मनोहर काही माझ्या नात्यातला नव्हता, की त्याची माझी जुनी ओळख होती, की त्यानं माझ्या ओळखीतली मुलगी पळवुन आणली होती. कंपनीतल्या आठ तासाच्या ड्युटीत असे रिकामे विचार डोक्यात चालुच असतात.
"साहेब, शंभर रुपये उसणे देता काय?" मागे वळुन पाहतो तर मनोहरच.
"काय पाहीजे?" मी तिरकसपणे विचारलं.
"उसने शंभर रुपये देता, माझा पगार झाला की परत करीन!"
"का? त्या पोरीला पळुन आणतांना घरुन वडीलांचे चोरुन नाही आणले"
"मला घर आहे पण आता आई वडील नाहीत."
म्हणजे आता तु त्यांनाही मारलं, तुझ्या लफड्यासाठी"
"मी खोटं नाही बोलत साहेब."
"मग खरं काय?"
"द्यानं शंभर रुपये, खोलीवर माझी बायको आजारी आहे."
"अरे ती पळवलेली मुलगी, तुझी बायको कधी झाली?"
मी हे सगळं ऐकीव माहीतीच्या आधारे बोलत होतो. आता मनोहर एकदम रडायला झाला होता, पण मीही काही माघार घ्यायाला तयार नव्हतो.
"त्या बायकोलाच दिवस गेले आहेत, म्हणुन तिला दवाखान्यात न्यायला पैसे पाहिजेत!"
त्या पोरीला दिवस गेले म्हटल्यावर मला तर काय बोलु - किती बोलु असच झालं होतं. नंतर मनोहरच बोलायला लागला.
"हे पहा कोर्टाचं मॅरेज सर्टीफिकेट, सगळेच विचारणारे मला पळून आणली असचं म्हणतात, वरुन चांगली मजाही केली असंही बोलुन दाखवतात. आता माझा विषय सार्या कंपनीलाच करमणुकीचा झाला आहे, मी कोणा-कोणाला खरं सांगु, कोण ते ऐकणार? ............ माझी आई म्हणायची, जेव्हा लोकांना आपलं बोलणं खरं वाटत नाही, तेव्हा आपलं तोंड बंद ठेवणं केव्हाही चांगलं!" मनोहर खुपच केवलवाण्या शब्दात बोलत होता, आता त्याच्या डोळ्यातले अक्ष्रु चष्म्याखालून गालावर आले होते.
कंपनीचा सायरण झाला, एकदाची शिफ्ट संपली. मनोहरला आणखी बोलायचं होतं, मलाही त्याला कुठंतरी समजवुण घ्यायचं होतं, पुढे काहीही न बोलता तो जायाला निघाला. मी त्याच्या खांध्यावर हात ठेवुन थांबवलं, खिश्यातलं पाकीट काढुन त्याच्या हातात दोनशे रुपये दिले.
घरी परतण्यासाठी बसमधे जावुन बसलो. बस शहराच्या दिशेने धावु लागली, थोड्या वेळानंतर मनोहर रोडच्या कडेनं चालतांना मला दिसला. तो राहायचा ते खेडं लांब होतं, तरी दोन-तिन किलोमीटर लांब. मनोहर एवढ्या लांबुन चालत येत होता, फक्त ऐंशी रुपये मजुरी साठी. तो एवढं सगळं सहन का करतो? तो चांगला बी. ई. झालेला आहे, त्याला याच कंपनीत नाहीतर दुसर्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.
दुसर्या दिवशी मनोहर आधीच सफाई करुन गेला, नंतर आठवड्याची सुटी आली, त्यामूळे मनोहरला विचारायचे कितीतरी प्रश्न तसेच मनात रेगांळत राहीले. आजही माझी नजर खिडकीबाहेर त्यालाच शोधत होती, पण कंपनीचं गेट आलं तरी तो मला काही दिसला नाही. आज तो लवकर आला असेल, नाहीतर कोणाच्या टु-व्हीलरवर लटकवुन आला असेल. कोणालाही कोणाची तरी दया ही येतेच, तसचं माणुस काही एकाच परिस्थीतीत सारखाच वागतो असंही नाही.
मशिनवर आलो तर आज जुनाच ओळखितला माणुस झाडु मारत होता, मग मनोहर कुठे गेला, त्यालाच मी विचारलं तर तो बोलला.
"कालच रात्री त्याच्या बायकोची डिलेव्हरी झाली, त्याला पोरगी झाली."
"एवढ्या लवकर?"
"लवकर कशी होणार, बरोबरच झाली. आता तर लयच वाईट स्थिती आहे त्याची!"
"तु कधीपासुन ओळखतो त्याला."
"माणसानं माणसाला ओळखायला किती वेळ लागतो! माझ्याच वाडीत माझ्याच खोलीत भाड्यानं राहतो. एक दिवस कंपनीच्या गेटवर भेटला, आपल्या कंपनीत काहीतरी काम पाहीजे असं म्हणत होता, मी त्याला म्हटलं, तु चांगला शिकलेला दिसतो, झाडु मारण्याचं काम कसं करशील?"
"काहीही करील पोटासाठी!" एवढच तो आपलं शर्ट वर करत बोलला.
"मग मी कॉन्ट्क्टराला सांगुन त्याला कामावर घेतलं, शिफ्ट संपल्यावर तो मला म्हणाला, तुझ्याच शेजारी एखादी रुम भाड्याने आहे का? बायको आहे सोबत! त्यानं बायको म्हटल्यावर मी खुपच गांगारलो, आठ तासाच्या ड्युटीत मला तो चांगला माणुस वाटला, मग मी त्याला माझीच रुम दिली."
"मला याचं मोठंच प्रकरण दिसतं" विषय वाढवण्यासाठी मी बोललो.
"हो ना! संध्याकाळी बायकोला घेऊन आला, तेव्हा तिच्या पोटाकडे पाहुन माझे घरचे सगळेच बुचकळ्यात पडले, त्याला विचारलं तर तो सांगयला लागला, त्याचे वडील कारच्या अपघातात गेले, आई हार्टअॅटकने गेली, त्याचे वडील सरकारी बांधकाम खात्यात इंजिनिअर होते, आई कॉलेजात प्राध्यापिका अन् मनोहर त्यांना एकुलता एक मुलगा. त्याची चांगली सुशिक्षित फॅमिली होती, पण नशिबानं दाणादाण उडउन दिली सगळ्यांची."
"त्या पोरीकडची काय परिस्थीती?"
"मनोहरला तिच्या मोठ्या भावाचीच भिती वाटते, तिलाही वडील नाहीत पण आई आहे. आजही कोणत्याही प्रेमप्रकरण म्हटलं की, कोणीही विरोध करतं. लोकं असे का वागतात, हेच मला समजत नाही?"
"हे दोघं किती दिवसापासुन घराबाहेर आहेत?"
"चार-पाच महीन्यापासुन, मित्रांच्या मदतीनं ते दोघं रेल्वेनं इकडे पळुन आले, नंतर ते असेच फिरत आहेत. त्यांनी सोबत आणले होते तेवढे पैसे मागेच संपले, काही मित्रांनीही मदत केली होती, पण आता मनोहरनंच काम करुन आपला संसार चालवायचं ठरवलेलं आहे, असा किती दिवस तो दुसर्याच्या मदतीवर जगणार?"
आमच्या बोलण्याकडे शिफ्ट सुपरवायझरचं लक्ष नव्हतं, नाहीतर त्यानं मधेच येऊन तोंड खुपस्ण्याची संधी सोडली नसती.
खरचं, आपण असं किति वेळा म्हणतो की, हा असता तर असं झालं असतं, तो असता तर तसं झालं असतं. त्यानं आणखी जगायला पाहीजे होतं, अन् कितीतरी वेळा ते खरंही वाटतं, पण त्यात काही अर्थ नसतो. जे घडणारं असतं ते घडुन गेलेलं असतं, जे मागे राहलेले असतात, त्यांना जगायचं असतं, आपलं नशिब वाट दाखविल तिकडे, मग परिस्थिती कितीही भयान असो.
आज मनोहरच्या पाठीशी कोणीही नाही, तरी तो धडपडतोय, संघर्ष करतोय. आपल्या भोवतालच्या परिस्थितीशी, समाजाशी, माणसांशी, फक्त स्वतःच्या मनासारखं जगता यावं म्हणुन. नाहीतर एखादा आपल्या दुखःचा गाजावाजा करत राहीला असता, नाहीतर सगळं सोडुन दारुच्या नशेत धुंद राहला असता.
एकदाची शिफ्ट संपली, मी बसमधे येऊन बसलो. मी मनात पक्का विचार केला होता की, आज जातांना त्या वाडीजवळ उतरायचं, घरी जायाला उशीर झाला तरी, नाहीतरी घर रोजचचं आहे.
बस धावु लागली, रोडच्या कडेवरची झाडं मागे पडु लागली, त्यापेक्षा वेगानं माझ्या आयुष्यातल्या घटनात मागे जावु लागलो. मी मनोहरचा वयाचा असतांना ज्याला प्रेम-प्रेम म्हणतात असच काही केलं होतं की आणखी काही?
तेव्हा तर आम्ही त्यालाच प्रेम म्हणत होतो.
दोघांचं गुपचुप भेटणं, दोन-चार पानांचे लव्हलेटर लिहणं, त्यात दुसर्यांच्या तोंडुन ऐकलेल्या शेर-शायरी लिहणं. तु किती सुंदर दिसतेस, तुला हा रंग किती खुलतो, तुझा चॉईस किती वेगळा आहे, अशाच आमच्या पोकळ गप्पा होत असत.
तु रात्री माझ्या स्वप्नात आली होती, एवढीशी थापही दोघांच्या भेटीचा विषय होऊन जात असे. तिच्या घरातल्या गच्चीवर सगळ्यांच्या चोरुन आम्ही हातात-हात गुंफुन बसायचो. मी तिला किती हौसेनं गप्पा सांगायचो, त्यात खर्यापेक्षा खोट्याच जास्त, त्यावरही ती अगदी खळखळुन हसायची. मग मीही तिला चंद्राच्या प्रकाशात पाहत राहायचो, तरी माझी छाती उगाच धडधडायची, कोणीतरी आम्हाला पाहत तर नाही. त्या काळात असेच हातात हात गुंफुन आयुष्यभर सोबत राहण्याच्या शपता हजारदा घेतल्या.
तिचं म्हणणं होतं की, मीच पुढाकार घ्यावा, तिच्या घरी लग्नाचा विषय काढावा, मी टाळाटाळ करीत तिला फक्त हसवित राहलो. एक दिवस निर्णयाची वेळ आली तेव्हा तिचं लग्न दुसर्या सोबत ठरलं, मी काहीच बोललो नाही, मनातलं कोणासमोर बोलुन दाखवलं नाही.
ती आधीच अबोल, तिचं लग्न ठरलं तेव्हा मी साखरपुड्याला तिच्या घरातचं होतो. माझ्याकडे पाहुन तिच्या डोळ्यात आसवे आली, हे मला दिसलं तेव्हा मीच तिथुन सटकलो.
मनोहर राहत होता ती वाडी दुरवर मला दिसु लागली, नोकरीच्या एवढ्या वर्षात कधी तिथं जाण्याचा योग आला नाही. आता तिथंल्या एका लहानशा खोलीत, मनोहर, त्याची प्रेयशी अन् आताची छोटी चिमुकली राहते. खरं तर सुखा:त की दुखा:त हे त्यांनीच त्यांनच ठरवायचं, आपण कोण त्यांना सांगणार? मी मनात पक्क ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण उतरायचं, पण जागेवरुन पायच हलले नाहीत.
आता बस शहराकडे धावत होती, ती वाडी कधीच मागे पडली. कदाचित, माझं येणं मनोहरला आवडलं नसतं, तो मला तसं काही बोलला नसता, पण, मलाही ते बरं वाटलं नसतं. आयुष्याच्या कठीण संकटाच्या काळात दुखा:च्या आगीतं होरपडुन निघत असतांना, तिर्हाईत माणसानं दाखवलेली वरवरची साहनुभुती, आधीच असलेलं दुखः आणखी बोचरं करते. हे मला मनोहरच्या डोळ्यात पाहवलं नसतं.
* * * * *
छान उतरलीयं.
छान उतरलीयं.
छान. आधिच्या भागांची
छान. आधिच्या भागांची लिंकसुद्धा देत चला प्रत्येक भागात म्हणजे काही वाचायचं राहीलं तर सोपं पडतं.
कथेतल्या "मनोहर"बद्दल
कथेतल्या "मनोहर"बद्दल सहानुभूती वाटते.
मनोहरच्या जीवनातील Problems कशी संपणार ?
उत्सुकता. . . . .
हं... फारच करूण कथा..
हं... फारच करूण कथा..
वाचुन प्रतिसाद दिल्याबद्द्ल
वाचुन प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद!
मनोहरची कथा वास्तवादी आहे, कारण असाच तरुण मी जिवनात झगळ्तांना पाहीला.