भाग्ययोग - सिल्व्हरबिल....
बहुतेक दोन - तीन वर्षापूर्वी असेल..... अशाच थंडीच्या काळात ऑफिसमधे या सिल्व्हरबिल महाशयांशी गाठ पडली.
माझ्या ऑफिसच्या बाहेरच छान लॉन, थोडी झाडे, झुडपे आहेत. मध्यम उंचीच्या मयूरपंखीच्या (मोर पंखी /थुजा ) झुडपात स्पॉटेड मुनिया, व्हाईट रम्प्ड मुनिया विणीच्या हंगामात कायम घरटी करण्यात मग्न असतात. चोचीत एखाद्या गवताचे पाते घेऊन जाताना फारच गंमतीशीर दिसतात हे मुनिया. हिरव्या गवताचे छान गोल गोल घरटे करतात हे. आसपास अॅशी, बुलबुल, चिमण्या, कावळे तर कधी धोबी (वॅगटेल), भारद्वाजही असतात.
(हा स्पॉटेड मुनिया - घरट्यासाठी गवत पाते घेउन जाण्याच्या गडबडीत)
ऑफिसमधे जाऊन बसतोय तोच ऑफिसबाहेरील झाडझूड करणारा मुलगा आला धावत धावत - एक निपचीत पडलेला पक्षी हातात घेऊन........ नुकतेच उडायला लागलेले एका पक्ष्याचे पिल्लू पाहून माझ्या लक्षात आले की बहुतेक थंडीने गारठून पडले असणार -झुडपाखाली... छाती मंद धपापत होती त्या चिमुकल्याची.. मनात म्हटले - चला, जिवंत तर आहे - मांजर, कावळे यांच्या तावडीतून सुटले म्हणजे याची आयुष्यरेषा नक्कीच बळकट दिसतीये...
याला उब (शेक) कशी द्यावी बरं - आमच्या ऑफिसमधील वॉशरुम्स मधे हँड ड्रायर (गरम हवेच्या झोताने हात वाळवणारे) असतात ते आठवले..... त्याला एकदम त्या ड्रायरच्या झोतात धरले तर चटका बसू शकेल - आता काय करावे ? शेजारील पेपर नॅपकिन्स (टिश्यू पेपर) होते त्यात त्याला गुंडाळून धरले त्या गरम झोताखाली - तो गरम झोत त्याला फार चटका देणार नाही - पण शेक देईल असा......
तेवढ्यात शेजारी माझे साहेब आलेले दिसले - "अरे, काय करतोस रे हे ?....."
मी तो टिश्यूत गुंडाळलेला पक्षी दाखवला व त्याला शेक देतोय हे सांगितले
"अरे, फारच चांगले काम करतोस की, चालू देत ........"
"हो, पण आता ९ ला मिटींग आहे तर काय करु मी ?"
"मिटींगचं मी बघतो - तू प्रथम त्या पक्ष्याकडे लक्ष दे - वाटलं तर मिटींग जरा पोस्ट पोन करीन मी......"
वा, साहेब असावा तर असा.... असे म्हणून (मनात) मी त्या पक्षाच्या हालचाली न्याहळत होतो- शेकणेही चालूच होते - चांगले १०-१२ मिनिटांच्या शेकणे - कार्यक्रमानंतर चिरंजीव माझ्या ओंजळीत स्वतःच्या पायावर बसू शकले.....
पण खूप थकलेले दिसत होते ते पिल्लू.....
आता याला खायला काय द्यावे बरे जेणेकरुन याच्या अंगात ताकद येईल थोडी.... उडण्या इतपत - स्वतःचा बचाव करु शकेल इतपत......
माझ्या लक्षात आले की पार्ले जीचा पॅक आहे बॅगमधे........ पण..... याक्षणी बिस्किट कसे खाऊ शकेल हे अशक्त बाळ ?
पाण्यात बिस्किट घालून बघू या झालं........
बिसलेरीच्या झाकणात बिस्किटाचा चुरा करुन टाकला आणि वर थोडे पाणी......
त्या चुर्यावर जे पाणी आले ते हळूहळू त्याच्या चोचीला लावले......
अतिशय थकल्यामुळे ते पिल्लू ते पाणी ओढूही शकत नव्हते.....
त्या पिल्लाला थोडे तिरके करुन मी त्याच्या चोचीत ते पाणी घालायचा प्रयत्न करु लागलो.
थोड्याशा प्रयत्नाने त्याच्या चोचीत थोडे पाणी गेले एकदाचे......
हुश्श..... आता नक्कीच उडू शकेल हे.....
परत परत मी ते पाणी त्याच्या चोचीत अगदी हळूहळू घालत होतो...
आणि आता मात्र त्याने जरा जरा पंख हलवायला सुरवात केली. त्याला उचलून उन्हात ठेवले व बिस्किटपाणी पाजणे चालू ठेवले.
हळूहळू त्याच्या अंगात हुशारी येऊ लागली, पंख थोडे थोडे फडफडू लागले.
मी विचार केला - एवढ्या जवळून एका पक्ष्याचा फोटो काढायची संधी मिळतीये तर चला.... ते ही उरकून घेउया.....
आता ते पिल्लू चांगलेच तरतरीत झाले. बागेतल्या एका झुडपावर ठेवताच ते उडायचाही प्रयत्न करु लागले व जराशा प्रयत्नातच उडूनही गेले....
मला इतके दिवस हे मुनियाचे पिल्लू वाटत होते - पण कांदापोहे यांनी नेमके सांगितले की हा तर - सिल्व्हरबिल -
http://www.maayboli.com/node/24654
मस्तच आणि आगळाच अनुभव,
मस्तच आणि आगळाच अनुभव, शशांकजी...
Pages