अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - अंतिम

Submitted by मी मुक्ता.. on 21 December, 2011 - 10:22

अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग २
http://www.maayboli.com/node/31368
-----------------------------------------------------------------------------------
"माणसं जितक्या सहजतेने आयुष्यातून निघून जातात तशाच आठवणीपण गेल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण असं होत नाही. दिवस-महिने-वर्षे.. काळ कसा भराभर पुढे जातो. हे असं सगळं चालू असताना अचानक "आपण होतो त्याच जागी आहोत" याची जाणिव होणं फार भयानक असतं.. बघता बघता २ वर्षे निघून गेली. आणि कंपनीतलं डेजिग्नेशन सोडता काहीच बदललं नाही आपल्या आयुष्यात." भर दुपारी लंच च्या वेळेला खिडकीतून बाहेर बघताना असले विचार द्रौपदीच्या डोक्यात पिंगा घालत होते. "किती काय काय बदललं या दोन वर्षांत. बहिणींचं लग्न झालं. सुपरवूमन चा रोल करायला सुरुवातही केली तिने. घरचे आता आपल्यापाशी लग्नाचा विषय काढत नाहीत. शाल्मली ६ महिन्याच्या गोड बाळाची आई झाली. बाळ थोडं मोठं झालं की जॉब करायचा म्हणतेय. गौरी मात्र अजूनही लग्न टाळतेय. कधीतरी कॉलेजमध्ये असताना तिला आवडणार्‍या मुलाने नकार दिला म्हणून अजून एकटी आहे ती? कसं शक्य आहे हे? इतकं प्रेम वगैरे खरंच काही असतं का? पोस्ट ग्रॅज्युअशन, पीएचडी आणि आता नोकरी करायला लागूनही ३ वर्षं झाली तिला. ह्म्म.. परवा वाचलेल्या लेखाविषयी तिच्याशी बोललंच पाहिजे. आई बाळाला दूध पाजताना आणि स्त्री कोणाविषयी तरी रोमँटीक विचार करताना स्त्रवणारा हार्मोन एकच असतो म्हणे. किती वेगळ्या भावना आहेत दोन्ही. आणि जगाच्या दृष्टीने एक अतिशय उदात्त तर दुसरी अजूनही चोरटीच.. पण दोघांमागची प्रेरणा एकच? गौरीसोबत चर्चा करायला खरी मजा येईल. तसंही खूप दिवसात काही भेट नाही." गौरी ला मेसेज टाकायला म्हणून द्रौपदीने फोन हातात घेतला. आणि तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली.
"मे आय कम इन?"
दारात सुहास उभा होता. सुहास तिचा कलीग. वर्षच झालेलं कंपनी जॉईन करुन पण प्रोफेशनली जितका चांगला त्याच्यापेक्षा कणभर अधिकच चांगला मित्र झालेला तिचा. तिच्या विचारांची गुंतागुंत शांतपणे ऐकून घेणारा आणि बर्‍याचदा एका झटक्यातच सगळ्या गुंतागुंतीच्या मुळावर घाव घालणारा.
"ओह.. सुहास.. ये ना.. बस..! बोला.. झालं का जेवण?"
"हो.. तू आली नाहीस."
"अं.. हं.. मूड नव्हता.."
"नेहमीप्रमाणेच.."
"..."
"असो.. ऐक.. आज संध्याकाळी क्लायंटला फायनल ड्राफ्ट द्यायचा आहे. आपण परवाचीच आयडीया फायनल करतोय. द्रौपदी यक्षाच्या प्रश्रांना उत्तरं देऊन सगळ्यांची सुटका करते."
"ओके.."
"चल मग.. तुला तर माहिती आहेच बाकी. प्रेझेंटेशन च्या तयारीला लाग.."
"येप.."
---------------------------------------------------------------------------------
"प्रेझेंटेशन भारीच झालं. काय बोललीस तू. अर्थात हे होणारच होतं म्हणा. तुझी द्रौपदी खर्‍या अर्थाने आजच्या स्त्रीला रीप्रेझेंट करते. कॉन्ग्रॅट्स मॅडम.." सुहास अखंड बडबडत होता गाडीत बसल्या बसल्या.
"पण तो यक्ष मूर्ख होता."
"म्हणजे?"
"फिलॉसॉफिकल प्रश्न कायमच सोपे असतात रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांपेक्षा. फिलॉसॉफिकल प्रश्न आणि त्यांची फिलॉसॉफिकल उत्तरं. फारच सोपा मामला आहे हे. रोजच्या जगण्यात यातलं काहीच अ‍ॅप्लिकेबल नसतं."
"तुला याचं कारण माहितेय?"
"तुला माहितेय?"
"हो.. असं होतं कारण प्रश्नांना उत्तरंच नसतात."
"?"
"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून. पण आपल्या नशीबाला आलेला यक्षही इतका मूर्ख नसतो. तुझ्या डोक्याला कायम भुंगा लावणारं तुझं मन. त्यातून तुझी सुटका नाही. कोणाचीच नाही. आपण उत्तरं मिळवल्यासारखं करतो. प्रश्न सोडवल्यासारखं करतो पण वास्तविक पाहता यातलं काहीच झालेलं नसतं. त्यामुळे त्या यक्षाचं कधी समाधानही होत नाही आणि तो आपली कधी पाठही सोडत नाही."
"खरंय तुझं. आणि आपल्या सगळ्यांची द्रौपदी झालीये. सगळ्यांचच लग्न लागलंय.. घर, संसार, नोकरी, संस्कार आणि आपली स्वप्नं. या सगळ्यांत मात्र आपलं माणूसपण, स्वातंत्र्य लांब राहिलय. कर्णासारखं. आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा व्याभिचार ठरतो मग."
"वाहवा.. आता कसं अगदी क्रिअटीव्ह हेड सारखं बोललात मॅडम.."
"बर्र.. असू द्या.."
सुहासशी बोलणं तिथेच थांबलं तरी हीचे विचार थांबेनात. घरापाशी सोडून सुहास गेला. फ्लॅटच्या काळोखात पुन्हा तिचा यक्ष तिला छळू लागला. "शेवटी गौरी काय, मी काय, शाल्मली काय किंवा माझी बहिण काय. येनकेनप्रकारेण सगळ्या द्रौपदीच. पावलोपावली छळणार्‍या यक्षासोबतच आपलं जगणं. प्रश्न सोडवण्याचा रामबाण भारतीय उपाय म्हणजे प्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा करणे. कुपोषणाने मुलं मरतायेत तर कुपोषण नाहीच असं म्हणायचं. वाघांची शिकार होतच नाही असा दावा करायचा. हे म्हणजे सगळ्यात सोयिस्कर. बहिणीसारखं किंवा शाल्मलीसारखं. यांना प्रश्न पडतच नाहीत का? आपल्या आयुष्यासोबत जे काही घडतय, घडत आलय ती सगळी व्यवस्था कधी मान्य केली यांनी काहीच विरोध न करता? कसं जमलं यांना? यांचा हेवा करावा की किव करावी हेच कळत नाही कधी कधी. पण ओढाताण होतेच की यांची पण. गौरीची पण.. सपशेल हरुन जातोय आपण या यक्षापुढे."
विचार करुन संपेनात. उत्तरंही मिळेना आणि शांतताही वाटेना. द्रौपदीने टेबल लँप लावला. कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली, "अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.."

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

>>माणसं जितक्या सहजतेने आयुष्यातून निघून जातात तशाच आठवणीपण गेल्या असत्या तर किती बरं झालं असतं.

Sad खरं आहे.

>>प्रश्न सोडवण्याचा रामबाण भारतीय उपाय म्हणजे प्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा करणे.

अगदी, अगदी Denial. Sad

छान लिहीलंय

"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून.>>>

अगदी खरंय !

पण ईथेच वपुंची आठवण झाली हो.....(डोळा मारणारी बाहुली)

"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून.
खरंय.
आवडली कथा.

<<<माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून.>>>
तूफान मुक्ता Happy व्वाह!!! लैच आवडली कथा Happy येऊ द्यात Happy

"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून"

फिलॉसॉफिकल प्रश्न कायमच सोपे असतात रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांपेक्षा. फिलॉसॉफिकल प्रश्न आणि त्यांची फिलॉसॉफिकल उत्तरं"

>>वरच्या वाक्यांतून झाली खरी वपुंची आठवण मला पण. गोष्ट आवडली. दुसर्‍या भागात जरा अडखळल्यासारखी वाटली.

But overall not your best work....

:दिवे:

सर्वांचे खूप आभार.. Happy

संघमित्रा, कविता नवरे..
धन्यवाद..! आपलं लिखाण वाचायला खूप आवडतं त्यामुळे आपल्या प्रतिसादासाठी खास.. Happy

शूम्पी,
Happy नॉट अ‍ॅट माय बेस्ट ही तर चांगली गोष्ट आहे. अजून सुधारणेला वाव आहे म्हणायचा.. मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!

"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून.>>>

हे मात्र व पुं सारखे झालयं.
"आपण म्हणतो प्रश्न पडलायं पण प्रश्ण कधिच पडला नसतो, पडलेले असतो ते आपण आणि प्रश्ण आपल्या छाताडावर पाय देउन खदाखदा हसत असतो"

वपु च ना? का कणेकर आठवत नाही, पुन्हा मी गोंधळ घातला.

सर्वांचे आभार... Happy

सुहासचं कॅरॅक्टर.. उम्म.. Kinda trigger.. आणि स्वतःशी सतत संवाद करुन करुन कधी सॅच्युरेट होऊ शकतो आपण. अशा वेळेला अजून कोणाशी थोडं बोललं तर वेगळी दिशा किळते किंवा एखादी नवीन गोष्ट कळते.. म्हणून... त्या कॅरॅक्टरला अजून खोली देता आली असती खरंतर.. ह्म्म.. Happy

"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून."
" प्रश्न सोडवण्याचा रामबाण भारतीय उपाय म्हणजे प्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा करणे."
अगदी पटले!
खूप सुंदर लिहिलय तुम्ही!

सुंदर....... तीनही लेखातील कथानकापेक्षा विचार फारच आवडले.......
तुमच्याकडून असेच उत्तम लेखन होत राहो....... Happy

Pages