स्टीव आणि त्याचे 'बाबा'

Submitted by आशयगुणे on 16 October, 2011 - 17:23

सी.एस.टी वरून पनवेलला येणाऱ्या शेवटच्या लोकलने प्रवास करत होतो. मुंबईतल्या 'वारा खेळता असणाऱ्या' अश्या एकाच ठिकाणी - म्हणजे ट्रेनच्या दरवाज्यात उभा होतो!
ट्रेनच्या दरवाज्यात उभं राहून संगीत ऐकणं ही माझ्यासाठी उच्च-आनंदाची स्थिती आहे. आणि, 'i -pod ' shuffle स्थितीत असल्यामुळे, कानांना केव्हा कसली मेजवानी मिळेल काय सांगता येत नाही. आणि अचानक एका जुगलबंदीची 'रेकॉर्ड' सुरु झाली. ती जुगलबंदी होती विख्यात सरोदवादक उस्ताद अलिअक्बर खान आणि विख्यात सतारवादक विलायातखान ह्यांच्यात. मंदिराच्या गाभाऱ्यात 'ओम' म्हटलं की आवाज घुमतो तसा तो सरोद चा आवाज आणि मोत्यांची माळ सोडल्यावर जितके अलगद ते मोती त्यातून सांडतील तसा सतारीचा साज! आणि ह्या दिव्य सुरांना उस्ताद झाकीर हुसैन आणि अवतार सिंग ह्यांच्या तालाची गुंफण! खरच, ह्या सुरांच्या फुलांना तालाचे गुंफण बसले की पुष्पगुच्छासारखी मैफल पेश होते!
'क्या बात है' म्हणत म्हणत मी ऐकू लागलो. परंतु, 'तिलक- कामोद' रागाची ती रेकॉर्ड ऐकता ऐकता आठवण झाली एका वल्लीची! ती वल्ली म्हणजे स्टीव. स्टीव ह्या माणसाने ७० च्या दशकात झालेल्या ह्या मैफिलीत हजेरी लावली होती. तो होता 'स्टीव मिलर' - विख्यात सरोदवादक अलिअक्बर खान ह्यांचा शिष्य! मी अमेरिकेत असताना एक वर्ष आमची 'संगीत' ह्या धाग्यावर टिकलेली मैत्री होती.
२००७ साली ही रेकॉर्ड मी 'download ' केली. तेव्हा अमेरिकेत जाईन असं ठरवलं देखील नव्हतं. परंतु ३ वर्षांनी ह्या रेकॉर्डशी संबंधित असलेला ईसम मला भेटेल, त्याच्याशी चर्चा होईल, मैत्री होईल असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते! ह्याच स्टीवबद्दलच्या काही आठवणी इथे लिहाव्याश्या वाटल्या!

२०१० साली भारतातून परत अमेरिकेत गेलो. सुट्टीसाठी आलो होतो ना! मनात विचार आला संगीताशी निगडीत काहीतरी करावे. तीच तर माझी आवड आहे आणि त्या देशात ओळखी वाढवायचे एक साधन. भारतीय संगीत शिकवणारे कुणी माझ्या शहरात आहेत का ह्याचा शोध मी घेऊ लागलो. तर गुगल वर एक नाव आढळले. 'स्टीव मिलर', वाद्य: सरोद, इच्छुक व्यक्तींना गाणे सुद्धा शिकवून मिळेल! क्षणभर विश्वास बसेना......भारतीय संगीत आणि अमेरिकन नाव? पण क्षणभरच! कारण, रवी शंकर ह्या व्यक्तीमुळे आणि आता झाकीर हुसैन मुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे अनेक अमेरिकन शौकीन आहेत हे माझ्या ध्यानात आले! आणि त्वरित स्टीव ला
e -mail केलं. दोन दिवसात उत्तर आले. ' शनिवारी भेटूया का?' मी कशाला नाही म्हणतोय....ठरलं....आणि आम्ही शनिवारी त्याच्या घराच्या जवळ असलेल्या 'स्टारबक्स' मध्ये भेटायचे ठरवले. उत्सुक्तेपोटी मी अर्धा तास आधीच जाऊन पोचलो. त्याचे फोटो आणि video मी आधीच पाहून ठेवले होते. त्यावरून एवढे कळले की हा पठ्ठा अलिअक्बर खान ह्यांचा शिष्य आहे....आणि त्यांनी स्थापन केलेल्या 'अली अकबर कॉलेज ऑफ म्युसिक' मध्ये शिकला आहे. एवढे माझ्यासाठी पुरे होते. त्या कॉलेजबद्दल मला भरपूर माहिती होती आणि अलिअक्बर ह्यांची सरोद देखील मला आवडते. ह्या एवढ्या भांडवलावर मी 'interview ' ला जायच्या ऐटीत तयारी करून गेलो!
मी दाराशी उभा होतो. इतक्यात एक गाडी आली. एक बऱ्यापैकी उंच व्यक्तिमत्व त्यातून बाहेर पडले. हाफ पेंट आणि टी-शर्ट घातलेले आणि डोक्यावर टेक्सास ची टोपी. तब्बेतीने अगदी धष्ट-पुष्ट! दोघांनी एकमेकांना अगदी क्षणात ओळखले. मी त्याचे फोटो बघितले होते म्हणून आणि 'ह्या गोरयांमध्ये भारतीय दिसतोय तोच आशय' असं असेल म्हणून त्याने! आत बसलो आणि कॉफी मागायच्या आत संगीत हा विषय सुरु! किंबहुना, दोघांना कॉफीपेक्षा संगीताचेच व्यसन जास्त होते! प्रथम मी माझा परिचय करून दिला. मी अमेरिकेत कधी आलो...प्रथम कुठल्या शहरात होतो, इकडे कधी आलो....काय करतोय असे क्षुल्लक विषय झाल्यावर मी त्याच्याबद्दल विचारले. त्याचा परिचय ऐकून मात्र मला माझ्या देशाच्या शैक्षणिक परिस्थितीची आणि सामाजिक वस्तुस्थितीबद्दल कमालीची चीड आली! हा माणूस प्रथम 'mountaineering ' शिकायचे म्हणून नेपाळला गेला. तिकडे शिकता शिकता त्याला शेजारच्या भारतात जावेसे वाटले. कारण अमेरिकेत त्याकाळी भारताबद्दल आणि एकूण पूर्व-संस्कृती बद्दल कमालीची उत्सुकता आणि आस्था होती! (आजही आहे. जे भारतीय अमेरिकेत चांगले वागतात त्यांनी ती टिकवूनही ठेवली आहे! ) भारतात आल्यावर त्याच्या कानी भारतीय शास्त्रीय संगीत पडले आणि त्याने निर्णय घेतला- हेच शिकायचे! कुठे शिकायचे हा प्रश्न योगायोगाने सुटला. जवळ-जवळ तेव्हाच 'अलिअक्बर' ह्यांनी कॅलिफोर्निया मध्ये ते कॉलेज स्थापन केले. रवी शंकर, अलिअक्बर आणि अल्लारखा ( झाकीर चे वडील) ह्यांनी भारतीय संगीताचा झेंडा अमेरिकेत रोवला तेव्हाचा तो काळ होता! लगेच स्टीव ने गाडी मागे वळवली आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
स्टीव मग त्याच्या कॉलेजच्या वर्षांबद्दल सांगण्यात रमून गेला! साक्षात अलिअक्बर खान ह्यांच्या समोर बसून शिकायची संधी नियतीने त्याला दिली होती. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत होता सारखा. 'तुला सांगतो आशय, अलिअक्बर खान ह्यांना सगळे प्रेमाने बाबा म्हणायचो.....बाबांनी आम्हाला अनेक राग शिकवले...पण त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी आम्हाला खुलवणारी होती.आम्हाला साऱ्या स्वर-संगती समजल्या की नाही ह्याची काळजी ते घ्यायचे. आणि आम्ही काही विचारले की न रागावता उत्तर द्यायचे. पण ठरलेलं काहीच नसायचं....कधी म्हणायचे आज 'राग चंद्रनंदन' वाजवूया...ते वाजवायचे...आणि आम्ही त्यांच्या मागे-मागे!' मी हे अगदी आनंदाने ऐकत होतो. एकतर दूरदेशात कुणीतरी आपल्या संगीताबद्दल, आपल्या कलाकारांबद्दल बोलतंय हा आनंद....वर तोही एक अमेरिकन आहे ह्याने तो द्विगुणीत होत होता!
आणि अचानक स्टीवला एका मैफलीची आठवण झाली. ' आमच्या कॉलेजमध्ये विख्यात सतारवादक विलायात्खन आले होते....त्यांची बाबांबरोबर जुगलबंदी होणार होती. आम्हाला ह्याची हूरहूर आधीच लागली होती. आमच्या कॉलेजात कुणीतरी एक अफवा पसरवली....विलायत खान हे तबल्याला किशन महाराज ह्यांना घेऊन येणार आहेत आणि बाबा अल्लारखा( झाकीर चे वडील) ह्यांना तबल्याला बसवणार आहेत.......आमची तर झोप उडाली होती रे......एवढे मोठे वादक वर त्यांच्याबरोबर एवढ्यामोठ्या तबलावादकांची जुगलबंदी! आम्ही त्यादिवसाची उत्सुकतेने वाट बघत होतो! ( काय सुंदर अफवा होती ही.....अफवा उठवणारा किती रसिक असावा.....असा विचार मी करत होतो) पण ऐत्यावेळेला विलायत खान ह्यांनी अवतार सिंग हा तबलावादक आणला. बाबांनी देखील झाकीरला बोलावून घेतले! आणि जुगलबंदी काय रंगली ती! इथे स्टीवने त्या आठवणीत डोळे मिटले आणि माझ्याही डोळ्यासमोर माझ्या जन्माच्याही आधी झालेली मैफल आली! तो पुढे सांगू लागला, " दोघांनीही उत्कृष्ट वादन केले....पहिले पुरियाकल्याण ने सुरुवात झाली....नंतर यमन, मग बिहाग, मग तिलक कामोद...नंतर पिलू असे राग वाजवले! आणि शेवटची भैरवीची रागमाला तर काय उत्कृष्ट झाली.....४० मिंट चालू होती......आम्ही वेळ-काळ सोडून ऐकत बसलो होतो.....आम्ही नशीबवान रे...असा योग आमच्या आयुष्यात आला! विलायत खान हे घराण्याचा अभिमान तीव्रतेने मांडणारे होते....पण आमचे बाबादेखील कमी नव्हते...मी प्रथम बाबांना एवढे आक्रमक होताना पहिले होते तेव्हा! पण ही माणसे एवढी थोर.....बाबांनी तिलक-कामोद रागात एक अशी जागा घेतली की आमच्या आधी जर कुणी दाद दिली असेल तर ती विलायत खान ह्यांनी!
मी सुरुवातीला ज्या 'रेकॉर्ड' बद्दल लिहिले आहे ती हीच!
http://www.youtube.com/watch?v=m0oX6dy76Vw
नंतर इतर विषय निघाले. 'मी झाकीरला तो १० वर्षांचा होता तेव्हा ऐकलं' ह्या वाक्याने मला कमालीचा हेवा वाटला त्याचा! स्टीवने अनेक भारतीय कलाकार जवळून बघितले होते. त्यामुळे त्यांच्या आठवणीत तो रमून जात होता! 'एन राजम च्या वायोलिन च्या मागे आम्ही कसे वेडे होतो, इथपासून ५ तास चाललेली भीमसेन जोशींची मैफल...सारे काही त्याला आठवत होते. गायकांमध्ये आमच्या आवडीत एकमत झाले - भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व! आणि अचानक त्याचे गुरु, 'बाबा',अली अकबर खान ह्यांच्या निधनाचा विषय निघाला. आणि स्टीव ने सांगितलेली ती गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही.
" आशय, आम्हाला फार काळजी वाटत होती बाबांच्या तब्बेतीची. पण त्यांचे स्वास्थ्य दिवसेन-दिवस खालावत चालले होते. त्यांचे वय देखील कमी नव्हते...८६ होते! आणि ज्यादिवशी ते गेले त्या दिवशी त्यांनी काय केले माहिती आहे? त्यांच्या मुलाला हार्मोनियम आणायला सांगितली,सूर धरायला सांगितला आणि राग दुर्गा गायला सुरुवात केली! आणि गाऊन झाल्यावर थोड्यावेळाने बाबा आपल्याला सोडून गेले. कलाकाराची शेवटची इच्छा काय रे शेवटी....गायचे....प्राण जाईपर्यंत! मला कॅलिफोर्नियाला जायचे होते...पण माझ्या 'weak heart ' मुळे डॉक्टरांनी मला जायला मनाई केली. मी सारा दिवस रडून काढला!" आणि असं म्हणता म्हणता स्टीव माझ्यासमोर रडू लागला! शेजारचे लोक आमच्याकडे पाहत होते, पण त्याला त्याची परवा नव्हती. आपल्या गुरूबद्दल असलेल्या भक्तीमुळे आणि एका कलाकाराच्या आयुष्याचा अंत होत असलेला तो क्षण डोळ्यासमोर येऊन माझेही डोळे पाणावले!
" ह्यापुढे माझ्यासमोर बाबांचा विषय काढू नकोस रे.....I cannot control my tears ", असं हसत- हसत मला म्हणाला. नंतर मला माझ्या घरापर्यंत सोडलं आणि आपण 'टच' मध्ये राहूया अशी कबुली दिली.
नंतर मग आम्ही एकमेकांना 'फेसबुक' वर 'add 'केले आणि संगीताची देवाण-घेवाण सुरु झाली! त्याने काही चांगले ऐकले की तो मला द्यायचा, व तेच मी देखील करू लागलो. आणि थोड्याच दिवसात स्टीव हा 'कीर्तन' करतो हे कळले! त्याने लगेच मला त्या कीर्तनांना यायचे आमंत्रण दिले. ते कीर्तन मात्र एक विलक्षण अनुभव होता. एका 'योग शिकवणाऱ्या शाळेत' ह्यांचा अड्डा जमायचा....अजूनही जमतो. स्टीव हा अनेक स्तोत्र संगीतबद्ध करतो.....गणपतीची, सरस्वतीची, रामाची इ. त्यांना चाली मात्र पाश्चिमात्य पद्धतीने असतात. जमलेले सारे अमेरिकन लोक भक्तिभावाने गातात, हात जोडतात आणि आपल्या इथे टाळ्या वाजवतात तश्या ते देखील वाजवतात! कधी कधी उच्चार मात्र नको ते अर्थ घेऊन येतात.....जसं की....दुर्गे चं 'door gay ' होतं, सीताराम चं 'sita rum ' होतं! स्टीवला ह्याची जाणीव सुद्धा आहे. म्हणून मी त्याच्याबरोबर असताना त्याने मला लोकांचे उच्चार सुधारायला सांगितले होते. त्या लोकांबरोबर मी देखील गायलो. व तिथे माझी अमेरिकन संगीत वाजवणाऱ्या अनेक लोकांशी ओळख झाली, चर्चा झाली. एकूण खूप समाधानकारक अनुभव होता तो!
ह्यावर्षी जेव्हा भीमसेन जोशी ह्यांचे निधन झाले तेव्हा स्टीवने 'फेसबुक' वर लिहिले देखील होते - The World has lost a robust voice which will never be heard again. Fortunate to have heard that live in my life. त्यानंतरचे कीर्तन त्याने भीमसेन जोशींना अर्पण केले! मला मात्र सारखा एकंच विचार मनात यायचा....' अमेरिकन कलाकार, भारतीय संगीत, भारतीय भक्तीभाव'....अजब आहे रे हा माणूस!
जसं जसं आमचं बोलणं वाढत गेलं तेव्हा स्टीव हा हिंदू धर्माबद्दल किती श्रद्धाळू होता हे मला समजलं. गणेश चतुर्थीला गणपतीची भक्ती करायचा, नवरात्रीला दुर्गेची भजनं म्हणायचा, दिवाळीला 'विश' करायचा! त्याला भारताबद्दल फार आपुलकी होती ती ह्याच्यातून दिसून यायची! अजून देखील तो 'फेसबुक' वर हिंदू देव-देवीं बद्दल भक्तिभावाने लिहित असतो.
पण त्याचे भारताबद्दलचे प्रेम अजून एका गोष्टीत दिसून आले. आमच्या विद्यापीठाच्या संगीत विभागाने एका भारतीय सरोद वादकाचा कार्यक्रम आयोजित केलं होता. त्याचा प्रचार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी अर्थात पहिले मानाचे आमंत्रण स्टीवलाच दिले! त्याने देखील ते आनंदाने स्वीकारले. कार्यक्रम छान झाला. दुसऱ्यादिवशी स्टीवने त्या कलाकाराला आपल्या घरी नेले....त्याला जेऊ घातले...त्याच्याशी गप्पा मारल्या, घरी त्याची मैफल ठेवली आणि त्याला मानधन देखील दिले! आणि दुसऱ्या दिवशी आपण 'फेसबुक' वर फोटो टाकतो तसा त्याने देखील टाकला होता आणि - 'With an artist from India' असं त्याखाली लिहिले होते! आपल्याकडे 'पाश्चात्य' कलाकार आला की आपल्या इथली काही उत्साही पोरं कशी वागतील तसाच तो प्रकार होता!
एकदा असंच गमतीत त्याला म्हंटल, " काय उस्ताद स्टीव, कशे आहात?" त्वरित उत्तर आलं, " मला उस्ताद म्हणू नकोस आशय. माझ्यासाठी एकच उस्ताद .....आमचे बाबा." ह्यावरून त्याची भक्ती दिसून यायची!
अमेरिका सोडताना स्टीवला शेवटचा भेटायला गेलो! तेव्हा त्याने आवर्जून सांगितले होते. " आपण नशीबवान आहोत रे...आपल्याला भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायला मिळाले....जे ऐकत नाहीत त्यांची मला दया येते. खूप मोठ्या आनंदाला ते मुकत असतात. त्यांना आता कळणार नाही काही. पण जेव्हा शांती हवी-हवीशी वाटेल तेव्हा ते आपो-आप आपल्या संगीताकडे वळतील, आपल्या योग ( yoga ) कडे वळतील. शेवटी काय, जगाची सुरुवात ह्या कालांवरून झाली आहे....शेवटी वर्तुळ पूर्ण होण्यासाठी लोकं पुन्हा इकडे वळतील. तू मात्र आपल्या ह्या कलांना सोडू नकोस!"
अमेरिकन असूनसुद्धा ह्या कलांना 'आपलं' म्हणणारा स्टीव अजून माझ्या लक्षात आहे. त्याने सांगितलेलं अर्थात मी पाळतोय . म्हणूनच ती 'रेकॉर्ड' ऐकत असताना स्टीवची प्रकर्षाने आठवण झाली!

गुलमोहर: 

आशय, मित्रा काय प्रतिसाद देणार मी पामर......
डोळ्यातील अश्रुधारांपुढे काय लिहू शकणार....
ही सर्व दिग्गज कलाकार मंडळी, स्टीवसारखी त्यावर प्राण ओवाळून टाकणारी मंडळी.....
आणि हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचवणारा तू....सगळेच धन्य व वंदनीय....
आजचा दिवस धन्य झाला, बाकी काही लिहू ब बोलूही शकत नाही आता....

छान! वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्याचा सूर भिन्न संस्कृतीतील एखाद्या गोष्टीशी कसा जुळू शकतो त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण! हा एक प्रकारचा 'रेझोनन्स्'च की! पण प्रत्येकाच्या बाबतीत असे घडेल असे नाही. या शास्त्रीय संगिताच्या उगमस्थानीही हा आपला अमोल ठेवा आहे याची कितपत जाणिव सर्वसामान्यांमध्ये आहे? नव्या पिढीतील बहुतेकजण पाश्च्यात्य संगिताशीच ट्यून (रेझोनेट) झालेले दिसतात. हा नाविन्याच्या नैसर्गिक आवडीचा परिणाम कि शास्त्रीय संगिताकारांचे अपयश? सुगम व सिनेसंगिताच्या माध्यमातून मात्र हा ठेवा थोडा का होईना अनेक संगीतकारांनी जुन्या काळात लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला.

फारच सुरेख व्यक्तिचित्रण...धन्यवाद आम्हाला स्टीवला भेटवल्याबद्दल...खूप खूप आवडलं...
फक्त एक गोष्ट कळली नाही...

त्याचा परिचय ऐकून मात्र मला माझ्या देशाच्या शैक्षणिक परिस्थितीची आणि सामाजिक वस्तुस्थितीबद्दल कमालीची चीड आली!
हे वाक्य कशासंदर्भाने होते??

छान आहे लेखन. स्टीव ची गुरु भक्ती वाचुन माझ्याही डोळ्यात पाणी खळाळले. या मायबोलीवर माझ्या परीचयाचे सच्चे संगीताचे प्रेमी यांची संख्या वाढत आहे.
१) दाद
२) देव काका
३) आशय गुणे

हा लेख जरा बदलुन स्टीव आणि त्याच्या बाबांचा फोटो टाकुन वाढवा ना. नुसत्या शब्दांनी मजा येत नाही.

आशुचँप | 17 October, 2011 - 06:35 नवीन
फारच सुरेख व्यक्तिचित्रण...धन्यवाद आम्हाला स्टीवला भेटवल्याबद्दल...खूप खूप आवडलं...
फक्त एक गोष्ट कळली नाही...
त्याचा परिचय ऐकून मात्र मला माझ्या देशाच्या शैक्षणिक परिस्थितीची आणि सामाजिक वस्तुस्थितीबद्दल कमालीची चीड आली!
हे वाक्य कशासंदर्भाने होते??

>>
त्याला चीड ह्या गोष्टीची आली की आपल्या देशातिल तरुण तरुणींना इतक्या सहजपणे कोणतेही शिक्षण घेणे शक्यच नव्हते.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! आपल्याबरोबर संगीताच्या गप्पा मारायला मला नक्कीच आवडेल! माफ करा, मला 'स्टीव' चा फोटो नाही लावता येणार. अमेरिकन लोकं जरी मैत्रीने वागली तरीही त्यांची एकदम घनिष्ट मैत्री ज्यालोकांशी असते त्यांच्याच संपर्कात ते राहतात. माझे आणि स्टीवचे तसे नव्हते. मी अमेरिकेत अजून राहिलो असतो तर असं होऊ शकलं असतं! पण हा अनुभवच इतका चमत्कारिक होता की आपल्या सर्वांशी share करावासा वाटला! मी असे अनेक व्यक्ती जे मला भेटले, त्यांचे चित्रण करायचे ठरवले आहे. पुढे पुढे मायबोली वर ते येईल देखील. आशा करतो आपल्याला आवडेल! Happy