अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले)

Submitted by खालिद on 22 September, 2011 - 02:07

पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता. त्यावरचे वाक्य होते (COEP-All Men are Equal but Some are more equal). त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते. फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे. नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या "अ‍ॅनिमल फार्म " या पुस्तकातील "All animals are equal but some are more equal than others" या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले. त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते, आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो, तसे अर्धवट राहिले.

काल लायब्ररी मधे एक पुस्तक शोधताना Relevant Search मधे अ‍ॅनिमल फार्म दिसले. लगेच बैठक मारली आणि ३-४ तासात इनमिन १५० पानांचे पुस्तक संपवून टाकले. पुस्तक संपवले खरे, पण ऑर्वेल ने मनात जी बैठक मारली ती मारलीच वर लिहायलाही उद्युक्त केलय. बर्‍याच जणानी हे पुस्तक वाचले असेल, तरीही माझे हे दिन पैसे या पुस्तकाबद्दल.

जॉर्ज ऑर्वेल ने १९३७ साली लिहायला घेतलेले, पण १९४३ पर्यंत प्रकाशित न झालेले १५० पानांचे हे "अ‍ॅनिमल फार्म - अ फेअरी स्टोरी " नावाचे पुस्तक. सरळपणे बघायला गेल्यास, एखादी इसापनीती, हितोपदेश सारखी गोष्ट. पण एका छोट्या शेतावर राहणार्‍या प्राण्यांच्या जीवनात घडणारी ही गोष्ट वाचून संपल्यावर इतिहास, समाजजीवन, संस्कृती, मानव स्वभाव या इतर अनेक पैलूंवर प्रकाश टाकून आपल्याला स्वतःबद्दल आणि परिस्थितीबद्दल विचार करायला भाग पाडते.

मूळ कथा अगदी साधीसरळ. जोन्स नावाच्या एका शेतकर्‍याच्या शेतावर बैल, गायी, घोडे, डुकरे, कुत्रे, गाढव, कोंबड्या, मेंढ्या असे बरेच प्राणी राहत असतात. आपापले काम प्रामाणिक पणे करत असतात. पण मेजर म्हणून एक सर्वात वयस्कर डुक्कर ज्याला सर्व प्राणी फार मान देत असतात, त्याला सारखे वाटत असते की 'अरे, आपल्याला यातून काय मिळते? जेमतेम जगण्यापुरते खायला आणि राहायला. बाकी सर्व फायदा या मनुष्यांना. तर नाही, आपण यांची गुलामी आता नाही करायची.' तो सर्व प्राण्याना एकत्र करुन त्यांच्या मनात या पारतंत्र्या विरुद्ध लढायची प्रेरणा निर्माण करतो. तो मेल्यावर त्या कळपातील दोन हुशार डुकरे, नेपोलिअन आणि स्नोबॉल, त्याचा वारसा पुढे चालवताना जोडीने सर्व प्राण्याना लिहावाचायला शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरुन सुशिक्षित झालेले प्राणी नीट विचार करुन जागरुक होतील. काही प्राणी , जे चलाख असतात ते शिकतात , काहीजण नाहीत. पुढे एकदा जोन्स च्या चुकीने उपाशी राहायला लागते आणि तिथेच क्रांतीची ठिणगी पडते. सर्व प्राणी माणसांवर हल्ला करून त्यांना हाकलून लावतात आणि शेताचा ताबा घेतात. सर्व जणाना गुण्यागोविंदाने राहता यावे म्हणून कामे वाटून घेतली जातात. स्नोबॉल आणि नेपोलिअन सर्वात जास्त ज्ञानी असल्याने सर्व मॅनेजमेंट चे काम बघतात. घोडे शेतीकाम आणि ओझी वाहणे तर बाकी सर्व प्राणी आपापल्यानुसार ताकदीची कामे वाटून धेतात. सर्वांचे चांगले व्हावे, शांततेत सर्व कामे पार पडावी म्हणून सात नियमांची घटना लिहीली जाते.ती अशी

१. जे कोणी दोन पायांवर चालतील ते शत्रू
२. जे कोणी चार पायांवर चालतील किंवा ज्याना पंख आहेत ते मित्र.
३. कोणताही प्राणी माणसासारखे कपडे घालणार नाही.
४. कोणताही प्राणी माणसासारखा बिछान्यात झोपणार नाही.
५. कोणताही प्राणी दारु पिणार नाही.
६. कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याची हत्या करणार नाही.
७. सर्व प्राणी समान आहेत. (All animals are equal.)

अशाप्रकारे काही दिवस आनंदात जातात. पण जसा जसा काळ जायला लागतो तसतशी प्राण्यांमधे धुसफुशी सुरु होतात. आपणच शेताचे सर्वेसर्वा व्हावे असे काही प्राण्यांना वाटू लागते. राजकारण खेळले जाउ लागते. एकाएका जातीला हाताशी धरून दुसर्‍याचा काटा काढणे, इतर प्राण्यांची मने कलुषित करुन भांडणे लावून आपला स्वार्थ साधणे, सर्वांचे हित साधण्याचा देखावा करुन फक्त आपले आणि आपल्या बगल्बच्चांचे हित साधणे असे प्रकार होउ लागतात. आपल्या अकलेच्या जोरावर आणि फोडा आणि झोडा या तत्वाने डुकरे स्वतःला श्रेष्ठ घोषित करतात. त्यानंतर ते जपण्यासाठी नियमांमधे सोयीस्कर बदल करणे, इतराना तुच्छतेने वागवणे, सत्ता टिकवायला शेवटी माणसांबरोबरही हातमिळवणी करणे, विरोध करणार्‍याचा काटा काढणे अशा सर्व थरांना गोष्टी नेल्या जातात. मात्र एवढे करुनही सामान्य प्राण्याना 'तुमच्या भल्यासाठीच आम्ही हे करतोय' अशी भ्रामक समजूत करुन दिली जाते. सर्व आपल्या मनासारखे करण्यासाठी हे मूठ्भर प्राणी सर्व नियमांवर बोळा फिरवून शेवटी एकच नियम बनवतात की "all animal ara equal but some are more equal than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अ‍ॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.

दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात बेतलेली आणि मुख्यत्वे साम्यवाद (मार्क्सवाद) आणि त्याच्या तत्वावर टीका करुन त्यातला फोलपणा दाखवणारी ही कथा काल, आज आणि उद्याच्या देखील परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करते. कारण ऑर्वेल ची माणसाचा स्वभाब अचूक टिपण्याची हातोटी. आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेले सर्वात प्रभावी असे हे व्यक्तिचित्रण. साम्यवाद, कॅपिटॅलिझम, क्रांतीवाद, गांधीवाद, कोणताही वाद घ्या, किंवा कोणतेही तत्वज्ञान्/संस्कृती घ्या, तिच्या उदयाची, भरभराटीची कारणे आणि त्याछ बरोबर अस्ताचीही कारणे या छोट्याश्या गोष्टीच्या आधारे स्पष्ट करता येतात कारण सर्वांच्या मागे असलेली एकच मानवी स्वभावाची जडणघडण. सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी ही या सर्वांची मूलभूत प्रेरणा. मानवसमूहावर संकट आले की, ते कोणतेही असो, धर्माचा र्‍हास, परकीय आक्रमण असो, सर्व समूह आपल्या रक्षणासाठी एकत्र येतो. एखादा महान आत्मा त्या समाजाला नेतृत्व देतो, चांगल्या जगण्यासाठी तयार करतो. पण एकदा समाजात शांतता नांदू लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. महात्म्यांच्या विचारांच पराभव त्यांचेच अनुयायी म्हणून घेणार्‍यांकडूनच केला जातो. पुन्हा संघर्ष, नवी संस्कृती, नवे विचार. प्रवृत्ती तीच.

आजचे जगातले कोणतेही प्रश्न उदाहरणार्थ जातीवाद, वंशवाद, भूभागावरील संघर्ष हे सर्व आपण या कथेशी सहज जोडू शकतो. ते आपल्यावर आहे की कोणता प्रश्न आपल्या जीवनाशी जास्त निगडीत आहे. मग तो भ्रष्टाचार असेल, दैनंदिन गरजांची उणीव असेल अथवा देशभक्ती असेल. पूर्ण कथा वाचताना क्षणभर असे जाणवेल की अरे याचे कारण हेच आहे आणि उत्तर हे असेल. पुढच्याच क्षणी असे वाटेल की ते निसटून गेले. पुस्तक संपले की ते अस्वस्थ करतेच पण आपल्याला कारणे कळून पण बर्‍याच वेळा आपण काही करू शकत नाही याची चुटपूट ही लावते.

हे माझे दोन पैसे. ही सर्व माझी मते कुणालाही मूर्खपणाची , विचारजंती वाटू शकतात पण त्याला इलाज नाही. तो कथेचा दोष. कारण शेवटी "All men are equal, but nobdy is same" हेच खरे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप पूर्वी वाचलं होतं पण त्याने आजही फरक पडत नाही; कदाचित, आज "all animal ara equal but some are more equal than others" यात थोडा फरक करावा असं ऑर्वेलजीनाही वाटलं असतं-"all animal ara equal but some are undoubtedly genuine animals !
खालिदजी, पुस्तकाकडे पुन्हा लक्ष वेधलंत, त्याबद्दल धन्यवाद.

"all animal are equal but some are more equal than others" - किती कमी शब्दात जागतिक सत्य सांगितलंय ऑर्वेलसाहेबांनी ...... केवळ ग्रेट ...

सुंदर लेखन..

लेख आणि प्रतिसाद वाचनीय आहेत.

आजकाल (किंवा लेखक COEPत होते तेव्हाही) 'All animal are equal but some are more equal than others' हे वाक्य, त्यातला खवचटपणा पूर्ण दुर्लक्षित करून, उलटं मिरवायला वापरलं जातंय का?

पुस्तक वाचल्यापासून मी स्वतः नक्की कुठल्या गटात येते विचार करतेय. डुक्कर, कुत्रा, मेंढी, बॉक्सर, बेंजामिन, मॉली, मांजरी??? यापैकी कोणीही मला व्हायचं नाहीय...

> तो मेल्यावर त्या कळपातील दोन हुशार डुकरे, नेपोलिअन आणि स्नोबॉल, त्याचा वारसा पुढे चालवताना जोडीने सर्व प्राण्याना लिहावाचायला शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरुन सुशिक्षित झालेले प्राणी नीट विचार करुन जागरुक होतील. काही प्राणी , जे चलाख असतात ते शिकतात , काहीजण नाहीत. पुढे एकदा जोन्स च्या चुकीने उपाशी राहायला लागते आणि तिथेच क्रांतीची ठिणगी पडते. सर्व प्राणी माणसांवर हल्ला करून त्यांना हाकलून लावतात आणि शेताचा ताबा घेतात. सर्व जणाना गुण्यागोविंदाने राहता यावे म्हणून कामे वाटून घेतली जातात. > क्रम चुकलाय का घटनांचा?
१. मेजरचा मृत्यू
२. क्रांती
आणि मग
३. सर्वांसाठी शिक्षण

डॉ तुषार बापट यांनी मराठीत अनुवादित केलेले पुस्तक नुकतेच वाचले. सुनिधी पब्लिकेशनचे. मराठीत अनुवाद मी शोधत होतो तेवढ्यात हे पुस्तक मिळाले. https://suyashbookgallery.com/books/Book/5937/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%8...

१९८४ आणि अ‍ॅनिमल फार्म ही पुस्तके 'साम्यवादा'ला झोडपण्यासाठी लिहिली आहेत का खरेच हा प्रश्न पडू लागतो.
>> नाही ती समुहाचे मानसशास्त्र यावर जास्त टीका करतात. >>>> खरे आहे. उलट मी हे पुस्तक २००१ च्या अमेरिकतल्या ट्विन टॉवरवरच्या हल्ल्यानंतर वाचले होते. त्या वेळेस ज्या प्रकारचे एकुण जागतिक वातावरण झालेले… ते एकदम ते बिग ब्रदर, माइंड स्पिक वगैरेशी इतके साधर्म्य वाटलेले. आता फारसे आठवत नाही. परत वाचायला हवे आणि ह्या वेळेस त्या दुसर्‍या धाग्यावर कुणितरी सांगितलेल्या हाउ टू रिड बाय टीम स्पार्कच्या पद्धतीने वाचायला हवे.

Pages