वच खेळांना व्हायला हवा होता मग तो तसा का झाला नाही? केवळ क्रिकेटच्या खेळामध्येच क्रांती का झाली (वन डे, २०-२०) आणि त्याचंच स्वरूप का बदललं गेलं? क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये खेळणारे सर्वच देश हे ब्रिटीशांनी अनेक वर्षे राज्य केलेले आहेत. असं का? ऑलिंपिक्स मध्ये अजुनही क्रिकेट या खेळाचा समावेश का नाही? ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं (मिळत नसल्याने) मला अधिक भंडावून सोडतात.

प्रश्न उरला क्रिकेटला भारताचा राष्टीय खेळ करण्याचा: तर भारतीय हॉकी संघांसारखी सारखी सातत्यपूर्ण सुवर्ण कामगिरी भारतीय क्रिकेटने अत्तापर्यंत कधिच केलेली नाही. अगदी मार्चच्या शेवटी विश्वचषक जिंकणारे भारतीय क्रिकेटचे विर चारच महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये माती खातात. विश्वविजेत्याला साजेशी कामगिरी सोडाच पण जागतिक क्रमवारीतही सर्वच प्रकारच्या क्रिकेट मध्ये घसरण करून घेतात. यांना जगज्जेते कसं म्हणणार? बरं क्रिकेट हा खेळ १०-१२ देश खेळतात. १०-१२ देश म्हणजे संपूर्ण विश्व कसं काय होतं? मग हे विश्वविजेते कसे काय या प्रश्नाचं उत्तर (आम्ही विश्वविजेते म्हणण्यास पात्र नाही) भारतीय संघानेच आपल्या नजिकच्या कामगिरीने दिलं आहे. फक्त पॉप्युलॅरीटीच्या जोरावर एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळ कसा म्हणणार? खरं तर भारता मध्ये इतर खेळांच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं आंतर्गत तसेच आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत.

काही जाणकारांच्या मते इतर खेळाच्या कारभार करणार्यांनी गचाळ कारभार ठेवला आहे. कारण काहीही असो, पण क्रिकेट शिवाय दुसरा खेळच आपल्या देशात नाही असं वाटण्या इतपत क्रिकेटचं अवाजवी महत्त्व कमी व्हायला पाहीजे. इतर खेळांमधेही तितक्याच चांगल्या संधी उपल्ब्ध होऊ शकतात फक्त तिथलं आर्थिक गणित जुळलं पाहीजे. कारण खेळ लोकांमधे पॉप्युलर असेल तर त्याला आर्थिक सहाय्य किंवा प्रायोजक वगैरे मिळणार. क्रिकेट हा खेळ लोकांमधे पॉप्युलर आहे म्हणूनच त्याला प्रायोजक आणि प्रचंड पैसा मिळतो आहे. असं काही जाणकारांचं मत आहे. काहींचं म्हणणं आहे की नविन पद्धतीच्या नियमांमुळे आपल्या खेळाडूंचा वेग आणि क्षमता कमी पडतात. याला उत्तम प्रशिक्षण हाच एक उपाय आहे. आपल्या देशात इतर खेळांनाही महत्त्व आहे हे आपणच दाखवून दिलं पाहीजे. आपल्या मातीतील बुद्धीबळ, कबड्डी या खेळांना आपणच फारसं महत्त्व देत नाही मग त्यात आपल्याकडे कौशल्य असूनही त्याचा उपयोग होत नाही. यामागे होत असलेलं राजकारण थांबवणं हाच एक उपाय आहे. हे जनतेने ठरवल्या शिवाय होणार नाही. तेव्हा भारतातील क्रिकेट सोडून इतर खेळांसाठी 'चक दे इंडिया' च घडायला पाहिजे.

गुलमोहर: 

असामीच्या सर्वच मुद्द्याना +१.

अगदी विश्वनाथन आनंदने बुद्धीबळात सातत्यपूर्ण कामगीरी करत जगज्जेते पद गेली काही वर्षे राखले आहे तरी भारतातील क्रिकेटपटुंना जी वागणूक मिलते ती त्यालाही मिळत नाही हे खटकतंच.<<<< हे मला समजलं नाही. आनंद हा एक महान खेळाडू आहे. त्याला आतापर्यंत सर्वत्र आदरानेच वागणूक मिळालेली आहे. त्याला ब्रँड एंडोर्समेंट्सदेखील मिळालेल्या आहेत आणि त्याचा अ‍ॅड रेट सचिन इतकाच आहे. मग नक्की काय खटकतय? त्याला स्वत:ला अतिप्रसिद्धी आवडत नाही म्हणून तो पब्लिक ईव्हेंट्सना जास्त येत नाही. यामधे क्रिकेटचा काय दोष आहे??

यांना जगज्जेते कसं म्हणणार? बरं क्रिकेट हा खेळ १०-१२ देश खेळतात. १०-१२ देश म्हणजे संपूर्ण विश्व कसं काय होतं? मग हे विश्वविजेते कसे काय या प्रश्नाचं उत्तर (आम्ही विश्वविजेते म्हणण्यास पात्र नाही) भारतीय संघानेच आपल्या नजिकच्या कामगिरीने दिलं आहे.>>> कुठला खेळ १९२च्या १९२ देश खेळतात? त्या त्या खेळ खेळणार्‍ञा सर्व देशानी एकत्र येऊन खेळणार्‍या स्पर्धेला जागतिक स्पर्धा अथवा विश्वचषक म्हणतात. हेच लॉजिक मग विश्वसुंदरी आनी जगत्सुंदरीला लावायला हवं का?

काही जाणकारांच्या मते इतर खेळाच्या कारभार करणार्यांनी गचाळ कारभार ठेवला आहे. कारण काहीही असो, पण क्रिकेट शिवाय दुसरा खेळच आपल्या देशात नाही असं वाटण्या इतपत क्रिकेटचं अवाजवी महत्त्व कमी व्हायला पाहीजे. इतर खेळांमधेही तितक्याच चांगल्या संधी उपल्ब्ध होऊ शकतात फक्त तिथलं आर्थिक गणित जुळलं पाहीजे. कारण खेळ लोकांमधे पॉप्युलर असेल तर त्याला आर्थिक सहाय्य किंवा प्रायोजक वगैरे मिळणार. क्रिकेट हा खेळ लोकांमधे पॉप्युलर आहे म्हणूनच त्याला प्रायोजक आणि प्रचंड पैसा मिळतो आहे. असं काही जाणकारांचं मत आहे. काहींचं म्हणणं आहे की नविन पद्धतीच्या नियमांमुळे आपल्या खेळाडूंचा वेग आणि क्षमता कमी पडतात. याला उत्तम प्रशिक्षण हाच एक उपाय आहे. आपल्या देशात इतर खेळांनाही महत्त्व आहे हे आपणच दाखवून दिलं पाहीजे. आपल्या मातीतील बुद्धीबळ, कबड्डी या खेळांना आपणच फारसं महत्त्व देत नाही मग त्यात आपल्याकडे कौशल्य असूनही त्याचा उपयोग होत नाही. यामागे होत असलेलं राजकारण थांबवणं हाच एक उपाय आहे. हे जनतेने ठरवल्या शिवाय होणार नाही. तेव्हा भारतातील क्रिकेट सोडून इतर खेळांसाठी 'चक दे इंडिया' च घडायला पाहिजे.

बोल्ड केलेले शब्द पुन्हा एकदा वाचा. कोण जाणकार? कोणाचं काय म्हणणं आहे? तुमचं स्वतःचं काय म्हणणं आहे? असं व्हायला पाहिजे, तसं व्ह्यायला पाहिजे. पण त्यासाठी करायला काय पाहिजे? ते पूर्ण लेखातून अजून समजलेले नाही.

नवाब मन्सुर अली खान पतौडी (इतरही काही नावं असतील पण उदाहणादाखल एकच लिहीले आहे) हे नाव त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जायचं.>> या वाक्यरचनेमधे गडबड आहे. आदराने घेतली जाणारी नावे अजून असतील हे म्हणणे तुमचे याबाबतीतले अज्ञान दाखवून देतो. कृप्या होमवर्क करा.

तरूणांना वेडं करणारा आणि पैशासाठी देशापेक्षा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा हा मंत्र देणारा आय पी एल हंगाम >>>> का? तरूण नसणारे लोक आयपीएल बघतच नाहीत असा तुमचा निष्कर्ष कसा? आणि हा मंत्र तुम्हाला कुठल्या आयपीएल खेळाडूने दिला आहे? याची काही उदाहरणे आहेत का तुमच्याकडे?

खरं तर भारता मध्ये इतर खेळांच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं आंतर्गत तसेच आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत. >>> होक्का??? लोकानी ऑलरेडी पद्धतशीर अभ्यास केले आहेत त्यांचे निष्कर्ष वेगळेच आहेत त्याचे काय???

असामी म्हणतो तसं तेच तेच लिहायचं कंटाळा आला आहे आता.

श्रीकांत तुमच्या सारखेच विचार मी प्रथम करायचो.... पद्धतशीत योजना, मिळणारा अपाम पैसा - प्रसार हे चक्र आहे ते क्रिकेटला साधण्यात यश मिळाले. जसे क्रिकेटसाठी BCCI झटली तशी हॉकी किंवा कब्बडी यांच्या संस्थांनी काय प्रयत्न केले? त्यांनी कधी क्रिकेटच्या प्रसिद्धीचा अभ्यास केला आहे कां?
प्रसार माध्यमांनी हॉकीचा प्रसार करण्याचे कंकण नाही बांधले (त्यांची नजर पब्लिक डिमांड आणि पैशावर असणार - ते चुक आहे असे नाही म्हणता येणार - त्यांना पण जगायचा नैसर्गिक हक्क आहे).

उदयवन ते जौद्या हो, तेंडुलकरला भारतरत्न का देऊ नये याबद्दल ५०० शब्दात निबंध लिहा पाहू...

आणि सचिन काँग्रेसचा पंटर आहे यावर एक ५०० शब्द.

प्रसार माध्यमांनी हॉकीचा प्रसार करण्याचे कंकण नाही बांधले,त्यांना पण जगायचा नैसर्गिक हक्क आहे>>> मान्य !! पण मी इथे फक्त हॉकी बद्द्ल बोलत नाहीये. मला म्हणायचेय ते असे की कमीत कमी क्रिकेट वगळता अन्य खेळात ल्या भारताच्या विजयाची जी बातमी पाहुन एका भारतीयाला आनंद होईल ती तरी नीट दाखवा. क्रिकेट सारखा प्रसार नका करु. ती बातमी दिवस भर दाखवलीत तर टी आरपी नक्कीच मिळेल. टीआरपी नाही म्हणून बातमी बघायला मिळत नाही व बातमी नाही म्हणून लोकांना त्यात रस वाटत नाही व म्हणून टी आरपी नाही -- हे दुष्ट्चक्र भेदले जावे असे मला वाटते. नाही तर क्रिकेट पलिकडेही अन्य खेळांचे ही जीवन समृध्द करणारे असे एक जग आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही. ( जे आपण हून ते जग जाणून घेतील ते अर्थातच अपवाद मी ही क्रिकेट उत्सुकतेने बघतो हे अर्थातच सांगणे नलगे.)

प्रसार माध्यमे म्हणजे वृत्तवाहिन्या म्हणायचे आहे का तुम्हाला? कारण वृत्तपत्रातून इतर खेळाच्या बातम्या व्यवस्थित येतात. त्यातही स्थानिक खेळाच्या स्पर्धाना प्राध्यान्य दिलेले असते. वेबसाईटवर देखील खेळाचे विश्लेषण असतेच. रेडिओ लास्वतःच्या मर्यादा आहेत तरीदेखील ऑल इंडियारेडिओच्या प्रत्येक बातमीपत्रामधे खेळाच्या बातम्याचा समावेश जरूर अस्तो.

वृत्तवाहिन्या जे लोक बघतात तेच दाखवतात. मग ते क्रिकेट असो वा कमिशनर का कुत्ता खो गया टाईप बातम्या असोत. त्यातही काही वृत्तवाहिन्यावर खेळाच्या बातम्यासाठी विशेष बातमीपत्र असते त्यामधे बहुतेक महत्त्वाच्या बातम्या कव्हर केलेल्या असतात. अगदी भारतात शून्य लोकप्रियता असणार्‍या खेळाच्या जागतिक स्तरावरच्या बातम्या आवर्जून दाखवल्या जातात. मध्यंतरी हॉकीची स्पर्धा चालू असताना विशेष टीकाटिप्पणी करणारे खेळाडू पण दिसले होते. क्रिकेटच्या बातम्या दिवसभर दाखवतात कारण वन डे आणीकसोटी दिवसभर चालतात. इतर खेळ तेव्हढा वेळ् चालतात का??? खेळासाठी म्हणून असणारी स्वतंत्र चॅनल्स (डीडी स्पोर्ट्स, ईएसपीएन, निओ वगैरे वरती सतत खेळाचे कार्य्क्रम चालू असतात, किती लोक पाहतात?? त्यांचा टीआरपी काय आहे?)

पुण्यामधल्या बालेवाडीमधे दोन वर्स्।आपूर्वी जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धा झाली होती. त्याचे अ‍ॅव्हरेज एअर टाईम (न्युज सेक्शनमधे) तीस ते पस्तीस मिनिटे होते. (which is a very good coverage.)... हेच एक उदाहरण देतेय कारण याचे रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे. अजून दुसर्‍या स्पर्धाचे रिपोर्ट माहित असते तर जरूर दिले असते.
उगाच दरवेळेला प्रसारमाध्यमाना दोष देऊन काय उपयोग? त्यांचा धंदा आहे. उद्या जर प्रेक्षक अमुक एका खेळामधे इंटरेस्ट दाखवत असतील तर प्रसारमाध्यमे झक मारत ती बातमी दाखवतील. (उदा. फॉर्मुला वन रेस- बंगलोर)

नंदिनी,अनुमोदन!! कारण जे आपण हून ते जग जाणून घेतील ते अर्थातच अपवाद अस जे मी म्हटल त्या मधे तुम्ही आहात.

सर्वात आधी तुम्ही आपले बाकीचे जे खेळ आहेत जे टिव्हीवर दाखवले जातात ......त्याला कृपया बघा...... त्यांची टी आर पी वाढवा........ मगच त्या लोकांना प्रायोजक मिळतील त्यांना मदत होईल...

खेळ खेळणार्‍यांनी सुध्दा आपला खेळाचा दर्जा इतका उंचवा की लोकांनी आपण हुन तुमचा खेळ पाहायला टिव्ही चालु करायला हवा...... आक्रमक पणा आपल्या खेळात आणा मग बघा सगळे भारतीय आपला खेळ नक्कीच पाहतील

Pages