NOTE ::(ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)
असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>3 पासून पुढे़...
.
.
.
.भाग=>4
.............................................................धोक्याची पुर्वसुचना.............................................
असे म्हणतात की, काही प्राणीं पुढे होणार्या अभद्र आणि अमंगळ घटनांची पुर्व सुचना देत असतात. तसेच अनाकलनीय- गुढ़ किंबहुना मानवाला न दिसणार्या अशा अदृश्य गोष्टींचेही यांना लगेच आकलन होते. आता यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आपल्यावर अवलंबुन असते. पण कधीकधी असे होते की एखाद्या विश्वास न ठेवणार्या व्यक्तीलासुद्धा एके दिवशी यांवर विश्वास ठेवावाच लागतो परंतु त्यावेळी मात्र खुपच उशीर झालेला असतो. असो,
मुंबईमध्ये त्या रात्री काय होणार होते किंबहुना घडत होते ते नियतीलाच काय पण साक्षात भगवंतालाही माहीत नव्हते!
माटुंगा स्टेशनलगतच्या बाहेर त्या निर्जन रस्त्यावर गुढ़ शांतता पसरलेली होती. दुरवर, पाठीमागच्या रस्त्यावर मात्र काही वाहने ये-जा करण्याचा अस्पष्टसा आवाज येत होता तर तिथेच कुठेतरी एक-दोन माणसे लांबून चालताना दिसत होती. पण तिही विरळच!. रस्त्याकडेच्या उंच खांबावरल्या मळलेल्या कळकट्ट, मिणमिणत्या दिव्यातुन काविळीसारखा पिवळट प्रकाश खाली पायवाटेसारख्या दिसणार्या- झिजलेल्या रस्त्यावर झिरपत होता, तो आजुबाजुला आपली अंधुक पिवळट् छटा पसरवून मनाला एकप्रकारची मरगळ आणि बैचेनी निर्माण करत होता. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असुनही वातावरणात कमालीचा थंडपणा जाणवत होता हे एक आश्चर्यच! हवा मात्र निर्जिव झालेली, झाडाचे पानही हलत नव्हते, पण वातावरणात जाणवणारी थंडी अंगावर काटे आणत होती. 'काय विचित्र प्रकार आहे!' तो मनात विचार करत होता.
आज वेळही गोठल्यासारखीच वाटत होती. ती आली त्यावेळी बरोबर सात वाजत होते. आल्यावर ती तिथेच स्टेशनवर थांबली, त्याच्याबरोबर बरंच काही बोलायला, त्याचा सहवास मनसोक्तपणे अनुभवायला. नियतीने घडवुन आणलेला त्यांचा विरह वाट्याला आलेले असंख्य दु:ख आणि त्यानंतरच्या त्या भयाण- दुखःद घटना, सर्व-सर्व काही विसरून ती त्याच्याबरोबर बोलण्यात दंग झाली होती. अगदी दिलखुलासपणे ती आपले मन त्याच्यासमोर मोकळं करीत होती. तोही काही न बोलता तिचे सर्व बोलणे शांतपणे ऐकत होता. इतक्या दिवसानंतर तिच्या चेहर्यावर विशिष्ट प्रकारची चमक दिसत होती. चेहर्यावरचा तो आनंद, समाधान त्याचे ते तेज तो आपल्या डोळ्यांत भरभरून साठवत होता. स्टेशनवरच इकडेतिकडे करत शेवटी ते दोघेजण प्लॅटफोर्मच्या एका टोकाला निवांत बसले. काही वेळाने आपले डोके त्याच्या मजबूत खांद्यावर ठेवत ती त्यावर विसावली; पण तिचे बोलणे मात्र चालूच होते नंतर कधी एकदा ती आपल्या स्वप्नांच्या रंगीत दुनियेत हरवली, आणि कधी तिचा डोळा लागला ते तिचे तिलाच कळले नाही.
त्यांच्या चाललेल्या या असंख्य गुजगोष्टींमध्ये एव्हाना खुपच उशीर झाला होता यामध्ये कमीत कमी चार तास तरी आरामात उलटुन जायला हवे होते पण प्रत्यक्षात घड्याळात मात्र आठ वाजत होते म्हणजे फक्त एक तासच!!!(?). काहीही असो, पण यामुळेच तो अधिकाधिक वेळ तिच्याबरोबर, तिच्या सहवासात घालवत होता. ही गोष्टच त्याच्यासाठी मोठी होती. निदान आजच्या पुरता तरी हा काळ- ही वेळ त्यांच्यासाठी थांबली होती! त्याने चालता-चालता आपल्या मनगटावरील गोल्डन पट्ट्याच्या घड्याळात नजर टाकली, आठ-दोन! तो पुन्हा मनोमन हसला. आपला डावा हात पाठीमागुन खांद्यावर टाकून तिला जवळ घेत आणि दुसर्या हातने अलगद तिचा हात हातात घेत तो संथ पावले टाकीत तिच्याबरोबर रस्त्यावरून चालू लागला --
"ई$$.... क्षितिज तो कुत्रा बघ किती घाणेरडा दिसतोय ते, माझ्याकडेच बघतोय तो! मला खुप भिती वाटतेय रे..$$." मध्येच दचकून थांबत, डाव्या बाजुच्या बिल्डींगच्या कोपर्यावर ऊभ्या असलेल्या एका कुत्र्याकडे बोट दाखवत ती म्हणाली. त्याने एकवार त्या दिशेला पाहिले, लांबट काळे केस, वरची पाठ सोडली तर गटारामधील घाणीत पुर्णपणे बरबटल्याने वास मारणारे आणि बघताच क्षणी किळस वाटुन उलटी यावी असे दिसणारे त्याचे ते शरीर!
कान मागे सारून, किंचित तोंड वर करून पुढचे दात विचकत, काहीसे गुरगुरतच, रात्रीच्या अंधारात चमकणार्या आपल्या भयानक डोळ्यांनी, नजर रोखुन ते एकटक तिच्याकडेच पाहत होते. त्याच्या त्या पाहण्याने ती चांगलीच घाबरली होती, पोटात भितीचा गोळा येऊन तिचे हात-पाय अक्षरश: थंड पडले होते.
"इतकं काय घाबरतेस त्याला? रस्त्यांवरची कुत्रीं ती, अशीच असणार त्यात घाबरायच काय?" बेफिकीरीन तो म्हणाला.
"नाही रे, त्याचे डोळे बघ आधी कसे माझ्यावर रोखून धरलेत ते. असं वाटतय आत्ताच मला खाऊन टाकेल तो." पुन्हा थरथर कापत ती म्हणाली.
"तु अगोदर त्याच्याकडे लक्ष द्यायच सोडुन दे आणि चल बघु इथून. तो काहीएक करणार नाही. तु घाबरलीस ना तर तो तुला जास्तच घाबरवेल." असे बोलत तो तिला वळवुन पुढे नेऊ लागला. पण ती मात्र मान मागे वळवुन-वळवुन त्या कुत्र्याकडेच बघत होती. दबा धरत ते कुत्र अंधारात त्यांच्या मागे हळुहळु येऊ लागलं जसा एखादा जंगली हिंस्र पशु आपल सावज़ पकडण्यासाठी यावा तसे! ते पाहुन ती पुन्हा जागचे जागी थांबली.
"आता काय झाल?" प्रश्नार्थक नजरेनं त्यानं तिच्याकडे पाहिल.
"तो आपल्याच मागे येतोय" पाठीमागे पाहातच कापर्या आवाजात ती बोलली.
त्याने पुन्हा मागे बघितलं आणि खरोखरच तो कुत्रा दबकतच त्यांच्या मागोमाग येत होता.
"बरं, थांब तु इथंच" असे तिला म्हणत, तो कुत्र्याला पळवुन लावण्यासाठी पुढे जाऊन त्याला हटकु लागला, पण यावेळी परिणाम मात्र वेगळाच झाला. आत्तापर्यंत गुरगुरत दबकत येणार्या कुत्र्याने आपला संयमच सोडला. जागच्या जागेवरच मागे न हटता पिसाळलेल्या प्राण्यासारखे ते त्याच्यावर जोर जोरात भुंकू लागले. त्या भुंकण्याच्या आवाजाने तेथिल शांतता अचानक भंग पावली. त्याचा तो कानठीळ्या बसवणारा आवाज ऐकुन तिने आपले दोन्ही कान हाताच्या तळव्याने घट्ट दाबून धरले मात्र तो कुत्रा इतक्या जोराने भुंकत होता की कानावर हात ठेवलेले असुनही तो आवाज आपल्या कानाचे पडदे फाडुन मेंदवात घुसत असल्याची तिला जाणीव होत होती.
शेवटी वैतागुन त्याने रस्त्यावरचा एक दगड उचलुन कुत्र्याच्या दिशेने भिरकावला तसा घाबरून आलेला दगड चुकवत ते धावत जात तेथिलच एका अंधार्या गल्लीत कुठेतरी गुडुप झाले.
"हं...आता तरी पुढे जायचं?" तिच्याकडे बघत तो म्हणाला.
तिने सावकाश आपले डोळे उघडले, वातावरण पुर्ववत शांत झाले होते. कानावरचे हात काढत आपली भिरभिरती नजर एकदा सर्व बाजुंनी फिरवली, तो कुत्रा कुठेच दिसत नव्हता. जिव सुटला अशा अविर्भावात तिने मग 'हुश्श...' असा एक सुस्कारा सोडला आणि त्याच्याकडे पाहत गोड स्मित हास्य करत, दाताखाली ओठ दाबत मानेनेच त्याच्या बोलण्याला संमती दिली. आता दोघेजण वळुन पुढे जाणार इत़क्यात अचानक तिच्या तोडांतुन पुन्हा जोरात किंकाळी बाहेर पडली.
पुढे जाऊन अंधारात लपलेल्या त्या कुत्र्याने डाव साधत तिच्या अंगावर उडी घेतली होती, पण त्याच वेळी तिला मागे सारत, त्या कुत्र्याची ती झेप चुकवत, हवेतच त्याच्या जबड्यावर त्याने आपल्या डाव्या मुठीचा जोरदार ठोसा दिला होता. या ठोशाने तो कुत्रा चांगलाच दोन-तिन कोलांट्या उड्या खात, साडेतीन फुटांपर्यंत घसरत उजव्या बाजुच्या भिंतीवर आपटला होता.
जबड्यावर बसलेल्या जबरदस्त ठोश्याच्या वेदनेने जोरात विव्हळत, आणि तडफडतच तो पुन्हा समोर धावत जात डाव्या बाजुच्या झाडीजवळील गडद अंधारात कुठेतरी गायब झाला.
काही क्षणांतच या सर्व घटना झटपट घडल्या होत्या. ती मात्र अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे भेदरलेल्या अवस्थेत जागच्या जागेवर तशीच खिळुन उभी होती.
"किती क्रुर आहेस रे तू??.." विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत ती उद्गारली.
"का?.. काय झाल?" त्याच्या चेहर्यावर मगाचेच काहीच न झाल्यासारखे भाव!
"का काय!! किती जोरात मारलस तू त्याला!" तिची तिच भेदरलेली नजर.
"हो... ते का, डोंन्ट वरी आपण परत जाताना ना त्याची एकदा भेट घेऊया. तु त्याला स्वारी म्हण आणि मी त्याच्या पायावर डोSS क ठेउन त्याच्याकडे चुकून झाल्या प्रकाराबद्दल कन्फेशन करतो. मग, आपल्यालाही माफी मागितल्याने हलकं वाटेल आणि त्या बिचाSS.र्यालाही त्याची विचारफुस केल्याबद्दल जरा बरं वाटेलं, नाही का?" हसत तिच्याकडे पाहत तो म्हणाला.
पण ती मात्र काहीच न बोलता त्याच्यावरून नजर फिरवत सरळ पुढे चालू लागली. हातावर लागलेल्या कुत्र्याच्या रक्ताकडे आणि नंतर एकदा तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत त्याच्या तोंडावर अस्पष्टसे छद्म हास्य पसरले. आपला हात, रुमालाने पुसत तोही मग तिच्याबरोबर चालु लागला.
असे काही क्षणच गेले असावेत की, हृदयाचा कंप करीत पुन्हा एकदा त्याच कुत्र्याचा वेदनेने भरलेला पण भयानक असा रडलेला आवाज संपुर्ण शांततेत घुमला, आणि मग थोड्याच वेळात त्याला साथ देत वेगवेगळ्या ठिकाणाहुन इतर कुत्र्यांचा रडलेला आवाजही त्यात मिसळला गेला. त्या आवाजासरशी मनात धस्स् SS झाले. छातीतून भितीची एक कळ झटक्यात डोक्यात जाऊन मेंदवाला झीणझीण्या आल्या. तशी तिने घाबरून त्याला घट्ट मिठी मारली.
"अग!!... काय झाल?" तिच्या केसांमधून बोटे फिरवत त्याने विचारले.
"..मला कसतरी होतयं रे क्षितिज! खुप.... खुप घाबरल्यासारख वाटतयं.." त्याच्या बाहुमध्ये तशीच डोळे झाकलेल्या अवस्थेत ती म्हणाली.
"शोनु, घाबरायला काय झाल? आणि मी आहे की तुझ्याबरोबर..."
"त्याची तर जास्त भिती वाटतेय!!"
"म्हणजे...?"
"..किती निर्दयपणे मारलस तू त्याला?" विषय परत फिरून तिथंच!!
या मुली म्हणजे ना, एखादी गोष्ट त्यांना कुठे खट़कली की त्याचा पिच्छा पुरविल्याशिवाय त्या शांत अशा बसतच नाहीत.
"अग पण त्यान तुला चावलं असत.."
"म्हणुन का तू त्याला असं मारायचं...?" राईचा पर्वत म्हणतात तो यालाच!
"हे बाकी तुम्हा मुलींच बरं आहे, एक तर मदत करा आणि वरून तुमचं बोलणं पण ऐकुन घ्या." हसुन बोलत त्याने तिच्याकडे पाहीले पण ती मात्र रागाने त्याच्याकडे पाहत होती.
"बरं बाई माझंच चुकल! मी माझी चुकी मान्य करतो.हं..... आता तरी बसं!!" अपराध्यासारखी मान खाली घालत त्याने स्वतःचे कान पकडले.
त्याच्याकडे पाहुन तिच्या ओठांवर स्मित हास्य उमटलं. "ह्म्म....आता कसं वाटतयं SS..!!" ती मनातल्या मनात म्हणाली. मग आपले हास्य लपवत त्याला खिजवण्यासाठी मुद्दाम हाताची घडी़ घालून, त्याच्यापासुन मान वळवत ती दुसरीकडेच कुठेतरी पाहू लागली.
तिचा काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्याने वर पाहीले तर हीची दुसरीकडेच नजर!
"..आता उठाबशा काढायला लागतात की काय..?" केविलवाणी तोंड करत तो बडबडला, आणि नंतर खरंच त्याने ऊठाबशा काढायला सुरवात केली. फरक एवढाच होता की फक्त नंबरच वाढत होते तो मात्र तिच्या 'थांब' म्हणण्याची अपेक्षा करत हळूहळू एका-एका स्टेपने तिथल्या तिथेच खाली जात होता. एक... दोन... तिन.. चार... पाच...
निम्मा खाली बसेपर्यंत त्याने दहावा आकडा ओलांडला होता. तरीही तिची काहीच प्रतिक्रीया नाही! शेवटी त्याची गाडी तेथेच अडकली. रडकुंडीला आल्यासारखा बारीक आवाज काढत एखाद्या टेपरेकॉर्डमध्ये अडकलेल्या कॅसेट सारखा तो तोच-तो शब्द पुन-पुन्हा उच्चारू लागला...दहाS......दहाSS.....द हाSSS......आता मात्र तिला त्याचा तो माकडासारखा अर्धवट बसलेला अन् केविलवाणे तिच्याकडेच पाहत रडत असलेला अवरतार पाहुन हसू आवरणे कठीण झाले. तोंडावर हात ठेवत जोरजोरात त्याच्याकडे पाहुन ती हसू लागली.
"हे शोनू प्लिज सॉरी ना!" तिच्याजवळ जात तो म्हणाला.
"हूं.....आणि मी पण शॉSरी!..." त्याच्या खांद्यावर हात टाकत दुसर्या हाताने त्याचा डावा कान धरून त्याची मान हलवत ती म्हणाली.
दोघेजण आता पुन्हा नॉर्मलपणे एकमेकांशी बोलू लागले जसे आता इथे काही घडलेच नव्हते! पण तरीसुद्धा तिला मनामध्ये अजुनही कुठेतरी एक भिती, ताण जाणवतच होता. मघाच्या त्या कुत्र्याच्या भेसुर आवाजाने सभोवारच्या वातावरणमध्ये एकप्रकारची अवकळाच पसरवली होती; हे खरे!.
रस्त्याच्या उजव्या बाजुला तिथेच एका झाडाच्या वरच्या फांदीवर एक काळ्या रंगाचे मांजर बसले होते. गडद अंधारात, झाडाच्या सावलीत बसल्याने ते काळे मांजर पुर्णपणे त्यात मिसळुन गेले होते. फक्त अंधारामध्ये चमकणारे टपोरे डोळेच काय ते त्याचे तेथिल अस्तित्व दर्शवत होते. आत्तापर्यंत झालेला हा सर्व प्रकार ते अस्वस्थपणे बसुन पाहत होते. त्याचे ते तिक्ष्ण परंतु विलक्षण असे मोठे डोळे तेथील कुठल्याशा वस्तुवर स्थिरावले होते. त्या गोष्टीकडे पाहत असतानाच त्याच्या हृदयाची स्पंदने वाढली होती, पुढच्या पायांच्या नखाने झाडावर ओरखडत, तोडांतल्या तोंडात गुरगुरत ते डोळे फाडून त्याच दिशेला पाहत होते. पुढे जायचे त्याचे धाडस होत नव्हते, भितीने अंगावरील सर्व केस ताठ करत मग मध्येच दबकत आपले दात दाखवत फिस्स्कारत ते जागच्या जागीच खिळले होते. त्याच्या चाललेल्या या चुळबुळीवरून तरी ते कमालीचे बैचेन दिसत होते.
ते कशाकडे एकटक पाहत होते? का ते जागच्या जागीच असे खिळले होते?, असे काय होते तिथे ज्यामुळे त्याचे पुढे जायचे धाडसच होत नव्हते? किंवा अशी कोणती गोष्ट त्याने पाहीली होती, की ज्याने त्याच्या हृदयाची स्पंदने वाढ़त होती?; काहीच कळायला मार्ग नव्हता. पण त्याचे अंधारात चमकणारे तिक्ष्ण परंतु भेदरलेले डोळे मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगत होती ती ही! की, त्याने जे काही पाहीले होते ते अतिशय अभद्र, पाशवी आणि भयानक होते, खुपच भयानक!!!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
शिंदेनी आपली गाडी ग्रीन पॅलेस हॉटेलच्या आवारातून तशीच पुढे एका साईडला घेतली. गाडीतून घाईघाईने उतरत शिंदे आणि पवार हॉटेलच्या लिफ्टकडे धावले. लिफ्टमध्ये आत घुसताच त्यांनी तेथिल एक बटन दाबले, ते बटन क्षणात लाल होत लिफ्टचे डोअर हळुवार बंद झाले आणि लिफ्ट वेगाने वर जाऊ लागली.
त्यांच्या पाठोपाठ येणारी काळी होंडा बाईकसुद्धा आता हॉटेलच्या आवारात शिरली. बाईक स्टँडला लावून त्या दोन व्यक्ती धावत लिफ्टपाशी आल्या. तेथे दोन लिफ्ट होत्या त्यातील एक लिफ्ट नुकतीच खाली आली होती तर दुसरी वर चालली होती.
"....,याच लिफ्टने ते दोघे वर गेले असणार!" त्यातील एक व्यक्ती पुटपुटली. तिने लिफ्टच्या बाजुला नजर टाकली. लिफ्टच्या बाहेर असलेल्या इंटीकेटरवर वरच्या दिशेने तोंड करून एक हिरव्या रंगाचा बाण फ्लॅश होत होता आणि त्याच्याच पुढच्या काळ्या चौकोनामध्ये ठळक लाल रंगात नंबर फ्लॅश होत होते.....१ ......२ .......३ ........४...
शेवटी एका नंबरवर लिफ्ट थांबली, आणि पुन्हा लिफ्टची रिव्हर्स काउंटींग सुरू झाली.
"टॉप फ्लोर!!!" त्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीकडे एक अर्थपुर्ण नजर टाकली.
"..काSS य...???, तुला म्हणायच आहे की आपण पण आता वर जायच?.." पहिल्या व्यक्तीच्या डोळ्यातील भाव ओळखुन दुसरी व्यक्ती गडबडत म्हणाली. पहिल्या व्यक्तीने फक्त त्याला मानेनेच होकार दर्शविला.
"अग पण आपल्याला तिथे..."
"..शु.SSS....." दुसर्या व्यक्तीचे बोलणे मध्येच तोडत, आपल्या ओठांवर बोट ठेवत, पहिल्या व्यक्तीने त्याला शांत राहण्याची खुण केली आणि डोळ्यांनीच तिच्या मागोमाग येण्याचा इशारा करत ती बाजुच्या लिफ्टमध्ये घुसली.
"च्या.SS.यला मरवणार ही आपल्याला एक दिवस!" असे काहीसे पुटपुटतच दुसरी व्यक्तीही लिफ्टमध्ये शिरली आणि लिफ्टची दोन बटने प्रेस केली.
लिफ्टचा डोअर बंद होताच त्या (स्त्री) व्यक्तीने आपल्या पर्सच्या पुढच्या कोपर्याला एक छोटीशी गोल काळ्या रंगाची वस्तु फिरवुन बसवली. त्यानंतर पर्समधुन लिप्स्टिक आणि एक छोटा लांबट पण शट़कोनी आकाराचा आरसा काढला. तो चेहर्यासमोर धरत ओठांवर लिप्स्टिकचा हलकासा हात फिरवला, दोंन्ही ओठ एकमेकांवर घासत तिने ओठांवरची लिप्स्टिक सरळ केली, हातांनी डिवचत केस नीट केले व पुन्हा एकदा आरशात आपला चेहरा न्याहाळुन बघत आरसा पर्सच्या बाजुच्या कप्प्यात कोंबला. आता आपला पिंक कलरचा मखमली स्कार्फ डोक्याभोवती असा गोल फिरवून बांधला की जेणेकरून तिचा चेहरा झाकला जावा. नंतर मग तिने एक मोठ्ठा डार्क (ब्लॅक) रेड कलरचा गॉगल डोळ्यांवर चढवला. तिच्या चेहर्याचा बराचसा भाग आता झाकला गेला होता.
"नाऊ रेडी फॉर द मिशन!!" असे म्हणत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला.
"....आपल्याला तिथे काहीएक करायची आवश्यकता नाही, आता जे काय करायच तो हाच करेल." आपल्या डोळ्यांनी पर्सच्या कोपर्यावर लावलेल्या त्या काळ्या वस्तुकडे निर्देश करीत ती म्हणाली. आणि पुन्हा वर कुठेतरी पाहत ती टॉप फ्लोर येण्याची वाट बघु लागली.
त्यानेही मान डोलवत तिच्या बोलण्याला संमती दिली खरी पण पुन्हा दुसरीकडे तोंड फिरवत त्याने स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतला. 'चट्ट......' क्षणात तेथे आवाज घुमला. त्यासरशी तिने त्याच्याकडे नजर टाकली परंतु काहीच झाले नाही अशा अविर्भावात दुसरी व्यक्ती तिच्यापासून नजर चुकवत लिफ्टमधील उजव्या बाजुच्या काळ्या चौकटीत फ्लॅश होणार्या लाल रंगाच्या आकड्यांकडे पाहु लागली......२ .....३ ......४ ......५......
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
शिंदे आणि पवार जेव्हा तेथे घटनास्थळी डेड़ बॉडीची पाहणी करण्याकरता पोहोचले तेव्हा गड़द पिवळ्या रंगाची मिडी घातलेली, अन् रक्ताने पुर्णपणे न्हालेली अशी एक २०-२१ वर्षाची तरूणी त्यांच्यासमोर पाण्याच्या टाकीमध्ये निर्जिव अवस्थेत पडलेली होती. तिच्या उजव्या हातामध्ये फ्रेंन्डशीप बॅन्डसारख्या तीन विविध रंगाच्या रबरी पट्ट्या, एक रंगीत मण्यांची माळ वजा ब्रेसलेट, आणि त्याचप्रकारचे बटनांसारखे दिसणारे दुसरे एक ब्रेसलेट होते, मधले बोट आणि करंगळी सोडली तर अंगठा, तर्जनी, आणि अनामिका यांमध्ये प्रत्येकी दोन-दोन...तीन-तीन अशा अंगठ्या होत्या, डावा हात मात्र त्यामानाने पुर्णपणे मोकळा होता. नाकामध्ये नथ, डाव्या पायात काळा दोरा तर गळ्यामध्ये एक गोल्डन रंगाचे कडे असलेले हार्ट शेप लॉकेट अर्धवट तुटलेल्या स्थितीत होते. तिच्याकडे पाहुन ही कोणीतरी फिल्म मधली हिरोइन किंवा मॉडेल असावी असा भास होत होता. ही खरंच त्या बारा विद्यार्थ्यांपैकीच एक असेल का? पवारांच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. आणि तसं त्यांना वाटणंही स्वाभाविकच होतं कारण ही डेड़ बॉडीसुद्धा निदान सहा सात दिवसां पुर्वीचीच होती, ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या गायब होण्याच सत्र चालु होत तेव्हाची!
इन्स्पेक्टर शिंदेंनी आता हॉटेलच्या मॅनेजर आणि स्टाफकडे मोर्चा वळवला, ते त्यांची कसून चौकशी करू लागले. थोड्याच वेळात तिथे पोलिसांची दुसरी एक टीम हजर झाली. त्यांनी आल्याबरोबर लगेच आपल्या कामाला सुरवात केली. त्यांची कामे झटपट आणि चोख होत होती. त्यामध्ये, फिंगर प्रिंट तज्ञांद्वारे प्रेताच्या जवळपासचे काही ठसे जमा करण्यात आले, त्यानंतर दोन-चार पोलिस काँन्स्टेबल, यांच्या मदतीने त्या मुलीची डेड़ बॉडी पाण्याच्या टाकीतून वर बाहेर काढुन तेथेच टेरेसवर मोकळ्या जागेत ठेवण्यात आली, प्रेताचे तसेच त्या जागेचे, संशयास्पद ठिकाणाचे फोटो घेण्यात आले, पंचनामा तयार करण्यात आला आणि शेवटी त्या डेड बॉडीला पुढच्या चाचण्यासाठी फॉरेंन्सीक लॅबमध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
एकंदर, मरीन ड्राईव्हला सापडलेल्या प्रेतासारखी याची भयावह अवस्था जरी नसली तरी पण हृदयद्रावक मात्र नक्कीच होती. खुपच निर्दयतेने आणि तडपवून हीला मारण्यात आले होते. मरतानाचे ते केविलवाणे भाव तिच्या डोळ्यांत पुर्णपणे साठलेले दिसत होते. अंगावर असलेले ओरखडे आणि काही झटापटीचे व्रण तिच्या जगण्यासाठीच्या शेवटच्या निष्फळ प्रयत्नांची ग्वाही देत होते. घराच्या किंवा बागेच्या कुंपणाला लावतात तसल्या काटेरी जाड तारांनी तिचा गळा आवळण्यात आला होता, म्हणजे ओरडण्याचा प्रश्नच नाही! त्या तारा तिचा निम्मा अर्धा गळा चिरत खोल आतमध्ये घुसल्या गेल्या होत्या, येथपर्यंत काहीच नव्हते पण याच्या पुढे जाऊन तिला नरकाची यातना देण्यात आली होती. एखादा कसाई जसा कोंबडीची मान अर्धवट कापून तिला तडपण्यासाठी सोडून देतो तसेच काहीसे हीला करण्यात आले होते फरक एवढाच होता की, त्याच्या अगोदर एखाद्या भुकेलेल्या हिंस्र प्राण्यासारखे तिची लख्तरे तोडण्यात आली होती, त्यानंतर हाता पायावर कोणत्यातरी धारदार हत्याराने अमानुषपणे वार करण्यात आले आणि मग शेवटी गळ्याला काटेरी तारा आवळून, दोन्ही हात तारेने बांधुन तिला पाण्याच्या मोकळ्या टाकीत ढकलण्यात आले होते, जिवाच्या आकांताने तडफड़ण्यासाठीच!!
टाकीमध्ये सर्वत्र पसरलेला तो रक्ताचा सडा आणि बाजुच्या भिंतीवर उडालेले रक्ताचे शिंतोडे तिच्या त्या वेदनादायक तडफडीची आठवण ताजी करून देत होते. तेथेच टाकीच्या एका कोपर्यावर असलेले दोन तीन सिगारेटची थोटकं तसेच टाकीच्या आत पडलेली सिगारेटची राख आणि जळालेल्या माचीसच्या काड्या यावरून एक गोष्ट स्पष्ट होत होती, हे पाशवी कृत्य ज्याने कोणी केले होते तो टाकीच्या कट्ट्यावर निदान एक तासभर तरी आरामात बसुन गेला होता, कदाचित तिला तडफडताना पाहतानाचा पुरेपुर आनंद त्याला घ्यायचा होता. त्यामुळेच तो उशीरपर्यंत येथे थांबला होता; जोपर्यंत ती कायमची शांत होत नाही तोपर्यंत.
त्या मुलीची ती दयनीय अवस्था पाहुन पवारांचे मन बधीर झाले. बोटाची हाडे मोडत, नकळत त्यांच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या कसही करून या नराधमाला पकडलेच पाहीजे त्यांनी आता मनोमन विचार पक्का केला होता....
क्रमशः
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कुत्र्याचं अस वेड्यासारख भुंकण-रडणं तसेच मांजराची ती बैचेन अवस्था काय संकेत देत असेल? खरंच काहीतरी गुढं- पाशवी होत का तिथे?
पवारांच्या डोक्यात असा कोणता विचार चालला आहे? ते कधी त्या खुन्यापर्यंत पोहोचू शकतील का, की तोच त्यांना हुलकावणी देईल?
पोलिसांच्याच मागावर असणार्या त्या दोन व्यक्ती कोण आहेत? त्यांचा नेमका कोणता हेतु असेल?
अशा एक ना अनेक रहस्यांचा उलगाडा आता लवकरच होणार आहे, तसेच काही अनेक अदभुत घटनाही अजुन पुढे येणार आहेत.....
या कथेचा १२ वा भागाचि लिन्क
या कथेचा १२ वा भागाचि लिन्क मिलेल का
Pages