"आज गौरी भेटली.."
"काय म्हणाली?"
"अं.. काही नाही. जनरल.."
"तरी पण? इतक्या दिवसांनी भेटलात ना? तिला काही माहिती नसेलच. सांगितलस का मग?"
"हो.. सांगितलं ना."
"मग काय म्हटली?"
"काही नाही. तू ठिक आहेस ना, एवढंच विचारलं."
"बस्स?"
"हो.. तुला सांगितलं ना, काही नाती नाही बदलत. ती माणसं आपलीच राहतात. तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही. तुम्ही काय निर्णय घेतले. ते बरोबर की चूक यावर जोखत राहत नाहीत तुम्हाला. ती तुमची असतात. आणि कायम तुमच्यावर तेवढंच प्रेम करत रहातात."
"हो का? तिला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नसेल म्हणूनही काही म्हटली नसेल ती."
बहिणीच्या या प्रश्नाने गौरी भेटल्याचा आनंद थोबाडात मारल्यासारखा खर्रकन द्रौपदीच्या चेहर्यावरुन उतरला.
"घेणं देणं असतं म्हणजे काय? फक्त घरातल्या लोकांनाच असतं का ते? आणि नक्की काय असतं? माझ्या आयुष्यात जे काही झालं त्याचा तुमच्या आयुष्यावर आणि इमेजवर काय परिणाम होईल याची चिंता. हेच ना?" अजून बरंच काही बोलावसं वाटत होतं पण ती गप्प बसली.
"याही पेक्षा बरंच काहीतरी असतं." रागारागाने एवढं बोलून बहिण निघून गेली मैत्रीणींसोबत सिनेमाला. हिला काही केल्या रडू आवरेना. रडून रडून गाल चिकट वाटायला लागले तशी द्रौपदी उठली. वॉश बेसिनकडे जाऊन चेहर्यावर पाणी मारताना सवयीने आरशात पाहिलं. "श्या! च्यायला इतकं रडूनही आपल्या चेहर्यात काहीच फरक दिसत नाही. ना डोळे सुजलेले, ना लाल झालेले.. चेहरा थोडासा ओढलेला दिसतोय. बस्स.. तेवढीच काय ती रडल्याची खूण. की आपण रडतच नाही इतके, डोळे सुजण्याइतके वगैरे? आपल्याला कशाचंच मनापासून दु:ख होत नाही का? इतके दगड आहे का आपण?" या विचारासरशी तिला अजून एक हुंदका फुटला. "मुली रडतानाही सुंदर वगैरे दिसतात. झोपल्यावरही. आपण काय्यच्या कायच दिसतो झोपेतून उठल्यावर.. भूतासारखे." या विचाराने अजून एक हुंदका. म्हणजे रडू यायला लागलं की कशावरही रडूच येतं तसं काहीसं झालेलं तिचं. मग तिला रडायचा कंटाळा आला. झोपही चांगलीच आलेली. दु:खी आहे म्हणून झोप नाही आली, रात्र जागून काढली असलं काही व्हायचं नाही तिच्याबाबतीत. सकाळी ऑफीसला जायचं होतंच. त्यामुळे मुकाट्याने अंथरुणावर जाऊन पडली. रडून मन हलकं झालं की सगळा हळवेपणा पण वाहून जायचा शक्यतो तिचा. मग नेहमीप्रमाणे तिने विचार केला, "बास्स. कशाचं एवढं रडू आलं तुला? हे तुझं आयुष्य आहे. तुझ्या मर्जीने. तू निवडलेलं आणि परिणामांची तयारी ठेवत. हे असंच होणार हे माहित नव्हतं का तुला? मग त्यात रडण्यासारखं काय आहे?" विचार करता करता डोळ्यांवर पेंग यायला लागली...
समोर घरचे बसलेत. आणि ही बोलत सुटलिये. म्हणजे अक्षरश: सुटलीये. "कोणत्या समाजाची गोष्ट करता तुम्ही? मी कोणत्याही समाजाचं उत्तरदायित्व नाकारतेय. मी फक्त माझ्या आयुष्याला जबाबदार आहे. मला प्लीज कसलंही लेबल लाऊ नका. मी माणूस म्हणून नाही का जगू शकत? फक्त माणूस म्हणून? आणि माझ्या सुखाच्या व्याख्या दुसर्या कोणी का ठरवाव्यात? मला जे वाटतं ते करायला मिळण्यातच माझं सुख आहे. मला मुखवट्यांचा तिरस्कार आहे. मुखवटा न वापरता जगायचं आहे मला. अॅट एनी कॉस्ट.! तुम्ही काय करताय? केलाच ना इतकी वर्षे संसार? आहात सुखी?" हे असलं काही पुस्तकी बोलतेय ती आणि घरचे ऐकून घेतायेत असं एक स्वप्न ती नेहमीच जागेपणी पहायची. गंगाधर गाडगीळांच्या कथेतली हरलेली माणसं बघतात तशी स्वप्नं. अर्धवट झोपेत कूस बदलली तसे विचारही बदलले. "कसलं आयुष्य जगतोय हे आपण? कसला समाज आहे हा? माणसाला ना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. स्वातंत्र्य आणि संस्कार यांचा ३६ चा आकडा असलेला समाज कसा चालेल? पण म्हणून यातल्या कोणाचंच महत्व कमी होत नाही. स्वातंत्र्याचा संस्कार का नाही होत? आपल्याला कसा समाज हवाय नक्की? सर्वांच्या प्राथमिक गरजा तर पूर्ण व्हायला हव्या. पण कम्युनिझम नको. समाजातली स्पर्धा संपून चालणार नाही. पण ही स्पर्धासुद्धा निकोप हवी. यासाठी सगळे स्पर्धक समजूतदार हवे. मग असा समजूतदार माणूस निर्माण कसा करायचा. आणि माणसाला समजूतदार बनवायचं असेल तर मग त्याच्यातल्या नैसर्गिक उर्मींचं काय? माणूस 'घडवण्याचे' प्रयत्न इतिहासात झालेच पण माणसाच्या माणूसपणाला जास्त किंमत आहे. शेवटी माणूस हे सत्य आहे, समाज ही संकल्पना. आणि माणसाच्या नैसर्गिक उर्मी बदलल्या नाहीच आहेत अनंत काळापासून. माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे. किती सोयिस्कर वाक्य आहे. समूहात असतो तेव्हा बुद्धीमान आणि एकटा असतो तेव्हा प्राणी. माणूस हा फक्त सोयिस्कर जीव आहे.... विचार विचार.. कुठून कुठे. प्रश्नच नुसते. उत्तरं नाहीतच. कधीतरी एकदा सवडीने हे प्रश्न लिहून ठेवले पाहिजेत.. अर्रे... लाईटचं बिल भरायचं राहिलय. उद्या नक्की. ऑफिसचं काम कंटाळावाणं वाटतय हल्ली........"
झोप चढू लागली तसे विचार विस्कळीत होऊ लागले...
क्रमशः
--------------------------------------------------------------------------------
अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग २
http://www.maayboli.com/node/31368
---------------------------------------------------------------------------------
अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग १
Submitted by मी मुक्ता.. on 19 December, 2011 - 23:09
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
नवीन लेखन मध्ये दिसत का
नवीन लेखन मध्ये दिसत का नाहीये हे?
दिसतय ना
दिसतय ना
हो.. प्रतिसादानंतर दिसायला
हो.. प्रतिसादानंतर दिसायला लागलं..
मुक्ताशैलीचा पुनश्च
मुक्ताशैलीचा पुनश्च अनुभव..!!
पुढचा भाग लवकर येवू द्या.
(No subject)
छान सुरुवात..
छान सुरुवात..
मस्त पण हा भाग जरा मोठा हवा
मस्त पण हा भाग जरा मोठा हवा होता.
छान सुरवात.
छान सुरवात.
सुरुवात मस्त झाली आहे. पुढचे
सुरुवात मस्त झाली आहे. पुढचे भाग पण लवकर लवकर येउदेत.
सर्वांचे खूप आभार..
सर्वांचे खूप आभार..
छान लिहिलयस मुक्ता, जरा
छान लिहिलयस मुक्ता,
जरा परिच्छेद व्यवस्थित कर ना आणि दोन परिच्छेदांमधे एका ओळीच अंतर ठेव; वाचायला सुटसुटीत वाटेल मग.