दिवाळी आली की उत्साह, सजावट, चकली-करंज्यांसोबतच आणखी एक आठवण येते.... लुटुपुटीच्या किल्ल्याची !
यंदाची दिवाळी भारताबाहेर मालदीवमध्ये साजरी करताना अर्थातच ह्या सगळ्याचीच उणीव चुटपुट लावत होती.
लेकाला दिवाळीच्या आठवणी सांगताना किल्ल्याबद्दल सांगत होते.
पण कधीच न पाहिलेल्या गोष्टीची कल्पना करायला त्याला काही जमेना.
मनात आलं , इथेच किल्ला बनवायचा प्रयत्न केला तर !
त्याच इच्छेतून साकार झाला आमचा किल्ला.
१. किल्लेबांधणीसाठी कच्चा माल.
इथे प्रवाळांची ( कोरल्सची ) बेटं असल्याने आणि सगळीकडे फक्त पांढरी वाळू असल्याने दगड-माती कुठून आणायची हा प्रश्न पडला. पण मग.......घरातल्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये आम्हाला किल्ल्याचे बुरुज दिसायला लागले.
२. घरातच किल्ला बनवायचा असल्याने भिंती खराब होऊ नयेत म्हणून कार्डबोर्डच्या खोक्याचा एक भाग कापून घेतला.
३. किल्ल्याच्या भिंती बांधण्यासाठी हार्डवेअरच्या दुकानातून " काहीतरी " मिळालं. ते काय होतं हे अजूनही आम्हाला कळलं नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे का ? असं विचारल्यावर " नू " ( म्हणजे - ' नाही') असं उत्तर मिळालं. ही पावडर इथले स्थानिक लोक घरं बांधताना वापरतात, एवढीच माहिती कशीबशी मिळाली.
आमच्या बाटल्यांच्या किल्ल्यावर हिरवळ उगवणं शक्यच नव्हतं. ती पावडरसुद्धा पांढरी होती. पण हिरवळीशिवाय किल्ल्याची कल्पना करवेना. मग पावडरमध्ये खायचा हिरवा रंग मिसळायचं ठरलं.
४. " काय करताय तरी काय तुम्ही ? बघू दे बरं मला ! "
५. कार्डबोर्डच्या कोपर्यात बाटल्यांची मांडणी करून त्याच्यावर हिरव्या पावडरचा लेप लावला. पण रंग लावून झाल्यावर तयार झालेलं प्रकरण पाहून आम्ही जरा हिरमुसलो. आम्हाला छान पोपटी-हिरवा रंग हवा होता. पण हा रंग तर शेणाने सारवल्यासारखा दिसत होता.
आमचा किल्ला बांधून व्हायच्या आधीच ( लेकाच्या कृपेने ) त्याच्यावर एक पूर्ण वाढीचं हिरवंगार नारळाचं झाड उगवलंय बरं का !
६. अजून थोड्या वेळाने तर आमच्या किल्ल्याने आणखीनच वेगळा रंग दाखवला. शेवटी दगडांचा आभास निर्माण करायला राखाडी रंग लावायला सुरूवात केली.
शिवाजीराजांना बसायला सिंहासन कशाचं करायचं ? 'स्क्वेअर बॉक्स' हवंय म्हटल्यावर लेकाने लगबगीने जाऊन म्हैसूर सँडल साबणाचं बॉक्स आणलं....आतला साबण बेघर झाला !
७. आणि हा आमचा किल्ल्ला !
८. शिवाजीराजांचे चित्र आंतरजालावरून घेतलं. आमच्या बेटावर प्रिंटिंगची मोजकीच दुकाने. त्यातल्या एकाकडे अगदी उत्साहात पेनड्राईव्ह घेऊन गेलो. त्याने फोटो पाहिला आणि आमच्याकडे जरा विचित्र नजरेने बघितलं. पण आमच्या ओळखीतला असल्याने त्याने फोटो प्रिंट केला.
मात्र शेवटी हळूच सांगितलं, " प्लीज डोण्ट टेल एनीबडी दॅट आय हॅव प्रिन्टेड धिस अॅण्ड प्लीज डोण्ट शो टु एनीवन. "
तो तसं म्हटल्यानंतर आमची ट्युब पेटली की आपण एका १००% मुस्लिम देशात खुलेआम शिवाजीराजांचा फोटो घेऊन फिरतोय !
सिंहासनाला लाल रंगाचं कापड चिकटवलं आणि राजे सिंहासनाधिष्ठित झाले.
९. भगव्या रंगाच्या क्राफ्ट पेपरचं ' स्वराज्य-तोरण ' बनवलं. बासरीच्या टोकावर चिकटवलं. आमचा भगवा ध्वज किल्ल्याच्या उंचीइतका झाला....पण हौसेपुढे प्रमाण आणि मोजमापांचं काय इतकं ?
आमच्या किल्ल्याला दार नाही...म्हणजे रात्र झाल्यामुळे ते बंद केलंय ना, म्हणून दिसत नाहीये.
आणि आमचा किल्ला ' मोबाईल ' आहे बरं का ! खोक्याच्या कोपर्यावर केल्याने आख्खा किल्ला उचलून इकडून तिकडे हलवता येतो.
भारतात असतो तर तुळशीबागेत फेरफटका मारून भरपूर मावळे, गवळणी आणल्या असत्या आणि किल्ला सजवला असता.
पण सध्यापुरतं एवढ्यानेसुद्धा खूप समाधान वाटलं !
.
मस्त झालाय किल्ला. भारीच हौस
मस्त झालाय किल्ला. भारीच हौस आणि उरक आहे तुम्हांला. पाण्याच्या बाटल्याही भारीच प्रिय दिसताहेत तुमच्याकडे. त्या बाटल्यांच्या कंपन्यांनी खरंतर तुम्हांला बक्षिस द्यायला हवं विविध उपयोग केल्याबद्दल
आरती, हो. पायर्यांसाठी
आरती, हो. पायर्यांसाठी सुद्धा पुठ्ठ्याचेच वेगवेगळ्या आकाराचे बॉक्स वापरले आहेत.
सायो,
खरंतर .....इथे पिण्यासाठी पावसाचं पाणी वापरावं लागतं. त्यातून वेगवेगळे आजार( विशेषतः टॉक्सोप्लास्मॉसिस) व्हायचा धोका असतो म्हणून रोजच्या वापराला मिनरल वॉटरच वापरतो.
रोज ४ माणसांना लागणारं पाणी आणि त्यासाठी वाया जाणार्या बाटल्या. (शिवाय त्या बाटल्या नंतर समुद्रकिनारी ड्म्प होतात :()
जीव तुटतो. मग त्यातली त्यात असं काहीतरी करत रहायचं. अर्थात हे काही प्रश्नावरचं उत्तर नाही...पण काहीतरी सदुपयोग केल्याचं समाधान.:)
खूपच छान!
खूपच छान!
मस्त झालाय किल्ला
मस्त झालाय किल्ला
खूप छान झालाय किल्ला. कसला
खूप छान झालाय किल्ला.
कसला उरक आहे तूला. पूढच्या वर्षी मी पण लेकी बरोबर करणार किल्ला.
रूणुझुणु, तुला आणि तुझ्या
रूणुझुणु, तुला आणि तुझ्या लेकाला __/\__
Pages