म्हणींच्या राज्यातील गमतीजमती

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 November, 2011 - 08:23

पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.

एखाद्या देशात प्रचलित असलेल्या म्हणींवरून त्या देशातील लोकांची प्रतिभा, वाक्चातुर्य व व्यवहाराची पडताळणी करता येते असा सर्वसामान्य समज आहे. त्यानुसार पाहावयास गेले तर भारतातील विविध भाषांमधील म्हणींचा समृद्ध खजिना येथील लोकांची विलक्षण प्रतिभा, चातुर्य व स्वभाव-विशेषांची ओळख करून देतो असेच म्हणावे लागेल.

आधुनिक युगात म्हणींचा वापर शहरी संभाषणात कदाचित मोठ्या प्रमाणावर होत नसेल. परंतु आजही ग्रामीण भारतात या म्हणी संभाषणात, व्यवहारात सतत डोकावताना दिसतात. गावाकडची दोन माणसे गप्पागोष्टी करत बसली असतील तर त्यांच्या गावगप्पा अवश्य ऐका. तुम्हाला दोन-तीन तरी इरसाल, अस्सल, झणझणीत म्हणी ऐकायला मिळणारच याची खात्री!

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोंकण, घाटावरच्या अनेक म्हणी आज पुस्तकांच्या व आंतरजालाच्या कृपेने आपल्याला एकत्रित स्वरूपात वाचावयास मिळतात. त्यांच्या 'उद्बोधकते'वर झडलेल्या महान चर्चाही आपण वाचतच असतो. परंतु महाराष्ट्राबाहेर अशा कितीतरी म्हणी आहेत ज्यांचे मराठी स्वरूप आपल्याही माहितीचे आहे! परवा असेच एक म्हणींचे पुस्तक चाळताना वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील समानार्थी म्हणींचा शोध लागला. भाषा बदलल्या, प्रांत बदलला, संस्कृती - आचार - विचार बदलले तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही. त्याच्या वृत्ती बदलत नाहीत! त्यांच्यामागचे मर्म तेच राहते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये डोकावून बघितलेत तर अशा बर्‍याचशा म्हणी तुम्हाला सामायिक अर्थाच्या दिसतील.

उदाहरणार्थ हिंदी भाषेतील ही म्हण पाहा ना! म्हण आहे,''मरें भैस में बहुत घी''. म्हणजे म्हैस मेली की त्या मेलेल्या म्हशीला किती दूध यायचं, त्यापासून किती तूप लोणी बनायचं याबद्दल तिचं बेफाट गुणगान करणं. भले ती म्हैस जिवंत असताना तिला कधी प्रेमाने चारा खाऊ घातला नसेल. पण ती मेल्यावर तिच्या गुणांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करायची. बुंदेलखंडी भाषेत या म्हणीशी साधर्म्य दाखवणारी ''मरे पूत की बडी आँखे'' अशी म्हण प्रचलित आहे. तिचाही अर्थ असा की जोवर एखादी व्यक्ती जिवंत असते तोवर तिची कदर नसते. परंतु तीच व्यक्ती मेल्यावर तिच्या महानतेचे पोवाडे गायले जातात. याच म्हणीचे आणखी एक रूप म्हणजे, ''मरे बाबा की पस्सों सी आँखे''. इथला 'पस्सों' म्हणजे मराठीतील पसा किंवा ओंजळ!

एकाच अर्थाच्या, शब्द साधर्म्य दाखवणार्‍या म्हणी कदाचित एका प्रांतात जन्मल्या व त्यानंतर विविध कारण - मार्गे इतर प्रांतांमध्ये प्रचलित झाल्या असेही असू शकेल. पूर्वीच्या काळी सार्थवाह, यात्रेकरू, भटके लोक, यती - मलंग - फकीर - साधू - भिख्खू, भ्रमण करून लोक-मनोरंजन करणार्‍या कलावंत लोकांचे तांडे यांच्याद्वारेही अनेक कथा, म्हणी, शब्दप्रयोग वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे होते काय, जरी दोन प्रांतांतील व्यक्तींची बोलीभाषा वेगळी असली तरी त्या त्या सामायिक अर्थाच्या म्हणीने ते आपोआप एकमेकांशी सांधले जातात. वाक्यांची लांबण न लावता त्यांना मोजक्या शब्दांमधून व्यक्त होता येते. शिवाय त्या प्रसंगाला वा परिस्थितीला साजेशी ठसकेबाज म्हण आपल्या संग्रही आहे व ती वापरता येणे याचा आनंदही औरच असतो!

महाराष्ट्रात ''कोठे राजा भोज आणि कोठे गंगू तेली'' ही म्हण आजही लोकप्रिय आहे. गमतीची गोष्ट की हीच म्हण भारतात इतर अनेक भाषांत अगदी त्याच प्रकारे आढळते. जसे, हिंदीत, 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' तर भोजपुरीत 'कहाँ राजा भोज, कहाँ भोजवा / लखुआ तेली', गुजरातीत 'क्यां गंगाशाह, क्यां गंगा तेली', बंगालीत 'कोथाय राजा भोज, कोथाय गंगाराम तेली', राजस्थानी भाषेत 'कठै राजा भोज, कठै गांगलो तेली', बुंदेलखंडात 'कां राजा भोज, कां डूंठा तेली' अशी या म्हणीची विविध रूपे पाहावयास - ऐकावयास मिळतात.

त्याच प्रकारे आणखी एक म्हण : ''नाचता येईना, अंगण वाकडे.... स्वैपाक करता येईना, ओली लाकडे. '' बंगालीत हीच म्हण 'नाचते न जानले, उठानेर दोष' म्हणून प्रचलित आहे. गुजराती मंडळी ह्या म्हणीला 'नाचतां नहीं आवडे तो के आंगणुं बांकुं' अशा प्रकारे वापरतात.

'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' हे वचन तर प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. मोठ्या लोकांवरच कायम संकटे येतात अशा अर्थाच्या म्हणी इतर भाषांतदेखील दिसून येतात. 'बडे गाछेई झड लागे' अशी म्हण बंगालीत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ : मोठ्या वृक्षांनाच वादळ सतावते. (लहान झाडाझुडुपांची वादळात तितकी हानी होत नाही.) बुंदेलखंडी भाषेत हीच म्हण 'बडेई रूख पै गाज गिरत', म्हणजे मोठ्या वृक्षावरच वीज कोसळते, या अर्थाने दिसून येते.

गावांगावांमधून पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे ओवा. त्यावरही एक म्हण प्रचलित आहे, ''ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल.'' म्हणजे आपण होऊन कोणी चवीला तिखट लागणारा, जिभेला मिरमिरणारा ओवा मागायला वा खायला जाणार नाही. ही म्हण हिंदीत 'जिसका पेट दर्द करता है वहीं अजवाइन खोजता है' म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बंगालीत तिचे रूप, 'जार माथा मांगे सेई चून खोजे'. म्हणजेच, ज्याचे डोके फुटेल तोच चुना शोधेल.

अनुभवातून आलेलं शहाणपण हे नात्यासंबंधी असो की पोटापाण्याच्या व्यवसायासंबंधी - म्हणींत ते लीलया सामावून जाते. आता ही भोजपुरी म्हणच पहा ना -- ''खाद पडे त खेत, नाहीं त कूडा-रेत |'' म्हणजेच शेतीत जर खत घातले तरच शेती चांगली होते, नाहीतर तिचा फक्त कचरा होतो. किंवा ''करम टरे त टरे, बाकिर जोत न टरे'' ही म्हण. तिचा अर्थ आहे, भले भाग्य धोका देवो - न देवो, पुरुषार्थ धोका देत नाही. भारतातील शेती पर्जन्याच्या मर्जीवर अवलंबून असते त्याचेच हे प्रतिबिंब म्हणीत दिसून येते. भाग्यात पर्जन्यवृष्टी असो वा नसो, (त्याला न डरता) शेत जोमाने नांगरण्यातच पुरुषार्थ आहे.

''अंधेर नगरी चौपट राजा'' या म्हणीचा हिंदी अवतार म्हणजे ''बेबूझ नगरी बेबूझ राजा.''
त्याची गोष्ट अशी :

एक साधू व त्याचा शिष्य फिरत फिरत आटपाट नगरात आले. साधूने शिष्याला शिधासामग्री खरेदी करण्यासाठी बाजारात पिटाळले. शिष्याने पाहिले तो काय, तिथे बाजारात सार्‍या वस्तू एकाच किमतीला मिळत होत्या. मग काय, त्याने त्या पैशांतून भरपूर मेवा-मिठाई खरेदी केली व साधूकडे परत आला. शिष्याचा तो वृत्तांत ऐकून साधूला ती नगरी राहण्यास सुरक्षित वाटेना व त्याने लगेच तिथून मुक्काम हालवायचे ठरविले. परंतु शिष्याला तर त्याच नगरीत राहायचे होते. बरेच समजावून सांगितल्यावरही फरक न पडल्याने साधू महाशय शेवटी शिष्याला मागे सोडून एकटेच त्या नगरीतून चालते झाले. इकडे शिष्य रोज भरपूर मिठाई खाऊन चांगला जाडजूड, लठ्ठ झाला.

एके दिवशी त्या नगरीत एक खून झाला. खूप तपास करूनही गुन्हेगार सापडला नाही. तेव्हा राजाने क्रोधित होऊन आज्ञा दिली की या नगरीतील सर्वात लठ्ठ मनुष्याला पकडा आणि त्यालाच फाशी द्या! राजाच्या शिपायांनी गरगरीत झालेल्या लठ्ठ शिष्याला पकडले व फाशी देण्यासाठी राजाच्या समोर आणले. शिष्य गयावया करू लागला की तो खून त्याने केलेला नाही. परंतु राजाने त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. तेवढ्यात शिष्यावरच्या संकटाची वार्ता ऐकून साधूही तिथे धावत धावत आला आणि म्हणू लागला, ''मला फाशी द्या. तो खून मी केला आहे. या माझ्या शिष्याला सोडून द्या. तो निरपराध आहे. '' हे ऐकून शिपायांनी शिष्याला सोडले व साधूला पकडले. राजासमोर साधूला फाशी होणार तेवढ्यात तो शिष्य तिथे धावत आला व ओरडू लागला, ''खरा खून तर मी केलाय, मलाच फाशी द्या!'' साधू व त्याचा शिष्य या दोघांमध्ये अशा रितीने खरा दोषी कोण यांवरून चांगलीच जुंपली. एक म्हणायचा, ''मी केला खून'', तर दुसरा म्हणायचा, ''नाही, नाही, मीच केला खून!!'' शेवटी राजा चांगलाच बुचकळ्यांत पडला व त्याने दोघांनाही सोडून दिले!

प्रत्येक म्हणीच्या मागे असणार्‍या उगम कथा बदलतील, पात्रे बदलतील. पण त्यांतून लखलखणारे अस्सल शहाणपण - व्यवहारचातुर्य मात्र अनुकरणीय ठरेल. अनेक तपे लोटली तरी त्या म्हणी आजच्या काळालाही तितक्याच लागू आहेत.

खालची ही गोष्ट व म्हण वाचून तुम्हाला सध्याच्या कोणत्या घोटाळ्याची आठवण होते का, पहा बघू!

''आँधर सौंटा'', म्हणजेच अधिकारी पदाला अयोग्य व्यक्तीच्या हाती अधिकार देण्याचे फळही वाईटच मिळते!

त्याची गोष्ट ही अशी :

एका गावात एका माणसाने गावातील आंधळ्या व्यक्तींना भोजन द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने सर्व आंधळ्यांना गोळा करून भोजनासाठी पंगतीत बसायला सांगितले. आता त्या माणसाची चलाखी बघा बरं का! त्याला मनातून खरेच त्या आंधळ्यांना भोजन देण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र त्यातून मिळणारे श्रेय,नाव व फुकटची प्रसिद्धी हवी होती. मग त्याने एक युक्ती केली. पंगतीत बसलेल्या पहिल्या आंधळ्याच्या पुढे मिष्टान्नाने भरलेले ताट ठेवले. आंधळ्याने ताट चाचपून पाहिले. आपल्यासमोर ठेवलेले ताट पदार्थांनी भरलेले आहे हे चाचपडून पाहिल्यावर तो निश्चिंत झाला व मागे रेलून बसला. त्या चलाख माणसाने तेच ताट उचलून दुसर्‍या आंधळ्याच्या समोर ठेवले. तोही ताट चाचपडून निश्चिंत झाला. अशा पद्धतीने त्या चलाख इसमाने एकच ताट सर्व आंधळ्यांच्या समोर फिरवले. मग तो सार्‍या अंधांना उद्देशून जोरात म्हणाला, ''बंधूंनो, सर्वांना भोजन वाढले आहे. तेव्हा देवाची प्रार्थना करून भोजनाला सुरुवात करा!''
परंतु कोणाच अंधाच्या पुढे भोजनाचे ताट नव्हते. प्रत्येकाला वाटले की माझे ताट शेजारच्या व्यक्तीनेच पळवले. झाले!! ते एकमेकांवर दोषारोप करू लागले, की तूच माझे ताट चोरलेस! करता करता त्यांच्यात भांडणे लागली आणि एकमेकांची सोट्याने यथेच्छ धुलाई करून ते सारे अंध न जेवताच, भुकेल्या पोटी, जखमी होऊन परत गेले!!

एखाद्या कामात मूर्खपणे अडथळा बनून हटवादीपणा करणार्‍यांसाठी हिंदी भाषेत एक म्हण आहे,
'जो बोले सो घी को जाय'. त्या म्हणीमागे एक मजेशीर कथा सांगतात.
एकदा चार मूर्खांनी एका झाडाखाली एकत्र स्वयंपाक बनवायचे ठरविले. पण स्वयंपाकासाठी लागणारे तूप कोणी आणायचे यावरून त्यांच्यात भांडाभांडी सुरू झाली. शेवटी चौघांनी ठरविले की मौन पाळायचे. आणि त्यांच्यातील जो पहिल्यांदा मौन तोडेल त्यानेच तूप आणायला बाजारात जायचे! आता चौघेही चुपचाप.... आपापसांत काहीही न बोलता, हूं की चू न करता तसेच भुकेल्या पोटी कोण पहिल्यांदा मौन तोडतोय याची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसून राहिले. बघता बघता रात्र झाली. गस्तीवर असणार्‍या पहारेकर्‍याने त्यांना हटकले. पण चौघांपैकी कोणीच मौन सोडायला तयार नव्हते. शेवटी पहारेकरी त्यांना कोतवालाकडे घेऊन गेला. कोतवालाने त्यांना जाब विचारला तरी कोणी बोलायला तयार होईना! कोतवालाला वाटले की चौघेही त्याचा अपमान करत आहेत. त्याने चारही मूर्खांना चाबकाचे फटके ओढायची शिक्षा फर्मावली. एका मूर्खाला शेवटी तो मार सहन होईना, आणि तो वेदनेने कळवळून जोरात ओरडला, ''अयाईगं!'' त्याबरोबर बाकीचे तिघे जोरात ओरडले, ''आता तूच तूप आणायचेस!!!''

''आज नहीं कल'' या म्हणीमागची गोष्ट माणसाच्या स्वभावावर प्रकाश टाकणारी आहे.
एका नगरीत एक मुसलमान माणूस राहायचा. स्वतःला सच्चा मुसलमान, खुदाचा सच्चा पाईक मानायचा. रोज रात्री एका झाडाखाली बसून तो खुदाची करुणा भाकताना म्हणायचा, ''या खुदा, मला तुझ्यापाशी बोलावून घे.'' एक माणूस त्याचे हे खुदाशी बोलणे रोज ऐकायचा. त्याने एक दिवस या मुसलमानाची कसोटी घ्यायचे ठरविले. त्या रात्री तो झाडावर जाऊन बसला. नेहमीप्रमाणे मुसलमान आला, त्याने खुदाची करुणा भाकली, ''या खुदा, आपकी मोहब्बतमें मुझे आपके पास बुला लो |'' झाले! झाडावर बसलेल्या माणसाने वरून एक फाशीचा दोर खाली सोडला व म्हणाला, ''ये वर माझ्याकडे!'' मुसलमानाला वाटले की खुदाच त्याला वर बोलावतोय. त्याबरोबर तो ''आज नहीं कल,'' असे म्हणत आपल्या घराकडे पळत सुटला! म्हणजेच, मला आज नको, उद्या बोलाव. थोडक्यात काय, तर मरणाची कल्पना करणे आणि प्रत्यक्षात मरणे यात खूप फरक आहे. आणि जोवर एखाद्या गोष्टीची कसोटी घेतली जात नाही तोवर त्यातील सत्यता कळून येत नाही.

''टेढी खीर'' म्हणून एक म्हण हिंदीत प्रचलित आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी खूप कठीण वाटली की ही म्हण वापरतात. त्यामागची कथा अशी : एकदा काही लोक मिळून मोठ्या चुलाण्यावर खीर बनवत होते. एक दृष्टिहीन माणूस तिथेच शेजारी बसला होता. त्या लोकांची आपापसात खिरीबद्दल चर्चा चालली होती. ती ऐकून त्या आंधळ्या व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटले. या अगोदर त्याने कधी खीर खाल्ली नव्हती. न राहवून त्याने त्यातील एका माणसाला विचारले, ''भाऊ, कशी असते हो ही खीर?'' त्यावर जमलेल्या लोकांनी सांगितले, ''मस्त पांढरीशुभ्र असते ही खीर!'' आता अंध व्यक्तीला काळे - पांढरे कसे समजणार? अंधाने विचारले, ''मग पांढरीशुभ्र म्हणजे कशी?'' त्यावर लोकांनी उत्तर दिले, ''पांढरी म्हणजे बगळ्यासारखी!'' आता अंधाला बगळा माहीत नव्हता. त्याने विचारले, ''बगळा कसा असतो?'' त्याबरोबर लोकांमधील एकाने आपल्या हाताचा बगळ्यासारखा आकार करून त्या अंधाच्या समोर धरला. अंधाने आपल्या हातांनी तो आकार चाचपडून पाहिला आणि म्हणाला, '' मला नको बुवा अशी खीर! ही तर वाकडी खीर आहे.... मी नाही खाऊ शकणार! उगाच माझ्या घशात अडकून बसायची!!''

''काली मुर्गी सफेद अंडा,'' या म्हणीमागे माणूस जरी वाईट असला तरी त्याची संतती चांगली निपजू शकते या लोकज्ञानाची खमंग फोडणी आहे. त्यामागील कथा अशी सांगतात : एका नगरात एक श्रीमंत गृहस्थ राहत होता. तो वर्णाने काळा होता याची त्याला फार खंत वाटायची. एकदा तो अंगणात हिरवी शाल पांघरून बसलेला असताना एक फकीर फिरत फिरत त्याच्यापाशी आला आणि म्हणाला, ''क्यों भई हरे खेत के कौए.... या फकिराला काही देणार की नाही?'' त्या श्रीमंताला आपल्या काळ्या वर्णाचा फकिराने असा उल्लेख केलेला ऐकून खूप राग आला व तो तडक घरात निघून गेला. थोड्या वेळाने तो श्रीमंत पिवळ्या रंगाची शाल पांघरून पुन्हा अंगणात येऊन बसला. काही अवकाशाने आधी येऊन गेलेला फकीर फिरत फिरत पुन्हा त्याच्या अंगणासमोर आला व पुकारता झाला, ''क्यों भई बंगले की मैना, कुछ मिलेगा?'' या खेपेस श्रीमंताने फकिराला एक रुपया दिला. निघताना फकीर टोला लगावायला विसरला नाही, ''कोंबडी काळी असली म्हणून काय झाले.... अंडे तर सफेद देतेय बुवा!!''

साचलेले धन कितीही का असेना, एक ना एक दिवस ते संपुष्टात येते, या लोकसमजाला पुष्टी देणार्‍या म्हणी अनेक भाषांमध्ये दिसतात. बुंदेलखंडी भाषेत 'खायें खायें पार बडात', बंगालीत 'बोसिया खाईले राजार भंडार टूटे', अशा रूपात त्या समोर येतात.

म्हणींचे जे रांगडेपण आहे, त्यांच्यात त्या त्या गोष्टीला कोणताही मुलामा न देता, लोकलाजेचा कसलाही मुलाहिजा न ठेवता थोडक्यात लोकांपुढे ठेवायचे जे कसब आहे, जो रोखठोकपणा आहे तो शब्दालंकारांनी नटलेल्या लांबलचक, पल्लेदार साहित्यात क्वचितच आढळेल! त्यांच्यात लोकरंजनाबरोबरच उपहास आहे, अनुभवातून आलेले शहाणपण आहे, उद्बोधकता आहे आणि त्यांचा जो गंध आहे तोही मिरमिरणारा.... नाकाला झोंबणारा, डोळ्यांत पाणी आणणारा!

वेगवेगळ्या म्हणींचे रचयिते असे हे लोक नक्की कोणते? तर ते कोणी उच्चतम मानल्या जाणार्‍या साहित्याचे अभ्यासक, उपासक नव्हेत वा कोणी महान विद्वान नव्हेत. कोठे दूर डोंगरांवर - रानांमध्ये - ग्रामांमध्ये वस्ती करून राहणारे, कोणी हातावर पोट असणारे, कोणी पोटासाठी देशोदेशी वणवण भटकणारे तर कोणी दोन वेळच्या अन्नासाठी मिळतील ती कामे करून वेळ निभावणारे.... श्रद्धा - अंधश्रद्धांनी घेरलेले, रीती-रिवाजांच्या जगात वावरणारे, परंपरा - समजुती - रूढींचे पालन करणारे... जाती, धर्म, समाज, पंथाच्या चौकटींना एकाच वेळी घट्ट चिकटून असलेले आणि त्याचवेळी कैक वेळा त्यांच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडसही करणारे... त्यांच्या निर्माणातील व वापरातील म्हणींमध्ये या सार्‍या राहणीतील, विचारांतील व आचरणातील वास्तव जाणवत राहते.

म्हणींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या म्हणी लोकजीवनात कोणीही वापरू शकते. त्यांना प्रताधिकाराचे, जाती -धर्माचे बंधन नाही. सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात येणार्‍या वा येऊ शकणार्‍या प्रत्येक प्रसंगासाठी म्हणी रचल्या गेल्या आहेत. त्या नैतिकतेचा आव आणणार्‍या नाहीत. मनुष्यस्वभावातील स्वार्थी वृत्ती, संधिसाधूपणा, लोभ, मोह, क्रोध, अहंकार, बावळटपणा, मूर्खता, मत्सर, दांभिकता, आळशीपणा इत्यादी अवगुणांचा या म्हणी थेट वेध घेताना दिसतात. आयुष्यातील सुख-दु:खाचे प्रसंग, जीवन-मरण-संकट प्रसंग, हर्षोल्लासादी प्रसंगांना माणसाच्या ज्या स्वाभाविक व सामायिक प्रतिक्रिया उमटतात त्या काल, देश, प्रांत, भाषा, वर्ण इत्यादींना भेदून जाणार्‍या असतात. त्या प्रतिक्रियांचा आधार हे म्हणींचे उगमस्थान ठरते. म्हणींच्या आधारे आत्मस्तुती व परनिंदेचे चमत्कृतीयुक्त, रोचक व संक्षिप्त वर्णन करण्याचे, स्वतःच्या अवगुणांवर पांघरूण घालत परक्याच्या दुर्बलतेवर नेमके बोट ठेवण्याचे उत्कृष्ट साधन जनसमुदायाला मिळते.

खास ग्रामीण शैलीतील ''पुरुष वो ही, जो एक दंता होई'' या म्हणीच्या उत्पत्तीची कथा काहीशी अशीच आहे. म्हातारा तितुका न अवघे पाऊणशे वयमान सारखा म्हातारा मनुष्य जेव्हा तरुण, सुस्वरूप वधूची स्वप्ने बघत लग्नाला तयार होतो तेव्हा काय होऊ शकते याची ही मजेदार कथा!

खूप खूप वर्षांपूर्वी एकदा एका वृद्ध विधुराला नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या एकटेपणाचा खूप कंटाळा आला. घरी तो एकटाच होता. त्याने लग्न करायचे ठरविले. मध्यस्थाला खूप पैसे देऊ केले आणि आपल्यासाठी (तरुण), सुस्वरूप वधू शोधायला सांगितले. मध्यस्थाने सांगितल्याप्रमाणे लग्न जुळवून आणले. पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. विवाह समारंभ आटोपून स्वगृही परत येताना त्या वृद्धाला आपल्या सुंदर नववधूशी बोलण्याची इच्छा झाली. पण त्याला भीती वाटत होती, की वधू आपल्या म्हातारपणाची थट्टा करेल! म्हणून मग त्याने घोड्यावर स्वार होऊन तिच्या डोलीच्या चारही बाजूंना एखाद्या तरुणाच्या जोषात फेर्‍या मारल्या आणि वधूच्या जवळ येऊन म्हणाला, ''पुरुष वो ही, जो एक दंता होई''. (म्हणजे ज्याच्या तोंडात एकच दात, तोच पुरुष!) कारण त्या वृद्धाच्या तोंडात फक्त एकच दात शिल्लक होता.
त्यावर त्याच्या बायकोने डोलीचा पडदा बाजूला सारून मुखावरचा घुंगट दूर केला आणि म्हणाली, ''नारी रूपवती वो ही, जाँके मुँह में दंत न होई''!! (ज्या स्त्रीच्या मुखात एकही दात नाही, तीच नारी रूपवती होय!) .... याचे कारण??? ती 'नववधू' त्या वृद्धापेक्षाही म्हातारी होती आणि तिच्या तोंडात एकही दात शिल्लक नव्हता!!!

ऐतिहासिक घटना, प्रसंगांचे पडसादही काही म्हणींमध्ये दिसून येतात. ज्या घटना पुढे लोकोक्तीच्या स्वरूपात जनमानसात टिकून राहतात. बुंदेलखंडात ही एक म्हण प्रचलित आहे : 'घर के जान बराते गये, आलीपुरा कठवा में दये.' या म्हणीचा संबंध भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिकांच्या अजब अनागोंदीच्या राज्यकारभाराशी आहे. म्हणीनुसार कोणी एक सद्गृहस्थ वर्‍हाडी म्हणून एका वरातीत सामील होण्यासाठी रवाना झाले आणि त्यांची रवानगी मात्र झाली आलीपुरा संस्थानाच्या कोठडीत! त्यांची कसलीही चौकशी न करता त्यांना कोठडीत डांबण्यात आले. इथे आलीपुरा हे नाव प्रतीक रूपाने वापरण्यात आले असले तरी म्हणीमुळे ते जनमानसात अमर झाले आहे.

तीच गोष्ट रिन्द नदी व फतेहचंद सेठची! एकदा शहाजहान बादशहा आग्र्याहून फतेहपूरला जात होते. वाटेत म्हणे रिन्द रिन्द नामक एक नदी लागायची. तर फतेहचंद सेठ नावाच्या व्यक्तीने बादशहाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून त्या नदीवर पूल बांधायचे ठरविले. पूल तर बांधून झाला, मात्र मुसळधार पावसामुळे तो पूल कोसळला. त्यावेळी फतेहचंदने प्रतिज्ञा केली की काहीही होवो, पूल पुन्हा बांधायला लागला तरी चालेल, पण तो बांधेन तरच नावाचा फतेहचंद! आणि त्याने खरोखरी बादशहाच्या आगमनाअगोदर तो पूल पुनश्च बांधला. तेव्हापासून एक म्हण रूढ झाली, 'कै रिन्द रिन्द ही नहीं, कै फतेहचंद ही नहीं |' आणि आजही ही म्हण वापरण्यात येते.

समाजाची नैतिक जडणघडण, मानसिकता, स्थित्यंतरे, विचारधारा, आचार-व्यवहार या सर्वांचे प्रतिध्वनी आपल्याला म्हणींच्या रूपातून अभ्यासण्यास मिळतात. त्याचबरोबर त्यांची भाषा, शब्द, शैली हेही समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन देतात. म्हणी व त्यांमागील कथा हे एका प्रकारे कष्टकरी, श्रमिक जनतेने रचलेले साहित्य ग्रंथच होत. त्यांच्या रूपाने आपल्याला त्या त्या समाजाचे, व्यक्तींचे अनुभव संक्षिप्त रूपात ज्ञात होतात. हा त्यांच्या अनुभवांचा इतिहासच म्हणा ना! आणि त्या अनुभवाचे सौंदर्य वादातीत आहे.

--- अरुंधती कुलकर्णी

------------------------------------------------------------------------------------
ह्या लेखातील काही भाग येथे पूर्वप्रकाशित झाला आहे : http://mfda2011.blogspot.com/2011/10/mhaninchya-rajyat.html

माहिती स्रोत : आंतरजाल व म्हणींचे अर्थ सांगणारी पुस्तिका.

गुलमोहर: 

.

पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते.
अपेक्षित, दणदणीत आणि खणखणीत अशी सुरुवात खुप आवडली !

तुमच्या वरील (इतर लेखातल्या देखील) प्रत्येक शब्दामध्ये अस्सलपणा,सच्चेपणा जाणवतो !

Happy

ग्रामीण भागात अशा अनेक अस्सल म्हंणीमुळे (पगडा) तर अजुन थोडीफार संस्कृती ,सच्चेपणा,स्वाभिमान, चांगुलपणा,वाईटाला विरोध करण्याची,चांगल्याला साथ देण्याची वृत्ती या गोष्टी टिकुन आहेत अस म्हंटल्यास वावग होणार नाही

तुमच्या वरील (इतर लेखातल्या देखील) प्रत्येक शब्दामध्ये अस्सलपणा,सच्चेपणा जाणवतो ! >>> अनिल, अगदी माझ्या मनातलं बोललात ! Happy

'अरुंधती कुलकर्णी' म्हटले की कुठेही बेगडी अथवा भडक शब्दांचा आधार न घेता अतिशय संयमितपणे केलेल्या दर्जेदार लेखनाची खात्री ! म्हणुन त्यांचं लिखाण दिसलं की मी चक्क झडप घालुन वाचते. Happy

वेगवेगळ्या म्हणी आणि त्या मागिल कहाण्यांचे उत्तम संकलन. हा लेख नजरेतना निसटला कसा काय.
हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.

म्हणींचे जे रांगडेपण आहे, त्यांच्यात त्या त्या गोष्टीला कोणताही मुलामा न देता, लोकलाजेचा कसलाही मुलाहिजा न ठेवता थोडक्यात लोकांपुढे ठेवायचे जे कसब आहे, जो रोखठोकपणा आहे तो शब्दालंकारांनी नटलेल्या लांबलचक, पल्लेदार साहित्यात क्वचितच आढळेल! >>>

मस्त वाक्य!

त्याच्याहीपेक्षा म्हातारी वधू >>> Lol

वा, खुपच माहितीपुर्ण लेख होता. लेख लिहिण्यासाठी भरपुर कष्ट घेतेलेले दिसताहेत, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी. सहीच !

>>''अंधेर नगरी चौपट राजा'' या म्हणीचा हिंदी अवतार म्हणजे ''बेबूझ नगरी बेबूझ राजा.''
त्याची गोष्ट अशी : <<

एक होता राजा अश्या नावाचे एक डॉ. सरोजिनी बाबर यांचे पुस्तक आहे. यातील एका विभागाच्या उपविभागात म्हणींच्या कथा असे सापडते.
ती म्हण जी आहे न? 'अंधेर नगरी चौपट राजा' ती पूर्ण म्हण अशी आहे: अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भाजी टका शेर खाजा.
एक पैशाला शेरभर भाजी, अन एक पैशाला शेरभर मिठाई सुद्धा.

***
इतपत वाचून प्रतिसाद टंकिला आहे. पुढील वाचून पुढचा टाकतो Wink

@अरुंधती कुलकर्णी
तुमचा अभ्यास सुंदर आहे.
म्हणी अन वाक्प्रचार याबाबत मी कधीकाळी चिंतन केल ते असे:
या म्हणी वेदांप्रमाणेच अपौरुषेय आहेत. कुणी लिहिल्या? किंवा म्हटल्या? कधी स्फुरल्या? त्या कथा त्यांच्या भोवती कुणी विणल्या?? कसलाही डेटा उपलब्ध नाही. तरीही मानवी वागणूकीस, इतिहासास या चपखल बसतात. एका वाक्यात प्रचंड अक्कल शिकवून जातात. (वेद अन अपौरुषेय म्हटले म्हणून कृ. रागावू नये. 'उगम ठाऊक नाही, पण फार प्राचीन.' इतकाच अर्थ घ्या अन सोडून द्या.)
पण जेही असेल, Those sayings are inculcation of thousands of years of human experience. हजारो वर्षांच्या मानवी अनुभवांचेव सार. अन बर्‍याच म्हणी अती अश्लील 'साऊंड' करतात. करोत. तरीही ती वाक्ये अनेकानेक वर्षांच्या मानवी अनुभवाचे 'एक्स्प्रेशन' असतात हे ही तितकेच खरे.

***

म्हणींच्या गोष्टी रंजकच.
अमुक म्हण कुठून आली याबद्दल कुणास काही कथा ठाऊक असल्यास जरूर पोस्टाव्यात. वाचायला मजा येईल.